दहि-बुत्ती

Submitted by मामी on 16 November, 2010 - 19:17
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तांदूळ, दूध, दहि, कोथिंबीर (बारीक चिरून).
फोडणीकरता (अंदाज आणि आवडीप्रमाणे) - तेल, मोहरी-जिरे, सुक्या लाल मिरच्या (लहान तुकडे करून), हिरव्या मिरच्या (अगदी बारीक कापून किंवा उभ्या अर्ध्या कापून), कढिपत्ता.

प्रमाणः दोन माणसांकरता
तांदूळ - एक वाटी
दूध - दोन ते अडीच वाट्या (गरम करून, साईसकट)
दही - २-३ टेबलस्पून

क्रमवार पाककृती: 

तांदूळ धुऊन काहीसा मऊ भात करून घ्यावा. तो होत असतानाच दुसर्‍या भांड्यात तेल घालून गरम झाल्यावर मोहरी-जिरे (हिंग नको), सुक्या मिरच्या, हिरव्या मिरच्या, कढिपत्ता घालून फोडणी करून घ्यावी. भात गरम असतानाच फोडणीत घालावा. चवीप्रमाणे मीठ घालून कालवून घ्यावा. त्यात दूध कोमट करून घालावे. साय असेल तर ती सुध्दा घालावी. पुन्हा कालवून झाकून ठेवावे. ५-७ मिनिटांत सगळे दूध भातात शोषले जाते. गार झाल्यावर आयत्यावेळी जेवढे हवे तेवढे दही घालून, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून नीट कालवून वाढावा.

अधिक टिपा: 

- आवडत असेल तर तळणीच्या मिरच्या वेगळ्या तळून कुस्करून घालाव्यात.
- ऑफिसमध्ये किंवा सहलीला वगैरे घेऊन जाताना थोडेच दही घालून करावा. म्हणजे आंबट होत नाही.

माहितीचा स्रोत: 
मूळ कृती आईची, त्यात स्वतः केलेले बदल
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोडणीत जळल्यावर दहिभातावर काळे कण दिसतात. मला स्वत:ला आवडत नाही ती चव. घातला तर काही बिघडत नाहीच म्हणा.

आमच्याकडे यात फोडणी घालत नाहीत ऐवजी कच्चा लसूण आणि काळी मिरी ठेचुन लावतात.

पिकनिकला वगैरे जाताना भात कोमट असताना साधारण १/२ वाटी ते १ वाटी दही बाकीचे दूध घालायचे. जाताना दह्याची बाटली घेऊन जायची ऐनवेळी घालायला Happy

आमच्याकडे यात फोडणी घालत नाहीत ऐवजी कच्चा लसूण आणि काळी मिरी ठेचुन लावतात. >>>> एकदा करून पाहिला पाहिजे.

अरे वा! ही एकदम झटपट कृती आहे. मी आपली रात्रभर विरजण लाव वगैरे उद्योग करायचे. माझ्या लेकीला हा भात प्रचंड आवडतो. उद्याच करते. थँक यू, मामी! शेअर केल्याबद्दल!

मी पण फोडणीत हिंग घालते, शिवाय उडीद डाळ, दाणे, डाळे फोडणीतच जरा तळून घेते. अल्टिमेट कंफर्ट फूड. मी अगदी दहीभात पर्सन आहे. Happy

बरोबर ताजे आंब्याचे लोणचे. हॉट चिप्स नावाच्या दुकानांमधून बटाट्याचे वेफर्स मिळतात ताजे ते ही मस्त लागतात. प्लेन सॉल्टेड किंवा तिखट लावलेले. ड्ब्यात देताना डाळीचा तिखट चपटा वडा असतो तो ही बरोबर मस्त लागतो.

इथे दक्षिणेत हॉटेल बुफे मध्ये हमखास असतो. जरा सरसरीत करून बोल मध्ये ठेवतात व वरून गाजराचा कीस शोभेला घालतात.

