आई
"आई गं"
"बोल"
शांतता..
"आई गं."
"बोला.."
परत शांतता.
हे असं माझं दिवसभर चालू असतं. नुसतं "आई" हे बोलण्यामधे पण जे सुख आहे ना त्याबद्दल काय लिहिणार आणि सांगणार? तर असं मी माझ्या आईला पिडते. त्रास देते. आणि तिच्यामते जर तिला मी असा त्रास दिला नाहीतर दिवस सफळ संपूर्ण होत नाही. माझा दिवस सफळ सपूर्ण करण्यासाठी मात्र मला तिचा फटका मिळत असतो.
हरतालिकेचं व्रत केल्यावर शंकरासारखा भडकू नवरा मिळतो असं माझी आई मानते, तो तिचा स्वानुभव आहे. मात्र नक्की कुठलं व्रत केल्यावर भडकू नवरा आणि त्याच्या दुप्प्पट संतापाची मुलगी मिळते हे तिला अजून समजलेलें नाहिये. माझे वडील जितके भडकतात तितकीच किंवा त्याहुन जास्त मी चिडते. आणि आमच्या दोघाच्या संतापात सँडविच मात्र आईचं होतं.
पण मला माझ्या आईला भडकवायला जाम आवडतं. अशा वेळेला ती एखादा फटका देते. (मी घरभर पळत असते) आणि मी दमल्यावर मग आई मला मारते. खरंतर मला लागत वगैरे काही नाही पण उगाच "माझी आई मला खूप मारते. ती दुष्ट आहे!!!" वगैरे म्हणून भोकाड पसरलं की. (अजूनही!) ती मग लगेच सॉरी म्हणते. अर्थात प्रत्येक सॉरीची किंमत ठरलेली असतेच.
आईला स्वयंपाकाचा अजिबात कंटाळा येत नाही. पहाटे पाच वाजता उठून ती कामाला लागली तरी सात वाजता सर्व काम संपवून मोकळी होते. मग दिवसभर तिचे नाना उपद्व्याप चालू असतात. आम्ही कुणीच त्यानंतर घरी नसल्यामुळे तिचा दिवस नक्की कसा जातो याची कल्पना नाही. पण ती टीव्ही बघणे हे एक काम सोडून दुसरं काहीतरी शिवण टिपण वगैरे करत असते. नाहीतर फोनवरून सर्व नातेवाईकाची खबर घेतेच घेते. गोव्याला सासूबाईकडे आज घेवडीची भाजी होती इथपासून ते ऑस्ट्रेलियाची भाचेसून घरात घसरून कशी पडली इथपर्यंत सर्व माहिती तिच्याकडे रेडी असते. माझ्यापेक्षा जास्त चांगली पत्रकार ती बनली असती...
स्वतःचं अपूर्ण राहिलेलं शिक्षण हे तिचं सगळ्यत मोठं स्वप्न. ते तिने माझ्याकडून पूर्ण करवून घेतलं. लहानपणापासोन आतापर्यंत कधीही "हे काम तू कर" असं कधीच सांगितलं नाही. "आधी अभ्यास कर. घर चालवायला काय अक्कल लागत नाही" हे तिला मला अजूनही म्हणतेच. आजही चहाचा कप माझ्या हातात येतो, भले मी नेटवर गप्पा मारत असू देत किंवा कादंबरी वाचत असू दे. मी तर कायम म्हणते. "मी आळशी आहे याला कारण माझी आई."
माझ्या आईने माझ्यासाठी फार वाईट दिवस पाहिले. एक काळ असा होता की चाळीस पैशाचा ब्रेड मला देणं तिला जमत नव्हतं. माझं लहानपण खडतर गेलं म्हणून आज मी कसेही पसिए उधळले तरी तिची ना नसते. आईला मी पाच वर्षाची असताना मला एक निळा फ्रॉक घ्यायचा होता. पण किंमत तिच्या बजेटबाहेर जात होती. त्या दिवाळीला मला नवेन कपडे घेतले नाहीत म्हणून आई दर दिवाळीला मला पाच (कधी कधी सहापण) ड्रेस घेते. स्वत:ला साडी मात्र कधीच घेत नाही. (ते काम पप्पानी ऑलरेडी केलेलं आहे हे तिला माहीत असतं. पप्पानी साडी कुठे लपवली आहे हेही तिला माहीत असतं.) पाडव्याच्या दिवशी ते तिला साडी गिफ्ट देतात. आईचा मॅचिंग ब्लाऊज परकर तयार असतो. असा हा अजब इब्लिस वेधळेपणाचा सोहळा आमच्याकडे दरवर्षी असतो.
