मेघाची गोष्टं

Submitted by हायझेनबर्ग on 18 November, 2010 - 21:38

*कथा जुनीच आहे, परागच्या नवीन बाफसाठी पुन्हा इथे देत आहे.

मेघाची गोष्टं

आता मी मोठा झालो आहे! खूप मोठा!....इंग्लिश देवाची पुस्तकं वाचण्याएवढा मोठा!....गच्चीवर एकटा झोपण्याएवढा मोठा!....माझ्याच पैशातून रंगीत कागद विकत घेण्याएवढा मोठा!....एकट्याने चार ग्लास रसना पिण्याएवढा मोठा!....बर्फ खाल्ल्यावरही ताप न येण्याएवढा मोठा!.....विमानाने अमेरिकेला जाण्याएवढा मोठा!.....मी आता एक ग्रेट आणि शहाणा माणूस झालो आहे हे नक्की.
माझ्या वर्गातली मिनी चिरमुले आज दुपारी 'तू मला आवडतोस' असे सांगत होती. मिनी अजून लहान आहे. मोठ्यांच्या सगळ्या गोष्टी तिला कळतातंच असे नाही. काही कळत असतील, पण ती अजून मोठी झाली नाही हे खरे. पण मी मोठा झालोय.
पण आता मोठं होऊन फार काही उपयोग आहे असे मला वाटत नाही. मोठेपणा यायला थोडा उशीर झाला हे आता मला कळलं आहे, तो मला माझ्या लहानपणी यायला हवा होता. मग मी लग्न केलं असतं.......मेघाशी.

-----*****-----

माझा वाढदिवस होता तेव्हा, पण मला वाढदिवस आवडत नाही. वाढदिवसाच्या सहा महिने आधी आई मला कितीही हट्ट केलातरी कुठलीच गोष्ट घेऊन देत नाही .....
' वाढदिवस आल्यावर घेऊया की रे ' ...असे म्हणते आणि वाढदिवस होऊन गेल्यावरही सहा महिने......'आत्ताच वाढदिवसाला घेतलं की रे चिकू' ....म्हणून सांगते.
बाबा मात्र दिल्लीवरून येतांना माझ्यासाठी रोबोट, मॅग्नेटचा कॅरम, बँजो अशा खूप कामाच्या गोष्टी घेऊन येतात. त्या वापरणे आईला कधीच जमत नाही म्हणून ती त्यांना खेळणी म्हणते. बाबा खूप ग्रेट आहेत, आई तेवढी ग्रेट नाही. पण माझ्या वाढदिवसाच्या दुसर्‍या दिवशीच बाबा दिल्लीला गेले. त्यांच्या साहेबांनी त्यांचं पोस्टींग की पुडींग कायतरी दिल्लीला ठेवलं होतं. पोस्टींगच असणार पुडींग घ्यायला बाबा एवढ्या लांब जायचे नाहीत ते तर उस्मानच्या बेकरीत पण मिळतं. दिल्ली खूप लांब आहे हे मला महित्येय. मी झोपलो होतो आणि बाबा पहाटेच निघून गेले. मी हट्ट करेन म्हणून त्यांनी मला उठवले नसेल. तेव्हा मी लहान होतो आणि हट्ट करीत असे.
रात्री ते मला...'आईला त्रास देऊ नकोस....आईची काळजी घे....रसनासाठी हट्ट करू नकोस...नीट अभ्यास कर....उन्हात पतंग उडवू नकोस...टॉम्याला रोज फिरवून आण.'...असले काहीतरी सांगत होते. मला सगळे ऐकू येत होते पण मी मुळीच काही ऐकले नाही. मला त्यांचा खूप राग आला. त्यांनी मला वाढदिवसाला मुंबईला नेऊन विमान दाखवण्याचे कबूल केले होते. रॉनी जेकबने तीन वेळा तरी विमान पाहिले आहे. आता मी त्याला....
'मी विमानात बसलो आणि बर्फ घालून चार ग्लास रसना प्यालो'.....असे सांगू शकणार नाही.
बाबा कधी कधी मला लहान मुलगा समजून फार फसवतात. कोणी लहान मुलगा समजून फसवलेलं मला आजिबात आवडत नाही.

मी सात वाजता उठलो तेव्हा टॉम्या माझ्या बेडजवळ मी उठण्याची वाट बघत होता. मी त्याला घड्याळ वाचायला शिकवले आहे. बाबांचे बूट जाग्यावर नव्हते. आई खिडकीत उभी राहून रडत होती. मला माहित्येय ती कधीच ग्रेट वागत नाही. तिला बाबा नसल्यावर रात्री खूप भिती वाटते. मला तिची दया आली. मी सोफ्यावर चढून तिच्या गळ्यात हात टाकले तेव्हा तिने पटकन साडीने डोळे पुसले.

