(सप्टेंबर १९९८ ला लिहीलेली कथा.)
अनिकेतचं कामात लक्ष लागतच नव्हतं मुळी. नजर सारखी मैथिलीच्या रिकाम्या खुर्चीकडे वळत होती. आजचा तिसरा दिवस... ती आली नव्हती. फोन नाही की निरोप नाही. .... निदान फोन तरी करायला हवा होता तिने... हा म्हणजे निव्वळ बेजबाबदारपणा ... ? त्याच्यातला ’बॉस’ वैतागला. काय झालं असेल ? आजारी तर नसेल ? तिच्या घरी काही प्रोब्लेम्स ? ... काळीज धडधडलं किंचित. आतापर्यंत ऑफिसात झाडून सगळ्यांकडे चौकशी करून झाली होती. पण व्यर्थ ! कोणाला काहीच कल्पना नव्हती. आता केवळ प्रश्नामागून प्रश्न आणि ते ही अनुत्तरीत... !
सिगरेट शिलगावून तो खिडकीकडे वळला. बाहेर पावसाची रिपरिप नुकतीच थांबलेली. आडोशाला थबकलेले माणसांचे थवे पुन्हा रस्त्यावर विहरू लागलेले. एखादं दुसरी छत्री अजूनही मिटली नव्हती. येणार्या-जाणार्या गाड्या साचलेल्या पाण्याचा फवारा मारून जात होत्या. त्या मागोमाग भिजणारे आधी गाडीवाल्याला, मग पावसाला आणि शेवटी म्युन्सिपाल्टीला शिव्या घालत पुढे सरत होते. बचावलेले दुसर्यांच्या फजितीचा आनंद लुटत होते. ओलेत्यांची अवस्था जरा बिकटच होती. वार्याच्या मंद झुळकीने देखील अंगावर शहारे बहरत होते. रस्त्याच्या पलिकडला भय्या त्यातही मक्याची कणसं भाजत होता. काही दर्दींनी चहावाल्याकडे गर्दी केली होती.
"साहेब...?" शेलारच्या आवजाने त्याचं ते चित्र विस्कटलं. तो आत वळला. शेलार फाईल ठेवून निघून गेला होता. शेवटचा कश घेऊन त्याने सिग्रेट ऍशट्रेमध्ये विझवली. फाईल उघडून तो मैथिलीचे ऍप्लीकेशन शोधू लागला. ओठांवर एक हल्कीशी स्मितरेखा असलेला मैथिलीचा फोटो समोर आला. त्याची नजर त्या फोटोवर खिळली. त्याने स्टॅपलरची पिन काढून फोटो हातात घेतला. ती त्याच्याकडेच पहात होती. वाटलं आता ही पटकन म्हणेल, ’सर, डिक्टेक्शन देताय ना ? "..... त्याने डोळे मिटून घेतले.
छोट्या छोट्या फुलांचा.. फिकट गुलाबी रंगाचा पंजाबी, गळ्याभोवती फिरवलेली ओढणी, गव्हाळ वर्ण, डाव्या बाजूस काढलेला भांग, कपाळावर रेखलेली टिकली, खांद्यावरून पुढे रूळणारा वेणीचा शेपटा, स्वत:मध्येच हरवलेली नजर, अबोल असला तरी प्रसन्न वाटणारा चेहरा. रिसेप्शनमध्ये सोफ्याच्या एका टोकाला अंग चोरून बसलेली मैथिली त्याला पहाताक्षणीच आवडली होती. त्यानंतर तिची दुसरी तिसरी झलक मिळावी म्हणून त्याने विनाकारण दोन तीन फेर्या रिसेप्शनला मारल्या आणि नेमकं ते अनिताच्या लक्षात आलं.
"काही हरवलयं का सर ? " तिच्या प्रश्नातली खोच त्याला कळली.
"एनी प्रोब्लेम ? " मैथिलीवरची नजर त्याने तिच्यावर फिरवली.
"नो. नॉट ऍट ऑल." ती मैथिलीकडे पाहून त्याच्याकडे वळत हसली. तो त्याच्या कॅबिनकडे वळला तेव्हा ’बेस्ट ऑफ लक’ सारखं ती काही पुटपुटली असं वाटलं त्याला. त्याने पुन्हा एक नजर मागे टाकली. मैथिलीला या सार्या प्रकाराची जणू काही जाणिवच नव्हती. ती फक्त तिचं नाव कधी पुकारलं जातय याचीच वाट पहात होती.