बहुतेक आया मुलीनी काय कपडे घालावेत यावर तावातावाने बोलत असतात. माझी आई सरळ सांगते. तुला जे आवडतय ते तू घाल." गंमत म्हण्जे माझे टॉप बघून ती कायम म्हणते." पोरी तुला लहानपणी पण याच्यापेक्षा मोठी झबली घातली आहेत मी."
माझ्या भावाच्या मुंजीच्या वेळेला मी मस्त स्लीव्हलेस ब्लाऊज घातला होता. माझी मामी आईला म्हणाली "असे कपडे शोभत नाहीत तिला.. लग्नाची झालीये आता"
आईबाई लगेच "अहो छान दिसतो तिला म्हणूनच शिवून घेतलाय मी. तिला तर माहीत पण नव्हतं. हल्ली अशीच फॅशन आहे म्हणे." बिचारी मामी!!
असंच एकदा माझ्या मामाला घरी एक सिगरेटचं पाकीट सापडलं. आळ माझ्यावर आणि मामेभावावरच आला. मामीच्या मते माझंच ते पाकिट होतं. आई त्यावेळेला रत्नागिरीला होती. मामाने फोन करून "मी सिगरेट ओढते" हे सांगितलं. आईने शांतपणे सर्व किस्सा ऐकून घेतला आणि म्हणाली. "मी नंदिनीला पूर्णपणे ओळखते. ती जर सिगरेट ओढत असेल् तर इतकी मूर्ख आणि बावळट नाही की तुझ्या घरी पाकिट विसरून येइल"
माझ्या कुठल्याही कार्यक्रमामधे ती हिरीरीने सहभागी होते. भले मग तो डान्स असो नाटक असो किंवा अजून काही. बॅकस्टेजचे सर्वजण तिची वाट बघतच असतात. ती येताना काही तरी खायला आणेल म्हणून. लोकाना खिलवण्याचा तिला जबरदस्त नाद आहे. काही झालं की "तुला भूक लागलीये का?" हा तिचा पहिला प्रश्न असतो. तिच्यामते मला भूक लागलेली समजत नाही, त्यामुळे मी तणतणायला लागले की माझ्या पुढ्यात काहीतरी खऊ आणून ठेवते. भावाच्या बाबतीत पण हे असंच बरं का...
माझ्या आईचा मी अभिमान आहे. मला कुणी काही बोललेलं तिला अजिबात सहन होत नाही. स्वतः मात्र माझी रोज पूजा बांधतच असते. ते चालतं. दुसरं कुणी बोललं की मग मात्र लगेच आई चिडते.
माझी आई माझी मैत्रीण आहे. दिवसभरात जे काही घडलं असेल ते मी आईला सांगतेच सांगते. मस्त गोष्ट म्हणजे ती मला कधीच सल्ला देत नाही. कारण तो मला पटणार नाही हे तिला माहित आहे.
"आई गं.. तुझ्यावर एक लेख लिहू का गं?"
"कशाला? लोकाना तुझी आई किती अडाणी आहे हे समजायला?"
तर अशी माझी आई. जबरदस्त विनोदबुद्धी. दिसायला एकदम छान (पितृमुखी झाले नसते तर किती बरं झालं असतं)... आणि मी आज जे काही आहे ते या आईमुळेच बरं का... तिने खूप सोसलय आणि अजून सोसतेय. माझ्या हातोन तिचे दु:ख जरा जरी कमी झालं तर जन्माला आल्याचं सार्थक होइल.
सुरेख !
आई, खरच अशीच असते स्वत। सोसते आणि आपल्याला झळही लागु देत नाही ! पण मस्त हलक्या फुलक्या शब्दात चित्रण केलेयस तु आवडले एकदम!
मस्तच!!
अख्ख्या लेखामधून तुझ्या आईविषयी तुला असलेली माया ओसंडून जाताना दिसतेय
आवडल खूप!!
एकदम
एकदम मस्त.....
तूला आठवतय का ग?
(नन्दिनी खर तर हे सर्व लिहीणयाची ही जागा नव्हे पण तरीही लिहितोय कारण हा प्रतिसाद नसून प्रतीक्रिया आहे. त्याबद्दल क्षमस्व)
आई.
