लेखन स्पर्धा-२ - फिटे अंधाराचे जाळे... -- ऋन्मेऽऽष

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 September, 2023 - 10:34

लेखन स्पर्धा-२ - फिटे अंधाराचे जाळे... -- ऋन्मेऽऽष

लाखो करोडोंच्या गर्दीत मी एकटा होतो. ना पुरेशी हवा होती ना धड प्रकाश होता, अश्या रस्त्यावरून वाट फुटेल तिथे धावत होतो. सोबत धावणारे माझे भाऊबंद नाहीत तर स्पर्धक आहेत हे समजायला एक काळ जावा लागला. ना मी त्या सर्वात वेगवान होतो, ना सर्वात सशक्त होतो. नशीबवान तर बिलकुल नव्हतो. पण तरीही एक गुण होता माझ्यात. तो म्हणजे चिकाटी. ती मी शेवटपर्यंत सोडली नाही, आणि अखेरीस फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश म्हणत मी या जगात जन्माला आलो Happy

sperm quote 1.jpg

...

पण आयुष्याचा संघर्ष ईथे संपला नव्हता तर सुरू झाला होता. माझाच नाही तर तुम्हा आम्हा सर्वांचाच ईथे सुरू होतो.
बालपणीचा काळ सुखाचा असे म्हणतात. माझ्या आयुष्यातील देखील तो सर्वात सुंदर काळ होता. पण त्यालाही संघर्षाची झालर होतीच.

दक्षिण मुंबईतील चाळीतले आयुष्य जगताना मी जी धमाल केली त्यावर शेकडो लेख लिहिले तरी त्याची शब्दांत मोजदाद होणार नाही. लिमिटेड रिसोर्सेस असूनही प्रोजेक्ट सक्सेसफुल केल्याचे समाधान वेगळेच असते. आयुष्याचेही असेच असते. हे सुख समाधान अनुभवायचे असेल तर तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येऊ नये. मी अगदी सोन्याचा नसला तरी चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेलो. एकुलता एक मुलगा. आईवडील दोघेही चांगल्या पगाराच्या सरकारी नोकरीत. चाळीतील शेजारच्या पाजारच्या लोकांपेक्षा सुखवस्तू म्हणावे असे घर.. पण फार काळ हे सुख टिकले नाही.

बालपणीचा जो काळ आपल्याला जेमतेम आठवतो तोपर्यंत आमची घरची आर्थिक परीस्थिती चांगली होती. पण वडिलांना नऊ ते पाच सरकारी नोकरीत रस नव्हता. व्यवसाय नेहमी खुणावत राहायचा. त्यासाठी जे गुणकौशल्य अंगी लागतात त्यातले काही त्यांच्याकडे होते. पण आयुष्य म्हटले की सगळेच कुठे मनासारखे घडते? बघता बघता डोक्यावर कर्जाचा डोंगर चढला. जो उत्पन्न आणि मालमत्तेपेक्षा वरचढ होता. त्यातून बाहेर पडायला कित्येक वर्षे जावी लागली. हा संघर्ष खरे तर माझ्या आईवडीलांचा. पण आता ते मायबोली सदस्य नसल्याने यावर लिहू शकत नाहीत आणि मी ते सविस्तर लिहिणे ऊचित होणार नाही. पण या सगळ्याची झळ माझ्या बालपणाला देखील बसली होती.

