टिकलीभर जागा

Submitted by दाद on 11 December, 2008 - 19:27

इतक्या दुपारचं कोण असेल बरं, असा विचार करीत वीणाने दार उघडलं. आणि तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वास बसेना.

अगदी क्षणभरच तिलाच झांज आल्यासारखं झालं. काही न बोलता ती दारातून बाजूला झाली.
’येऊ आत?’, दिलीपनी विचारलं.

मग मात्र ती भानावर आली. ’या नं. बसा. पंखा लावते’, आणि आत पाणी आणायला गेली.
ओट्याशी उभं राहून चार श्वास घेऊन स्वत: स्वत:ला सापडेपर्यंत तिनं बाहेरच्या खोलीत वाकूनही बघितलं नाही.
पाणी आणि गुळाची वाटी बाहेर घेऊन आली तेव्हा ती नेहमीची शांत, स्थिर वीणा झाली होती. पण दिवाणखान्यात येताच तीच थक्क झाली. दिलीपनी कोट काढून ठेवला होता आणि सोफ्यावर डोळे मिटून आडवे झाले होते.

नाही नाही म्हणताना नजरेने बरंच काही टिपलं. वयाच्या पन्नाशीलाही पिळदार शरीर, तसेच झावळाले केस, तशीच नीट राखलेली आता भुरकटली मिशी, तसाच व्यवस्थित कपड्यांचा, बूटांचा शौक, तोच कोलनचा मंद वास...

वीणाला घुसमटल्यासारखं झालं... आणि तिची चाहूल लागून दिलीप उठून बसले. समोरच्या ट्रेमध्ये पाण्यासोबत गुळाची वाटी बघून त्यांना हसूही तस्सच आलं... अगदी खर्जातलं... वीणाला वेडावणारं.... त्यावेळी.

पाणी पिता पिता त्यांनी दिवाणखाना निरखला. मोजकी सजावट पण डोळ्यांना सुखावणारी होती. फिरत फिरत नजर तिच्यावर स्थिर झाली. आधी संकोचून खाली गेलेली पापणी तिनं नेटानं उचलली आणि एखाद्या जुन्या कधीच्या शेजारातलं कुणी भेटलं तर असावं तितकाच उत्सुक तरी अंतर राखलेला भाव चेहर्‍यावर घेऊन ती बसून राहिली.
’बदलली नाहीस फारशी. केस तर, माझेच जास्तं पिकलेत. तीच फिक्कट रंगांची आवड, त्याच सवयी.... गूळ-पाणी...’

वीणा नुस्ती हसली. ’निशू घरी नाही. आज तिच्या नवीन जॉबचा इंटरव्ह्यू आहे.... तीनेक वाजे...’

’मला माहीत आहे. माझ्याच कंपनीत आहे तिचा इंटरव्ह्यू. आहे म्हणजे झाला सकाळीच. ऍप्लिकेशन आले तेव्हाच यार्दी बोलला होता मला, ह्या कॅंडिडेटमधे स्पार्क आहे. त्याला माहीत नाही... माझीच मुलगी ते. निवड झाली तर सांगू म्हटलं, सावकाश... आहे काय त्यात? घेतानाच ग्लोबल टीमची लीडर म्हणूनच घेतोय तिला. नाहीतर कोणत्यातरी भिक्कार कंपनीत अनुभव म्हणून प्रोजेक्ट इंप्लीमेंट करीत बसली असती. तिचा ऍप्लिकेशन बघितला आणि ठरवलं की हीच वेळ आहे, तिच्या आयुष्याला योग्य ते वळण द्यायची.
एव्हढी शिकलीये तर आता चार जास्त पैसे मिळवायला लागायला नको? अनुभव अनुभव काय... करत राहिलं की मिळतो. आत्ताच चांगल्या पोस्टवर घेतोय, मी आहे म्हणून होतय...’.
दिलीप वीणाच्या चेहर्‍यावरचे आश्चर्याचे भाव बघून पुढे म्हणाले, ’म्हणजे, तुला सांगितलं नाही तिने? कमाल आहे..... एका घरात रहाता आणि....’