मस्त! मला ह्या दहीबुत्तीत द्राक्षे, डाळिंबाचे दाणे, बारीक कोचवलेली काकडी, कोथिंबीर घालून आवडते. आणि फोडणीत भिजवलेले शेंगदाणे, भिजवलेली हरभरा डाळ घालायची. सुकी लाल मिरची, कढीपत्ता घातलेली फोडणी. थोडी मिरपूडही घालायची.

मामी हा कोल्हापूरचा प्रकार आहे का ? तिथे हॉटेलमधे मिळतो असा भात.
अकु, सेम !! मला तर त्यात बुंदी, फोडणीची मिरची, काजूगर, सुरणाचे क्यूब्ज असे बरेच कायकाय घालून आवडते. उन्हाळ्यात हा भात चक्क फ्रीजमधे ठेवायचा. ज्यावेळी तल्लखीमूळे अन्नावरची वासना जाते, त्यावेळी हा भात सहज खाल्ला जातो.

कल्पू,
अरे वा! ही एकदम झटपट कृती आहे. मी आपली रात्रभर विरजण लाव वगैरे उद्योग करायचे. माझ्या लेकीला हा भात प्रचंड आवडतो. उद्याच करते. थँक यू, मामी! शेअर केल्याबद्दल!

>>>>>>>> दही झटपट नाही बरं का! ते विरजून तयार असलेच पाहिजे - निदान थोडेतरी.

दही करण्याची एक छान पध्दत. जी माझ्या साबांनीच मला शिकवली. दूध कोमटपेक्षा थोडे अधिकच गरम करून घ्यावे. एका दुसर्‍या भांड्यात दही मोडून घ्यावे (याला माझ्या साबा 'जामून' म्हणतात). साधारण अर्धा लिटर दुधाचे दही करायचे असेल तर चहाचा एक ते दिड चमचा दही पुरते. मग हे गरम दूध धार धरून दहिवाल्या भांड्यात वरून ओतायचे. दुधाला मस्तपैकी फेस आला पाहिजे. (पण जरा जपूनच हं नाहितर बाहेर सांडायचे आणि आपल्या तोंडाला फेस यायचा. - हा आपला उगाच विनोद!) असे या भांड्यातून त्या भांड्यात चांगले ८-१० वेळा करावे. डोळ्यापुढे आदर्श म्हणून दूधडेअरीवाला असू द्यावा म्हणजे धार अधिकच लांबवरून पडेल. असे ते फेसमय दूध कम भावी दही, दह्याच्या भांड्यात ओतून अलगद हातानं मायक्रोवेव मध्ये ठेवावे. या आधी मायक्रोवेव मध्ये जर काही गरम केले गेले असेल तर फारच उत्तम. नाहीतर एक कप पाणी गरम करून घ्यावे (विशेषतः पाहुणे वगैरे मंडळी येणार असतील तर आणि एकदम छान दही हवं असेल तर). नाहीतर तसेच आत ठेवावे. बाहेर ठेवले तरी अर्थातच चालेल. हे दूध जसजसे गार होते ना तसतसे दही लागते. त्यामुळे जरा जरी हलायचे बंद झाले की लगेच फ्रीजमध्ये टाकावे. म्हणजे अगदी मधूर दही मिळते. (सोर्स : एव्हाना लक्षात आलाच असेल. साबा.)

दिनेशदा, कल्पना नाही हो. मी पहिल्यांदा खाल्ला माझ्या आईच्या हातचाच. पण तमिळ लोकं वगैरे करतात ना म्हणून वाटलं की दाक्षिणात्य प्रकार असावा. कर्नाटकात सुध्दा करत असतीलच ना. त्यामुळे कोल्हापुरात आला असेल.

मामी सेम मेथड... पण माझ्या लक्षात आलेला आजुन एक पॉइंट. गरम दुधाचे भाडे गार पाण्यात ठेवुन कोमट ( बोट बुडवुन पहावे.. बोटाला सोसेल असे ) केले जास्त छान होते.. तसेच ठेवुन गार करण्यापेक्षा.. आणि तसेच गार करायला ठेवले तर खुप वेळा चेक करावे लागते Happy

वर्षा_म >>> हो का? स्वयंपाकघरात छोट्या छोट्या गोष्टीसुध्दा किती महत्वाच्या ठरतात ना?