'अरे चिकू! बाळा उठलास तू....आज बेडमधून आई साठी दवंडी नाही पिटलीस ती.....ताप तर नाही आला ना..बघू...'...आई फार भित्री आहे ती रात्रीसुद्धा माझ्या खोलीत येऊन मला ताप आला का बघते.....मी बर्फ घालून रसना पिलो तरंच मला ताप येतो हे तिला अजून कळले नाही. कशाला सांगा!. तसा अमृतची कुल्फी खाल्ल्यावर पण मला थोडा ताप येतो आणि भोल्याचा गोळा खाल्ल्यावरपण थोडा, मग ती मला खिडकीत बसून लिंबाच्या झाडाकडेही बघू देत नाही.
'चिकू अरे किती वेळ माझ्या गळ्यात लोढणार आहेस....आवरना रे बाळा...मलाही उशीर होतोय बँकेत जायला......तो टॉमी बघ कसा टकमका बघतोय माझ्याकडे'.....मी आणि टॉमी तिला धीर देतोय हे तिला कळलेच नाही. तिला तिच्या बँकेतल्या साहेबाचा फार राग येतो. तो तिच्या कामात फार ढवळाढवळ करतो असे ती नेहमी बाबांना सांगते. मग मी स्वैपाकघरात तिला मदत करायला गेलो की.... 'संचारला का डोईफोड्या तुझ्यात' असे ती म्हणते.
'चिकू...तुला माहित्येय आज आपल्याकडे कोण येणार आहे रहायला?' ….आईने बोर्नव्हिटाच्या ग्लासमध्ये ढवळाढवळ करत विचारले.
'कोण?' मी उलट विचारले, तेव्हा मी टॉम्याच्या पायात माझे पांढरे सॉक्स घालत होतो.....ते ऐनवेळी सापडले नाही की बस निघून जाते आणि मग आई मला तिच्या स्कूटीवरून शाळेत सोडते. आमचा टॉम्यापण सॉक्ससारखाच पांढरा आहे.
'माझी नागपूरची मावशी आहे ना...'
'कोण कुमुद मावशी?' मी डोळे मोठ्ठे करत विचारलं.
'अरे गधड्या! कुमुद माझी नाही तुझी मावशी आहे....' आईने बोर्नव्हिटाचा ग्लास माझ्या हातात कोंबला.
'सगळ्या मावश्या नागपूरलाच रहातात मग मला कसं कळणार माझी कुठली आणि तुझी कुठली...'....मी रागातच म्हणालो. सकाळी सकाळी कुणी गधड्या म्हंटलेलं मला आजिबात आवडत नाही.
'अरे सोन्या....म्हणजे जशी तुझी कुमुद मावशी माझी बहीण ना, तशी आपल्या नानीआजीची पण एक बहीण आहे'..... आईने बोर्नव्हिटाचा ग्लास माझ्या तोंडात कोंबला.
'तिचं काय नाव?'...मी ग्लास आईच्या हातात कोंबत विचारलं.
'तुला रे काय कारयचंय सगळी नामावळी ऐकून....शहाजोगंच आहेस'....आईने बोर्नव्हिटाचा ग्लास पुन्हा माझ्या तोंडात कोंबला.
'शहाजोग कोण?' आई रागावली की मला डोईफोड्या, शहा, जोग असल्या तिच्या बँकेतल्या न आवडणार्‍या लोकांच्या आडनावांनी हाक मारते, पण बाबांना मात्र नेहमी 'ओ पटवर्धन' असेच म्हणते.
'आता तू माझा अंत पाहू नकोस रे देवराया'....असे म्हणत आईने माझ्या समोर हात जोडले आणि ती पोळ्या करण्यासाठी तडक स्वैपाकघराकडे गेली. आईला कपिल देव फार आवडतो आणि घारोळी ऐश्वर्या राय पण. आई थकली की मला देवराय म्हणते.
मग मला आईची फार दया आली आणि मीच बोर्नव्हिटाचा ग्लास माझ्या तोंडात कोंबला. सगळं बोर्नव्हिटा रसनासारखं एका झटक्यात घटघट पिऊन टाकलं आणि ग्लास दातात धरून त्यातला शेवटचा थेंब ओठांत ओघळेपर्यंत तिरपा करत विचारलं,
'सांगना मग कोण येणार आहे आपल्याकडं ?'.... तशी आई हातातलं लाटणं घेऊन तरातरा बाहेर आली आणि ते छडीसारखं माझ्यासमोर नाचवत म्हणाली.....
'माझी नागपूरला मावशी आहे.....वासंतीमावशी....तिची मुलगी....मेघा.....ती कॉलेजात शिकवते....आणि ती येणार आहे आपल्याकडं रहायला.....मिळाली सगळी उत्तरं तुला...हूं..?'... आणि आईने रागाने नाक वाकडे केले.
आईने नाक वाकडे केले की ती माझ्या वर्गातल्या शिरिन धोडपकरसारखी दिसते. शिरिनच्या भावाने तिच्या नाकावर सॉक्समध्ये घालून पंख्याला लटकवलेला दगडी बॉल मारला तेव्हा तिचे नाक एका बाजूला वाकडे झाले आणि ती फरशीवर झोपून गेली....आता ती उठल्यावर आईला नाक दाखवून आपले नाव सांगेल म्हणून मग त्याने तिचे नाक दुसर्‍याबाजूने बॅटीच्या मुठीने दणके देऊन ठोकून सरळ केले. शिरीनचा भाऊ ग्रेट आहे.
'कोण ही मेघा-बिघा?...मला तिचं नाव आजिबात आवडलं नाही ' असे मी आईला सांगणारंच होतो पण आईच्या हातात लाटणं बघून घाबरलेला टॉम्या सॉक्समुळे घसरून टीव्हीच्या शोकेसला धडकला आणि सगळ्या सीडी खाली पडल्या. आता आईला आपला सॉक्सचा प्लॅन कळणार म्हणून मी बाथरूममध्ये जाऊन बादलीमध्ये बसून राहिलो आणि आईने मग 'ओ पाणकोंबडे आता बाहेर या' असे जोरात ओरडल्यावरंच बाहेर आलो.
मला आईची दया आली की मी कधीकधी तिला फावड्याचाकूने बटाट्याची साल काढून देतो मग तशीच दया आई माझ्यावर माझा भांग पाडतांना दाखवते. तिने माझा टाय बांधला की मला दिवसभर बाबांचा बनियन फाडून त्यात आव्वळ बांधलेल्या ओल्या मटकीसारखं वाटतं, मग बनियनमधून बाहेर येणार्‍या मटकीच्या शेंडीसारखीच माझी जीभपण तोंडातून बाहेर येते......टॉम्यापेक्षाही जास्ती लांब.
टाय बांधतांना आई मला काहीतरी सांगत होती......' मी शेजारी दातारांकडे चावी ठेवतेय....मेघा आली की दातारवहिनी तिला चावी देतील...तू दुपारी घरी येशील तोपर्यंत मेघा आली असेल.....मी बँकेतून फोन करेन.....शांताबाई येऊन सगळी कामं करतील....टॉमीलाही भरवतील.........मी संध्याकाळी लवकर येईन...अरे कार्ट्या ऐकतोयेस ना.....मासे...च्च...अरे त्या माशांकडे काय बघतोयेस टक लावून'....आईने वैतागून माझ्या टायची क्नॉट पुन्हा आव्वळ बांधली. मी रोज शाळेत जातांना पावतासभर तरी मासे बघतो तेव्हा आई खूप वैतागते आणि मग फार वेंधळेपणा करते. तिने सांगितलेल्या सूचना दातारकाकू आणि शातांबाईंसाठी, त्या मी ऐकून काय करणार? मग अशावेळी मला आईची फार दया येते.
सॉक्सचा प्लॅन फसल्याने मी बसने शाळेत गेलो तेव्हा खिडकीतून मी आईला.....
' मेघाला त्रास देऊ नकोस....तिला क्रूर आणि विक्षिप्त प्रश्न विचारू नकोस'.....असे काहीसे सांगतांना ऐकले. बाबा ग्रेट आहेत त्यांचा माझ्यावर फार विश्वास आहे. आई ग्रेट नाही. तिचा माझ्यावर विश्वास नाही. तिने एका दिवसासाठी मला किती कायकाय सांगितले आणि तेही त्या मेघा-बिघासाठी!
'मी त्या मेघा-बिघाला आजिबात आवडून घेणार नाही ' मोठी माणसे ठरवतात तसं मी ठरवून टाकलं. मी लहान असतांनापण काही गोष्टी एकदम ठरवून टाकत असे.