चंदीगडचा दौरा आटपून तो जेव्हा परतला, तेव्हा त्याला पहाता क्षणीच अनिता पटकन म्हणाली,"लकी मॅन." तिच्याकडे दुर्लक्ष करत तो गळ्यातला टाय सैल करत कॅबिनकडे वळला.
"गुड मॉर्निंग सर." आत पाऊल टाकताच एक मंजुळ आवाज कानी आला आणि तो त्या दिशेला वळला. ती सोफियाच्या जागेवर उभी होती. तो तिच्याकडे पहातच राहीला.
"गुड मॉर्निंग सर." ती पुन्हा म्हणाली. तो भानावर आला.
"या... मॉर्निंग." बॅग सोफ्यावर टाकून तो खुर्चीकडे वळला.
"सोफिया ? " नेमकी कशी सुरुवात करावी तेच त्याला कळेना.
"तिची हेड ऑफिसला ट्रांन्सफर झाली सर." पॅड आणि पेन घेऊन ती त्याच्या समोर येऊन उभी राहीली.
"आपण ? " तिच्या नावासाठी आसुसला तो नकळत.
"मैथिली कारखानीस." ती हळुच बोलली. ’सुंदर नाव आहे तुझं... तुझ्यासारखचं’ हे ओठावर आलं पण ते त्याने महत्प्रयासाने मागे सारलं. तिला समोर बसण्याचा त्याने इशारा केला. आता तिने बोलत रहावं आणि आपण ऐकत रहावं असं वाटत होतं त्याला. पण शब्दांशी सख्य नसल्यासारखं ती त्याला जेवढ्यास तेवढं उत्तर देत होती. तो अख्खा दिवस फक्त तिच्या मोहक हालचाली न्याहाळण्यातच गेला.
जुन्या पद्धतीच्या त्या कॅबिनचा त्याला राग होता. कॅबिनच्याच एका कोपर्यात असलेली ती सेक्रेटरीची टेबल खुर्ची आपल्या व्यक्तीस्वातंत्र्यावर असलेला प्रचंड मोठा हल्ला आहे हे त्याच मत. यासाठी त्याने फार हातपाय हलवले होते. पण कंपनी व मालक दोघेही जुनाट. त्यामुळे सगळं मुसळं केरात गेलेलं. सोफियाच्या अघळपघळ वागण्याचा त्याला त्रास व्हायचा. तिचं ते प्रमाणाबाहेर मोकळेपणाने वागणं त्याच्या संस्कारात बसत नव्हतं. पण कालपर्यंत असलेला तो विरोध आज पुर्ण विरघळला होता. अधुनमधून तिच्यावर चोरटी नजर टाकताना तो मालकाचे आभार मानत होता. तेही मनापासून.
कामाप्रमाणेच ती तिच्या पेहरावाबाबत दक्ष होती. जितका तिचा नीटनेटकेपणा त्याच्या नजरेत भरलेला, तितकाच किंबहुना त्यापेक्षा जास्तच तिचा अबोलपणा त्याला छळत होता. ’गुड मॉर्निंग’ ने सुरु होणारी तिची सकाळ ’ मी निघू सर’ किंवा ’गुडनाईट सर’ यावर संपत होती. तिला कधी उशीर झालाच तर तो तिला घरी सोडण्याचा आग्रह करायचा व ती नम्रपणे त्याला नकार द्यायची. तिचा अलिप्तपणा खटकायचा त्याला. पण तिचा कधीतरी होकार येईल या अपेक्षेत तो होता. नेहमी टुरवर जाण्यासाठी धावपळ करणारा अनिकेत आता शक्य तेवढा वेळ ऑफिसात रहात होता. क्लायंटसच्या मिटींगपण आता त्याच्याच कॅबिनमध्ये होऊ लागल्या. तिच्या समोर, तिच्या सोबत, तिच्या सहवासात राहण्याची एकही संधी गमावली जाणार नाही याची पुरेपुर काळजी तो घेत होता. कधी कधी नुस्त तिच्याशी बोलावं म्हणून लेटर डिक्टेट करायचा आणि ती गेली की मग तिला आठवत त्या लेटर्सचे तुकडे करत बसायचा. तिच्या मनाचा त्याला थांगपत्ता लागत नव्हता. तिच्याशी बोलता-बोलता तो हरवला की ती त्याला अदबीने म्हणायची," डिक्टेशन देताय ना सर ? " तिचं ते ’सर’ म्हणणं त्याला तिच्यापासून शेकडो कोस दूर न्यायचे. पण तिने त्याला ’अनिकेत’ म्हणावं असा तिला आग्रह करण्याचे धाडसही त्याने कधी केलं नाही. शेवटी हा सगळा अबोल प्रकार त्याला फारच असह्य झाला.