वीणाला पुढचं ऐकू आलं नसतं तरी चाललं असतं. इतक्या वर्षांनंतरही तिला ते पाठ होतं. दिलीपचं तिरकं बोलणं. कितीही प्रयत्न केला तरी आपली नाराजी, तिला लपवता आली नाही. लपवण्याच्या प्रयत्नात ती अधिकच केविलवाणी झाली.

***************************************************
वीणाचं खरतर मागणी घालून केलेलं लग्नं. वीणाच्या आत्येबहिणीच्या लग्नात दिलीपच्या आई-वडिलांनी बघितलेली वीणाला. तिचं शांत, सोज्वळ तरी चैतन्यानं रसरसलेलं वावरणं बघून त्यांनी चौकशी केली. दिलीपना पसंत आहे आणि सगळं जुळतय म्हणताना मागणी घातलीही.
एकुलत्या एक दिलीपचा स्वभाव थोडा चिडचिडा, हेकेखोर, आढ्यताखोर होता. मागणी घातलीये म्हणजे आपण सगळ्यांनाच आवडलोय, खूप आवडलोय. आपल्याला सासरी स्थिर व्हायला वेळ लागणार नाही.... हे वीणाचं फक्तं स्वप्नच राहिलं.
अतीव आत्मकेंद्रित अशा दिलीप बरोबर तिची फक्त घुसमट होऊ लागली. आधी ’मी’, मग बाकी सगळं. ह्या त्याच्या हेक्याचा अनेकदा अतिरेक व्हायचा.

वीणाला दिलीप कळत गेले पण दिलीपला वीणाला समजून घ्यायची गरज भासली नाही. एक गोंडस मुलगी झाली तरी, स्वकेंद्रित दिलीपचा स्वभाव फारसा बदलला नाही.
लहान निशूच्या बाबतीतही, पैसे दिले की आपली जबाबदारी संपली हाच समज. मग वीणाचं गाणं, तिने घर-मूल संभाळत स्वत:हून पूर्ण केलेली गाण्यातली मास्टर्स डिग्री, ह्यातल्या कशातही त्यांचा काहीच सहभाग नसणं ही आश्चर्याची गोष्टं नव्हती. सासू-सासर्‍यांचा पाठिंबा, आई-वडिलांची मदत ह्यावर वीणानं जवळ जवळ बारा वर्षं घालवली त्या घरात. हळू हळू निशूचं सारखं फक्तं आई-आई करणं, खुद्द त्यांच्या आई-वडिलांनी वीणाला महत्व देणं, वीणाचे गाण्याचे उत्तम चाललेले क्लासेस, त्यामुळे शहरात आता तिला मिळू लागलेला मान.... ह्या सगळ्यातून कितीही दुर्लक्ष केलं तरी वीणानं सुंदररित्या विकसित केलेलं आपलं व्यक्तिमत्व, त्याची आभा दिलीपला एकटा असताना सुद्धा जाणवायला लागली.

मग सुरू झाला अनावश्यक अपमानाचा जीवघेणा खेळ. वेळोवेळी वीणाला जमेल तसं तिची पायरी दाखवत रहाणं ह्यातच एक आसुरी आनंद मिळू लागला. कधी तिच्या साधं रहाण्यावरून, तिच्या आवडी-निवडींवरून, तिच्या माहेरच्या गरिबीवरून, मुलगीच झाली म्हणून... काहीच नाही तर मग जेवण्यातल्या पदार्थांपासून ते बिछान्यावर तिच्या लांबसडक केसातला एखादा आढळला म्हणून... फक्तं चुकाच अन त्याही क्षुल्लक आणि शोधायच्या म्हणून शोधायचं म्हटल्यावर...
पावलोपावली वीणाला कोसायला, घटनांची कमी नव्हती, टोमणे, शिव्यांची कमी नव्हती, मुद्दाम ठरवून शोधलेल्या चार-चौघातल्या अपमानाच्या जागा आणि वेळा ह्यांची कमी नव्हती. निशूला ह्यापासून वाचवत, तिच्यापासून हे दडवत, निशूसाठी वीणा सगळं सहन करीत तरीही तिथेच राहिली....