मारुती गाडीची तेव्हा मला फार क्रेझ होती. रस्त्याने मारुती जाताना दिसली की मी मोठ्याने मारुतीsss म्हणून ओरडायचो. घरची सुबत्ता पाहता लवकरच ती आपल्या घरात येईल अशी चिन्हे खुणावत होती. पण त्याच काळात परिस्थिती बदलू लागली आणि स्वतःचे खाजगी वाहन घेणे दूर, टॅक्सी परवडत नाही म्हणून तास दिड तास वेळ गेला तरी बसच्या रांगेत प्रतीक्षा करणे नशिबात आले. त्यातही अर्ध्या तासाचे अंतर असेल तर चालत जाऊन बसचे पैसे देखील वाचवावेत हे अंगवळणी पडले. कॅडबरी चॉकलेट आणि फ्रूटी वगैरे जंक फूड आहे, त्याचा हट्ट करू नये हे संस्काराचा भाग झाले. दिवाळी आणि वाढदिवस हे आयुष्यात नवीन कपडे मिळावेत म्हणूनच येतात ही आपली संस्कृती वाटू लागली. खेळणी हा प्रकार आयुष्यात मग कधी आलाच नाही. ज्याची बॅट त्याला एक्स्ट्रा बॅटींग दिली की आपल्याला फुकट खेळायला मिळते हा व्यावहारीकपणा समजला.

खरे तर भारतातील दारिद्र्य रेषेखालील जनता पाहिली तर त्या तुलनेत मी काही हलाखीचे जीवन जगत नव्हतो. पण तरी बालपणी जेव्हा समज येऊ लागली तेव्हा आर्थिक परिस्थिती डोळ्यासमोर बदलताना बघत होतो. तिच्यासोबत जुळवून घेत होतो. आणि त्याचमुळे वयाला न शोभणारा समजूतदारपणा अंगी येत होता.

केळा वेफर माझ्या फार आवडीचे. पण ते आईच्या पगाराच्या दिवशीच यायचे. ईतर दिवशी सुका खाऊ म्हणून परवडावे अशी एक सुकी भेळच उरली होती. जी मला फार आवडायची नाही. पण ओली भेळ जास्त किंमतीची असल्याने ती आवड मनातच ठेवायचो, आणि मला सुकी भेळच जास्त आवडते असे दाखवायचो, अन्यथा आपल्या एकुलत्या एक मुलाची आवड आपण पुर्ण करू शकत नाही याचे आईवडिलांना वाईट वाटले असते. माझ्यातील समजूतदारपणा दहा-बारा वर्षांचे असतानाच या लेव्हलला गेला होता Happy

खाऊ असो वा कपडे, खेळणी किंवा गोष्टींची पुस्तके, वा मित्रांसोबत पिकनिकला जाणे, पार्टी करणे.. जिथे जिथे पैसा लागतो ते मी स्वेच्छेने टाळू लागलो. पण यात कुठेही माझे मन मारले जात नव्हते. अश्या प्रकारे आपण आपल्या आईवडिलांना मदतच करत आहोत असे वाटून एक वेगळाच आनंद मिळत होता. त्याचवेळी मित्रांसोबत खेळताना, चाळीतले सण उत्सव साजरे करताना, जी मजा येते ती विनामूल्य असूनही अमूल्य असते हे देखील उमगले होते.

जेव्हा कर्जाचा आकडा उत्पन्नापेक्षा जास्त असतो तेव्हा ते फेडायला काहीतरी चाकोरीबाहेरचे अन वेगळे करावे लागते. कधी ते जमते तर कधी फसते. आमचे फसले. यात वडिलांनी नोकरी काही काळासाठी सोडली. आईच्या पगारावर घरखर्च आणि कर्ज दोन्हींचा भार आला. स्वस्थ कसे बसणार म्हणून तिने उत्पन्नाचा अतिरीक्त सोर्स म्हणून शिवणकाम सुरू केले. कुठलेही काम छोटे किंवा मोठे नसते ही शिकवण त्या दिवशी जरी मला आईकडून मिळाली असली तरी ती फार काळ टिकली नाही. कारण यावरून घरात खडाजंगी झाली. कारण माझ्या आजीचे म्हणने असे होते की आपल्या घरात आजवर कोणी असे काम केले नाही. हे आपल्या घराण्याच्या प्रतिष्ठेला शोभत नाही. आधीच कर्जदार दारात आल्याने प्रतिष्ठा धुळीला मिळाली होतीच. त्यात अजून हे नको होते.

