नितांत सुंदर 'फेवा लेक' आणि परिसर - पोखरा, नेपाळ

Submitted by संजय भावे on 3 December, 2023 - 00:58

काळ बदलला तसे पर्यटनाचे स्वरूपही बदलले. 'ज्ञानार्जन, हवापालट, देवदर्शनासाठी धार्मिक स्थळांना दिल्या जाणाऱ्या भेटी किंवा विविध भौगोलिक प्रदेशांतील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी केलेला प्रवास' अशी काही दशकांपूर्वीपर्यंत असलेली पर्यटनाची साधी सरळ व्याख्या आता कालबाह्य झाली असून रोजच्या धकाधकीच्या जीवनशैलीपासून दूर होऊन चार विरंगुळ्याचे क्षण मिळवण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रवासात व्यक्तिगणिक बदलणाऱ्या आवडी-निवडी, छंद आणि मनोरंजनविषयक कल्पना विचारात घेऊन धार्मिक पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, वारसा पर्यटन, क्रीडा पर्यटन, कृषी पर्यटन, जंगल पर्यटन, जल पर्यटन, साहसी पर्यटन अशा अनेक प्रकारांत त्याचे वर्गीकरण झाले आहे.

उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम अशा भारतातल्या पाच राज्यांशी तब्बल १७७० किलोमीटर लांबीच्या खुल्या आंतरराष्ट्रीय सीमेने जोडलेला, एक लाख ४७ हजार १८१ चौ.कि.मी. क्षेत्रफळ असलेला, म्हणजे तौलनिकदृष्ट्या आपल्या छत्तीसगड राज्यापेक्षा थोडा मोठा आणि ओडिशा राज्यापेक्षा आकाराने थोडा लहान असलेला आणि दक्षिणेकडे उत्तर प्रदेश आणि बिहार ह्या राज्यांच्या सीमेवर पूर्व-पश्चिम पसरलेले, समुद्रसपाटीपासून अवघ्या ५०-६० मीटर उंचीवरचे 'तराई क्षेत्र' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगेच्या सपाट मैदानी प्रदेशापासून पुढे 'शिवालिक टेकड्या', 'महाभारत पर्वतरांग', 'इनर हिमालया' ते उत्तरेकडे संपूर्ण तिबेटची सीमा व्यापणाऱ्या 'ग्रेट हिमालया'तील जगातले सर्वोच्च पर्वतशिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टच्या रूपाने समुद्रसपाटीपासून ८,८४८.८६ मीटर इतकी उंची गाठणारा, प्राचीन ऐतिहासिक वारशाने, वैविध्यपूर्ण संस्कृतीने आणि निसर्गसौंदर्याने समृद्ध असलेला नेपाळ हा दक्षिण आशियाई देश जगभरातील अबालवृद्ध पर्यटकांच्या उपरोल्लिखित सर्व पर्यटनविषयक अपेक्षा पूर्ण करण्यास सक्षम आहे.

नेपाळला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये धार्मिक पर्यटनासाठी पौराणिक-धार्मिक संदर्भ असलेले, अतिशय सुरेख आणि भव्य असे 'जानकी मंदिर' आणि श्री राम-सीता ह्यांचा विवाह झालेला 'मणी मंडप' व अन्य काही धार्मिक पर्यटन स्थळांसाठी प्रसिद्ध असलेले 'जनकपूर'; 'पशुपतीनाथ' आणि 'चांगू नारायण' अशी दोन भव्य प्राचीन मंदिरे, 'काठमांडू दरबार स्क्वेअर (बसंतपूर)', 'पाटण दरबार स्क्वेअर (ललितपूर)', 'भक्तपूर दरबार स्क्वेअर (भक्तपूर)' ह्या १३व्या ते १८व्या शतकातील तीन प्राचीन राज्यांच्या राजधान्या असणाऱ्या नगरांतील अप्रतिम काष्ठशिल्पे असलेली मंदिरे व महाल आणि 'बौद्धनाथ' व 'स्वयंभूनाथ' असे दोन प्राचीन स्तूप अशा युनेस्कोने 'जागतिक वारसा स्थळे' म्हणून जाहीर केलेल्या सात स्थळांचा समावेश असलेले 'काठमांडू खोरे'; वन पर्यटनासाठी युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केलेले 'चितवन राष्ट्रीय उद्यान' ही ठिकाणे लोकप्रिय आहेतच, पण त्याचबरोबर ग्रेट हिमालयाच्या कुशीतले 'ऑल इन वन' अनुभव देणारे 'पोखरा खोरे'देखील अत्यंत लोकप्रिय असून ते नेपाळची 'पर्यटन राजधानी' म्हणून ओळखले जाते.