-----*****-----

मी रोज चार वाजता शाळेतून घरी येतो मग दातारकाकू मला दार उघडून देतात. म्हणजे मीच ते उघडतो. त्यांना कधीच लॅचची चावी दोनदा पावणेबारा फिरवता येत नाही त्या नेहमी एकदाच सवाबारा फिरवतात. मग मलाच चावी फिरवून दार उघडावं लागतं. जातांना त्या मला 'हुश्शार बगळाच आहेस मोठा' म्हणून डोक्यावर टोमणा मारतात. मला कोणी डोक्यावर टोमणा मारलेला आजिबात आवडंत नाही...रुपा मिस सोडून.
पण त्यादिवशी मेघा येणार हे मी एकदम विसरूनच गेलो. मग दातारकाकूंनी सांगितले मला....
'ते फुलपाखरू गेलं की रे चावी घेऊन ' दातारकाकू सगळ्या मुलांना पक्षांची नावं देतात. मला त्या साळसूद बगळा म्हणतात आणि आपट्यांच्या समीरला सहाजूक करकोचा. पण फुलपाखरू म्हणजे पक्षी नाही. आई म्हणते दातारकाकू ढावंगळ आहेत. 'त्यांनी मला बगळा म्हंटले की मी त्यांना ढावंगळ म्हणणार' असे मी नेहमी ठरवतो पण ढावंगळ शब्द मला नीट म्हणता येत नाही.
मी फाटक उघडून घरी गेलो आणि व्हरंड्यातून बेल दोन वेळा वाजवली. दोन वेळा बेल वाजवणे आमचं फॅमिली प्लॅनिंग आहे. आई आणि बाबा पण दोन वेळा बेल वाजवतात. एक वेळंच बेल वाजली की टॉम्या खूप भुंकतो, म्हणून मी गणपतीच्या देवळातली घंटा पण दोन वेळाच वाजवतो. मग घराचे दार उघडले, पण मी ठरवल्याप्रमाणे आजिबात वर पाहिले नाही. 'कोण कुठली मेघा-बिघा मी तिला आजिबात आवडून घेणार नाही' असे मी तर ठरवलेच होते.
'चिकू ना रे तू ?' दारातून आवाज आला. रुपा मिसचा आवाज आणि मोगर्‍याचा वास पण एकदम रुपा मिससारखांच! मला वाटलं रुपा मिसच आल्या आणि मी ठरवलेलं एकदम विसरूनच गेलो. पण छे ! रुपा मिस नव्हत्याचं. ती मेघाच होती.
'अच्छा ही मेघा काय? वेडीच दिसते माझ्या घरात मलाच विचारते 'चिकू ना रे तू ?'....शाळेतून आल्यावर कोणी लगेच प्रश्न विचारलेलं मला आजिबात आवडंत नाही.
' नाही मी आदित्य! ' मला फार राग आला की मी माझं शाळेतलं नावच सांगतो.
'हट!....सीमानं सांगितलं मला, चिकू आला की त्याला रसना करून दे.. मला माहित्येय तू चिकूच '...मेघा रुपा मिससारखंच ग्रेट हसली आणि तिने माझ्या डोक्यावर टोमणा मारला. रसना ऐकून मला खूप ग्रेट आनंद झाला. ही मेघा तर ग्रेटच आहे. ही आल्यावर पहिल्या दिवशीच रसना मिळणार! मला तर वाटलं होतं की बाबा येईपर्यंत आई मला रसना बघू पण देणार नाही. तेव्हा मी ठरवलं आपण मेघाला आवडून घेऊया. मग तिने डोक्यात मारलेला टोमणाही मला रुपा मिससारखाच वाटला.
मी मेघाला सांगणार होतो की ....'मी तुला आवडून घेणार, तू रुपा मिससारखीच दिसतेस'.....पण तेव्हा मला टॉम्या दिसलाच नाही म्हणून मग मी आत गेलो. टॉम्या तीन तीन बॅगांवर उड्या मारत होता. मेघाच्या बॅगा ?
मग मी विचारले मेघाला 'एवढ्या सगळ्या बॅगा तू कशाला आणल्यास?'
'अरे वा! थोरंच आहेस की तू, तुझ्या आजीने पाठवलान दिवाळसण तुझ्यासाठी आणि म्हणे बॅगा कशाला आणल्या?'
'थोर म्हणजे? आणि आता तर तिळगुळसण आहे दिवाळी नाही '... मी काहीच चुकीचं बोललो नाही तरी मेघा...' मग ते सतीचं वाण समज..' असे म्हणून पावतासभर वेड्यासारखं हसतंच बसली आणि टॉम्या जोरात भुंकायला लागला. मी असं हसलो की आई मला...'आधीच केसाळ त्यात झुरळ घुसलं'...म्हणते.