निखिलच्या कॅबिनमध्ये त्याने दणदणत एन्ट्री घेतली. कॅबिनचं दार लोटण्यापुर्वी ’ डू नॉट डिस्टर्ब’ असा शेलारला दम भरून तो निखिलच्या समोर जाऊन बसला.
"ऍनी प्रोब्लेम? " निखिलने हातातली फाईल व पेन बाजूला ठेवत विचारलं.
"मैथिली." अनिकेतच्या या शब्दावर निखिल चमकला. त्याची एक भुवई हल्केच वर गेली. ’आय लव्ह हर.’ अनिकेतने भुवई खाली आणली.
"प्रोब्लेम काय आहे ?" निखिलने मागे रेलत त्याला दुसरा प्रश्न टाकला. तो गोंधळला. त्याचं त्याला इतकं लाईटली घेणं त्याला कोडयात टाकून गेलं.
"इथे सगळ्यानाच तुझ्या या वन वे लव्हेरियाची माहीती आहे. तू पुढे बोल." त्याच्या मनातला पुढचा प्रश्न ओळखून त्याने आधीच त्याला उत्तर दिलं. निखिलने बेल वाजवली. अनिकेत अजूनही गोंधळलेलाच होता. फक्त दोघात असणारी बातमी ऑफिसभर कधी आणि केव्हा झाली याचा त्याला उलगडा होईना. शेलार आत आला. निखिलने त्याला निव्वळ दोन बोटे दाखवली व तो मान हलवत निघून गेला.
"यु मीन... प्रत्येकाला..... म्हंजे तिलाही..."अनिकेतलाच स्वत:च्या काळजाची धडधड आता स्पष्ट ऐकू येत होती.
"असेल." निखिल पुढे झुकला."आणि नसेलही."
"हे बघ. शब्दांचे खेळ करू नकोस. काय ते नीट सांग." अनिकेतचा धीर सुटत चाललेला. निखिलने त्याला रोखून पाहीलं. अनिकेतची ती अवस्था पाहून त्याला हसावसं वाटत होतं पण तरीही त्याने संयम बाळगला.
"तिला जाऊन सांग.. माझं तुझ्यावर प्रेम आहे." त्याने एका मोठ्या पॉजनंतर दिलेला तोडगा.
"माझं तुझ्यावर प्रेम आहे." अनिकेतने नकळत पुनरुच्चार केला.
"मला नाही. तिला सांग." निखिलचा मिश्किलपणा डोकावला.
"डॅम इट. इतकं सोप्पं असतं तर इथे तुझ्यासमोर येऊन नसतो बसलो." अनिकेत किंचित वैतागला.
"मग मी बोलू ? " निखिलच्या त्याच्या डोळ्यात पाहीलं.
"न..नको. मी बोलेन. आजच बोलेन." अनिकेत झपदिशी उभा राहीला आणि दाराकडे वळला.
"अनिकेत." निखिलच्या आवाजावर तो वळला. "बेस्ट ऑफ लक." निखिलच्या त्या तीन शब्दातला रोख समजून घेण्यासाठी तो थांबला नाही. तो कॅबिनमध्ये शिरला. ती तिच्याच जागेवर बसून कॉम्पुटरवर काही तरी खरडत होती. तिने एकदा नजर उचलून त्याच्याकडे पाहीलं आणि मग पुन्हा स्क्रीनकडे वळली. इंटरकॉम वाजला आणि त्याने फोन उचलला.
"तुझी कॉफी पाठवलीय. अजून काही हवं असल्यास सांग." निखिलचा स्वर.
"नो. थॅंक्स." त्याने फोन ठेवला. मागोमाग दार ठोकून शेलार आत आला. त्याने कॉफी समोर ठेवली. अनिकेत तिच्याकडे वळला.
