डॉ. प्रकाश आमटे यांच्याबरोबर काम करण्यासाठी श्री. विलास मनोहर १९७५ साली हेमलकशाला दाखल झाले. प्रकल्प सुरू होऊन वर्ष झालं होतं. दारिद्र्य, अज्ञान यांमुळे त्या भागात वन्यप्राण्यांची भरपूर शिकार होत असे. प्रकल्पावरच्या दवाखान्यात येणारे आदिवासी प्राणी मारल्यावर त्यांची पिल्लं प्रकाशकाकांना आणून देत. या अनाथ पिल्लांचा संभाळ प्रकाशकाका व विलासकाकांनी केला. बिबट्या, सिंह, मगरी, साप, हरणं, घुबड, सर्पगरुड, माकडं, अस्वलं, सायाळ, नीलगायी असे असंख्य प्राणी प्रकल्पावरचे रहिवासी झाले. प्रकाशकाका, विलासकाका यांनी या प्राण्यांना भरपूर प्रेम दिलं, आणि त्याहून कितीतरी जास्त प्रेम या प्राण्यांनी या दोघांवर केलं. प्रकाशकाकांचे अनिकेत, आरती आणि विलासकाकांचे अजिंक्य, मोक्षा या प्राण्यांबरोबरच मोठे झाले. प्रकल्पावर राहणार्या समस्त प्राण्यांना प्रकाशकाका, विलासकाकांची भाषा समजते, स्पर्श समजतो, यातंच काय ते आलं..
माडिया आदिवासींच्या भाषेत बिबट्या म्हणजे 'नेगल'. १९८३ साली एक माडिया आदिवासी प्रकल्पावर बिबट्याची दोन पिल्लं घेऊन आला. एक नर आणि एक मादी. मादी गेली, नर जगला. तोच हा नेगल. नेगल आरतीबरोबर वाढला. प्रकल्पावर सर्वांना त्यानं जीव लावला. 'नेगल' ही प्रकल्पावर वाढलेल्या नेगल-नेगली, हेमल, राजा, राणी अस्वल, मुन्ना पँथर, बबली माकडीण, बेन, लुसी या सार्यांची आणि त्यांना जिव्हाळा देणार्या प्रकल्पावरील सर्वांची लोकविलक्षण गोष्ट आहे.
'नेगल'चा पहिला भाग १९९१ साली प्रकाशित झाला, आणि असंख्य वाचकांनी या अनुभवकथनाचं भरभरून कौतुक केलं. पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. २००३ साली श्री. विलास मनोहर यांनी 'नेगल'चा दुसरा भाग लिहिला. हा दुसरा भागही तितकाच रंजक व हृद्यस्पर्शी आहे. या दोन्ही पुस्तकांतील ही काही पानं..

जुलै महिन्यात नेगल खरा वाढला. जुलैअखेरीला तो चौदा किलो वजनाचा झाला. आता त्याला उचलून घेणे कठीण होऊ लागले. पण तो फार चांगला खेळत असे. कधी नखे काढत नसे. चिडला तरच नखे लागत होती. पावसाळा सुरू झाला होता, व शेतीची कामे सगळीकडे सुरू झाल्यामुळे बाहेर फिरण्यास नेणे बंद केले होते. सकाळी बगीच्यात तो मोकळाच असे. दिवसभर नेगल प्रकाशच्या घरी एका खोलीत बंद असे. प्रकाश दुपारी आरतीला घेऊन खोलीत बराच वेळ राहात होता. आरती मांडीवर व नेगल बाजूला बसून खेळे. आरतीवरील त्याचे प्रेम वाढत होते. आरतीला लहानपणी त्याची काहीच भीती वाटत नव्हती. ती आरामात त्याचा कान ओढ, तोंडात हात घाल, किंवा चक्क पाठीवर बसवून घोडा कर, असे खेळू लागली. तिने काही हाल केले तरी नेगल सहन करत होता.
त्याचे खाणे चांगले वाढले होते. रोजच मटण देत होतो. जवळपास बैल, रेडा मेला तर मटण आणून फ्रिजमध्ये भरत होतो. आमचा सहकारी मुकुंद दीक्षित लाहिरीला दवाखाना चालवत होता. तोही मदत करत असे. महिन्या-दोन महिन्यांत एकदातरी पंधरा ते वीस किलो मटण तो कोणाबरोबर पाठवत होता. गुरे-ढोरे कोठेतरी मरतच असत. आम्ही कोठी-हिंदूर गावात डुकरे वाढवत होतो. काहीच नाही तर डुक्कर विकत घेऊन कापत होतो. सुरुवातीला चामडे टाकून देत होतो. आतडीपण घेत नव्हतो. जुलै महिन्यात दोन-चार दिवस नेगलने नीट खाल्ले नाही. त्याला जंत झाले असतील म्हणून गोळ्या दिल्या. नेगल इतका गरीब होता की तो प्रकाशच्या हाताने खात असे. मटणाचा एक एक तुकडा तो त्याला देत असे. त्यामुळे कोणतेही औषध देणे सोपे होते. मटणाच्या मोठ्या तुकड्यात औषधाची गोळी लपवून देत होतो. पॅंथर सर्वसाधारण मटण चावत नाहीत, गिळतात. हाडे चावून बारीक करतात व गिळतात. मानेची, गुडघ्याची, मांडीची हाडे चघळून टाकतात. बाकी सर्व हाडे खातात. त्यांची पचविण्याची शक्ती इतकी जबरदस्त असते की दुसर्या दिवशी हाडांची पांढरी पांढरी पावडर परसाकडण्यात सापडते. पुढे नेगलचे दात पिवळे दिसत. लहानपणी मटण न मिळणे व बकरीचे दूध याचा हा परिणाम असावा. नेगलला व्हिटॅमिनच्या गोळ्या देण्यापेक्षा कातडे, आतडी, हाडे भरपूर प्रमाणात देऊ लागलो. ह्यात आमचाही फायदा होता. डुक्कर-बकरीमधील बराच भाग वाया जात होता. तोपण उपयोगी येऊ लागला. केसासकट कातडी खाल्ल्याने त्याला परसाकडणेही साफ होऊ लागले.