मग हसतांनाच मेघाच्या डोळ्यातून पाणी आले तेव्हा मला तिची फार दया आली.
मग मी माझ्या आवडत्या स्टूलावर बसून तिच्याकडे बघतंच राहिलो. मला अजून असे हसतांनाच रडणे जमत नाही.
' ये इकडे... दाखवते तुला तुझं सतीचं वाण ' ती म्हणाली आणि परत वेड्यासारखं हसायला लागली. मला तिची फारंच दया येत होती.
मग मी बघितलं एका बॅगेत नुसते लाडूच लाडू, करंज्याच करंज्या , शंकरपाळेच शंकरपाळे, चिक्कीच चिक्की आणि दुसर्‍यात नुसतेच कपडे. मला खोबर्‍याच्या करंज्या फार आवडतात. नानीआजी दिवाळीला ग्रेट करंज्या करून पाठवते. आईला करंज्याही तेवढ्या ग्रेट जमत नाहीत आणि चकलीही नाही. लहानपणी मला टीव्ही बघत लाडू चघळायला खूप आवडत असे. मेघाची करंजीपण नानीआजीसारखीच होती. मी एकदा आईची चकली टॉम्याला खाऊ घातली होती तेव्हा टॉम्या दिवसभर दातारकाकूंच्या सोफ्याखाली झोपून गेला. मग रात्री दातारकाकू नाकावर आंधळी कोशिंबीर खेळायची पट्टी बांधून सोप्याखाली गेल्या. त्यारात्री आईने टॉम्याला दातार काकूंचं घर खराब केलं म्हणून लाटण्याने मारलं. मग मी आणि टॉम्या खूप रडलो. मी लहान असतांना कधी कधी थोडा रडत असे.
दुसर्‍या बॅगेतले मेघाचे सगळे कपडे गुलाबी आणि निळेच होते. मला निळा रंग फार आवडतो पण गुलाबी आजिबात नाही. माझ्या वर्गातल्या निशा चिपळूणकरचं नाक सारखंच वहातं आणि तिचा रुमाल गुलाबीच आहे म्हणून. निशाही मला आवडत नाही कारण ती चक्रम आहे. ती रुपा मिसला चटकचांदणी म्हणते. चटकचांदणी शब्दही मला आवडंत नाही. तो तिला तिच्या आजीने शिकवला असे तिने मला एकदा सांगितलं. निशाची आजीही चक्रमच आहे.
मग मी विचारलं मेघाला.....'त्या तिसर्‍या मोठ्या बॅगमध्ये काय आहे ?'
'त्यात माझी पुस्तकं आहेत रे चिकू....' आणि मेघाने बॅग उघडून एक जाडे पुस्तक मला दाखवले.
'मी बघू तुझी पुस्तकं...त्यात चित्रं आहेत? मला पुस्तकातली चित्रं खूप आवडतात ' मी मेघाला सांगितलं आणि मेघाने एकदम हातंच पुढे केला.
'तुला चित्र आवडतात?...दे टाळी...मग मी तुला चित्रं काढायलाच शिकवीन...एकदम झकास चित्र काढशील बघ तू..'..मेघा मला चित्र काढायला शिकवणार? हे ऐकून मला एकदम झकास आनंद झाला आणि मी मेघाला जोरात टाळी दिली . कसला ग्रेट शब्द आहे झकास. झकास...झकास...झकास...झकास.
मग मी ते जाडे पुस्तक उलटेसुलटे करून पाहिले, त्याच्या मागे आपट्यांच्या नैनासारखा मागून केसांचा बॉपकट केलेल्या पण समोरून दातारकाकांसारखे टक्कल असलेल्या मिशीवाल्या माणसाचं चित्र होतं. मी विचारलं मग मेघाला...'हे कोणाचं चित्र आहे ? '
ती म्हणाली ' ते माझ्या बर्‍याच देवांपैकी सगळ्यात मोठ्या इंग्लिश देवाचं चित्र आहे'
'काय नाव या इंग्लिश देवाचं ?'
' शेक्सपियर '
'काय? शेक्पि...?'
'शे क् स पि अ र' असे म्हणत मेघाने साडेपाच वेळा माझ्या डोक्यावर टोमणा मारला. मग मला ते नाव एकदम पाठंच झाले. 'शे क स पि अ र...शे क स पि य र...शे स क पि र र' कसलं झकास नाव होतं. मला एकदम ग्रेटच वाटलं.
मग तेवढ्यात आई आली आणि मी दोन ग्लास रसना पिलो. आईने तर एकच ग्लास दिला होता, मग मेघाने मला हळूच तिचा पण ग्लास देऊन टाकला. तिने तर फक्त रसना प्यायचे नाटक केले आणि माझ्याकडे बघून डोळे गचकावले. मेघा ग्रेटंच होती. रुपा मिस पेक्षाही ग्रेट. झकास.

