पुरस्काराचा भुलभुलैया

Submitted by अभय आर्वीकर on 23 November, 2010 - 01:18

पुरस्काराचा भुलभुलैया

“स्टार माझा” तर्फे, घेण्यात आलेल्या ब्लॉग माझा-३ स्पर्धेत मला मिळालेल्या पुरस्काराबद्दल आपण माझेवर प्रेम व्यक्त करून अभिनंदन केलेत त्या बद्दल मी आपणा सर्वांचा अत्यंत ॠणी आहे, त्याबद्दल आपले सर्वांचे खूपखूप आभार. भविष्यातही आपणाकडून असेच उदंड प्रेम मिळत राहील ही अपेक्षा.

शक्यतो कुठल्याही स्पर्धेत भाग घ्यायचा नाही. घेतलाच तर त्याचा निकाल कसाही लागो, नंबर येवो अथवा ना येवो, दोन्ही स्थितीमध्ये ना आनंद मानायचा ना दु:ख. अशी मानसिक तयारी करून तसा फार पूर्वीच निर्णय घेतला आहे मी. पण जेव्हा जेव्हा हा निर्णय अमलात यायची वेळ येते तेव्हा तेव्हा मात्र अगदी विचित्र परिस्थिती निर्माण होत असते. मी आणि माझे मन/शरीर या दोन स्वतंत्र ‘संस्था’ आहेत, याची पुरेपूर जाणीव होत असते. कारण मी जे ठरवतो त्यानुरूप वागण्यास मन अजिबात तयार नसते. ‘इंद्रियावर ताबा’ ठेवण्याचे निश्चय सामान्य माणसाला पाळणे तसेही कठीणच काम असते. किंवा असेही म्हणता येईल की, अशा तर्‍हेचे निश्चय करून ते अंगवळणी पाडणे, हे सामान्य माणसाच्या दृष्टीने महाकठीणच असते. फक्त या निमित्ताने मनावर थोडाफार ताबा मिळवता येऊन आचाराविचारावर थोडेफार नियंत्रण मिळवता येते, एवढाच काय तो आनंद.

या विषयावर काथ्याकूट करण्याचे कारण असे की, बर्‍याच कालावधीनंतर या तीन महिन्यांच्या कालावधीत मी दोन स्पर्धांमध्ये भाग घेतला. एका स्पर्धेत अपयश आणि दुसर्‍या स्पर्धेत यश. पहिल्या स्पर्धेत जेव्हा अपयश मिळाले तेव्हा थोडीफार नाराजी आलीच. प्रयत्न करूनही नाराजी जाईना. दु:ख मानायचे नाही, हा माझा आदेश माझेच मन स्वीकारेना. मी माझ्या मनाला परोपरी समजावण्याचा प्रयत्न केला, मनासमोर मी तर्‍हेतर्‍हेचे तर्क सादर केले, पण सारे व्यर्थ. मनाची उदासी जैसे थे. मग मनाच्या नाराजीचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा एक बाब लक्षात आली की, नाराजी यश मिळाले की अपयश याबाबतची नसून परीक्षकाने मर्यादा ओलांडून निष्कारण आपल्या कलाकृतीला ‘कचरा’ ठरवून जाणूनबुजून हीनत्वाची वागणूक द्यायचा प्रयत्न केलेला आहे. मनाच्या उदासीचे हे कारण मात्र पटण्यासारखे वाटले. मग पुन्हा मी माझ्या मनाला समजावण्याचा प्रयत्न केला.