जगातल्या सर्वोच्च दहा पर्वतशिखरांपैकी तब्बल आठ शिखरे नेपाळमध्ये आहेत. पोखरा ते सारंगकोट अशा हौशा-नवश्या गिर्यारोहकांसाठीच्या एक दिवसीय ट्रेकपासून दहा दिवसांचा 'अन्नपूर्णा बेस कॅम्प' असा थोड्या अनुभवी गिर्यारोकांसाठी, तर दोनशे तीस किलोमीटर लांबीच्या, बावीस दिवसांच्या 'अन्नपूर्णा सर्किट' सारखे तरबेज गिर्यारोकांसाठी असे सुमारे वीस ते पंचवीस पर्याय पोखरा व्हॅलीत उपलब्ध असल्याने जगभरातल्या गिर्यारोहकांची ही पंढरीच आहे.
माउंटन सायकलिंगची आणि माउंटन बायकिंगची आवड असणाऱ्यांना आकर्षित करणारे, आपल्या लडाख आणि लाहौल-स्पितीसारखे निसर्गरम्य पर्वतीय 'शीत वाळवंट'देखील पोखरा खोऱ्यातील 'मस्टांग' जिल्ह्यात आहे.
'व्हाईट वॉटर राफ्टिंग', 'कयाकिंग', 'बंजी जंपिंग', 'झिप लायनिंग', पॅराग्लायडिंग, 'माउंटन फ्लाइट', 'अल्ट्रा लाइट प्लेन फ्लाइट', 'हेलिकॉप्टर राइड' अशा अनेक रोमांचक अ‍ॅक्टिव्हिटीज हिमालयात करण्याची संधी पर्यटकांना पोखरात मिळते. त्याचप्रमाणे 'पुमदीकोट महादेव', 'विश्व शांती स्तूप', 'डेवी'ज फॉल', 'गुप्तेश्वर महादेव गुंफा', 'केदारेश्वर महादेव मंदिर', 'महेंद्र गुंफा', 'विंध्यवासिनी मंदिर', सारंगकोटचा 'सनराईज पॉइंट' आणि 'रोप-वे', खरेदीसाठी प्रसिद्ध असलेला जुना पोखरा बाजार, 'इंटरनॅशनल माउंटन म्युझिअम' अशी अनेक अन्य प्रेक्षणीय स्थळे पोखरामध्ये असली, तरी त्या सगळ्यांचा आढावा एका लेखातुन घेणे अशक्य असल्याने सदर लेखाचा फोकस हा पोखराची शान असलेले 'फेवा लेक', ह्या तलावातल्या बेटावरचे 'ताल बाराही' मंदिर, आणि 'लेक साइड' परिसरातल्या थोड्या मजामस्ती एवढ्यापुरताच मर्यादित ठेवत आहे.

'फेवा लेक' आणि त्यातले 'ताल बाराही' मंदिर.
fewa-1

.

ताल बाराही मंदिर १
.

'फेवा लेक' आणि त्यातल्या 'ताल बाराही' मंदिराच्या उत्पत्तीविषयी अनेक आख्यायिका / दंतकथा सांगितल्या जात असल्या, तरी त्यातली सर्वाधिक मान्यताप्राप्त आख्यायिका अशी -

कोणे एके काळी 'फेवा' नावाचे एक नगर होते. उत्तम हवापाणी आणि सुपीक जमीन असे शेतीसाठी अनुकूल वातावरण असल्याने शेतीवाडीतून होणाऱ्या मुबलक उत्पादनाच्या जोरावर नगरातले रहिवासी सधन-संपन्न होते. अशा समृद्ध नगरातील सधन नागरिकांच्या दातृत्वाची परीक्षा घेण्यासाठी भगवती देवी भुकेल्या भिकारिणीच्या वेशात प्रकट होऊन घरोघरी जाऊन अन्नाची मागणी करू लागली. नगरातील एकाही कुटुंबाने तिला अन्न-पाणी न देता अपमानित करून हाकलून लावले होते, परंतु नगराच्या वेशीजवळ काठमांडूहून तेथे स्थलांतरित होऊन जमिनीच्या छोट्याशा तुकड्यावर शेती करून आपली उपजीविका चालवणाऱ्या एका गरीब दांपत्याने तिला पोटभर जेवू-खाऊ घातले होते.

