माबो गटग - निळू दामल्यांशी 'लवासा' बद्दल चर्चा

Submitted by शैलजा on 19 November, 2010 - 08:26

लवासा पुस्तकावरुन जी चर्चा झाली होती त्या चर्चेमध्ये, एक मायबोलीकर परेश लिमये, ह्यांनी खुद्द निळू दामल्यांशी लवासासंबंधित चर्चा आयोजित करण्याची जबाबदारी घ्यायची तयारी दाखवली होती. त्याप्रमाणे २८ नोव्हेंबर २०१० ह्या दिवशी, निळू दामल्यांशी ह्या विषयासंबंधित चर्चेची संधी आपल्याला मिळत आहे. वेळ साधारण सकाळी ११:०० ते २:३० दुपार.

निळू दामले ह्यांच्याबरोबर ग्रंथालीचे धनंजय गांगल व मौजेचे संजय भागवत हे देखील उपस्थित असतील.

ज्या मायबोलीकरांना ह्या गटगला जमायची इच्छा आहे, त्यांनी ह्या बाफवर बुधवार, २४ नोव्हेंबर २०१० पर्यंत कळवावे. हे गटग पुण्यात होईल. सभासद संख्या अपुरी असल्यास गटग रद्द करण्यात येईल.

माणशी रुपये २००/- खर्च - सभागृहाचे भाडे व जेवण ह्यासकट -अपेक्षित आहे, असे परेश लिमये ह्यांनी कळवले आहे.

गटगचे ठिकाण : 'बैठक' बॅंक्वेट हॉल, हॉटेल रणजित, भांडारकर रोड. हे हॉटेल भांडारकर रस्त्यावर कॉसमॉस बॅंक आहे त्याजवळ आहे.
गटगची तारीख व वेळ: २८ नोव्हेंबर २०१०, सकाळी ११:०० ते २:३० दुपार.
सकाळी ११ पर्यंत सगळ्यांनी उपस्थित रहावे ही विनंती. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे अजून वृत्तन्त नाही? दामल्यांनी निरुत्तर केले की काय?
शिकार करने आये थे शिकार होके चले? Proud

बाजो, तुम्हाला चर्चेचा वृत्तांत वाचायची उत्सुकता आहे ना? मग सरळ सांगा ना तसे! उगाच वाचायला येऊन चष्मा कशाला लपवायचा तो? Proud

बाळू, मला वाटले तू विबासं वर सापडशील. इथे काय करतोहेस तू? विबासं आणि त्यावर पोश्टी पाडणारे लोक यांचा जसा काहीच संबंध नाही, तीच गोष्ट दामले आणि लवासाबद्दल आहे अरे! Proud

अगदी अगदी साजिर्‍या. दामल्यांना निदान काहीतरी लाभ तरी झाला असेल पोस्टी टाकण्याचा . त्यांच्याच अ‍ॅटिट्युड प्रमाणे विबास वाल्यांना सांगायला पाहिजे, ज्यांनी अनुभव घेतलाय त्यांनीच बोला. उगाच काठावर बसुन पाण्यातल्यांना दगड मारु नका. Proud

परेश . ऑम्लेटची चव चाखण्यासाठी स्वतः अंडी घातली पाहिजेत असे थोडेच आहे? Proud

बाजो आणि पलि, तुम्हा दोघांचे प्रश्न दामलेंनी वेगळ्या संदर्भात हॉटेल रणजितला विचारले होते, त्याबद्दल बोला. विषयाशी संबंधित नसणार्‍या पोश्टी उडवण्यात येतील. इथे 'दामलेंचा लवासाशी असलेला पर्यावरणबाह्य संबंध' असा विषय आहे. Proud

त्याचप्रमाणे पवार कुटुंबियांचा लवासाशी काहीही संबंध नसून त्यांच्यावर केवळ राळ उडवलेली आहे, आणि पवारांनी इंग्लंडमधल्या लेक डिस्ट्रिक्टवरुन तलावाकाठी हिल सिटी बांधण्याची केवळ कल्पना सुचवली होती, ह्याचाही उल्लेख करायला दामले विसरलेले नाहीत

आजच्या सकाळमध्ये का साम टिवीवर कुठेतरी लवासाला नोटीस दिल्याबद्दल पवार नाराज असे वाचले. दामल्यांनी वर लिहिलेय ते खरे असेल तर पवारसाहेब का नाराज झाले? की उद्या कसाबला फासावर चढवल्यावरही ते अशीच नाराजी दाखवणार आहेत????