मी : हे बघ मना, असल्या बारीकसारीक क्षुल्लक बाबींना एवढे महत्त्व द्यायचे काहीच कारण नाहीये.
मन : बारीकसारीक? क्षुल्लक? येथे चक्क उपमर्द होतोय, आणि तुला काहीच कसे वाटत नाही?
मी : हे बघ मना, तुला जे वाटते तेच खरे असेल कशावरून? त्याला दुसरी बाजूही असू शकते आणि ती खरी असू शकते.
मन : दुसर्‍याला हीन लेखने ही एक विकृती आहे, आणि तिचे समर्थन केले जाऊ शकत नाही.
मी : हे बघ मना, माणूस म्हटलं की चूकभूल होतच राहणार.
मन : नकळत किंवा अनवधाने घडते त्याला भूलचूक म्हणायचे असते. जाणीवपूर्वक केलेल्या कृतीला भूलचूक म्हणता येत नाही. अशी कृती क्षम्य सुद्धा असू शकत नाही.
मी : ते जाऊ दे, पण परीक्षकाबद्दल आणि श्रेष्ठ व्यक्तीबद्दल आदर बाळगायचा असतो, ही साधी बाब तुझ्या कशी लक्षात येत नाहीये?
मन : तीच तर खरी ग्यानबाची मेख आहे रे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. माणसांनाच काय, गाय हे जनावर असूनही तिच्याकडे आदराने बघायला शिकविलेना आम्हाला आमच्या संस्कृतीने. पण आदर राखूनही अवहेलनेचे शल्य तसूभरही कमी होत नाहीये.
अर्थातच कारण काहीही असो, आलेला प्रसंग पचवणे कठीण गेलेच. आपणच स्वमर्जीने केलेला निश्चय, आपल्यालाच पुरेपूर पाळता आला नाही, हे अधोरेखीत झाले.
* * *
प्रसंग दुसरा. आता विजेत्याच्या यादीमध्ये माझे नाव होते. मी निश्चयाप्रमाणे तसा मख्खच होतो. पण मनामध्ये मात्र आनंदाचा एक तरंग उठलाच होता. मात्र हा आनंदाचा तरंग “आपण जिंकलो” या भावनेतून अजिबात आला नव्हता. आपली दखल घेतली गेली, उपेक्षितांच्या भावनांना समजून घेणारेही आहेत, याबद्दल मिळालेल्या पावतीचा तो आनंदक्षण होता. त्यामुळेच यादीत नाव पहिले की शेवटले, याबद्दलही सोयरसुतक उरले नव्हते.

मी काय लिहितो,कसे लिहितो, याचे मला भान आहे. माझे लेखन बहूसंख्यजनांना न रुचणारे, न पटणारे किंवा अनाकलनीय असू शकते, याची मला जाणीव आहे. कधीकधी तर क्रित्येकाच्या भावना दुखावणारे, तडाखे,चटके देणारे असू शकते, हेही ज्ञात आहे मला. पण नाईलाज आहे, वास्तव हे कटू असले तरी ते वास्तव असते, आणि मी ते टाळू शकत नाही. लेखन करतो म्हणून लेखक आणि कविता लिहितो म्हणून कवी, एवढंच माझं लेखक व कवी या शब्दांशी नातं. एरवी लेखक, कवीसाठी लागणारी योग्यता माझ्यात आहे किंवा नाही, मलाच संशय आहे. कारण मी कल्पनाविलासात फार काळ रमू शकत नाही. लोकांना रुचावे, दाद मिळावी, आपल्याला वाहवा मिळावी म्हणून त्या तर्‍हेने लेखन करण्याचे प्रयत्न मी करू शकत नाही.वाचक, रसिक, समिक्षक हा लेखकाच्या दृष्टीने देव असतो हे मान्य, पण त्यांचे फ़ाजिल लाड पुरविलेच पाहीजे, याबाबत मी सहमत होऊ शकत नाही. याउलट गरज असेल तेथे त्यांना दोन खडे बोल ऐकवण्याची कठोरता लेखकात असायलाच हवी, यावर मी ठाम आहे.लोकांचे निखळ मनोरंजन व्हावे एवढ्यासाठी मी लिहू इच्छित नाही. केवळ उपेक्षितांची दुर्लक्षित बाजू कागदावर चितारायचा प्रयत्न करणे, सिमित म्हणा की संकुचित म्हणा, पण एवढाच उद्देश माझ्या डोळ्यासमोर असतो, हे खरे आहे.

