इंजिनीयरींगचा सोहळा-१-बारावी उवाच पण प्रवेश हवाच!

Submitted by सुमेधा आदवडे on 26 July, 2010 - 12:14

ड्रीमगर्ल आणि मा.बो वर नसलेल्या माझ्या इतर मित्र-मैत्रिणींच्या अनुरोधाने इंजिनीयरींगचा सोहळा लेखणीने साजरा करायला घेत आहे. याल ना सगळे मज्जा करायला माझ्या बरोबर? Happy

बारावीचं वर्ष..आता खुप मेहनत करायची हं, दहावी पेक्षा चांगले परसेंट मिळाले पाहिजेत..तेव्हा कुठे चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळेल...इंजिनीयरींग करायचंय ना..खायची गोष्ट नाही हं तायडे...डॅडींनी माझ्या अकरावी पासुनच लढाईला निघालेल्या मावळ्याची जय्यत तयारी करायची सुरूवात केली होती. खरं म्हणजे,"पुढची तीन वर्ष तुझ्या आयुष्याचा पाया घडवतील!" असं टाळ्यांचं वाक्य बोलुन आमच्या एका परिचीतांनी ह्या तयारीला माझ्या नव्वीपासुनच हातभार वगैरे लावला होता. डोक्यावर जाडजुड( आणि जडजड) एकावर एक रचलेली प्रत्येक विषयाची पुस्तकं ठेवुन, पाठीमागे शंभाराची माळ पेटवुन, घड्याळ लावुन कोणीतरी पळायला सांगतंय अशी काहिशी स्वप्न पडुन खडबडून जागी झाल्याचे प्रकारही झाले.असो.

अकरावीला विषय निवडतानाच "वोकेशनल" विषयाचं प्रकरण समजलं होतं. झाडाच्या एकदम खालच्या फांदीला लगडलेल्या आंब्यांसारखे हातातले २०० गुण तेव्हाच दिसले होते. तो विषय घेतला खरा, पण त्या वेळी आमच्या कॉलेजात त्या विषयाला "वोकेशनल" अशी मान्यता प्राप्त नव्हती,त्यासाठी सडेतोड प्रयत्न चाललेत आणि तुम्ही बारावीत जाईपर्यंत मान्यता मिळेल ह्या प्रीन्सीपलच्या आश्वासानाच्या आधारावर "सध्या ऍडीशनल आणि होतकरु वोकेशनल" असा तो विषय मी निवडला. पण बारावीच्या परिक्षेचा फोर्म भरायची वेळ आली तरी "ते काही आंबे दिसेना,विषय मान्य होईना"(अटक-मटक,चांदणी चटक च्या चालीवर :फिदी:). भरोशाच्या म्हशीला मेला टोणगा बोलुन मला भुगोल नाव्याच्या रेड्याचे चित्र-विचित्र नकाशे गिरवायचा प्रचंड कंटाळा आला होता. म्हणुन बारावीचा फॉर्म भरायच्या आधी डॅडींना प्रीन्सिपलला भेटायला लावुन मी बायलॉजी घेतलं. प्रीन्सीपलची अट होती की येत्या परिक्षेत मला बायो मधे ६०% हुन अधिक गुण मिळाले पाहिजेत..वर्गात बायोमधे सर्वाधिक गुण मिळवुन मी तिला निकालात काढलं होतं. बायोचा अभ्यास म्हणजे धमाल असायची. माझं सर्वात आवडतं काम म्हणजे त्यातले डायग्राम्स. पानं-फुलं, विविध किटक,अवयव..असं सगळं नीटस शेड्स,बारीक-सारीक रेषां सहीत मी काढायचे..त्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारांच्या पेन्सिलींची गस्त घालुन झाली होती. एकदा डायग्राम काढायला बसले की सहा-सहा तास आईचे पर्मोच्च प्रशंसेचे स्वर (त्यांना सभ्य भाषेत ती ’कानी कपाळी ओरडणं’ असंही म्हणायची) कानी पडल्याशिवाय उठायचे नाही.

