गुन्हा ?

Submitted by विशाल कुलकर्णी on 16 July, 2009 - 07:22

"ए बाबा, चल ना रे पावसात जावू!"

शोणने पुन्हा एकदा विचारलं तसा मी ओरडलो.....

"तुला सांगितलं ना एकदा, पाऊस खुप जोरात पडतोय म्हणून! आणि तु लहान आहेस का आता असला हट्ट करायला?"

माझा आवाज अंमळ चढलाच होता. एकतर आज ऑफीसात जी. एम. शी थोडं ऑर्ग्युमेंट झालेलं. तसं बघायला गेलं तर माझी काहीच चुक नव्हती. त्यांनी काल माझ्या हातात दिलेली "मेहता अँड मेहता" कंपनीची फाईल मी कालच कंप्लीट करुन त्यांना परत केली होती. त्यांनी बहुदा इथे तिथे कुठेतरी ठेवुन टाकली आणि आज ती त्यांना सापडत नव्हती. त्याचं खापर ते माझ्या डोक्यावर फोडू पाहत होते. सुदैवाने मी फाईल त्यांना दिली तेव्हा एच.आर. चा रणजीत तिथेच होता. त्यामुळे मी सुटलो पण दिवस व्हायचा तो खराब झालाच. त्याच मुडमध्ये घरी आलेलो तर शोण मागे लागला होता... बाबा, चल ना पावसात जावू म्हणुन!

"ओ गॉड, हे मी काय करुन बसलो? कळत नकळत माझ्या बॉसचा राग मी शोणवर काढला होता. खरेतर त्याची काय चुक होती?"

बिच्चारा शोण, माझ्या ओरडण्याने अगदीच हिरमुसून गेला. त्याचं ते एवढंसं झालेलं तोंड बघवेना मला. म्हणुन मी शेवटी त्याच्या जवळ गेलो ....

"आय एम सॉरी, शोण! अरे मी थोडा वेगळ्याच मनस्थितीत होतो!"

"नाही रे बाबा, तु कशाला सॉरी म्हणतोयस? खरेतर चुक माझीच होती! एकतर तु ऑफीसमधुन दमुन आलेला. तुलाही विश्रांतीची आवश्यकता असते हे ध्यानातच नाही आले बघ माझ्या. पण दिवसभर खुप कंटाळा येतो रे मला! तशा त्या गोमतीमावशी असतात. पण त्यांना थोडंच मला उचलुन बाहेर अंगणात नेता येणार आहे. जोपर्यंत लहान होतो तोवर ठिक होतं रे. आता १८ वर्षाच्या मुलाला त्या कशा काय उचलुन घेणार? अगदी बेडवरुन उचलुन व्हीलचेअरवर ठेवायचे म्हणले तरी त्यांना ते अशक्यच आहे. मी पण असा मुर्खासारखा काहीही विचार न करता तुझ्याकडे हट्ट करतो बघ. सॉरी बाबा, माझंच चुकलं. पुन्हा नाही असा हट्ट करणार मी."

शोणचे ते चमकदार निळे डोळे एकदम निस्तेज वाटायला लागले आणि माझ्याच पोटात कुठेतरी आतवर कालवल्यासारखं झालं. मी पुढे होवून त्याला मिठीत घेतलं.......

"नको रे राजा असा परक्यासारखा बोलू! मलातरी कोण आहे दुसरं तुझ्याशिवाय?" खुप प्रयत्न करुनही दाद न देणार्‍या एखाद्या व्रात्य मुलासारखे माझ्याही डोळ्यात अश्रु उभे राहीले होते.

"बाबा मी काय करु रे? मी काय गुन्हा केला होता म्हणुन देवाने ही अशी शिक्षा दिली मला?" आता मात्र शोण अगदी अनावर होवून रडायला लागला.

"नाही रे बाळा! असं बोलू नये, अरे हे काय कायमचं थोडंच आहे? आपले उपचार चालुच आहेत ना? पुढच्या महिन्यात ते देगावकर वैद्य एक रामबाण गुण देणारं औषधी तेल देतो म्हणालेत, मग बघ सहा महिन्यात तु कसा पुन्हा आपल्या पायावर उभा राहतोस ते!"