नगरातल्या धनिकांच्या गोरगरिबांप्रती असलेलया बेपर्वाईतून मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे क्रोधित झालेल्या भगवती देवीने फेवा नगराचा विनाश करून तिथल्या असहिष्णू नागरिकांना अद्दल घडवण्याचा आपला निर्णय जाहीर करून ह्या गरीब पण कनवाळू दांपत्याला त्या विनाशापासून वाचवण्यासाठी शेजारच्या एका टेकडीवर आपला संसार थाटायला सांगून आशीर्वाद दिला. भगवती देवीच्या सांगण्याप्रमाणे हे कुटुंब त्या टेकडीवर स्थलांतरित झाल्यावर देवीने नगराला सर्व बाजूंनी वेढणाऱ्या डोंगर-टेकड्यांपैकी दोन टेकड्या नाहीशा करून त्यांच्यामुळे अडलेल्या जलसाठ्याला मार्ग मोकळा करून देत फेवा नगराला जलसमाधी दिली.

संपूर्ण फेवा नगर पाण्याखाली जाऊन तिथे हा तलाव निर्माण झाला आणि ते गरीब दांपत्य वास्तव्यास असलेली टेकडी चहूबाजूंनी पाण्याने वेढली जाऊन तयार झालेल्या ह्या प्रचंड तलावात एका बेटाच्या रूपाने अस्तित्वात राहिली. ह्या जलप्रलयापासून आपल्याला वाचवणाऱ्या भगवती देवीप्रती आपला भक्तिभाव प्रकट करण्यासाठी त्या दांपत्याने ह्या बेटावर देवीचे छोटेसे मंदिर बांधले होते.

पुढे सोळाव्या शतकात कास्कीचा राजा कुलमंडन शाह ह्याने त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. दगड, लाकूड आणि धातू यांचा वापर करून पॅगोडा शैलीत बांधलेल्या ह्या छोट्याशा दुमजली मंदिराचा कळस स्वर्णाच्छादित आहे. आपल्याकडे सहसा सप्तमातृका पूजल्या जातात, त्याप्रमाणे नेपाळमध्ये पूजल्या जाणाऱ्या अष्टमातृकांपैकी एक असलेल्या 'वाराही' देवीला (नेपाळी भाषेत 'बाराही') समर्पित केलेले हे तलावातील मंदिर 'ताल बाराही' तसेच दुर्गा हे भगवती देवीचेच नाव असल्याने दुर्गा मंदिर म्हणूनही ओळखले जाते.

विशाल फेवा तलावातील बेटावर असलेल्या ह्या मंदिरात जाण्यासाठी बोटीशिवाय अन्य पर्याय नाही. तलावात नौकानयन करण्यासाठी किनाऱ्यावरील धक्क्यावर स्वतः वल्हवण्याच्या आणि नावाड्यासहित असे दोन्ही पर्याय उपलब्ध असलेल्या छोट्या होड्या आणि पॅडल बोट्स भाड्याने मिळतात, तसेच केवळ मंदिरात जाण्या-येण्यासाठी शेअर बोटीचा पर्यायही उपलब्ध आहे.

ताल बाराही मंदिर २

.

ताल बाराही मंदिर 3
.

ताल बाराही मंदिर 4
.

नेपाळ मधल्या 'रारा लेक' नंतर आकारमानाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या फेवा लेकचे क्षेत्रफळ जवळपास साडेचार वर्ग किलोमीटर एवढे विशाल आहे. ह्या तलावाच्या चार किलोमीटर लांबीच्या काठावर वसलेल्या पोखरा शहराची, विशेषतः 'लेकसाईड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसराची 'नेपाळचे गोवा' अशीही ओळख आहे. अर्थात समुद्रकिनारा नसलेल्या ह्या भूवेष्टित देशातील रहिवासी ह्या तलावाच्या काठाला 'बीच' म्हणून दुधाची तहान ताकावर भागवत असले तरी काही बाबतीत पोखरा व लेकसाईड परिसर आणि गोव्यात साम्य देखील आहे.

