सूकापूर, सुकापूर असे कंडक्टर ओरडला आणि मी तंद्रीतून जागा झालो. सामान आधीच पोहोचले होते.
त्यामूळे माझ्याजवळ आता फक्त एक बॅगच काय ती होती. घर शोधावे लागलेच नाही, रेडकर न्यायला
आलाच होते.
"येवा, येवा मास्तरानू, बरा असा मा ?" अगदी तोंडभरून स्वागत झाले. त्याच्या गावाला माझी बदली
झाली हे जणू त्याच्या ईच्छेप्रमाणेच झाले, असे त्याला वाटत होते.
प्रथमदर्शनी तरी गाव छान वाटले. तसे मुंबईपासून फार लांब नाही आणि गजबजाटही नाही. इथली
शाळापण अशीच असू दे, म्हणजे गावात निवांतपणे राहता येईल.
"चालत जाउचा का रिक्षा करुची मास्तरानू ?" रेडकराने विचारले.
"अरे रिक्षा कशाला ? जाऊ कि चालत. फार लांब नाही ना घर तूझे ?" मी विचारले.
"ह्यां काय, हयसरच तर हा. मास्तरानू घर तूमचा हां आता, माजा नाय काय" रेडकर म्हणाला
"अरे पण आपलं ठरलं होतं ना, की तू पण तिथेच रहायचे. भाडेकरु घरात आणि मालक घराबाहेर्,असे कसे होईल ?" मी क्षीण प्रयत्न करुन बघितला.
पण त्याने हे आधीच माझ्याकडून कबूल करुन घेतले होते कि मी त्याच्याच घरी राहणार.
कूठल्या जन्मीची साथ देत होते कुणास ठाऊक ? गेली १५ वर्षे माझे आणि त्याचे संबंध आहेत.
माणूस फटकळ खरा. त्या फटकळपणांत त्याच्या गावच्या मातीचा वाटा जास्त आहे, पण त्याच मातीतला जिव्हाळही काठोकाठ भरलेला. अर्ध्या रात्री त्याला हाक मारावी, आणि त्याने धावत यावे,
असा माणूस हा. आणि असे अर्ध्या रात्री हाक मारायचे प्रसंग माझ्यावर अनेकदा आले.
पाच मिनिटात येऊन पोहोचलो देखील. खरेच घर छान ऐसपैस होते. घर साफसूफ करुन घेतलेले दिसत होते. पाठवलेले सामान जागच्या जागी लावलेले दिसत होते. सैपाकघर पण टापटीप होते.
मोजकी भांडी जागच्याजागी लख्ख घासून ठेवली होती. मालतीच्या पेटीवर छानसे आच्छादन घातलेले होते. त्यावर तिचा फोटो नीट मांडून ठेवला होता.देव्हारापण नीट मांडून ठेवला होता. एखाद्या
बाईचा हात घरावरुन फिरल्याचे राहून राहून जाणवत होते. माझी बॅग ठेवून रेडकर मागच्या दारी गेले.
"शकल्या, गो शकल्या, बगलस कोन आयलत तां" त्याने हाक मारली.
एक तरतरीत मध्यमवयीन बाई सामोरी आली.
"मास्तरानू ह्या शकल्या. घरातला सगळां काम करतत. जेवनखान, पानी
सगळा बघतत. काय्येक काळजी नाय करुचा" रेडकराने ओळख करुन दिली.
रेडकराने माझी कुठलीही गैरसोय होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली होती. शकल्या म्हणजे
शकुंतला त्याची दूरची बहिण होती. मुकी होती. मलाही घरचे सगळे बघायला कुणीतरी हवेच होते.
इथल्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून आलो होतो. त्यामूळे जबाबदारी आणि काम दोन्ही वाढणार होते.
"मास्तरानू संभाळून घ्येवा. ह्या शकल्या हापमॅड नाय हां" रेडकर म्हणाला.
"अरे मी कुठे काय तक्रार करतोय ? मी पूर्ण दिवस शाळेतच असणार. आणि तिची कामातली सफाई
बघतोच आहे की. तिला काही सांगायची वेळ येणार नाही माझ्यावर. आणि हे बघ, आता मला मास्तर नको रे म्हणू, उगाचच म्हातारा झाल्यासारखे वाटते. अजून पन्नाशी नाही गाठली मी. सगळे बापट
सर म्हणतात, तसेच म्हण. नवीन गावात उगाच प्रख्यात करशील." मी उत्तरलो.