आई म्हणाली मग मेघाला ..' झाली का या खाष्टं पोराशी ओळख... सांभाळून रहा गं बाई...नाहीतर लग्नाआधीच सासुरवास वाटायचा तुला इथे.' मग त्या दोघी पावतास हसतंच बसल्या.
'आणि तू रे खाष्ट पोरा!....मेघा नाही...मेघामावशी म्हणायचं..काय !' आईने मला सल्ला दिला. कोणी सल्ला दिलेला मला आजिबात आवडत नाही.
मग मेघा हसून म्हणाली 'नाही गं सीमा मोठा गोड छोकरा आहे तुझा चिकू.....तू मला मेघाच म्हण रे चिकू....' आणि तिने माझा गालगुच्छ घेतला. मेघा ग्रेटच होती.

मग मी आणि टॉम्या आत गेलो आणि मेघाच्या सगळ्या पुस्तकातली चित्र बघून टाकली. आई आणि मेघा गॅलरीत लग्न्-बिग्न, सासू-बिसू, साडी-बिडी, अमेरिका-बिमेरिका असल्या काहीतरी टाकाऊ-बिकाऊ गोष्टी बोलत होत्या.

-----*****-----

मग मी रोज मेघाबरोबर रिक्षानेच शाळेत जाई तेव्हा रिक्षात रोज वेगवेगळ्या फुलांचा खूप ग्रेट वास येत असे. मेघाचं कॉलेजपण माझ्या शाळेजवळंच होतं आणि माझी शाळा पण तिच्या कॉलेजजवळच होती. ते खूप मोठ्या मुलांचं खूप मोठ्ठं कॉलेज होतं, पण मेघा सोडून त्या कॉलेजमधले सगळेच टीचर म्हातारे आणि दिवसभर चष्मा लावणारेच होते. आमच्या म्यूझिकच्या बडबडे मॅडमपण दिवसभर गळ्यामध्ये चष्मा घालतात.
मग मी गेलो होतो मेघाबरोबर एकदा, तिच्या कॉलेजमध्ये. तिथे एका मोठ्या वर्गात तर नुसती पुस्तकंच होती आणि शिड्यापण होत्या. आमच्या सगळ्या वर्गात फक्त बेंचच आहेत, शिड्या नाहीतच. पण मेघा कधीच शिडीवर बसत नसे. त्या वर्गाचे एक म्हातारे टीचर होते ते टीचर सारखे शिडीवर चढत आणि उतरत. मग मला त्यांची खूप दया येत असे.

एकदा मी रॉनी जेकबच्या वहीत एका दाढीवाल्या माणसाचं चित्र पाहिलं. तो माणूस दोन्ही हात आडवे आणि मान खाली करून उभ्यानेच झोपला होता. मग मी विचारले रॉनीला...' हे चित्र कुणाचे? '.
तर तो म्हणाला.... 'हे चित्र आमच्या इंग्लिश देवाचे आहे'.....मग मी त्याला सल्ला दिला.... 'हा इंग्लिश देव नाही , शेकस पियर इंग्लिश देव आहे'.
पण तो ऐकेचना. मग मी त्याला खूप वेळा शेकस पियरचा सल्ला दिला तर तो म्हणाला....
'मला माझ्या डॅडींनी सांगितलंय हा आमचा इंग्लिश देव येशू आहे'.
मग मी त्याला म्हणालो....' तू अजून लहान आहेस म्हणून तुझ्या डॅडींनी तुला फसवलं.' तर तो एकदम रडायला लागला. मग मला त्याची खूप दया आली आणि मी त्याला 'येशू पण इंग्लिश देव आहे...पण शेकस पियर सगळ्यात मोठा इंग्लिश देव आहे '. असा सल्ला दिला. मग तो रडायचा थांबला. मी लहानपणी मला दया आली की थोडं खोटं बोलत असे.