बायोचे प्रॅक्टीकल पण गमतीशीर असायचे. रक्तगट आणि हीमोग्लोबिनचं प्रमाण ओळखण्याचं एक प्रॅक्टीकल होतं. साध्या इंजेक्शनलाही भूतापेक्षा जास्त घाबरणारी मी,त्यावेळेस स्वत:च्या बोटातुन रक्ताचे २ थेंब काढण्याचं अग्नीदिव्य केलं. अगदी भयाण जखमी झालेल्या,पिसाळलेल्या वाघाच्या जबड्यात हात घालुन दात (वाघाचे) मोजल्याच्या थाटात ही बातमी घरी सांगितलेली मी!
रॅट-डिसेक्शन साठी पिंजऱ्यात आणुन ठेवलेले पांढरे गोंडस उंदीर आम्ही कितीतरी वेळा जाऊन पाहुन यायचो. खरंतर त्या गोंडस जीवांची चिरफाड करणं अगदी जीवावर आलं होतं,पण तेवढीच उत्सुकताही असायची. मेल-फीमेल ओळखणं आणि ब्रेनचे पार्ट्स ओळखणं ह्या दोन गोष्टी होत्या. पहिल्यांदा मॅडमने दाखवलं होतं तेव्हा ग्लोव्ज घालुनही त्या मऊसुत बिलबिलीत स्पर्षाची किळस वाटली होती. पण त्यापेक्षा सर्वात कठीण काम होतं ते रॅट-ब्रेन काढुन त्याचे भाग ओळखणं. कांद्याच्या पापुद्र्यासारख्या कवटीमधुन आतला बिलबिलीत चिकट मुषक मेंदु जराही फुटू न देता बाहेर काढण्यात खरी कसोटी लागायची. माझ्या बोर्डाच्या प्रॅक्टीकल च्या वेळेस हे नाही आलं तर बरं होईल अशी प्रार्थनाही करुन झालेली माझी. पण नशीब नेहमीप्रमाणे एकदम जोरावर! नेमकं तेच आलं परिक्षेत..ब्रेन नीट वन पीस मधे काढुन,अजीबात फुटु न देता स्लाईडवर ठेवलं. पुन्हा नशीबाने धाव घेतली माझ्याकडे..ती स्लाईडच खाली पडुन फुटली! मेंदु जमीनीला चिकटला! "ये चूहेका मजबूत दिमाग है, छुटेगा नही" असा पवित्रा घेतलेल्या त्या चिवट अवयवाला कसंतरी हळुहळु एकेका बाजुने सोडवुन उचलुन दुसऱ्या स्लाईडवर ठेवलं आणि एकदाची मॅडम जवळ आल्यावर सगळे पार्ट्स ओळखुन सांगितले. हुश्श! परिक्षा संपल्यावर घरी जाता जाता मॅडम म्हणाली तुम्हा वर्गातल्या टॉप दहा मुलांचे मार्क्स आम्ही आधीच देऊन ठेवले होते. मला बाप्पाचं वाहन त्याचं मोठ्ठं पोट धरुन माझ्या तोंडावर खदाखदा हसताना दिसलं.

आमचा बारावीचा एक पेपर अहमदाबादला झालेल्या ट्रेनमधल्या दंगलीमुळे भारत बंदात पुढे ढकलण्यात आला होता. म्हणजे सगळे पेपर संपल्यावर मधे १० दिवसांचा सक्तीचा "अभ्यासु आराम" आणि मग तो पेपर. त्रागा करण्यात काही अर्थ नव्हता..भले..तोच पेपर सर्वात सोप्पा गेला मला. बारावीचा निकाल अपेक्षेप्रमाणे लागला. कॉलेजात गेल्या गेल्या आईला स्वत: सुपर्वाईजरने येऊन तुमची मुलगी सायन्स ब्रान्च मधे दुसरी आल्याचं सांगितलं. आई फक्त नाचायची बाकी होती..पण माझ्या नजरेसमोर नाचत होती ३ अक्षरं-पी.सी.एम. त्याचे पर्सेंटच इंजिनीयरिंगला मला ऍडमिशन मिळवण्यासाठी महत्वाचे ठरणार होते. ३ वाजता रीझल्ट हातात पडला आणि जीव भांड्यात. पी(फिजिक्स) आणि सी(केमिस्ट्री) ने क्लासेसचं आणि माझंही चांगलं नाव राखलं होतं,पण एम(मॅथ्स) चे दोन-दोन क्लास लावुन देखील त्यानेच धोका दिला होता.सर्वाचा शत्रु असलेला हा गणीताचा विषय,त्यावर इतकं प्रेम करुनही माझ्यावर नेहमी का रुसतो हे अद्यापही न सुटलेलं गणीतच आहे. तरी ९०% म्हणजे ठिकच होते मार्क्स. मुंबईतल्या २१ अभियांत्रिकी( २००२ ची आकडेवारी) महविद्यालयातल्या एखाद्या "मेरीट सीट" वर तरी आपलं नाव असेल.

