इंजिनीयरींगचा सोहळा-२-पहिला मान रॅगींगचा..

Submitted by सुमेधा आदवडे on 3 August, 2010 - 01:05

पहिला भागः इंजिनीयरींगचा सोहळा-१-बारावी उवाच पण प्रवेश हवाच!

"अगं,इतकी काय घाबरतेस रॅगींगला? तो जस्ट एक भाग आहे कॉलेज लाईफचा..उलट रॅगींग नंतर नवीन मित्र-मैत्रीणी भेटतील तुला. सगळे हेल्पफुल असतात गं.. "
(आवाज बारीक करत)"आपण त्यांनी सांगितलेलं केलं तर.." इती दोन वर्ष इंजिनीयरींगला कॉलेजाळलेली माझी बहीण. आता ती स्वत: लोकांच्या रॅगींगची मजा घेत होती..पलीकडची तवान्यांची (कोण रे ते टवाळे म्हणतंय?) म्हणजे बिच्चाऱ्या फ़्रेशर्सची बाजु तिच्या लेखी नाही म्हटलं तरी निकृष्ट!
"तुला काय करायला सांगितलं होतं?" आता ह्या निरर्थक प्रश्नाने मला काय समाधान मिळणार होतं ते मला पण नाही माहित..एकाबरोबर जे घडलं तेच दुसर्‍याबरोबर तेही वेगळ्याच कॉलेजला घडणार कशावरुन? तरीही आपलं एक समाधान...जणु काही मोठ्ठ्या युद्धालाच जायचंय.
"मला ८-१० मुला-मुलींच्या घोळक्याने घेरलेलं. सगळ्यांनी रॅपिड फायर खेळत असल्या सारखी आपापली नावं सांगितली. आणि मग मला सांगितलं आता प्रत्येकाची नावं बोलुन दाखव."
"एवढंच होय..असं काही सांगितलं तर काय टेंशन नाय आपल्याला" माझ्या वाढलेल्या कॉन्फीडन्स वर ती "हिची फुल वाट लागणार आहे" असा चेहरा करुन हसली.

"कॅन यु सी दॅट फॅट लेडी देअर?" एका सिनीयरने विचारलं. मला किल्ल्याला चारी बाजुंनी पाण्याने घेरल्यासारखं वाटत होतं.
"येस" कॅटीनचं एक अख्खं मोठ्ठं टेबल व्यापुन बसलेलं मोठ्ठं धुड बघुन फेफरं भरल्यासारखी कसातरी एक शब्द फुटलेली मी.
तिच्या टेबलावर ८-१० डिशेस होत्या..नाना तर्हेच्या पदर्थांनी भरलेल्या..आणि त्या प्रचंड तोंडातल्या गुहेच्या दिशेने रिकाम्या होत चाललेल्या. अर्ध तोंडात आणि बरंचसं टेबलावर आणि खाली पडणार्‍या खाण्याकडे आणि त्या दयनीय अवस्थेतल्या टेबलाकडे बघुन मला भडभडुन आलं.
"जा, उसको सर पे एक टपली मार और बोल "कितना खायेगी मोटी? फट जायेगी" और सामने की एक भरी हुई डिश उठाकर ला यहॉं!"
बापरे! एकवेळ "रामगोपाल वर्मा की आग" एकटीनेच, कसलीही तोडफोड न करता संपुर्ण बघायला सांगितला असता तरी चाललं असतं. पण हे? काय करावं..काय करावं? केलं नाही तर हे माणसांच्या पोषाखातले दैत्य आपले काय हाल करतील माहित नाही. पहिलाच दिवस कॉलेजचा आणि असा प्रसंग? पण जिद्द मावशीने भिती ताईंना पळवुन लावले आणि अस्मादिक गड लढवायला निघाले. तिच्या जवळ गेल्यावर टेबलाकडं पाहुन आणखी कसंतरी झालं. स्पृष्य-अस्पृष्य, सोवळं-ओवळं मानत नसले तरी त्या क्षणी,"माणुस जगण्यासाठी खातो की खाण्यासाठी जगतो?" ह्या प्रश्नाच्या पाचावर धारण बसवणार्‍या त्या बकासुरीणीला हात पण लावायची इच्छा नव्हती. पण करणार काय? आलीया भोगासी...तिच्या टपली मारली, "कितना खायेगी बे मोटी?" एवढंच बोलले, बाकीचं आठवलंच नाही..आणि समोरची एक (अजुनही तिची सावज न झालेली) डिश उचलुन जी धुम ठोकली. ..बकासुरीण माझ्या मागे येतच असणार, मागे वळुन पाहण्याची हिम्मत झालीच नाही, भिती ताई पुन्हा अवतरल्या होत्या!..पळतीये..पळतीये..श्वास बंद होईल की काय असं वाटत होतं..पण मघासचा दैत्यांचा घोळका काही दिसला नाही..ओरडले.." अरे कहॉ गये सब?"