***************************************************
पण का सांगितलं नसेल निशूने आपल्याला? बाबांच्या कंपनीत नोकरी धरतेय म्हणून? की ह्यांनीच तिला बोलावून घेतली? आधीच्या कंपनीत निशूचं काम इतकं वाखाणलं गेलं होतं की, एका इंटरनॅशनल कंपनीने तिला तसलाच प्रोजेक्ट अजून दोन देशांत राबवण्यासाठी वरच्या पोस्टवर, जास्त पगारावर बोलावलं. आपण म्हणत होतोच की, जा तू. इतकी चांगली संधी आहे. अशा संधी पुन्हा पुन्हा येत नसतात.
मी ही येईन चारेक महिन्यात क्लासेसचं जरा आवरून. तेव्हा म्हणाली होती की अजून एक संधी आहे म्हणून.... पण ’बाबांच्या कंपनीत’ हे नव्हती बोलली. काय आहे तिच्या मनात कोण जाणे.

आणि वीणाला चटका बसावा तसा एक संवाद आठवला. अगदी दोनच आठवड्यांपूर्वीचा. कोणतंतरी नाटक बघून आल्या होत्या दोघी. पलंगावर वीणाच्या मांडीवर आडवारून गप्पा चालल्या होत्या दोघींच्या.
तेव्हा निशूने विचारलं होतं, ’बदलले असतील का गं बाबा? माणसाने ठरवलं तर काय होणार नाही? बाबांची ’मी मी’ करायची सवय. सवय म्हणजे काय? परत परत केली की सवय. करायची थांबवली की सवय नाही. आहे काय त्यात?’

आता चौवीस वर्षांच्या आपल्या लेकीला अजूनही आपण एकत्र येऊ, इतर मुलांसारखं आपलंही एक पूर्ण घर असेल.... असं तुकड्या तुकड्यात, कप्प्या कप्प्यात रहावं लागणार नाही.... ह्याची अजून आशा वाटते आपल्या ह्या पिल्लाला... ह्याचं वीणाला मनस्वी वाईट वाटलं होतं. नेहमी प्रमाणे तिने शिताफीने ते होऊही शकतं आणि नाहीही असलं काहीतरी बोलून विषय बदलला होता. पण तिलाच समजावताना, दिलीप बदलणार्‍यातले नाहीत हे स्वीकारणं आपलं आपल्यालाच किती कठीण होतय ते तिचं तिलाच कळत होतं.

बाबांच्या कंपनीत नोकरी धरून आपल्याला एकत्र आणण्यासारखं काहीतरी घडवून आणण्याचा तिचा प्रयत्नं आहे की काय? वीणाला अगदी अस्वस्थ वाटू लागलं.

"कॉफी कर मस्तपैकी’, दिलीपनी मधली बारा तेरा वर्षं पार करीत नेहमीसारखी आज्ञा सोडली. वीणाला आश्चर्य वाटलं नाही. एका अक्षरानेही तिची किंवा निशूची मधल्या काळात चौकशी न केलेला हा माणूस आता आपण त्या घरचेच आहोत, सकाळीच बाहेर पडलो होतो, ते आत्ता घरात येतोय, ही आपली हक्काची बायको आहे, तिला हवी तशी हव्या त्या वेळी हव्या त्या कारणासाठी गृहीत धरायला हरकतच नाही..... ह्या अविर्भावात होता.

’आम्ही दोघी कॉफी घेत नाही त्यामुळे घरातली संपलीये. तुम्ही बसा. मला थोडी कामं आहेत. निशू येईल इतक्यात’, असं म्हणून दिलीपना बोलायचीही संधी न देता वीणा उठून आत गेलीही.