गोव्याप्रमाणेच निसर्गरम्य आणि 'सुशेगात' जीवनशैली असलेल्या ह्या शहरात पर्यटकांना मौज-मस्तीसाठी भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. प्रसन्न सकाळी, संध्याकाळी किंवा रात्री 'फूट ट्रॅकवर मारलेल्या एखाद-दोन लांबलचक चकरा असोत कि खादाडी, रात्री उशिरापर्यंत नाईटलाईफ अनुभवणे असो कि दिवसातल्या कुठल्याही वेळी, बाकी काही न करता, नुसते किनाऱ्यावरच्या एखाद्या बाकड्यावर किंवा गझेबोमध्ये निवांतपणे काही तास बसून आसपासचा निसर्ग, त्याची पाण्यात पडणारी प्रतिबिंबे पाहणे असो, ह्या सर्वच गोष्टी आनंददायी वाटतात.

दोन अडीच किलोमीटर लांबीच्या फूट ट्रॅकच्या एका बाजूला विस्तीर्ण जलाशय तर दुसऱ्या बाजूला शेकडो लहान-मोठी खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने, बार अँड रेस्टोरंटस, अ‍ॅम्यूजमेंट पार्क अशा गोष्टी आहेत. मद्याची रेलचेल आणि मत्स्याहार प्रेमींसाठी माशांचे विविध प्रकार हे देखील गोव्याशी असलेले आणखीन एक साम्य, अर्थात मद्याच्या किमतीच्या बाबतीत गोव्याशी अजिबात तुलना होऊ शकत नाही हा भाग वेगळा, पण विक्रीच्या बाबतीत बघितलं तर अक्षरशः इथल्या चहाच्या टपरीतही मद्यविक्री होताना दिसते.

फेवा सरोवराकाठचे अ‍ॅम्यूजमेंट पार्क
अ‍ॅम्युजमेंट पार्क १

.

अ‍ॅम्युजमेंट पार्क २
.

अ‍ॅम्युजमेंट पार्क ३
.

अ‍ॅम्यूजमेंट पार्कमधल्या 'जायंट व्हील'मधून दिसणारी फेवा लेकची आणि फूट ट्रॅकची विहंगम दृश्ये
अ‍ॅम्युजमेंट पार्क ४
.

अ‍ॅम्युजमेंट पार्क ५
.

अ‍ॅम्युजमेंट पार्क ६
.

पोखराचे 'डिस्नीलँड' म्हणवल्या जाणाऱ्या ह्या अ‍ॅम्यूजमेंट पार्कमध्ये जायंट व्हील, ब्रेक डान्स, डॉजेम कार, पायरेट शिप, स्केटिंग आणि अन्य पाच-सात नेहमीच्या लहान-मोठ्या राईड्स पेक्षा फार काही वेगळी आकर्षणे नसली तरी इथल्या जायंट व्हील मधून दिसणारी परिसराची दृश्ये मात्र विलोभनीय आहेत.

सुमारे दोन ते अडीच किलोमीटर लांबीच्या फूट ट्रॅकवरून दिवसातल्या वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या कोनांतून दिसणारी फेवा लेकची नयनरम्य दृश्ये
फुट-ट्रॅक
स्वच्छ-सुंदर फरसबंद फूट ट्रॅक ▲

fewa-lake

.

फेवा लेकची वेगवेगळी रुपे १
.

फेवा लेकची वेगवेगळी रुपे २
.

फेवा लेकची वेगवेगळी रुपे ३
.

फेवा लेकची वेगवेगळी रुपे ४
.

फेवा लेकची वेगवेगळी रुपे ५
.

फेवा लेकची वेगवेगळी रुपे ६
.

फेवा लेकची वेगवेगळी रुपे ७
.

 फेवा लेकची वेगवेगळी रुपे ८
.

फेवा लेकची वेगवेगळी रुपे ९
.

फेवा लेकची वेगवेगळी रुपे १०
.

फेवा लेकची वेगवेगळी रुपे १०
.

लेक साइड परिसरातील 'नाइट लाइफ':

लेकसाईड फूट ट्रॅक हि पोखरामधली एकदम 'हॅपनिंग प्लेस', त्यामुळे इथल्या वास्तव्यासाठी 'लेकसाईड' परिसरातले हॉटेल बुक करणे श्रेयस्कर! फूट ट्रॅक लगतच्या अनेक गार्डन बार अँड रेस्टोरंट्स पैकी बऱ्याच ठिकाणी रात्री बारा पर्यंत पररवानगी असल्याने लाईव्ह ऑर्केस्ट्रा, डीजे आणि अन्य नृत्यगायनाचे कार्यक्रम सुरु असतात ज्यात पर्यटक खात-पीत किंवा भटकंती करत छानपैकी नाईटलाईफ एन्जॉय करतात त्यामुळे रात्री उशिरापर्यंत इथे बऱ्यापैकी वर्दळ असते.