"ए ...... शोण, तु एकदा बरा झालास ना की मग आपण दोन रेसर सायकली घेवू आणि मग दररोज संध्याकाळी मी ऑफीसमधुन आलो की मग गावाबाहेरच्या वेशीपासुन ती महादेवाच्या मंदीरापर्यंत रेस. आता मात्र मीच जिंकेन बरं का! सद्ध्या रोज सायकल चालवुन चालवुन मला चांगलीच प्रॅक्टीस झालीय. बघु कोण जिंकतं ते?"

मी आपल्याच नादात बडबडत होतो. सहजच शोणच्या चेहर्‍याकडे लक्ष गेलं आणि पोटात धस्स झालं, मुळातुन हललो मी. त्याच्या चेहर्‍यावर उमटलेली ती वेदना, ती असहाय्यता! परमेश्वरा, हे कसलं प्राक्तन दिलं आहेस माझ्या निष्पाप लेकराला. काय गुन्हा आहे रे त्याचा? शक्य असेल तर मला खिळव बिछान्याला, पण माझ्या लेकराला बरा कर रे! मला शोणच्या चेहर्‍याकडे पाहवेना, मी तसाच नजर चुकवून त्याच्या खोलीच्या बाहेर पडलो आणि हॉलमध्ये येवुन सोफ्यावरच्या उशीत डोके खुपसुन हमसुन हमसुन रडायला लागलो.

सहाच वर्षाचा होता शोण, शमा गेली तेव्हा ! मला आठवतं नेहेमीप्रमाणे शमा "संकल्प" च्या शिबीरासाठी म्हणुन कोल्हापुरला गेली होती. तशी ती नेहमी शिबीराला जाताना शोणला बरोबर घेवुनच जायची. पण यावेळी माझी आई आलेली होती आमच्याकडे, शिबीरही फक्त दोनच दिवसांचं होतं आणि शोणनेच हट्ट धरला आज्जीबरोबर राहण्याचा म्हणुन ती त्याला त्याच्या लाडक्या आज्जीकडेच ठेवुन गेली होती आणि कोल्हापुरहुन परतताना ते अघटीत घडलं. पेठनंतर कुठेतरी बस उलटली आणि माझी शमा त्या अपघातात .........

माझी शमा ! शोण तिच्यावरच गेलाय. तिचा गोरा रंग, निळे डोळे, तिची बुद्धीमत्ता सगळं काही जसंच्या तसं उचललय त्याने. माझा आणि शमाचा प्रेमविवाह. मी तेव्हा कायम संघाच्या कार्याला वाहुन घेतलेले होते आणि शमा त्या "संकल्प" नामक समाजसेवी संस्थेसाठी कार्यकर्ती म्हणुन काम करत असे, एक समाजसेवा म्हणुन. मला वाटतं अशाच कुठल्यातरी शिबीरात माझी आणि शमाची गाठ पडली. ओळख झाली, आवडी निवडी जुळल्या आणि एका सुमुर्तावर आम्ही विवाहबद्ध झालो. माझ्या घरचे लोक (म्हणजे आई!) बर्‍यापैकी सुधारकी मतांची असल्याने तेव्हाही बाकी कुठल्या समस्या उभ्या राहील्या नाहीत. शमा तर एका अनाथाश्रमातच वाढलेली, त्यामुळे तिथुन काही हरकत असण्याची शक्यता नव्हतीच.

एका सुदिनी आम्ही नोंदणी पद्धतीने विवाहबद्ध झालो. मुळातच दोघांच्याही वैयक्तिक गरजा खुपच मर्यादीत असल्याने थोडक्या उत्पन्नातही आमचा संसार अगदी मजेत, टामटूमीत चालला होता. लग्नानंतरही शमाचे समाजकार्य चालुच राहीले होते. सुदैवाने आमच्या घरात कुणाचीच काही हरकत नव्हती. असला तर आईला अभिमानच होता सुनेचा. अरे हो... हे राहीलंच...घरात असायला माणसे किती? आई , मी आणि नव्याने अ‍ॅड झालेली शमा अशी इन मिन तीन माणसे. बाबा गेल्यानंतर आईनेच मला वाढवलेले. आई एका शाळेतुन शिक्षिका म्हणुन निवृत्त झाली होती. लग्नाचे नव्या नवतीचे नऊ दिवस संपले आणि आम्ही दोघेही पुन्हा आपापल्या व्यापात गुरफटून गेलो. आणि साधारण वर्षभराने शोणचा आमच्या संसारात प्रवेष झाला.

