कुठला बोर्ड? ICSE, CBSE की SSC

Submitted by केदार on 16 July, 2009 - 10:30

सध्या भारतात परत जाणारे मित्र वाढत आहेत. दरवेळी चर्चा कुठल्या शाळेत टाकावे वरुन सुरु होऊन ती मग कुठल्या बोर्डाची शाळा असावी ह्यावर येते. इथे राहून तिथे कुठल्या शाळेत घालायचे हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो पण नीट उत्तर मात्र मिळत नाही. कुणी आयसीयस्सी म्हणतं तर कुणी सिबीय्सी तर कुणी आपले जुने एसेस्सी बोर्ड. सध्या भारतात कुठल्या बोर्डाचे शिक्षण चांगले आहे? (तुलनेने).

तुम्ही भारतात जाताना तुमच्या पाल्याला कुठल्या बोर्डाच्या शाळेत घालाल?

बोर्ड निवडीचा तुमचा निकष काय होता?/आहे?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी स्वत: एसेस्सी बोर्ड मधे होते पण तेव्हा अकरावीत क्लासमधे काही मुली पाहिल्या ज्यांचे आयसीयस्सी / सि.बि.एस.सि. होते. त्यांना science, math जास्त माहिती होतं असं मला वाटायचं. म्हणून शक्य झाल्यास मला मुलीसाठी ते बोर्ड आवडेल. तिला झेपेल का वगैरे आत्ताच सांगता येणार नाही म्हणून "मला आवडेल" एवढचं म्हणते.
प्राजक्ता

माझा एक मित्र परत गेला, तेव्हा त्याच्या मुलीसाठी त्यांनी CBSC बोर्डाला प्राधान्य दिले.
त्याची नोकरी पुणे/मुंबई, बंगळुरू, दिल्ली इथे कुठेही असु शकते. जर कामानिमीत्त महाराष्ट्राबाहेर राहावं लागलं तर मुलांसाठी शाळा शोधणे सोयीचे पडते, हा विचार त्यांनी केला होता.

बरोबर राहूल. पण त्यातही परत दोन सेंट्रल आहेत त्यामुळे गोची. व त्यांचा दर्जा कसा आहे. मी ऐकलेले की आयसिएस्सी सर्वात चांगला पण तेथील शिक्षण सर्वात अवघड. हे कितपत खरे आहे. मी पण एसेस्सी वालाच. मला काही फरक नाही पडला पण जितके रिसोर्सेस जास्त तितके सिलेक्शन अवघड अशी गत. Happy

ह्या सर्वात मित्र ते ईंटरनॅशनल स्कुलचे फॅड विचारात घेत नाहीये ते एक बरे असे वाटते. त्याबद्दल कुणाला काय वाटते?

>>ईंटरनॅशनल स्कुलचे फॅड
केदार, ते फॅड नाही. ज्यांच्या नोकर्‍या 'जगभरात कुठेही बदली होऊ शकेल' अश्या आहेत त्यांच्या मुलांना ह्या शाळा आवश्यक आहेत. पाल्याची शाळा ठरवताना प्रत्येक पालक शेवटी 'नोकरी' किंवा व्यवसाय हा भाग पण विचारात घेणारच.

सर्वसाधारणपणे पूर्वी ज्याना भारतभर फिरती आहे असे लोक सीबी एस सी च्या शाळेत घालीत्.पण आता तो प्रेस्टीज सिम्बॉल झालाय. काही वर्षापूर्वी त्यांचा सिलॅबस एवढा पुढचा होता की अकरावीला महाराष्ट्रात प्रवेश देताना सीबी वाल्याना अधिकचे १० मार्क देऊन कॉमन मेरीट काढीत. पण अ‍ॅडव्हान्सड सिलॅबस म्हणजे चांगले शिक्षण नव्हे हे मान्य व्हायला हरकत नाही.तो झेपलाही पाहिजे. त्यामुळे बारावीच्या विषयांची थोडी आगाऊ तयारी होऊन अधिक अभ्यास होणे हा त्यातला फायदा असू शकतो.