"तूमी मास्तरच हो, ता सर बिर काय आमका जमूचा नाय" रेड्कर सांगून ऐकणार नव्हता.
त्याच्या मास्तर या संबोधनाने माझा स्तर उगाच उंचावल्यासारखा वाटत होता. पण सर या संबोधनाला
त्याच्या आपुलकिची सर येणार नव्हती. पण रेडकराने माझा जणू ताबाच घेतला होता.
तसा काही लांबचा प्रवास नव्हता झाला पण अंघोळ करावीशी उठली. न्हाणीघरात गेलो तर
गरम पाणी काढूनच ठेवले होते. शकुंतलेला न सांगताच. न्हाणीघर छान ऐसपैस होते. कोकणातल्यासारखे. छप्पर नसलेले. आकाशाचा तूकडा सोबतीला होता.
शेवगा, केळी मायेची पाखर घालत होते. पाणी पण मला लागतं तेवढच गरम होतं. गरम नाही, गारही
नाही. निव्वळ उबदार.
शाळेत लवकरच रुळलो. अधिकार वाढले होते. सहकारी शिक्षकपण चांगले होते.
शकूंतला मनापासून जेवण करायची पण ते आमच्या पद्धतीप्रमाणे नसायचे. कधी कधी ठसकाच
लागायचा मला. अशावेळी तिचा जीव घाबराघुबरा व्हायचा. तिची काही चूक नाही, हे मी तिला
सांगत रहायचो. तिखट लागले तरी मुद्दाम आणखी मागून घ्यायचो. तिला वाईट वाटू नये म्हणून.
ती मुकी होती पण तिचे डोळे विलक्षण बोलके होते. जेवायला वाढलय, पाणी काढून ठेवलय, अशा
गोष्टी ती डोळ्यांनीच सांगत असे. किंवा मला तिच्या डोळ्यांची भाषा कळायला लागली होती, असे
म्हणणे जास्त संयुक्तीक होईल.
ती रोज माझ्यासाठी फूले काढून आणायची. मला तशी काही रोज पूजा वगैरे करायची सवय नव्ह्ती.
पण आयतीच तयारी करुन मिळत होती म्हणून मलाही ती करणे आवडू लागले होते.
ती मालतीच्या फोटोसमोरही फूले ठेवत असे. तिचा फोटो खालीच बॅगेवर ठेवला होता. तिच्या सगळ्या
साड्या, दागिने त्या बॅगेतच होते. कधी ती बॅग उघडून बघायची गरज वाटली नाही वा इच्छाही
झाली नाही.
एकदा असेच गंध उगाळत बसलो होतो तेवढ्यात बॅगेमागून एक छोटा विंचू बाहेर पडला. माझे लक्ष
गेले म्हणून बरे. पटकन सहाणेनेच ठेचला त्याला. शकूंतला तिथेच वावरत होती. तिने लगेच ते सगळे
साफ करुन टाकले. सहज विचार आला, तिला विंचू डसला असता तर. बिचारीला कण्हता पण
नसते आले. विंचवाच दंश काय भयानक यातना देतो, याची मला चांगलीच कल्पना होती. पुर्वी
प्रसाद मिळाला होता.
नवीन जागी आल्यावर वसुधाताईला पत्र लिहिले होतेच. तिचा लिप्ताळा मोठा. मोठं घर. चार दीर,
चार जावा, वयस्कर सासू आणि मूलाबाळांनी भरलेलं घर आहे तिचं. माझी स्मृती पण त्याच गोकुळात
वाढली. मालतीचं करताना, तिच्याकडे लक्ष देणं शक्यच नव्हतं मला.
ताईनेच प्रस्ताव ठेवला होता. म्हणाली होती, " आयशीचे हे रुप मुलीसमोर नको. माझ्या गोकुळांस
तिचा काही भार व्हायचा नाही. मालतीवैनी बरी झाली, कि देत्ये पाठवून हो..."
मालती कधी बरी झालीच नाही.... स्मृती तिथेच ताईकडे राहिली.
