अंजली देशपांडेची कथा

Submitted by दिनेश. on 6 December, 2010 - 06:26

माझा मोबाईल नंबर मी फ़ार कुणाला देत नाही, त्यामूळे तिने माझा नंबर माझ्या कुठल्यातरी मित्राकडून
मिळवला आला असावा. पण ते तिलाच विचारला आले असते, प्रत्यक्ष भेटीत.

तर असाच एका संध्याकाळी मला फोन आला. नावाची वगैरे खात्री करुन झाल्यावर, मला तिने भेटायची
इच्छा दाखवली. माझ्या कुठल्यातरी एका जून्या कथेबाबत तिला माझ्याशी बोलायचे होते. खरे तर मला
त्या कथेचे नाव अजिबात आठवत नव्हते, अंजली देशपांडेची कथा असेच ती म्हणाली.

मला नाही वाटत कि असे काहिसे नाव मी कुठल्याही कथेला दिले असेल. त्या काळात नूकत्याच कथा
वगैरे लिहायला सुरवात केली होती, पहिल्यांदा जसे सगळेच अनुकरण करत असतात, तसेच मीही त्या
काळात प्रसिद्ध हो असलेल्या "वामकुक्षी" टाईपच्या मासिकांतील कथांवर माझ्या कथा बेतत होतो.
"तिचे काय चूकले ?", "हा खेळ सावल्यांचा","राहिले दूर घर माझे" अशी काहिशी नावे असत कथांची.
तशा कथा अजूनही प्रसिद्ध होत असतील, पण मी आता त्या वाचायचे सोडून दिलेय. हिंदी फॉर्म्यूला
सिनेमाप्रमाणे त्या बर्‍याच प्रेडिक्टेबल असायच्या. पण माझी कथा, खास करुन तिचा शेवट बहुदा
वेगळा होता. अंजली देशपांडे हे नाव मात्र नक्किच होते, नायिकेचे.

अंजली देशपांडे, नाव अगदी ओळखीचे वाटतेय ना ? खरं तर तूमच्याही, ओळखीत एखादी अंजली
देशपांडे असणारच. पण खुपदा तिच्याविषयी खास असे काही नसते.

म्हणजे ती व्यवस्थित शिकते बिकते.ती गोरी असते, तिचे केस कुरळे असतात. दोन चार स्थळांनी
बघितल्यानंतर योग्य वयात तिचे लग्न होते. तिची मंगळागौर वगैरे व्यवस्थित पार पडते. तिची
सासू तिला जराशीच छळते. नणंद अधूनमधूनच टोमणे मारते. तिचे सातव्या महिन्यात ओटीभरणे
वगैरे होते. तिला दोन मूले होतात. एक मुलगा एक मुलगी. नोकरी करत असली तर ती मूलांसाठी
म्हणून सोडतेच. तिची मूले बर्‍यापैकी हुशार असतात, कारण ती त्यांचा मनापासून अभ्यास घेते.
तिची मूले स्कॉलरशिपच्या परिक्षेला बसतात. चित्रकलेच्या परिक्षेला बसतात आणि टिळक
विद्यापिठाच्या देखील. ती एकाच नवर्‍याबरोबर मरेस्तोवर संसार करते, नवरा कसाही असला तरी.
एकंदर संसारात ती खाऊन पिऊन सुखी असते.

कदाचित तूमच्या ओळखीच्या अंजली देशपांडेच्या बाबतीत काहितरी वेगळे घडले असेलही. म्हणजे
कदाचित तिला दोन्ही मुली झाल्या असतील, किंवा दोन्ही मुलगेच. कदाचित तिने नोकरी सोडलीही
नसेल. पण हेही तसे नॉर्मलच.

अरे हो सांगायचे राहिलेच, हे तिचे आडनाव सासरचे असते. माहेरचे आडनाव, केसातला सुकलेला गजरा जितक्या सहजतेने काढून फेकावा तसे तिने विसरलेले असते. फेकण्यापूर्वी बायका त्याचा हमखास वास घेतात, तसे तिचे मह क्षणभर हुळहुळले पण असते.

