पंचामृती मिरच्या (फोटोसहित)

Submitted by दिनेश. on 5 December, 2010 - 09:59
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

जाड्या बुटक्या ताज्या हिरव्या मिरच्या ३०,
तेल २ टेबलस्पून,
गोडा मसाला दिड टेबलस्पून,
जिरे १ टेबलस्पून,
पांढरे तीळ ३ टेबलस्पून,
हिंग १ टिस्पून,
हळद १ टिस्पून,
सूक्या खोबर्‍याचा किस ४ टेबलस्पून,
टॅमरिंड पल्प २ टेबलस्पून (किंवा चिंचेचा दाट कोळ अर्धा कप )
क्रंची पीनट बटर ३ टेबलस्पून (किंवा दाण्याचे कूट अर्धा कप )
बेदाणे अर्धा कप,
काजू अर्धा कप (वगळल्यास चालतील )
मीठ १ टिस्पून,
डिमेरारा (ब्राऊन) शुगर पाऊण कप (किंवा तेवढाच गूळ, बारीक करून किंवा साधी साखर )

क्रमवार पाककृती: 

पुर्वी आपल्याकडे मराठी लोकांत लग्नाच्या जेवणावळीत पंचामृत आवर्जून असे. त्या जेवणात (जिलेबी मठ्ठा, पुर्‍या, वांगी बटाटा भाजी, भजी, तोंडले भात, अळूचे फदफदे ईत्यादी.. ) हा प्रकार मस्तच लागत असे.
ह्या मिरच्या त्याच्याच प्रकार आहे पण, त्यामानाने कमी खटाटोपाचा. शिवाय दिसायला छान.

तर यासाठी,
मिरच्यांना एक उभी चिर देऊन, मीठ घातलेल्या थंड पाण्यात अर्धा तास बुडवून ठेवाव्या. मग निथळून घ्याव्यात. (असे केल्याने मिरच्यांचा तिखटपणा थोडा कमी होतो, पाण्यात नाही ठेवल्या तरी चालतील.)
तेलाची हिंग हळदीची फोडणी करुन त्यात जिरे टाकावे, ते फूलले कि तीळ टाकावेत व जरा परतावेत.
मग खोबरे घालून आणखी परतावे. गोडा मसाला टाकावा. (तूम्हाला हौस असेल आणि वेळ असेल तर हा मसाला थंड करुन प्रत्येक मिरचीत थोडा थोडा भरावा, पण तशी गरज नाही, मी केलेले नाही.)
मग त्यात मिरच्या घालाव्यात, जरा परतून दोन मिनिटे झाकण ठेवून जरा वाफ येऊ द्यावी.
मग त्यात चिंचेचा कोळ वा पल्प घालून कपभर पाणी घालावे. मग गूळ आणि बाकीचे घटक क्रमाने घालावे, हलक्या हाताने ढवळून झाकण न ठेवता मंद आचेवर शिजवावे.
तेल वेगळे दिसू लागेपर्यंत शिजवावे.
कुठल्याही मराठमोळ्या जेवणाबरोबर खाव्यात.
या मिरच्या आठवडाभर टिकतील.

वाढणी/प्रमाण: 
तीस भागिले खाण्यार्‍यांची क्षमता
अधिक टिपा: 

यात हवे तर बारिक चिरलेली कोथिंबीर घालता येईल, बारिक चिरुन तीळा बरोबर परतायची.
फोटो प्रतिसादात आहेत.

माहितीचा स्रोत: 
पारंपारीक पदार्थ आणि सध्या बाजारात उपलब्ध पदार्थ वापरुन केलेला प्रयोग.
आहार: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉ, याला तिखट म्हणायचं म्हणजे सलमान खानला शहाणा म्हणण्यासारखे आहे. नसते फारसे तिखट, मी खाऊ शकतो, म्हणजे नक्कीच नाही. (मूळात या मिरच्याच तिखट नसतात.)

हे फोटो, (मिरच्या शिजत असताना )

p mirachya 1.jpg

शिजून तेल वेगळे झाल्यावर

p mirachya 2.jpg

दिनेशदा छानच रेसीपी, फोटो पाहून तोंडाला आणि चवी च्या नुस्त्या कल्पनेने नाका-डोळ्याला पाणी सुटले !
आमच्याकडे कुळधर्माला, श्राद्ध्-पक्षाला पंचामृत मस्ट च असते. पण अश्या सबंध मिरच्या ठेवत नाहीत, तर फोडी करून घेतात, दाणे अर्धवट भरडून घेतात आणि स्लो कुकींग सारखं बराच वेळ शिजवतात.
आणि सकाळी केलेले पंचामृत संध्याकाळी शिल्लक राहीले की थंड भाताशी कालवून, सोबतीला लाल भोपळ्याची भाजी खाणे हा तर माझा वीक पॉईन्ट! असो !
अशी अगदी पारंपारीक रेसीपी देवून जून्या आठवणी जागृत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !

दिनेशदा, यम्मी दिसतायत मिरच्या... Happy

जाड्या, बुटक्या, ताज्या, हिरव्या, मिरच्या ३० <<< कित्ती ती विशेषण मिरची ला Lol

पंचामृत माझे अगदी फेवरेट. घरी पुण्याला गेले की आई कडे फर्माईश पण करायला लागत नाही.. जाते त्या दिवशी अगदी भटी जेवण असत... अळुच फदफद आणि पंचामृत मस्ट Happy

दिनेश,
पुढच्या भारतवारीत माझ्यासाठी घेऊन तरी या, किंवा इथे आल्यावर करून तरी द्या.
फारंच तोंपासु आहे हे.. Happy
स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प! Proud

दिनेशदा भन्नाट.
हा मिरच्यांचा प्रकार माझ्या खुप आवडीचा आहे. दिनेशदा फोटो बघुन तो.पा.सु.
आमच्याकडे कुठल्याही कार्यक्रमाच्या म्हणजे लग्न, साखरपुडा, गणपती, बाशाच्या जेवणात ह्या मिरच्या असतातच. आम्ही कधी कधी ओल खोबर पण घालतो सुक्या खोबर्‍या ऐवजी. आणि मला इतर वेळी करायचीही कधी कधी लहर येत. तेंव्हा मी शॉर्टकट मध्ये करते. मिरच्यांना चिर पाडून त्याला फोडणी देउन त्यात मिठ, गुळ, शेंगदाणाकुट, ओलखोबर, थोडी कोथिंबीर चिरुन घालते मग त्यावर कधी चिंचेचा कोळ तर कंटाळा आल्यास लिंबाचा रस टाकते.
आमच्याकडे ह्या मिरच्यांत खोबर्‍याबरोबर मेथीदाणेही भाजुन वाटतात थोडे. अजुन खमंगपणा येतो.

दक्षिणा, योगेश नक्कीच.
आपले असे सुंदर पदार्थ आता कुठल्याच हॉटेलमधे मिळत नाहीत.
जागू,
खरेच या कृतिबद्दल काहितरी शुभ / सात्विक वाटते. शुभ प्रसंगात हव्याच त्या.

मस्त वाटतेय. घरी सांगायला हवं.

पंचामृताबद्द्ल लिहिलयत तुम्ही. कालच घरी विषय निघाला होता, लग्नात पंगतीची जेवणं बंद झाली अणि पंचामृत देखिल. कुठल्याही लग्नात मी मागुन खायचो. माझं लग्न गावी झालं, त्यामुळे पंगत. मी पंचामृताचा आवर्जुन समावेश करायला लावला..

किती सुरेख दिसतय हे पंचामृत. माझ्या नवर्‍याने फोटो बघुन ह्या आठवड्यात करायला सांगीतल आहे.
माझ्या इथे भारतीय दुकानात ह्या मिरच्या मिळत नाहित. कॉस्टको मध्ये मिळतात पण त्या रंगित आहेत, त्याच पंचामृत छान लागेल का?

अनु ३, कुठल्याही कमी तिखट मिरच्यांचे करता येईल. गोडा मसाला मात्र आवश्यक आहे. तो नसेल तर धणे वगैरे वापरून ताजा मसाला केला तर चांगले.

अरे वा गोडा मसाला आहे (आईने ताजा बनवुन पाठवला आहे)
त्यामुळे अगदि सुरेख बनतिल. Happy
आता मिरच्या आणुन नक्की करुन बघेन.
धन्यवाद दिनेशदा..

मी अशा मिरच्या घेऊन आलेय. एवढ्या बुटक्या नाहीत लांब आहेत. पण वर तुम्ही लिहिलेल्या प्रमाणात साखर/ गूळ मला घालायचं नाहीये, तर चवीत फरक पडेल का?

सायो एवढी साखर चिंचेच्या आंबटपणाचा समतोल साधते. साखर कमी करायची असेल तर चिंच पण कमी करावी लागेल.

दिनेशदा,
मला ढब्बु मिरची इतकी आवडत नाही, म्हणुन हे वाचातला वेळ झाला...! Happy
(तरीपण बायको बनवते आणि मी ते दरवेळी खातोच...:डोमा: )

मस्त दिसते आहे करून बघीन. आज खूपशी नवीन भांडिकुंडी घेतलीत त्यांचे उद्घाटन Happy रविवारी करून ठेवले कि तीन चार दिवस बघायला नको.

Pages