मला आठवतो तो दिवस. शमाचे दिवस भरलेले. मी आपला वेड्यासारखा ओ.टी.च्या बाहेर येरझार्‍या घालत होतो. दर पाच मिनीटानी नजर दरवाजाकडे जायची. डॉक्टरांनी सांगितले होते की मुल आडवं आलेलं आहे त्यामुळे सिझरीन करावं लागेल. तसे आता अत्यानुधीक तंत्रज्ञानामुळे या सर्व प्रक्रिया अतिशय सोप्या झालेल्या आहेत. पण मनाला चैन थोडीच पडते. मनाला एक हुरहूर लागलेली. काय असेल? मुलगा होइल की मुलगी? मला तर बाबा, मुलगीच हवी. मी तिचं नावही ठरवून ठेवलं होतं..."गंधाली"! आमच्या छोट्याशा घरकुलाला तिच्या सान्निद्ध्याने दरवळून टाकणारी गंधाली.

पण...., मुलगा झाला तरी काही हरकत नाही. मी ठरवलं होतं...

"आई, मुलगा झाला तर मी त्याला शोनु म्हणणार, आणि मुलगी झाली तरी शोनु !"

"गप रे, सरळ नावाने हाक मारायची, काही अपभ्रंश करायचे नाहीत माझ्या नातवंडाच्या नावाचे!" आईचा प्रेमळ दम.

त्यावर पुन्हा तिनेच मार्ग काढला.

"आपण असे करु लौकीक, मुलगी झाली तर तिचे नाव गंधालीच्या ऐवजी "शोनाली" ठेवू आणि मुलगा झाला तर बाळाचे नाव "शोण" ठेवू. महाभारतातील कर्णाच्या धाकट्या भावाचे, अधिरथ आणि राधेच्या धाकट्या पुत्राचे नाव शोण. म्हणजे मग तुला अगदीच काही वेगळं वाटायला नको, अर्थात शमाचा निर्णय अंतिम असेल. मान्य? "

आईचा शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य, शमा काही हरकत घेणे शक्यच नव्हते, कारण नवर्‍याच्या चुका काढताना मिळणारा एक खंदा साथीदार ती गमवणे शक्यच नव्हते आणि माझीही इच्छा पुर्ण होणार असल्याने मी लगेच होकार दिला होता. आज त्या नर्मदा सुतिकागृहात अस्वस्थपणे येरझार्‍या घालत होतो. एकदाचा तो दरवाजा उघडला आणि नर्सबाई हासर्‍या चेहर्‍याने बाहेर आल्या...

"अभिनंदन, मुलगा झालाय!"

"शमा कशी आहे? तिला त्रास तर नाही झाला ना फार?" माझ्याआधी आईचा प्रश्न. नर्स थोडीशी भांबावली. नातु झालाय हे कळाल्यावरही नातवाच्या आधी सुनेची काळजीने चौकशी करणारी सासु पहिल्यांदाच पाहीली असावी तिने.

"बाळ-बाळंतिण दोघेही ठणठणीत आहेत." नर्सबाईने ग्वाही दिली.

"जा रे लौकीक, पेढे घेवुन ये आधी!"

"अगं मला बघु तरी दे ना बाळ!" मी कुरकूरलो.

"गधड्या, बाळ बघायचय की बायकोला भेटायचय? चल भेट आधी तिला आणि मग पळ पेढे आणायला." आईने माझ्या मनातलं बरोबर ओळखलं होतं.

पलंगावर पहूडलेली, थोडीशी थकलेली शांत, क्लांत पण चेहर्‍यावर अतिव समाधान दाटलेली शमा आणि तिच्या कुशीत निवांत, निर्धास्तपणे विसावलेलं आमचं बाळ. मी त्याच्याकडे पाहातच राहीलो. गुलामाने आईचाच रंग घेतला होता. हाताच्या एवल्याशा, मिटुन घेतलेल्या लालभडक मुठी, बघीतलं की ओठ टेकवावेसे वाटणारी लालसर नाजुक पावलं, ते गोरंपान, गुटगुटीत मुटकुळं विश्वासाने आईच्या कुशीत शांतपणे झोपलं होतं. मी हळुच शमाचा हात हातात घेतला.......

शमा माझ्याकडे बघून हलकेच हसली, म्हणाली ,"आतापर्यंत एकच लेकरू सांभाळत होते, आता दोन दोन सांभाळावी लागणार!"

