ब्लॉग, ब्लॉगर्स आणि ब्लॉगिंग २
गेल्या रविवारी म्हणजे ९ मे २०१० ला मुंबईत दादर सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात ब्लॉगर्स मेळावा दणक्यात पार पडला. त्याबद्दल मायबोलीवर बोलायचं काय प्रयोजन असं वाटेल अनेकांना. मायबोलीवर लिहिणार्यांपैकी बरेचसे लोक नियमित ब्लॉगर्स आहेत. उत्तमोत्तम लिखाण ते सगळे आपल्या ब्लॉगवर करत असतातच. तसेच ब्लॉग लिखाणासंदर्भातले बरेचसे मुद्दे हे मायबोलीवरच्या लिखाणांनाही लागू होतात. मराठी ब्लॉग जगत या अस्तित्वाला मायबोली, मिसळपाव किंवा तत्सम साइटसवरचे लिखाण हे जगही जोडलेलेच आहे. त्यामुळे हे इथल्यांपर्यंतही पोचवावे असे वाटले.
तर असो....
कांचन कराई, महेंद्र कुलकर्णी आणि रोहन चौधरी या तिघांनी अतिशय उत्तमपणे या मेळाव्याचे संयोजन (आर्थिक बाजूसकट) उत्कृष्टरित्या पार पाडले. त्यांचे आभार. या सगळ्याबद्दल वेगवेगळ्या ब्लॉगर्सनी लिहिलंच आहे. कोण कोण आले होते पासून काय काय खाल्ले इथपर्यंत सगळंच बहुतेक ब्लॉगपोस्टस मधे आलेलं आहे. तेव्हा मी त्यावर काय बोलणार अजून!
मेळाव्यानंतर घरी गेल्यावर लगेच लिहिले गेले असते तर नक्कीच सरळसोट वृत्तांतापलिकडे मीही लिहिलं नसतं आणि कदाचित ज्यांनी लिहिलंय त्यांच्याइतकं चांगलं मला लिहिताही आलं नसतं. आणि माझा आळशीपणाही होताच त्यामुळे मेळावा झाल्या झाल्या लिहायचं राहूनच गेलं.
तेव्हा आता वृत्तांतापलिकडे जाऊन मेळाव्यासंदर्भाने पुढे आलेल्या आणि मला महत्वाच्या वाटलेल्या काही गोष्टींबद्दलच मी लिहेन म्हणते.
मेळावा छान पार पाडण्यासाठी संयोजकांचे कष्ट होतेच यात वाद नाही पण त्यांनी जे ठरवलंय ते योग्य रितीने पार पडावं याची जबाबदारी आपली सगळ्यांची म्हणजे जमलेल्या सगळ्या ब्लॉगर्सची आहे. हे अर्थातच ब्लॉगर्स मेळावाच नव्हे तर कुठल्याही सभासंमेलनाच्या बाबतीत खरं आहे. या मेळाव्याच्या ठिकाणी आणि इतरत्रही आपण ते पाळतो का? संयोजकांनी मेळाव्याची एक रूपरेषा ठरवलेली आहे. ती इमेलमधून पाठवलेलीही आहे तर त्या रूपरेषेनुसार कार्यक्रम व्हावा ही जबाबदारी उपस्थित असलेल्या प्रत्येकाची नाही का? जर पहिलं सेशन, पहिला कार्यक्रम हा केवळ ब्लॉगर्सनी स्वतःची थोडक्यात ओळख करून देण्याचा आहे तर आपण किती वेळ बोलायचं याला मर्यादा आपण घालायला नको का? की थोडक्यात या शब्दाची व्याख्या/ अर्थ आपल्याला माहीत नाहीयेत? जे सगळे विस्ताराने बोलले त्यांचं म्हणणं महत्वाचं होतं हे निश्चित. पण थोडक्यात ओळख च्या ऐवजी नंतरच्या सेशनमधे ते केलं गेलं असतं तर विस्तृत भाषणांनंतर ज्या ब्लॉगर्सच्या ओळखी झाल्या त्यांच्या ओळखींमधे आणि नंतरच्या सेशनमधेही लोकांना इंटरेस्ट राह्यला नसता का? संयोजकांनी ठरवलेल्या रूपरेषेला धाब्यावर बसवण्यात आपल्याला काय भूषण वाटतं? की हा पण एक मराठी बाणा आहे?
देवनागरी लिखाणाचे तंत्र यावर आपण सगळ्यांनी भरपूर किंवा सगळ्यात जास्त उहापोह केला. काहींना मुळाक्षरांच्या सेटसप्रमाणे किबोर्ड असल्यामुले लिखाण सोपे वाटत होते. काहींनी फोनेटिक किबोर्ड जवळ केला होता. स्पेलचेक, शुद्धलेखन इत्यादींच्या अनुषंगाने काही मुद्दे मिळाले. ते जामच तांत्रिक असल्याने माझ्या अर्थातच लक्षात राह्यले नाहीत. आणि मुळात ओळख प्रकरणांमधे खूप वेळ गेलेला असल्याने तोवर काही ऐकण्याचा पेशन्स बहुतेक संपला होता. तिथे दिली गेलेली तांत्रिक माहिती कुणी एकगठ्ठा आपल्या ब्लॉगमधे टाकली तर नीट समजून घ्यायला फार आवडेल.