"मैथिली, कॉफी घेणार का ? "
"नो थॅंक्स, सर." तिने क्षणभरासाठी स्क्रीनवरची नजर काढली व त्याला उत्तर दिले. शेलार निघून गेला आणि तो कॉफीचा कप घेऊन तिच्यासमोर शांत बसला. तिने नजर त्याच्याकडे वळवली.
"यस सर ? "
"अनिकेत... चार अक्षरं फक्त. कठीण आहेत का उच्चारायला ? " त्याने तिच्या नजरेत नजर मिसळली.
"नो सर." त्याच्या वाक्याचा सरळ अर्थ तिच्या लक्षात आला तरी तिने ते पालुपद सोडलं नाही.
"हरकत नाही. वेळ लागेल थोडा. पण यापुढे ’यस सर’ ’नो सर’ असलं काही नको. प्लीज." त्याला हुरुप आला बोलण्याचा.
"यस स..." ती थांबली.
"गुड. लंचला काय घेऊ या मग ?" त्याने दुणावलेल्या आत्मविश्वासाने विचारलं.
"माझ्याकडे डबा आहे स.." ती पुन्हा आठवणीने थांबली. त्याचा चेहरा खर्रकन उतरला व ते तिला जाणवलं. त्याच वेळेस इंटरकॉम वाजला. तिने फोन उचलला.
"अग, लंचला येतेस ना ? " पलिकडे अनिता होती.
"आलेच." तिने फोन ठेवला आणि खणातला डबा काढायला ती वाकली. तिची मान वर झाली तेव्हा तो खिडकीजवळ उभा होता. त्याने खिशातील सिगारेटचं पाकीट काढलं. बाहेर पडताना त्याने शिलगावलेली सिगारेट तिने पाहीली. पण तो मागे वळला नाही. दार बंद झाल्याचा आवाज झाला तरी. तो धुराची वर्तुळे खिडकीबाहेर सोडू लागला. मागे दार वाजलं आणि तो वळला. ती समोर उभी होती.
"वेज चालत ना तुम्हाला ? गुरुवारी मी नॉनव्हेज खात नाही." ती म्हणाली आणि तो प्रसन्न हसला.
"आणखी एक... मला धुराड्याखाली जेवणाची सवय नाही." त्याने तिच्या त्या शांत, हसर्या चेहर्याकडे पाहीलं आणि सिग्रेट समोरच्या ऍशट्रेमध्ये विझवली. क्षणभरासाठी तो चेहरा खुलल्यासारखा वाटला त्याला. त्यानंतर मग अधूनमधून लंच व ऑफिस सुटल्यावर चहाकॉफीची बैठक रंगू लागली. पण मैथिली त्याला हवी तशी खुलल्यासारखी वाटली नाही. पण निदान संबंध मैत्रीच्या पातळीवर पोहोचले याचं त्याला समाधान होतं.
"मग काय म्हणतेय तुमची प्रेमाची प्रगती ? " निखिलने सॅडविचचा तुकडा घशात ढकलला.
"अजूनतरी मैत्रीच्या स्लो ट्रेकवरच आहे. प्रेमाच्या फास्ट ट्रेकवर कधी धावेल ते देव जाणे." अनिकेत उदगारला.
"धावेल... धावेल. होकाराचा सिग्नल मिळाला की धावेल." निखिलने उरलेले तुकडे चावत त्याचं सांत्वन केलं.
"पण केव्हा ? " अनिकेतचा त्रागा जाणवला निखिलला.
"ते तुलाच माहीत अनिकेत. कारण सुरुवात तुलाच करायची आहे."निखिलने सॅंडविचचा दुसरा तुकडा उचलला.
इंटरकॉम वाजला आणि अनिकेतची विचारधारा भंगली.
"सर, प्रधान आलेत." पलिकडे अनिता होती.
"कोण प्रधान ? "
"प्रधान असोसिएटचे. आज तीनची अपॉंइटमेंट होती."
"मी सगळ्या अपॉइंटमेंट कॅन्सल करायला सांगितल्या होत्या तुला."
"यस सर. मी केली होती. तरी ते आलेत."तिने आपली बाजु मांडली.