यथावकाश ताईचे पत्र आलेच. आता तिचे पत्र न उघडताच मला मजकूर समजत असे. आधी
असणार मायना. चिं सुहास यांस अनेक आशिर्वाद विशेष.. हसूच यायचे मला. आता चिरंजीव
लिहिण्याइतका मी काही लहान नव्हतो. आणि ताई तर माझ्यापेक्षा केवळ पाच मिनिटाने मोठी.
जूळे असलो तरी थोरलेपणाचा पुरेपूर मान घ्यायची.
हे मानपान केवळ रितीरिवाजात. मला कधी धडपणे तिचे माहेरपणही करता आले नव्हते कधी.
एकतर तिचे गाव सोडून तिला मुंबईला यायला व्हायचे नाही. शिवाय मालतीच्या आजारपणात कुणी
घरी येणेच नको वाटायचे.
पत्रात नेहमीप्रमाणे सगळ्यांची खुषाली होती. स्मृतीच्या प्रगतीचे कौतूक होते. पण महत्वाचे म्हणजे
घर बघायला म्हणून ती दोन दिवस रहायला येणार होती.
ताई येणार म्हणून रेडकर खुष झाला होता. ताईनेच त्याला सांगितले होते कि आम्ही बापट मूळ
मालवणचे. तिला तशी थोडीफार मालवणी येतही असे.
ठरल्याप्रमाणे ताई आली. बरेच सामान होते. म्हणजे तिचे स्वतःचे नाही, माझ्यासाठीच सगळे.
घरचे तांदूळ, कूळथाची पिठी, मेतकूट, मिरगुंड, पापड, लोणची, काळा मसाला, सांडगी मिरच्या.
मी म्हणालो " अगं ताई, मला आता वर्षभर बाजारहाट करायला नको. त्यावर ती म्हणाली, " आधी
तूझ्यासाठी काही भेटच देता यायची नाही बघ. कारण करुन कोण घालील तूला, असे वाटायचे.
आता शकूंतला आहे, तिला सगळे नीट दाखवून जाईन म्हणत्ये." तिने रेडकरांसाठी पण वेगळी
भेट आणली होती.
नेहमीप्रमाणे विषय निघालाच. "आता मालतीवैनी जाऊन पाच वर्षे झाली. किती दिवस असा
मूंजासारखा एकटा राहणार आहेस ? तूझ्या काळजीने रात्ररात्र डोळ्याला डोळा लागत नाही.
स्मृतीची काळजी सोड. माझीच लेक आहे ती आता... " असे म्हणत राहिली.
मी पण नेहमीप्रमाणेच आता का वय आहे नव्याने संसार मांडायचे. शाळेत भरपूर काम असते,
जबाबदारी वाढलीय, असे सांगत विषय टाळला.
तरी जाताना म्हणालीच, "माझे ऐकणार नाहिसच तू, आता यांना सवड झाली कि देत्ये पाठवून.
मग बरा ऐकशील."
रहायचा आग्रह केला, म्हणालो कधी नव्हे ते माहेरपण करता येईल. तर म्हणाली, एकवेळ मुलं
राहतील, पण भावोजींचे पान हलत नाही, माझ्याशिवाय. खरेही होते म्हणा ते.
ताईने शकूंतलेला बरेच कानमंत्र दिले होते वाटते. आता सैपाक आमच्या पद्धतीचा असायचा.
डावी उजवी बाजू नीट वाढलेली असायची. चार घास जास्तच जात होते. मला नीट जेवलेले बघून
शकूंतला पण निर्धास्त झाली होती. तशी तिच्या कामात नावं ठेवायला जागा नव्हती. काही सांगावेच
लागत नसे तिला.
संध्याकाळी मीच तिला लवकर घरी जायला सांगितले होते. नाहीतर माझे जेवण होईपर्यंत ती
वाट बघायची. तसे त्यांचे घर माझ्या घराच्या जरा मागे होते. परसात एक त्यांचीच विहित होती.
त्या विहिरितून एक कळशी पाणी, ती जाताना नेत असे, मी शाळेतून येताना, ती मला नेहमी
घरी जाताना दिसत असे. हसून ती मला निरोप देत असे. त्यात नेहमी, सर्व करुन ठेवलय,
जर गरम करुन घ्या, उरलेलं झाकून ठेवा, ताट वाटी तसंच ठेवा, मी सकाळी घासून टाकेन,
असे सर्व निरोप मला सहज वाचता येत.