तिचे नाव मात्र तेच राहते, नाही म्हणायला तिच्या नवर्‍याने लग्नात ताम्हणातल्या तांदळावर. अंगठीने
काहितरी नाव लिहिलेले असते. तिला मुंडावळ्यांमूळे ते नीट दिसलेले नसते आणि ताम्हणातले तांदुळ
लग्न लावणार्‍या भटजीने, दुसऱ्या विधीसाठी भसकन उचलल्याने, ते नंतर कुणालाच आठवत नसते.
तिचा नवर्‍याने, काहि दिवस हळूच त्या नावाने हाक मारुन बघितलेली असते, पण तिला त्या नावाची
सवयच झालेली नसते. शेवटी वैतागून त्याने तिला अंजलीच म्हणायला सुरवात केलेली असते.
नाही म्हणायला त्याने तिला पहिल्यांदा अंजू म्हणून बघितलेले असते, पण बरं नाही दिसत
सगळ्य़ांसमोर, या सबबीखाली तिने ते टाळलेले असते.

तर अशाच कुणीतरी ओळखीतल्या अंजली देशपांडे वर माझी कथा बेतलेली असावी. त्या काळात
मी माझी कॉपी ठेवत नसल्याने, आता तिची भेट होण्यापूर्वी ति कथा परत वाचावी, हे शक्य नव्हते.
इतक्या वर्षाने असे काही घडेल असे वाटलेही नव्हते.

ठरलेल्या दिवशी, मी जहांगीरमधल्या समोव्हर मधे वाट बसलो होतो. तिची आतुरतेने वाट बघत
बसलो होतो, असे लिहिणे एकाचवेळी निर्लज्जपणाचे आणि खोटेपणाचे ठरेल. बायका सहसा दिलेली
वेळ पाळत नाही, म्हणून ती वेळेवर येईल अशी अपेक्षाच नव्हती. पण ती वेळेवरच नाही तर वेळेच्या
आधीच पाच मिनिटे आली. माझे फोटो वगैरे प्रसिद्ध झाल्याने तिने मला लगेचच ओळखले. मी जरी
दरवाज्याकडे तोंड करुन बसलेलो असलो, तरी आत येणार्‍या प्रत्येक बाईकडे रोखून पाहणे टाळत होतो.
कारण तसे बघितले तर बायकांना वरकरणी तरी आवडत नाही. म्हणून मी डोळ्यासमोर पुस्तक
धरले होते, तरीही येणार्‍या प्रत्येक बाईकडे बघतच होतो.

फोनवरच्या आवाजावरुन ती एक मध्यमवयीन बाई असावी असा माझा कयास होता.
पण तिने खरेच वाट बघायला लावली नाही, माझ्या मनात थोडिफार धाकधूक होती, कारण "तूमच्या
त्या अंजली देशपांडेची कथा माझ्याशी संबंधित आहे." असे काहिसे ती फोनवर बोलली होती. मी
खरेच काही वेडेवाकडे लिहिले होते का ते आठवत होतो, पण स्मरणशक्ती दगा देत होती. कथा जरी
वास्तवातल्या, सांगीवांगीच्या का होईना, घटनेवर आधारीत असल्या, तरी त्या व्यक्तीचा थेट संदर्भ वा
सूचन होणार नाही, अशी काळजी घेतली जातेच. मीही घेतली असणारच.

तर ती आलीच. आधी समोव्हर ते केवढे ? त्यात एकटा बसलेला माणूस म्हणजे मीच असणार ना?
तर ती सरळ माझ्याकडेच आली. "नमस्कार, बसलं तर चालेल ना ?" असे म्हणत ती बसली देखील.

"हो, हो बसा ना, काय मागवू ? " असे मी विचारल्यावर, "काहीही, तूम्हाला आवडेल ते." असे तिचे
उत्तर आल्यावर मी नेहमीप्रमाणे समोसा मागवला.

"हं तर बोला" मी सुरवात करुन दिली. मी तूमच्या कथांची चाहती आहे, मी तूमच्या बहुतेक सगळ्या
कथा वाचल्या आहेत वगैरे वगैरे प्रास्ताविक झाल्यावर ती मूळ मुद्यावर आली.

"खरे तर इतकी वर्षे झाली तरी तूमची ती कथा अजून लक्षात आहे, त्या कथेसंदर्भातच तूमच्याशी
बोलायचे होते. मला सांगाल का, कि ते सगळे एवढ्या डिटेल्समधे तूम्हाला कसे कळले ?" तिने
विचारले.