आता उलटे झाले आहे. सी बी एस सी ची गुणांकन पद्धती (बहुधा लोकप्रियता वाढविण्यासाठी)फार लिबरल झाली आहे. त्याना खूपच मार्क्स मिळतात (आणि बारावी आणि सी ई टीत ही मंडली पुन्हा घसरतात) असे अनुभवाला आले आहे. महाराष्ट्र बोर्ड 'कडक' असल्याने दहावीला तुलनेने कमी मार्क पडतात्.परिणामी मुम्बईच्या चांगल्या कॉलेज मध्ये मेरिटवर सर्व सीबीएस्सीची मुले येत असून एसेस्सीची मुळे उपनगराच्या कॉलेज मधून जात आहेत. त्यामुळे श्री . विखे शिक्षणमंत्री यानी एसेस्सी व सीबी यांचे प्रवेश प्रमाण ९०:१० असे ठरवून दिले. ते तांत्रिक मुद्द्यावर हायकोर्टाने रद्द केले असले तरी एसेस्सीच्या मुलावर अन्याय होत असल्याने चिंतेचे वातावरण आहे.

अर्थात याचा कोणते बोर्ड निवडावे याच्याशी संबंध नाही. बोर्डाचा अभ्यास्क्रम असतो. शिकविणारी शाळा असते . त्यामुळे शाळेच्या दर्जावर खरे तर निवड ठरली पाहिजे. मूळ विद्यार्थ्याची कुवत नसेल तर कोणतेही बोर्ड काय करणार? हल्ली तर 'मोर नाचला म्हणून लांडोर नाचली' या न्यायाने खेडोपाडी देखील सीबीएस्स्सी व आय सी एस सी च्या शाळा निघताहेत. मग केवळ बोर्ड उच्च स्तरिय असून उपयोग नाही शाळा दर्जेदार पाहिजे.

मृ होय, पण जेंव्हा जगभरात बदल्या कुठेही होउ शकतात तेंव्हाच ते खरे. माझे ९० टक्के मित्र भारतात परत जात आहेत, नेहमीसाठी. परत ते येणार नाहीत कुठे (निदान तसे म्हणत आहेत) म्हणून फॅड शब्द योजला. पण जर माझी नौकरी IFS मध्ये असेल तर इंटरनॅशनल शिवाय पर्याय नाहीच. (किंवा अशी इतर उदाहरणे)

हूड बरोबर शाळेचा दर्जा बघुनच शाळा निवडावी ह्या मताचा मी पण आहे. पण येथून भारतात परतताना शाळा कुठली हा प्रश्न पडतोच. त्याचे उत्तर शोधायचा प्रयत्न. शेवटी अभ्यास करणारा काय कुठेही करेलच. पण ह्या विषयावर जरा प्रकाश टाका (श्लेष अपेक्षीत नाही Happy ). कारण अश्यातच तुमच्या घरी १० वगैरे झाले आहे, त्याचा फायदा होईल.)

केदार,

आम्ही पण परत गेल्यावर cbse/icse मधेच पहाणार आहोत.

आम्ही नवरा/बायको मराठी मीडीयम एस एस सी आहोत पण मुलांसाठी मात्र इंग्रजी माध्यम सी बी एस ई किंवा आय सी एस ई Happy

काही कारणे:
१. त्या शाळामधे मुले कमी असतात. (शिक्षक्/मुले रेशो जास्त)
२. अभ्यासक्रम थोडा कठीण असतो. पुढे जर जे ई ई वगैरे साठी जायचे असेल तर प्राथमिक तयारी एस एस सी पेक्षा चांगली असते असे वाचलेय.

