धक्का

Submitted by सुनिल परचुरे on 6 August, 2009 - 07:54

--------------------------धक्का-----------------------------------
``हॅलो-हॅलो - आनंद लिमये आहेत का?`` फोनवर मंजुळ आवाज. ``हो - मी आनंदच बोलतोय, आपण कोण ? मी संभ्रमातच विचारल.
``मी`` - मध्ये जरा वेळ काहीच आवाज नाही - ``अहो नांवात काय आहे - मी - अस समजाना - तुमची एक हितचिंतक``.
``अरे व्वा ! अहो परत बोला, इतके चांगले मराठी शब्द हल्ली ऐकुच ऐत नाहीत. माझ्याकडे काय काम आहे ? मी विचारले तेवढयात `ऐ आनंदा` - श्रीकांतची - माझ्या कलीगची जोरदार हाक. फोनवर `एक मिनिट हं`` - अस बोलुन रिसिव्हरवर हात ठेऊन - `काय रे ?` ति स्टेटमेंट मी बनवतोय - 10 मिनिटात देतोय म्हणून सांग साहेबांना, `श्रीकांतला जरा नाराजीच्या स्वरातच म्हटले`.
`स्टेटमेंट मरु दे रे - कुणाचा - वहिनिंचा फोन आहे ? खवचट प्रश्न.
`नाही - अं - हं - हो - हो` अस म्हणत जरा रागानेच बघत परत संभाषण चालू केल.
`हं - बोला -`
`तुम्हाला आता फार काम असेल नाही ? सॉरी हं ! पण मग आपण अस केल तर – म्हणजे If you have no objection ?`
`संध्याकाळी ऑफीस सुटल्यावर भेटाल ?`
`अहो - पण - काय काम आहे एवढे ?`
अगदी पर्सनल` लाडिक आवाज, `मग संध्याकाळी भेटालनां` ?
`अं - भेटु की ! पण कुठे ?`
`गेट वे वर चालेल ?`
`नको त्यापेक्षा आपण महालक्ष्मी मंदिराशी भेटू, तिथुन समुद्र फार सुंदर दिसतो, चालेल ?` मि विचारले.
`अं - ग्रँड आयडिया - चालेल ?`
` O.K.पण काय हो अजून तर तुम्ही नांवही नाही सांगितलत ! मी तुम्हाला ओळखू कस ?`
`हुषार आहात !`
`थँक्स हं -`
खळखळते हास्य फोनवर, `अहो मी आज, लाल रंगाची साडी नेसलीय, त्यावरुन ओळखा मला.`
`व्वा ! रेड सिग्नल, ठीक आहे, अहो पण मी - मी तुम्हाला ओळखतही नाही - आणि -
`नको - त्याची काही गरज नाही - मी तुम्हाला चांगली ओळखते नं ! मग संध्याकाळी 5.30 वाजता मंदिरा बाहेर नक्की ?`
`अहो पण हे बघा - मी तुम्हाला - `माझ वाक्य अर्धवटच राहील, फोन डिस्कनेक्ट झाला.
काय रे, वहिनिंचाच फोन नं ? काय बोलत होत्या ?` श्रीकांतचा आवाज
`अं - काही नाही रे` - उसासा टाकत मी म्हटले.
`अरे शाम्या - बघ - बघ एका फोननेच ह्याची काय हालत झालीय, अजून तर लग्न व्हायचय - मग बघा लेको - `शाम्याला हास्यात सामील करत श्रीकांत म्हणाला.
`लिमये - साहेबांनी बोलावलय` - हरि फ्यून सांगत आला, मी सुटकेचा निश्वास टाकला. केबिनमध्ये गेलो. साहेबांनी आणखी दोन स्टेटमेंटस करायला सांगितली. बाहेर आलो, - पण कामात लक्षच लागेना.
मी एका खाजगी कंपनीत कामाला होतो. नुकताच दोन महिन्यापुर्वी माझा अलका अभ्यंकर बरोबर साखरपुडाही झाला. लग्न दोन महिन्यांवर आलेल - फोन आल्यापासून एकदम बेचैन. आवाज तर कधीच ऐकलेला नव्हता. कदाचीत कुणी ओळखीपैकी मस्करी म्हणून - की खरच - छे ! स्टेटमेंट करतांना चुका होत होत्या. परत खाडाखोड - सारख घडÎाळ्याकडे लक्ष - कधी एकदा 5 वाजतायत.
5ला 5 मिनिटे कमी असतांनाच काम आटोपल. नाही तरी स्टेटमेंट उद्याच द्यायची होती. ड्रॉवर बंद केला.