तसे आम्ही तिघेही खळखळून हसलो. त्या दिवसापासुन आमच्या सुखी संसाराचे दुसरे पर्व सुरू झाले. माझे आणि शमाची शिबीरं दौरे आता अगदीच थांबले नसले तरी बर्‍याच प्रमाणात कमी झाले होते. आता बराचसा वेळ घरातच शोणच्या बाललीला न्याहाळण्या, त्याच्याशी खेळण्यातच जावु लागला होता. त्यामुळे आईदेखील खुश होती. शोण साधारण दोन-अडीच वर्षाचा होइपर्यंत आमचे चौघांचे एकत्रित सहजीवन सुखात चालले होते. मध्येच एक दिवस आईने जाहीर केले.

"आता तुम्ही दोघेही संसारी आहात, सुजाण आहात. स्वत:ची आणि शोणची काळजी घेण्यास समर्थ आहात. आता मी या संसारव्यापातुन मोकळी व्हायचं ठरवलय. मी बाबा आमटेंच्या आनंदवनात जावुन राहणार आहे."

आम्हा दोघांनाही खुप वाईट वाटलं आई दुर जाणार म्हणुन. शोणलाही तिचा चांगलाच लळा लागला होता. पण शेवटी तिचे जिवन तिने कसे जगायचे हा सर्वस्वी तिचा अधिकार होता. आजपर्यंत खुप काही केलं होतं तिने माझ्यासाठी, आमच्यासाठी. आता तिचं जिवन तिला तिच्या पद्धतीने जगायची इच्छा होती. शेवटी आम्ही तिला भरल्या अंत:करणाने आणि साश्रु नयनांनी निरोप दिला. आम्ही दोघेही काही दिवस शोणला घेवुन तिच्याबरोबर आनंदवनात राहुन आलो. त्यानंतर मात्र खर्‍या अर्थाने आमचा संसार चालु झाला. इतके दिवस आई असल्याने पुष्कळ लहान सहान गोष्टीत लक्ष घालायची वेळाच आली नव्हती आता मात्र तिची उणीव पदोपदी जाणवायला लागली. तशी आई अधुन मधुन येवुन जावुन असायची. अशीच एकदा ती आली असता शोणला तिच्याकडे सोडुन शमा कोल्हापुरला त्या शिबीरासाठी म्हणुन गेली. परत आली ती पांढर्‍या अँबुलन्समधुनच. येताना कुठेतरी त्यांची बस उलटली आणि शमा ऑन दी स्पॊटच गेली. शोण ५-६ वर्षाचा असेल तेव्हा. शोणसाठी म्हणुन आई घरी परत आली.

त्याला फारसं काही कळालं नाही. पण आता आपली आई जवळ नाही हे मात्र त्याच्या लक्षात आलं होतं. तिच्या आठवणीत आई आई करत एकदा तो खुपच आजारी पडला. ताप जवळ जवळ ४-५ च्या घरात गेला होता. त्या आजारात जो शोण बिछान्याला खिळला तो परत उठलाच नाही. त्याच्या हाता पायातली संवेदनाच गेली होती. हातापायांची सगळी हालचाल बंदच होवुन गेली. एके दिवशी डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले ....

"सॉरी लौकीक, पण तुझा शोण कधीच आपल्या पायावर उभा राहु शकणार नाही. कदाचीत नियमीत मसाज वगैरे करुन त्याच्या हातांमध्ये थोडेफार बळ येवु शकेल. पण पायात सुधारणा होण्याची शक्यता जवळ जवळ शुन्यच !"

मी सुन्न झालो होतो. माझं सोन्यासारखं लेकरु कधीच आपल्या पायावर उभं राहू शकणार नाही ही कल्पनाच सहन होत नव्हती माझ्याच्याने. त्यादिवशी आईच्या कुशीत डोके ठेवुन हमसुन हमसुन रडलो ते बहुदा शेवटचेच.

त्या दिवसानंतर आज पुन्हा डोळ्यात पाणी उभे राहीले होते. पण आज माझे डोळे पुसायला आई नव्हती. शमाचं अकाली जाणं, शोणची अशी अवस्था याने आईपण आतल्या आत खचत चालली होती. आयुष्यभर तिने खस्ताच काढल्या होत्या. बाबांच्या मृत्युनंतर तिनेच मला आई आणि बाबा दोन्ही होवून सांभाळले होते. आता उतारवयात हे सगळं पाहायची तिच्यावर वेळ आलेली होती. त्यातुनच बहुदा तिने दुखणं धरलं आणि त्यातच ती गेली. माझा शेवटचा आधारही दैवाने काढुन घेतला होता. आता फक्त मी आणि माझा शोण.