 फुट ट्रॅक १

.

 फुट ट्रॅक २
.

 फुट ट्रॅक ३
.

 फुट ट्रॅक ४
.

 फुट ट्रॅक ५
.

फुट ट्रॅक ६
.

 फुट ट्रॅक ७
.

 फुट ट्रॅक ८
.

तुंबा (Tumba / Tongba)

फूट ट्रॅकवर संध्याकाळी फेरी मारत असताना स्थानिकांकडे आधी केलेल्या चौकशीत वरच्या फोटोत दिसणाऱ्या 'दुना टपरी मो मो हाऊस' नामक लहानशा रेस्टोरंटमध्ये 'तुंबा' चांगली मिळत असल्याचे समजले होते. तुंबा म्हणजे नेपाळी लोकांची एकप्रकारची पारंपरिक घरगुती बिअर. थंडीच्या दिवसांमध्ये हिमालयानजीकच्या पहाडी जमातींमध्ये घरोघरी तुंबा बनवून अबालवृद्धांद्वारे तिचे सेवन केले जाते. बाजरी पासून बनणारा हा पारंपरिक सौम्य मद्यप्रकार तांत्रिकदृष्ट्या बिअर गटात मोडत असला तरी त्याची निर्मितीप्रक्रिया आणि सेवनपद्धती मात्र बिअरपेक्षा वेगळी आहे.
तुंबा १

एक ते तीन आठवडे आंबवलेली बाजरी एका विशिष्ट आकाराच्या कंटेनरमध्ये अर्ध्याच्यावर भरून सेवन करण्याआधी त्यात उकळते पाणी ओतले जाते. त्यानंतर साधारणपणे पाच ते सात मिनिटांत आंबलेल्या बाजरीतले अल्कोहोल त्या गरम पाण्यात मिसळल्यावर त्या कंटेनरच्या मध्यभागी असलेल्या स्ट्रॉने ह्या गरम गरम पेयाचे सेवन केले जाते. त्या कंटेनरमधले पेय संपले कि पुन्हा त्यात उकळते पाणी ओतायचे आणि पाच-सात मिनिटे थांबून त्याचे सेवन करायचे. हि क्रिया सहसा दोन किंवा तीन वेळा केली जाते.
तुंबा २

एक वेगळा अनुभव म्हणून हे 'उष्ण' पेय प्यायला मजा आली, पण त्यासाठी मोजावी लागलेली किंमत मात्र जरा जास्तच वाटली. असो, पर्यटनस्थळी गोष्टी महागच असतात त्यामुळे 'व्हॅल्यू फॉर मनी' वाटली नसली तरी 'तुंबा' मात्र आवडली!

डान्सिंग बोट पबः
रात्री बारा वाजता फूट ट्रॅकवरची 'जत्रा' संपते पण खरे नाईटलाईफ हे बारानंतरच तर सुरु होते असे वाटणाऱ्या किंवा 'ये दिल मांगे मोअर' अशा गटातले तुम्ही असाल तर निराश व्हायचे कारण नाही! फूट ट्रॅकला समांतर असलेल्या 'बैदम रोड' ह्या हमरस्त्यावर काही चांगले पब्स आणि क्लब्स आहेत जे मध्यरात्री दोन वाजेपर्यंत सुरु असतात, त्यापैकीच एक हा 'पब डान्सिंग बोट'.

हॉटेलच्या रिसेप्शनिस्टकडे इथला चांगला क्लब,पब कुठला आहे अशी विचारणा केली असता त्याने चांगला क्राउड, उत्तम सजावट असलेल्या, दर्जेदार खाद्यपदार्थ आणि कॉकटेल्स मिळणाऱ्या ह्या तीन मजली पबचे नाव सुचवले होते. कोविडपूर्व काळात भरपूर नावलौकिक असलेल्या ह्या ठिकाणाला लॉकडाऊन काळात पर्यटन ठप्प झाल्याने बराच फटका बसला होता. त्यावेळी बराच काळ बंद राहिलेला हा पब नव्या व्यवस्थापनाखाली पुन्हा सुरु झाला पण काही महिन्यांनी पुन्हा बंद झाला होता. गेल्यावर्षी मूळ मालकांपैकीच कुणीतरी पुन्हा तो सुरु केला असून अद्याप तरी चालू आहे अशी अतिरिक्त माहितीही रिसेप्शनिस्टने दिली होती. प्रत्यक्ष त्याठिकाणाला भेट दिल्यावर त्याने सांगितल्याप्रमाणे इथले सर्व काही छान वाटल्याने हा पब पुढेही असाच व्यवस्थित सुरु राहो अशी सदिच्छा मनात निर्माण झाली.