"अगं उठ..पहिल्याच दिवशी उशीर होईल कॉलेजला जायला!" आईच्या हाकेने सकाळी ६ ला जाग आली. खडबडुन बिछान्यावर उठुन बसले! हुश्श! बापरे...काय स्वप्न होतं! असं रॅगींग झालं तर काय खरं नाही आपलं.

५ सप्टेंबर २००२.आवरुन एकदाची पोहोचले कॉलेजला. आमचं कॉलेज म्हणजे चेंबुरच्या एकदम शेवटच्या टोकाला, सिंधी सोसायटीत. समोर झोपडपट्टी, मधुन वाहणारा काळ्या पाण्याचा किळसवाणा मोठ्ठाच्या मोठ्ठा नाला आणि त्यावरच कॉलेजच्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील अशी पुस्तकांपासुन,झेरॉक्स्वाल्यांपासुन पाना-सिगारेट्च्या टपरीपर्यंत दुकानच दुकानं! एक गेट मधुन आत शिरताच आधी बी.एम.एम आणि सायन्स,कॉमर्सच्या सिनीयर कॉलेजची बिल्डींग. ती पास केल्यानंतर आणखी एक गेट मधुन आत आल्यावर आमचं इच्छीतस्थान! तीन बाजुंनी उंच पाच मजली इमारती, मधे मोठ्ठाच्या मोठ्ठा चौक आणि सगळीकडे गजबज! पहिला दिवस म्हणजे सरळ कोणाशी जाऊन बोलु पण शकत नाही. पण एक मुलगी तिच्या आईसोबत रिक्षेतुन उतरताना दिसली. आईला गळाभेट वगैरे देऊन ती आत आली आणि रिक्षा निघुन गेली. नक्कीच ही फर्स्ट ईयरची असणार...गोरी गोरी पान, डोळ्यावर चष्मा आणि साधासा ड्रेस! मी हाय केलं तसं तिनेही चेहर्‍यावरची एक रेषही न हलवता हाय केलं आणि निघुन गेली पुढे. "खडुस असेल" इती मी अर्थात मनातल्या मनात (हीच मुलगी वर्षभरातच माझ्या आयुष्यात मी कधीही न विसरु शकणारी आणि अजुनही माझा हात घट्ट धरुन ठेवणारी माझी एकमेव जीवश्च कंठश्च मैत्रीण झाली! त्या येडुला मात्र आमची ही छोटुशी पहिली भेट काही केल्या अजुनही आठवत नाहीये!)

एकच लिफ्ट होती " ओन्ली फॉर स्टाफ" चा ठळक बट्टा कपाळावर मिरवीत! फर्स्ट ईयरचे क्लासेस पाचव्या मजल्यावर..करा तंगडतोड! वर्गात येऊन बसले. मोजक्या ३ मुली आणि १-२ मुलं होती सगळे वेगवेगळ्या बाकांवर बसलेले. माझ्या शेजारी एक मुलगी येऊन बसली, आम्ही बोलु लागलो. ती मघाशी खाली भेटलेली मुलगी काही नव्हती, बहुदा दुसर्‍या स्ट्रीमला असणार. वर्ग हळुहळु भरु लागला. पहिलं लेक्चर झालं, अगदी साधं-सुधं तोंडओळखीचं...विषयाच्या नाही..आम्हा सगळ्यांच्या! आज दिवसभर हे ओळख करुन देण्याचे प्रकार चालतील की काय ह्या विचाराने तासाभराच्या पहिल्या लेक्चर नंतरच मनाला शीण यायला लागला..(भरीस भर म्हणजे शिक्षक दिन असल्यामुळे सगळ्या प्रोफेसर्सना त्याचं महत्व आमच्या तोंडून ऐकण्याचं चांगलं कारण सापडलेलं)...पहिले आपलं नाव सांगायचं...आपल्याच नावाचं वर्गात आणखी कुणी असलं की पुढची चार वर्ष होणार्‍या कंफ्युजनला डोळ्यांसमोर आणायचं. त्यानंतर कुठल्या ज्युनीयर कॉलेजातुन आलोय ते सांगायचं..ते एखादं छोटंसं,कमी नावाजलेलं कॉलेज असलं किंवा लांबलचक विनोदी नाव असल्यामुळे आपण शॉर्ट फॉर्म सांगितला तर पुढचे काही दिवस तरी काही नटद्रष्ट कार्टी तुम्हाला त्यावरुन चिडवणार! (इथे वाचकांना नम्र विनंती, कृपया कुणीही माझ्या ज्युनीयर कॉलेजचं नाव विचारु नये!) आणि त्यानंतर बारावी चे मार्क्स सांगायचे..आता जे उवाच कृत्य घडुन गेल्यावर कृतकृत्य होऊन आज ह्या वर्गात आपल्याला उभं रहायला मिळतंय ते असं चारचौघांत मार्कांच्या तोंडुन सांगायची अशी काय गरज आहे? वर हे एकदा ठिके..प्रत्येक लेक्चरला नवा/वी प्रोफेसर आणि वर्गातल्या एखाद्या तरी मुलाचा/मुलीचा "हं..एवढी काय स्मार्ट नाहीये" असा चेहरा बघण्यात कसला आनंद मिळणार होता? असो.