तिचे डोळे एखाद्या हरिणीप्रमाणे विलक्षण बोलके होते. मुकी माणसे निदान तोंडाने अं अं असा
आवाज काढतात. पण तिच्या तोंडातून तसले आवाज आलेले मी ऐकले नहईत. पण तिचे कान
आणि डोळे मात्र अतिसंवेदनशील होते.
परिक्षेचे दिवस जवळ आल्याने मला यायला उशीर व्हायचा. अशीच एकदा शाळेतून येताना ती
लगबगीने जाताना दिसली. घामाने निथळत होती. बहुतेक तिलाही घरी जायला उशीर झाला होता.
ती गेल्यावर मी वळून बघितले आणि तेवढ्यात पाय शेणात पडला. तो थंड गिळगिळीत स्पर्ष
अगदी नकोसा वाटला मला. तसाच मागच्या दाराने न्हाणीघरात शिरलो आणि थंडगार पाण्याने
अंघोळ केली. रात्री कशालातरी आलेला रेडकर म्हणाला देखील, "मास्तरानू निस्ता पाय तर
घाणीत पडलांव, न्हायलत खेकां ? " त्याला काय सांगणार ?
मधेच माझे जरा मुंबईत काम निघाले. रेडकरला पण माझ्याबरोबर यायचे होते. पावसाचे दिवस
होते. मुंबईत पोहोचेपर्यत दुपार झाली, माझे काम आटपले. रेडकर हिंदु कॉलनीत कुणालातरी
भेटायला गेला होता. तिथल्या पोष्टाबाहेर भेटायचे आमचे ठरले होते. मी आधीच जाऊन उभा राहिलो.
पाऊस पडतच होता. सहज समोर बघितलं तर एक फुलांनी डवरलेला कदंब होता. पावसात सुस्नात
न्हायलेला. केशरी पिवळे गेंद जागोजाग लगडले होते. त्याचा हळुवार गंध आसमंतात भरुन राहिला
होता. अनेक काव्यांचा विषय झालेला कदंब. सहज गुणगुणू लागलो,
दहका हुआ ये अंगारा, फूल गेंदवा कहलाये है
जहा कही गिरे पापी, वही आग लग जाये रे
अंग अंग मेरा जल जाये, और जलके कहे
फूल गेंदवा ना मारो मैका...
त्यातूनच आठवले मालतीसाठी कधीकाळी गायलेले गाणे
कदंबतरूला बांधून दोला
उंच खालती झोले
परस्परांना दिले घेतले
गेले ते दिन गेले
आठवलं तिच्या झोपाळ्यावरच्या डोहाळे जेवणाच्या वेळी गायलो होतो. ताई खट्याळपणे
म्हणाली होती. येतील हो ते झुलायचे दिवस परत, थोडी कळ काढ.
पण ते दिवस परत कधी आलेच नाहीत. स्मृतीच्या वेळीच मालती आजारी पडली. ताईने लगेच
स्मृतीला तिच्या घरी नेले. अनेक उपाय झाले पण निदानच झाले नाही. तिची उजवी बाजूच लूळी
पडली. सर्वच दूसर्याला करावे लागे. ते दिवस माझ्या कसोटीचे होते. एक नाही, दोन नाही
तब्बल बारा वर्षे ती अंथरुणावर पडून होती.
पहिल्यांदा पहिल्यांदा तिच्या डोळ्यात मला लाज दिसायची. पण पुढे पुढे डोळ्यांत काही भावही
उमटत नसत. डोळाही बंद होत नसे. पण तिची निर्जीव नजर माझ्यावर रोखलेली आहे असे
मला वाटत असे. तिचे सारे संभाळून शाळेत शिकवणे मला फार जड जात असे त्यावेळी रेडकर
त्यावेळी रेडकर बोलावल्यासारखा धावून आला. माझ्याच शाळेत कामाला होता. कधी कधी अपरात्री पण त्याला बोलवावे लागत असे. मी बायकोचे सगळे करतो, याचे त्याला अप्रूप वाटत असे. सगळीकडे तो माझ्या निष्ठेबद्दल सांगत रहायचा. तिला तिच्या माहेरी टेवायचा पण विचार केला होता, पण
त्यांनी तयारी दाखवली नाही.
कोणी सांगेल तो उपाय करत होतो. रेडकर पण मॉलिशसाठी कसलीकसली तेले आणून द्यायचा.