अगदी सुरवातीला स्थापन झालेल्या कंपनीत पवारांची कन्या होती. नंतर नाहीये ती. मला वाटतं पुस्तकात पण तसा उल्लेख असेलच.

अतिशय थोडक्यात वृ -

'लवासा' हे पुस्तक मी विकत घेतले ते निळू दामलेंचे नाव पाहून. त्यात पुन्हा मौजेचे प्रकाशन. माझ्या अपेक्षा जरा वाढलेल्याच होत्या. लवासा हे नाव ऐकून होते, त्याबद्दल उलट सुलट वाचलेलेही होते, तेह्वा ह्या पुस्तकात सर्व प्रकरणाचा सांगोपांग अभ्यास केलेला वाचायला मिळेल, हे एक गृहीतक मनाशी धरुन पुस्तकाची खरेदी झाली, आणि मग यथावकाश वाचनही. पुस्तक वाचता वाचता मात्र बराच भ्रमनिरास होत गेला. पर्यावरण, विस्थापन, जमीन विषयक कायदे कानून इत्यादींविषयी मला फारशीच काय, जराही शास्रशुद्ध - एखाद्या हे विषय अभ्यासणार्‍याला जशी माहिती असते तशी - माहिती नाहीच, पण तरीही वाचलेले खटकत होते खास. पुस्तक फार एकांगी वाटत होते.

पुस्तकाबद्दल लिहिताना, मी ते लिहिले होते माझ्यासारख्या सामान्य वाचकाच्या भूमिकेतून. पुस्तक वाचताना मला पडलेले प्रश्न, मनात आलेले विचार, उडालेला गोंधळ असे काहीसे. खरेतर तिथे ५ एक प्रतिसाद आले तरी डोक्यावरुन पाणी, असे मला वाटले होते! पण भलतीच जोरदार चर्चा घडली आणि त्या चर्चेतच परेश लिमयेने निळू दामलेंना भेटून त्यांनाच का विचारायचे नाहीत प्रश्न, असा प्रस्ताव मांडला.

परेशच्या प्रस्तावाला अनुसरुन काही माबोकरांनी चर्चेसाठी जमायची तयारी दाखवली. हो, नाही करता करता, २८ नोव्हेंबर २०१० ला दामलेनांही वेळ असल्याने भेटायचे ठरले आणि ह्या गटगसाठी बाफ उघडायला मी एकाला विनंती केली आहे, असे परेशने मला कळवले. २ दिवस झाले तरी बाफ उघडला गेला नाही, तेह्वा काय झाले विचारायला फोन केल्यावर मोठ्या हुषारीने, सोप्पं असतं गं बाफ उघडायचं काम, त्यात काही कठीण नाही, असं सांगत, ते काम आता तूच कर,अशी उदार मनाने परवानगीही आणि जबाबदारीही देऊन टाकली Proud बाफ उघडल्यावर तिथे कोणी गटगला येण्यासाठी नोंदणी करणार की नाही, हा प्रश्न मला खरं तर पडलेला होता, पण म्हटले पाहू काय होतेय. उत्साहाची गोष्ट म्हणजे अल्प प्रमाणात का होईना, प्रतिसाद येत होते.

तोवर पुस्तक मिळवून आणि वाचून योगनेही उत्तम मुद्दे मांडत लेख लिहिला होता, अल्पनानेही आपल्या रंगीबेरंगीवर काही मुद्दे नोंदवले होते.

कोण येणार, कोणी नाव काढून घेतले वगैरे अपडेट्स मी व परेश एकमेकांना देत होतो, आणि २८ नोव्हेंबरचा दिवस उजाडला. गटगच्या ठिकाणी पोहोचता पोहोचता, मेधा२००२ चा फोन आला आणि तिने तिथे ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्याचे कळवले. पाठोपाठ मीही हजेरी लावली. पहिली पाच दहा मिनिटे आम्ही दोघीच आलेल्या असल्याने, आणि त्याच दिवशी पुण्यात "समता मोर्चा" असल्याने निळू दामले मायबोली चर्चा सोडून, मोर्चात सामील व्हायला गेले की काय आणि अजून कोणी येणार तरे आहे की नाही, असा रास्त प्रश्न आम्हां दोघींनाही पडला! Proud त्याबद्दल आम्ही दोघी बोलत असतानाच भुंगा हा मायबोलीकर पोहोचला, आणि परेशचाही दामलेंना घेऊन येत अहे, असा निरोप मिळाला. जरासे हुश्श झाले!