पुढचा मुद्दा कॉपीराइट इश्यूचा. आपण आपल्या लेखात फोटोग्राफ्स कुठून उचलून वापरत असू तर ते तसे वापरणे हे मुळात violation आहे. तसे करणे चुकीचे आहे हीच गोष्ट बहुसंख्य ब्लॉगर्स किंवा इतरांच्या गावी नसते. फॉरवर्ड पाठवणारे किंवा काही ब्लॉगर्स हे केवळ मला आवडलं मी शेअर केलं असा सूर लावतात, त्यापुढे जाऊन आम्ही प्रसिद्धी देतोय या गोष्टींना अशी शेखीही मिरवतात. ही वृत्ती मोडण्यासाठी मुळात काहीतरी करायची गरज आहे. मराठी ब्लॉगर्स म्हणून आपण आपलं अस्तित्व उभं करत असताना या काही मुद्द्यांकडे आपण जायला हवे. कॉपीराइट संदर्भातले तांत्रिक ज्ञान महत्वाचे आहेच पण अॅटिट्यूड, वृत्ती याबद्दल पण आपण जबाबदार मराठी ब्लॉगर्स म्हणून आपल्या ब्लॉग्जमधून भाष्य करायला हवे. निदान काही ढापू लोक जे अनभिज्ञ आहेत ते तरी सुधारतील.
अर्थात ह्या झाल्या तांत्रिक गोष्टी. संपूर्ण कार्यक्रमात या तांत्रिक गोष्टींपलिकडे कोणी बोलायलाच तयार नाही की काय असं वाटलं. ब्लॉग्ज मधून येणारे विषय, लिखाण यांचा मर्यादित स्कोप यावर प्रसन्न जोशीने खूप महत्वाचे मुद्दे मांडले. मराठी ब्लॉग्ज मधे मराठीपण हे ज्ञानेश्वर-तुकाराम, वपु-पुलं, गणपती-दिवाळी, वडापाव यापलिकडे जातच नाही. मराठी ब्लॉग्जमधे या पलिकडचे विषय फारसे येत नाहीत. मराठी बाहेरचं इतर साहित्य मराठीत आणलं जाणं असं फारसं काही घडत नाही. ब्लॉगला मराठी शब्द शोधण्यापुरताच आपला मराठीचा अभिमान असतो. हा असा अट्टाहास योग्य आहे का? असं काहीसं त्याचं म्हणणं होतं. मुद्दा महत्वाचा होता. पण कदाचित खूप वेळ भाषणबाजी झाल्यामुळे असेल त्या मुद्द्याला सोयीस्कर बगल दिली गेली आपण सगळ्यांकडूनच. माझ्या आसपासच्या खुर्चीवरून कशासाठी जायचं या पलिकडे? कशासाठी पहायचं यापलिकडे? अशी कूपमंडूक प्रतिक्रियाही खुसखुसताना मी ऐकली.
मुद्दा मला महत्वाचा वाटला. मराठीपण हे खूपच मर्यादित मुद्द्यांपुरतं दिसून येतंय ब्लॉग्जमधे. कुठे ब्लॉग किंवा तत्सम अनेक गोष्टींना मराठी प्रतिशब्द शोधण्याच्या अट्टाहासापुरतंच रहातंय तर कुठे आमचे सण आणि आमची संस्कृती याबद्दल प्रचंड भावनांनी ओथंबून जात आंधळेपणाने जुनं ते सोनंचाच जप करताना दिसतंय तर कुठे वापरून गुळगुळीत झालेल्या शब्द आणि संकल्पनांना घेऊन run of the mill प्रकारची तथाकथित साहित्यनिर्मिती करताना दिसतंय इत्यादी. मराठी भाषेबाहेरचं काहीतरी मराठीत आणणं सोडाच महाराष्ट्रातल्याच आयुष्याबद्दल बरंच काही आपल्यापर्यंत सर्वांगाने पोचत नाहीये. आपल्याला ते शोधावसं, लिहावसं वाटत नाहीये. मराठीपणाच्या कक्षा आपल्या बुद्धीत रूंदावत नाहीयेत आणि त्यामुळे मराठीपणाचे बरेचसे पैलू आपल्याला दिसतच नाहीयेत.
आता याची कारणं म्हणायची तर मला सापडलेली ही काही कारणं...
१. इंटरनेट हा प्रकार उपलब्ध असणं, तेही अश्या प्रकारच्या लिखाणासाठी मुक्तपणे उपलब्ध असणं हे अजूनही ठराविक व्यवसायांपुरतंच आणि शहरांपुरतंच मर्यादित आहे.
२. उपलब्धता असली तरी कॉम्प्युटर आणि इंटरनेट या संदर्भातली भीड चेपली जायला अजून वेळ आहे. हे इतर व्यवसाय आणि लहान गावे यांच्यासंदर्भात
या दोन कारणांमुळे खूप ठराविक लोकच लिहिणारे आहेत आणि त्यामुळे निश्चितच वैविध्याची कमतरता आहे.
३. आपली (माझ्यासकट आपली सगळ्यांची) कवाडं अजून बर्याच अंशी बंद आहेत. यापलिकडे आहेच काय/ गरजच काय याप्रकारची मानसिकता आपली सगळ्यांचीच आहे कमी अधिक प्रमाणात.
४. ब्लॉग लिहिणे हे अजूनही आपल्या ओळखीच्यांपुरते लिखाण, गंमत म्हणून लिखाण इतपतच आहे. त्याचे ते स्वरूप जोवर बदलत नाही (आपल्याकडून आणि इतर अनेक तांत्रिक पातळ्यांवर सुद्धा) तोवर त्यात गांभीर्याने दखल घ्यावी असे थोडेसेच असणार.
अर्थात ही सगळी 'कारणे' झाली. स्वतःच्या, स्वतःच्या मराठीपणाच्या मर्यादा मोडायची, कक्षा रूंदावायची वेळ झाली आहे हे आपलं आपल्यापुरतं आपल्याला टोचलं तरी खूप झालं की!!
या मर्यादित विषयांच्या पार्श्वभूमीवर मला काही जणांचं लिखाण महत्वाचं वाटतं. त्यातले आत्ता आठवणारे हे दोन.