मग मी तेव्हा लहान असतांना जेवण झाल्यावर मेघाबरोबर रोज आमच्या गच्चीवर जाई. ती मला खूप सारी गाणी गाऊन दाखवत असे...एकदम झकास गाणी...तिचा आवाजपण खूप ग्रेट होता. बडबडे मॅडमपेक्षा सव्वाशेर तरी ग्रेट. मग मी तिला माझा बँजो वाजवून दाखवत असे. मला तिने सांगितले, तिच्याकडे नागपूरच्या घरी पेटी पण आहे आणि ती नागपूरला गेली की पेटी घेऊन येणार मग आम्ही दोघे पण पेटीवर गाणी म्हणणार. मेघा ग्रेट आहे. आईला गाण्यातलं काहीच कळत नाही.
मी एकदा आईला मदत म्हणून, ती देवीची आरती गात असतांना बँजो वाजवला. मग आई खूप चिडली आणि तिने माझा बँजो बाथरूमच्या माळ्यावर टाकून दिला. मी लहान असतांना तिथे माझा हात आजिबात पुरत नसे. मग मी आईची सांडशी फ्रीजमध्ये बर्फाच्या घरात लपवली आणि तिने माझा बँजो काढून दिल्यावरंच तिला परत दिली. तेव्हा मला आईची खूप दया आली होती आणि तिला पण माझी, म्हणून तिने मला पावतासभर बाथरूममध्ये कोंडले. तेव्हा टॉम्या खूप जोरात भुंकत होता, मग आईने त्याला पण माझ्याबरोबर बाथरूममध्ये पाठवले. तेव्हा मला बाथरूमच्या खिडकीतून दातारकाकू दिसल्या मग मी त्यांना ओरडून म्हणालो.....
' ओ दातारकाकू.....तुमचा फोन आहे !..' तर आईने मला टराटरा बाथरूममधून ओढून बाहेर काढले. मग दातारकाकू घरात आल्यावर आईने त्यांना 'फोन आला होता पण आता कट झाला' असे खोटेच सांगितले. मग तेव्हा मला दातार काकूंचीपण खूप दया आली पण मी फक्त बनियनच घातले होते म्हणून त्यांच्यासमोर गेलो नाही. लहानपणी मी घरात फक्त बनियनवरच रहात असे. शर्ट नाहीच.

एकदा आमच्या शाळेत कुणीतरी मोठ्या पोटाचे पाहुणे येणार होते, आणि ते शाळेला खूप पैसे देणार होते म्हणून आम्ही एक महिनाभर रोज दुपारी ग्राऊंडवर पावतास जनगणमनची प्रॅक्टीस करीत होतो. मी आणि नंदन देसाई तर एक गाणंपण गाणार होतो. तेव्हा नंदन देसाई म्हणाला... 'या पाहुण्यांच्या पोटात फक्त पैसेच असतात. ते सकाळी नाष्ट्याला, दुपारी जेवतांना आणि रात्रीपण पैसेच खातात. असे मला माझ्या बाबांनी सांगितले.' नंदनचे बाबा पोलिस आहेत, त्यांचेपण पोट खूप मोठे आहे. मग मी त्याला सांगितले.....
'तुझे बाबापण पैसेच खातात.' पण तो माझे ऐकेचना. मग मी त्याला तीनदा आग्रह करून सांगितले तर त्याने माझा गाण्याचा कागद फाडून टाकला. मग गाण्याच्या बडबडे मॅडमनी आम्हाला......
'जा वात्रट कार्ट्यांनो इथून....काही गाणंबिणं बसवणार नाही मी तुमचं.. जा पळा' असा सल्ला दिला. त्यांनी कारण नसतांना फार मोठ्याने ओरडून सल्ला दिला.
मग मी घरी गेल्यावर सांगितले मेघाला... 'बडबडे मॅडम फार वात्रट आहेत. फक्त कागद फाडला तर किती मोठ्याने सल्ला दिला. आणि माझं गाणंपण काढून टाकलं. मला गाणं तर पाठंच होतं.'
मग मेघा आली माझ्याबरोबर शाळेत आणि तिने बडबडे मॅडमना....'तुम्ही चिकूचं गाणं पुन्हा बसवा'...असा सल्ला दिला आणि मॅडमना तो आवडला. मग बडबडे मॅडम म्हणाल्या मेघाला.....'तुमचा आदित्य फार छान मराठी बोलतो...पण खूप बडबड्या आहे...' मी लहानपणी थोडी जास्त बडबड करीत असे. मग माझं गाणं पुन्हा झालं. एकदम झकास. मेघा तर ग्रेटंच होती.