घराण्याची ती तथाकथित प्रतिष्ठा आईवर लादली गेली आणि ते काम सुरू होताच बंद झाले. वडिलांचे हातपाय झाडणे चालू होतेच. पण दर महिन्याचे ठराविक असे उत्पन्न नव्हते. कधी पैसे आले तर मेजवानी, आणि नसले तर उपवास. मोठे घर आणि पोकळ वासे म्हणावे तसे एकदा खरेच घरात खायला अन्नाचा दाणा नव्हता. विभागात दंगलींमुळे कर्फ्यू लागला होता. तरीही आई वडिलांना जीव धोक्यात घालून मामाकडे चालत जाऊन जेवण घेऊन यावे लागले होते.

हे सर्व घडत असताना माझ्या कैक मित्रांना वाटायचे की याचे आईवडील दोघे छापताहेत आणि हा एकुलता एक. याची तर ऐश आहे. माझे टापटीप राहणे आणि चेहर्‍यावर न दिसणारी गरीबी याला दुजोरा सुद्धा द्यायची. त्या मित्रांचे समज कायम ठेऊन आयुष्य जगायची सवय मला झाली होती.

हळूहळू वडिलांच्या प्रयत्नांना यश मिळू लागले तसे थोडेफार उत्पन्न वाढू लागले. पण ईतके नव्हते की आयुष्य स्थिरस्थावर होईल. दोन वेळच्या जेवणाची ददात मिटली असली तरी भौतिक सुखांपासून दूर होतो. डोक्यावरचे कर्ज अजूनही कायम होते. पण डोक्यावर हक्काचे छप्पर नव्हते. मुंबईत हक्काचा निवारा नव्हता. त्यासाठी जमवलेले पैसे केव्हाच खर्च झाले होते. जे एका घरात गुंतवलेले ते देखील कर्ज फेडायला काढून घ्यावे लागले. जे चाळीतले घर होते ते आजी-आजोबांचे होते. एकेक करत त्या दोघांनी या जगाचा निरोप घेतला. आणि त्याचसोबत आमच्यावर त्या घराचा निरोप घ्यायची वेळ आली. कारण आता त्या घराच्या आठ भावंडांमध्ये आठ वाटण्या होणार होत्या. पाच भावांच्या, तीन बहिणींच्या..

जानेवारी महिना संपत आला होता. माझी बारावीची बोर्डाची परीक्षा जवळ आली होती. मी डोंगरावर अभ्यासाला जायचो. एके दिवशी अभ्यास करून घरी आलो आणि घराला टाळे दिसले. घरचे सारे पोलिस स्टेशनला. रात्री कधीतरी ते टाळे उघडले आणि घरात प्रवेश मिळाला.

जोडून दोन रूम होत्या आमच्या. त्यापैकी एकीचे टाळे कायम ठेवले गेले आणि एका रुममध्येच प्रवेश मिळाला. तो देखील केवळ तीन महिन्यांपुरता. त्या मुदतीत घराच्या किंमतीईतके पैसे जमवायचे होते. ईतर सात भावंडांना त्यांच्या वाटण्या द्यायच्या होत्या. तरच घर ताब्यात येणार होते.