`कुठे - अलकाला भेटायला कां रे ?` हि श्रीकांतची हाक न ऐकल्यासारखी करुन ऑफीस बाहेर आलो. टॅक्सी केली, म्हटल चलो महालक्ष्मी टेंपल - मध्येच ट्रफिक जॅम - खरच ति कुणीतरी तिथे येईल कां - मस्करी ? मध्येच एकदम मन गोठल्यासारख झाल. कोण आपल्याला 5।। ला भेटा म्हणून अनोळखी फोन येतो काय - आपण सरळ वेडयासारखे तिथे जातो काय - आणि अलकाला कळले तर? कां - कां तिच्याबद्दल काही सांगायचय. टॅक्सी ट्रफिकमधून वाट काढत एकदा देवळापाशी पोहोचली - बिल देऊन धावतच मी मंदिराच्या पायथ्याशी येऊन थबकलो - रेड सिग्नल.
माझा डोळ्यावर विश्वासच बसेना, खरच एक लाल साडी नेसलेली एक मुलगी तिथे उभी होती. वय - तिशिच्या आसपास - आकर्षक - मी एक घाबरत अनोळखी हास्य केल.
`तुम्ही आनंद लिमये नं ?` अरेच्या म्हणजे ही आपल्याला एवढी चांगली ओळखते आणि आपण हिला एकदाही पाहिले नाही म्हणजे -
`चला जाऊया` - तोच फोनवरचा मंजुळ आवाज.
`अं - हो - हो - चला ना !` मी म्हणालो - काय होतय - काय चाललय हेच मला कळत नव्हत. मंदिरात गेलो - देवीच दर्शन घेतल. बाहेर आलो, आता तिचा चेहरा पार बदलला होता, कोमेजल्यासारखा.
`काय हो - काही होतय कां ?`
`अं - काही नाही, चला जरा आपण तिथे बसुयात कां ?`
`अं - हो - चालेल न - चला` मी म्हटल.
सावरत उडया मारत मंदिरामागे असलेल्या एका मोठया खडकावर आम्ही बसलो. आठवडयातील मधला दिवस असल्याने आजुबाजूला एवढी गर्दी नव्हती. समोरच समुद्र खळाळत होता. मंद खारा वारा नाकाला जाणवत होता. मला ह्या रेड सिग्नलच कोडच पडल होत.
`हं बोला - प्रथम मला तुमच नांव सांगाल - आणि काय एवढ खाजगी काम आहे माझ्याकडे `मी अधीरपणे प्रश्न केला, तिचा चेहरा तेवढाच अस्वस्थ - अपराधी - क्षणभर तिने वर माझ्या चेह-याकडे बघितले आणि - आणि ति चक्क रडायला लागली. डोळ्यातून घळाघळा पाणी - मी तर एकदम कावराबावरा झालो.
`अहो - हे - हे बघा, अहो रडताय कशाला ? काय चाललय काय तुमच ? आजुबाजुला बघत मी म्हटल. `हे बघा रडणार असाल तर मी निघतो आता`.
`नही - फ्लीज थांबा हो ! आधी तुम्ही म्हणा मला क्षमा केलीय म्हणून`, रुमाल नाकावर ठेऊनच तिचा आवाज. `क्षमा ? कशाबद्दल ?`
`नाही आधी म्हणा ... रडवेला स्वर
`बर... केली क्षमा`.
तिच्या चेह-यावर थोडा भार हलका झाल्याचा भाव.
`आता तरी सगळ सविस्तर सांगाल ?`
ति आता थोडी सावरल्या सारखी वाटली. माझ्या नजरेला नजर न देताच म्हणाला - `असच आम्ही मैत्रिणी दुपारी ऑफीसमध्ये बसलो होतो. काम एवढ नव्हत. आम्ही सगळ्याजणी तशा थट्टेखोर स्वभावाच्या. कुणीतरी तुमचा फोन नंबर फिरवला व माझ्या हातात देऊन अस बोलायला सांगितल !`
`अस - अस म्हणजे कसं ?` मी मुद्दामच विचारल.
`मी आपली फोनवर बोलत होते` - माझ्या प्रश्नाला उत्तर न देताच ति सांगु लांगली - `पण सतत वाटत होत की आपण करतोय ते चांगल करत नाही आहोत. अशी छोटीशी गोष्टही एखाद्याचा संसार उध्वस्त करु शकते. निदान आपल्या सारख झाल अस कुणाच होऊ नये ...'
`आपल्या सारख - म्हणजे तुम्ही ?`
`हो - एकदा खळाळत्या लाटांकडे दृष्टी टाकून ति म्हणाली 'माझ ही लग्न झाल होत`
`होत - म्हणजे` -