१. झुलेलाल उर्फ दिनेश गुणे http://zulelal.blogspot.com - दर वेळेला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या जगण्याबद्दल, वेगवेगळ्या प्रकारच्या जगण्याबद्दल एक काहीतरी नवीन अनुभवायला मिळतं. एखादा प्रश्न, समस्या, नवी वाटचाल, एखादा तिढा असं काहीतरी नेहमीच्या चक्कीपेक्षा वेगळं, काहीतरी खूप महत्वाचं आणि आपल्या आयुष्यांशी अप्रत्यक्षपणे का होईना निगडीत असणारं प्रामाणिक लिखाण. परत भाषाशैली अप्रतिम आहेच.
२. मधुकर रामटेके http://mdramteke.blogspot.com - सुरूवातीला मायबोलीवर याचं काही वाचलं तेव्हा ब्राह्मणविरोधी/ ब्राह्मणद्वेष्ट्या विचारांपलिकडे काही दिसलं नाही. रागही आला. पण मग त्याने त्याच्या भामरागडबद्दल, त्याच्या भाषेबद्दल, तिथल्या चालीरितींबद्दल लिहायला सुरूवात केली तेव्हा सुखद धक्का होता. सहज, उस्फूर्त आणि वेगळ्या आयुष्याबद्दलचं लिखाण. पण तरी मराठीपणातलंच(भाषा वेगळी असली तरी ते मराठीपणच), महाराष्ट्रातलंच. आपल्यापेक्षा वेगळा समाज आपल्यापुढे उभा करणारं आणि पर्यायाने आपल्याला विचारात पाडणारं.
अजूनही बरेच आहेत पण सध्या पटकन हे दोन आठवतायत.
तर असो.. मर्यादा तोडण्याच्या नावाने चांगभलं करून सध्यापुरती माझ्या किबोर्डाला विश्रांती देते. तुम्हीही थकला असाल तर उतारा म्हणून वरचे दोन ब्लॉग्ज नक्की वाचा. याला आमच्या मायबोलीवर रिक्षा फिरवणे म्हणतात. म्हणोत म्हणतात तर. मेरेको क्या!!
- नी
छान माहिती. झुलेलाल तर छानच
छान माहिती.
झुलेलाल तर छानच लिहितात. रामटेके साहेब तिकडे पण लिहितात का? वाचले पाहिजे
नी, चांगली माहिती. मलाही
नी,
चांगली माहिती.
मलाही झुलेलाल यांचं लेखन आवडतं. मधुकर यांचा ब्लॉग वाचला आहे, आणि त्यातलं काही लिखाण आवडलं आहे.
छायाचित्रांच्या प्रताधिकाराबद्दल -
प्रताधिकारमुक्त नसलेली छायाचित्रं वापरणं योग्य नाही. छायाचित्रकार कोण हे माहीत असेल, व त्याची परवानगी असेल, तरीही छायाचित्रकाराचं नाव व त्याचा प्रताधिकार अधोरेखीत करणं बंधनकारक असतं. एखाद्या छायाचित्राचा प्रताधिकार कुणाकडे आहे, हे ठाऊक नसल्यास तिथे 'प्रताधिकार अज्ञात' अशी नोंद करावी.
चिन्मय, तुझ्याशी बोलणारच होते
चिन्मय,
तुझ्याशी बोलणारच होते या संदर्भात. तू म्हणतोस ते तांत्रिक मुद्दे आहेतच. नियम आहेत पण मुळात श्रेय न देण्याची वृत्ती, त्यात काय एवढं प्रकारचा ignorance (मराठी शब्द?) ह्याचं काय करायचं?
असो कांचन कराई कॉपीराइट संदर्भात माहितीचा गठ्ठा प्रकारचा ब्लॉग सुरू करणार आहे. त्यात तू एखादं प्रकरण लिहावंस पाहुणे लेखक म्हणून असं मला वाटतं. तुमचा दोघांचा संपर्क साधून देते.
प्रताधिकाराच्या बाबतीत ते
प्रताधिकाराच्या बाबतीत ते धारण करणारानीही त्यान्ची अतिरेकी भूमिका सोडली पाहिजे. ज्याचे त्याचे श्रेय त्याला मिळाले पाहिजे हे तर निर्मात्याचा मूलभूत हक्क आहे. समजा मी एखादी कविता उद्ध्रूत केली आणि त्यात मूळ कविचे नाव आभारपूर्वक नमूद केले तर अडचण येऊ नये.तेच फोटोच्या बाबतीत. आणि त्यापासून दुसर्याने व्यावसायिक फायदा उपटू नये या मर्यादेत. पण मागे वहुधा चिनूक्सने राजहंस, मेहता आदि प्रकाश्कांनी जी काही कायदेशीर बंधने टाकली आहेत ती तर अतिरेकीच वाटली. कायदेशीर असली तरी. चिनूक्सचे म्हणणे तेव्हा असेच होते जे काही आहे ते असे आहे ते तुम्हाला पटो अगर न पटो पण पाळावे लागेल. त्यात पुन्हा लेखकाने परवानगी दिली तर प्रकाशकाचीही पाहिजे. अर्थात ह्या अटी लेखक आणि प्रकाशकादरम्यान झालेल्या कायदेशीर कराराला अनुलक्षून असतात. हे कायद्याने योय असेल पण भाषा संवर्धनाच्या दृष्टीने योग्य आहे काय. म्हनजे मला माझ्या लिखाणात कोणाच्या चार ओळी ऐन वेळी वापरायची उर्मी आली की मी ती दाबून लेखक प्रकाश्क या.न्चे पाय धरीत बसायचे. हाईट म्हनजे खरेच कोणी मागितली तर हे चक्क नाकारतात ही . कारणे न देता.
