वासुदेव बळवंत फडके - चित्रपट

महाराष्ट्र मंडळाने दि. ३ मे ला Fremont येथे 'वासुदेव बळवंत फडके' हा चित्रपट दाखवला.

साधारण १५ मिनीटे आधी Old Naz या थिएटरमधे गेलो. पण आधी एकदम साधारण अजिंक्य देव सारख्याच दिसणार्‍या एका तरूणाचा एकदम मॉडर्न ड्रेस मधे फोटो पाहून हा चित्रपट राम गोपाल वर्मा करतो तसा नव्या काळासाठी Adapt वगैरे केलेला आहे की काय अशी शंका आली. पण तो Kantri हे नाव असलेला कोणतातरी दाक्षिणात्य चित्रपट होता. मग वा. ब. फ. चे पोस्टर ही दिसले. पोस्टर वरूनच कळत होते की तात्रिकदृष्ट्या चित्रपट चांगला असणार आहे. त्यामुळे उत्सुकता वाढली.

१ वाजून गेला तरी चित्रपट चालू होण्याची लक्षणे दिसेनात. मला पुण्यात अलंकार आणि डेक्कन यांच्यात रिळे शेअर करून दाखवलेले चित्रपट आठवले. तेथे ३ चा संपल्याशिवाय येथे ६ चा चालू होत नसे स्मित. पण नंतर कळले की अजिंक्य देव येणार आहे आणि चित्रपट तो आल्यावर चालू होणार. मग थोड्या वेळाने तो आल्यावर सगळे आत गेलो. या आधी इतर काही कार्यक्रम झाले होते त्यातीलच एक लावणी व एक लेझीम पुन्हा सादर करण्यात आले. लावणी करणार्‍या त्या छोट्या मुलीने सुंदर नृत्य केले. लेझीम ही चांगले झाले पण त्याबरोबर चे संगीत अगदीच चुकीचे वाटले.

असे करत शेवटी चित्रपट चालू झाला. आता थोडे त्याबद्दल:

पूर्वी शाळेत 'आद्य क्रांतिकारक' म्हणून वाचलेला धडा आणि त्यातील काही आठवणार्‍या गोष्टी सोडल्या तर वासुदेव बळवंत फडकेंबद्दल फारशी माहिती नव्हती. त्यात ते पंजाबी नसल्याने राकेश ओमप्रकाश मेहरा ते गुड्डू धनोआ पर्यंत सगळ्यांनी भगतसिंग सारखे अनेक चित्रपट काढलेले नाहीत. त्यामुळे कथेबद्दल ही कुतूहल होते.

एकूण चित्रपट नक्कीच बघण्यासारखा आहे. अजिंक्य देव या भुमिकेत एकदम शोभून दिसतो. प्रत्यक्षात वासुदेव बळवंत फडके कसे दिसत ते माहीत नाही, पण अजिंक्य देव तशा रोल मधे चपखल वाटतो. सोनाली कुलकर्णी चे ही काम एकदम मस्त झाले आहे. त्यांच्या सहकार्‍यांचा मात्र मिश्र उल्लेख करावा लागेल - काहींचे काम चांगले तर काही नुसतेच फ्रेम भरायला उभे केल्यासारखे वाटतात. हिंदी चित्रपट म्हणून सहज खपेल इतपत तांत्रिक सफाई आहे. पण वासुदेव बळवंत फडकेंबद्दल काही वाचून हा बघणार्‍यांना जास्त आवडेल असे वाटते. म्हणजे ते तुरुंगाचे दार उचकटून पळाले ही माहिती (मी नंतर वाचली) जर नसेल तर तो प्रसंग एखाद्या जीतेंद्रच्या चित्रपटासारखा वाटेल.

दुष्काळामुळे शेतकर्‍यांना होणार्‍या त्रासावरची प्रतिक्रिया, रामोशी टोळ्यांना या लढ्याचे महत्त्व पटवून सामील करून घेणे, इंग्रजांशी दिलेला लढा हे सर्व चांगले घेतले आहे. यांना पकडणार्‍यास ४०० रू. चे इनाम इंग्रज सरकारने जाहीर केल्यावर मुंबईच्या गव्हर्नर ला मारणार्‍यास त्यापेक्षा जास्त इनाम यांनी जाहीर करणे वगैरे प्रसंग ही छान आहेत. पण हे तुम्हाला आधीच माहिती असतील तर अतर्क्य वाटणार नाहीत. अशा चित्रपटांना येणार्‍या प्रेक्षकांना बहुधा सर्व कथा माहिती असते, पण या चित्रपटाला तो फायदा मिळत नाही.