"ठिक आहे. त्यांना कॉन्फरंसमध्ये बसव आणि चहा कॉफी विचार. मी आलोच." फोन ठेवून तो पुन्हा मैथिलीच्या फोटोकडे वळला व मग तिच्या बायोडेटाकडे. त्यात तिच्या घरचा नंबर नमुद केला होता. त्याने फोन फिरवला. पण साधी रिंग वाजत नव्हती. त्याने पुन्हा प्रयत्न केला. पुन्हा तेच. तो वैतागला. इतक्या दिवसात त्या फोनची कधी गरज भासली नव्हती आणि आता तो लागत नव्हता. तिच्या घरी जाण्याचा कधी प्रश्न उद्भवलाच नाही. कधी तिनेही आग्रह केला नाही. तिच्या घरच्या पत्त्यावर नजर टाकून त्याने फाईल बंद केली. त्याचवेळेस त्याची नजर तिच्या जन्मतारखेकडे गेली. नकळत त्याने गणित मांडल. ’अठ्ठावीस वर्षे’. तिच्यासारखी सुशिक्षित, सुस्वरूप मुलगी अजून अविवाहीत का असेल ? एक नवा प्रश्न. पण त्यात गुरफटण्यापुर्वी त्याने अनिताला सांगून प्रधानाना आतच बोलावलं.
गाडीने मरिन ड्राईव्ह ओलांडलं. त्याने वळून पाहीलं. चार दिवसापुर्वी ते जिथे बसले होते, तिथेच आज एक दुसरं ’कपल’ होतं.
कितीतरी वेळ दोघे शांत बसून लाटांचा खेळ न्याहाळत होते. सरतेशेवटी अनिकेतने विषय काढला.
"मैथिली, मला वाटतं आता आपल्या मैत्रीने पुढची पायरी गाठावी." तिने एक क्षण त्याच्याकडे पाहीलं आणि त्याच्या नजरेच्या तावडीतून आपली नजर सोडवत ती पुन्हा लाटांकडे वळली. ती दोन मिनिटांची शांतता त्याला भयाण युगांसारखी वाटली.
"मी तुझ्या उत्तराची वाट पहातोय मैथिली." त्याने त्या दोघांमधल्या शांततेचा भंग केला. पाणावलेल्या नजरेने वळली ती.
"माझ्याबद्दल काय माहीत आहे तुम्हाला ? " अनपेक्षित प्रश्न.
"तू आजवर सांगितलस तितकचं. तुझ्या भुतकाळाबद्दल जाणून घ्यायची उत्कंठा असली तरी त्याचा आग्रह नाही. मी तुझ्यावर प्रेम करतो हा वर्तमानकाळ जास्त महत्त्वाचा आहे माझ्यासाठी. आपलं लग्न हा त्याचा भविष्यकाळ. पण तुझ्या होकाराशिवाय सगळचं व्यर्थ आहे."त्याने आपलं सगळं बळ एकवटून मन मोकळं केलं.
"अनिकेत, भुतकाळ हा वहीवरच्या नको असलेल्या अक्षरांसारखा नसतो. त्याला खोडता येत नाही. मी जेव्हा जेव्हा आरशात डोकावते, तेव्हा तो मला माझ्या मागे उभा आढळतो. त्याची नजर कायम माझ्यावर रोखलेली असते." तिचा आवाज कातर झाला. डोळ्यातलं पाणी आता गालांशी सलगी करण्याच्या इराद्याने पुढे सरसावत होते. का...??? तो अस्वस्थ झाला. काय असेल त्या भुतकाळाच्या काळ्याकुट्ट अंधारात ?
"मैथिली, माझ्यावर विश्वास ठेव. तो भुतकाळ कधीही आपल्या दोघांच्या आड येणार नाही." त्याने तिचा मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न केला.
"पण मी तो विश्वास गमावून बसलेय अनिकेत."एका हुंदक्यासरशी ती उठली आणि चालू लागली.
"मैथिली..." तो तिच्यामागे धावला. पण ती मागे वळूनही न पहाता पुढे धावली आणि टॅक्सीत बसून निघून गेली. तो जडावल्यासारखा तिथेच उभा राहीला.
तिचं घर शोधून काढायला जास्त वेळ लागला नाही त्याला. दार तिनेच उघडलं.
"अनिकेत, तुम्ही ? " तिच्या स्वरात आश्चर्यासह अविश्वासही होता.
"थॅंक गॉड. तू व्यवस्थित आहेस. डोकं भणाणून गेलं या तीन दिवसात. एखादा फोन तरी करायचा." तिला पाहताच त्याने उंबर्यावरच बोलायला सुरुवात केली. तिच्या मागून त्याला न्याहाळणार्या तिच्या आईवडीलांना व बहिणीलादेखील विसरला तो.