नाही... दिलीप बदलले नाहीयेत. हे वाक्य मनात नुस्तं उमटलं तरी वीणाला कुठेतरी सललं. आपण पोळलो. एकदा नाही, अनेकदा.
एकदा लग्न करून. मग घराबाहेर पडल्यानंतर सासू-सासर्‍यांनी, आई-वडिलांनी ’अगं लेकीसाठी तरी बघ अजून एकदा प्रयत्नं करून’ असं विनवलं तेव्हा....
त्यानंतरही सासूबाई खूप आजारी झाल्या तेव्हा त्यांच्या समाधानासाठीम्हणून....
प्रत्येकवेळी एकत्र रहाताना, तिची व्हायची ती परवड, मानहानी होतच राहिली. शेवटच्या दिवसांत सासूबाईंनी माफी मागून, ’जा तू हे सोडून... माझ्याच ओटीत खोट आहे. तुला काय म्हणून शिक्षा बाये? जा... सुखी रहा, निशूला संभाळ’, म्हणत तिला मोकळी केली होती. इतकं वाईट वाटलं होतं वीणाला. त्यांच्या निधनानंतर आप्पांसाठी म्हणून तिथेच नेट धरून राहिलेल्या वीणाला खूप काही ऐकून घ्यावं लागायचं.

एक दिवस... तिच्याकडे आलेल्या तिच्या विद्यार्थ्यांच्या समोर दिलीप एका क्षुल्लक गोष्टी वरून इतकं विक्षिप्तं वागला की... आप्पांनीही तिला परत जायला सांगितलं. त्यावेळी तिथेच उभ्या निशाच्या डोळ्यामधे तिच्या आत झालेली पडझड, उफाळून येणारी चीड, असहाय्यता बघून वीणा थिजली होती. ह्यातलं काहीही तिच्यासमोर घडायला नको होतं... पण ती काहीही करू शकली नाही.

प्रत्येकवेळी शक्य झालं तितकं तिनं निशूला ह्यातून वाचवायचा प्रयत्नं केला. तुझा बाबा स्वभावाने वाईट नाही, असतो एकेकाचा स्वभाव, आमचं पटत नाही, आणि तू आईकडे रहातेस ह्याचा अर्थ तुला वडील नाहीत असं नाही...
पण वयाने आणि समजेने वाढणार्‍या निशूला सगळं दिसत होतच की. तिचं तिलाच कळत होतं की आई कशी आपल्याला वाईट वाटू नये म्हणून जीवाचा आटापिटा करते, कधी कधी खोटंही बोलते. तीच प्रेझेंट आणून बाबांनी पाठवलं असं सांगायची हे निशूला माहीत होतंच की.

**************************************************
मग नक्की कसला अट्टाहास चाललाय तिचा? परवा तिच्या जुन्या ऑफिसमधले तिचे बॉस साने, त्यांना घेऊन आली जेवायला घरी. वर आणखी त्यांच्या बरोबर नाटकाला जा वगैरे सुरू केल्यावर मग समजावलं तिला. म्हटलं, त्या भानगडीतच पडायचंच नाहीये, आता. दिलीपचा विषय काढल्यावर आपण अजून कासावीस होतो हे तिच्या लक्षात आल्याशिवाय राहिलंय का?
ह्यावेळी ही वेडी पोर पोळून घेणारय असं दिसतय. कसं वाचवायचं हिला?
तुझा बाबा बदललेला नाही, तो बदलणार नाही, त्या बाबतीत आपण दोघी कमनशिबी आहोत, ज्या प्रेमावर जन्मसिद्ध हक्क असतो ते प्रेम तुझ्या नशिबी नाही. हे कसं पटवायचं? हे कोणत्या शब्दांत सांगितलं तर कमी दुखेल?