घोरपडीचे तेल पण आणून दिले होते. त्याचा उग्र घाण वास घरभर असायचा. तिला मॉलिश
करताना माझेच हात निर्जीव होउन गेले होते. सगळ्या जाणीवा मेल्या होत्या. सगळेच कळाहीन
उदास झाले होते. सेवाभाव, कर्त्यव्यभावनाही उरली नव्हती. तोंडात घातलेले पाणी गिळले तर
तेच जिवंतपणाचे लक्षण समजायचे, एकदा तोंडात घातलेले पाणी, तसेच बाहेर आले, तेंव्हा शंका
आली. खोटे कशाला बोलू, आनंद झाला.
सर्व म्हणाले सरांनी बारा वर्षे निष्ठेने सेवा केली. पुण्यवान माणूस. ईश्वर त्यांना कधी काही कमी
पडू देणार नाही. नावाने अंघोळ करताना खूप मोकळे मोकळे वाटले. मोकळेपणी श्वास घेणे शक्य
झाले. घरभर रेंगाळणारा तेलाचा उग्र वास सहन करण्याच्या पलिकडे गेला होता, माझ्या..
"काय मास्तरांनू, काय बघतां " रेडकरच्या प्रश्नांने भानावर आलो.
"काहि नाही, हा कदंब बघतोय. कसला मोहोरलाय बघा तरी, आपल्याकडे लावायला हवा." मी म्हणालो
"ह्या कसलां कदम. ह्या तर निव. होया तूमका लोणचं घालूक, बरां लागता." रेडकर म्हणाला.
"रेडकर तूझ्या नजरेत खायच्या कामाला येणारे तेच करे झाड. शाळेतल्या मुलांनी गुलाबाचा
गुच्छ दिला तर म्हणालाय, हे कसले गुलाब. गावठी दिले असते तर गुलकंद तरी केला असता."
मी म्हणालो.
" होय तर" तो अजून त्याच्या मतावर ठाम होता.
माहित होते तरी मी सहज विचारले, "लग्न का नाही केले ?"
" बायलीक पोरां हुईत नसली तर काय चुलीत घालूची तिला. एक नाय दोन केलांनी, मगे काय
वासनाच नाय रवली." त्याने सहज सांगितले.
पुढे म्हणाला "५० कलमां आणि १०० माड असात. पोफळींची तर मोजदादच नाय केलानी हा.
पोरींचे बापूस येतात हो पण आता माकाच नाय करुचा. ह्या शकल्यास एकदा उजवलांनी, कि
झालां "
दादरला मी तिचासाठी साड्या घेतल्या. रेडकर म्हणालाच कि कशाला उगाच ? पगार तर
देत आहात. मी म्हणालो, पावसाळ्याचे दिवस आहेत, साड्या वाळत नसतील तिच्या.
सुकापूरला उतरल्यावर रेडकर जरा वेगळ्या वाटेने घरी घेवून आले. वाटेत लालसर पानांचे
एक वेगळेच झाड दिसले. बरेच वाढले होते, पण फळे फुले काही दिसत नव्हते. आणि असे
फळे फुले न येणारे झाड, रेडकराच्या जमिनीवर असावे, याचे मला नवलच वाटले. मी विचारलेच
त्याला.
"मास्तरांनू ह्या मव. आता नाय बगूचा. जरा फूलां येवूक होया तेका, मगे बगा कसा खूळावता नि
लोकांक खूळवतलां तो. " रेडकर म्हणाला.
म्हणजे हे मोहाचे झाड तर. मी आधी कधी बघितलेच नव्हते, का कुणास ठाऊक, ते झाड चांगलेच लक्षात राहिले माझ्या.
आताशा सकाळी गावात एक फेरी मारायची सवय लावून घेतली होती. सगळी घडी छान बसली
होती आता. मला वाटते खूपच लवकर उठलो होतो त्या दिवशी. घड्याळ न बघताच बाहेर पडलो.