"फोन डेड आहे. या आत या." शेजारच्या दामलेकाकुंनी डोकावून बघताच ती दार पुर्णपणे उघडून एका बाजूस उभी राहीली. तो आत सरताच तिने दार बंद केलं.
चहापाण्याच्या औपचारिक कार्यक्रमात त्याला पाहून गंभीर झालेलं ते वातावरण बरचं निवळलं. तिच्या मानाने तिच्या घरचे जास्त बोलके वाटले त्याला.
"मैथिली, गेले तीन दिवस तू ऑफिसला का नाही आलीस? " मनात घोळत राहीलेला आणि ओठांशी रेंगाळलेला प्रश्न त्याने शेवटी विचारलाच. वातावरणातला उत्साह मावळल्यासारखं झालं. चार दिवसापुर्वी तिच्याशी झालेला संवाद घरात गिरवला गेला असावा असा अंदाज आला त्याला. पण त्यामुळे हे चेहरे इतके उतरावे.... पटेच ना त्याला.
"अनिकेत, माझी रुम त्या दिशेला आहे. या मी दाखवते." मैथिलीने विषयांतराचा क्षीण प्रयत्न केला. कुणी काहीच बोललं नाही तसा तो उठला आणि तिच्या मागोमाग निघाला. सगळ्यांच्या नजरा आता याक्षणी आपल्याकडेच आहेत हे त्याला मागे न पहाता देखील जाणवलं. अवघडल्यासारखं वाटलं त्याला.
तिची रुम छोटीशीच पण तिच्यासारखीच नेटकी होती. ती सरळ बाल्कनीकडे वळली. रेलिंगवर हात ठेवून बाहेर सुरु झालेली पावसाची रिपरिप न्याहाळू लागली. तो तिच्या शेजारी येऊन उभा राहीला.
"अबोल्याने प्रश्न सुटत नाहीत मैथिली. उलट जास्त गहन होतात." ती नजर त्याच्याकडे वळवली. बाहेरचा पाऊस तिच्या डोळ्यात साठला होता.
"आय ऍम सॉरी मैथिली. तुला दुखावण्यासाठी वा त्रास देण्यासाठी मी इथे आलो नव्हतो. पण चुकून तेच करतोय. येतो मी." तो बाहेरच्या दिशेला सरसावला.
"अनिकेत" तिने रेलिंगवरची पकड घट्ट केली. "पहिल्याच दिवशी तुमच्या भावना मला कळल्या होत्या." तिच्या त्या वाक्यासरशी तो थबकला. तिच्याकडे वळला. "तुम्ही जितके जवळ येत होता, तितकी मी तुमच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होते. पण ते अशक्य होतं. मी तुमच्यात कधी गुंतले ते माझं मलाच कळलं नाही. आपल्या या मैत्रीची परिणीती कशात होणार हे माहीत असूनही मी स्वत:ला आवरू शकले नाही." बरसता-बरसता आभाळ मोकळं होत जावं तसं ती मन मोकळं करू लागली.
"तरीही तू..." त्याने नकळत तिच्या बोलण्यात व्यत्यय आणला.
"कारण मी चारचौघींसारखी राहीले नाही अनिकेत. हे आयुष्य, हे तारुण्य, हे सौंदर्य... सारं सारं शापित आहे." तिचा कातर स्वर त्याचं काळीज चिरून गेला. कोणत्याही क्षणी तो हुंदका बरसेल असं वाटलं त्याला.
"मैथिली, काही बोलू नकोस. भुतकाळाच्या त्या भुतांना जाळून राख......" तो पुढे काही बोलायच्या आतच ती त्याच्या दिशेला वळली.
"ती राख माझं अस्तित्व झाकोळून आहे अनिकेत. मी कशी विसरू की मी एक बलात्कारीत आहे. मी कशी विसरू ?"तिला हुंदका आवरता आला नाही. वीज कोसळल्याने उन्मळून जाणार्या एखाद्या वृक्षासारखी ती उन्मळली. त्याने सावरलं तिला. त्या जळजळीत सत्यापेक्षा तो हुंदका त्याला जास्त वेदना देऊन गेला. तिच्या डोळ्यातले अश्रु पुसून त्याने तिच्या चेहरा आपल्या तळहातात घेतला. एखाद्या नाजूक फुलासारखा.