पुढील काही क्षणांत जवळ जवळ सर्वच मंडळी येऊन पोहोचली आणि गटगला सुरुवात झाली. चर्चा सुरु होण्याच्याही आधी, ओळख करुन देताना, माझी ओळख करुन दिल्यावर, तुम्हीच का त्या लेख लिहिलेल्या, असे दामल्यांनी विचारल्यावर दामले म्हणजेच बाजो की काय, अशी एक शंका मला उगीचच मनात आली! Proud Light 1 म्हटले, कळेलच, वाट पाहू. सगळे जमल्यानंतर लगेचच आलेला वाफाळता चहा घेत घेत चर्चा सुरु झाली.

झालेली चर्चा, जमल्यास संवादमध्ये जशीच्या तशी देण्याचा प्रयत्न आहे, त्यामुळे त्याबद्दल इथे आत्ता फारसे लिहित नाही. साधारणरीत्या काय काय प्रश्न विचारले गेले त्याचा, माझ्याकडे उपलब्ध माहिती आहे, त्या अनुषंगाने साधारण गोषवारा लिहिते.

१. लवासामध्ये दामल्यांना रस कसा, केव्हा आणि का निर्माण झाला?
२. निळू दामले एखादे पुस्तक लिहिण्याआधी हिंडून फिरुन जी माहिती मिळवतात, त्यासाठी जो खर्च येतो, त्याची सोय कशी होते? की हे सर्व ते स्वतःच्या खिशाला खार लावून करतात?
३. हिंदुस्थान कन्स्ट्रक्शनमध्ये सल्लागार पदावर असतानाही लवासाबद्दल दीड वर्षापर्यंत, सुलभा ब्रह्मे यांचा लेख वाचनात येइपर्यंत आपल्याला काही ठाऊक नव्हते हे निदांचे म्हणणे कितपत ग्राह्य मानावे?
४. लवासाशी पवारांचे नाव गुंतल्यामुळे लवासाची वाटचाल सोपी झाली का?
५. पवार हे नाव वापरुन लवासाने आपण म्हणता तसे कायदे मोडले नसले तरी वाकवले का? त्यामधले लूपहोल्स वापरुन, आणि कातकरी व शेतकरी ह्यांचे अज्ञान वापरुन लवासाने आपला फायदा साधला का?
६. जिथे तिथे शेतजमीन संपादन करुन असे प्रकल्प उभारले तर भारतातल्या शेतीचे भवितव्य काय?
७. पर्यायाने पुन्हा एकदा धनधान्यासाठी भारताने बाहेरच्या देशांवर अवलंबून रहायचे का?
८. पर्यावरणाची हानी
९. केवळ ३-४ वर्षात जमीनीविषयक कायदे इतक्या पटापट कसे बदलले गेले?
१०. खासदार निधीतून बनवलेल्या रस्त्याचा वापर करण्यात येण्याबद्दलचा नागरिकांवर आकारला जाणारा टोल.
११. लवासामुळे खरोखर कोणाचा फायदा आहे?

आणि इतरही काही प्रश्न. काही प्रश्नांना दामल्यानी मनमोकळी उत्तरे दिली, काही प्रश्न त्यांना आवडले नाहीत, आणि जिथे आपण अडचणीत येऊ असे त्यांना वाटले (असावे) तिथे, असेल, शक्यता आहे, मला तरी कल्पना नाही, अशीही काही उत्तरे त्यांच्याकडून मिळाली. कधी कधी अडचणीच्या नेमक्या मुद्द्यापासून दूर राहण्यासाठी, त्यांनी पाल्हाळ लावून मूळ प्रश्नांचे उत्तर टाळल्यासारखेही वाटले. तरीही, दामल्यांनीही कोणतेही आढेवेढे न घेता ह्या उपक्रमात भाग घेऊन, प्रसंगी त्यांच्या विरोधातल्या प्रश्नांचीही उत्तरे दिली, निदान प्रयत्न केला, ह्याबद्दल आदर वाटला. योग ह्यांनी पाठवलेल्या इमेलबद्दल दामल्यांना सांगून, योगला उत्तर पाठवायची विनंती केली.

दोन- अडीच तास चर्चेमध्ये, गप्पांमध्ये कसे गेले हे समजलेही नाही. ह्या उपक्रमात भाग घेतल्याचे खूप समाधान आहे. अजूनही असे उपक्रम राबवायची इच्छा आहे.