चिमणचेटक्याचे गारुड झाले होते बहुतेक माझ्यावर. नेहमीची पायाखालची वाट सोडून जरा
लांबची वाट धरली. वाटेत ते मोहाचे झाड लागले, खरे तर त्याच्य त्या गंधाने मी त्याच्याकडे
खेचला गेलो होतो. फटफटलेही होते. झाड चांगलेच मोहरले होते. झाडाखाली काही फूले पडली
होती. बहुतेक लोकांनी गोळा करुन नेलेली दिसत होती. तिथेच शकूंतला दिसली. तिने पण
टोपलीभर फुले गोळा केली होती. माझ्यासमोर तिने टोपली धरली. मलाही ती फुले कशी
दिसतात ते बघायचेच होते.
बोटभर देठ, टपोरा आकार, पिंगट तपकिरी रंगाचा पुष्पकोष, नीट बघितले तर जाणवले कि
ती तपकिरी रंगाची मखमाली लव होती फक्त. त्याखालचा रंग हिरवागार होता, त्या आड दडलेल्या
पांढर्या मांसल पाकळ्या, दिसतील न दिसतील अशा. पण आतल्या पुंकेसराना आत न लपवणार्या. आतल्या स्त्रीकेसराना उरी लपवून ठेवणार्या. ए़क बांकदार पु़केसर बाहेर डोकावणारा, बघत रहावे असे ते रुप होते.
आणि तो गंध काय वर्णावा ? ओंजळभरुन फुले नाकाशी नेली. श्वास त्या दिव्य गंधाने भरुन घेतला.
स्वर्गीय, अप्रतिम, अतुलनीय असा तो गंध.
शिजणार्या आंबेमोहोर तांदळात कस्तुरीची चिमूट सोडल्यासारखा.
मोहवणारा, मोहक, मोह, महुआ,
मधुका लाँगफोलिया..
शकु तशीच ताटकळत उभी होती.
सुंदर!!!
सुंदर!!!
अतिशय सुंदर कथा.... मोहाच्या
अतिशय सुंदर कथा....
मोहाच्या झाडाचे वर्णन तर अप्रतिम...
दिनेशदा कसे असते मोहाचे झाड आणि फुले, मी कधी बघितले नाही ... वर्णन वाचून कसे असेल याचाच विचार करते...
दिनेशदा, सुंदर लेख ! माझ्या
दिनेशदा,
सुंदर लेख !
माझ्या विपुच,प्रश्नाचं उत्तर देखील आपोआप मिळालं
हे वाचुन , मला आता मोहाचे झाड आणि फुले बघायची आहेत
आता एवढ्यातच मायबोलीवर
आता एवढ्यातच मायबोलीवर मोहाच्या झाडाचे आणि फुलांचे फोटो आले होते.
कुणाला जर खरेच फिल्म करायची असेल, तर मी लोकेशन्स सुद्धा दाखवू शकेन, एवढा हा परिसर माझ्या बघण्यातला आहे.
आणि हि कथा सुचायला ते मोहाचे झाडच कारणीभूत झाले होते.
दिनेशदा...लिप्ताळा हा शब्द
दिनेशदा...लिप्ताळा हा शब्द पहिल्यांदाच ऐकला....काय ओघ आहे हो लिखाणाला या! गुंतून पडायला होतं...आणि यात निसर्गाची वर्णनं इतकी सहज येऊन जातात...मस्त शैली आहे..शेवटचा परिच्छेद तर काय वर्णावा...असेच भेटत रहा लेखनाच्या माध्यमातून
खुपच छान फार पुर्वी मारुती
खुपच छान
फार पुर्वी मारुती चितमपल्लींची मोहाचे झाड गोष्ट वाचलेली, ती पुर्णपणे वेगळी होती पण आठवण झाली.
सुंदर वर्णन, खुप आवडली कथा.
सुंदर वर्णन, खुप आवडली कथा.
सुंदर शैली....
सुंदर शैली....
छान.. लिहिलेली प्रत्येक ओळ
छान.. लिहिलेली प्रत्येक ओळ डोळ्यासमोर उभी राहीली. कथे इतकीच किंबहुना थोडी जास्त अशी तुमची लिहीण्याची शैली आवडली.
लिप्ताळा म्हणजे आपल्याला
लिप्ताळा म्हणजे आपल्याला चिकटून असलेला गोतावळा........ ( चिकटलेले जळू )..... माझ्या आईच्या बोलण्यात हा शब्द बर्याचदा येतो.
दिनेशदा खुपच आवडली कथा. अजुन
दिनेशदा खुपच आवडली कथा. अजुन येउद्यात अशा कथा, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा.