"मैथिली, रात्रीच्या गर्भात दु:स्वप्नांना जाग येते. पण ती क्षणिक असते. एकदा आपण डोळे उघडले की मग भोवती असते ते फक्त सत्य. त्यानंतर पुन्हा निजावं... सुंदर स्वप्नांच्या साक्षीने. फुलांच्या पाकळ्या जपतो आपण. काटे नाही. शरीरावरचे ओरखडे मिटतात कालांतराने. पण ते मनावर उमटू द्यायचे नाहीत. तू फक्त एकदा त्या मनाला माझ्या मनाशी जुळवून बघ. तुझ्याभवती नंदनवन उभं करीन मी. तुझ्या प्रेमाची शप्पथ." त्याचा एकेक शब्द तिच्या मनातील वादळाला शांत करत गेला. एका हुंकारासह ती त्याच्या बाहुपाशात शिरली.
पावसाचा जोर आता ओसरला होता. काळे ढग आता पांगू लागले. आकाश पुन्हा निरभ्र होऊ लागलं.
kautukshirodkar......बस
kautukshirodkar......बस नाम हि काफि है...
प्रतेक लेख छान लिहिता तुम्हि...हि कथाहि आवडलि...
खूप गोड
खूप गोड आहे कथा!
प्रच्चंड
प्रच्चंड सुंदर!
<<मैथिली, रात्रीच्या गर्भात दु:स्वप्नांना जाग येते. पण ती क्षणिक असते. एकदा आपण डोळे उघडले की मग भोवती असते ते फक्त सत्य. त्यानंतर पुन्हा निजावं... सुंदर स्वप्नांच्या साक्षीने. फुलांच्या पाकळ्या जपतो आपण. काटे नाही. शरीरावरचे ओरखडे मिटतात कालांतराने. पण ते मनावर उमटू द्यायचे नाही>>
जियो, कौतुक!
kautukshirodkar......बस
kautukshirodkar......बस नाम हि काफि है...>>>>अगदी अगदी...आज्काल तर मी कथेचे नाव वगैरे सुद्धा वाचत नाही...कथा चान्गलीच असणार याची खात्री असते.
मस्तच! बरीचशी प्रेडिक्टेबल असली तरी छान आहे.
छान!!!!!........आव
छान!!!!!........आवडली.
छान....................
छान......................!!!
मस्तच लिहिलय......
>>>>>"मैथिली, रात्रीच्या गर्भात दु:स्वप्नांना जाग येते. पण ती क्षणिक असते. एकदा आपण डोळे उघडले की मग भोवती असते ते फक्त सत्य. त्यानंतर पुन्हा निजावं... सुंदर स्वप्नांच्या साक्षीने. फुलांच्या पाकळ्या जपतो आपण. काटे नाही >>>>>>>
सही!!!!!!!!!!!!!!!!!!
---------------------------------------------------------------------------------
स्वतःच्या पायावर ठामपणे उभं राहत मी म्हटलं,
'माझं नशीब मीच घडवीन'
तेंव्हा डोक्यावरचं आभाळ पोक्तपणे हसलं- म्हणालं
ठीक आहे.........इतक्यातच कोसळणार नाही
कौतुक छान
कौतुक छान कथा
-------------------------------------------------------------------------
इतक्या सुंदर ववी करिता संयोजकांचे व सांस्कृतिक समितीचे आभार
सुरेख !
सुरेख ! सुरेख ! सुरेख !!!
एखादा रोमँटीक सिनेमाच बघतेय असे वाट्त होते.
धनु.
खुप सुंदर
खुप सुंदर कथा.....
आवडेश...
आवडेश...
kautukshirodkar......बस
kautukshirodkar......बस नाम हि काफि है...
+१ हेच म्हणतो कथा कोणतीही असो ती मस्त असणार हे १००% सत्य आहे
बाकी कथा सुरेख आहे
मस्तच
मस्तच रे..आवडली एकदम
-------------------------
अंधेरा मांगने आया उजाले की भिख हमसे,
अपना घर ना जलाते तो क्या करते हम.
सुरेख! कथा
सुरेख! कथा आवडली.
भन्नाट
भन्नाट यार... सॉलीड कथा आहे...
---------------------------------------------------------
सत्याने क्रोधाचा नाश होतो पण सत्य सांगणार्याचा सत्यानाश होतो.
छान.