विचार करता करता, मन:स्तापाने वीणाचा चेहरा लाल झाला, डोळे चुरचुरायला लागले. बाथरूममध्ये जाऊन तिनं टिकली काढून आरशाच्या कडेला लावली. थंड पाण्याचे हबके चेहर्‍यावर मारले. मन शांत होत असतानाच, तिने चेहरा पुसला. बाहेर येतानाच तिला निशू आणि दिलीपचा आवाज ऐकू आला. दिलीपच्या काहीतरी बोलण्यावर निशूचा जोरात हसतानाचा आवाज ऐकून तिला कुठेतरी काळजात कळ उठल्यासारखही झालं.

चेहरा नेहमीचा हसरा ठेवत ती बाहेर आली.
’आई, सर... सर म्हणतायत की, कंपनीच्या क्वार्टरवर रहायला जाणार, ना? तशी अटच आहे नोकरीची. तुला काय वाटतं?’, निशूचा उत्साह निथळून वहात होता, चेहर्‍यावर.

’नोकरीसाठी आवश्यक ते कर गं सगळं. माझे क्लासेस सोडून कशी येऊ? पण आपण काहीतरी मार्ग काढू हं’, वीणाला होय-नाहीच्या मधलं उत्तर देताना फार त्रास झाला.

तिचं बोलून व्हायच्या आधीच दिलीप म्हणाले, ’तिला काय विचारतेस? लहान आहेस का तू आता? आय हॅव बिग प्लॅन्स फॉर यू! ह्या खुराड्यातून बाहेर पडायचय तुला. यू हॅव टू फ्लाय. हिला नाही कळायचं ते.. तेव्हढी कुवतच नाही...’

’इज दॅट true? रिअली? शुअर?’, अजूनही तितक्याच उत्साहात हसत हसत निशूने दिलीपला विचारलं.

’अरे, शुअर म्हणजे काय? काय समजलीस तू तुझ्या बापाला?’, दिलीपने सुरूवात केली पण तो पूर्णं करू शकला नाही.

’समजले काय? काय समजले?’, आत्तापर्यंत एक पाय वर दुमडून, कोचाच्या हाताला रेलून, सैलावून बसलेल्या निशाने सरळ बसत पुढे वाकून दिलीपच्या नजरेत नजर मिळवली. अत्यंत बेदरकार, थंड, सुरीसारखी ती नजर दिलीपच्या अंगातून शिरशिरी काढीत पायापर्यंत पोचली.

’बाप? कोण? कधीपासून? का? मिस्टर पोहनकर मला, निशा पोहनकरला फक्तं आई होती आणि आहे. मला माहीत नव्हतं की मला भेटायला माझे वडील आज येणारेत, ते. ही... हिने पढवत ठेवलं म्हणून मानत राहिले की, मला वडील आहेत. वेगळे आहेत इतरांच्या वडिलांपेक्षा. माझ्या वाढदिवसाला न का येईनात, मला तीनवेळा हॉस्पिटलमध्ये ठेवल्यावरही न का येईनात, आणि माझ्या शाळेच्या, कॉलेजच्या कार्यक्रमांना?......
आहेत! मलाही वडील आहेत. असणारच. एक जीव जन्माला घालायला दोन माणसं लागतात, तेव्हा...’

’निशू....’, थोडं जरबेच्या आणि थोडं दुखावल्या स्वरात वीणा ओरडली.

’ओरडू नकोस, आई. आज मी बोलले नाही तर... तर पुन्हा कधीच कधीच....’, लाल झालेले अंगार फेकणारे आपल्या लेकीचे डोळे बघून वीणाला कळून चुकलं की, आपल्याला वाटलं त्यापेक्षा कितीतरी खोल खोल घाव आहेत.... आणि आत्ता याक्षणी आपण काहीही करू शकत नाही.