चर्चेचा समारोप करुन, दुपारी अडीचच्या सुमारास जेवणाचा आणि आईसक्रीमचा आस्वाद घेऊन, दामलेंना निरोप देऊन, आणि एकमेकांचा निरोप घेऊन सारेजण पांगलो. परेशने अतिशय चोख व्यवस्था ठेवली होती, त्याबद्दल त्याचे खूप आभार. Happy आणि ह्या चर्चेत भाग घेतलेल्या मायबोलीकरांचेही मनापासून आभार.

थोडक्यात लिहिले आहे, गोड मानून घ्या, अशी विनंती. Happy

ह्या उपक्रमात भाग घेतल्याचे खूप समाधान आहे. >> सेम हियर.

दामल्यांनीही कोणतेही आढेवेढे न घेता ह्या उपक्रमात भाग घेऊन, प्रसंगी त्यांच्या विरोधातल्या प्रश्नांचीही उत्तरे दिली, निदान प्रयत्न केला, ह्याबद्दल आदर वाटला. << अनुमोदन.

धन्यवाद शैलजा, सर्वांच्या वतीने वृ लिहिल्याबद्दल.:)

'टोकाच्या समाजवादाने काही साध्य होणार नाही..' ही आणि यासारखी दामल्यांची काही मते पटली. त्यांचे रोखठोक बोलणेही काही ठिकाणी आवडले. मात्र त्यांनी काही अडचणीच्या मुद्द्यांना शिताफीने बगल दिली आणि काही मुद्द्यांवर ते इतक्या भडकपणे बोलले, की हेच का निळू दामले- असा प्रश्न पडला अक्षरश:!

श्रावण, शैलजा, परेश, सुर्यकिरण, भुंगा या सार्‍यांनीच चांगले मुद्दे मांडले. दामल्यांना बोलते करायचा प्रयत्न केला. Happy

शैलजा,

छान! पण प्रशाणंईची ऊत्तरे ईथे पोस्ट केलेली नसल्याने (त्यावर काम चालू आहे, नंतर पोस्टणार असेच ना?) एकंदर ऊपस्थितांचा काय समज झाला किंव्वा निकष निघाला? जसे:
१. दामले यांचे एकूण लिखाण वा लवासाकडे पाहण्याचा दॄ. बायस्ड वाटला का नाही?
२. वस्तूनिष्ट प्रश्णावळी ला ऊत्तर देताना त्यांच्याकडे काही वस्तूनिष्ट मुद्दे होते का? अभ्यास्/पुरावे वगैरे?
३. एकंदरीत लवासातील जमेची बाजू काय आणि खर्चाची (नकारात्मक) बाजू काय असा काही ठोस निश्कर्ष निघाला का?

धन्यवाद शैलजा, साजिरा.

तिथे असायला हवं होतं.
'टोकाच्या समाजवादाने काही साध्य होणार नाही..' >>> हे पटलं. टोकाची समाजवादी भुमिका म्हणजे खूपच स्वप्नाळूपणा झाला. आणि दुसरं म्हणजे तश्या भुमिकेने कोणत्याच प्रश्नाला ठाम उत्तर मिळत नाही असं हल्ली वाटायला लागलंय.

योग, मला तरी बायस्ड वाटला. बाजो वर म्हणतात तसे ते लवासाचे प्रवक्ते आहेत माझ्या मतेही. तुमच्या इमेलचे काय उत्तर येते हे वाचायला आवडेल.

धन्यवाद शैलजा.. थोडक्यात पण मुद्देसूद लिहिलेला वृत्तांत आवडला.. Happy
'टोकाच्या समाजवादाने काही साध्य होणार नाही..' ही आणि यासारखी दामल्यांची काही मते पटली. त्यांचे रोखठोक बोलणेही काही ठिकाणी आवडले. >>> साजिराला अनुमोदन..