एखाद्या लहान मूलाला जेन्व्हा नवी कोरी पाटी पेन्सील मिळते, तेन्व्हा त्याला त्यावर काय लीहू आणि काय नको अस होवून जात. त्याच्या शरीरात रोमा रोमात नवीन पाटीचा गन्ध भिनत असतो. त्यावर तो कसल्या कसल्या रेघोटया मारतो, कसली कसली चित्र काढतो. खर तर त्या चित्रांमध्ये काहीच नसत वर वर पाहील तर. पण नसत कस? असत ना -अगदी निर्खून पाहील तर काय नसत त्यात? नव्याची नवलाई असते, स्वतः च्या पहील्या स्रुजनाचा आनन्द सतो, नवीन शिकण्याची जिद्द असते. आईला ते सर्व दिसत. म्हणून ती त्याच कवतीक करते.
माझही अगदी असच झालय. मला मायबोलीची नवीन पाटी मिळालीये लिहायला. म्हणूनच पहीला शब्द लीहीला तो आई.
आई तूला आठवतय का ग? लहान पणी मी खूप मस्ती करायचो. दिवस्भर हून्दडायचो. ईतका की रात्री शुभम करोती न म्हणता, न जेवता तसाच झोपायचो. मग रात्री , मध्यरात्री अवचीत जाग यायची भूकेन. मग तूला उठवायचो. तूही लगेच मला वेलची घातलेली कॉफी करून द्यायचीस पटकन. मारी बिस्किट बरोबर. तूला सान्गू का ग आई. तशी कॉफी आता कुठेच मिळत नाही.
तूल आठवतय का ग? तू रोज पहाटे ४ वाजता उठायचीस? सगळ्यांचा जेवण नाश्ता बनवून ७ वाजता घर सोडायचीस. मलाही कधी कधी जाग यायची तू बनवणार्या पदार्थ्यान्च्या वासाने. आजही अशीच कधीतरी जाग येते. आणि तो परीचित वास शोधत बसते.
तूला आठवतय का ग? मी जेन्व्हा पहिल्यान्दा बाहेर गावी जाणार होतो, तेन्व्हा आपण दोघांनी मिळून माझ्यासाठी केसेट आणलेली- कल हो ना हो ची. आणि मीही लहान मूला सारख तूझ्या मान्डीवर निजून ती ऐकलेली. अजून्ही ऐकतो मी ती कधी कधी पण खर सान्गू का ती ऐकताना मला शब्दच जाणवत नाहीत जाणवतो तो फक्त तूझा स्पर्श.
तूला आठवतय का ग? तू लाम्बच्या प्रवासाला निघलेलीस? मी आलेलो की ग तूला भेटायला? तूला कळल का ग ते? कसली कसली यन्त्र लावलेली तूला. मी हळूच तूझ्या केसातून हात फिरवलेला. तूला जाणवला का ग तो स्पर्श? मला अजून जाणवतोय तो. विसरेन कसा?
तू म्हणायचीस मी नसताना तूझ कस होणार रे? काय करणार तू?
अगदी खर ग आई तू नाहीस आता आणि मी अजून काहीच करू शकलो नाहीये मी.
केदार.
फ़ारच छान...............
तुमच्यासारखं सोडा त्याच्या १०% जरि लिहता आल तरी मी स्वत : चीच पाठ थोपटुन घेईन !
नंदु, केदार!
अगदी तुमच्या आईसारखीच माझी आई आहे! खरं तर सासुबाई सुद्धा तश्याच आहेत.
छान वाटलं वाचून. (भरून आलंयं. आठवणीने डोळ्यात पाणी पण आलंयं. हट्टाने तिच्यापासून एवढ्या दूर आल्यावर कळतंयं!)
सुरेख ,
सुरेख , अगदी सर्वान्च्या मनातल लिहील आहे.
डोळे पाणावले!!
केदार, सकाळीच तुझा रिप्लाय वाचला नि खरंच सांगते, डोळे भरुन आले एकदम!!
नंदु, मस्त
नंदु, मस्त लिहिलंस गं!!
माझी आई पण अशीच! तिला खुप आवडतं मला वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांत पहायला... तिच्या लहानपणी तिने खुप हलाखीचे दिवस पाहिलेत ना... अगदि तुझ्या आईसारखीच, मी कितीही खर्च केला तरी तिची काही हरकत नसते. उलट प्रत्येक वेळि बाहेर गेलो कि तिच मला म्हणत असते, चल तुला ड्रेस घेउ एखादा!