इंटरनॅशनल शाळा मधे फी अव्वाच्या सव्वा (६,००,००० ते १२,००,००० प्रतिवर्षी) आहे. उदा. पुण्यात मर्सिडीज बेंझ शाळेची फी दरवर्षी ६,००,००० रुपये इतकी आहे. उद्योगपती किंवा सी ई ओ इ ची मुले तिथे जातात.
त्यांचे बोर्ड सी बी एस ई /आय सी एस ई नसते. त्याला भारतात मान्यता आहे की नाही कल्पना नाही.
साधारणतः तिथे शिक्षण घेतलेली मुले पुढे शिक्षणासाठी परदेशी जातात.
सी बी एस ई/आय सी एस ई शाळांची फी (तुलनेने) कमी आहे. ५०,००० (ऑर्चीड, पुणे) ते १,००,०००(बी जी अकॅडमी, पुणे) रु. वर्षाला.

मी प्रजाशी सहमत. आमच्या सौ. शिकवायच्या सर्व शाळांच्या मुलांना. त्यांच्यामते सुद्धा आयसीयस्सी / सि.बि.एस.सि. चे पोर्शन व्यापक असतात. त्यामुळे मुलांना आत्मविश्वास मिळतो. शिवाय अंतिम परिक्षेत मार्क ही त्यामानानी जास्त मिळतात एसेस्सी पेक्षा. म्हणजे चांगल्या कॉलेज मधे अ‍ॅडमिशन मिळायला सोपे.
आम्ही सर्व मात्र एसेस्सी झालो.:)

आम्ही मागच्या वर्षी बँगलोरला परतलो. मी पण एसेस्सी बोर्डची पण महाराष्ट्राबाहेर असल्याने ICSC / CBSE ठरवले होते. शाळा निवडताना r2i forum चा खुप उपयोग झाला. मुलगी पहीलीत आणि मुलगा ज्यु.केजी मध्ये जाणार असल्याने तसे फार टेंशन नव्हते. खरं म्हणजे शाळा निवडताना डोनेशन न द्यावी लागणारी शाळा (नंतर घर कुठे घेऊ ते माहीत नसल्याने) व वरच्या फोरमवर लोकांनी चांगले बोललेली शाळा निवडली.

ICSC अभ्यासक्रम तसा खूप कठीण वाटत नाही आहे. (अजूनतरी Happy ) मुलांनापण interest वाटतोय (अजूनतरी Happy ). पाठांतर कींवा रट्टा मारण्यावर अजिबात भर नाही आणि शाळा तसं करू नका असे सांगतेय. आता हे ह्या शाळेची पॉलिसी आहे की ICSC पॉलिसी माहीत नाही.

International शाळांची फी पण International आहे. आमची आतची शाळा International नाही आहे पण IGCSE संमत आहे. International शाळांविषयीपण चांगलेच ऐकले आहे.

फक्त एक आहे. ह्या नवीन शाळांमध्ये शिक्षक फार बदलत रहातात. माझ्या काही मैत्रिणींच्या मुलांना फार त्रास झाला. जून्या शाळा त्यामानाने ह्या बाबतीत जास्त प्रस्थापित असतात

>> पाठांतर कींवा रट्टा मारण्यावर अजिबात भर नाही
बरोबर. मी महाराष्ट्र बोर्डातुन शिकलो. पण आमच्या सरांनी ८वी, ९वीत CBSC चे science पण शिकवले. त्यांचे पुस्तक आणि पोर्शन दोन्ही आवडलं. बराच व्यापक आहे (केवढ मोठ्ठ पुस्तक होतं ते!) पण अवघड नाही.
बाकी मला अजुन मुलं नसल्यानी अ‍ॅडमिशनचा अनुभव नाही, पण बर्‍यापैकी चांगली शाळा असावी.. आणि जास्त फीया असलेल्या शाळाच चांगल्या असं वाटतं नाही Happy

SSCचा नवीन अभ्याक्रम व CBSEचा अभ्यासक्रम यात (सातवीच्या पुढे) आता फारसा फरक नाही (गणित व विज्ञान). इंग्रजी, इतिहास, भूगोल हे विषय मात्र CBSEच्या अभ्यासक्रमात अधिक चांगल्या प्रकारे शिकवले जातात. CBSEच्या विद्यार्थ्यांचे फंडे बर्‍यापैकी स्पष्ट असतात, असा माझा अनुभव आहे.