म्हणजे चित्रपट कला ही व्यवसाय म्हणून अर्धशिक्षीत बनियांच्या हातात गेली , पुढे त्याचे हक्क वितरक नावाच्या दुसर्या बनियाच्या आणि आता तर माफियांच्या हातात गेली तसे झाले. प्रकाशन व्यवसाय हा भांडवलदारांच्या हातात गेल्याने ते म्हनतील त्या अटी. दुर्दैवाने लेखक साहित्य प्रकाशित होतेय दुस्र्याच्या भांडवलावर या आनन्दात वाट्टेल त्या अटी मान्य करताहेत.
वेगवेगळ्याब्लॉगवर वापरलेल्या इतर कलाकृतीतून त्याच्या निर्मात्याना बोनस प्रसिद्धी मिळते ह्या दाव्यात तथ्य आहेच.
पन वापरकर्ता त्याचा स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता वापर करत नसेल तर आणि मूळ कलाकाराचे ॠण मान्य करत असेल तर हे प्रताधिकाराचे खूळ जरा आवरलेच पाहिजे.
चिनूक्सच्या लोखाणावरून तरी प्रकाशकान्ना अशी भीती वाटत असावी की पुस्तकेची पुस्तके नेटवर उद्धृत केली जाऊन मूळ पुस्तकाचे व्यावसायिक गणित कोलमडेल. एक तर या पुस्तकवाल्यांची वितरण व्यवस्था एवढी भिकार आहे की हव्या त्या माणसाला हवे ते पुस्तक उपलब्धच होत नाही.ऑट ऑफ प्रिन्ट पुस्तके हे छापत नाहीत.दुसर्यालाही छापू देत नाहीत. त्यातले उतारे उद्दृत करू देत नाही म्हनजे अक्षरशः यानी संस्कृतीच वेठीला धरली आहे.
होणार्या व्यवसायिक नुकसानीचा मुद्दाही तपासला पाहिजे. बहुधा गाण्या.न्ची/संगीताची पायरसी सर्वात जास्त होत असावी.तरीही चित्रपट संगीताच्त्या ध्वनीफीतीचे लाँचिंगचे सोहळे होतात , चित्रपटापेक्षा कधी कधी त्यातूनच जास्त पैसे मिळतात. ध्वनिफितीच्या हक्कातून निर्मीतीचा मोठा भाग वसूल होऊ शकतो. त्यामुळे इकडे तिकडे पुस्तके नेटवर आल्याने त्याच्या खपावर परिणाम फार होईल असे वाटत नाही.
नशीब लायब्ररीवाल्याना पुस्तके सर्क्युलेट करण्यावर या महाभागानी बंदी आणली नाही . एक पुस्तक १०० जणानी वाचल्याने ९९ गिर्हाईकाच्या प्रतीचा खप बुडाला या मुद्द्यावर.
या कोत्या मनोवृत्तीपायी चित्रीकरण झाल्यास त्याच्या कॉप्या होऊन नाटके कोणी पहायला येणार नाही ह्या भीतीने यांनी चंगल्या नाटकांचे चित्रीकरणही केले नाहे . त्यामुळे सांस्कृतिक नुकसानच झाले.
बाकी ब्लॉग संस्क्रुती वाढेल तसे विषयाचे वैविध्य वाढेल यात शंकाच नाही. पूर्वी मराठी साहित्यात जो साचले पणा होता तो नवनवीन लेखन आल्यावर त्या जसे पुष्कळ वैविध्य आले तसे.....
<< स्वतःच्या मराठीपणाच्या
<< स्वतःच्या मराठीपणाच्या मर्यादा मोडायची, कक्षा रूंदावायची वेळ झाली आहे हे आपलं आपल्यापुरतं आपल्याला टोचलं तरी खूप झालं की!! >>
अगदी बरोबर.
छान मुद्दे मांडलेत तुम्ही. पटलेत.
मधुकर रामटेके बद्दलचे तुमचे बदललेले मत तुमच्या मनाचा मोठेपणा आणि विचारांची लवचिकता दाखवून गेलेत.
>>संयोजकांनी ठरवलेल्या
>>संयोजकांनी ठरवलेल्या रूपरेषेला धाब्यावर बसवण्यात आपल्याला काय भूषण वाटतं? की हा पण एक मराठी बाणा आहे?
ही सार्वत्रिक समस्या आहे.... आणि इथेच संयोजकांचे कसब पणाला लागते!
कॉलेज लेव्हलवर आणि इतरही अनेक सार्वजनिक कार्यक्रमांच्या संयोजन अनुभवावरुन माझे असे मत बनलेय की वेळेची स्पष्ट कल्पना दिली नसेल तर वक्ता हमखास वहावत जातो.
आणि मराठीच नाही हा गुण (खरतर अवगुण) सर्वभाषिक वक्त्यांमध्ये आढळतो.
(आमचे एक प्रोफेसर होते... ते आमंत्रण स्वीकारतानाच विचारायचे... मी किती मिनिटे बोलायचेय... बोलणार्यांच्यात माझा नंबर कितवा असणारेय?.... माईक्/पोडियम असणारेय की नाही... किती श्रोते असणारेयत?... आणि हे सर्व डिटेल्स नसतील तर ते आमंत्रण कधीच स्वीकारायचे नाहीत)
>>ब्लॉग लिहिणे हे अजूनही आपल्या ओळखीच्यांपुरते लिखाण, गंमत म्हणून लिखाण इतपतच आहे. त्याचे ते स्वरूप जोवर बदलत नाही (आपल्याकडून आणि इतर अनेक तांत्रिक पातळ्यांवर सुद्धा) तोवर त्यात गांभीर्याने दखल घ्यावी असे थोडेसेच असणार.
आणि जरी काही दर्जेदार असले तरी माणशी एक ब्लॉग जर निघाला तर कुणाकुणाचे आणि कितीकिती आणि कायकाय वाचायचे हा प्रश्न उरणारच!