`मला नव-यान घटस्फोट दिलाय, तिनच वर्षापुर्वी माझ लग्न झाल - अगदी ऍरेंन्ज मॅरेज. सुरवातीचे काही दिवस ठीक गेले. पण नंतर उगाचच त्यांना - म्हणजे अशोक - अशोक रानडेंना माझ्या बाबतीत संशय यायला लागला की मी कुठे जाते, काय करते, कुणाशी बोलते - एक ना दोन आणि त्यात साथ होती त्यांच्या आईची आणि - आणि माझ्याच एका मैत्रिणीची ति - ति त्यांना माझ्याबद्दल नाही नाही ते सांगे - हि बया माझ्या संसारावर कां उठली तेच मला कळेना - मी नसतांना ती घरी येऊन जायची - सासुबाई हे काही मला बोलायच्या नाहीत. मग एवढया तेवढयावरुन भांडण - शेवटी मला आपल माणूस कुणाला म्हणाव हेच कळेनास झाल. घरची गरिबी, आई-वडलांना सांगून आणखी त्यांना त्रास कशाला देऊ म्हणून गफ्प. दिवसे दिवस त्या दोघांच वाढतच चालल, वाटल मध्ये राहुल -एक मुलगा झाला - त्यान तरी त्यांच डोक ठिकाणावर येईल, पण नाही - उलट जास्तच वाढल - व मी व्यभिचारी आहे म्हणून घटस्फोटाकरता कोर्टात केस केली.
हं ... पतिच आपल्या बायकोला म्हणतो, व्यभिचारी - मी पार उन्मळून पडले. कोर्टात काय - काहीतरी करुन त्यांनी घटस्फोट मिळवला. मी लग्न करुन तरी काय मिळवल ? नवरा की मुलगा ? नशीब कोर्टान राहुलला माझ्याकडे रहायची परवानगी दिली. नाहीतरी त्यांना तेच हव होत - त्या दोघांनी आता लग्न केले आहे - आपलीच मैत्रिण एवढी - त्यांच हे आधीपासून होत हे मला नंतर कळल ! पण मग माझा कां म्हणुन त्यांनी बळी दिला ?`
हे सगळ बोलतांना आता मात्र तिच्या डोळ्यातुन अश्रु यायला लागले - सुर्य हळुहळु समुद्रात लुप्त होत होता, मी अचेतन अवस्थेत.
`मग मुलाची जबाबदारी म्हणून इथे एका कंपनीत नोकरी केली - मी - अलका जिथे काम करते न तिथेच मी आहे. माझ नांव सुहास परांजपे, तुमच्या सारखपुडयाचे फोटो तिने दाखविले होते त्यावरुन तुम्हाला ओळखल, तुम्हाला दुपारी फोन केला तेव्हा सर्वांचाच मुड तुमची मस्करी करण्याचा होता. पण खर सांगु मी हे सगळ फोनवर बोलत होते, पण मनात सतत कुठेतरी खात होत, आपण - आपण हे करतोय ते अगदी वाईट करतोय. एखाद्या संशयामुळे स्वतचा संसार-जीवन कस उध्वस्त होत - त्याचे चटके मी सोसलेत - ती पाळी वै-यावरही येऊ नये अशी मी नेहमी प्रार्थना करते. पण कदाचित अस असेल की मनाच्या कोप-यात कुठेतरी त्या - त्या माझ्या मैत्रिणी बद्दलची असुया होती. ती फोनवर ह्यांना बोलून कस फसवत असेल ! माझा संसार मोडतांना तिला कसा आनंद मिळाला असेल. तिच्या मनात काय विचार येत असतील - हे आपण थोडे तरी अनुभवावे अस - अस कुठेतरी दडलेल होत - ते अचानक ऊफाळून वर आल. त्यामुळेच - त्यामुळेच मी अस बोलण्याच आणि इथे येण्याच धाडस करु शकले.
फोन ठेवल्यावर मलाही, बोचणी लागली. म्हणून मी हे अलकाला सगळ सांगितल.`
म्हणजे तुम्ही हे सर्व - अलकाला' - मला धक्यावर धक्के बसत होते.
`हो - हे मी सगळ अलकाला सांगितले, ह्या कारणाने का होईना पण माझ दुःख तिच्याशी व तुमच्याशी बोलण्याने हलके झाले.
`अहो पण - मग - अलकाने` -
`हो - तिनेही मला क्षमाच केलीय. म्हणूनच तिलाही मी इथे मुद्दाम घेऊन आलीय`.
`इथे` ?
`हो - ति बघा - ति - तिथे बसलीय ...`
मी झटकन मान वळवली, तिथे एका कटयावर ति बसली होती - हात हलवत.
समोर समुद्र खळाळत होता लाटा जोरजोराने दगडावर आपटत होत्या - मी अनिमिष नेत्रांनी दोघींकडे पहात होतो.

गुलमोहर: 

यानंतर लग्न मोडले का? जर हा माणुस लग्नाआधी असा कोणीही बोलावल्यावर जातो तो लग्नानंतर जाणार नाही याची काय गॅरंटी? Happy असो.

आवडले. मांडणी चांगली आहे.
रुनीला अनुमोदन. तुम्ही पटकथा लिहायला हरकत नाही. चांगले लिहाल.