मला भावलेली आंबोली...

Submitted by विशाल कुलकर्णी on 16 November, 2010 - 10:57

कोल्हापूरहुन सकाळी सव्वा सहाची आजरामार्गे सावंतवाडीची बस पकडली, बसची एकंदरीत अवस्था पाहून धडकीच भरली होती. सगळेच ऐनवेळी ठरल्याने हॉटेल सोडले तर इतर कसलेच आरक्षण नव्हते. हॉटेलची सुद्धा सोय झाली ती मायबोलीकर सुनील गावडे उर्फ सुन्या आंबोलीकर यांच्या कृपेने. (हल बे, धन्यवाद वगैरे म्हणणार नाहीये मी :-P)

धडक-धडक करत लाल डब्बा निघाला. दोन अडीच तासानंतर वातावरण बदलायला लागले...., निसर्गराजाने आज माझा मुड ठिक आहे हे सांगायला सुरुवात केली होती.

दहा-साडे दहाच्या दरम्यान गाडी आंबोलीत पोहोचली. हॉटेलवर जावुन फ्रेश झालो, चहापाणी आटोपले आणि बाहेर पडलो. सुन्याने आंबोलीबद्दल जे काही सांगितले होते त्यातली सत्यता पटायला सुरूवात झाली होती. स्थानिक भटकंतीसाठी एक गाडी ठरवली, पण तो दुपारी ३ च्या नंतर येणार होता. म्हणुन तोपर्यंत पायीच घाटाचा रस्ता धरला.

घाटात सगळीकडे प्रचंड धुकाळ वातावरण होतं. दरीत खाली डोकावुन बघितलं तरी काही दिसत नव्हतं.

या हसर्‍या फुलांनी मात्र मनापासुन स्वागत केलं...

अजुन काही अ‍ॅडिशन्स...

IMG_6571.JPGIMG_6591.JPGIMG_6592.JPGIMG_6595.JPGIMG_6626.JPGIMG_6631.JPG

जोडीला फुलपाखरेही होतीच...

शेवटी १२ च्या दरम्यान परत फिरलो, पोटात कावळे ओरडायला लागले आहेत याची आठवण बदललेल्या वातावरणाने आणि या एकाकी मित्राने करुन दिली.

जेवणानंतर थोडा आराम करुन साडे तीनच्या दरम्यान परत उंडगायला निघालो. यावेळी अनिल आमचा स्थानिक ड्रायव्हर कम गाईड बरोबर होता. पहिला मोहरा वळवला तो हिरण्यकेशीकडे. इथे हिरण्यकेशी नदीचा उगम आहे म्हणे. मी फार खोलात गेलो नाही, मला ती जागा मात्र आवडली.

पुढे राघवेश्वर हे स्वयंभु गणेशाचे दर्शन घेवुन ....

लगेचच कावळेसाद पॉईंट गाठला. इथे मला काही बेस्ट लँडस्केप लोकेशन्स मिळाल्या.

दुसरा दिवस तळकोकणात उतरायचे असल्याने स्थानीक स्थळे आज उरकायचीच असे ठरवले होते. दोन दिवस पुर्ण आराम आणि दोन दिवस भटकंती असा बेत होता. त्यामुळे लगेचच पुढच्या पॉईंटकडे 'नांगरतास धबधबा' निघालो.

मला या धबधब्याला काही एका फोटोत बसवता आले नाही.

तिथे जवळचे कुरकुरे आणि वेफर्सची पाकीटे गमवावी लागली. तरीपण ही बया अजुन आशाळभुतासारखी बघतच होती.

तिथुन निघालो ते थेट महादेव गड पॉइंट गाठला. हा स्पॉट मात्र खरोखर वेड लावणारा होता.

मलाही मग मोह आवरला नाही...

त्यानंतर मात्र अनिलने गाडी थेट आंबोलीच्या मुख्य धबधब्याकडे काढली. आता फारसे पाणी नाहीये पण जे होते ते देखील माझ्यासारख्या मुंबईकरासाठी खुप होते.

तिथुनच पुढच्या वळणावर आणखी एक मस्त नजारे मिळाले..

वातावरण क्षणाक्षणाला बदलत होतं. क्षणापुर्वी स्वच्छा झालेला आसमंत परत धुक्याने भारला गेला.

काही क्षणापुर्वी वरचं हे धुकाळलेलं झाड असं दिसत होतं...

हळु हळु भास्कररावांनीपण परतीचा मार्ग धरला होता. धुक्यामुळे त्यांना टाटा पण करता आले नाही.

आता मात्र पर्जन्यराजाने देखील हजेरी लावली आणि आम्ही आजच्यापुरती माघार घेतली. नुकत्याच काही महिन्यापुर्वी घाटात कोसळलेल्या दरडीचा ढिगारा अजुनही रस्त्यावरुन हलवलेला नाहीये त्या पार्श्वभूमीवर माघार घेणेच शहाणपणाचे होते. आणि ते शहाणपणाचे होते हे नंतर दोन-अडीच तास कोसळलेल्या सडाक्याने सिद्ध केले.