ब्रेकची वेळ झाली. मी, माझ्या शेजारी बसलेली मुलगी आणि आणखी एक नुकतीच ओळख झालेली मुलगी अशा आम्ही डब्बा खात होतो. डब्बा संपणार इतक्यात १०-१२ मुला-मुलींचा घोळका बॅंक लुटायला आल्याच्या थाटात वर्गात शिरुन समोरच्या स्टेजवर जाऊन उभा राहिला. सांगायला नकोच हे आमचे मायबाप सिनीयर होते!
त्यातला एक जण पुढे होऊन बोलु लागला, "हाय फ़्रेंड्स, वुई आर फ़्रॉम अ‍ॅंटी-रॅगींग कमीटी ऑफ वेसीट*. रॅगींग इज कंप्लीटली प्रॉहिबीटेड हीअर अँड इज ए पनिशेबल ऑफेन्स. इफ एनीबडी फ़्रॉम यु फेसस एनी प्रॉब्लम इन दिस रीगार्ड, प्लीज कॉन्टॅक्ट अस!" आणखी काही वेळ तो बरंच काही बरळत होता आणि आमच्या कळ्या खुलु लागल्या होत्या. ज्या गोष्टीची भिती वाटत होती ती होणारच नव्हती. वा! पहिल्या दिवशी चांगली बातमी समजली म्हणुन आम्ही हुरळुन गेलो. सिनीयर खाली उतरुन वर्गातल्या तुरळक खादांती गटांमधे विखुरले. त्यातल्याच २ मुली आणि २ मुलं आमच्या इथे आली आणि समोरच्या बाकावर बसली. आमची नावं वगैरे विचारली, जुजबी चौकशी केली..आणखी काय हवे? ताई म्हणाली तेच खरं होतं, "सगळे हेल्पफुल असतात गं."

"कम ऑन, नाऊ थ्री ऑफ यु सिंग अ सॉंग फॉर अस!" एक जण म्हणाला.
आता हे काय? म्हणजे मघापासुन हे लोक आपली मस्करी करत होते?? आजुबाजुला पाहिलं तर कोणी घाबरलेल्या हळु आवाजात गाणं बोलत होतं..एक जण तर चक्क उलट-सुलट उड्या मारुन नाचत होता! अरे काय चाललंय काय? वर्गात हे सगळं, तर बाहेर कॉरीडॉर मधे काय चाललं असेल एवढ्या गर्दीत?
"कम ऑन फास्ट..द ब्रेक विल एंड नाऊ!" एक मुलगी ओरडली. तितक्यात ब्रेक संपल्याची घंटा वाजली! हुश्श! सुटलो...माझा आवाज काही एवढा खराब नाहीये, पण कसंही गायलं, काहीही केलं तरी हे लोक पहिल्याच दिवशी सगळ्यांसमोर आपल्या अब्रुची एक हजार शकलं करतील ह्यात काहीच शंका नसल्यामुळे पोटात गोळा आला होता, घंटेच्या आवाजाने तो गेला!
"वुई वील कम टुमारो.बी प्रीपेर्ड वीथ अ सॉंग!"
"बट आय डोंट सिंग वेल." आमच्यातल्या एकीने शब्द कुठून मिळवले होते तिलाच ठाऊक!
"देन यु डान्स!" तसुभरही विनोदी नसलेल्या ह्या तुच्छ वाक्यावर सगळे जोरात हसुन निघुन गेले.