रोज त्याला सकाळी बगीच्यात सोडले म्हणजे दोन-तीन तास तो खेळत असे. झाडावर चढणे व उड्या मारून त्यांच्या फांद्या तोडणे हा त्याचा आवडता खेळ होता. लपून बसणे व शाळेची मुले तेथून जाऊ लागली की त्यांचा पाठलाग करणे हेही सुरू असे. तो अंगावर आला की नुसते उभे राहिले तरी तो पायांना पायाचा विळखा घालत असे व परत जात असे. हे माहित असून कुणी उभे न राहता पळत. समोरचा आपल्या पायांतून सुटणार असे वाटले की पकडीसाठी नखे आपोआप बाहेर येतस. मग कपडे फाटणे, नख लागून ओरखडा येणे, रक्त येणे, हे प्रकार सुरू झाले. पुढे सकाळी कोणीच बगीच्याकडे फिरकत नसत. तासभर बगीच्यात मनसोक्त खेळून झाले म्हणजे नेगल माझ्या अंगणात येई. पेरूचे व आंब्याचे झाड त्याचे आवडते होते. तेथून तो बाजूला पपईच्या झाडावरून माझ्या घराच्या खिडकीत येई. रेणुकाशी त्याची चांगली ओळख होती, ही आपल्याला घाबरत नाही हे पण त्याला माहीत होते. खिडकीत बसून तो रेणुका कोठे आहे ह्याचा अंदाज घेई. तेथून ओट्यावर येत असे. रेणुका त्याला एका भांड्यात पाणी देत असे. थोडे पिऊन, बाकीचे सांडून तो खाली उतरत असे. जमले तर रेणुकाची खोडी काढत असे. ती सावध असली तरी तिच्याजवळ घुटमळत असे. एकदा तिने डोक्यावर थोपटले की बाजूच्या खोलीत जाई. पलंगाखाली त्याची म्हणून एक उशी ठेवली होती. ती तोंडात घेऊन नेगलसाहेब पलंगावर चढत. ती उशी बरेच वेळा त्याने फाडली होती, व रेणुकाने परत परत शिवली होती. पलंगावर लांबलचक पसरून तो थोडासा लोळे. गाद्या किंवा इतर उश्या त्याने कधीच फारशा फाडल्या नाहीत. तेथेच आरशाचे कपाट होते. त्या आरशात रोज बघे. आरशातील स्वत:वर डूक धरून दबकत दबकत उडी घेई. तोंड आरशावर शेकले की पलंगाखाली बसून पंज्याने तोंड घासत असे व मागच्या दरवाज्याने मागील व्हरांड्यात येई. मी घरात असलो तरी मागील व्हरांड्यात बसत असे. माझ्यामागून येऊन मिठी मारणे त्याला खूप आवडे. त्याचे दोन्ही पाय पकडून खाली पाडले की तो तेथेच पसरत असे. मी कंगव्याने त्याचे केस विंचरून देत असे. तो खूप खुषीत पडून राही. माझ्या घराच्या मागेच हरणाचा मोठा पिंजरा आहे. व्हरांड्यातून पिंजर्यातील हरणांकडे, नीलगायीकडे बघे. चटकन दोन्ही कान मागे पाडून दबत दबत पिंजर्याकडे जाऊन जाळीवर उडी घेई. तेथून गोडाऊनच्या मागे जाई. तेथे काजूची झाडे लावली आहेत तेथे, किंवा तेथून गॅरेजमागे जाई. तेथे आमची बोडी म्हणजे छोटासा तलाव आहे. पावसाळ्यात तेथे बेडूक असत. ते पटापटा उड्या मारत. त्यांच्यामागे धावे. तोपर्यंत मी, दादा, प्रकाश त्याची शेपूट शरून त्याला सांगत असू, चला, तुमच्या फिरण्याची सीमा झाली. तो मग नाराजीने खोलीकडे चालू लागे.
जुलै महिन्यात नेगल सोळा किलोंचा झाला. त्याला उचलून काट्यावर उभे राहून वजन करत होतो. दुपारी त्याच्या खोलीत गेलो म्हणजे तो अंगावर येत असे. मला धरून पाडण्याचा प्रयत्न तो नेहमी करे. अर्थात चावणे, ओरबाडणे हा प्रकार नव्हता. काही असले तरी प्रकाशशी तो नेहमीच हळुवारपणे खेळत असे. माझ्याशी त्याची दांडगाई जास्त होती.
जुलैच्या २० तारखेला प्रकाशला वरोरा येथे जावे लागले. नेगल मोठा झाला होता. मी, दादा व मनोहर, तिघे त्याच्या ओळखीचे होतो. रोज सकाळी त्याला बाहेर सोडावे लागे. एकदा बगीच्यात गेला की दोन तास लांबूनही त्याच्यावर लक्ष ठेवले तरी चाले. सोडताना शेपूट धरून बाहेर काढले तर बरे राही. नाहीतर घरात घुसून तो काहीतरी उद्योग करत असे. परत बंद करताना शेपूट धरून इकडे तिकडे न जाता तो खोलीतच जातो हे पाहावे लागे. प्रकाश गेला त्या दिवशी दादाने त्याला खावयास दिले. मटण त्याने खाल्ले. पण थोडे थोडे खात होता. दुसर्या दिवशी मी सकाळी खोलीत गेलो. नेहेमीचे खेळणे झाल्यावर शेपटी धरली तशी तो बाहेर निघाला. बाहेर जाण्याऐवजी तो प्रकाशच्या खोलीत जाऊ लागला. तो इतक्या वेगाने निघाला की मला आवरता आले नाही. शेपूट सुटली. मी मागे धावू लागलो. आता नेगल फाडाफाडी करेल असे वाटले होते. माझ्या आधी तो खोलीत पोचला होता. काही न करता शांतपणे तो इकडे तिकडे पाहत होता. वास घेत होता. तो प्रकाशला शोधत होता.
खोलीभर वास घेत राहिला. आरतीच्या पलंगाकडे गेला. वास घेऊन उभा राहिला. मी मागून गेलो. शेपटी धरली. चल, नेगल, प्रकाश गावाला गेला आहे, आठवड्यात परत येईल, असे म्हटले. त्याच्या डोक्यावर थोपटले. एकदा माझ्या पायाला डोके घासून त्याने वर पाहिले. नजरेत नाराजी होती. पण तो शांतपणे वळला व गडबड न करता सावकाश बगीच्यात गेला. नेगलचे प्रकाशवरील प्रेम व त्याला बोललेलेसुद्धा समजते याचा प्रथम अनुभव तेव्हा आला. परत प्रकाश येईपर्यंत तो माझ्याशी प्रेमाने वागला. माझ्या हाताने व्यवस्थित खातही होता. पुढे नेहमीच प्रकाश नसताना त्याने माझ्याशी वागण्यात हा फरक दाखविला आहे. प्रकाशशी ज्या आदराने तो नेहमी वागतो तसेच तो वागत असे.