बाकी, मार्क SSCलासुद्धा वाटले जातात. हल्ली तोंडी परीक्षेचे २० मार्कं सरसकट दिले जातात.

<बोर्ड उच्चस्तरीय असून चालत नाही, शाळाही चांगली पाहिजे>>

CBSEचा अभ्यासक्रम जर एखाद्या शाळेला राबवायचा असेल, तर काही निकषांची पूर्तता करावी लागते. वर्गातील मुलांची संख्या, उत्तम प्रयोगशाळा, मोकळे मैदान, तसंच सर्वांत महत्त्वाचं म्हणजे चांगले शिक्षक. या काही अटी पूर्ण केल्यावरच शाळेला हा अभ्यासक्रम राबवता येतो. त्यामुळे हा अभ्यासक्रम असलेल्या बहुतेक शाळा चांगल्याच असतात. अपवाद, काही नवोदय विद्यालयांचा.

kedarjoshi खुप धन्यवाद हा धागा सुरु केल्याबद्द्ल ! Happy
मलाही हेच प्रश्ण पड्ले होते माझ्या मुलीकरता ...
CBSC? /ICSC ? ...
तसे मी पण ऐकले आहे कि ICSC चा अभ्यासक्रम जास्त 'vast/deep' (याला मराठीत योग्य शब्द काय?) असतो. वर काही मंडळीनी उल्लेख केल्याप्रमाणे त्याचे पुढील शिक्षणाकरिता फायदे आहेतच ,पण हे पुन्हा 'मूळ विद्यार्थ्याची कुवत ' यावरच अवलंबुन आहे असे दिसते.
परत एकदा धन्यवाद्...
मला पण याबाबत अधिक माहिती वाचायला आवडेल. म्हनजे मलाही निर्णय घेण्यास मदत होयील Happy

चांगली माहिती मिळते आहे. उपयुक्त धागा काढल्याबद्दल धन्यवाद केदार.

cbse बेस्टचे होते. आता माहीती नाय काय फरक झालाय ते. पण मी स्वत शिकले असल्याने माझ्या मते बरेच विषय आधीच असत SSC पेक्षा. काही subjects जसे engineering drawing वगैरेची ओळख होती आम्हाला शाळेतच. आता त्याचा फायदा तुम्ही कसा करता पुढे जावून ते तुमच्यावर. बाकी फायदा हाच की १०% अ‍ॅडिशन व्हायचे % मध्ये. बाकी शाळा व मुख्य म्हणजे टिचर्स चांगली असेल तर उत्तमच. Happy

हां, आणखी एक मॅथ्स खूप चांगले असते. trignometry वगैरे आम्हाला आधीच शिकवली होती. खरे तर माझी टिचर्स खूप चांगले होते. टिचर्सना पण काही परेक्षा द्याव्या लागतात. no offense to anyboy पण म्झ्या शाळेत ते मद्रासी टिचर्स कमीच होते. त्यामुळे उच्चार चांगले असतात व फंडे सुद्धा चांगले असतात मुलांना कसे शिकवायचे. नाहीतर माझा मावस भाऊ एका शाळेत जायचा नी उच्चार 'हेच' नी स्चॅअर असे करायचा. Happy आम्ही चिडवायचो.

ह्म्म मलाही हाच प्रश्न पडतो cbse ki ssc सध्या फी आणि डोनेशन पण किती वाढलय यन्दा फी ५० ते ७० हजार वर्शाला आणी डोनेशन cbse ला आणी शाळा ठीक तर ssc बोर्ड शाळा जर चान्गली असेल तर तिथ का जाउ नये कि आपला पाल्य मागे पडेल का पुढे याची काळजी वाटते

इंटरनॅशनल शाळा मधे फी अव्वाच्या सव्वा (६,००,००० ते १२,००,००० प्रतिवर्षी) आहे. उदा. पुण्यात मर्सिडीज बेंझ शाळेची फी दरवर्षी ६,००,००० रुपये इतकी आहे.>>>>

बापरे.....