आता हे उद्या येणार...मी कोणतं गाणं गायचं वगैरे विचार करुन ठेवला होता. पण आमचं नशीब "मी कधीतरी शहाण्या मुलासारखंही वागतो हं!" असं सिद्ध करण्याच्या मुड मध्ये असल्यामुळे ती टोळी किंवा त्यातल्या कोणीच मला तरी परत कधीच गाठलं नाही. असाईनमेंट आणि जर्नल्स नावाचे प्रकार कळले आणि आपण "इंजिनीयरींग कॉलेज" ला आलोय याची सर्वात मोठी वर्दी मिळाली. असंख्य ए-फोर साईझ पेपर्स, वर्गांच्या बाकड्यांवर, स्टेजवर, कॉरीडॉरमध्ये (मधुन नववधुला पाय उमटवत चालण्याइतपतच जागा राहिल अशा बेताने), सायकल स्टॅंडच्या पलीकडच्या बाकड्यांवर, खालच्या चौकातल्या बाकड्यांवर, लायब्ररीत, कॅन्टीनमध्ये...थोडक्यात काय..जिथं टेकायला,फेकायला,वेचायला आणि सर्वात महत्वाचा शब्द "छापायला" मिळेल असल्या कुठल्याही ठिकाणी पामरांची मुंग्यांप्रमाणे वस्ती होत असे.

पहिल्या सेमीस्टरला प्रोफेसर नावाच्या प्राण्यांमध्ये अनेक महाभाग भेटले. आमचे मॅथ्सचे सर आमच्या पहिल्याच सेमच्या तिसर्‍या महिन्यातच हार्ट अटॅकने गेले.(गेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलु नये, पण त्यांच्या गंमतीही सांगु नये असं कुणीच म्हटलंय नाही, म्हणुन त्यांचा उल्लेख!) ते आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना सर आणि मॅडम म्हणुन संबोधायचे. आमच्यापैकी कोणावर कुठल्याही कारणामुळे त्यांचे रागवणेही त्याचमुळे फार मजेशीर वाटायचे. "सर, यू गेट आऊट ऑफ द क्लास." किंवा "शट अप मॅडम" अख्ख्या वर्गासमोर "इतक्या आदराने हा आपली वाट लावतोय" हा विचारच कित्ती थ्रीलींग नै?
वर्गात काय चाललंय? हे १००% ध्यानी-मनी असणार्‍या संत विद्यार्थ्यांनी ( त्यांना संत असंच म्हणतात, कारण हे असाधारण कृत्य सगळ्यांनाच करता येत नाही म्हणुन तसं करणारे पहिल्या बाकड्यांवर बसलेले महान आत्मे अगदीच पुजनीय!)फळ्यावर सर सोडवत असलेल्या गणीताच्या एखाद्या स्टेप मध्ये त्यांची चुक निदर्शनास आणुन दिली की त्यांचा एक लोकप्रीय डायलॉग असायचा, "ओके. यु हॅप्पी,आय हॅप्पी, द वर्ल्ड हॅप्पी" एकदा ह्या लेक्चरला बसायला सगळ्यांना खुप कंटाळा आला होता. सर यायच्या आत वर्गाचं दार आतुन लावुन घेण्याची कोणीतरी आयडीया सुचवली. त्यावर एक जण बोलला..."मत रे..वो वेंटीलेटर से मुंडी अंदर डालके "आय हॅप्पी,यु हॅप्पी, वर्ल्ड हॅप्पी" डायलॉग मारके चला जायेगा!" सगळ्यांची त्या कल्पनेनंच हसुन हसुन पुरेवाट झाली होती.

बी डबल ई B.E.E (बेसिक्स ऑफ ईलेक्ट्रीकल्स अ‍ॅंड ईलेक्ट्रॉनिक्स इंजिनीयरिंग असा तो विषय.) चे प्रोफेसर एक साऊथ इंडीयन सर होते. साऊथ इंडीयन लोकांच्या इंग्रजीवर या आधी विशेष टिप्पणी केल्यामुळे इथे फार लिहत नाही.(अज्ञात जीवांनी "चेन्नई ट्रीपा?"वाचावा)
तरीही फळ्यावर अक्राळविक्राळ रेषांनी कसल्यातरी चिन्हांना जोडुन " अप्लाय के.व्ही.एल अ‍ॅंड के.सी.एल** टू धिस सरकूट (circuit)" ह्या सरांच्या डायलॉग ने खल-बत्त्यात सर (हिंदीतलं) कुटायचा भास न झाला तरच नवल!