जे एवढे वर्षे दोन खोल्यांमध्ये राहत होतो तो संसार एका खोलीत आला होता. महिन्याभराने तो देखील रस्त्यावर येतो का अशी परिस्थिती होती. ज्या चाळीत आयुष्य गेले तिथून अशी सामानाची बांधाबांध करून जाणे सोपे नव्हते. वडिलांचे टेंशन त्यांनाच ठाऊक. त्यांनी काही टोकाचा निर्णय घेऊ नये हे आईचे टेंशन. माझ्या डोक्यावर बारावीचे टेंशन. आधीच मी एक वर्ष अभ्यास केला नव्हता म्हणून गॅप घेतली होती. दुसर्‍या वर्षातही मी अभ्यासाची टाळाटाळ केली होती. पोरगा चारचौघांपेक्षा हुशार म्हणून वडिलांच्या आशा माझ्यावर होत्या. त्या मी धुळीला मिळवणार होतो हे तेव्हा मला एकट्यालाच ठाऊक होते. माझे बारावीचे वर्ष म्हणून त्यांचे पैश्यांचे टेंशन ते कधी माझ्यापर्यंत येऊ द्यायचे नाहीत. दिवसभर तंगडतोड करून जेव्हा ते घरी यायचे, रात्री दबक्या आवाजात आईशी बोलायचे, तेव्हा एक वाक्य नेहमी माझ्या कानी पडायचे. ते म्हणजे विष खायलाही पैसे नाहीत.. आणि हे असे ऐकल्यावर माझ्या छातीवर येणारे दडपण मलाच ठाऊक.. त्या काळात कसले टेंशन नसलेच तर ते खोटी प्रतिष्ठा जपायचे नव्हते..

पुढचा महिना फार अवघड होता. रोज थोड्याफार फरकाने हेच चित्र होते. चाळीतली शेजारधर्माची संस्कृती म्हणून एक चांगले होते. शेजारचे लोकं चर्चेला यायचे, त्यांच्याशी बोलून मन मोकळे करता यायचे. हा आयुष्याचा शेवट नाही, यातूनही काही मार्ग निघेल असा ते धीर द्यायचे. वकिलाशीही बोलणे होत होते. बँकेच्या फेर्‍या होत होत्या. पण नुसते दिवस पळत होते. गरजेपुरते पैसे जमत नव्हते.

आणि मग अश्यावेळी बहिणी मदतीला धावून आल्या !

स्त्री असणे म्हणजे काय... हे पहिल्यांदा मला माझ्या आईने दाखवले. त्यानंतर आत्यांनी प्रचिती दिली. तीनही बहिणींनी मिळून आपला हिस्सा तेव्हा आम्हाला दिला. कुठलीही कागदपत्रे न करता, शक्य होईल तेव्हा फेडू या शब्दावर विश्वास ठेवून दिला. जे पैसे जमवायचे होते ते अचानक निम्मे झाले. आणि दडपण पुर्ण गेले. तेवढी तजवीज करणे देखील सोपे नव्हते, पण शक्य होते. जेव्हा जगण्याचे सारे दरवाजे बंद झाले होते आणि आयुष्य वेंटीलेटरवर गेले होते तेव्हा एका पाठोपाठ एक तीन खिडक्या उघडल्या होत्या.

आर्थिक परिस्थिती अचानक बदलली असे नाही, पण जगण्याची नवी उमेद मिळाली होती. मी मात्र आधीच माझ्या बारावीची वाट लाऊन बसलो होतो. याबद्दल सविस्तर गेल्या गणेशोत्सवात "कॉलेजचे ते मोरपिशी दिवस" या सदराखाली लिहून झाले आहे. पण तेव्हा विषय कॉलेज जीवनाचा असल्याने ते घडत असतानाची ही पार्श्वभूमी लिहिली नव्हती. घरची स्थिती अशी असताना वडिलांना माझ्याकडून शिक्षणाबाबत बरेच अपेक्षा होत्या. त्यांची मी शून्य पुर्तता करून देखील त्यांनी मला सांभाळून घेतले. कदाचित आयुष्यात जी अजून एक संधी त्यांना मिळाली तीच त्यांनी मला देखील दिली होती.

आज वेळ बदलली आहे पण पैश्याची खरी किंमत त्या त्या वेळेला असते. ज्या वेळी वडिलांना त्यांच्या बहिणींनी मदत केली त्याची परतफेड कितीही व्याज जोडले तरी पैश्यात होणार नाही. म्हणून वडील आजही कुठलाही हिशोब न ठेवता ते कर्ज फेडतच आहेत. आत्या नाही राहिल्या तरी त्यांच्या मुलांना गरजेनुसार मदत करतच आहेत.