फॉर्म्स आणणं, नीट वाचणं,भरणं आणि जमा करणं पार पडलं.आता पुढचे सोपास्कार होते ऍडमिशनचे. त्या वेळेस एकाच कॉलेजला (व्ही.जे.टी.आय ला) सगळ्या कॉलेजसची सेंट्रलाईझ्ड ऍडमिशन प्रोसेस असायची. प्रचंड जनलोट..हजारो काय लाखो मुलं आणि त्यांचे पालक. कोणी हातातल्या रीझल्टला चित्रगुप्ताच्या पाप-पुण्याच्या लेखाजोख्यासरखं बघुन "इकडचा आकडा तिकडे झाला असता,तर आपला नंबर ह्या राऊंडला लागला असता," असा विचार करत, काही तसं पालकांना बोलुन ही दाखवत, एकटीच किंवा मित्र-मैत्रीणींसोबत आलेली मुलं फोनवर पालकांना लाईव्ह ऍडमिशन कॉमेंट्री ऐकवत, काहींची लागणाऱ्या कागदपत्रांचे दोनाचे चार हात करण्याऱ्या झेरॉक्सवाल्यांकडे धावपळ, काही तिथल्या तिथे फॉर्ममधे झालेल्या चुका/राहिलेल्या बाबी पुर्ण करत, तर काही फक्त हुंहात (हुंदडण्यात आणि हादडण्यात) गर्क होती.जागोजागी लागलेल्या स्क्रीनवरची प्रत्येक कॉलेजच्या विविध सीट्सची बदलती आकडेवारी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होती. काहींच्या स्वप्नांचं झाड मूळं धरत होतं, तर काहींना अद्याप बीजच दिसत नव्हतं. त्यातच गर्दी म्हटल्यावर प्रचंड गदारोळ.

त्यावेळी ७०-३०चा रुल होता. मागासवर्गीय जातींसाठी राखीव असलेल्या ३०% सीट्स आपल्या हातातुन आधीच निसटल्या ही किती गंभीर बाब आहे हे लक्षात यायला मला थोडा उशीरच झाला. माझे ठिक वाटलेले मार्क्स मला ६००० च्या रांगेत घेऊन गेले होते. पहिल्याच राऊंडला माझा नंबर ४थ्या दिवशी लागला. तेव्हा व्ही.जे.टी.आय सारख्या कॉलेजमधे आय.टी आणि इलेट्रिकल स्ट्रीमच्या ४-५ मेरीट सीट्स सहज उपलब्ध होत्या. पण "ह्या दोन्ही स्ट्रीमला काही भविष्य नाही,त्यात काही खास करीयर नाही करता येणार तिला!" अशी विधानं करणाऱ्या व्ही.जे.टी.आय च्या प्रीन्सीपलच्या पाजळलेल्या अकलेने चाललो. शिवाय "आपण मेरीट सीटच घ्यायची डॅडी" हा माझा हट्ट. "डॅडी आणि माझ्यासारखी भोळसट माणसं आहेत म्हणुन आपला देश मागे आहे" वगैरे विधानं करत बसण्याची ती वेळ नव्हती.