मी हळु हळु माझे संघकार्य कमी केले. शेवटी पुर्णपणे बंदच करुन एका ठिकाणी नोकरी धरली. शोणच्या संगोपनासाठी आईच्याच नात्यातल्या एका दुरच्या बहिणीची, गोमतीमावशीची खुप मदत झाली. निराधार आणि निपुत्रिक असलेली गोमतीमावशी आमच्याकडे आली आणि मला थोडासा वेळ मिळायला लागला. मावशी शोणचं सगळं करायच्या. त्याचे कपडे बदलणं,साफसफाई, स्नान सगळं. त्यामुळेच मी माझ्या नोकरीत लक्ष एकाग्र करु शकलो. शोणच्या पुढच्या इलाजासाठी पैसा कमावणे म्हणजे नोकरी करणे भागच होते. म्हणता म्हणता वर्षावर वर्षे उलटुन गेली. शोण सतरा अठरा वर्षाचा झाला. उपचार चालुच होते. आयुर्वेद, निसर्गोपचार, अ‍ॅलोपथी एवढेच काय तर कुठल्या कुठल्या बाबा लोकांनाही भेटुन झाले होते. पण शोणच्या अवस्थेत काडीइतकाही फरक नव्हता. आणि आज तोच शोण मला विचारत होता...

"बाबा, मी काय गुन्हा केला होता म्हणुन देवाने ही अशी शिक्षा दिली मला?"

या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नाही रे राजा. खरे तर मलाच विचारायचेय त्या परमेश्वराला, की देवा रे मी काय गुन्हा केला होता म्हणुन ही अशी शिक्षा दिलीस मला आणि माज्या पिल्लाला? शमा, का सोडुन गेलीस तु मला एकट्याला? तुझ्याशिवाय या जगण्यात अर्थच राहीलेला नव्हता. तर पदरात हे गोड लेकरु टाकुन गेलीस. त्याला आणि मला दोघांनाही अनाथ करुन. माझ्या आजवरच्या आयुष्यात मी तीनवेळा अनाथ झालो.... प्रथम बाबा गेले तेव्हा, दुसर्‍यांदा शमा गेली तेव्हा आणि तिसर्‍या वेळेस आई गेली तेव्हा! मनात एकच शंका वारंवार राक्षसी रुप धारण करुन उभी राहते....

"माझ्यानंतर माझ्या शोणचं काय होणार?" आणि मग मी अस्वस्थ होवुन जातो.

यावर काही तरी उपाय करायलाच हवा होता. कारण परिस्थिती हातातुन निसटत चालली होती. शोण मोठा होत होता. झोपुन जरी असला तरी त्याच्यात व्हायचे ते सारे तारुण्यसुलभ बदल होतच होते. परवाची एक घटनाच मुळी मला अंतर्मुख करुन गेली. आज मी आहे, पण माझ्यानंतर शोणकडे कोण बघणार? ही कल्पनाच बेचैन करुन टाकत होती. झालं असं, गोमतीमावशींचंही वय झालं होतं, त्यामुळे त्यांनाही आता फारसं काम होत नसे. म्हणुन त्यांनी त्यांच्या मदतीला त्यांची एक दुरची नातेवाईक आपल्याबरोबर बोलवुन घेतली होती.

इंदीरा १७-१८ वर्षाचीच असेल, पण वाढत्या अंगाची होती. घरातली छोटी छोटी साफसफाई धुणी-भांडी यासारखी कामे ती करायची. एकदा शोणच्या खोलीत ती नेहेमीप्रमाणे फरशी साफ करत असताना शोणच्या डोळ्यांनी नको ते पाहीलं........

त्यादिवशी मी जरा उशीराच घरी आलो. पाहतो तो शोण अजुनही जागा होता. साहजिकच मी त्याच्याकडे गेलो. मला बघुन तो एकदम रडवेला झाला. मला काही कळेना.

"अरे ... रडायला काय झालं शोण? कोणी काही बोललं का? काही त्रास होतोय का?"

शोण बहुदा सांगावं की नको या संभ्रमात पडला होता. शेवटी धीर एकवटुन त्याने बोलायला सुरूवात केली.

"बाबा.... अरे, आज काहीतरी वेगळंच झालं. तसा मी रोजच टिव्ही बघतो. त्यावर वेगेवेगळे सिनेमे, त्यातल्या त्या नट्या, त्यांचे कपडे.......! आजपर्यंत टिव्हीवर पाहताना काही खास वाटलं नव्हतं रे, पण आज दुपारी इंदीराला साफसफाई करताना ....