मग एकदा मी आईकडे रात्री गच्चीवरच झोपण्यासाठी हट्ट केला तर आईने सरळ सांगितले......
'वा रे! हे काय नवीन नाटक आता.....गच्ची-बिच्ची काही नाही....हवं तर तू एकटाच टॉम्याला घेऊन जा.....बघू कितीवेळ झोपतोस.'....आणि आईने नाक वाकडे केले.
मग मेघाच म्हणाली...'चल चिकू मी येते तुझ्याबरोबर, आपण जाऊया आज गच्चीवर झोपायला' आणि आम्ही गच्चीत जाऊन झोपलो. तेव्हा मेघाने हळूच आईच्या कानात काहीतरी सांगितले, पण मला ते ऐकूच आले नाही. मला माहित्येय आईला एकटीला रात्री खूप भिती वाटते म्हणून तिने आईला सांगितले असणार...'तू घाबरू नकोस...चिकू आणि मी गच्चीवरच आहोत.' मेघा ग्रेटच होती.
पण मी सकाळी उठलो तर घरातंच होतो, तिथे गच्ची नव्हतीच. मेघाने सांगितले मग मला...'पहाटे ढगातून खूप बर्फ पडलं, म्हणून आपण खाली आलो. मी ते बर्फ फ्रीजमध्ये ठेवलंय आता आपण ते रसनात टाकू' ....मग तेव्हा मला खूप ग्रेट आनंद झाला आणि आम्ही बर्फ टाकून रसना प्यालो. एकदम झकासच होतं ते रसना.

मेघाकडे खूप सारे रंगीबेरंगी कागद होते. ती रोज रात्री त्यांच्यावर इंग्लिशमधून सारखं काही तरी लिहित असे. मी विचारले मग मेघाला..'हे तू काय लिहितेस? '
'मी ना...अं....गोष्टं लिहितेय रे चिकू....' मेघा म्हणाली.
'गोष्टं? मला पण सांगना मग एक गोष्टं.' मी म्हणालो.
'ऐकणार तू गोष्टं? चल मी तुला एक मस्तं गोष्टं सांगते ...' आणि मेघाने माझ्या डोक्यावर एक टोमणा मारला. मला एकदम ग्रेट वाटले.
मग मेघा आणि मी गच्चीवर गेलो आणि तिने मला संतू नावाच्या एका इंग्लिश मुलाची गोष्ट सांगितली... 'त्याच्याकडे खूप मेंढ्या होत्या.....मग त्याला रात्री एक स्वप्न पडले......स्वप्नातल्या छोट्या मुलाने सांगितले त्याला...'ए मुला तू त्रिकोणी मंदिरात जा, तिथे खूप पैसे आहेत'......पण त्रिकोणी मंदिर तर खूप लांब होते, दिल्लीपेक्षाही लांब......मग संतू गाणी गात गात निघाला...मग त्याला रस्त्यात एक म्हातारा राजा भेटला...त्याने त्याला त्रिकोणी मंदिराचा रस्ता सांगितला....मग संतू तिकडे गेला...तर त्याला एक चोर भेटला..तो संतूचे सगळे कपडे घेऊन पळून गेला....मग तेव्हा संतूला एक नवी मैत्रिण आणि एक खूप हुशार माणूस भेटला......मग संतूने रस्त्यात चोरांबरोबर लढाई केली आणि तो त्या त्रिकोणी मंदिरात पोहोचला.... पण पैसे तिथे नव्हतेच, ते तर दुसर्‍याच मंदिरात होते. मग संतू तिकडे गेला आणि त्याने पैसे मिळवले आणि श्रीमंत झाला...मग शेवटी संतू आपल्या नव्या मैत्रिणीकडे परत गेला.
कसली ग्रेट गोष्ट होती ती......एकदम झकासच.