अशी शाळा काढायला नेमके काय काय करावे लागते? Happy

मी एका इंटरनॅशनल स्कूल मधे डायरेक्टरची सेक्रेटरी म्हणुन काम केलय! केंब्रिज युनिवर्सिटीचा IB curriculam होता तिथे! सी बी एस्सी, आय सी एस्सी, अगदी आपले पुणे बोर्ड यांचा अभ्यासक्रमही आयबी च्या तुलनेत फार अवघड आहे! आयबी म्हणजे स्टुंडंट्स फ्रेंडली अभ्यासक्रम! आपल्यासारखे स्पेलिंग मिस्टेकला अर्धा मार्क कट होत नाही तिथे. त्यांच्या पॉलिसीप्रमाणे एक शब्द जरी प्रश्नाच्या उत्तराशी रीलिव्हंट असला तरी पुर्ण मार्क मिळतात.....त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मुलाला उत्तर येतय पण एक्स्प्रेस करता येत नाही....आता ते टिचर्सच काम ...त्याच्याकडुन कस करुन घ्यायच ते!
एन आर आय,उद्योगपती, मंत्री, नट-नट्या यांची मुले तिथे शिकतात कारण फी ५-५ लाख आहे वर्षाला! आणि या मुलांना इंडीयन कल्चर ( मोठ्यांचा/ शिक्षकांचा मान ठेवणे, प्रार्थनेला हात जोडुन बसणे...इ. कोरीयनच मुले तर मनोरंजनाच्या कार्यक्रमाला आल्यासारखी प्रार्थनेला बसतात)शिकवणे म्हणजे फारच डोकेदुखी असते. एक तर तिथे आपले राष्ट्रगीत होत नाही. Sad

CBSE का ICSE च्या शाळांमधे १ ली पासुन काही विषय हिन्दी मधुन शिकवतात असे ऐकले आहे. ते खरे आहे का? इंग्लिश किंवा मराठी मधुन शिकणे ठीक वाटते पण १ ली पासुन हिन्दीमधुन शिक्षण काही फारसे पटत नाही. विनाकारण मुलांवरचा अभ्यासाचा ताण वाढणार असे वाटतेय.

मराठी माध्यमाचा विचार करा हो निदान प्राथमिक शिक्षणासाठी तरी अशी एक कळकळीची विनंती.
इतिहास किंवा तत्सम विषय इंग्रजी मधुन शिकण्याची काय गरज आहे ?

मी एच.एस.सी, आयसीएससी या भारतीय बोर्डामधे शिकवले आहे व आता आयजिसिएससी आणि आयबी या इंटरनॅशनल करिक्युलममधेही शिकवत आहे. शिक्षक म्हणून माझे अनुभव खालीलप्रमाणे-
१] भारतीय बोर्ड्स कंटेंटवर अतिभर देतात, स्किल्स शिकवली जात नाहीत, सिलॅबस इतका प्रचंड असतो की शिक्षकाची इच्छा असूनही हे शक्य होत नाही. ११वीत आलेल्या मुलांनी मायक्रोस्कोप हातात ही घेतलेला नाही ही परिस्थिती मी पाहिलेली आहे.
२] या उलट इंटरनॅशनल सिलॅबस स्किल्सवर जरा जास्तच भर देतात, त्यामुळे कंटेंट थोडा कमजोर राहतो.
३] माझ्या मते माहितिच्या विस्फोटामुळे कंटेंट थोडा कमी माहिति असेल तरी चालून जाईल पण स्किल्स तयार होणे जास्त महत्वाचे.
४] भारतीय बोर्ड्समधे ज्ञानशाखा (सायन्स,कॉमर्स इ.) निवडण्याचा ऑप्शन दहावीनंतर येतो जो इंटरनॅशनल सिलॅबसमधे ८ वी नंतरच असतो. अर्थात इतक्या कमी वयात असा चॉईस करावा की नाही याबद्द्ल पालकांत मतभेद दिसून येतात.
५] इंटरनॅशनल सिलॅबस महाग आहेत यात शंका नाही पण त्यामुळे या शाळांचा स्टूडंट-टीचर रेशो आयडीअल आहे.
६] इंटरनॅशनल सिलॅबसला बहूतेक भारतीय युनिव्हर्सिटीजनी मान्यता दिली आहे. मात्र या सिलॅबसमधून बाहेर पडणारी बहुतेक सर्वच मुले परदेशी शिकायला जातात त्यामुळे उच्चशिक्षणाच्या भारतीय पद्धतीत ती किती टिकून राहतील याची माहिती अजूनतरी उपलब्ध नाही.
७] आयबी डीप्लोमासारखे कोर्सेस 'सर्वांगिण विकासा'बद्दल अत्यंत गंभिर आहेत आणि त्यादृष्टीने प्रयत्न केले जातात. याबद्द्ल अधिक माहितीसाठी स्वतंत्र लेख लिहिण्याचा माझा मानस आहे.
जाता जाता- नावात इंटरनॅशनल शब्द असणारी प्रत्येक शाळा इंटरनॅशनल सिलॅबस शिकवणारी असेलच असे नाही.