ऑगस्टच्या १ तारखेला प्रकाश परत आला. आनंदाची गोष्ट म्हणजे तो नेगलसाठी बायको घेऊन आला होता. प्रकाशने साधारण दीड-दोन महिन्यांचे पॅंथरचे पिल्लू आणले होते. मादी होती. तिला माणसांची अजिबात सवय नव्हती. कुठेही आडोसा बघून लपत होती. वरोर्याहून येताना प्रकाश चंद्रपूरला थांबला होता. मागचे पॅंथरचे नर पिल्लू मुंबईला पाठवले होते. पण त्याची बहीण दुसरीकडे पिंजर्यात चंद्रपूरलाच होती. प्रकाश वनसंरक्षक अधिकारी श्री. खेडकरसाहेबांना भेटला. खेडकरसाहेब मागे प्रकल्पावर येऊन गेले होते. त्यांनी प्राणी पाहिले होते. नेगल त्यावेळी लहान होता. प्रकाशने त्यांना सांगितले की नेगल मोठा होत आहे, त्याला जोडीदारीण हवी आहे. एकटा वाढणे चांगले नाही. नाहीतरी सध्या तुमच्याकडे असलेले मादी पॅंथरचे पिल्लू तुम्ही कोणत्यातरी झूमध्ये देणार, तर ते आम्हालाच द्या. खेडकरसाहेबांनी त्यांची अडचण सांगितली. कोणत्याही सरकारी झूला आम्हाला ते सहज देता येईल. पण तुम्हाला दिले तर ते खाजगी व्यक्तीला दिले असे होते. ते कायद्यात बसणार नाही. आपण वर लिहू व मग देईन. पण पुण्या-मुंबईहून परवानगी येईपर्यंत ते पिल्लू बरेच मोठे झाले असते. मग त्याला आम्ही हातही लावू शकलो नसतो. प्रेमाने वागवणे हा आमचा प्रयोग होता. हो-नाही करता प्रकाशने खेडकरसाहेबांना म्हटले की ही मादी पॅंथर सरकारी संपत्ती म्हणून आमच्याकडे राहील. एवढेच नाही तर ती किंवा तिला झालेली पिल्ले तुम्ही, सरकार केव्हाही घेऊन जाऊ शकेल असे मी लिहून देतो. वर शिवाय, हिच्यासाठी कुठलाही खर्च तुम्ही परत घेतानापण आम्ही मागणार नाही असे लिहून देतो. खेडकरसाहेब विचारी आहेत. तसे लिहून घेऊन त्यांनी मादी प्रकाशला देऊन टाकली. तीच ती ’नेगली’. आजही ती आमच्याजवळ आहे.
प्रथम नेगलपाशी नेगलीला सोडताना भीती वाटत होती. नेगली फक्त तीन किलोची होती. नेगल बारा किलोचा आडदांड होता. प्रकाशने प्रथम हातात घेऊन वास दिला. नेगलने वास घेतला. खोल श्वास घेऊन वर तोंड करून विचार केला. नेगलीला खाली सोडले. नेगलीने तिच्या शेपटीकडून वास घेतला. इतक्या लवकर त्याला ती बायको आहे हे समजले होते का? नेगली चटकन तेथील कपाटाखाली जाऊन लपली. थोडावेळ आम्ही खोलीत बसून राहिलो. नेगली दोनदा बाहेर आली. पण नेगलने कधीच तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला नाही.
खोलीचा दरवाजा बंद केला तरी त्या खोलीची एक खिडकी प्रकाशच्या घराच्या दुसर्या खोलीत उघडणारी होती. मोठी जाळी बसवून खिडकी बंद केली तरी ती उघडीच असे. पलीकडे प्रकाशचा पलंग होता. तेथून प्रकाश पाहू शकत होता. संध्याकाळपर्यंत नेगली बरेच वेळा बाहेर आली. दोनदा आपणहून नेगलपाशी गेली. पण नेगलने वास घेण्यापुढे काही केले नाही.
दुसर्या दिवशी नेगलबरोबर नेगलीला बगीच्यात सोडले. सर्व विधी तिने बगीच्यात केले. अशी सवय लागली तर बरेच होईल, व तशी सवय लागलीपण. बगीच्यातून आल्यावर प्रकाश मटणाच्या ताटल्या घेऊन खोलीत गेला. आम्हीपण होतो. नेगल नेहमीप्रमाणे शांत होता. नेगली नुसत्या वासावर इतक्या जोराने कपाटाखालून बाहेर आली, व तिने प्रकाशवर झडप घालून ताटलीच खाली पाडली. सांडलेले मटणाचे तुकडे गुरगुरत तिने खाण्यास सुरुवात केली. पूर्वी हिला मटण खूपच कमी मिळत असावे. हा प्रकार आम्हाला नवीन होता. त्या गुरगुरण्याने नेगलही थोडासा घाबरला होता. नेगलीने स्वतःचे मटण संपवले व नेगलच्या ताटलीकडे ती निघाली. अजूनही गुरगुरतच होती. गंमत म्हणून आम्ही बाजूला उभे राहून पाहत होतो. गुरगुरण्याला घाबरून नेगल बाजूला झाला. चला, नेगलपासून तिला काही भीती नव्हती! थोडेसे मटण खाऊन ती बाजूला झाली. कोपर्यात बसून पाय तोंडावर घासून साफ करू लागली. एका दृष्टीने बरे झाले. तिचा कोटा तरी समजला. तोंड साफ करता करता ती झोपी गेली. मग नेगलने प्रकाशकडे मागून घेऊन मटण खाल्ले. दुसर्या दिवशीपासून नेगलीचे मटण वाढवले. पुढे प्रकाश नेगलीला आधी आत जाऊन धरून ठेवत असे, व मग मी, दादा ताटली घेऊन आत जात होतो. एका कोपर्यात ताटली ठेवली की प्रकाश तिला आत सोडत असे. ती रागाने जाऊन पायाने ताटली धरून ठेवून खात असे. असे तिने चांगले महिनाभर केले. तिची तब्येत चांगली सुधारली. एका महिन्यात तिचे चार किलो वजन वाढले. पुढे, आपल्याला भरपूर मटण मिळते ही खात्री झाल्यावर ती शांत झाली. पण खात असताना तिने कधी आम्हांला जवळ येऊ दिले नाही. ऑगस्ट महिना चांगला गेला. नेगली अंगाला हात लावू देत होती. पण फारशी जवळ येत नसे. त्या उलट नेगलला कायम कोणीतरी जवळ हवे असे. मांडीवर बसणे, मागून गळ्यात हात (पाय) टाकून डोक्यावरचे केस खाणे, असे त्याचे सतत चालू असे.