’तेव्हा....’, थांबल्या जागेपासून सुरू करीत त्याच थंड, धारधार, शांत आवाजात निशा बोलत राहिली.
’तुम्हाला मुलगी होती का हो कधी? म्हणजे कधी होती? कधी झाली? कधी वाढली? कधी शाळेत गेली, कधी पडली-झडली? कधी रडली? जिंकली कधी? कधी हरली? डावखुरी आहे का हो तुमची मुलगी, तुमच्यासारखी? काय आवडतं तिला? नाटक की सिनेमा? गोड आवडतं की तिखट? तिच्या आईसारखं गाणं केलं का तिने? की अजून काही? का काहीच नाही? का नाही? पैसे पुरले असतील?...
मला वडील आहेत. आई म्हणते म्हणजे नक्की आहेत. माझा माझ्या आईवर विश्वास आहे. पण प्रश्नं तो नाहीये... बोला मिस्टर पोहनकर, तुम्हाला मुलगी होती का?’

’तुझं बरं करायला जातोय आणि वर तोंड करून मलाच....’, दिलीपने हलत्या स्वरात काहीतरी बोलायचा प्रयत्नं केला.

’सॉरी, पुन्हा बोला, जरा मोठ्याने... काय म्हणालात? माझं बरं? अगदी खरं खरं बोलताय? माझं बरं की आईचं वाईट?
मला नाही खरं वाटत.... कारण तसं असतं तर मला क्वार्टर्सवर रहाण्याची अट घातली नसतीत. आई तिथे येणार नाही हे माहितीये तुम्हाला. मला आईपासून तोडण्याचा हा पद्धतशीर प्रयत्नं आहे, तुमचा. अजूनही आईला या ना त्या प्रकारे धडा शिकवण्याचा किती केविलवाणा प्रयत्नं करताय! पथेटिक... ऍब्सोल्यूटली पथेटिक!... एखाद्याचं स्वकेंद्रित मन इतक्या थराला जाऊ शकतं?’, निशाने शहारा काढला.

’एक सांगा मिस्टर यार्दींना माहितीये? मी तुमची मुलगी आहे ते?’, निशाने सहज विचारल्यासारखा प्रश्नं टाकला.

’म्हणजे काय, सांगितलय मी त्याला... तुझी शप्प...’, दिलीप इतकं धादांत खोटं बोलले की, वीणाचेही डोळे विस्फारले.

’लायर.... खोटं. साफ खोटं. लाज नाही वाटत आपल्या मुलीची खोटी शप्पथ घ्यायला?’, निशाचा आवाज चढला होता. ’मिस्टर पोहनकर, मग यार्दींना हे माझ्याकडून ऐकल्यावर धक्का बसला नसता. माझी निवड झाली असती आणि मी कंपनीत नोकरी धरली असती तर कदाचित फुशारकी म्हणून सांगितलंही असतंत.... किंवा नसतंही.’

निशाने प्रयत्नपूर्वक आपला आवाज खाली आणला.
’दिलीप पोहनकर, जगात प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. एकाबाजूला नाण्याची किंमत आणि दुसयाबाजूला छाप. तुमच्या नाण्याला एकच बाजू आहे. "तुम्ही स्वत:"! दोन्ही बाजूला तुम्हीच.... असल्या नाण्याला किंमत नसते.... असलं नाणं .... असलं नाणं खोटं असतं. हे घ्या.’, तिने एक लिफाफा पुढे केला. ’तुमच्या कंपनीतली नोकरी मी स्विकारू शकत नसल्याचं पत्रं. यार्दी घाबरले, माझ्याकडून हे घ्यायला. घ्या.’

कपाळाला आठ्या घालीत दिलीपने उठून लिफाफा हातात घेतला.... वीणाकडे बघत अत्यंत घृणेच्या स्वरात म्हणाले, ’हलकट... माझ्या मुलीला माझ्या विरुद्ध फितवतेस... ह्या... ह्या... ज्या छपराखाली तुझ्या सगळ्या गमज्या चालल्यायत, ते माझ्या पैशाने उभंय... हरामखोर....’