छान. सिनेमाच वाटतोय. एव्हढा गुंतून गेलो होतो कथेमधे की कथा संपली हे खरेच नाही वाटले. क्रमशः असेल असेच वाटले. १०० टक्के प्रेडिक्टेबल आहे पण नितांत सुंदर. अरे हो कथेचे नाव काय आहे?
..............................................................................
हलकी 'घ्या', जड 'घ्या'
दिव्याखाली 'घ्या', अंधारात 'घ्या'
'घ्या', 'घेऊ' नका
तुमचा प्रश्न आहे!
कथा म्हनुन
कथा म्हनुन छान आहे
पण वास्तवात असे घडत नाही ना
सॉरी, आधीच
सॉरी, आधीच वाचायला हवी होती. कथेची 'उंची' छान आहे.
कौतुक
कौतुक आवडली कथा.. पण अजुन थोडी जास्त का लिहिली नाहीस?
----------------------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......
कथा आवडली!!
कथा आवडली!!
कौतुक..
कौतुक.. तुझ्या समर्थ लेखनशैलीबद्दल परत परत तिच प्रतिक्रिया देउन कंटाळलो बघ.. आता मी ठरवले आहे की तुझी कथा आवडली नाही तरच प्रतिक्रिया द्यायची..:) तुझ्या कथेमधे कथेतल्या नायक्/नायिका किंवा जी काही पात्रे असतात त्यांच्या अंतरंगातले भाव तर तु वाचकांच्या पुढे लिलया आणतोसच पण कथेतल्या पात्रांच्या आजुबाजुचे वातावरण,प्रसंग व पात्रांच्या हालचालीतले सुक्ष्म बारकावे... याचे चित्रही तु मोजक्या शब्दात इतके प्रभावी उभारतोस की त्यामुळे तुझी प्रत्येक कथा ही कथा न वाटता एखाद्या चलतचित्रपटासारखी वाटते. म्हणजे एखादे थ्रि डिमेन्शनल चित्र कसे सजिव वाटते तश्या तुझ्या कथा एकदम थ्रि डिमेन्शनल व सजिव वाटतात... ही कथासुद्धा त्यात मोडते हे सांगण्यास नलगे...
छान!
छान!
<<मैथिली,
<<मैथिली, रात्रीच्या गर्भात दु:स्वप्नांना जाग येते. पण ती क्षणिक असते. एकदा आपण डोळे उघडले की मग भोवती असते ते फक्त सत्य. त्यानंतर पुन्हा निजावं... सुंदर स्वप्नांच्या साक्षीने. फुलांच्या पाकळ्या जपतो आपण. काटे नाही. शरीरावरचे ओरखडे मिटतात कालांतराने. पण ते मनावर उमटू द्यायचे नाही>>
खूऊऊऊप छान आणि गोड!
कौतुके !
कौतुके ! सुंदर रंगवली आहेस कथा...बेहद्द आवडली.
आवडली..
आवडली..
छान कथा,
छान कथा, कौतुक. आवडली.
तू लिहिलेल्या कथा वाचताना कधीच कंटाळा येत नाही. पात्रं खूप छान रंगवतोस तू.
सुंदर कथा
सुंदर कथा ................!
कथा वाचतोय असे वाटतच नव्हते, ती कथा आपल्यासमोर घडतेय असेच वाटत होते इतकी कथा बोलकी आणी सुंदर आहे सहीच एकदम
good work keep it up...!
नेहमीप्रम
नेहमीप्रमाणेच सुरेख लेखन..
कौतुकास्प
कौतुकास्पद!
अप्रतिम
अप्रतिम
********************
झाडावरुन प्राजक्त ओघळतो
तरि त्याचा आवाज होत नाही,
पण याचा अर्थ असा नाही
की त्याला इजा होत नाही...
क्या बात
क्या बात है यारा... अ प्र ति म!!!
"रात्रीच्या गर्भात दु:स्वप्नांना जाग येते. पण ती क्षणिक असते. एकदा आपण डोळे उघडले की मग भोवती असते ते फक्त सत्य. त्यानंतर पुन्हा निजावं... सुंदर स्वप्नांच्या साक्षीने. फुलांच्या पाकळ्या जपतो आपण. काटे नाही. शरीरावरचे ओरखडे मिटतात कालांतराने. पण ते मनावर उमटू द्यायचे नाहीत.">>> अ फा ट... प्लेसमेंट आहे शब्दांची.. कथेमध्ये या वाक्यांची..!!
Pages