सतत कामात... नि एवढ्या मोठ्या कुटुंबाचं सगळं हसतमुखाने करणारी!! सासरचे माहेरचे कुठलेही पाहुणे आले तरी पाहुणचार सारखाच.. कधि चिड्चिड नाही, वैतागलेली वगैरे तिला मी पाहिलेलेच नाहीय... कितीही काम पडलं तरी चेहरा हसरा!! मी नेहमी म्हणते, तुला कसं काय जमतं असं रहायला??? खरं तर आमच्या घरात आठ माणसे नि त्यांच्या आठ तर्हा!! पण ती सगळ्यांना सांभाळुन घेत असते.
माझी आजी, म्हणजे तिची सासु पण तिच्याबद्दल नेहमी म्हणत असते.. सगळ्या पंचक्रोशीत माझ्या सुनेसारखी कोणी नाही म्हणून!!
माझ्या सगळ्या मैत्रिणी तर नेहमी म्हणायच्या, तुझ्या आईसारखी सासु जरी मिळालि तरी किती छान!!
खरंच आई, मी खुप भाग्यवान आहे कि मला तुझ्यासारखी आई मिळाली!........ touchwood!!
त्रास झाला
त्रास झाला खूप. माझ्या आईने पण खूप स्वप्न पाह्यली होती माझ्याबद्दल. खूप वेगळं वाढवलं होतं मला.
खूप पोरकं वाटायला लागलंय. हा लेख वाचून अजूनच.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
आई नावाचं माणूस
प्रत्येक आई तिच्या मुलाना अशीच वाढवते. पण तिची ओळख मात्र पटायला वेळ लागतो. छान वाटले. आईलाही छान वाटेल हे वाचुन.
अर्थात प्रत्येक सॉरीची किंमत ठरलेली असतेच. >>>>>>>
थांब आता काकुना फोन करुनच सांगतो
मस्त लिहिल आहेस.
काय ना तु, केदार,स्वाती तिघानी इकडे जे लिहिलय ना आता मला अजुन जास्तच एकट एकट वाटतय.
माझी आता भेट ह्या महिन्याअखेरलाच होइल तोवर आता अजुन जोर जोरात वाट पहावी लागणार आहे २५ तारखेची.
खुप छान
खुप छान लिहिले आहे तु.
तुझी आई खरेच खुप छान आणि मस्त आहे.
केदार खुप
केदार खुप छान लिहिलेस आईविषयी.
रडू येतेय वाचताना.
नंदु,
नंदु, केदार
खुप छान लिहिल आहे..
दोळ्यात पाणि कधि भरुन आल ते कळलच नाहि. आई हा विषय इतका नाजुक आहे कि त्याला हताळायला तुमच्या सारखे मात्तब्बर लेखच लागतात.
माझ्या आईने सुद्धा खुप खस्ता खाल्या. मि तेव्हा ६ व्या वर्गात असेल, माझि आई lecturer होति. ति मराठि वाड्मय शिकवायचि.ति पाहाटे ४.०० वजता उठुन सगळा स्वयंपाक करुन मग कोलेज ला जायचि. तिचे कोलेज पण आर्णि नावाच्या गावि होते. सकाळि सगळ आटोपुन मग ति बस पकडायचि अणि कोलेजला जायचि. आता स्वता: मि नौकरि कर्ते तेव्हा तिच्या कष्टांचि जाणिव होते. काहि कारणास्तव ति आत नौकरि नाहि करत पण याचि खंत मात्र तिला आहे.हे दुख ति मात्र कधि बोलुन दाखवत नाही. अस वाटत तिचि हुशारि अम्च्या त्या चर भिंतिन मध्ये तिने कैद करुन ठेवलि आहे.
माझि आई खुप हुशार आहे. गाण, चित्रकला, लिखाण सगळे गुण आहेत तिच्यात. तिच्या कवितांपैइकि एका कवितेच्या दोन ओळि..
"सरता श्रावण देतो अठवण तुझिच रे साजणा,
श्रावण सरी परि आला माझ्या ह्रिदइच्या अंगणा"
ह्या कवितेला तिने खुप सुरेल चाल पन दिलि आहे..तिच्या बद्दल लिहावे तेवढे कामिच वाटेल मला..
आज मे जे काहि आहे ही तीचीच देणगि आहे.