मेरीट सीट च्या फीचा डी.डी घेऊन फिरत असलेले आम्ही "दो बेचारे" पेमेंट सीटच्या फीचा प्रचंड आकडा नजरेआड करत त्याचाही डी.डी बनवला. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडला हाती फक्त अपयश आलं. सगळ्या सीट्स एकदम लांबच्या कॉलेजच्या,कधी नावही न ऐकलेल्या! आता माझा धीर सुटत चालला होता. आपण इंजिनीयर होणार ह्या स्वप्न नव्हे,आयुष्यच मानलेल्या माझ्या विधानाचे समोरसमोर तीनतेरा उडत होते. चौथ्या राऊंडला गेलो,कॉलेज चांगलं असेल तर जी मिळेल ती, मेरीट किंवा पेमेंट सीट आज घ्यायचीच असा निर्धार करुनच! स्क्रीनवर झळकणाऱ्या सीट्स मधे स्वामी विवेकानंद कॉलेज,चेंबुर, ईन्स्ट्रुमेंटेशन, १ मेरीट सीट अशी एंट्री दिसत होती. स्वामीज सारखं प्रसिद्ध, आणि इंस्ट्रुमेंटेशनसाठी नावाजलेल्या कॉलेज मधे सीट, तीही इंस्ट्रुचीच आणि वर मेरीट सीट! डॅडींनी सांगितलं, आपण घेतोय ही सीट. आमचा टोकन नंबर १०० होता. पुढचे ९९ लोक माझं भवितव्य ठरवणार होते. अखेर देवाला दया आली आणि आमचा नंबर येईपर्यंत कुणीही ती सीट घेतली नाही. डी.डी जमा केला, सगळे सोपास्कार केले..ऍडमिशन झाली होSSSS!!

घरी माझा भावी इंजिनीयरचा नवा हुद्दा समजला आणि आईने शेजारच्या मंदीरात जगातल्या सर्वात मोठ्या इंजिनीयरचं तोंड गोड करुन थॅंक्यु म्हणायला मला पाठवलं. त्याच्याच आशिर्वादाने आणि कृपेने मी इंजीनीयर होणार होते..एक अविस्मरणीय काळाला सामोरं जाऊन..अविस्मरणीय ४ वर्ष!

विशेष आभार: मा.बो कर चिमण गुर्जी (पुरावा वाचनासाठी Happy )
हा लेख इथेही वाचता येईल, नक्की भेट द्या, वाट बघतीये Happy

गुलमोहर: 

सुमेधा तुझा लेख आणि तु लिहु लागलीस या दोन्हीही गोष्टी छानच. २००६ साली पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनीयरींग मधे असेच दोन जीव उभे होते याची आठवण झाली. एक माझी मुलगी आणि दुसरा मी. यावर्षीच ती बी. टेक पदवी घेऊन एका आय टी कंपनीत जाईन झाली. तुझ्या लेखामुळे हा तिचा इंजिनियरीग प्रवेश, त्या आधीची सी.ई.टी., बारावी चे स्मरण झाले.

सुमेधा छानच लिहिलयस. शीर्षक पण मस्त आहे, अगदि वाचायचा मोह होतो लगेच Happy
एक प्रश्न विचारु का. सहज विचारतेय, रागवु नकोस हा. तुला बायोलॉजि एवढ आवडत असताना तु इंजिनिरिंग कस काय निवडलस? आणि अगदि इंजिनिरिंगमध्येहि बायोटेक्नॉलॉजि ऑप्शन कसा काय नाहि घेतलास?