"बाबा त्यानंतर अचानक खाली काहीतरी विचित्र अशी जाणीव झाली आणि मग एक प्रकारचा चिकटपणा........!"

बोलता बोलता शोणने मान खाली घातली होती, डोळ्यातुन पाणी ओघळत होते. क्षणभर मला काहीच कळेना. त्याची समजुत कशी काढावी तेच कळेना. शेवटी मी त्याच्याजवळ गेलो, डोक्यावरुन हळुवारपणे कुरवाळलं आणि म्हणालो...

"एवढं मनाला लावुन घेवु नकोस राजा. हे नॅचरल आहे रे. या वयात असं व्हायचच?"

"पण मी.... मी काय करु बाबा?"

शोणच्या डोळ्यातली व्याकुळता कुठेतरी आत जखम करुन गेली. त्याच्या प्रश्नाला माझ्याकडे खरोखर उत्तर नव्हते आणि ही परिस्थिती कशी हाताळायची हेच कळत नव्हते. मला शमाची खुप प्रकर्षाने आठवण झाली. आज शमा असती तर तिने शोणची व्यवस्थित समजुत काढली असती. हे सगळे त्याला छान समजावुन सांगितले असते.

"नाही गं शमा, कितीही ठरवलं तरी त्याची आई नाही होवू शकत मी! आज तुच हवी होतीस."

कसं असतं ना, काही गोष्टींवर मुलं जेवढ्या मोकळ्यापणे आईशी बोलतात तेवढ्या मोकळेपणाने बापाशी नाही बोलत, किंबहुना बापही नाही बोलु शकत. शोण मोठा होत होता तशा त्याच्यापुढच्या समस्याही वाढायला लागल्या होत्या. या प्रसंगानंतर मात्र मी गंभीरपणे विचार करायला लागलो. शोणची काहीतरी कायमची सोय करायला हवी होती. आज मी आहे, पण माझ्यानंतर त्याच्याकडे कोण बघणार? याचे उत्तर शोधायलाच हवे होते. आणि तशातच एक दिवस गोविंदकाका घरी आले.

गोविंदकाका आईबरोबर आनंदवनात होते. पेशाने डॉक्टर असलेले गोविंदकाका आपली चांगली चाललेली प्रॅक्टीस सोडुन आनंदवनात बाबांबरोबर रोग्यांच्या सेवेत आपले आयुष्य व्यतीत करत होते. त्यांच्या माझ्याकडील वास्तव्यात मी माझी व्यथा त्यांच्यापुढे मांडली.

"सोपं आहे लौकीक, शोणची अशी अवस्था होण्यापुर्वी तु आणि शमा समाजसेवाच करत होतात ना? मग आता काय हरकत आहे. सोड नोकरी आणि चल आनंदवनात. तिन्ही गोष्टी साधता येतील. तुझे समाजसेवेचे व्रत पुन्हा चालु करता येतील. तिथल्या रुग्णालयातुन शोणवर उपचार चालु ठेवता येतील, त्याला घरबसल्या शिक्षण मिळण्याची पण व्यवस्था करता येइल आणि तुझ्यानंतर शोणची जबाबदारी आम्ही घेवू. तुझी जर इच्छा असेल आणि त्यांची तयारी असेल तर गोमतीमावशी आणि इंदीरेलाही बरोबर घेवु शकतोस, आपल्याला मिळतील तेवढी माणसे हवीच आहेत."

त्या "आम्ही" मध्ये केवढी ताकद होती, केवढे प्रेम, किती आत्मविश्वास होता. मी शोण कडे बघितले. त्याच्या डोळ्यात प्रसन्न चांदणे फुलले होते. गोविंदकाकांनी माझ्या पाठीवर हलकेच थोपटले.

"विचार कसला करतो आहेस लौकीक? अशी संधी पुन्हा पुन्हा येत नसते. चल, एक नवी वाट, एक नवी पहाट तुम्हा दोघांची वाट पाहते आहे."

समाप्त.