उपेक्षितांची दुर्लक्षित बाजू कागदावर चितारायचा प्रयत्न करणारे आजवर खूप झालेत. पण इतिहास असे सांगतो की, या तर्‍हेचे व्रत घेतलेली बरीचशी माणसे मध्येच भरकटली आणि शेवटी देवाच्या आळंदीची वाट चुकून चोराच्या आळंदीला पोचलीत. आणि त्यामागच्या अनेक कारणांपैकी ‘पुरस्काराची अभिलाषा’ हे एक प्रमुख कारण आहेच आहे. एकदा का पुरस्काराची इच्छा मनात जागृत झाली की सर्वांना रुचेल, पसंतीस पडेल असे लेखन लिहिण्याकडे कल झुकलाच समजावा. मग कटू, कठोर, तडाखे देणारे, दुष्प्रवृतीवर घाव घालणारे लेखन जन्माला घालणारी लेखनी स्वत्वाच्या विनाशाकडे वाटचाल करायला लागलीच असे निर्विवाद समजावे. मग पुरस्काराच्या भुलभुलैयात लेखनीची धार कधी आणि कशी बोथट झाली, याचा उलगडा भल्याभल्यांना होत नाही.

जी चूक इतरांनी केली, तीच चूक माझ्याकडून होऊ नये,एवढे बळ विधात्याने मला द्यावे, आणि या प्रवासात पुरस्कार वगैरे मिळाले तर आनंदच आहे, पण नाही मिळाले तरी त्यात खेद वाटण्यासारखे काहीच नाही, आपला मार्ग तेवढा महत्वाचा, तो भरकटू नये, हीच धारणा मरेपावेस्तोवर कायम रहावी, त्यात अंतर येऊ नये, एवढीच आंतरीक इच्छा आहे.
.
.
. गंगाधर मुटे

,,,,,,,,,,,,*,,,,,,,,,,,,,,,,*,,,,,,,,,,,,,,*,,,,,,,,,,,,,,,*,,,,,,,,,,,,,*,,,,,,,,,,,,,,
संदर्भ :
पहिली स्पर्धा - एक काव्यलेखन स्पर्धा.
दुसरी स्पर्धा - स्टार माझा स्पर्धा.

गुलमोहर: 

बक्षिस मिळाल्यावर आनंद आणि न मिळाल्यास वाईट वाटणं हे साहजिक आहे. माणूस असण्याचं लक्षण आहे.
पण बक्षिस न मिळणे = हिनत्वाची वागणूक, अवहेलना इत्यादी असं समजणं याच्याइतका मोठा विनोद नाही.
कदाचित ज्यांना बक्षिस मिळालेय ते किंवा त्यांच्या कलाकृती आपल्यापेक्षा जास्त योग्य असू शकतील बक्षिसासाठी हा विचार कधीच का नाही मनाला शिवत?

निधप, तुमचा मुद्दा बरोबर आहे.
पण मी वरील मुद्दा एका ठरावीक प्रसंगाबद्दल लिहिला आहे. सरसकट नाही.

गंगाधरजी, मर्मावरच बोट ठेवले आहेत बघा!