पहिल्या चार सेमीस्टर पर्यंत आम्हाला फॅनेटिक्स नावाच्या पुस्तकांचा प्रचंड आधार असायचा. विषयांच्या पोथी-पुराणांप्रमाणे जाडजुड पुस्तकांपेक्षा अर्थातच ही छोटी-छोटी, मुद्देसुद आणि मुख्य म्हणजे ४० मार्क्स (४० हा आकडा इंजिनीयरींगच्या प्रत्येक विद्यार्थ्याला जन्म-मृत्यु पेक्षाही महत्वाचा आहे. हे नुसते प्रत्येक सबजेक्टचे पासिंग मार्क्स नाहीत तर याचं किती महत्व आहे हे माझ्या इंजिनीयर वाचकांना तरी नक्कीच अभीप्रेत असेल!) हमखास मिळवुन देणारी ही पुस्तकं आम्हाला पवित्र आणि वंदनीय होती.
आणि या उलट "सक्सेस के पीछे मत भागो, एक्सेलेन्स के पीछे जाओ!" ह्या आमीरी पावित्र्यातले आमचे बी डबल ई चे सर होते.साठ मिनीटांच्या लेक्चरमध्ये किमान एकशे साठ वेळा तरी सरांचं " यू रीड गूड बुक्स्स्स्स!" हे शेवटल्या स मधुन निघणार्‍या ठिणगीने फॅनेटिक्स बनवणार्‍या कंपन्यांना आग लागेल, असा प्रचंड संताप दर्शवणारे वाक्य नाही आले तर आम्हालाच चुकल्या सारखं व्हायचं.

तरी "पिळवणुक" ह्या शब्दाचा मतीतार्थ सहजरीत्या आम्हाला समजावुन देणारे महाभाग अजुन पुढच्या चार ४ वर्षात यायचे होते.

वेसीट*-- आमच्या कॉलेजचं नाव "Vivekanand Education Society's Institute Of Technology" असं होतं. प्रत्येकवेळी एवढं बोलुन जिभेला गाठ पडण्यापेक्षा आम्ही वेसीट (V.E.S.I.T) असं प्रेमाचं नाव बहाल केलं होतं.

के.व्ही.एल अ‍ॅंड के.सी.एल**-- Kirchoff's Voltage Law and Kirchoff's Current Law

हा लेख इथेही वाचता येईल,नक्की भेट द्या, वाट बघतीये Happy

गुलमोहर: 

.

सुपु, एक एक आठवण ताजी करत चाल्लीयेस.

आमचे सौदिन्डियन सर , कुलुंब असा साधारण राणिच्या बागेतल्या वाघसिंहाच्या पिंजर्‍यातून येतो त्या पद्धतीचा आवाज काढायचे.

दुसर्‍या एका सरांना

एस्क्यूज मी.

यु विद द ब्ल्यू शर्ट प्लीज गेट अप

व्हॉत इज युर नेम ?

व्हॉटएव्हर इट मे बी, प्लीज गेटाउट

ही वाक्य सलग म्हणायची सवय होती.

त्यामुळे आपल्याला वर्गाबाहेर काढल्याचा आनंद तन्मनात झिर्पायला थोडा वेळच लागायचा.

मस्तच!! Happy
के.व्ही.एल अ‍ॅंड के.सी.एल >>> फारा वर्षांनी हे शब्द पुन्हा कानावर पडले आणि असलं काहीतरी आपणही शिकलो होतो हे अंधुकसं आठवलं Proud

(५ सप्टेंबर २००२ - इथे नवीन परिच्छेद सुरू केलास तर चांगलं वाटेल.

आज दिवसभर हे ओळख करुन देण्याचे प्रकार चालतील की काय ह्या विचाराने तासाभराच्या पहिल्या लेक्चर नंतरच मनाला क्षीण यायला लागला. >>> तो शब्द 'शीण' असा हवा. :))

सुमे, मस्तच. कॉलेज डेज ची लेखमाला वाचताना .. फिर से याद आयेंगे वोह दिन.. सही तू अशीच लिहित रहा. बहुदा, कॉलेजचा सांस्कृतीक दिवस त्याची तयारी याचे पण किस्से वाचायला मिळतील. होय ना ?