गुलमोहर: 

विशल्या आवडली कथा. इमेल चेक कर

-------------------------------------------------------------------------
जो संपतो तो सहवास, आणि ज्या निरंतर रहातात त्या आठवणी

चांगली आहे कथा विशाल...साधी, सोपी....एवढया मोठ्या समस्येचं किती सोप्प समाधान झालं शेवटी..आवडली

*******************
सुमेधा पुनकर Happy
*******************

विशाल, छान आहे कथा. सस्पेन्स स्टोरी असेल अशा समजूतीने दुर्लक्ष करत होते. पण बघूया तर म्हणून वाचायला सुरूवात केली आणि कधी गुंतून गेले कळलेच नाही. आशावाद आवडला.

खूप खूप आवडली कथा........! शेवट येईपर्यंत खिळवून ठेवणारी आहे.

खुप आवडली................ छान आहे कथा.............

आवडली Happy
***************
ॐ नमश्चण्डिकायै |

सस्पेन्स स्टोरी असेल अशा समजूतीने >> उत्सुकतेने वाचायला घेतली... पण... वेगळाच विषय संयतपणे आणि छान शब्दबध्द !!

Searching for guaranteed search engine optimization services at affordable rates? Your search ends here!!! Find your website on the top of popular search engines with our seo services...

भावस्पर्षि, डोळ्यात पाणी आणणारी, मनाला भिडणारी... ह्रुदयस्पर्षि कथा... आवडली.

विशाल कथेच प्रयोजन नाही कळल? म्हणजे कळालीच नाही म्हणना... तुझी ओघवती शैली म्हणुन वाचत गेलो पण शेवटी कथा का आणि कशासाठी ते नाही कळाल. Sad

कथेमधे कारुण्य, अगतिकता, दु:ख, डोळ्यांतून पाणी काढणारी माया, जवळच्या व्यक्तींच्या नसण्याने निर्माण होणारी पोकळी या सगळ्यांचे वर्णन अगदी सुरेख केले आहे. वातावरणनिर्मिती आणि शब्दसामर्थ्य तर छानच आहे.फक्त शेवट मला एकदम अनपेक्षित आणि पुराणमतवादी वाटला. या कथेचा केंद्रबिंदू शोण असायला हवा; नव्हे तो आहेच. कारण तो लौकिकच्या भविष्यकाळाचे प्रतिनिधित्व करतो. त्याचप्रमाणे त्याच्या आशावादाचेही प्रतिनिधित्व कथेतून ध्वनित व्हायला हवे होते.

पण अचानक गोविंदकाकांचे येणे, अचानक आनंदवनात जाण्याचा विषय आणि शोणला आजारावर मात करून स्वतःची नॉर्मल आयडेंटिटी मिळणार की नाही, की आनंदवनात जाऊन समाजसेवक लौकिकचा एक अपंग मुलगा अशीच ओळख राहणार हा अनुत्तरीत राहणारा प्रश्न या गोष्टींमुळे कथा अपूर्ण वाटते.

वैद्यकीय क्षेत्राच्या मर्यादेचे वर्णनही अपुरे वाटते. याउलट शोणला जिद्दीने आयुष्याचे इप्सित मिळवून देऊन मग लौकिक ईतर शोणांना मोठे करायला आनंदवनात गेला असता तर तो शेवट अधिक समर्पक (अर्थात माझ्या दृष्टीने) वाटला असता. असो.वरील विषयावरील जास्त विदेशी चित्रपट बघितल्यामुळे मी कदाचित त्या अँगलने वरील कथेच्या शेवटाची अपेक्षा केली असेल. आपला 'श्वास' ऑस्करच्या परिक्षकांना प्रॅक्टीकल वाटला नाही तो असाच.

विशालराव, रागावू नका मात्र. मी फक्त तुमच्या कथांमुळे निर्माण झालेल्या अफाट अपेक्षांमुळे माझ्या दृष्टीकोनातून 'मला असे वाटते' असे म्हटलेय. कदाचित चुकीचेही असेल.
..............................................................................
हलकी 'घ्या', जड 'घ्या'
दिव्याखाली 'घ्या', अंधारात 'घ्या'
'घ्या', 'घेऊ' नका
तुमचा प्रश्न आहे!