वीणा संतापाने उभ्या जागी थरथरत होती, तिला बोलायचही सुचेना...
’स्टॉप इट... जस्ट शट अप.... बाबा... लाज वाटते लाज, तुम्हाला बाबा म्हणतानासुद्धा. माझ्या मनात जो काय आदर या क्षणापर्यंत तरी होता, तो हिने जोपासला, टिकवला, वाढवला म्हणून होता.... तेव्हढही तुम्हाला जपता आलं नाही?
तुम्ही नक्की विसरला असाल, आई विसरली की नाही माहीत नाही पण मी नाही विसरलेय... तिच्या विद्यार्थिनींसमोर, माझ्या समोर, आप्पाआजोबांसमोर तुम्ही तिची काढलेली सालं. कशावरून? तर तोंड धुताना टिकली काढून आरशाच्या कडेला लावायची तिची क्षुल्लक सवय. तशी एक टिकली तुम्हाला बाथरूमच्या आरशावर दिसली म्हणून... म्हणून तुम्ही सगळ्यांच्या समोर तिला, वाट्टेल तसं बोललात. तुमच्या बारातेरा वर्षाच्या मुलीसमोर, तिच्या अकलेचे, माहेरच्यांचे वाभाडे काढलेत.... शिव्यांसकट वाट्टेल ते भकलात....’

’नीट ऐका, मी काय सांगतेय ते.’, निशू दिलीपच्या जवळ जाऊन उभी राहिली.
’...तुम्ही ज्या जागेत उभे आहात, ती जागा तिने स्वत:च्या पैशाने घेतलीये. तुम्ही पोटगीचे म्हणून जे काही देत होतात ते तिने माझ्या अकांऊंटवर ठेवलेत... त्यातला पैही घरालाच काय पण घरात कशालाच वापरला गेला नाही. त्या सगळ्या पैशांचा चेकही त्या पाकिटात आहे.....
मनात आणलं तर याक्षणी तुम्ही उभे आहात ती जागाही, ती तिची टिकली लावायला मोकळी करू शकते....’

निशाने मग मागे वळून वीणाच्या खांद्यावर आपला थरथरणारा हात ठेवला., ’तुम्ही निघा आता, दिलीप’... वीणाने आपल्या लेकीच्या थरथरणार्‍या हातावर आपला हात ठेवला.

समाप्त

गुलमोहर: 

झणझणीत कथा.. छान फुलवली आहे.
आवडली.

मस्त! ती बापाला ऐकवते आणि तेथून कथा फिरते ते एकदम जबरी आहे!

सुरेख...... दाद! फारच आवडली.

दाद, तुझे नाव वाचले की कथा वाचल्याखेरीज पुढे जाववतच नाही. आजही तसेच..
कथा नेहमीप्रमाणेच मस्त.. निशुचा उद्रेक पटला.. अगदी मनापासून पटला. खुपच छान.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे...:)

Happy एका श्वासात वाचावी अशी कथा...!!!

दाद, नाव बघितल्यावर आधी वाचायला घेतली. मस्तच आहे कथा.

छान च लिहीले आहेस दाद....संवाद म्हणजे भाषा खुप छान वापरली आहेस्....आवडलं...

जबरदस्त.. मी ही श्वास रोखून वाचली.. आपल्या वडिलांसारखी स्वार्थी मुलगी नाही रंगवलीत,, छान,, पण मुली ऐवजी मुलगा ही असाच वागला असता?

मस्त.. खुप आवडली. तु छानच लिहीतेस, एका दमात वाचुन काढण्यासारखंच लिहीतेस.
खुप छान.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

दाद ... खुप छान कथा आहे... संवाद खुपच ताकदीचे आहेत विशेषतः बापलेकीचे.

पल्लवी
**********************
नजरेला काय हवी... स्वप्न थोडी जास्त !