अशा पुरस्कारांना जरी स्पर्धा म्हणत असले तरीही त्या खर्‍याखुर्‍या स्पर्धा नाहीतच मुळी. पुरस्कार देणार्‍यास ज्याची निवड करावीशी वाटेल त्यालाच तो निवडत असतो. निवडीकरता तो परीक्षकही नेमत असेल, पण ते त्याच्याच अप्रकाशित आदेशांचे पालन करत असतात. ही बाब जर ध्यानी धरली, तर खर्‍याखुर्‍या स्पर्धेत पुरस्कारास पात्र ठरू शकणार्‍या लिखाणासही पुरस्कार न मिळाल्याचे शल्य फारसे राहत नाही. पुरस्कारदाते पारदर्शक, सद्गुणधार्जिणे, सच्चे परीक्षक आहेत असा दावा ते स्वत:च करत नाहीत. हे सारे गुण आपणच त्यांच्या ठायी आहेत अशी कल्पना करून घेत असतो. मग त्याविपरित निकालांमुळे आपल्यावरच विद्ध होण्याची वेळ येते. असो.

हे सर्व असे असूनही, या पुरस्कारामुळेच मराठी अनुदिनी लेखकांत गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढ झाली, पारंपारिक वाचकांत अनुदिन्यांतील लेखन काय आहे हे जाणून घेण्याची जिज्ञासा जागृत झाली, आणि त्यांच्या योग्य/अयोग्य अनुदिन्यांच्या निवडीबाबत कल्लोळ (विवाद) उसळून, एरव्ही दुर्लक्षित लिखाणाकडे महाजालीय आणि पारंपारिक वाचकांचे लक्ष वेधले गेले. हे संचितही काही थोडके नाही.

कदाचित काही होतकरू (भावी) पुरस्कारदात्यांस हे पुरस्कार अन्यायकारक निकषांवर आधारित आहेत असे वाटल्यास नव्या पुरस्कारांची निर्मितीही होऊ शकते. तेही अनुदिनीलेखकांस धार्जिणेच ठरणार आहे.

तेव्हा, या पुरस्कारांत काय नाही याचा शोध घेण्यापेक्षा, त्यात काय आहे याचाच शोध घेणे योग्य ठरेल. किमान आता तुम्ही विजेते ठरल्यावर तरी.

सल अपयशाचा न वाटे, अपयशा मी पात्र नव्हतो
भुलवू कुणी पहातो, का भुलण्या मी पात्र ठरतो?

हाच जर तुमचा सवाल असेल, तर मात्र जबाबही तोच आहे!

धन्यवाद नरेंद्रजी,

वरील उल्लेखीत स्पर्धांना खालीलप्रमाणे संदर्भ आहेत.

पहिली स्पर्धा - एक काव्यलेखन स्पर्धा.
दुसरी स्पर्धा - स्टार माझा स्पर्धा.

कदाचित ज्यांना बक्षिस मिळालेय ते किंवा त्यांच्या कलाकृती आपल्यापेक्षा जास्त योग्य असू शकतील ?................... आहो मान्य आहे पन परिक्षकच स्ट्र्गल करीत आसेल तर ?
उदा :- स हित स्पष्टीकरण देउ शकतो . आनेक स्पर्धा चे व परिक्षकांच्या लायकीचे .

मुटे साहेब,
पुन्हा एकदा पुरस्कारासाठी अन या लिखाणासाठी अभिनंदन!

माझं हे विधान फारच फिलॉसॉफिकल वाटेल पणः कुठलिही कलानिर्मिती जो आनंद अन समाधान कलाकाराला देते ते कुठलाही पुरस्कार देवू शकत नाही. अर्थात पुरस्कार हे "व्यवहारीक दखल घेणे" असे निश्चीत आहे अन सर्वांचेच लिखाण असे दखलपात्र होईल असे नाही. पण आजकालच्या स्पर्धा अन त्यांचे निक्काल हा स्वतंत्र वादाचा(?) विषय आहे. त्यात न शिरलेले बरे.

कविता लेखन संदर्भात माझ्या रंगीबेरंगी पानावर मी केशवसुतांच्या पत्रातील जो ऊतारा दिला होता त्यातील वाक्ये पुन्हा उधृत करतो:
------------------------------------------------------------------------------------
(http://www.maayboli.com/node/1070)

"तुम्हाला स्वानन्द पाहिजे आहे काय? स्वानन्द हे कवीचे उत्तम पारितोषिक होय यात शन्का नाही. पण खाज सुटली असता खाजविल्याने जो आनन्द होत असतो, तसला आनन्द काय कामाचा? सगळे ऐहिक आनन्द याच मसाल्याचे आहेत. त्यान्च्या परिणामी हळहळच राहवयाची.