आज त्या आठवणी उगाळून मन काही सुखावत नाही. पण आज आपण जिथे आहोत तिथे आधीपेक्षा सुखी आहोत हे जाणवते. इथून पुढे गेलो तरी पाय जमिनीवरच राहतील असा विश्वास राहतो, आणि इथून खाली घसरलो तरी तो निसर्गाचाच नियम म्हणून त्याला स्विकारण्याची हिंमत अंगी येते. आफ्टरऑल, वक्त बदलते देर नही लगती..

कुठेतरी वाचलेला, आवडलेला शेर शेअर करतो..

समय के एक तमाचे की देर है प्यारे...
फिर मेरी फकीरी क्या.. तेरी बादशाही क्या... !!

-----------------------------------------

आजच्या तारखेला देखील गेले चार महिने आयुष्यात एक टेंशन आहे. सध्या कोणाला काही सांगू शकत नाही. फक्त संबंधित व्यक्तींनाच ते ठाऊक आहे. पण टेंशन ईतके आहे की एकदा ते विचार मनात येऊ लागले की घश्याखाली घास उतरत नाही. छातीवर दडपण ईतके येते की आता फुटून जाईल असे वाटते. ईतका वाईट अनुभव आयुष्यात या आधी कधी घेतला नव्हता. टेंशन घेणे हा माझा पिंडच नव्हता. पण ही परीस्थिती वेगळीच आहे. जे मी नेहमी सहजपणे आनंदीच राहत होतो ते आता ओढून ताणून आनंदी राहायचा प्रयत्न करत आहे. स्वत:लाच फसवायचा प्रकार चालू आहे.

त्यामानाने गेले तीनचार आठवडे या दडपणाला झुगारून नॉर्मल लाईफ जगायचे प्रयत्न चालू आहेत. कधी ना कधी मी यातून बाहेर पडेन आणि सारे काही सुरळीत होईल हा विश्वास स्वतःला देत आहे. मायबोलीच्या या गणेशोत्सवाला एक स्ट्रेसबस्टर म्हणून घेत आहे, डोक्यातले विचार जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कागदावर कसे उतरवता येईल हे बघत आहे.

डायलॉग फिल्मी आहे, पण विश्वास ठेवलात तर त्यामागचा अर्थ अस्सल आहे. आणि तेच माझ्या मनाला पटवून देत आहे, की खरेच बॉलीवूडच्या एखाद्या पिक्चरसारखेच आपल्या आयुष्यात देखील शेवटी सगळे चांगलेच होते. बोले तो, हॅपी एंडींग्ज..!

आणि जर चांगले झाले नाही..,
तर समजावे तो शेवट नाही..
पिक्चर अजून बाकी आहे माझ्या मित्रांनो.. आयुष्य अजून बाकी आहे !!

सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा Happy

धन्यवाद,
ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप स्वच्छ मनाने लिहिले आहे.

गत आयुष्यात केलेला संघर्ष आणि त्यातून येणारी समज पुढील आयुष्यात नेहमीच कामाला येते.

संघर्ष हा प्रत्येकाच्या पाचवीला पुजलेला असतो.. आयुष्यात चांगले आणि वाईट दोन्ही दिवस पाहायला मिळतातच.
तुमचे खरंच कौतुक तुम्ही अगदी प्रामाणिकपणे सगळं लिहिलंत...

तुमचा भविष्यकाळ सुखाचा जावो.. हि सदिच्छा..!

खूप छान शब्दात लिहीले आहे. मनाला भिडले. असले काहीतरी लिहीता म्हणून तुमच्याविषयी आदर वाटतो. (नाहीतर तुमचे शाहरूख प्रेम केवळ दिखाऊपणा वाटतो.. व मुद्दाम लोकांना हुसकवायला लिहीता असे वाटते.. सॉरी ह.घ्या. ).

