आत्म्याचा भूगोल

Submitted by pkarandikar50 on 1 January, 2008 - 02:43

आत्म्याचा भूगोल

अक्षांश, रेखांश, समजले का तुम्हाला?
सगळी वृत्ते, प्रदेश, अंश, कोन?

स्वप्नांच्या अन्कुरांची नवी नव्हाळी,
फूल-पानांवरची शिरशिर झावळी?
निबिड काळी निब्बर बांडगुळी?
अवहेलणारी लांब लोचट पाल्हाळी?
. . . . सारे, सारे, ठाऊक झाले तुम्हाला?

खोल गुहा, गूढ दर्‍या, विवरे,
मेघवेधित उन्मत्त शिखरे
अफाट रेताडे, ओऍसिसचे चकवे
अल्लड निर्झर, शांत सफेद किनारे,
ते डोह, झाडीत लपलेली सरोवरे,
नदीकाठचे घाट, ती कपारे . . . .
. . . . सगळ्यांच्या नोंदी टिपल्यात ?

कुठे संपतात सीमारेषा?
कुठे व्हायचा बेडापार?
कधी संपणार मोहीम?
काय लागणार हाती?
. . . . सगळा गृहपाठ करून झाला?

भाग्यवान आहात!

-बापू

गुलमोहर: 

आवडली बापू कविता . तसा गृहपाठ होणारा आहे का?

खर्‍या अर्थाने गृहपाठ "होतो" तेव्हा दाखवायला आपणच रहात नाही.... शाळाच संपलेली असते, नाही बापू?
सुंदर कविता.....
ही वाचली आणि कबीराचा 'मन तू पार उतर कहा जै हो?' आठवला.....

धन्यवाद. गृहपाठ झाला की घर सोडायचे आणि शाळेत जायचे. घर सुटते, शाळा निरंतर असते. असे मला अभिप्रेत होते. असो. एकूण अर्थ तोच. कबीराचा दोहा मी वाचलेला नाही. प्लीज पाठवशील?
बापू.

खरंच आयुष्य असंच असतं नाही......बापु, तुम्हाला हे सुचलं...तुम्ही भाग्यवान आहात!

धन्यवाद.
नव्या वर्षाच्या शुभेच्छा.
मी 'भाग्यवान' एव्हढ्या पुरताच की मला अशी दिलखुलास दाद मिळाली.
-बापू

कुठे संपतात सीमारेषा?
कुठे व्हायचा बेडापार?
कधी संपणार मोहीम?
काय लागणार हाती?
. . . . सगळा गृहपाठ करून झाला?

भाग्यवान आहात!

आवडले.