एकडे बरेच जण मुलाच्या मुलाच्या शिक्षणासाठी अमेरिकेतुन भारतात परत जाण्याचा विचार करत आहेत! अम्ही मुलाच्या शिक्षणासाठी भारतातुन अमेरिकेत आलो आहोत Happy

माझ्या मुलानी ६ वी सिंगापुर मध्ये केंब्रिज युनिवर्सिटीचा करिकुलम ने केली , ७ वी स्किप केली , त्यानंतर CBSC मधुन दहावी केली . नंतर ११वी ४ महिने SSC बोर्डातुन केली ऑक्टोबर २०१३ ला अमेरिकेत आलो. मुलगा मे २०१५ ला अमेरिकेत हायस्कुल मधुन डिप्लोमा घेईल.
आम्ही केंब्रिज युनिवर्सिटीचा करिकुलम, CBSC , SSC आणि अमेरिकन हायस्कुल ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव मागच्या ५ वर्षात घेतला आहे. त्यातुन खालिल अनुभवः

१> अमेरिकन आणि केंब्रिज युनिवर्सिटीचा करिकुलम सर्वात चांगले . रट्टा मारायला स्कोप नाही
२> केंब्रिज युनिवर्सिटीचा करिकुलम खुपच अवघड आहे त्यामुळे माझ्या मुलाला एक वर्ष स्किप करुन पण CBSC अवघड गेली नाही. ( इतिहास सोडुन )
३> भारतात खुप स्पर्धा आहे. CBSC मध्ये चांगले गुण मिळुन पण पुण्यात चांगले कॉलेज/क्लासेस मिळाले नाही. चाटे क्लासेस ला admission घेतली. SSC बोर्ड मध्ये १०वी केली असती तर कदाचित चांगले कॉलेज/क्लास मिळाले असते.
४> Percentile साठी SSC बोर्ड चांगले म्हणुन १०वी नंतर CBSC तुन SSC मध्ये घातले. चांगले कॉलेज/क्लासेस मिळाले नाही म्हणुन कंपनीत ५ वर्षासाठी अमेरिकेत बदली घेतली. विसा मिळायला ४ महिने लागले तोप्र्यन्त चाटे क्लास आणि खाजगी क्लास केले. नंतर अमेरिकेत ११वी पुर्ण केली. सध्या मुलगा १२वी ला आहे.
५> अमेरिकेत त्यामानाने स्पर्धा नाही. युनिवर्सिटी ला admission मिळायला फारसा त्रास झाला नाही. ( अमेरिकेत ९ ते ११वी आणि १२ वी mid-term च्या मार्कावर युनिवर्सिटी ला admission मिळते) ऑगस्ट मध्ये engineering मध्ये अभ्यास चालु करेल. ( मुलाने पण मेहनत घेतली) भारतात चंगल्या कॉलेज मध्ये admission मिळायला बराच त्रास झाला असता. कदाचित admission मिळाली पण नसती.