सुमेधा २००२ ची १२वी.. सेम पिंच.. मी पण.. पण का कोण जाणे ११ वीत असताना इंजींनिअरिंगलाच जायचं म्हणुन बायो सोडुन दिलं होतं.. नंतर बाकिच्यांच्या आग्रहाने परत घेतलं.. आणि १२वी रिझल्ट नंतर मात्र इंजींनिअरिंगचा फॉर्म देखील भरला नव्हता मॅथ्स मधे अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स मिळाले म्हणुन Sad

बाकी लेख सुरेखच... Happy

सुमे, मस्तच लेख अगदी खुसखुशीत ! बाकी ते डिसेक्शनवरुन आठवण झाली, आम्हाला PCBM कंपल्सरी होता. आम्हाला फ्रॉग आणि अर्थवॉर्म होते. फ्रॉग (Rana Tigrina की असंच काहीसं शास्त्रीय नाव होतं त्याचं) सोपा होता पण गांडुळाची नर्व्ह रिंग सहिसलामत वेगळी करताना घाम फुटायचा. गंमत म्हणजे बारावीला बायोला ९६ मार्क्स घेवूनही मी देखील इलेक्ट्रॉनिक्स इंजीनीअरच झालो Wink

सर्वांचे मनापासुन आभार Happy
सावली...मला बायो खुप आवडत होतं, पण रॅट-डिसेकशनचा किस्सा वाचुन कळलं असेलच की चिरफाडाची किती भिती आणि किळस वाटायची मला..म्हणुन इंजिनीयरींग. मोरोवर, माझी कजीन त्यावेळेस सेकन्ड ईयर ईलेट्रॉनिक्सला होती..तिच्या पुस्तकात नाक खुपसलेलं बर्‍याचदा आणि खुप आवडलेलं.
बायो टेक्नॉलॉल्जी च्या सीट्स मिळत होत्या दुसर्‍या-तिसर्‍या राऊंडला, पण खुप लांबच्या कॉलेजस मधे होत्या, म्हणुन नाही घेतल्या. तू विचारलंस म्हणुन सांगते, मला डॅडी बारावीच्या सुट्टीत एका अ‍ॅपटीट्युड टेस्ट साठी घेऊन गेले होते. त्यात बायो रीलेटड एकही प्रश्नाचं उत्तर माझं चुकलं नव्हतं. ते काऊनसीलर स्पष्ट म्हणाले होते की ही डॉक्टर झाली तर चुटकीसरशी पुढे जाईल, खुप यश मिळेल. पण सी.ई.टी ची परिक्षा होऊन गेली होती,आणि मला पी.सी.बी मध्ये ९२% असुनही डॉक्टर व्हायची इच्छा नव्हती. डॅडींनी कपाळाला हात लावलेला Happy असो, इंजिनीयर होऊनही काही वाईट नाही झालं Happy

सगळ्यांच्या त्या काळाला आणि आठवणींना उजाळा मिळावा हाच उद्धेश आहे माझाही..
विशाल दादा, आमच्या मॅथ्स क्लासच्या मॅडमने अर्थवर्मचा किस्से सांगितलेले आम्हाला..:फिदी:

मस्त लिहिलयस सुपु Happy विशाल, राना टायग्रिनाच तो. आम्हाला झुरळ, बेडूक, गांडूळ होते कापायला. एक बेशुद्ध बेडूक घरी घेऊन आले होते प्रॅक्टीससाठी आणि त्याच्यातच सगळ्या सिस्टीम्स स्टडी केल्या होत्या. एकदा कॉलेजमधे सगळ्या बेडकांना भूल कमी झाली होती तेव्हा सगळ्यांच्या प्लेटमधले बेडूक तंगड्या झाडू लागले होते आणि लॅबमधे किंचाळ्या घुमल्या होत्या.

सुमे, छानच लिहिलयस...
अ‍ॅडमिशनची सगळी झेंगटं वाचून अजून २ वर्षांनंतरचं चित्र डोळ्यांसमोर रंगवलं Sad
(आमच्या वेळेला अगदीच सोपं, सुरळीत आणि निवांत होतं सगळं...)

विशाल, सुपु, सेम पिंच. च्यामारी सगळे इंजिनीयर्स बायालॉजीची आवड असलेले असतात कॉय ?

सुपु, मस्त लिहिलयस. एकदम लय पकडून. वाचायला धमाल येत्येय. लगे रहो.