" काय असतं ना, कथेचं मूळ वगैरे असे काही सांगता येत नाही." मी सावध पवित्रा घेतला.

"ओह, सॉरी. तूम्हाला बोलायचे नाही का त्याविषयी ? मी तूमची इच्छा विचारलीच नव्हती" तिने
दिलगीरी व्यक्त केली.

"नाही नाही, तसे नाही पण कथा अशा पुर्णपणे वास्तव नसतात, थोडेफार तपशील पदरचे घातलेले
असतातच. पण आपण बोलू ना, बोलायला काहीच हरकत नाही. फक्त मला काय म्हणायचं होतं, कि
कथेतले सगळेच संदर्भ आणि उल्लेख काही खरे नसतात. " मी बाजू सावरुन घ्यायचा प्रयत्न केला.

"पण मी सांगते ना, या कथेतले ९० % तपशील वास्तव होते. मला तर असेही वाटले होते कि उरलेले
१० % तपशील हे केवळ संबंधित व्यक्ती दुखावल्या जाऊ नयेत म्हणून बदलून लिहिलेले असावेत. आणि
तूम्ही हि कथा, पूर्णपणे कलपनिक आहे, असे काहि लिहिले नव्हते." तिचा रोख आता माझ्या लक्षात
येऊ लागला होता.

"तूम्ही म्हणताय तसा उल्लेख सिनेमात वगैरे केलेला असतो. म्हणजे कुणाही जिवित वा मृत व्यक्तीशी
याचा संबंध नाही, आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा वगैरे वगैरे. कुठल्याही कथेखाली, मी
असे काही लिहिलेले बघितले नाही कधी. शिवाय काय असतं ना, कि कथेचा जीव असतो अगदी
छोटासा. त्यात येणारे पात्रांच्या जीवनातील तपशील आणि वर्णने, अगदीच त्रोटक. म्हणजे जितके
कथेसाठी आवश्यक असतात तितकेच. आता ते तपशील काय कुणाचाही आयूष्यातले असू शकतात,
जसे तूमच्या तसेच माझ्यादेखील." मी खुलासा केला.

"मी इतकी वर्षे हा सल मनात ठेवला होता, कि इतके सगळे डिटेल्स तूम्हाला कसे कळले म्हणून.
आणि तूमच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे एका धक्कादायक उल्लेखावर तूम्ही ती कथा संपवलीय, त्या
नंतर काय झाले असावे, याचा विचार वाचकांवरच सोपवला होता" तिने सहजपणे माझ्या कथांची
खासियत सांगितली होती.

"पण तूम्ही अजून हे नाही सांगितलेत की तूमच्याशी ती कथा कशी संबंधित होती ती." माझी
उत्सूकता लपत नव्हती.

"खरे तर तूम्ही लिहिले होते, ते अंजलीचे वर्णन अगदी बरोबर होते. रितसर शिक्षण, लग्न, मुलं
वगैरे अगदी तसेच, म्हणजे तपशीलात किरकोळ इकडे तिकडे असेल, पण बाकी सगळे वास्तव.
पण ज्या तर्‍हेने तूम्ही तिच्या नवर्‍याचे आणि नीता जोशीचे प्रेमप्रकरण रंगवले होते, ते जरा
अतिशयोक्तीचे होते." तिने मला आणखीनच गोंधळात टाकले.

"म्हणजे मी समजलो नाही, जरा आणखी डिटेल्स मधे सांगणार का ?अर्थात तूमची हरकत
नसेल तरच हं. मी जे लिहिले होते, ते बहुतांशी काल्पनिकच होते." मी माझी बाजू स्पष्ट करुन
टाकली.

"सुनीता जव्हेरीचे, नीता जोशी केलेत, एवढेच काल्पनिक. पण तरीहि तूम्हाला विचारायचे होते,
कि हे तपशील तूम्ही कसे भरता ? मला खरेच उत्सुकता आहे. अर्थात तूमची हरकत नसेल तरच
हं." ती माझा पिच्छा सोडायलाच तयार नव्हती.