पण मग एकदा म्हणजे खूप दिवसांनी म्हणजे माझा वाढदिवस येणार होता तेव्हा मेघाने मला सांगितले..... 'चिकू आता मी नागपूरला जाते आणि पेटी घेऊन येते मग मी पेटीवर तुला नवी गाणी शिकवीन आणि तू मला बँजो शिकंव चालेल?'
मी म्हणालो 'चालेल ! तू जा....पण लगेच परत ये'
'हो रे चिकू....अश्शी परत येते बघ मी'...आणि मेघा रात्री रेल्वेने निघून गेली.
मग खूप दिवस झाले म्हणजे खूपच दिवस झाले तरी मेघा आलीच नाही. मग मी आईला रोज विचारायचो......' आई सांगना मेघा कधी येणार'....पण आई मला नुसतंच... 'येईल रे ती लवकरच '... म्हणून सांगायची.
मी खूप वाट बघितली पण मेघा आलीच नाही. मग मला समजले आई मला लहान समजून फसवतेय. मग मी आईकडे....... 'मला मेघाकडे जायचंच'...म्हणून हट्टंच धरला, तेव्हा आई मला जवळ घेऊन म्हणाली ......' चिकू...बाळा कसं सांगू रे तुला....बघ! कुमुदमावशीचं झालंना मागे...तसं आता आपल्या मेघाचं पण लग्न होणार...आणि मग ती अमेरिकेला जाणार....खूप खूप लांब....आता नाही रे जमणार तिला आपल्याकडे यायला '.....मग तेव्हा मला खूप रडायला आलं. मी आणि टॉम्या आईच्या मांडीवर डोकं ठेऊन खूप खूप रडलो.
मग रात्री दिल्लीवरून बाबा आले त्यांनी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या गोष्टी आणल्या होत्या पण मला त्या आवडल्याच नाहीत. मला मेघाची खूप आठवण येत होती. मग मी रात्री झोपून गेलो आणि मला खूप ताप आला.
मग एक दिवस बाबा मेघाची सगळी पुस्तकं घेऊन पोस्टात गेले आणि त्यांनी ती मेघाला पाठवून दिली. मला त्यातले इंग्लिश देवाचे पुस्तक पाहिजे होते, मला त्यातली चित्रं खूप आवडत असत. पण मी काही बोललोच नाही.
मग काही दिवसांनी माझा वाढदिवस आला, तेव्हा एक खूप मोठा बॉक्स घेऊन दोन माणसे आमच्या घरी आली. त्यांनी एकदाच बेल वाजवली म्हणून टॉम्या खूप भुंकला.
मग बाबांनी बॉक्स उघडला तर बॉक्समध्ये मेघाने माझ्यासाठी तिची पेटी पाठवली होती. पेटी एकदम झकासच होती. मला खूप आनंद झाला पण तो आनंद ग्रेट नव्हता. पेटीबरोबर शेकस पियरचं ते पुस्तक आणि खूप सारे रंगीत कागद पण होते. त्यातल्या एका निळ्या कागदावर काहीतरी लिहिलं होतं. आई म्हणाली मेघाने मला पत्रं पाठवले आहे पण लहानपणी मला पत्रं वाचता येत नसे. मग आईनेच मला ते वाचून दाखवले.
'प्रिय चिकू....मला माफ कर दोस्त...मी तुला भेटायला परत नाही रे येऊ शकले. तू खूप शहाणा आणि गोड मुलगा आहेस. मी तुझ्यासाठी पेटी आणि इंग्लिश देवाचं एक पुस्तक पाठवत आहे. तू खूप मोठा हो, खूप पुस्तकं वाच खूप गाणी गा खूप चित्र काढ आणि....मोठा झालास की सगळं जग फिर....अमेरिकेलापण ये.' .... मेघाचं पत्रं ऐकून मला खूप ग्रेट आनंद झाला. मग मी ते टॉम्याला पण वाचून दाखवलं. नंतर मी ते पत्रं शेकस पियरच्या पुस्तकात ठेवलं आणि पुस्तक माझ्या उशीखाली ठेऊन मी झोपून गेलो.
मग रात्री मला मेघाने गच्चीवर सांगितलेल्या....त्या गाणी गात त्रिकोणी मंदिराकडे निघालेल्या मुलाच्या गोष्टीचे स्वप्न पडले. मी स्वप्नात पाहिले त्या मुलाला....तो तर एकदम माझ्यासारखाच दिसत होता. एकदम ग्रेट आणि झकास.

** समाप्त **

गुलमोहर: 

परत परत वाचून पूर्वीपेक्षाही जास्त आवडतेय... खुप गोड आणि निरागस!!
काही शब्द तर इतके गोड पावतासभर,ढावंगज, टोमणा...
आणि प्रसंगही इतके निरागस... सुंदर आणि सही सही बालविश्व उभं केलं आहे... चिकू खरंच खूप मस्त ग्रेट!!!

निव्वळ मस्त........................
निवडक दहामध्ये नोंदवतोय.......

मस्त मस्त ! दिन बन गया आज !
खूपच आवडली. किती निरागस भावविश्व उभं केलं आहे !

<<' मेघाला त्रास देऊ नकोस....तिला क्रूर आणि विक्षिप्त प्रश्न विचारू नको>>:खोखो: Biggrin
अगदी असलंच एक कॅरॅक्टर सध्या घरात वावरतंय, त्यामुळे असेल कदाचित...पण खूपच आवडली ! Happy
माझ्या निवडक दहात !

अख्खी गोष्टं... सही आहे... पुर्वी वाचल्याची आठवतेय आणि काही तपशील बदलल्याचंही जाणवतय. ते लहान मुलाचं बेअरिंग कुठे म्हणजे कुठेच सुटलं नाहीये... कमाल लिहिलीये.
खूप आवडली, चमन.

चमन ची ही कथा, साजिर्‍याची 'गावशीव' त्याचसोबत चिनूक्सचा "किनारा तुला पामराला" हा 'चाकोरीबाहेर' सदरातील लेख आणि श्रध्दाची 'सती' ही कथा हे 'माहेर' जानेवारी २०११ मध्ये प्रसिध्द झाले आहेत. सर्वांचे खूप खूप अभिनंदन! मायबोलीकरांच्या नवीन वर्षाची सुरुवात धडाक्यात झाली!! Happy

खुप छान ...आताच माहेर मधे वाचली..नेट वर शोधात असताना मायबोली वर सापडली..त्याआधी प्रतिक्रिया देण्यासाठी फेसबुक वर शोधलही तुला..पण आता इथे प्रतिक्रिया देत आहे..
जमलिये.. Happy
प्रकाश संतांच्या लंपनची आठवण आली..

Pages