>तुमच्या इमेलचे काय उत्तर येते हे वाचायला आवडेल.
मीही ऊत्तराची वाट पहातो आहे. आपल्याकडे म्हणतात ना "वाट पहा".. Happy

तूर्तास एव्हडेच ऊत्तर आले आहे :
"नमस्कार. तुमच्या पत्रावर व इतर मुद्द्यांवर चर्चा झाली. सांगोपांग. मजा आली. मला त्या चर्चेचा उपयोग होणार आहे. भेटीत सविस्तर बोलू. पुन्हा आभार"
--------------------------------------------------------------------------------
>>>>बाजो वर म्हणतात तसे ते लवासाचे प्रवक्ते आहेत माझ्या मते

एकंदरीत असं दिसतय की लवासा चांगलं आहे आणि ते आवश्यकही आहे हे स्वतः निळू दामेल यांना पटले आहे त्यामुळे त्याविषयी बोलताना तो दृष्टीकोन कायम डोकावत असावा. यात फार काही गैर वाटत नाही, कारण प्रत्त्येकाला आपले मत बनवण्याचा अधिकार आहेच. पण एरवी सामान्य माणसाच्या मत बनविण्याच्या प्रक्रीयेवर टीका करणार्‍या दामल्यांकडून स्वताचे मत किमान सर्व वस्तूनिष्ट कसोटींवर तपासून घेतले जाणे अपेक्षित आहे. आणि निळू दामले स्वतंत्र पत्रकार म्हणून अनेक वर्षे काम करत असल्याने अशी अपेक्षा करणे योग्यच आहे. त्या पार्श्वभूमीवर दामले पुस्तक लिहीतात तेव्हा त्या पुस्तकाचा फॉर्मॅट "लवासात या या गोष्टी चांगल्या आहेत, कायद्याला धरून आहेत, समाज हिताच्या आहेत", "तर या गोष्टी खटकणार्‍या, संशयास्पद आहेत किंवा त्यात सुधारणा होणे आवश्यक आहेत"अशा प्रकारचा ठेवला असता तर मला वाटतं ते अधिक चांगल्या प्रकारे स्विकारलं गेलं असतं/जाईल..
पण तसे नाही, किंवा तसे जमले नाही, दुर्दैव ! अशा निव्वळ त्रयस्थी अन न्युट्रल भूमीकेतून लिहायचे तर कुठल्याही लागे बांध्याचा गुंता चिकटलेला असता कामा नये. आजकालच्या धंदेवाईक जगात ते निव्वळ अशक्य आहे. थोडक्यात आज प्रत्त्येकाच्या शाईला "रंग" आहे. "पांढर्‍यावरचं काळं" हा जमाना गेला. एकंदरीत पत्रकारीता, मिडीया यांचे आयाम, परिमाणे बदलली आहेत. तत्व, नितीमत्ता, नैतीकता वगैरे गोष्टी ऐकायला, बोलायला छान वाटतात- व्यवहारात कागदावर त्यांची किम्मत भेळेच्या कागदाएव्हडीच आहे, आणि शेवट रद्दी मध्ये. जे "खपते" तेच पिकवले जाणार. हा विषय मोठा आहे- एक वेगळा बा.फ. ऊघडावा लागेल.
असो.

या गोष्टी खटकणार्‍या, संशयास्पद आहेत किंवा त्यात सुधारणा होणे आवश्यक आहेत"अशा प्रकारचा ठेवला असता तर मला वाटतं ते अधिक चांगल्या प्रकारे स्विकारलं गेलं असतं/जाईल.. >> योग, बरोबर. ह्या मुद्द्यावर मी त्यांना विचारलं होतं की अभ्यास करुन मी लेखन केलं आहे हे तुम्ही म्हणता, पण लवसामध्येही खटकणार्‍या गोष्टी असतील, त्याबद्दल पुस्तकात कुठेच का भाष्य दिसत नाही? की ते जाणूनबु़जून टाळले आहे? - ती बाजू दाखवायचीच नाही, मग असे असेल तर ते एकांगी होते.. , त्यावर गुळमुळीत, हे पहा तुम्हाला तसे वाटत असेल, तर असूदेत, हरकत नाही, असे उत्तर मिळाले.

समझनेवालेको इशारा काफी.

कालच आयबीएन लोकमत वर निखिल वागळे निळू दामलेंची लवासा संदर्भात मुलखत घेत होते.. ती बघितली का कोणी..

हिम्स मी पाहीली, ती मुलाखत. परवा होती. अमित भंडारी, निळू दामले, विश्वंबर चौधरी, गोंविदराव आदिक इ. चर्चेत सहभागी झाले होते. कालची मुलाखत बघता आली नाही. पण एकंदरीत "मीटर" पडायला लागल्यावर किती नुकसान होतं या मुद्यावर गदारोळ क्रमशः ठेवत पहिला दिवस रंगला.

.

Pages