मी जरा खाकरून घेतले."काय असतं ना, कुठलेही कथाबीज असे तूटकच असते. त्याचा विस्तार करावा
लागतो. त्यातल्या रिकाम्या जागा भराव्या लागतात. आम्हा लेखक मंडळींचा तो एक छंदच असतो,
खोड म्हणा हवं तर. आम्ही कायम कल्पना करत असतो. कि बाबा हि व्यक्ती, अमुक एका प्रसंगात
कशी वागेल, तिच्या तोंडी नेमके काय शब्द असतील. याचा विचार करता करता मग हळूहळू सगळे
सूचत जाते. जणु काही ते पात्र, स्वत:च्या तोंडाने आमच्या कानात कुजबुजून जाते. कधी कधी असे
वाटते कि कुणीतरी आपल्या हातून काहितरी लिहून घेतेय. हे खरे तर सांगण्याच्या पलिकडचे असते.
पण जे हातून लिहून होते, ते त्या पात्राच्या संदर्भात चपखल बसते." मी खरेच मनापासून खुलासा
करायचा प्रयत्न केला.

"तूम्ही म्हणाताय ते कळतेय मला पण पटत नाही. हे सगळे अतींद्रिय अनुभव बाजूला ठेवू या.
मला फक्त हेच म्हणायचे होते की, कदाचित तूमच्या वैयक्तीक अनुभवांचा वा विचारांचा परिणाम या
लेखनावर अवश्य होत असणार. नाही का ?" तिने बराचसा प्रॅक्टीकल व्ह्यू घेतला होता.आणि मला
जमिनीवर आणले होते.

तरीही मी न समजल्याचा आव आणला व म्हणालो "म्हणजे मी समजलो नाही."

"म्हणजे तूम्ही असा विचार करत असाल, कि त्या व्यक्तीचा जागी तूम्ही असता तर कसे वागला
असता, काय बोलला असता. किंवा त्या व्यक्तीने कसे वागावे, कसे बोलावे याचे आडाखे तूम्ही बांधत
असता, मला हे कबूल आहे, कि तूमचे आडाखे खूपदा वास्तवाच्या जवळ असतात. पण ते शेवटी
आडाखेच असतात, वास्तवाशी थोडीफ़ार फारकत झालेली असणारच." ती म्हणाली. आता मलाही
तिचे म्हणणे पटू लागले होते, पण तरी विचारलेच.

"पण त्या कथेचा शेवटाचे काय ? तो तर धक्कादायकच होता ना ? वास्तवातला शेवट तसा असण्याची
शक्यता खुपच कमी होती. मला आठवतय बराच वाद झाला होता त्या कथेवरुन." आता मला ती कथा
थोडी थोडी आठवू लागली होती.

"अहो शेवट धक्कादायक करणे हिच तर तूमची कला ना ? पण खरे सांगू ? इथेही मला तूमचा वैयक्तीक
दृष्टीकोनच दिसतो. म्हणजे मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे, आपल्याला खूपदा असे वाटते कि या प्रसंगी
आपण असे वागायला हवे होते, असे बोलायला हवे होते, पण माणसाच्या कमकुवतपणामूळे म्हणा वा
परिस्थितीच्या रेट्यामूळे म्हणा, तसे वागायचे बोलायचे धाडस आपल्याला होत नाही. म्हणजे एका अर्थाने
तूम्ही तूमच्या सुप्त इच्छा पात्रांवर लादता, असे नाही तूम्हाला वाटत ? तूमच्या कथेतील अंजली शेवटी
तिच्या नवर्‍याला काय म्हणते ? आजही ते शब्द माझ्या लक्षात आहेत. मी ते आजही तूम्हाला म्हणून
दाखवू शकते. ती म्हणाली होती, तूम्ही आणि तूमच्या ऑफिसमधली नीता जोशी या प्रकरणाबद्दल मला
सगळे समजले आहे. कदाचित ते "सगळे" नसेलही, पण जेवढे कळलेय तेवढे मला पुरेसे आहे. यात दोष
कुणाचा या वादात मला पडायचे नाही. कारण मला तशी त्याची गरजही वाटत नाही. आता यातून मार्ग
कसा काढायचा, याचाच विचार मी करते. तूम्ही नीतामधे काय बघितले वा ती तूमच्यावर का भाळली,
याचीही मला फिकीर नाही. शिवाय माझ्यात काय कमी आहे, हा विचारही माझ्या मनाला आता शिवत
नाही.
तो विचार आता शिवत नाही असे म्हणतेय कारण काही दिवस मीही, आपण नेमके कुठे कमी पडलो
याचाच विचार करत होते. मग मी स्वत:ला सिद्ध केले. अगदी ठरवून जाणून बूजून मी एका तरुणाला
भूलवले.
मी नेमकी कुठली पातळी गाठली, ते मी सांगणार नाही, पण एक सांगते फार सोपे होते ते मला.
त्यामूळे मला नीताबद्दल अजिबात ईर्षा वाटत नाही. यापुढे माझी वागणुक कशी असेल ते तूमची
वागणुक कशी असेल, यावर अवलंबून नसेल तर मला काय वाटते, यावर अवलंबून असेल. मी तूम्हाला
कुठलाच सवाल करणार नाही, आणि अर्थातच कुठलाच जबाब देणार नाही. " ती अगदी आवेशात येऊन
हे बोलली. तिचा आवेश बघून, आजूबाजूच्या काही नजरा आमच्याकडे वळल्या.