शेवटचा पॅराग्राफ टाळता आला असता. पण तो लिहायचा हेतू माझे आताचे टेन्शन शेअर करावे असा नव्हता.
जे काही दडपण आहे त्यातून तुम्ही लवकरच बाहेर पडाल. तुमचा स्वभावच तुम्हाला यातून बाहेर काढेल. हे इथे लिहीलेत हे चांगले केलेत. काही गोष्टी मोकळेपणाने मांडल्यातर अर्ध्याहून अधीक टेन्शन कमी होते. बाप्पावर तसेच स्वःतावर विश्वास ठेवा. आम्ही सगळे आहोतच काही मदत लागली तर...

योगी, @ शाहरूख प्रेम
नाही हो, दिखावा नाही. लोकांना उकसवायला किडे करतो ते ठिक आहे. पण शाहरूख प्रेम खोटे नाही. लोकांना उकसवायला मटेरीअल मिळावे म्हणून वेळ आणि पैसा खर्च करून लेकीला सोबत घेऊन पिक्चरला जाणार नाही. आमच्याकडे सर्वांनाच शाहरूख आवडतो म्हणून गेलेलो. हे एक उदाहरण ताजे म्हणून दिले. पण ईतरही अश्या अनेक गोष्टी केवळ दिखाव्यासाठी करावे ईतके काही पडले नाही Happy

असो, ईथे शाहरूख जास्त नको. नाहीतर धागा हॅक होईल Wink फक्त तो दिखाऊपणाचा आरोप क्लीअर केला. उकसवण्याचा आरोप काही अंशी मान्य. पण ते एक गंमत म्हणूनच असते Happy

ऋन्मेऽऽष ओके.

पण ईतरही अश्या अनेक गोष्टी केवळ दिखाव्यासाठी करावे ईतके काही पडले नाही
मी फक्त शाहरूख प्रेमाविषयी म्हणालो आहे. बाकी कुठलाही दिखावा मला वाटत नाही. जे वाटले ते लिहीले. बाकी कुणाला काय आवडावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. खरं म्हणजे मला ही शाहरूख फक्त काही चित्रपटातलाच आवडतो. (बादशहा, स्वदेस, चक दे, कभी हा कभी ना अशा थोड्याफार चित्रपटात). धागा हायजॅक होऊ नये म्हणून थांबतो.

योगी, मी "ईतरही अश्या अनेक गोष्टी" हे शाहरूख संदर्भातच लिहिले होते.
बाकी थांबूया, ओके Happy

खूप छान लिहिलंय, हृदयस्पर्शी.
रात्रीच्या गडद अंधारानंतर उजळवणारी पहाट येतच असते.
योग्य उपचार पूर्ण घेऊन निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा.

प्रांजळ लेखन अतिशय भावलं! ह्या लेखाची ताकद सांगू … सर सर म्हणणार्याला हा लेख इत का रिलेट झाला की त्याने सर न संबोधित करता खूप छान प्रतिसाद दिलाय… तू तुझ्याबद्दल, कुटुंबाबद्दल इतकं नेहमी लिहीत असतो की आम्ही पण नकळत तुझ्या कुटुंबाशी जोडल्या गेलोत. वरचे प्रतिसाद वाचून आलेल्या प्रसंगात काही मदत हवी असेल माबोकर तुझ्या पाठीशी उभे राहतील … नक्कीच! खूप शुभेच्छा व आशीर्वाद!

मंजूताई Happy
पुर्वग्रहदूषित विचार न करता तसा प्रतिसाद देणे हा त्यांच्या मनाचा मोठेपणा..