नन्दीनी,
नन्दीनी, खुपच छान व्यक्तीचित्र उभे केलेत.
इतका सहवास नाही लाभला मला तिचापण.
मला माझी आई आठवली.
जेव्हा पासुन कळतं, ती सोसत होती. मी दुसरीत होते त्याच्याही आधीपासुन तिला डायबीटीस होता. त्याबरोबर येणारी दुखणीपण. माझ्या आठवणी प्रमाणे माझ्या प्रत्येक शैक्षणीक वर्षात एक अशी तिची आजारपणं येत होती. एकदा मोतीबिंदू, मग गँगरीन, मग व्हेन थ्रोम्बस अजुन काही अजुन काही....
माझी शाळा संपे पर्यंत ही दुखणी काढली. त्यानंतर वडीलांना कॅन्सर झाला. मग तिने स्वतःची दुखणी बाजुला ठेउन त्यांच्या उपचारांसाठी झिजली. वडिलांनी पण धीराने सगळे उपचार घेतले. पहिल्यान्दा केमोचा सेट संपवला आणि त्यांचा कॅन्सर बरा झाला, आम्हाला वाट्ले आता सगळे ठीक झाले. पण वर्षभरातच त्यांच्या गाठी परत आल्या, मी आणि मझी बहीण दोघी खचलो, पण ती दोघं खचली नाहीत. १६ वेळा केमो सहन केली. त्यांनी शरीराने सहन करत, आईने शरीर आणि मनाने सहन करत. खुप प्रयत्न केले. शेवटी २६ एप्रिल २००५ ला पप्पा आम्हाला सोडुन गेले.
इतकी सगळी वर्ष आईच्या तब्येती कडे लक्ष दिलेच गेले नव्हते. सहा सात महीन्यंनी थोडं सावरल्यावर आम्ही दोघीनई तिच्यामागे पुर्ण चेक अप् करण्याचा लकडा लावला. अस कळलं की तिच्या हार्टमध्ये ब्लोकेज् आहे. ट्रीट्मेंट सुरु केली. पण मला वाटते आम्ही तिला धीर द्यायला पुरे पडलो नाही. मी लग्नानंतर बोरीवलीला रहात होते, आणि बहीण शिक्षणासाठी मंगलोरला. ती तिच्या नोकरीसाठी आम्च्याकडे येउन रहायला तयार नव्हती. ती डोंबिवलीच्या आमच्या घरी एकटीच. तब्येत खालावतच गेली.
मला कधीच डॉक्टरांकडे घेउन गेली नाही. एकटीच जायची. काही विचारल की बर वटतय म्हणे. पण चेहरा दिवसेन्दिवस पांढरा पडत चालला. विचारले की म्हणे 'दिवसभर ए सी मधे बसते ना, म्हणुन मुळ रंग परत येतोय.:)' बँकेतपण एकदा तिच्या जागी बसली की काम संपेपर्यंत उठायची नाही. मैत्रिणींनी विचारले की उडवाउडवीची उत्तरे द्यायची.
पण वागताबोलताना अगदी नीट. हताश नाहीच दिसली कधी. साड्या म्हणजे तिची आवड. सुंदर साड्या जमवण्याच कोन वेड तिला. नित्यक्रमाने नविन साड्या घेत होती. आम्हाला वाटे वडीलांच्या दु:खातुन सावरली. ट्रीपला जाण्याचा प्लॅन पण बनवित होती. आम्ही पावसाळा संपला की जाण्याचं नक्की करुन पण टाकल.
३०जुलै २००७ ला आजोबा, आईचे वडील गेले. त्यापुर्वीच दोन दिवस आधी आई छातीत दुखतय सांगत होती. आम्ही नको म्हणत आसताना जळगावला आम्च्यासोबत आली. तिस-या दिवशी आमच्याबरोबरच परत आली.
आम्ही १३व्या साठी जाउ नको म्हणत होतो. न ऐकता, 'मावशी आहे बरोबर!' अस म्हणत परत जळगावला गेली. १२व्याला सकाळी ती आणि मावशी दोघी पोहोचल्या.दिवसभर १३व्यासाठी खपली. आजोबांना आवडत म्हणुन स्वतः नारळाचे लाडु आणि गुलबजाम बनवले.