सही.. मलापण आठवले ते इंजिनीयरिंग चे राउंड्स.. आमच्यावेळी ३०% चे ऑप्शनस आधीच भरुन द्यावे लागायचे.. माझा पहिला ऑप्शन coep civil होता.. त्या राउंडला तर नाही मिळाला पण इच्छा इतकी उत्कट की फायनली पोहोचलेच तिकडे. Happy

काहीही केलं असतं तरी असा काय फरक पडणार होता हे सध्याचे मत! Wink

सुमे झक्कास लिहिलयस, आता चार वर्षांचे चार भाग पण येऊदेत Happy

मला डिसेक्शन खुप्प खुप्प आवडायचं पण एकिकडे ते प्राणी मारावे लागतात म्हणून वाईटही वाटायचं. आता विचारल तर काहीही आठवणार नाही हा भाग वेगळा Sad तरिही काही निवडक लेक्चर्स, निवडक डिसेक्शन्स त्यावेळी केलेल्या मजा मस्तीमुळेच अजून लक्षात राहिलेत Wink Proud

सुमेधा, मस्तच ग! माझ्या इंजिनियरींगच्या प्रवेशाच्या आठवणी मनात तरळून गेल्या. शाळेत असताना बायो माझाही आवडता विषय होता. नेहमी वर्गात सगळ्यांपेक्षा जास्त मार्क मिळायचे. १० वी झाल्यावर आईबाबांना सगळ्यांनी सांगितलं की हिला डॉक्टर करा. शाळेतल्या सगळ्या मेरीटवाल्या मुली मेडिकलला. पण डिसेक्शनच्या भीतीमुळे मी इंजिनियरिंगला गेले. कॉलेजला असताना त्यातलीच एक एकदा बसमध्ये भेटली. तिच्या हातात एक प्लास्टीकची पिशवी. त्यात गांडूळं. आणि त्या गर्दीने भरलेल्या बसमधे ती पिशवी फुटली तर काय ह्या भीतीने घामाघूम झालेली मी. Happy

रच्याकने, ती म्हण "भरोशाच्या म्हशीला टोणगा" अशी आहे.

असाच एक लेख कॉलेजच्या पहिल्या दिवसावर पण लिही Happy

मला आत्ता जेवताना चक्क झूलॉजी प्रॅक्टीकलला रुमिनंट स्टमकच्या पिशवीत हात घालून त्याचं टर्किश टॉवेलसारखं टेक्स्चर अनुभवलं होतं ते आठवलं आणि एकदम याक्क्क असा उद्गार निघाला Uhoh एकटीच जेवत होते म्हणून बरं.

पुन्हा एकदा सगळ्यांचे खुप खुप आभार Happy
अश्वे Proud
अ‍ॅडमिशनची सगळी झेंगटं वाचून अजून २ वर्षांनंतरचं चित्र डोळ्यांसमोर रंगवलं>>> लले, आता तर सी.ई.टी,ऑटोनॉमस कॉलेजस,ऑल पेड सीट्स अशीही शेपटं लागलीत. २ वर्षांनी किती लांब होतील देवास ठाऊक Sad
पण येणार्‍या ४ वर्षांची गोडी कशानेच कमी होत नाही हेही खरंच Happy
काहीही केलं असतं तरी असा काय फरक पडणार होता हे सध्याचे मत!>>> १००% सहमत चिंगे Happy

स्वप्ना, कवे - एक मालिका तयार करायचीच आहे ह्या सोहळ्याची..इतक्या आठवणी आहेत...१-२ लेखात नक्कीच मावणार नाहीत Happy

सुमे मस्तच लिहीलंयस. आवडलं Happy

कॉलेज अ‍ॅडमिशनच्या लिस्ट लागतात तेव्हा लक्षात येतं की आपल्याला मिळालेले मार्क्स किती 'कमी' आहेत ते..अकरावी सायन्सला अ‍ॅडमिशन घेताना मागसवर्गीयांची लिस्ट ७२ टक्क्यांना क्लोज झाली होती आणि मला ७५ टक्के असुनही मागासवर्गीय प्रमाणपत्र नसल्याने अ‍ॅडमिशन घेता आलं नव्हतं. त्यादिवशी कळलं होतं अगतिकता कशाला म्हणतात ते.