*
भारत जोडो अभियान चालू असताना फेब्रुवारी १९८६ला मला धक्कादायक बातमी समजली. जानेवारी १९८६च्या २० तारखेला साप चावून नेगलचा मृत्यू झाला. रडू येणं क्रमप्राप्त होतो. पण मी मनाने खूप खचून गेलो. नेगलीचे काय होईल ही काळजी होती. प्रकाशच्या मनाची कल्पना फक्त मला व नेगलीला येऊ शकत होती. पुढे पुढे शक्यतो मनात हा विचार येऊ न देण्याचा प्रयत्न तेवढा मी करत होतो. पण ते शक्य नव्हते.
एप्रिल १९८६च्या शेवटी अभियान संपवून मी परत हेमलकसा येथे आलो. वाटेत नेगलीला राजा नावाचा साथीदार मिळाला आहे, हे समजल्याने आनंद झाला. हेमलकशाला आल्यावर सुरुवातीलाच नेगलीकडे जाण्याचे मुद्दाम टाळले. आधी हरणे, नीलगाय, राणी अस्वल, राजू माकड, हेला यांना भेटून शेवटी मी आणि प्रकाश नेगलीकडे गेलो. नवीन आलेल्या राजा पँथरला समोरच्या मोठ्या खोलीत बंद करून मधल्या खोलीत गेलो. नेगली चटकन आली. करुण नजरेने पाहत उभी राहिली. मला काय वाटते ते तिला सांगण्याची गरजच नव्हती. समोरच्या मधल्या दरवाज्याच्या जाळीतून राजा माझ्याकडे उत्सुकतेने पाहत होता. गजातून हात घालून प्रकाश त्याला लाडावत होता. मी कल्पना केली होती त्यापेक्षा राजा चांगला मोठा होता. दुधाचे सुळे पडून त्याला नवीन पक्के सुळे आलेले दिसत होते. निदान दीड वर्षांचा तरी असावा असे वाटत होते. दोघांच्याही मनांत नेगलबद्दलच विचार असूनही मी व प्रकाश तो विषय मात्र काढण्याचे टाळत होतो. हे दोघांबरोबरच नेगलीलाही माहीत होते.
मी ८ डिसेंबरला नेगलला भेटून गेलो होतो. ती शेवटची भेट आहे असे त्यावेळी वाटले नव्हते. अजूनही ती त्याची नजर डोळ्यासमोर येते. प्रकाशकडून समजले की नेगल वारला त्या दिवशी नेमका प्रकाशपण प्रकल्पावर नव्हता. साप चावल्यावर लगेच इलाज होऊ शकला नाही. प्रकाश असता तर निदान काही प्रयत्न तरी झाले असते. अर्थात या सर्व जरतरच्या गोष्टी होत्या. त्याचवेळी आलापल्ली येथे जिल्हा वनाधिकारी सिंग यांच्याकडे घरी ठेवलेला एक नर पँथर होता, व त्याला घरात ठेवणे जड जात असल्याने तो कोणत्या तरी झूमध्ये देण्याच्या विचारात ते होते. त्यामुळे प्रकाशने विचारणा करण्याआधी त्यांनीच प्रकाशला पँथर देण्याचे ठरवून २६-१-८६ रोजी स्वतःहून पॅंथर आमच्याकडे आणून पोचवला. म्हणजे नेगली फक्त सोळा दिवस एकटी होती. आलापल्लीला राजा पिंजर्यात असे. फक्त रोज काही वेळ जाड साखळी व दोर लावून त्याला बाहेर काढत होते. आमच्याकडे आला तेव्हा तो चांगला अकरा महिन्यांचा होता. प्रकाशबरोबर काही तासांतच त्याची दोस्ती झाली. दोन दिवसांत नेगलीनेपण आपला नवीन साथीदार म्हणून त्याचा स्वीकार केला.
वन्यप्राण्यांशी कसे वागावे हे प्रकाशकडूनच शिकावे. इतक्या मोठ्या पँथरबरोबर तो इतक्या सहजतेने दोस्ती करू शकतो त्यावरून त्याच्याजवळ काही दैवी शक्ती आहे, असे इतर कोणी म्हणोत, पण तो प्राण्यांवर सहजतेने प्रेम करतो, त्यामुळेच केवळ कितीही क्रूर प्राणी त्याला आपला समजू लागतात, हेच खरे. निदान माझा तरी तसा पक्का विश्वास आहे. आज चौदा वर्षं मी त्याच्याबरोबर प्राण्यांच्या संगतीत आहे. पण इतक्या मनापासून मीही प्राण्यांवर प्रेम करू शकत नाही, हे खरे. प्राण्यांबरोबर वागताना काय करावे हे तो अनेकदा मला समजावून देत आला आहे. नेगल-नेगलीबरोबर वावरताना त्यांच्यावरील विश्वासाइतकाच, किंबहुना त्यापेक्षा अधिक विश्वास प्रकाश माझ्याबरोबर आहे, यामुळे वाटत होता. पुढे राजाबरोबर दोस्ती करण्याचा मी प्रयत्न केला. पण मी कमी पडलो. एकतर पिंजर्यात गेलो की मला नेगलची आठवण येत असे. आणि त्याचवेळी माझ्या उपस्थितीबद्दल राजा साशंक आहे, हे मला त्याच्या नजरेवरून जाणवत राही. बरं, प्रत्येक कृतीत मी राजाची नेगलबरोबर तुलना करत आलो. तेथेच सर्व चुकत गेले. आता इतरांसारखा मीपण बाहेरूनच राजावर प्रेम करणारा झालो आहे.
***

जून २६ला नेगली तिसर्यांदा बाळंत झाली. ह्या वेळीही तिनं एक नर व एक मादी बच्चा दिला होता. राजा पँथर व सिंह माझ्या निकटचे कधी झाले नाहीत; पण अगदी आजही नेगलीच्या वृत्तीत काही फरक पडलेला नाही. पहिल्या दोन बाळंतपणांमुळे तिचा आम्हा दोघांवरील विश्वास अधिक वाढला असावा. सिंह व राजा पँथर ह्यांना पिंजर्यात समोरच्या मोठ्या हॉलमध्ये बंद करून प्रकाश, मी, नेगली व तिचे दोन बच्चे एकत्र मागच्या दोन खोल्यांत बराच वेळ राहत होतो.