मामी मस्त रेसीपी
आज संध्याकाळचा तोच मेनु Happy

मी इथे दही नाही लावत पण आई घरी अशाच पद्धतीनी दही लावते तुमच्या प्रमाणे.

मामी छान रेसिपी. मी दही बुत्तीला तुपाची फोडणी देते आणि ती पण भात कालवल्यावर वरून घालते. आणि त्यात अकु म्हणते त्याप्रमाणे चोचवलेली काकडी घालते. आता तुमच्या पद्धतीने करून बघेन.

अजुन एक बाहेर प्रवासाला जाताना या दही भातात एक मोठा बर्फाचा खडा ठेवायचा. त्यामुळे दही आंबट होत नाही. आणि भात छान गार राहातो.

हा प्रकार मी इथे आल्यानंतरचं खाल्ला. अर्था सिंगापुरात आल्यावर. यात किसलेला गाजर आणि मोठ्या हिरव्या मिरचीचे काप पण घालतात. मिरी पण चालतात. छान आणि सोपा प्रकार आहे हा.

नाही मी हाच भात म्हणत आहे. इथे सिंगापुरात माझे कलीग्स कित्येक वेळी आणतात हा भाग. बागला भात काय त्याची कृती तू सचित्र लिहि आता Happy

लिहि!!!! इथेचं अर्थात वेगळे पान उघडून लिहिली तर इतरांनाही माहिती होईल आणि चुकांची दुरुस्ती होईल. कदाचित पुर्ण अचूक कृती पण मिळू शकेल.

>>>>>>>> दही झटपट नाही बरं का! ते विरजून तयार असलेच पाहिजे - निदान थोडेतरी. Happy

मामी,

भाताला कोमट असताना विरजण लावते अस मला म्हणायच होत. पण त्या निमीत्ताने विरजणाची एक सही रेसिपी इथल्या सुगरणिना मिळाली.

कोकणात आमच्या आजीकडे असा भात करायचा असेल तर भात गरम गरम असताना दुधात चांगला कालवतात. दुध सायीसकट चांगलं भरपूर घालतात भात सैलसर होईपर्यंत आणि मग त्यात दह्याचा चमचा फिरवतात. मग त्यावर झाकण ठेवून विरजण लागण्यासाठी ठेवतात. मस्त घट्ट विरजण लागतं मग खायला घेण्याअगोदर मीठ घालून कालवतात, त्यावर साजूक तुपाची हिंग, जिरं, कढीपत्ता आणि सुक्या मिरच्यांची खमंग फोडणी.. अहाहा! पोटात कसं शांत शांत.

पावभाजी, मिसळ, रगडा पेटिस, छोले ह्यासारखं मसालेदार तिखट जेवण झाल्यावर हा दहीभात अगदी मस्ट असतो आमच्याकडे Happy

आर्च, त्यांच्याकडे घालत असतील हिरे. म्हणून तू घालायला हवेस असं नाही. तू आपले सेट करता राखून ठेव. Proud

कल्पू, मंजूडी- असं भातातच विरजण लावतात हे मला नवीनच आहे.

मोहरी-हिरे>

काय मामी, साहित्य वाचूनच धडकी भरली की हो.
>>>>> खरचं की, काय बारकाईने वाचलंय. केलं हं मी ते दुरुस्त! धन्स.

सायो, उन्हाळ्यात मी बऱ्‍याचदा असं भाताला विरजण लावून ऑफिसला घेऊन जाते. दुपारी डबा खाईपर्यँत मस्त विरजण लागतं. नुसता दहीभात नेला तर आंबटढाण होतो.

Proud
ऑफिसात फोडणी विरहीत दहीभात. 1 वाजता डबा खायचा तर 12 वाजता डबा ऑफिसच्या फ्रिजरमध्ये ठेवतो आम्ही.. द.भा. मैत्रिणी तिखट बुंदी वगैरे घालून खातात पण आम्हा मराठींसाठी उसळी मिरची झिंदाबाद Happy

Pages