मग त्यातुन आपल्या ब्लॉगचा टीआरपी वाढावा म्हणुन वेगवेगळी मार्केटिंग गिमिक्स वापरली जाण्याचीच आणि दर्जाकडे दु:र्लक्ष होण्याचीच शक्यता अधिक वाटते!
दहा लोकांचे दहा ब्लॉग उघडुन आज काय नविन आलय हे चेक करण्यापेक्षा मायबोली वरुन फेरफटका मारणे मला अधिक सोयिस्कर वाटते
>>नशीब लायब्ररीवाल्याना पुस्तके सर्क्युलेट करण्यावर या महाभागानी बंदी आणली नाही . एक पुस्तक १०० जणानी वाचल्याने ९९ गिर्हाईकाच्या प्रतीचा खप बुडाला या मुद्द्यावर.

>>बाकी ब्लॉग संस्क्रुती वाढेल तसे विषयाचे वैविध्य वाढेल यात शंकाच नाही.
वैविध्य वाढेलही कदाचित पण दर्जाचे काय?
प्रिंट प्रकारात निदान प्रकाशन तरी काही निकषांवर हे साहित्य पडताळुन घ्यायचे... इथे तर ते ही मॉडरेशन नाही!
उथळ आणि अशुद्ध साहित्य फार मोठ्या प्रमाणात आले तर ते एकुणच ब्लॉग या लेखनप्रकारच्या विश्वासार्हतेला मारक ठरेल हे नक्की!
<मराठीपणाच्या कक्षा आपल्या
<मराठीपणाच्या कक्षा आपल्या बुद्धीत रूंदावत नाहीयेत आणि त्यामुळे मराठीपणाचे बरेचसे पैलू आपल्याला दिसतच नाहीयेत. आता याची कारणं म्हणायची तर मला सापडलेली ही काही कारणं... >
तुम्ही लिहीलेली कारणं बर्याच प्रमाणात बरोबर आहेत.
पण होतील बहुतेक सुधारणा हळुहळु. सुरुवातीच्या उत्साहात होत असेल हे. समज येत गेली की दर्जा सुधारेल...
(ज्यांचा तितकासा दर्जा नाही, त्यांनी प्रयत्न केल्यास. मुळात चांगलं-वाईट समजण्याची पात्रता असल्यास..)
ब्लॉगवर बरेचदा हलकं-फुलकंच वाचनात आलं आहे. साहित्यिक दृष्ट्या विशेष दखल घेण्यायोग्य आहे का नाही माहित नाही... एखादा नवा अनुभव / फजिती / राग वगैरेही.
काही वेगळ्या विषयांवरचे ब्लॉग्स वाचनात आले.
कंटाळा http://kantala.blogspot.com/
बाष्कळ बडबड http://www.bashkalbadbad.blogspot.com/
हरकत नाय http://www.harkatnay.com/
* मी खुप ब्लॉग्स वाचलेत वगैरे म्हणणं नाहीये. हे मला चांगले वाटले म्हणुन लिंक दिली...
कुणाकुणाचे आणि कितीकिती आणि
कुणाकुणाचे आणि कितीकिती आणि कायकाय वाचायचे हा प्रश्न उरणारच!
मग त्यातुन आपल्या ब्लॉगचा टीआरपी वाढावा म्हणुन वेगवेगळी मार्केटिंग गिमिक्स वापरली जाण्याचीच आणि दर्जाकडे दु:र्लक्ष होण्याचीच शक्यता अधिक वाटते!
दहा लोकांचे दहा ब्लॉग उघडुन आज काय नविन आलय हे चेक करण्यापेक्षा मायबोली वरुन फेरफटका मारणे मला अधिक सोयिस्कर वाटते
>>>
प्रत्येक माध्यमात ही भीती असतेच. मराठी पुस्तकात ८० टक्के तरी भरताड असावे :). कवितेच्या प्रान्तात काय स्थिती आहे. ? कवी कमी 'कवडे' अधिक !अगदी मायबोलीपासून आत्मपरीक्षण केले तरी चालेल. हिन्दी चित्रपटात काय? त्यातही आपण सगळेचित्रपट पहात नाहीच.
दर्जा टिकवला तर आपसूक लेखन उचलले जातेच. अमिताभचा ब्लॉग आवर्जून वाचला जातोच. अगदी मायबोलीचे उदाहरण घेतले तरी चिनूक्स, साजिर्या, सिन्डी , मधुकर, धुन्द रवी (व यांच्यासारखे लोक ;)) यानी काही टाकले की ते प्राधान्याने वाचले जातेच.
लिम्ब्या आणि टोणग्याने अगदी प्रतिज्ञानेश्वरी लिहिली तरी अगदी काही वाचायला उरलेच नाही तर रविवारी कदाचित वाचले जाते.(किंवा ते ही नाही. )
शिवाय निवडक ब्लॉगलेखनाचा परिचय करून देणारे पोर्टलही निघतीलच ना सर्च इंजिनसारखे. शिवाय तांत्रिक विषयातले लोक आपापले समानधर्मा शोधीत राहतीलच...
त्यामुळे ब्लॉग लेखनाला भवितव्य आहेच...
@टोणगा बघ म्हणजे
@टोणगा
बघ म्हणजे पुस्तक्/सिनेमा काढण्यात भरपुर आर्थिक रिस्क असुन आणि अनेक लोकांची (जसे निर्माता/प्रकाशक्/वितरक) व्यावसायिकता पणास लागुनसुद्धा ८०% टक्के भरताड निर्माण होत असेल तर ब्लॉगच्या बाबतीत ही टक्केवारी अधिक असण्याचीच शक्यता जास्त नाही का?