सगळ्यांचे धन्यवाद!
उमेश ही कथा शोणची नाहीच आहे मुळी ! ती लौकीकचीही नाही. तु म्हणतोस त्याप्रमाणे कथेत शेवटी शोणला त्याच्या पायावर उभे करुन लौकीकला स्वतःचा मार्ग निवडता आलाही असता. पण मग तो नेहमीप्रमाणेच गुडी गुडी असा शेवट झाला असता. काही गोष्टी भविष्यावर सोडायच्या असतात. प्रत्येक गोष्टीला पुर्ण करणे आपल्या हातात असेलच असे नाही. आणि तशी ती असतेच असेही नाही.
ही कथा आहे एका माणसाची जो स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थापायी (शोणचे आयुष्य हा लौकीकचा वैयक्तिक स्वार्थच नव्हे का?) आपणच अंगिकारलेले माणुसकीचे, समाजसेवेचे कार्य सोडता झाला आहे. शोणहे प्रतिक आहे, आयुष्यात येणार्‍या समस्यांचे. आपण एका समस्येच्या पाठीमागे लागुन बाकी सर्व विसरुन जातात.
शेवटी गोविंदकाका लौकीकला तेच समजावतात. समस्येपासुन पळ तर काढायचा नाही, पण तिथेच अडकुनही बसायचे नाही. त्या समस्येला सामोरे जातानाच आपले समाजाप्रती असलेले कर्तव्यही पार पाडायचे. दोन्ही गोष्टी सोप्या नसतील पण अशक्य मुळीच नाहीत. शोण बरा होईल न होइल हा भविष्यकाळाचा भाग झाला. पण त्यासाठी आज ज्या इतरही अनेक शोणना लौकीकची गरक आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करणे अयोग्यच नाही का? लौकीकच्या शोणची योग्य ती काळजी, उपचार यांची ग्वाही गोविंदकाकांनी दिलीच आहे.
आता लौकीक निश्चिंत मनाने आपले कार्य करु शकतो, नव्हे ते करायला तो सिद्ध झाला आहे. माझ्या दृष्टीने हाच कथेचा परिपुर्ण शेवट आहे. चुभुदेघे. Happy

***********************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे!

विशाल, कथा सुंदर आहे. पण शेवटाला धप्पकन संपल्यासारखी वाटतेय, मला. तू म्हणतोयस तसा कथेचा फोकस वाटत नाहीये. म्हणजे वरवर दिसणारी लौकिक आणि शोणची कथा, मुळात त्यांची नाही... हे जितकं स्पष्टं व्हायला हवं तितकं मला दिसत नाहीये.. त्यामुळे अ‍ॅबरप्टली संपल्यासारखी वाटत असेल.
पण, एक सशक्तं कथाबीज छान हाताळलयस, त्यातल्या नाजुक विषय अन गुंत्यांसह.

विशाल, कथा नेहमीसारखी सुंदर झाली नाहीये. बरेच संदर्भ कथेमध्ये पुन्हा पुन्हा आले आहेत. शेवट सुद्धा तुटक झाल्यासारखा वाटतोय. एखादं नावडीचं काम उरकून टाकल्यासारखी झालीये कथा..... पुन्हा एकदा तुझा सफाईदार हात फिरवशील का कथेवरून??

विशाल ते बरोबर आहे. एका समस्येच्या मागे आपण लागतो व इतर विसरून जातो. आपले मूळ उद्दिष्ट बाजुला
राहते असे होते. एक संभ्रमित अवस्था असते. आणी वस्तुस्थीती निराळीच असते. जाणारा माणुस एका वलयात
राहतो व उरलेला कायम परिस्थितीशी झगडत राहतो, कमी पडतो, त्या मुळे खंत करतो. असे का? नव्या दिवसाचे
एक नवीन साहस म्हणून स्वागत केले पाहिजे. माझ्या मुलीने मला तिच्या भावी आयुष्याचे स्वप्न सान्गितले पण
त्यात मला स्थान नाही. माझे आयुष्य मला आज आत्ताच जगले पाहिजे. हे मला कळले. वाइट वाट्ले पण तेच खरे आहे. गोष्ट पट्ली हो. एकटे पालक बा. फ. वर टाकण्या सारखी आहे.

कथाबीज आणि तुझी शैली, आवडेश !
पण शेवट मलाही घाईत गुंडाळल्यासारखा वाटला.

आवडली कथा..
थोडी घाई वाटली, पण तरीही छान..

शोण नावाबद्दल तर आभारच! Happy किती दिवसांनी आलं हे नाव समोर.. कर्णाचा भाऊ तो मृत्युंजय मधे तर इतका गोड रंगवलाय! असो.. विषयांतर झाले !

www.bhagyashree.co.cc/

छान लिहिलं अहेस.. आवडलं.
----------------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

छान जमलीय कथा..... आवडली...... कल्पना

छानच आहे कथा........आवडली.