मी आठव्या दिवशी बच्च्यांना हातानं मटण भरवलं तरी तिनं नाराजी दाखवली नाही. प्रकाशच्या मांडीवर लोळत, लाड करून घेत ती फक्त माझ्यावर आणि बच्च्यांवर लक्ष ठेवून असे. आम्ही तिच्या बच्च्यांना काही अपायकारक खाऊ घालणार नाही ह्याची तिला खात्री असावी. नेगल असताना काही वर्षं नेगलीला बच्चे कधी होतील ह्या काळजीत आम्ही होतो. आता, हिला दरवर्षी पिल्लं झाली तर काय करावं ह्याची काळजी आम्हाला लागली होती. बच्चे दोन-तीन महिन्यांचे झाले की ह्यांना कोठे द्यावं ही काळजी होतीच आणि बाळंतपणानं नेगलीची प्रकृती खराब होईल ही काळजीदेखील सतावत होती. अर्थात बच्चे झाले की आनंद होत होता, त्यांच्याबरोबर पिंजर्यात जास्त वेळ घालवत होतो, तो भाग वेगळा.
पिंजर्यात बसल्यावरही ह्याच विषयावर आमची चर्चा होत असे. 'हम दो हमारे दो' हे माणसांसाठी ठीक आहे, पण नेगलीनं तर 'हम दो हमारे हर साल दो' असं सुरू केलं होतं, त्याचं काय? बोलता बोलता प्रकाश म्हणाला, "अरे, राजा पँथरचं ऑपरेशन केलं तर..?" अरेच्चा, खरंच की.. दवाखान्यात आम्ही संततिनियमनाच्या शस्त्रक्रिया करत होतोच! त्यासंबंधी माहिती गोळा करण्यासाठी पत्रं पाठवली.
नेगलीचं पहिलं बाळंतपण लाकडी कॉटला पाट्या मारून केलेल्या लाकडी गुहेत झालं होतं. नंतर पिंजर्याच्या शेवटच्या खोलीत विटा-सिमेंटनं पक्की गुहा बांधून घेतली होती. त्यानंतरची दोन बाळंतपणं तिथं पार पडली. आता चौथ्या बाळंतपणासाठी सर्व पिंजर्याला रंगसफेदी करून घेतली. शेवटच्या खोलीत जुनी वाळू काढून नवीन वाळू पसरून घेतली. ह्या तिसर्या खोलीत ऊन येण्यासाठी वरून जाळी आहे, त्यावर वाढलेला वेल व बाजूची झाडं थोडी छाटून भरपूर ऊन येईल अशी व्यवस्था केली. पिंजर्याचे खोल्यांमधील तिन्ही सरकते दरवाजे नीट करून घेतले. काहीही झालं तरी नेगलीचं हे शेवटचं बाळंतपण असं ठरवून टाकलं. दोन महिने वाट पाहून डॉ. वाटवे आले नाही तरी राजा पँथरची शस्त्रक्रिया करायची हेही ठरवलं.
एकदा पिंजर्यात बसून गप्पा मारत असताना मी विचारलं, "प्रकाश, नेगलीला माला डी गोळ्या दिल्या तर?" प्रकाशनं हसून संमती दिली. पूर्वी प्रकल्पावर आलेल्या एका स्विडीश बाईला त्या संबंधात अधिक माहिती हवी, असं पत्रही पाठवलं. नेगलीची काळजी वाटत नव्हती. आधीच्या तीन बाळंतपणांत ती उत्तम आई आहे हे तिनं सिद्ध केलं होतं.
प्रकाशबरोबर माझ्याही पिंजर्यातील फेर्या वाढल्या. राजा सिंहाला पुढच्या पिंजर्यात बंद करून नेगलीला निवडक मांस देऊ लागलो. मार्चच्या सुरुवातीला नेगली काहीशी शांत वाटू लागली. गेल्या दोन वेळच्या मानानं पोट मोठं वाटत नव्हतं. तिचं खाणं कमी झाल्यासारखं वाटत होतं. सकाळी तिच्या डोळ्याला चिपड आल्यासारखं वाटे.
आम्ही रोज चार-पाच वेळा पिंजर्यात जाऊन नेगलीला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. तिच्या आठ स्तनांपैकी सात स्तन मोठे झाले होते. मागच्या बाळंतपणात एका बच्च्याचा दात लागून एका स्तनाला जखम झाली होती. ह्या वेळी नेगलीला एकच बच्चा होईल असं वाटत होतं, कारण पोट फार मोठं दिसत नव्हतं. आता, २००२मध्ये आमच्याकडे सोनोग्राफी मशीन आहे. त्यावेळी असतं तर मला खात्री आहे की, आम्ही नेगलीला दवाखान्यात नेऊन सारं काही व्यवस्थित आहे हे पाहिलं असतं. पण त्यावेळी तर हेमलकशाला साधी वीजही नव्हती. 'फॉल्स प्रेग्नन्सी' असा प्रकार स्त्रियांत आढळतो. तो प्राण्यांत असेल का, अशी शंकाही आली. प्रकाशने तिचे स्तन दाबून पाहिले. त्यातून चिकट द्रव येत होता. इतर वेळी येत नाही, म्हणजे ती नक्की प्रेग्नंट होती. मागे जेव्हा जेव्हा नेगली बाळंत होई त्यावेळी आलेल्या पाहुण्यांना प्रकाश नेगलीचं दूध काढून दाखवत असे. आम्ही एकदा त्याची चव घेतली आहे. मागे एकदा एकानं पृथक्करण करण्यासाठी चांगलं चमचाभर दूधही नेलं होतं, पण त्याचा रिपोर्ट आजतागायत मिळालेला नाही.
नेगली परत दोन बच्चे देईल का? त्या बच्च्यांना कोठे द्यावं? बाळंतपणाआधी असे नाना प्रश्न समोर होते. दुसर्या बाळंतपणाचे दोन्ही बच्चे नागपूर झू व सेमीनरी हिल्स येथे होते. ते मरण पावले असं समजलं होतं. नंतरचे दोन बच्चे कोणी सांगत की मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आहेत, तर दुसरी बातमी होती की, ताडोबा जंगलात त्यांना मोकळं सोडून दिलं.