>>अमिताभचा ब्लॉग आवर्जून वाचला जातोच
तो दर्जेदार असतो (?) म्हणुन वाचणारे कितीजण आणि तो अमिताभचा आहे म्हणुन वाचणारे कितीजण असतील?
>>त्यामुळे ब्लॉग लेखनाला भवितव्य आहेच...
भवितव्य नक्कीच आहे पण ते उज्वल असो ही सदिच्छा!
निदान अमिताभचा ब्लॉग 'अमिताभ'
निदान अमिताभचा ब्लॉग 'अमिताभ' पेक्षा एका सेन्सिबल माणसाचा ब्लॉग म्हणूनच वाचला जातो असे मला वाटते.
चला, ह्या निमित्तानं होत
सगळ्यांना एक
सगळ्यांना एक विनंती.
कुठल्याही आवडत्या ब्लॉगची लिंक इथे देण्याऐवजी, कानोकानी.कॉम मधे द्यावी त्यासाठीच ती सोय केली आहे. लेखात एखाद दुसरी द्यायला हरकत नाही पण हळूहळू इतरही त्यांचे आवडते ब्लॉग इथेच सांगत आहेत.
इथे लिंक दिली कि विषय ताजा आहे तोपर्यत इथून थोड्या टिचक्या मिळतील. कानोकानीवर कोण जाऊन पाहणार असे वाटणे साहजिक आहे. पण कानोकानीवर आपोआप जी वर्गवारी होते ती इथे होऊ शकत नाही.
वेगळ्या भाषेत सांगायचं तर अशी कल्पना करा एका ठिकाणी आठवड्याचा बाजार भरला आहे. आणि शेजारी नवीन वाचनालय उघडलंय. पुस्तक आठवड्याच्या बाजारात एका ढिगात टाकलं तर जास्त लोकांपर्यत पोहोचेल असे समजून एकामागे एक त्या ढिगात जर पुस्तके पडायला लागली तर किती पुस्तके पाहिली जातील? किंवा पाहिली गेली तरी किती वाचली जातील? आणि बाजाराचा दिवस संपल्यावर काय? तो ढीग तसाच पडून राहणार?
आणि ते पुस्तक जर वाचनालयात एका वेगळ्या कप्प्यात ठेवलं तर त्या एका दिवसात (बाजाराच्या दिवसात) कमी लोक वाचतील पण नंतरच्या काही महिन्यात वाचनालयातले पुस्तक शोधायला सोपे आणि म्हणूनच परत परत वाचले जाऊ शकेल. योग्य त्या विभागात असल्यामुळे त्या विषयाची आवड असलेले लोक जास्त वाचतील.
ढिगार्यातले कुठले पुस्तक लोकप्रिय आहे, कुठले नाही हे कळायचा मार्ग नाही. मला एखादे पुस्तक आवडले तरी ते चांगले आहे हे मला ढिगार्यात सांगता येत नाही. त्यामुळे नवीन पुस्तकं आली की चांगली पण अगोदर आलेली ढिगार्यात दडपून जाणे शक्य आहे. वाचनालयात अभिप्रायाची सोय आहे. त्यामुळे चांगल्या लेखकाला वाचकांपर्यंत पोहोचणे सोपे आहे.
ढिगार्याचा एक फायदा जरूर आहे. कष्ट घ्यावे लागत नाही, नुसते पुस्तक फेकले की काम झाले. पण मला जर लेखक आवडत असेल, आणि खरोखर तो वाचकांपर्यंत पोहोचावा असे वाटत असेल तर वाचनालयात ते पुस्तक ठेवणे (म्हणजेच कानोकानी.कॉम मधे योग्य त्या विभागात लिंक देणे) जास्त योग्य होईल.
(वर लिहिलेले आठवड्याचा बाजार हे एक उदाहरण म्हणून दिले आहे. त्यापेक्षा त्यातून जास्त काही अर्थ काढू नये. या लेखाचे शिर्षक, विषय, लेखक इतर काही असते तरी मी हेच उदाहरण दिले असते)
webmaster तुमची विचार
webmaster
तुमची विचार करण्याची शैली अनुकरनिय आणि बोध घेण्यासारखी आहे.
नीधप छान माहीती दिलीस
नीधप छान माहीती दिलीस .
मास्तर , आठवड्याचा बाजार
नीधप खुप सुंदर लेख..... खुप
नीधप
खुप सुंदर लेख..... खुप छान माहिती !
वाचणार्यांना
वाचणार्यांना धन्यवाद.
प्रताधिकार या संदर्भात कोणाला काय योग्य वाटतं हे ज्याचं त्याचं मत आहे पण लेखक, फोटोग्राफर, प्रकाशक, किंवा अजून कोणी ज्यांनी ती कलाकृती निर्माण केली किंवा ज्यांच्याकडे त्या कलाकृतीचे हक्क आहेत त्यांचा निर्णय, त्यांचे नियम अंतीम समजायला हवेत. पाळायला हवेत. अतिरेकी वाटले तरी कारण भरपूर वाईट अनुभवातून ते नियम आलेले आहेत. असो.
>>कॉलेज लेव्हलवर आणि इतरही अनेक सार्वजनिक कार्यक्रमांच्या संयोजन अनुभवावरुन माझे असे मत बनलेय की वेळेची स्पष्ट कल्पना दिली नसेल तर वक्ता हमखास वहावत जातो.<<
खरंय स्वरूप. पण इथे तर आधीच इमेलवर एकुण अमुक एक वेळ ओळखीचा कार्यक्रम असेल असे कळवण्यात आले होते. आणि ओळख ही जमलेल्या ६०-७० ब्लॉगर्सची असणार होती.