मी तिला हातानेच शांत रहायला सुचवले आणि पाण्याचा ग्लास पुढे केला. ती शांत झालीदेखील, पण
पुढे म्हणाली, "चूकलात हो लेखक महाशय. अंजली तसे नाही म्हणाली काही. तिला तसे वागावेसे वाटले
नाही. तिने तूमचे पूर्वग्रह साफ खोटे ठरवले. ती फक्त एवढेच म्हणाली, मला सगळे समजलेय, माझी
काहिही तक्रार नाही. मला उलट नीताची किवच येते कारण लग्नाच्या बायकोशी प्रतारणा करणारा माणूस
तिचाशी प्रामाणिक राहील, हा तिचा विश्वास फ़ार काळ टिकणार नाही." हे सांगताना तिचा स्वर फारच
दुखावला होता.

"आय अ‍ॅम रियली सॉरी, मला कल्पना नव्ह्ती, तूम्ही या सगळ्यातून गेला असाल. पण माझ्या कथेतील
नायिकेप्रमाणे, तूम्हीही तसा बोल्ड पवित्रा घ्यायला हवा होता, अंजलीताई." मी तिला समजावण्याचा
प्रयत्न केला.

"अंजलीताई ? म्हणजे मी अंजली वाटले तूम्हाला ? पूर्वग्रह, लेखक महाशय पूर्वग्रह. अजूनही तूम्ही
तूमच्या कल्पनेच्या विश्वातच वावरत आहात तर." तिने स्वत:ला सावरत विचारले.

"मग तूम्ही कोण आहात ? ती कथा तूमची आहेत, असे म्हणाला होतात ना ?" मी भित भित
विचारले.

"बघा, परत एककल्ली विचार करता आहात. हि कथा जितकी अंजलीची, तितकीच नीताची असे नाही
वाटत तूम्हाला ?" तिने मला पेचात टाकले.

समाप्त

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अरे वा, छान वाटलं सगळे प्रतिसाद बघून.
सीमा धबधब्याची कुठली ? आणखी काही आठवतेय का ? सापडतेय का ते बघतो.
माझ्या बाकीचा कथा अशा गुडी गुडी नव्हत्या. त्यांना कसा प्रतिसाद मिळतोय ते पण बघायला आवडेल.

दिनेश , मला आठवतय त्याप्रमाणे ती रुपक कथा असल्यासारखी होती.वेगवेगळे अर्थ काढलेले लोकांनी. काहीशी गुढ अशी होती. तरुण मुल पोहायला जातात धबधब्यावर पोहायला जातात आणि पुढे एकजण बुडु लागतो अशी काहीतरी.
आणखी फोन संवादावर आधारीत होती ती पण वेगळी होती एकदम कथा.