दिनेशदा कथा पुन्हा
दिनेशदा कथा पुन्हा टाकल्याबद्दल धन्यवाद! नाहीतर एका छान अनुभवास मुकलो असतो. अहो ही कथा नव्हे एक सुंदर पोर्ट्रेट काढलेत की. पुढचा भाग लिहाना. उत्सुकता वाढलीय.
दिनेशदा, आताच ही कथा वाचली.
दिनेशदा, आताच ही कथा वाचली. तुमची लेखनशैली सुद्धा त्या मोहाच्या फुलासारखीच आहे हो! त्या लेखात पार बुडून जायला होते. लेख संपूच नये असे वाटते. !
सुदंर कथा....गाव डोळ्यासमोर
सुदंर कथा....गाव डोळ्यासमोर उभा राहीला.... मोहाच्या फुलाचे छान वर्णन... फुल कधि पाहिले नाहि पण हे वर्णन वाचल्यावर ते फुल पाहण्याची उत्कंठा मात्र वाढली ...... दिनेशदा, ह्या फुलाचे फोटो टाकता येतील का?
छान
छान
सुंदर कथा.
सुंदर कथा.
दिनेशदा, मस्त आहे कथा.
दिनेशदा, मस्त आहे कथा.
दिनेशदा खुप आवडली कथा.
दिनेशदा खुप आवडली कथा. धन्यवाद.
कथेतील सर्वच मनाला भावणारे
कथेतील सर्वच मनाला भावणारे
हळूवार कथा आहे .... आवडली
हळूवार कथा आहे .... आवडली
विद्याक, निसर्गाच्या गप्पा ६
विद्याक,
निसर्गाच्या गप्पा ६ वर शांकलीने फोटो टाकले आहेत या फुलांचे.
खरं तर इथे दुसर्यांदा पोस्ट केली होती, तरी सगळ्यांना आवडली याचा खुपच आनंद झाला.
दिनेशदा, पाहिले मोहाचे झाड...
दिनेशदा, पाहिले मोहाचे झाड... खुप छान आहेत फुले ...पण त्या कळ्या आहेत का? का तशीच फुले असतात ते कळले नाही......शांकलीला , तुम्हाला धन्यवाद! तुमच्यामुळे नविन नविन झाडे कळतात्.......रोहीतकाची फळे , कमळे... खुप छान आहेत.
दिनेशदा... मोहाचे फुल कसे
दिनेशदा... मोहाचे फुल कसे असेल यावर search केल्यावर हि लिन्क मिळाली.....
http://www.youtube.com/watch?v=Nom_HDkQjns&feature=related
विद्या, छान आहे ती लिंक. पण
विद्या, छान आहे ती लिंक.
पण मोहाच्या फुलांचा धुंद करणारा गंध, एकदा अनुभवायलाच हवा.
सुंदर लेखन
सुंदर लेखन
मस्त कथा दिनेशदा! मी कथा
मस्त कथा दिनेशदा! मी कथा वाचताना इतकी गुंतले होते की, शेवट वाचल्यावर आधी फार्फार अपेक्षाभंग झाल्यासारखी निराश वगैरे झाले. (कारण टिपीकल कथेप्रमाणे, शकुशी मास्तर लग्न वगैरे करणार असा काहीसा आनंदी शेवट मी गृहीत धरलेला.)
पण शेवटच्या तीन ओळी वाचताना भानावर आले, अन स्वतःशीच म्हणाले: अरेच्या! कथेचं नाव ''मोहाचे झाड आहे ना!'' हे मी विसरलेच होते.
सुंदर, वर्णनात्मक गोष्ट.
सुंदर, वर्णनात्मक गोष्ट. वाचताना अगदी डोळ्यासमोर घडतेय असे वाटत होते.
शेवटाला मात्र टोकुरिकासारखे वाटले. कथेचे नाव मोहाचे झाड असले तरी त्याचा संदर्भ कथेच्या शेवटी येतो, मास्तरांच्या नशिबी कुठल्याही मोहपाशात गुंतण्याचे लिहिलेले नसते - ना पत्नीच्या, ना मुलीच्या. त्या अनुषंगानेही मोह कथेत येईल असे वाटले होते.
पण अर्थात हे माझे मत. कथा जशी मांडलीय तशीही छान आहे.
आवडली
आवडली
झक्कास
झक्कास
Pages