अरूंधती, कांचन कराई आणि महेंद्र कुलकर्णी हे एक ब्लॉग चालवतात ज्यात ब्लॉगविषयी तंत्र या संदर्भाने भरपूर माहिती आहे. वेबमास्तरांच्या आज्ञेनुसार ती लिंक कानोकानी मधे टाकते. इंटरेस्ट असल्यास वाचणे.
नीरजा, इंटरेस्टिंग माहिती
नीरजा, इंटरेस्टिंग माहिती शेअर केलीस. मलाही यायच होत खरतर ह्या संमेलनाला पण एकतर फारशी ओळखीची नाव दिसली नाहीत त्यात डोंबिवली गटग त्याच दिवशी ठरला नी झुकत माप अर्थातच माबोच्या ओळखीच्या गटगला दिल गेल
ब्लॉग संबंधी तांत्रिक माहिती सोप्या शब्दात जाणुन घ्यायला नक्कीच आवडेल. तुझ्या ब्लॉगचा ले आउट हा डिफॉल्ट लेआउट दिलाय ब्लॉगर्.कॉम ने त्यापेक्षा वेगळा आहे ना.If I m not wrong तो डायरीच्या पानासारखा आहे ना? तो कसा केलास?
मराठीपण हे खूपच मर्यादित
मराठीपण हे खूपच मर्यादित मुद्द्यांपुरतं दिसून येतंय ब्लॉग्जमधे. कुठे ब्लॉग किंवा तत्सम अनेक गोष्टींना मराठी प्रतिशब्द शोधण्याच्या अट्टाहासापुरतंच रहातंय तर कुठे आमचे सण आणि आमची संस्कृती याबद्दल प्रचंड भावनांनी ओथंबून जात आंधळेपणाने जुनं ते सोनंचाच जप करताना दिसतंय तर कुठे वापरून गुळगुळीत झालेल्या शब्द आणि संकल्पनांना घेऊन run of the mill प्रकारची तथाकथित साहित्यनिर्मिती करताना दिसतंय>>>
१००% अनुमोदन.
मराठीपण हे खूपच मर्यादित
मराठीपण हे खूपच मर्यादित मुद्द्यांपुरतं दिसून येतंय ब्लॉग्जमधे. कुठे ब्लॉग किंवा तत्सम अनेक गोष्टींना मराठी प्रतिशब्द शोधण्याच्या अट्टाहासापुरतंच रहातंय तर कुठे आमचे सण आणि आमची संस्कृती याबद्दल प्रचंड भावनांनी ओथंबून जात आंधळेपणाने जुनं ते सोनंचाच जप करताना दिसतंय तर कुठे वापरून गुळगुळीत झालेल्या शब्द आणि संकल्पनांना घेऊन run of the mill प्रकारची तथाकथित साहित्यनिर्मिती करताना दिसतंय>>> टाळ्या. टाळ्या.
नीरजा- अतिशय छान लेख.
प्रताधिकारासंबंधी टोणग्याच्या पोस्टला अनुमोदन.
नीरजा, छान लिहलस. दहा
नीरजा, छान लिहलस.
दहा लोकांचे दहा ब्लॉग उघडुन आज काय नविन आलय हे चेक करण्यापेक्षा मायबोली वरुन फेरफटका मारणे मला अधिक सोयिस्कर वाटते >> ये हुवी ना बात!!!!!
अनेक मराठी blog वाचताना मला
अनेक मराठी blog वाचताना मला खटकलेली गोष्ट म्हणजे खुप nostalgic (प्रवीण दवणे छापाचे) लिखाण . विनोदी लिखाणात तोच तोच मराठी मध्यमवर्गीयपणातुन निर्माण होणारा विनोद (इथे पुलछाप म्हणायला हरकत नाही,हा प्रभाव शिरिष कणेकर, मंगला गोडबोले ह्यांच्या लिखाणातही जाणवतो ). हे इतके तेच तेच होते की मग कधीकधी खरे लिखाण असले तरी खोटे वाटायला लागते.
सामाजिक बांधिलकिच्या जाणिवेतुन केलेले लिखाणही कुठेतरी शाळु/teenager types असते (उदा. systemमधे भ्रष्टाचार आहे,राजकारणी वाईट असेच काहीतरी)..मुळात लेखकाकडे फारशी प्रतिभा नसली तरी मला blog निमित्ताने प्रामाणिकपणे व्यक्त होणारे लिखाण वाचायला वाचक म्हणुन जास्त आवडेल.
धन्स सगळे! कवे, >>ब्लॉग
धन्स सगळे!
कवे,
>>ब्लॉग संबंधी तांत्रिक माहिती सोप्या शब्दात जाणुन घ्यायला नक्कीच आवडेल.<<
टाकते लिंक कानोकानी मधे.
>>तुझ्या ब्लॉगचा ले आउट हा डिफॉल्ट लेआउट दिलाय ब्लॉगर्.कॉम ने त्यापेक्षा वेगळा आहे ना.If I m not wrong तो डायरीच्या पानासारखा आहे ना? तो कसा केलास?<<
नेटवरच टेम्प्लेट मिळतात वेगवेगळ्या. फ्री डाउनलोडसाठी उपलब्ध असतात. त्यातूनच शोधून मिळवली. ब्लॉग टेम्प्लेट असा कीवर्ड सर्च करून. तिथेच ती लोड कशी करायची याची माहिती असते. तेवढंच केलंय. मी बाकी काही केलं नाहीये त्यात. स्वतःच टेम्प्लेट कशी तयार करायची याची माहिती देणार्या पण साइटस आहेत पण जोवर बेसिक ले आउट पर्यंत आहे प्रकरण तोवर मी करू शकते पुढे ते कोडींग फोडींग सुरू झालं की माझ्या बुद्धीला झेपत नाही.
arc,
संपूर्ण पोस्टला अनुमोदन.