ह्या रॅगिंगच्या विरोधातच , खूप काही झालं होतं आमच्या कॉलेजमधे. आजही आठवत ते तीन दिवस आम्हाला कॉलेजच्या आवारातसुद्धा फिरकायला बंदी होती. कारण रॅगिंगविरोधात आम्ही काहिसा हिंसेचा मार्ग अवलंबला होता.

मस्त लिहिलय. त्या मानाने आम्हा कॉमर्स वाल्यात, अजिबात रॅगिंग नसायचे. (पण प्राध्यापकांच्या गमतीजमती होत्याच. )

मस्त Happy

सुमे, मस्तच...
माझेही एक साउथईंडीयन सर आठवले. ते नेहमी चहा ला 'छाया' म्हणाय्चे.
वर्गात कोणी गोंधळ घातले की 'यु गो एंड द्रिंक छाया देअर ओन तप्री' म्हणुन सांगाय्चे. Happy

सर्व वाचकांचे खुप खुप आभार Happy
रॅगिंगचा अनुभव न घेतलेला अपवादानेच सापडेल >>> अगदी अगदी गुब्बे Happy
लले..धन्स गं..बदल केलेत Happy

सगळ्यांना धन्यवाद!!

सुक्या....ह्यावरुन अजुनही खुप किस्से घडताहेत रे....मस्तीमध्ये केल्या जाणार्‍या गोष्टींमुळे लोकांच्या आयुष्याची वाताहात होते हे फार मोठं शल्य आहे Sad

छान आहे इंजिनीयरींगचा सोहळा-२-पहिला मान रॅगींगचा..

Kirchoff's Voltage Law and Kirchoff's Current Law मी पण शिकलो. के.व्ही.एल अ‍ॅंड के.सी.एल**-- हे शॉट फॉर्मस वाचुन मज्जा आली. पुण्याचा अप्पा बळवंत चौकात जाऊन मी १९७९ ते १९८२ मध्ये आम्ही इंजिनियरींगची पुस्तके आणायचो. आता त्याच नाव ABC झालय असाच हा प्रकार आहे. पण छान आहे.

मी पण आहे रॅगिंग न झालेल्यांच्या लीस्ट मधला....

सध्या बर्‍याच कॉलेजेस मध्ये रॅगिंग पूर्ण पणे बंद करण्यात आले आहे... बर्‍याच ठिकाणी फार वाईट प्रकार घडलेत रॅगिंगमुळे.. आणि त्याचाच परिणाम म्हणून सरकारनीच काही पावले उचलली आहेत..

मी पण आहे रॅगिंग न झालेल्यांच्या लीस्ट मधला.... >>>
अन् आम्ही रॅगिंग करणार्‍यांच्या लीस्ट मधले... Happy

मस्तच ग सुमेधा!

कंम्प्यूटर इंजिनियरिंगच्या लोकांना इंजिनियरिंग ड्रॉईग आणि वर्कशॉप करायला लावण्यामागे काही लॉजिक असेलच तर ते ह्या जन्मी तरी मला कळणार नाही. माझं फर्स्ट इयर ह्या २ विषयांनी अक्षरशः नासवलं. ड्रॉईगमध्ये तर मी काठावर पास. असली नामुष्की त्याआधी कधीही आली नव्हती Sad त्यात ते ड्रॉईगच्या कागदांच्या गुंडाळ्या घातलेली मोठी नळकांडी घेऊन बसमध्ये चढलं की सगळ्यांच्या शिव्या खायला लागायच्या. वर त्यात कधीही पैकीच्या पैकी मार्क्स मिळाले नाहित.

वर्कशॉपमध्ये फाईलिंग करताना ते नेहमी सरळ न होता तिरकस व्हायचं. मग त्या लोखंडाच्या तुकड्याला एक उतार प्राप्त व्हायचा. कारपेन्टरीमुळे माझा सुतारांबद्दलचा आदर शतपटीने वाढला. स्मिथीमध्ये कधी काही करायला लागलं नाही. तिथला माणूस फक्त मुलींना सगळं काम करून द्यायचा. त्यामुळे मुलं त्याच्यावर जाम उखडून होती.