आम्ही मुम्बईहुन रात्री निघालो. गाडीत जागा वगैरे मिळाल्यावर नव-याने आईला 'निघालो, गाडी मिळाली ' असा फोन केला, मी काही बोललेच नाही. म्हटले उद्या तर पोहोचु, उगाच बोलणे का वाढवा. पहाटे पोहोचलो तो स्टेशनला मामा घ्यायला आलए होते. आम्हाला घरी नेण्याऐवजी परस्पर होस्पिटलमधे नेले. आईला आय.सी.सी.यु. मधे ठेवले होते. क्रुत्रिम स्पंदनांवर होती. हार्टचा व्हाल्व्ह् लीक एक दोन आठवड्यांपुर्वीच झाला असावा, पण लक्षात यायला खुप उशिर झाला असे डॉ़क्टर म्हणाले. शॉक ट्रीट्मेंट पण देउन झाली. काहीच रिस्पॉन्स नव्हता.
माझ्या समक्ष रेस्पिरेटरी सिस्ट्म काढुन घेउन आईला म्रुत घोशित केले. :((
आम्हाला पोरक करुन निघुन गेली.
माझ्यासाठी कोडच राहिली. एकिकडे जगण्याची इच्छा असल्याचे भासवत, आमच्याबरोबर ट्रीपला जाण्याचे प्लॅन करत, इतक्या लांबच्या प्रवासाला निघुन गेली. फसवुन गेली अस वाटल. आमच्यापासुन लपवलेले सगळे रिपोर्टस् घरी आल्यावर मिळाले. तिचे सगळे प्रॉब्लेम्स तिला तिन्-चार आठवडे आधीच कळाल्याचे ते रिपोर्टस् दाखवित होते. मग का आम्हाला फसविले? कि आम्ही दुर्लक्ष केलं? तिला जगायच होतं का? पप्पांनी दाखवलेली जिद्द तिने का नाही दाखविली?
आता माझ्याकडे फक्त असे प्रश्न, आणि पोरकेपणाची जाणिव.
मी इकडे
मी इकडे लिहिलेल संकेतांमध्ये बसत नसेल, तर नेमस्तकांनी क्रुपया ते योग्य ठि़काणी हलवावे.
समजत नाहीये
नंदिनी, एका भलत्याच गहन विषयाला नेहमीसारखा हात घातलायस. सुंदर मांडलयस, तुझ्या आईचं तुझ्यात असणं. पण त्यानंतरचे इतरांचे अभिप्राय जास्तं त्रास देणारे आहेत.... कातर करणारे. नऊ महिने शरिराचा एक भाग म्हणून ती वागवते आपल्याला.... मग आयुष्यभर आभाळ बनून आपल्या मनाच्या मातीला सावली होऊन रहाते.... असली तरी.... नसली तरी.
(काहीतरी उलटंपालटं झालं आत....)
सगळ्यांचे प्रतिसाद
रमणी,
आनंदयात्री असतात अशी माणसं. सगळ्याना केवळ आनंदच देत जगतात आणि याच रितीने जातात.
तो वसा घेणे एवढेच आपल्या हाती असते मग.
दिनेशदा, आय
दिनेशदा,
आयुष्यभरासाठी रुख्रुख लावुन गेली की आम्ही तिच्यासाठी पुरेसे प्रयत्न करु शकलो नाही.
शेवट्च्या क्षणी एक अक्षरही बोलु शकले नाही मी.
नन्दिनी छान
छान लिहीलयेस. मला पण आईने असच आळ्शी केलेल. सगळ हाताशी आणुन द्यायची. सिरॅमिक वर्क खुप करायचे तेंव्हा हात खराब असायचे तर नंतर जेवते नंतर जेवते चालायच तर चक्क भरवल सुद्धा कित्येक वेळा तरी मी एकुलतीएक नाहीये. आईच माहेर खुप रग्गड श्रीमंत आणि वडिल फारच गरीबीतुन वर आलेले. वडिल बिझिनेस मधे, सुरवातीला फार चांगली परिस्थीती नव्हती पण कधीही मला ती नाराज असलेली आठवत नाही. आजोबांकडुन काहीही घेतलेले आवडायचे नाही पपांना. नंतर परिस्थीती खुपच बदलली पण मला अजुन ते जुने दिवस आठवतात.
रमणी तुझे वाचुन पण फार वाईट वाटले.
हं मस्तच..
तू सुरुवात करुन दिलीस आणि सगळेच हळवं लिखाण करायला लागलेत एकदम.
नन्दीनी, केदार, एकदम Gr8
डोळ्यात पाणी !!!