मला सगळ्यात आवडलेला शॉट म्हणजे तो दौलती रामोशी पडवीत खाली बसतो म्हंटल्यावर मी ही खाली बसतो म्हणून हे ही खाली बसतात तो. यात आवडले ते तसे करताना आपण काही तरी भारी करतोय याचा आविर्भाव न आणता आपण सर्व सारखेच आहोत हे दाखवणे.

याउलट त्यांचे लहानपण उगाचच दाखवलेले आहे असे वाटले. तसेच लहुजी वस्ताद हे त्यांचे गुरू आणि त्यांनी वासुदेव बळवंत फडके यांना इंग्रजांविरुद्ध लढण्याचे व त्या वेळी समाजा बाहेर असलेल्या लोकांना सामील करून घेण्याबद्दल शिकवले ते फारसे दिसत नाही. फक्त एकदा हे येऊन लहुजी वस्तादांच्या पाया पडतात एवढेच दाखवले आहे. विजय कदम आणि विजय पाटकर यांना विनोद निर्मीतीसाठी घेतले असावे पण त्यांचे विनोद अगदीच सरधोपट आहेत. विजय कदम चे सानुनासिक उच्चार खूप कृत्रिम वाटतात. तसेच तो रोहिला ही आधी फक्त पैशासाठी लढणारा पण नंतर लगेच हिंदुस्थान्साठी निज़ामाविरुद्ध ही लढायला तयार, याने गोंधळ उडतो. काही अनावश्यक प्रसंग ही आहेत.

पण सर्वात खटकणारी गोष्ट म्हणजे मध्यंतरा च्या थोडे आधी असलेले ते 'आयटेम सॉंग', ते ही चक्क लता च्या आवाजात. एक मलाईका अरोरा छाप डान्स, व आजूबाजूला नाचणारे तरूण हा फॉर्म्युला येथे टाकायची काहीच गरज नव्हती. आणि त्याच्यामुळे लोक येणार असतील तर "चांगला चित्रपट, पण फार चालला नाही" आणि "वासुदेव बळवंत फडके ना? काय डान्स आहे बॉस त्यातला" यातील जास्त वाईट स्थिती कोणती नक्की सांगता येत नाही. (नंतर च्या मुलाखतीत अजिंक्य नेच सांगितले की आता निघणार्‍या हिंदी आवृत्तीत ते नसेल)

संवाद मात्र फार पुस्तकी वाटतात, त्यावेळच्या सहज बोली भाषेतील वाटत नाहीत. एरव्ही मराठीत किंवा गरजे नुसार इंग्रजीत बोलणरे वासुदेव बळवंत फडके शेवटी 'मातृभूमी की जय' असे हिंदीत कशाला म्हणतील वगैरे प्रश्न आपल्या डोक्यात येतात.

अजून एक दाखवायला हवे होते म्हणजे जरी वासुदेव बळवंत फडके पकडले गेले तरी त्यांच्या लढ्याचा क्रांतिकारकांच्या पुढच्या पिढ्यांवर कसा परिणाम झाला ते. ते दिसत नाही.

मराठीत ऐतिहासिक (म्हणजे इतिहासावर आधारलेले. पुराव्या सिद्ध झालेल्या गोष्टीच फक्त दाखवणारे असे नव्हे) चित्रपट खूप चांगले आहेत. पण मागच्या काही वर्षांत एवढे आले नाहीत. हा निदान बर्‍यापैकी आहे. आणि मुख्य म्हणजे तेव्हाचे राजकारण यांनाच फक्त कळत होते आणि पुढच्या ५०-१०० वर्षांत घडणार्‍या घटनांबद्दल चा (लेखकाने त्यांच्या माथ्यावर ठोकून दिलेला) द्रष्टेपणा फक्त त्यांच्याकडे होता आणि बाकीचे महान लोक चुकीचे होते असे दाखवण्याची पद्धत व्यक्तीपूजक पुस्तके, चित्रपटात असते ती येथे अजिबात जाणवली नाही. तेवढ्या बाबतीत तरी श्रेय द्यायलाच पाहिजे.

भारतात नेहमीसारखाच प्रदर्शित झाला असेल. पण इतर ठिकाणी महाराष्ट्र मंडळ किंवा अशाच इतर संस्थांनी दाखवला तर जरूर पाहा. एकदा नक्कीच पाहण्यासारखा आहे.