पहिल्या वर्षाच्या कुठल्यातरी इलेक्ट्रिकल विषयाच्या पहिल्याच प्रॅक्टिकलला एका स्कॉलर मुलाने ट्रान्सफॉर्मर का असंच काहीतरी उडवलं होतं. ते लॅबच्या एका टोकावरून उडून जाऊन पार दुसर्‍या टोकाला गेलं होतं Happy त्यात पुन्हा रेझिस्टर, कपॅसिटर असल्या गोष्टींचा कलर कोड लक्षात ठेवायला लागायचा. एव्ह्ढं करून अजुनही घरात फक्त बल्ब बदलता येतो. त्यापुढच्या अ‍ॅडव्हान्स प्रॉब्लेम्स साठी इले़क्ट्रिशियनचसे पाय धरावे लागतातच वर घरचे ऐकवतात "इंजिनियर कशाला झालात?" Sad

असाईनमेन्ट्स आणि viva ह्यावर एक स्वतंत्र प्रकरणच लिही. रच्याकने, आमची साऊथ इंडियन मिस सर्किटला "सरक्यूट" म्हणायची. मुन्नाभाई पाहिला तेव्हा ह्या गोष्टीची आठवण येऊन आणि हसू आलं होतं. Proud

एव्ह्ढं करून अजुनही घरात फक्त बल्ब बदलता येतो. त्यापुढच्या अ‍ॅडव्हान्स प्रॉब्लेम्स साठी इले़क्ट्रिशियनचसे पाय धरावे लागतातच वर घरचे ऐकवतात "इंजिनियर कशाला झालात?">>>>>. सेम पिंच! Wink

सुमा मस्त चालुये लेखमाला.. पटापट पुर्ण कर. Happy

पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार Happy

एव्ह्ढं करून अजुनही घरात फक्त बल्ब बदलता येतो. त्यापुढच्या अ‍ॅडव्हान्स प्रॉब्लेम्स साठी इले़क्ट्रिशियनचसे पाय धरावे लागतातच वर घरचे ऐकवतात "इंजिनियर कशाला झालात?" अरेरे>>>>> Lol

असाईनमेन्ट्स आणि viva ह्यावर एक स्वतंत्र प्रकरणच लिही. >>> पुढच्या भागात टाकणारच होते Happy

आमच्या कॉलेज मधले रँगींग चे किस्से ऐकाल तर थक्क व्हाल.....अर्थात काही मजेशीर किस्से पण आहेत म्हणा....पण मोस्टली सगळे भयानक आहेत.
एक गम्मत...आमच्या कडे हॉस्टेल मधे रॅगींग होत असे....तुम्ही जर रुम घेवुन रहात असाल तरी तुम्हाला पहीला एक महीना रोज रात्री होस्टेल वर जावे लागत असे...इंट्रो साठी म्हणे...रोज वेगवेगळ्या सिनीयर्स्च्या रूम वर, न गेल्यास तुम्हाला वाळीत टाकलंच म्हणुन समजा...एका वेळेला दोन तीन जणांची रॅगींग होत असे....आणि गम्मत म्हणजे एकाची रँगींग चालु असताना उरलेल्या दोघांपैकी एकाला रूम मधल्या माळ्यावर बसावे लागत असे, तेही एखाद्या सिनीयर्ची आंघोळीची बादली डोक्यावर उलटी घेवुन, आणि दुसर्याला एखाद्या कॉट्खाली पोहोण्याची अ‍ॅक्शन करत बसावे लागे त्यांची वेळ येइ पर्यंत.....आता हसु येतय पण त्या वेळेला चांगलीच वाट लागायची....

मस्त लिखान ...
आणी बादवे माझे कॉलेज पण चेंबुरचे -- शाह अँड अँकर... २००५ पास आउट Happy सुरुवातीला माहीती वाचुन वाटले की तु पण शाह अँड अँकर मधली आहे की काय ...

आणी विवेकानंद ला अ‍ॅडमिशन मिळाले म्हनजे १२ वी ला चांगले मार्क्स मिळाले असणार Happy

तोष्दा,विनायक Lol धन्स!!!
किशोर.....ह्याचा पहिला भाग बारावीच्या मार्कांविषयीचाच आहे Happy
शाह अँन्ड अ‍ॅन्कर पण छान कॉलेज आहे Happy