@ मदत, तर याबद्दल मला काहींनी पर्सनल मेसेज सुद्धा केले. पण त्यांना जे सांगितले तेच ईथे लिहितो. कुठे फायनॅन्शिअली किंवा फिजिकली अडकलो नसल्याने तशी काही मदतीची गरज नाही. तुम्ही सर्वांनी हे लिहिले, विचारले, हीच मदत. ज्यांनी अशी विचारणा केली त्यांच्या मेसेजचे देखील मी स्क्रीनशॉट घेऊन ठेवले. गरजेला त्यातूनच बळ मिळेल. पण आता अ‍ॅक्चुअली बरेच छान फिल करत आहे. भले समस्या आपल्या जागी जैसे थे च का असेना . शेवटी आपण तिच्याकडे कसे बघतो यावरच आपले सारे सुख दुख ठरते हे पुन्हा एकदा नव्याने समजतेय Happy

प्रामाणिक आणि सुंदर लिहिले आहे. लेख आवडला.
आनंदी आणि निरोगी आयुष्याकरिता तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा!

प्रांजळपणे लिहिलं आहेस ऋन्मेष. पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा.
बारावीच्या रिझल्टबद्दल त्या दुसऱ्या लेखात वाचलं होतं. या लेखामुळे तुझ्या आईबाबांची मनःस्थिती त्या वेळी काय असेल याची जास्त कल्पना आली आणि किती तरी जास्त आदर वाटला त्यांच्याबद्दल.
नवऱ्याच्या ऑफिसमधे एकजण आहे. तीसेक वर्षांचा असेल. तो इंजिनिअरिंगला असताना त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट झालेली होती. वडिलांचं दुकान होतं पण चालत नव्हतं. त्यामुळे ते दुसरीकडे कुठलंतरी बारीकसारीक काम करायचे. खूप काटकसर करून त्याचं शिक्षण पूर्ण झालं. आता त्याचं लग्न झालंय, मुलगी आहे. नोकरी उत्तम आहे. त्याला आता गाडी (कार) घ्यायची आहे. आता परवडण्याचा प्रश्न नाही पण त्याला वाटतंय की नातेवाईकांच्या डोळ्यावर येईल आपण इतका खर्च केला तर Sad

धन्यवाद वावे Happy

पण त्याला वाटतंय की नातेवाईकांच्या डोळ्यावर येईल आपण इतका खर्च केला तर Sad
>>>>>>
हो, असा सीन असतो. आणि हे बरेच गुंतागुंतीचे गणित असते..

ऋन्मेष फार टचिंग लेख.

वेगळ्या कारणाने बालपण काळ रीलेट केला. आम्ही तिघं भावंडं शाळेत शिकत असताना माझ्या बाबांच्या कंपनीत दोनदा मधे थोड्या गॅपने संप झालेला. दोन्ही मिळून दिड वर्ष कंपनी बंद होती, आई नोकरी करत नव्हती. शाळेत सहल वगैरे असली की घरी सांगायचो नाही काही.

आत्ताचा तुझा जो काही प्रॉब्लेम आहे तो सुटूदे आणि सर्व चांगलं होऊदे ही गणपतीचरणी प्रार्थना.

धन्यवाद अंजू..
आणि हो, खरे आहे. असा काळ बरेच काही शिकवून जातो..

खूप छान लिहिले आहे .

आणि तुमची टेन्शन्स दूर होऊन तुम्ही पुन्हा पाहिल्यासारखे चीअरफुल व्हाल , अशा शुभेच्छा !

मामी आणि बिपीनजी, धन्यवाद!

हे मोलाचे शब्द मामी <<< खूप आनंदी आणि सकारात्मक स्वभाव>>> यामुळेच कधी टेन्शन नसायचे. पण हेच हरवता हरवता वाचले सध्या. आणि आता हेच जपायचे आहे Happy

अभिनंदन ऋन्मेऽऽष !
पुढाच्यावर्षीही असाच उत्साह कायम राहूदे.
तुमचे प्रशस्तिपत्रक खालीलप्रमाणे.

लेखन स्पर्धा २- फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश -प्रथम क्रमांक - ऋन्मेष.jpg

Pages