शेवटी, नेगली मार्चच्या २४ तारखेला बाळंत झाली. ह्यावेळी तिनं एकच नर बच्चा दिला. तो आजही प्रकल्पावर बाप राजा पँथर व काका सिंह यांच्याबरोबर आहे. बाळंतपण व्यवस्थित पार पडलं. आठव्या दिवशी मी मटणाचे अगदी बारीक तुकडे बच्च्याला खाण्यास दिले, तरी नेगलीनं नाराजी दाखवली नाही. मला तर वाटत होतं, ती स्वतः बाळंतपणाला कंटाळली होती. प्रकाश म्हणाला, आता आपण याला वेगळं वाढवू. फक्त तीन-चार वेळेला दूध पाजण्यापुरतं नेगलीकडे नेत जाऊ.
आम्ही दोघं हे पिंजर्यात बोलत होतो. नेगली बसल्या जागेवरून उठली. मी तिच्या बच्च्याला खिम्याचे अगदी बारीक तुकडे भरवत होतो, तो माझ्या मांडीवर होता. प्रकाशनं हलके शीळ वाजवली. मी समोर पाहिलं. नेगली माझ्याकडे पाहात सरळ माझ्याकडेच येत होती. प्रकाशनं मला सावध केलं म्हणजे तोही तयारीत असणार. मी नेगलीकडे पाहिलं, तिनं कान मागे पाडले नव्हते, अगर ती शेपटीचं टोकही हलवत नव्हती. कसलीही भीती नव्हती. तरी काही क्षण मी थोडा टेन्स होतो. ती एकटक माझ्या मांडीवरील तिच्या बच्च्याकडे पाहत होती. निदान, आम्ही दोघं काय बोलतो हे नेगलनंतर नेगली समजू शकते हे अनुभवावरून कळलं होतं.
प्रकाशचा विचार तिला समजला की काय? ती माझ्यासमोर उभी राहिली. तिनं खाली वाकून बच्च्याला चाटलं. आमचा अंदाज चुकला. वटलं होतं की, ती बच्च्याला मानेजवळ तोंडात पकडून त्याला गुहेत घेऊन जाईल. ती बच्च्याला चाटून प्रकाशकडे गेली, लाडानं प्रकाशच्या खांद्यावर मान घासू लागली. प्रकाशनं तिला डाव्या हातानं जवळ घेतलं, उजव्या हातानं मानेवर खाजवत तो म्हणाला, 'अगं, तुझ्या चांगल्यासाठीच तर... आम्ही काय तुझ्या बच्च्याचे हाल होऊ देऊ का?'
नेगलीनं प्रकाशचा खांदा चाटला आणि सरळ खाली बसत ती प्रकाशच्या मांडीवर अर्धवट पसरली. यापेक्षा जास्त आनंद मला तरी कधी झाला नव्हता. तिची पूर्ण संमती होती तर. त्याच दिवशी आम्ही पिल्लाला बाहेर आणलं. अनू-मोक्षा-जिंकू-आरतीला तर काय करू, काय नको असं झालं. त्या दिवशी मुलांनी शाळेला दांडी मारली. पॅंथरचा जिवंत बच्चा खेळणं म्हणून कोणा महाराजाच्या मुलांना मिळाला नसेल. त्यांनी त्याचं नाव मुन्ना ठेवलं. पुढे त्याला रंगू नाव मिळालं, त्याची गोष्ट पुढे येईलच.
ह्या मुन्नाला सर्वांत जास्त लळा लावला तो आरतीनं. तो अगदी लहानपणापासून आरतीबरोबर वाढला. आम्ही दोघांनी हाक मारलेली नेगल-नेगलीला समजत असे. त्यापुढे जाऊन आरती जेव्हा 'मुन्ना' म्हणून हाक मारी त्यावेळी मुन्ना आवाज काढून तिच्या हाकेला ओ देत असे. दहाव्या दिवशी आम्ही त्याला पिंजर्याबाहेर काढला, जवळजवळ दोन महिने दिवसातून तीन वेळा दूध पिण्यासाठी त्याच्या आईकडे - नेगलीकडे- सोडत होतो. तो पहिले पंधरा दिवस रात्री नेगलीजवळ राहत असे, पुढे रात्री झोपण्यासाठी तो आरतीच्या जवळ येई. तो उन्हाळ्यात अंगणात कॉटवरच असे. मुन्ना चार महिन्यांचा असताना उपवनसंरक्षक रावसाहेबांनी त्याला स्वतःच्या घरी ठेवण्यासाठी मागितला. आम्ही देण्यास तयार होतो, कारण अजून राजा पँथरची शस्त्रक्रिया झालेली नव्हती. ते दोनदा बायको-मुलांबरोबर येऊन मुन्नाशी दोस्ती करून गेले. पंधरा दिवसांनी त्याला घेऊन जाण्याचंही ठरलं. त्यांनी त्याचं नाव रंगू ठेवणार असं जाहीरही केलं. त्यामुळे आम्ही त्याला रंगू राव या नावानं हाका मारू लागलो. मुलं मुन्ना उर्फ रंगू रावला देण्यास बिलकूल तयार नव्हती. आमच्या मुलांनी बोलणं बंद केलं होतं. त्यांचं प्रेम व इच्छा किती प्रबळ असेल याची प्रचिती आली. नेमकी त्याच आठवड्यात रावसाहेबांची बदली मुंबईला झाली! मुंबईत पँथरचं पिल्लू नेणं शक्य नव्हतं. मुन्ना उर्फ रंगू राव कायमचा आमच्याकडेच राहिला.
त्याचा सारा वेळ आरतीबरोबर जात असे. ती पुढे शाळेत जाऊ लागली तर मुन्नापण तिच्याबरोबर नियमित वर्गात जाऊन बसत असे. आरती दप्तर घेऊन निघाली की हा आधीच पायर्या उतरून तयार असे. आदिवासी मुलांना त्याची सवय झाली होती. आमच्या लोकबिरादरी प्रकल्पाची आश्रमशाळा आहे. शिक्षकही प्रकल्पावर राहत असल्यानं रंगू सर्वांचा लाडका झाला होता. कधीकधी प्रकाशबरोबर किंवा माझ्याबरोबर तो खेळत असे. आरती शाळेत चालत जाई. ती गेली हे लक्षात आल्यावर हा कावराबावरा होत असे. व्हरांड्यात फिरत राही. आरती शाळेतून परत आल्यावर तिच्या अंगावर उड्या मारून तो तिचे हाल करत असे.