आई..... मी येतोय ग लगेच...
नन्दिनी....
तू लिहिलेला लेख वाचून मी कधी एक्दा माझ्या 'मातु:श्री' ना भेट्तोय असे झालेय. तसा मी आज १ महिन्याने आमच्या घरी जाणार आहे. हा जो १ महीन्याचा वेळ असतो तो कसा जातो ते कळत नाही,पण शेवट्चे जे काही क्षण असतात गाडीत बसेपासुन घरी पोहोचेपर्यन्त चे ते सम्पता सम्पत नाही आहेत. सध्या माझी नाईट शिफ्ट चालू आहे....आणि अशातच मी तुझा लेख वाचलाय... आता पहाटेचे ३ वाजले आहेत,
तुला वाचुन माझ्या आईची आठ्वण तर मला खुप येत आहे..पण ही वेळ अशी आहे की फोन हातात असून देखिल मी आत्ता तो नाही करू शकत..अस वाटतय की असेच सरळ इथून गायब व्हाव आणि सरळ आई च्या कूशीत जाऊन शान्त सुखाने झोपी जावे. याचे ३ फायदे होतील....१ तिला झोपेतून उठावे नाहि लागणार दार उघदण्यासाठि,२ सकाळी सर्प्राईज पण मी आल्याचे...३ आणि मला पण माझि खुप दिवसाची झोप पुर्ण झाल्याचे समाधान........ काय्,कशी वाटली माझी आयडीया???
अरे,गेले ३-४ दिवस तिला फोन करून नुसत्या जेवण्याच्या मेनुचि लिस्ट देतोय्..मी आलो की हे कर- ते कर... या वस्तु घरी आणुन ठेव्,म्हणजे मी पण थोडी लूड्बूड करेन कित्चन मधे..आणि मला जे काहि येते ते करून घालेन खायला. तिच्यावर च तर हे सगळे ट्राय करु शकतो ना मी....
.................... अरे मी खूप काहि भरकटतोय असे वाटतय..... तुम्ही कोणी काही ओरडायच्या आधी मी इथून पळू का?? काम सम्पवतो, आणि आधी आई ला जागे करतो... आणि सान्ग्तो की, 'आई..... मी येतोय ग लगेच...'
नन्दिनी.... धन्यवाद!!!
तुझी आठवण तर १००% निघेलच आज-उद्या-परवा मी घरी आहे तोपर्यन्त हे नक्की!!
दीपक
आई
स्क्रिन धुसर झाली. सुन्दर लिहीलय.
छानच
छानच लिहिलय. मला आता माझ्या आईची आठवण यायला लागलिय.
छे......:(
लास्ट वन सर्चवर आलेल्या प्रतिसादांनी इथे आणून सोडलं मला. :((
आवर्जून वाचायचं टाळलेलं, प्रतिसाद वाचत वाचत वरपर्यंत कधी जावून पोचले कळलच नाही.
नका लोकहो असं लिहून लोकांच्या जखमांवरची खपली काढू.
मी पण हीच चूक केली होती :((
नंदीनी, आईच ग ती ग्रेट असणारच, पण याची तुला जाण आहे हे खूप महत्वाचंय , खूप मोठी होशील नंदीनी.
आईची कदर असणारे लोक खूप पूढे जातात आयुष्यात. मनापासून शुभेच्छा तुला.
मस्त!!!!!!!!
योगिनि
हरतालिकेचं व्रत केल्यावर शंकरासारखा भडकू नवरा मिळतो असं माझी आई मानते, तो तिचा स्वानुभव आहे. मात्र नक्की कुठलं व्रत केल्यावर भडकू नवरा आणि त्याच्या दुप्प्पट संतापाची मुलगी मिळते हे तिला अजून समजलेलें नाहिये.

एकदम छान...........
वाचताना मला माझी आई डोळ्यासमोर येत होती........
नंदिनी
नंदिनी तुझ्या रंगिबेरंगी पानाला भेट द्यायला खूपच उशिर झालाय, पण उशिरा तर उशिरा एक छान लेख वाचायला मिळाला. खूप सुंदर लिहीले आहेस.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
.
दक्षिणा...
आई म्हणजे साक्षात गुरुमाऊली
आई म्हणजे साक्षात गुरुमाऊली आणखी काय बोलायचं ! देवाला सुद्धा जप करायचा असेल तर तो 'आई' या नावाचाच करत असेल ना?
Pages