सुम्स... (ड्रिम्स तसं सुम्स हा हा :D) जमलाय बरं प्रवेश... मला अगदीच अनोळखी... आम्ही DA वाले ना... १० नंतर डिप्लोमा नी मग डिग्री अशे... म्हणून सगळं ना परीकथा वाचत असल्याच्या नवलाईनं वाचलं..

पण रॅट-डिसेकशनचा किस्सा वाचुन कळलं असेलच की चिरफाडाची किती भिती आणि किळस वाटायची मला..>> मला तर भडभडून आलं... विपूत म्ह्टलेलं ना की तू समोर बघत असल्यासारखं लिहीतेस... आई गं तो लिबलिबीत जमीनीला चिकटलेला मेंदू दिसला मला इथून आणि असं ढवळून आलं ना... नुकतीच जेवलेले...

पण छानच चालू आहे गं... वाचतेय मी...

सुपु,

मस्तच लिहिलंयस. मला सुद्धा माझे डीप्लोमा नंतरचे इंजिनीअरींगच्या प्रवेशाचे दिवस आठवले. तेव्हा औरंगाबादला हे राऊंड्स होत असत.

माझ्या वडीलांची इच्छा होती की मी मेडीकल ला प्रवेश घेऊन डॉक्टर (MBBS) व्हावं. त्यांचं स्वतःचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न होतं ते. पण जिथे मी साधं तापासाठीचं औषध घ्यायला दवाखान्यात जायला पण घाबरते तिथे स्वतः डॉक्टर होऊन रुग्णांना तपासणे + सर्जरी + इन्जेक्शन्स वै. गोष्टी माझ्या साठी तरी 'दुरून डोंगर साजरे' या कॅटेगरीत होत्या.

शिवाय त्या चित्रविचित्र प्राण्या-कीटकांची आणि वनस्पतीच्या भागांची इ. (म्युकर, स्पायरोगायरा, कांद्याची साल, अमिबा etc) चित्रे काढणे हे माझ्यासाठी सगळ्यात जीवघेणे आणि कंटाळवाणे काम होते. एकूणच माझं आणि चित्रकलेचं वाकडं आहे. १० वीच्या वेळी माझी सबंध प्रयोगवही "लेखन मी आणि रेखाटन बाबांनी" (माझ्या बाबांचा बायॉलॉजी हा आवडता विषय आहे.) अशी कंप्लीट केली होती. तर माझी चित्रकलेची सबंध वही नन्याने कंप्लीट केली होती. (मला तर १० वीत शाळेच्या सहामाहीत चित्रकले मध्ये ३५ मार्क्स मिळाले होते. काठावर पास Blush )

त्यामुळे ते डीसेक्शन वै. टाळण्यासाठी डिप्लोमा ला अ‍ॅडमिशन घेऊन टाकली मी १० वी नंतर. Happy तेव्हा डीप्लोमा म्हणजे काय + इंजीनीअरींग म्हणजे काय + ते कशाशी खातात याच्याशी मला काही देणं-घेणं नव्हतं. १२ वी केली तरे सायन्स ला ते बोरींग प्रॅक्टीकल्स असतील. या भीतीने डिप्लोमा होकार दिला होता. Wink

अग बाई.. सर्वांनी आधी तीन मूर्ख बघून मग ठरवा काय कारायचं ते? ऊगाच इंजीनीयर होवून बँकेत नोकरी घेवून तिथे गप्पा नका कुटू.- ईती रँचो.