ह्म्म! आवडली निशा झकास आहे एकदम परफेक्ट.
~~~~~~~~~

दाद! सुरेख व्यक्तिचित्रण. तिन्ही पात्र पर्फेक्ट उभी केलीस. कथा डोळ्यासमोर घडते Happy

दाद... मी तुझा फॅनच झालोय.... अप्रतिम कथा...!!!

जगात प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. एकाबाजूला नाण्याची किंमत आणि दुसयाबाजूला छाप. तुमच्या नाण्याला एकच बाजू आहे. "तुम्ही स्वत:"! दोन्ही बाजूला तुम्हीच.... असल्या नाण्याला किंमत नसते.... असलं नाणं .... असलं नाणं खोटं असतं.>> क्या बात है.. बहोत खुब. आवड्या..
- अनिलभाई

दाद, कथा आवडली. कथा डोळ्यासमोर घडते >> अगदी अगदी

दाद, सुरेख फुलवलीयस कथा. कथाबीज नवं नाही. पण अगदी मनापासून आवडली.

दाद,

अप्रतिम! मला असे वाटले माझीच कथा तुम्ही सादर केलीत! बारकावे अर्थात वेगळे! कथा मात्र तीच! आत्ता तरी एवढेच लिहू शकेन. संवाद आणि मनातले विचार - माय-लेकी दोघीन्चे अगदी सही! अगदी काळजाला भिडावेत असे!

अमी

काय मस्त लिहितेस गं तु दाद...... कथा आवडली.. Happy

मस्तच... एकदम आवडली

--
I’m not sure what’s wrong… But it’s probably your fault... Proud

सुंदर! खुप आवडलि. तिरसट आणि अहंकारि लोक सहसा बदलत नाहित. 'ते सगळे सुखासमाधानाने नांदु लागलेत' हे नेहमि चित्रपटात दाखवतात ते फारच हास्यास्पद वाटत मला नेहमि. खरा वाटावा असा शेवट केल्याबद्दल मनापासुन आभार.

पुन्हा तेच कौशल्य...
कथेतील पात्राच्या मनात घुसुन आत चाललेली विचारप्रक्रिया डिकोड करुन योग्य शब्दात मांडण्याच कौशल्य...
जबरदस्त.
Happy
सशक्त म्हणण्यापेक्षा मी म्हणेल शक्तिमान कथा. Happy

आज तुझी कथा, पुन्हा एकदा वाचली. खरंच सांगतो, खुप छान आहे.
प्रत्येकाने अगदी मनापासुन भरभरुन दाद दिलीय, आता वेगळं काय लिहु, पण खुप आवडली.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

दाद, खुपच सुंदर कथा....... फारच छान झालीये.

वीणा आणि दिलीपचं व्यक्तीचित्रण सुंदर झालंय.... पण निशूबद्दल अजून थोडंसं काहीतरी लिहायला हवं होतं असं म्या पामराचं मत... एखादा संवाद किंवा अजुन एखादाच प्रसंग, म्हणजे तिच्या मनातला नकारात्मक दिलीप अजून ठळकपणे उभा राह्यला हवा होता, पण असं केवळ माझं मत, तीट म्हटलंस तरी चालेल. Happy

दाद, नेहमीप्रमाणे सुरेख कथा आहे...अगदी डोळ्यासमोर घडत आहे असं वाटलं Happy

*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************

daad,

भाषाशैली नेहेमीप्रमाणे छानच आहे.. कथा मात्र "फार झटपट" आहे. डोळ्यासमोर पात्र आहेत अन त्यांचे संवाद अन थोडी पार्श्वभूमी. पण कथा "रुजत" नाही. तिनही पात्रांच्या भूमिका एखाद्या action thriller सारख्या समोरून सरकत राहतात.... टिकलीवरून घडलेला प्रसंग अन कथेचे शीर्षक टिकलीभर जागा यातला संबंध काय तो प्रस्थापित होतो आहे पण पात्र थोडी जास्त प्रस्थापित व्हायला हवीत अस वाटत.

असो. तुझ्या लेखणीकडून वेगळ्या (अधिक) अपेक्षा आहेत.. Happy

Pages

Back to top