डान्सींग बोट १

.

डान्सींग बोट २
.

गॉडफादर्स पिझ्झेरिआ

नेपाळमध्ये खाण्यापिण्याचे तसे हाल होत नसले तरी त्या बाबतीत फार नखरे असणाऱ्या लोकांना खूप लवकरच 'नेपाळी भोजन', 'थकाली' वगैरे स्थानिक खाद्यसंस्कृतीचा कंटाळा येऊ शकतो. मी पण अशांपैकीच एक! मांसाहाराची विशेष आवड नाही, रेड मीटची तर बिलकुल नाही, मत्स्याहार अजिबात करत नाही, चमचमीत-मसालेदार पदार्थांची आवड असल्याने तिखट-मीठ उन्नीस-बीस झालेले चालत नाही, तिथे पावला पावलावर मिळणारा मोमो'ज हा पदार्थ तर घशाखाली उतरत नाही वगैरे वगैरे....

त्यामुळे १३ दिवसांच्या नेपाळ ट्रीपमध्ये सुरुवातीच्या जनकपूर आणि काठमांडू मधल्या चार-पाच दिवसांतच स्थानिक आणि तिथे मिळणाऱ्या उत्तर भारतीय पदार्थांना कंटाळलो नसतो तरच नवल होते. मग चांगले आणि आवडीचे पदार्थ कुठे मिळतील ह्याचा शोध घेतला असता बैदम रोडवरचे 'गॉडफादर्स पिझ्झेरिया' हे ऑथेंटिक इटालीयन पिझ्झा मिळणारे ठिकाण सापडले!

गॉडफादर्स पिझ्झेरिआ १गॉडफादर्स पिझ्झेरिआ २
मस्तपैकी हातानी लाटून पिझ्झा बेस बनवून त्यावर सॉस आणि टॉपिंग्स वगैरे पसरवून...
गॉडफादर्स पिझ्झेरिआ ३
त्यावर इच्छित असलेली 'याक चीज' आणि अन्य एक्स्ट्रा टॉपिंग्स वगैरे घातल्यावर 'वुड फायर ओव्हन' नामक भट्टीत टाकणाऱ्या आचाऱ्याच्या सगळ्या सराईत कृतींचे फोटो काढू देण्यास अनुमती देणाऱ्या देखण्या व्यवस्थापिकेचे आभार मानावे तेवढे आणि त्या आचाऱ्याचे कौतुक करावे तितके थोडेच...

गॉडफादर्स पिझ्झेरिआ ३
भट्टीतून काढलेले गरमागरम पिझ्झा तसेचही चवीला भारी लागत होते, पण चिली फ्लेक्स, ओरिगॅनो आणि Tabasco सॉस घातल्यावर तर अप्रतिम लागत होते. त्यांची मजा द्विगुणित करायला जोडिला 'गोरखा स्ट्रॉंग' (आपल्याकडच्या माईल्ड आणि स्ट्रॉंगच्या मध्ये बसेल अशी) हि स्थानिक बिअर आणि Somersby Apple Cider ही होतेच!
तर मंडळी तुर्तास इथेच थांबतो... पोखरा आणि नेपाळ मधल्या उर्वरित ठिकाणांबद्दल लिहिण्याचा लवकरच प्रयत्न करतो.

जय हिंद ! जय महाराष्ट्र !

तळटिपः सदर लेख १२ नोव्हेंबर २०२३ रोजी मिपा दिवाळी अंकात प्रकाशित झालेला आहे.

.
Group content visibility: 
Use group defaults

मस्त लेख व फोटो. नेपाळची सेल रोटी फेमस आहे. एकदा ती बनवु म्हणून व्हि डिओ बघितला तर फारच खटाटोप आहे म्हणून सोडून दिले.

लेक साधारण पवई लेक सारखा आहे.