सुमे छान लिहिलय्स. आम्हि पण १० नंतर डिप्लोमा वाले त्यामुळे हे डिसेक्शन सेक्शन नव्हतं आम्हाला..:)
मी तर कॉमर्सच करणार होतो. सायन्सला अजिबात जायचं नव्हतं मला आणि डिप्लोमा हे माझ्यासाठी नविनच होतं तेव्हा त्यामुळे त्यचाहि गंध नव्हता. आमचे पिताश्री मागे लागले डिप्लोमाच कर, मग काय घेतली एडमिशन आणि मग chemistry, physics, maths विषय बघुन डोळे पांढरे. पहिलं अख्ख वर्ष पांढर्‍या डोळ्यान्नीच वाचलं सगळं, नंतर हळु हळु डोळे निवळले आणि झाला एकदाचा डिप्लोमा.. :p
पण कसहि का असेना तेव्हाच्या बाबांच्या डिसिजनचा फायदा आत्ता लक्षात आला.
पु.ले.शु. Happy

सुमेधा,
छान लिहिलय (आपण दोघे बहुदा गाववाले. माझेही शालेय शिक्षण सातवी ते दहावी, चेंबूरलाच झाले.)
पण मी खुप आधीच्या पिढीतला. त्यावेळी मूली नूकत्याच या क्षेत्राकडे वळत होत्या. माझ्याही
दहावीनंतर फार ऑप्शन्स नव्हतेच आम्हाला. रक्ताची भिती मलापण होती, म्हणून नाईलाजाने
कॉमर्सला गेलो.

च्यामारी सगळे इंजिनीयर्स बायालॉजीची आवड असलेले असतात कॉय ?>>>अगदी.. माझा हि सगळ्यात आवडता विषय .. बायो.. ते अर्थवर्म आत्ता हि दिसले कि कसे तरी होते.. तेव्हा डिसेक्शन कसे केले काय माहिती Happy .. पण बाकी धमाल असायची .. ती बेडकांची उडाउडी आमच्या थे पण झाली होती..
पण ताई साहेबानी मेडिकल घेतले ..तिथला जीवघेणा प्रकार बघून (अडमिशन आणि नंतर पीजी साठी भानगड, अभ्यास मरमर) हे सगळे बघून आमचे घासपूस घासपूस करून लक्ख केले डोके ..कि मेडिकल ला जावून उपयोग नाही .. बायोत ९७ मिळून सुद्धा आम्ही इंजिनियर ... Sad बायो मेडिकल वगैरे प्रकार पुण्या मुंबई कडे .. नागपुरात गप गुमान कम्प्युटर करा.. ) पण ते इंजी drawing आणि मेकानिक्स अरारारा ..
आता काही फरक पडत नाही .. पण अजूनही संधी मिळाली तर .. असे स्वप्न बघत बसायचे Happy

योडे,ड्रीमगर्ल,निंबे,खवचट,सम्या,दिनेशदा,प्रित,आगाऊ आणि ऋयाम...खुप खुप धन्यवाद Happy

आता बायोत डिसेक्शन जवळजवळ रद्द झाले आहे!>> वाचले बिचारे जीव (विद्यार्थ्यांचेही :फिदी:)

ऋयाम, माझी बारावी मार्च २००२ ला झाली..पण तुमच्या बॅचलाही डिसेक्शनला अशीच परवड होत असणार, माझी कजीन होती त्याच बॅचला Happy

सुमे मस्त लेख लिहीलायस, खुपशा आठवणी जाग्या झाल्या अ‍ॅडमिशनच्या वेळेच्या,
विकु रॅना टॅग्रिना आणि नर्व रिंग >>>> अगदी अगदी, प्रॅक्टीकलला नर्वरिंग पूर्ण कढली तर ५ मार्क असायचे त्याला आणि त्यासाठी ३ गांडूळ वापरायची परमिशन Proud त्या टब मधून गांडुळ निवडून काढायच भयाण काम आठवल
फ्रॉग डिसेक्शन साठी तर एकदा ह्या टॅग्रीनाची वानवा झालेली तेव्हा पकडून आणावे लागले पिशवीतुन.
पण मला ही बायो मधे ९१% असून मेडीकल ला अ‍ॅडमिशन मिळाली नाही,कारण पीसीबी ग्रुप ला ८५% मिळाले. रादर जाता आल नाही, आणि एचाअर मधे पडले .
मराठवाड्यासारख्या,शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या /रद्दड विभागात एक वर्ष शिक्षणाच काढल्याची जबरदस्त शिक्षा मिळाली मला

Pages