तो सकाळी बगीच्यात मुलांबरोबर खेळत असे. व्हरांड्यातील झोपाळ्याचा उजवा कोपरा ही त्याची हक्काची जागा होती. आरतीमुळे त्याला झोपाळ्याचं वेड लागलं होतं. येणार्या काही पाहुण्यांना घरात एक पँथर मोकळा आहे हे माहीत नसे. नवीन पाहुणा झोपाळ्यावर उजव्या कोपर्यात बसला की मला हसू येत असे. आरतीपाठोपाठ मुन्ना घरातून बाहेर येई. त्याची उजव्या कोपर्यातील झोपाळ्यावरची जागा दुसर्या कोणी (म्हणजे आरती, प्रकाश व मी सोडून) घेतलेली तो कसा सहन करणार? त्यात तो व आरती झोपाळ्यामागून येत. मुन्ना झोपाळ्यावर चढून पाहुण्याच्या खांद्यावर पंजा ठेवत असे. मुन्ना बच्चा असला तरी चांगला पंचवीस किलो वजनाचा होता. ती व्यक्ती बेसावधपणी एकतर पँथर पाहून गडबडून उठत असे-पळत असे, नाहीतर धडपडून पळत असे. पूर्वी नेगल पळणार्याचा पाठलाग करत असे, पण मुन्ना सभ्य होता व आहे. तो पाठलाग करत नाही. त्याची हक्काची जागा त्याला मिळाली की तो खूष! नंतर तर आमच्या लक्षात आलं की जिंकू-आरती आधी नवीन माणसाला आग्रहानं झोपाळ्यावर मुन्नाच्या जागी बसवत असत, मग आरती मुन्नाला मागून घेऊन येत असे. बरोबरीच्या मुलांवर, अगर त्यांना अभ्यासाबद्दल विचारणार्यावर ही आफत ओढवत असे. एक चांगलं होतं की मुन्नानं कधी कोणाला दुखापत सोडा, साधं नखही लावलं नाही. म्हणून आम्ही दोघंही आरती-अजिंक्यला रागावलो नाही. मुन्ना कोणाही पाहुण्याला स्वतःबरोबर फोटो काढू देत असे. पण पुढे मुन्ना व मागे पाहुणा त्याच्या पाठीवर हात ठेवून असेच फोटो येत.
आरती तिसरी पास झाल्यावर मात्र मुन्नाला शाळेतून काढून टाकलं. आरतीला मुन्नामुळे कुणी मैत्रिणीच मिळत नव्हत्या. तो आरतीजवळ कोणाला जाऊ देत नसे. मुन्नाच्या खोड्याही वाढल्या होत्या. शिक्षकालाच टेबलावर चढून शिकवण्याची शिक्षा मुनानं तिसर्या वर्गात दोनदा केली होती. अभ्यास कच्चा की बेशिस्त, कशामुळे मुन्नाला शाळा सोडावी लागली ते समजलं नाही. आम्हीही त्याचं ट्रान्सफर सर्टिफिकेट आणायला गेलो नाही. त्याला आई नेगलीकडे ठेऊन आरती शाळेत जाऊ लागली. मुन्ना आरती-मुलांबरोबर मोकळ्यावर वाढल्यानं खोडकर झाला होता. तो पिंजर्यात बापाबरोबर (राजा पँथर) मारामारी करीच. पुढे पुढे, तो सिंहकाकाच्याही खोड्या काढताना दिसे. आम्हांला काळजी वाटे. पण सिंह सभ्य होता, काका होता. तो पुतण्याच्या खोड्या सहन करत असे. पुतण्या मर्यादा ओलांडू लागला की सिंहकाका एका चापटीत त्याला बाजूला करत असे. मग काही वेळ मुन्ना नेगलीच्या मागे मागे असे, नाहीतर बापाजवळ जाऊन शांतपणे पंज्याने तोंड खाजवत राही.
*
एक प्रसिद्ध सर्कसमालक एकदा प्रकल्प पाहण्यास आले होते. प्रकाश पँथरना चाबकाशिवाय सहज हाताळतो ह्याचं त्यांना आश्चर्य वाटलं, त्यांनी त्याचं कौतुक केलं, पण 'जपा हं, ह्याचा काही भरवसा नाही' असं म्हणालेच! नंतर त्यांनी अजगर पाहत असताना त्यांच्या सर्कशीतील एकाला अजगरानं कसं गिळलं, नंतर त्यांनी स्वतः अजगराचं पोट फाडून त्याला बाहेर कसं काढलं ही गोष्ट सांगितली. आम्ही हसलो नाही, वादही घातला नाही, कारण ते चांगले वयस्कर होते, आणि आमचे पाहुणेही होते!
राजा पँथर प्रकाशचा हात कित्येक वेळा जबड्यात धरून ठेवतो. पाहुण्यांचा नेहमी एक प्रश्न ठरलेला असतो. 'काय हो ऽ, तुम्ही ह्या वाघाचे (पँथरचे) दात, सुळे, नखं काढली आहेत का?' प्रकाश त्यांना पंजा हातात घेऊन, हातानं पंजा दाबून बाहेर येणारी नखं दाखवतो. पँथरची नखं नेहमी बाहेर दिसत नाहीत. ती पंज्याच्या कातडीत लपलेली असतात. जरूर तेव्हा ती त्याला बाहेर काढता येतात. प्रकाश हातानं जबडा उघडून पाहुण्यांना सर्व दात व सुळे शाबूत आहेत हेही दाखवतो. अशा वेळी कधीकधी राजा पँथर जबडा घट्ट मिटून घेतो. प्रकाश शांतपणे त्याला दुसर्या हातानं थोपटतो, राजा जबडा उघडून प्रकाशचा हात सोडून देतो. त्याच्या हातावर साधं खरचटलेलं पण नसतं. राजाचा तो खेळ आहे, प्रकाशला इजा करण्याचं त्याच्या मनातही येणार नाही. तरी येणारे सल्ले देत असतात, 'जपा हं. ह्याचा काही भरवसा नाही.' प्रकाश शांतपणे म्हणतो, 'गेली पंचवीस वर्षं मी पिंजर्याआतून लोकांना पँथर दाखवतो. मी समोर जिवंत असताना तुम्ही असं म्हणता. आजकाल दोन पायांच्या प्राण्याचाच भरवसा देता येत नाही.'