बाकी कोकणाचे इतर फोटो पुन्हा कधीतरी. सद्ध्यापुरते एवढेच बास्स.... Happy

विशाल

गुलमोहर: 

वा विशाल, सुंदर फोटो आणि वर्णनही.... विशेष म्हणजे लँडस्केप आणि त्या कावळेदादांचा फोटो झकासच. शिवाय दोन्ही 'स्वयंभूं'चे फोटोही छान! Happy

आता माझी नेक्स्ट ट्रीप आंबोलीच असणार बहुतेक.......

मी सुमारे १९७३ पासुन ऐकत होतो की आंबोली हिलस्टेशन म्हणून डेव्हलप करताहेत. शेवटी १९८६ च्या सुमारास जाण्याचा योग आला. लाल डब्यानेच गेलो होतो. उतरलो तर काय एकदम व्हर्जिन खेडं! अजुन एम्टीडिसी झोपलेलंच होते. शेवटी एका गावकर्‍याने दोन रुम देउ केल्या. दुपारी एका घरगुती खानावळीत जेवलो. नंतर लहान मुलीला चक्क एक सायकल आणि मला एक सायकल घेउन (भाड्याने) अख्खी आंबोली पालथी घातली. संध्याकाळि फिरायला बाहेर पडलो तर डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही असा गर्भरेशमी अंधार आणि काजव्यांचे थवे. व्वा! मजा आला. अजुनही एक गोष्ट नक्की अजुनही आंबोलि व्हर्जिन आहे. कुणास ठाउक १५-२० वर्षानी त्याचेहि महाबळेश्वर होते की काय?.....???

अजुन एम्टीडिसी झोपलेलंच होते.

१९८६ ते २०१० - अजुनही झोपलेलेच आहे आणि एवढ्यात जाग यायची काहीही चिन्हे दिसत नाहीयेत त्या स्थळी Happy

विशालजी,
अप्रतिम फोटो. आत्ताच १०-११ तारखेला आंबोलीत बर्‍याच वर्षानी जाण्यचा योग आला. कावळेसादला मात्र प्रथमच गेलो. या दरीचा थ्री डायमेन्शनल इफेक्ट पाहून
स्तंभितच झालो. तुम्ही काढलेले फोटो पाहून तर आनंद दुणावला. धन्यवाद.

विशालभौ, जबरदस्त फोटु Happy अजुन टाक रे....फोटो....

फार फार वर्षापूर्वी गेल्येय आंबोलीला. आता साधनाच्या घरी जायलाच हव Wink

स्वर्गाकडे नेणाऱ्या शिडीच्या फोटो साठी माझ्याकडे शब्दच नाहीत...! अप्रतिम!
सुरेख सचित्र प्रवासवर्णन लिहिलयस रे.. अरे पण इथे नंतर सुद्धा जाऊ शकला असतास ना.. आला असतास आमच्या सगळ्यांबरोबर तर बरे वाटले असते.... Happy

विशाल अ‍ॅडिशन्सपण सुन्दर. अ‍ॅडिशन्समधील प्रचि ४ जी फुले आहेत, त्याचा पा़कळयांकडचा भाग साबणच्या पाण्यात बुडवून देठाकडून फुंकर मारल्यास छान फुगे उडतात. लहानपणी हा माझा फार आवडता खेळ होता.

साधना, <<<<<<<<<<<हे माझे आंबोलीतले घर..... बर झाल बाई सांगितलत. खूप दिवस झाले आंबोलीला जायचे आहे. किती सुंदर घर आहे तुमच. माझ लहानपण अशाच घरात गेलय. पण आता खूप दिवसात अशा घरात रहायलाच मिळाल नाही आहे. खूप चुकल्या चुकल्यासारख वाटतय.आता तुमच्याच घरी येईन चालेल ना??? वर्णन पण कित्ती छान केलय. धन्यवाद!!!!

सुंदर लेख.

आंबोली मस्तच आहे. पावसाळ्यात पुन्हा एकदा पहायचंय. ताम्हिणी घाट मात्र आंबोलीपेक्षा सुंदर आहे . वै. म.

कोल्हापूर सोडल्यानंतर गोवा, आजरा, सावंतवाडीला कसं जायचं याच्या पाट्या नाहीत. आजरा फाट्याकडे कुठून वळायचं याच्याही पाट्या नाहीत. आम्ही विचारत विचारत गेलो आणि कावेरी हॉटेल शोधत राहीलो. नाही नाही त्या गावाच्या पाट्या आहेत.

हिरण्यकेशी उगम पहायचं राहूनच गेलं.

मी पहिल्यांदा घाटरस्त्याने गाडी चालवलेला हा घाट म्हणून लक्षात आहे. आज-याच्या पुढे बेळगावहून येणारा फाटा लक्षात येत नाही. मी ७० - ८० च्या भरवेगात टर्न घेतला आणि बेळगावहून आलेल्या ट्रकने मागच्या बाजूला करकच्चून ब्रेक्स लावले. दहा पंधरा मिनिटं हातापायाला थरथर सुटली होती. पण खचून न जाता पुन्हा गाडी ड्राईव्ह केली.

Pages