सुमे.. मस्तच गं ! आमचा अनुभव लै भारी होता. एकतर आम्ही हॉस्टेलला वगैरे नव्हतो. पण कॉलेजमध्ये चालणारं रॅगिंगसुद्धा आमच्या वाटेला गेलं नाही. कारण सोलापूर भागातून आमचा १६ जणांचा गृप होता COEP ला त्या वर्षी. ६ जण खुद्द सोलापूर, ३ जण पंढरपूर, १ जण उमरग्याचा, २ जण लातूरहून, २ बार्शीचे आणि २ मंगळवेढ्याचे. सगळे एका वरचढ एक टगे अगदी माझ्यासकट. साधारण आठवड्यानंतर फिजिक्सच्या प्रॅक्टिकलनंतर एकाने माझे नोटबुक घेतले आणि सरळ मधुन फाडून फेकुन दिले, माझ्या पार्टनरच्या नोटबुकची सुद्धा हीच अवस्था झाली. नंतर हुकूम आला, आत्ताच्या आत्ता जावून नवीन वह्या घेवून या आणि इथे बसुन लिहा. मी जावून आमच्या गँगला घेवून आलो.....
........, मग जी काय मज्जा आली.....

त्यानंतर आठवडाभर आम्हाला कॉलेजमधून हाकलण्यात आले होते. पालकांना घेवून या तरच वर्गात बसु दिले जाईल. पुण्यात त्यावेळी आण्णांचे एक मित्र होते, दातार काका. त्यावेळी ते एसीपी म्हणून कार्यरत होते. मी त्यांना कॉलेजवर घेवून गेलो..., त्यांनी काय केलं देव जाणे पण दुसर्‍याच दिवशी आम्हा सगळ्यांनाच कॉलेजला येण्याची परवानगी मिळाली.

के.व्ही.एल अ‍ॅंड के.सी.एल >>
पहिल्या चार सेमीस्टर पर्यंत आम्हाला फॅनेटिक्स नावाच्या पुस्तकांचा प्रचंड आधार असायचा. >>>
असाईनमेंट आणि जर्नल्स >>>
सुप्पु, डीप्लोमा आणि इंजिनीयरींगच्या दिवसांची आठवण करून दिलीस बघ.

सगळ्यात बोरींग तो इंजिनीयरींग ड्रॉईंग चा सब्जेक्ट होता. Angry
टॉप व्ह्यू, फ्रंट व्ह्यू, साईड व्ह्यू असले बावळट्ट प्रकार ड्रॉ करावे लागत. Angry

त्यात ते ड्रॉईगच्या कागदांच्या गुंडाळ्या घातलेली मोठी नळकांडी घेऊन बसमध्ये चढलं की सगळ्यांच्या शिव्या खायला लागायच्या. वर त्यात कधीही पैकीच्या पैकी मार्क्स मिळाले नाहित.
>>>
एव्ह्ढं करून अजुनही घरात फक्त बल्ब बदलता येतो. त्यापुढच्या अ‍ॅडव्हान्स प्रॉब्लेम्स साठी इले़क्ट्रिशियनचसे पाय धरावे लागतातच वर घरचे ऐकवतात "इंजिनियर कशाला झालात?"
>>> स्वप्ना, सेम पिंच गं.

डीप्लोमाला जवळपास सर्वच सर आणि मॅडमना आम्ही काही ना काही उपाध्या लावलेल्या होत्या.

इलेक्ट्रीकल ड्रॉइंग ला एक सर्वज्ञ म्हणून सर होते. बुटके, गोरे आणि गुबर्‍या गालांचे! त्यांना ससा म्हणत असू.
म्यूपी च्या बुटक्या व बारीक सरांना काकडी
इलेक्ट्रॉनिक्स लॅबच्या लॅब असिस्टंट ला भालू
सी प्रोग्रामिंग च्या सरांना खडु

Biggrin

जुने दिवस आठवून जाम मजा येतीये.

इथे कुणी GPM Bandra Polytechnic चे आहे का?

सगळ्यात बोरींग तो इंजिनीयरींग ड्रॉईंग चा सब्जेक्ट होता. राग
टॉप व्ह्यू, फ्रंट व्ह्यू, साईड व्ह्यू असले बावळट्ट प्रकार ड्रॉ करावे लागत.>>>>

निंबे, माझा तो आवडता विषय होता, कारण त्या एकाच विषयाला जी.टी. मारता यायची (Glass Tracing) Wink

जी.टी. मारता यायची (Glass Tracing) >>> हो रे हो. पण एकुणातच कंटाळवाणा होता माझ्यासाठी तरी. Sad
ड्रॉईंग आणि माझा ३६ चा आकडा आहे. साधी रांगोळीही जमत नाही. थातूर्-मातूर काढते आपलं काहीतरी Proud

Pages