------------------------------------------------------------------------------------
नेगल
लेखक - श्री. विलास मनोहर
प्रकाशक - ग्रंथाली
पृष्ठसंख्या - ११३
किंमत - रु. १२०
नेगल (भाग २) - हेमलकशाचे सांगाती
लेखक - श्री. विलास मनोहर
प्रकाशक - ग्रंथाली
पृष्ठसंख्या - ८६
किंमत - रु. १२०
------------------------------------------------------------------------------------
पुस्तकांतील निवडक भाग ग्रंथाली, मुंबई, यांच्या सौजन्याने
टंकलेखन साहाय्य - अंशुमान सोवनी
------------------------------------------------------------------------------------

------------------------------------------------------------------------------------
ही पुस्तके आता मायबोली खरेदी विभागात उपलब्ध आहेत.
नेगल - http://kharedi.maayboli.com/shop/product.php?productid=17127
नेगल : हेमलकाशचे सांगाती - http://kharedi.maayboli.com/shop/product.php?productid=17128
चिन्मय, तु
चिन्मय, तु इथे दिलेली पानं वाचुनच भारावले. आता दोन्ही पुस्तकं वाचल्याशिवाय चैन पडणार नाही.
योग्य प्रतिसाद द्यायला शब्द खुंटतात अशा वेळी.
ही दोन्ही
ही दोन्ही पुस्तके फारच भारी आहेत.. शाळेत असताना नेगल-१ वाचले होते. सध्या ही दोन्ही पुस्तके पुन्हःश्च प्रकाशनात आलेली दिसत आहेत, कारण एका प्रदर्शनात आणि पुस्तकांच्या १-२ दुकानात बघितली.
नेगल-१ फार सुंदर पुस्तक आहे.
नेगल भाग १
नेगल भाग १ वाचला आहे, फार छान आहे. दोन्ही भाग आत्ता भारतातुन घेउन आले. मला पण दोन्ही पुस्तके एका प्रदर्शनात मिळालीत.
मस्त... भारी
मस्त... भारी वाटलं वाचून एकदम...
अमेझिंग !!
अमेझिंग !! नेगलचे दोन्ही भाग घ्यायला हवेत.
~~
स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दु:ख कुणाचे.
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे
वा.. मस्तच...
वा.. मस्तच... !! धन्यवाद चिनुक्स आणि आर्फी.. !
सिंडे भारतातून पुस्तकं आणली आहेस तर पाठव बरं इकडे.. !
चिनूक्स
चिनूक्स धन्यवाद. आता मलाही भारतात गेल्यावर पुस्तकं आणल्याशिवाय चैन पडणार नाही.
मला नक्की आठवत नाही, पण शाळेत असताना नेगल हा धडा होता कां? वाचल्याचं आठवतंय.
शालेत
शालेत असताना चाळीसगावचे Dr. Purnpaatrenchaa धडा होता तो आठवला. सोनाली- रुपालीचा.
आवडलं.
आवडलं.
चाळीसगावच
चाळीसगावचे Dr. Purnpaatrenchaa धडा >>>> अगदी अगदी.. माझे आज्जी आजोबा चाळीसगाव ला असताना पूर्णपात्रे डॉक्टरांच्या शेजारी रहात असतं.. त्यामूळे आज्जी पण सोनाली च्या अश्याच गोष्टी सांगत असते अधे मधे..
हे दोन्ही
हे दोन्ही भाग माझ्या संग्रही आहेत. खुपच सुंदर पुस्तके आहेत ही. आणि मला अभिमान वाटतो ह्यातील रेखाचित्रे रेखाटण्याचे भाग्य माझ्या भावाला (किशोर गोविलकर) लाभले.
एकंदरच
एकंदरच अक्षरवार्ता हा सुंदर उपक्रम आहे. ह्या हेमलकसाशी संबंधित पुस्तकांचा सेट ठाण्याला कुठे मिळेल का?
***************
युद्धकर्ता श्रीरामः मम | समर्थ दत्तगुरु मुलाधारः ||
साचार वानरसैनिकोSहम | रावण वधः निश्चितः ||
इति अनिरुद्ध महावाक्यम |
खुपच
खुपच आवडल्....कधी एकदा वाचते असे झालेय
====================================
कितीक हळवे, कितीक सुंदर, किती शहाणे....आपुले अंतर.....
खुप
खुप छान्.पुस्तक वाचणे क्रमप्राप्त आहे!!
ओह.. काय
ओह.. काय कमाल आहे ही!
पुस्तके घेतल्याशिवाय चैन नाही पडणार आता !
www.bhagyashree.co.cc/
चिन्मय, पुन
चिन्मय,
पुन्हा एकदा धन्यवाद अजून एका चांगल्या पुस्तकाची माहिती करून दिल्याबद्दल.
पुस्तक मिळवणं आवश्यक आहे.
मस्त
मस्त पुस्तके असतील ही. घ्यायला पाहिजेत. धन्यवाद चिन्मय या ओळखीबद्दल.
खूप
खूप वर्षांपूर्वी नेगल वाचलं होतं. खूप छान पुस्तक आहे.
~साक्षी
मस्त ! खरंच
मस्त ! खरंच आश्चर्यकारक आहे हे सगळंच. चिन्मय धन्यवाद..
चिन्मय
चिन्मय धन्यवाद
वाचायलाच हव हे पुस्तक.
ही पुस्तके
ही पुस्तके आता मायबोली खरेदी विभागात उपलब्ध आहेत.
नेगल - http://kharedi.maayboli.com/shop/product.php?productid=17127
नेगल : हेमलकशाचे सांगाती - http://kharedi.maayboli.com/shop/product.php?productid=17128
प्रकाशवाट
प्रकाशवाटा वाचून ह्या पुस्तकांची भर यादीत पडलीय.
ही दोन्ही
ही दोन्ही पुस्तके माझ्या संग्रहात आहेत ...(प्रकाशवाटा देखील )! या पुस्तकांची कितीतरी वेळा पारायणे केली आहेत. पुढच्या भारतवारीत हेमलकसा येथे जायचे ठरवले आहे!!!
सही!!!
सही!!!
हि दोन्ही
हि दोन्ही पुस्तके कुठल्याहि पानापासून वाचायला घ्यावीत अशी आहेत.
सुंदर्!!!भा
सुंदर्!!!भारीच वाटल वाचताना.
~~~~~~~~~~~~~~~~~~
जब जब जगने कर फ़ैलाए
मैने कोष लुटाया
रंक हुआ मै नीज निधी खो कर
जगतीं ने क्या पाया!
भेंट न जिससे में कुछ खोऊं
पर तुम सब कुछ पाओ
तुम ले लो मेरा दान अमर हो जाए।
तुम गा लो मेरा गान अमर हो जाए।
.
.
मस्त सुंदर पुस्तके........
मस्त सुंदर पुस्तके........