दिनेशदा, वेगळीच कथा आहे ही. खुपच आवडली. अंजली देशपांडे ह्या कॉमन नावाबरोबरची तिची कॉमन आयडेन्टिटी मस्त रेखाटलीत... "तिची मूले बर्‍यापैकी हुशार असतात, कारण ती त्यांचा मनापासून अभ्यास घेते." ही वस्तुस्थिती वाचून खुपच मजा वाटली. Proud
शेवटचे ते आपले गृहितक खोडून काढणारी नीता हा धक्काच होता... मस्तच लिहिता तुम्ही खुप...तुमच्या सगळ्या कथा वाचायची उत्सुकता आहे. लवकर सगळ्या प्रकाशित करा.

मला एक प्रश्न पडलाय कधीपासून... जुन्या मायबोलीवरचे लेखन पुनर्प्रकाशित करायचे म्हणजे काय? जुन्या मायबोलीवरची लिंक नाही देता येणार का? की पूर्वीच्या कथा पुसल्या गेल्या आहेत?

सानी, हे सगळे लेखन मायबोलीवर युनिकोड यायच्या पुर्वीचे आहे. त्या काळात आम्ही शिवाजी फॉन्ट्स वापरायचो किंवा डि इ व्ही टॅग वापरायचो. आता खुप जणांकडे ते फॉन्ट्स नसतील, त्यामूळे ते वाचता येणार नाही. या दोन्ही मूळ फॉर्म मधले लेखन इथे आणायचे तर सगळे नव्याने टाईप करावे लागते.

सीमा आभार, बघतो सापडतेय का ती.
संवादांच्या बर्‍याच कथा होत्या, काल निर्णय, सचिनचं स्वप्नं, इनकमिंग फ्री

<<(या कथेनंतर मला एका मायबोलीकराने, या कथेतली मूळ कथा पोष्टायची विनंती केली होती, अगा जी कधी लिहिलीच नाही ती काय पोष्टू ?)>>...........हे आधीच सांगितलंत ते बरं झालं, नाहीतर मी सुद्धा तुम्हाला तीच विनंती करणार होते.>>>> मी ही तेच सांगणार होते... अप्रतिम कथा

खूप आवडली... दिनेशदा. शेवट खरच वेगला आहे.
(एकच विनंती... इथे प्रकाशित झाल्यावर दीड वाक्याचाच परिच्छेद होतोय. वाक्यं अर्धवट तुटून पुढच्या ओळीवर जातय. तेव्हढं सुधारणार का?
इतक्या छान गोष्टीला हे सुद्धा गालबोट नको)

दिनेशदा,
कथा पुर्ण वाचली, आवडली !

ठरलेल्या दिवशी, मी जहांगीरमधल्या समोव्हर मधे वाट बसलो होतो.
हे नेमकं कुठे आलं ? भारतातच आहे का ?
Happy

दाद, ते परिच्छेदाचे जमत नाही. दोन वेगळ्या ठिकाणी दोन तर्‍हेने तूटताहेत.
योग, मला स्वतःलाच जागं करण्यासाठी या माझ्या आवडत्या कथा परत टाकतोय.
वर सीमा म्हणतेय, ती धबाबा तोय आदळे, एक रुपक कथा होती, हरवली आता..

अनिल, मुंबईला जहांगीर आर्ट गॅलरी आहे तिथे आतमधे एक छोटेसे रेस्टॉरंट आहे. तिथे कॉफी आणि समोसा मस्त मिळतो. आणि आतमधली सजावट पण छान आहे. (अजून असावे ते तिथे.)

आता या विषयावर आहोतच, तर महालक्ष्मी रेस कोर्स च्या आतमधे पण असेच एक ब्रिटिशकालीन सजावट असलेले एक रेस्टॉरंट आहे. ते इतक्या आत आहे, कि अनेकजणांना माहीतही नसेल, शिवाय रेस न खेळणारे कशाला आत जातील (मी नाही खेळत !!) पण ते मस्त आहे. ही दोन्ही रेस्टॉरंट्स मुंबईत आहेत हे खरे वाटू नये, एवढी छान आहेत.

दिनेश सुंदर आहे कथा. लिहीत जा की. समोवार माझे पण आवड्ते आहे. काळा घोडयाला महाराष्ट्र चेंबर मध्ये काम करत होते तेव्हा गेले होते. छोटी सी बात सिनेमात पण आहे.

मस्तं कथा.
खूप छान लिहिलीय.
आजकाल कथा लिहिणे का बंद केलंय तुम्ही?

Pages