बर कानोकानी मधे एखाद्या
बर कानोकानी मधे एखाद्या ब्लॉगची लिंक कुठे ठेवायची ते काय मला कळत नाहीये. ज्याला माहीत असेल त्याने विपुमधे सांगा म्हणजे मी लिंक देते तुम्हाला तिकडे अपलोड करायला.
मलातर माबो वरच राहाव लागेल
मलातर माबो वरच राहाव लागेल कायम् :)...चायनामधे ब्लॉग्स आर ब्लॉक्ड
निरजा, चांगले / योग्य मुद्दे
निरजा, चांगले / योग्य मुद्दे मांडले आहेस ...
नी, तुझे मुद्दे चांगले आहेत.
नी, तुझे मुद्दे चांगले आहेत. संयोजनाविषयी आणि वेळखाऊ ओळखीविषयी तिथे उपस्थित असलेले बोलु शकतील.
प्रताधिकाराविषयी तुझं आणि चिनूक्सचं म्हणणं पटलं. प्रताधिकार न नोंदवलेल्या चित्रांविषयी काय करावं असा मला पण प्रश्न पडला होता. कारण मी माझ्या ब्लॉगवर अशी काही प्रकाशचित्रे वापरली आहेत. तसेच खास 'प्राधिकारमुक्त' प्रकाशचित्र किंवा कार्टून्स मिळतात त्या चित्रांखाली 'प्रताधिकार अज्ञात' अथवा 'प्रताधिकारमुक्त' असे काही लिहावे काय ?
बाकी मराठी भाषा, संस्कृती वगैरे विषयी>>>>>> अनेकानेक ब्लॉगर्सना आपले लिखाण प्रसिद्ध करायची खूप घाई असते/असावी. मुद्रितशोधन, शुद्धलेखन ह्या गोष्टी सरळ-सरळ धाब्यावर बसवलेल्या असतात. प्रथितरश ब्लॉगर्स स्वतःच्या मनाने शब्दांची वाट्टेल ती तोडफोड करताना दिसतात. ह्या लोकांकडून तू मराठी भाषेसाठी काही करण्याची अपेक्षा करते आहेस का ?
At the same time, ब्लॉग हा प्रकारच मुळी वैयक्तिक डायरीची पुढची पायरी आहे. तिथे शक्यतो स्वानुभवच लिहिले जाणार असे मला तरी वाटते. मधुकर भामरागडला लहानाचे मोठे झाले त्यामुळे त्यांच्याकडे अनेक सुरस (शहरी भागात वाढलेल्यांना interesting वाटतील असे) अनुभव आहेत. पण शेवटी ते वैयक्तिक अनुभव. झुलेलाल ह्यांच्या पेशामुळे त्यांच्याकडे असे अनुभव गोळा होतात. तसे प्रत्येकाकडे असतीलच असे नाही. भटकंती करणारे अनेक ब्लॉगर्स नवीन नवीन स्थळांची माहिती देतातच.
आणि तसेही हे लोक काही पूर्ण वेळ लिखाण करत नाहीत. मोठे मोठे साहित्यीक केवळ आपल्या साह्त्य कृती निर्माण करुन गेले, त्यांनी तर इतर भाषांतील साहित्य मराठीत आणण्याचे प्रयत्न केले नाहीत. मग अतिशय मर्यादित/तोकडी प्रतिभा असलेल्या ब्लॉगर्सकडून ती अपेक्षा कशी काय करणार ? हां आता ह्यातुनही तुम्ही क्रीम वेगळे काढणार असाल तर तसे त्या 'capable' ब्लॉगर्सना तसे वेगळे कळवले पाहिजे.
तुझा लेख वाचून जे मनात आले ते लिहिले आहे. बरेच विस्कळीत आहे. थोड्यावेळाने लिहिते अजून.
*** मधुकर आणि झुलेलाल ह्या दोघांचे लेखन मी आवर्जुन वाचते. कृपया गैरसमज नसावा
कविता, फ्री ब्लॉग टेम्प्लेट्स
कविता, फ्री ब्लॉग टेम्प्लेट्स माहिती आहेत का ? नीरजाने असेच एक घेतले असावे. इथे आहेत बरीच टेम्प्लेट्स. कस्टम इमेजेस टाकून पण टेम्प्लेट बनवता येतात. त्यासाठी थोडे style sheets, HTML, Java Script माहिती असावे लागेल. अगदीच नाही तर फ्रंट पेज, ड्रीम वीव्हर ह्यापैकी काही वापरुन बनवता येतील. तुला अजून माहिती हवी असेल तर मी देऊ शकेन.
सिंडे, तुझं म्हणणं बरोबर आहे.
सिंडे,
तुझं म्हणणं बरोबर आहे. पण तू ज्या सगळ्या ब्लॉगर्सबद्दल बोलतेयस ना त्यांची प्रत्येक वेळेला आपण ब्लॉग लिहितो म्हणजे मराठी भाषेसाठी काही करतो, मराठी संस्कृती संवर्धनासाठी काही करतो असे वेळोवेळी जाहीर केलेय. त्यामुळेच तर हे प्रश्न पडतायत मला. असो.
सिंडे धन्स बघते हे फ्री
सिंडे धन्स बघते हे फ्री टेंप्लेट्स
त्यासाठी थोडे style sheets, HTML, Java Script माहिती असावे लागेल. अगदीच नाही तर फ्रंट पेज, ड्रीम वीव्हर ह्यापैकी काही वापरुन बनवता येतील>>>ह्यातल्या सगळ्या बबातीत मी अंगुठाछाप आहे
नी, टेक्नीकल माहितीची लिंक पोस्टल्येस का?
कुठे पोस्टू गं? इथे पोस्टायला
कुठे पोस्टू गं? इथे पोस्टायला मास्तर नको म्हणतात. कानोकानी हे मला समजत नाहीये.
Pages