तर उत्तम पारितोषिक असा टिकाऊ आनन्द कसा मिळवायचा याचा विचार तुम्हीच करा. तो मिळू लागला म्हणजे मजकडे किव्वा कोणाकडेच पद्यलेख पाठवण्याची तुमची आतुरता जिरेल.
मला ह्या बाता सान्गणारा, हा खुद्द चुटकेच खरडीत असतो ते कशाकरिता तर? - असा प्रश्ण तुमच्या मनात उद्भवणे स्वाभाविक आहे. त्यास लोकास वाट दाखवू पाहणारा आन्धळा वाटाड्या किव्वा लोकास सान्गे ब्रह्मज्ञान सान्गणारा कोरडा पाषाणच मला समजा. पुढील ठेचा खाणारा मी मागल्या तुम्हास सावधगिरीची सूचना देत आहे. तेव्हडी मनावर घ्या म्हणजे झाले.
कळावे लोभ असावा ही विनन्ती.
आपला
कृ.के.दामले "
------------------------------------------------------------------------------------

दुसर्‍याला हीन लेखने ही एक विकृती आहे >>>> तुम्ही परीक्षकांवर असे आरोप करुन त्यांना एक प्रकारे हीन लेखताय असे नाही वाटत का ? तुम्हाला निर्णय पटला नाही, त्याबाबत आवश्य्क तिथे तुम्ही आवाज उठवलात. तिथे परीक्षकांनी येऊन निर्णयाचे स्पष्टीकरण दिले. मग आता पुन्हा हा असा लेख लिहिण्याचे प्रयोजन कळले नाही.

<< तुम्ही परीक्षकांवर असे आरोप करुन त्यांना एक प्रकारे हीन लेखताय असे नाही वाटत का ? >>

माफ करा सिंडरेलाजी. मी तसे म्हणत नाही. माझे मन तसे म्हणते. मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केलाच आहे.
पण बहिनाबाई म्हणतात ना?

मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोरं

मन हे असंच असतं. मात्र हे मनाचे वर्तन काही अंशी वाईटच आहे मान्य.

आहो मान्य आहे पन परिक्षकच स्ट्र्गल करीत आसेल तर ?
उदा :- स हित स्पष्टीकरण देउ शकतो . आनेक स्पर्धा चे व परिक्षकांच्या लायकीचे.<<
प्रत्येक जण वेगवेगळ्या पायरीवर स्ट्रगलच करत असतो. परिक्षक माहित करून घेऊन त्यांची लायकी बियकी जोखून मग उतरावे स्पर्धेत. परिक्षक लायकीचे नाही वाटले तर उतरू नये. कुठल्याच स्पर्धेचे कधीच स्पर्धेत न उतरलेल्यांच्यामुळे बिघडत नाही.
बाकी आपण स्पर्धेत उतरण्याच्या पायरीवर असतो आणि परिक्षकांना त्या स्पर्धेचे परिक्षण करण्यासाठी बोलावलेले असते आणि तरी आपण त्यांची लायकी काढण्याइतके मोठे स्वतःला समजतो हे पण अजब आहे.
परिक्षकांच्या, स्पर्धांच्या नालायकीच्या उदाहरणांचा अभ्यास करण्यापेक्षा आपण कुठे कमी पडतोय हे बघ लक्ष्मण.

गंगाधर मुटे,

१. आत्मपरीक्षण चांगले आहे.

२. अधिक चांगले / चांगले लिखाण करणे हे आपल्या हातात आहेच.

-'बेफिकीर'!