भारतात कुठला बोर्ड घ्यायचे ते आपल्याला पुढे काय करायचे आहे आणि त्यासाठी कुठले बोर्ड फायद्यात राहिल ते बघुन घेणे. उदाहरणासाठी ११वी ला admission साठी तुम्ही राहता त्या परिसरातिल शाळा/कॉलेज्ला काय लागते ते बघुन त्या बोर्डात प्रवेश घेणे. तसेच IIT ला ७५ Percentile लागतात. ते SSC बोर्डात मिळायला सोपे ( .compare to CBSC, ICSC or IB) ,

@ गजानन, सीबीएससीत कधी शिकवलेले नाही त्यामुळे मलातरी त्याची आणि आयसीएससीची तुलना करता येणार नाही.

ओके, आमच्यापुढे आता हे दोन पर्याय उपल्ब्ध झालेत. आधी सीबीएसई हा एकच होता. आता दोन असल्यामुळे पुन्हा डोक्यात हे की ते सुरू झालेय.

आगाऊंच्या प्रतिसादात उल्लेख असलेलं आय बी बोर्ड आणि सात वर्षांंच्या मुलांना critically evaluate 'Gaudi's Style of Architechture' असा होमवर्क देणारं आय बी बोर्ड एकच का?

महाराष्ट्र एसेसेसी बोर्डाची सहावी ते दहावीपासूनची गणित, मराठी आणि हिंदीची पुस्तकं पाहिलीत.
गणितातल्या कन्सेप्टसची लहान वर्गांत ओळख करून देऊन पुढच्या वर्गांत ती पक्की करून देण्याची पद्धत छान वाटली.
इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी नेमलेल्या हिंदीच्या पाठ्यपुस्तकाची पातळी (कन्टेन्ट, व्याकरण,पेपर पॅटर्न) या सगळ्या बाबत मराठीच्या पाठ्यपुस्तकांपेक्षा खूप वरची आहे. हे माझी मातृभाषा मराठी असल्याने मलाच वाटत असेल. पण मुलांना तुलनेने हिंदी विषय जास्त सोपा वाटतोय.

पाठ्यपिस्यकांबाबत : म.रा.पा.मं. ने पाट्या टाकल्याचे एक उदाहरण.नववीचा हिंदीचे दोन पाठ सरळसरळ सीबीएसई बोर्डाकडून उचललेत. पाठातले काही परिच्छेद वगळलेत, पण पाठाच्या शेवटी त्या वगळलेल्या परिच्छेदांवरचे प्रश्न मात्र कायम ठेवलेत. ज्यांची उत्तरे त्या पाठांत मिळणे शक्य नाही.
एसेसी बोर्डात आठवीपर्यंत पन्नास(४०) मार्कांची लेखी परीक्षा. मग नववीत सरळ शंभर (८०) मार्कांची परीक्षा आणि दहावीत बोर्डाला पूर्ण वर्षाचा अभ्यास एकदम हा चढ सामान्य विद्यार्थ्यांसाठी खूप कष्टप्रद आहे. आठवीतून नववीत जाताना मराठीची पातळी, पाठांची संख्या, भाषेची रूपे-काळ हे अचानक उंचावलेत. पण मराठी घरांतल्या मुलांना हे कठीण जाऊ नये.

एसेसी बोर्डाचा नवा पेपर पॅटर्न असा आहे की नापास होणे अशक्य आहे. मुलांना, शिक्षकांना, जिथे मध्ये पडतील तिथे पालकांना स्वतःच्या डोक्याला जराही तोशीस द्यायची गरज नाही.
दहावीला रिकाम्या जागा भरा हा बहुपर्यायी प्रश्न आणि काय काय. प्रत्येक विषयासाठी वीस गुण इन्टर्नल इव्हॅल्युएशन.

मयेकर, हे कुठे वाचलेत?! हे खरे असेल तर प्रथमदर्शनीतरी आत्यंतिक वाटत आहे. अर्थात क्रिटीकल इव्हॅल्यूएशन हे आयबीमध्ये मह्त्वाचे स्कील आहे हे खरेच.

Pages