सदस्य प्रवेश |
स्काऊट - २- आणि रांगेतल्या सगळ्यात पहिल्या शेतकरणीसाठी माझी निवड करण्यात आली! त्या शेतकरणीने मला थोडे खट्टू केले पण म्हटले चला शेतकरीण तर शेतकरीण. स्काऊटला तर जायला मिळणार! इतर स्पर्धांतील सहभागाच्या दृष्टीने कार्यक्रम ठरवले गेले. त्याप्रमाणे निवड केली गेली, आणि त्या दिशेने आमच्या तालमी सुरू झाल्या. शोभायात्रेसाठी आम्ही जोतिबाचा छबिना काढायचा ठरवले. आदल्या आठवड्यात आम्ही शाळेचा तंबू धुवून आणला. तो धुवायचा म्हणजे त्याचे बोचके उचलून गुरुजींसोबत विहिरीवर जायचे. तिथे एक दगडी कुंड असायचा. (म्हणजे टब!) त्यात निरमा पावडर टाकायची. पाणी शेंदून त्या कुंडात भरपूर फेस करायचा. त्यात तंबू भिजायला घालायचा. आणि जेवून घ्यायचे. जेवून झाल्यावर दोघादोघांच्या जोड्या करायच्या आणि एकेका जोडीने अगदी पाय दुखेपर्यंत त्या कुंडात नाचायचे! मधूनच गुरुजी, 'हो हो रे हो हो रे ह्हो!' असे ओरडून थांबवून तंबूची खालची बाजू वर करायचे मग कुंडातील थयथयाट पुन्हा सुरू होई... शेवटी तो दिवस आला. दोन दिवस पुरतील एवढ्या चपात्या, तेल-चटणी आणि भजी बांधून घेऊन, तंबू, बांबू, कवायतीकरता लेझिम, लाठ्या, dumbbells तसेच पांघरुणं वगैरे वगैरे पाठीवर टाकून आमची फौज स्काऊटच्या ठिकाणी उतरली. आणि सगळे कामाला लागले. मी ज्या गाण्यात भाग घेतला होता त्यातल्या शेतकरणीला साडी, गळ्यात, कानात दागिने, बांगड्या आणि कपाळावर मोठ्ठच्या मोठं कुंकू अशी वेशभूषा होती. आम्हाला साड्या नेसवायला, शिक्षकांपैकी एकजण पत्नीला घेऊन थेट त्या ठिकाणी येणार होते. पण काही कारणाने त्या येऊ शकल्या नाहीत. ऐन वेळी आमची चांगलीच पंचाईत झाली. आता आम्हाला साड्या कोण नेसवणार? एखाद्या शिक्षिकेची मदत मिळू शकेल असा विचार करून आमचे गुरुजी कन्याशाळेच्या एका तंबूत गेले आणि त्यांच्या शिक्षिकेला विनंती केली की, आमच्या पोरांना तेवढ्या साड्या नेसवून द्याल का? त्या बाई म्हणाल्या ठिक आहे, त्यात काय एवढे? रात्री आठच्या दरम्यान येऊन तुमच्या मुलांना साड्या नेसवून जाईन असे आश्वासन त्यांनी आमच्या गुरुजींना दिले. आम्ही निर्धास्त झालो. त्या दिवशी सात वाजता गुरुजी जाऊन पुन्हा त्यांना आठवण करून आले. पण 'हो हो आलेच आता तुम्ही चला पुढे' असे सांगितलेल्या त्या बाईंचा साडे आठ वाजायला आले तरी पत्ता नव्हता. गुरुजी पुन्हा गेले तर त्या वैतागून म्हणाल्या की आता तुम्हीच नेसवा हो! आमच्या मुलींना पण तयार करायचे आहे! आता मात्र गुरुजींच्या पण तोंडचे पाणी पळाले. आम्ही बाकी सारा मेक - अप करून साड्या घेऊन बसलेलो. गुरूजी डोक्याला हात लावून बसले. एव्हाना तिकडे कार्यक्रम सुरूही झाला होता. आमचीही धडधड आता वाढायला लागली होती. शेवटी जवळच असलेलं पाण्याचं मोठं पातेलं पालथं घालून त्यावर गुरूजी बसले आणि 'आपापल्या साड्या घेऊन रांगेत माझ्यासमोर या' असे फर्मान आम्हाला सोडले! त्यांनीच आम्हाला साड्या नेसवल्या. आम्ही तयार झालो. त्या साडीत मला कमालीचे uncomfortable वाटत होते. आम्ही आमच्या शाळेचे नाव पुकारण्याची वाट बघत बसलो. मग एकदाचे आमच्या शाळेचे नाव पुकारले आणि आम्ही ओळीने एकदाचे रंगमंचावर गेलो! गाणे सुरू झाले. गाणे साधारण मध्यावर आले असेल आणि मला काहीतरी घोळ होतोय असे वाटू लागले! मला साडी सावरता येत नव्हती. हे'वाटणे'वाढतच चालले होते. आमच्या गाण्याची आधी भरपूर प्रॅक्टीस झाली होती पण हे साडी वगैरे मला नविन होते. आणि एका क्षणी माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला की माझी साडी सुटली आहे! आता आपली चांगलीच फजिती होणार असा विचार मनात आल्यावर मी पार गडबडून गेलो. साडी सावरण्याचा व्यर्थ प्रयत्न करू लागलो. पण छे! त्याचा उलट परिणाम झाला. त्या नादात मला गाण्याचे शब्द आठवेनात की नाचाच्या steps आठवेनात! माझी कानशिलं एकदम गरम झाली. आता आपले काही चालत नाही हे उमगल्यावर शेवटी सगळी साडी गुंडाळून पोटाशी धरून, ओठ आवळून मी माझ्या जागेवर तसाच उभा राहिलो! नुसताच इकडे तिकडे पाहू लागलो. एव्हाना हा प्रकार शिक्षक आणि प्रेक्षकांच्याही लक्षात आला असावा कारण स्टेजवर वेळेच्या सूचनेची शिटी वाजवणार्या माणसापासून सगळे प्रेक्षक खो खो हसत होते. मी आणखीणच बावरून गेलो. हातपाय बधीर पडले आणि काही न सुचून मी तिथेच फतकल घातले! समोर सगळे जोरजोरात हसत होते. गाणे संपल्यावर सगळे सहकारी निघून गेले. आमचे गुरूजी आले आणि माझ्या दंडाला धरून त्यांनी जवळ जवळ फरफटतच मला स्टेजवरून ओढून नेले! आणि हास्याची लाट आणखीनच जोरात उसळली. पुढे परतीच्या प्रवासात आणि नंतरही बरेच दिवस हा विषय सगळ्यांना पुरला. त्यानंतर पुढच्या वर्षी ( या प्रकारानंतर
1 March, 2006 - 08:34 gajanandesai
|
|