काही कामानिमित्त मला उत्तर प्रदेशातील गोरखपूरला जावे लागले. काम आटोपून १ दिवस होता म्हणून जवळच १३४ किमीवरील अयोध्येतही जाऊन यावे असा विचार केला. गोरखपूरहून बस पकडून अयोध्येत पोहोचलो. राममंदिराबद्दल आस्था होती आणि बाबरी कांडाबद्दल बरेच काही ऐकून असल्याने उत्सुकता होतीच.
अयोध्येत पोहोचल्यावर राममंदिराच्या दिशेने जाणारा “रामपथ” पाहिला – अतिशय छान बनवलाय, वॉकिंग ट्रॅकसह! घरांचे अतिक्रमण तोडल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. रस्ता मोठा केल्याचे आवडले. त्यामुळे रहदारीला व परिसराला शोभा आली. २ बॅटरी ऑपरेटेड गाड्या बदलत, कुणाला १० तर कुणाला २० रुपये देत शेवटी मंदिराजवळ पोहोचलो.
आता पुढे मोठं दिव्य होतं. इथपर्यंतचा प्रवास त्रासदायक नव्हता, तेवढं दर्शन महाभयंकर होतं. दुपारी १२ वाजले होते. ऊन कडक होतं. मंदिराकडे मुख्य रस्त्यापासून वळालो. दूरदूरपर्यंत मंदिर किंवा कळस दिसेना. बराच चालून गेल्यावर चप्पल काढायचं लॉकर मिळालं. तिथे चप्पल तर काढली, पण चालायला एक लांबलचक नि रुंद सतरंजी अंथरलेली होती. सतरंजीवर जागा मिळाली तर ठीक, नाहीतर जळणारे पाय घेऊन पळत सुटावं लागलं.
फक्त चप्पल काढण्यासाठीच २००–४०० मीटरचा मोठा U-टर्न ठेवलेला. लोक घामाघूम होऊन चालत होते, पाय जळत होते. पुन्हा बरंच चालल्यावर सिक्युरिटीने सांगितलं – मंदिरात मोबाईल अलाउड नाही (अरे बाबानो, असा बोर्ड आधी लावायचा ना?) मग पुन्हा जिथे चप्पल काढल्या तिकडे लॉकरला मोबाईल ठेवायला यावं लागलं. सिक्युरिटी चेक करून झाल्यावर मंदिराच्या दिशेने निघालो. पुन्हा बरंच चालल्यावर मंदिर एकदाचं आलं.
मला वाटलं होतं – “रामजन्मभूमीचं राममंदिर” किती भव्यदिव्य असेल? पण नाही! जैन मंदिरांसारखं पांढऱ्या फरशीचं मंदिर, बाहेर छोट्या छोट्या मूर्ती, आणि गावातील एखाद्या २ नंबर कमावणाऱ्या माणसाने मंदिर बांधावं इतकंच छोटंसं प्रत्यक्ष राममंदिर होतं. एकतर राममंदिरापर्यंत पोहोचताना अनेक भाविक गळून पडले होते. सुरुवातीला "जय श्रीराम"च्या घोषणा देणारे चडिचूप झाले होते. म्हातारे–कोतारे सावली मिळेल तिथे बसत होते.
तर हो, छोटेखानी मंदिर अजूनही पूर्ण झालेलं नाही. बांधकाम अजूनही सुरूच आहे. मागच्या वर्षी सत्तालालसेपोटी हिंदूंच्या भावनेची कदर न करता उद्घाटन रेटलं गेलं होतं. बरं, एक अक्षरधामसारखं भव्य मंदिर बांधले असते तर ठीक पण नाही छोटं मंदिर बांधलंय, नि त्याच्या आजूबाजूला आणखी ४ मंदिरांचं बांधकाम सुरू होतं. माती, धूळ उडत होती.
मंदिरात प्रवेश केला. आता इतक्या दूर भक्तगण थकून आलेत, आपण त्यांचे इतके हाल केलेत – तर दर्शन तरी सुखाने होईल? पण नाही! सरकारने हाल केल्यानंतर दर्शनही सुखाने होऊ नये अशी चोख व्यवस्था केलीय. एकतर मूर्ती अतिशय छोटी – ३ ते ४ फुटांची. त्यात भक्त आणि मूर्तीमध्ये इतकं जास्त अंतर की मूर्ती नीट दिसतही नाही. कसं तरी दर्शन आटोपून लोक बाहेर पडले. पुन्हा तीच छोटी सतरंजी नि जळणारे पाय.
कसंतरी लॉकरपर्यंत पोहोचलो. मोबाईल घेतले. गरम फरशीवरून पळत जाऊन चप्पल मिळवली. रस्त्यात ठिकठिकाणी हाल होऊन म्हातारे लोक सावली पाहून पडले होते. स्त्रिया कुठेही फोटो काढायला जागा नाही म्हणून सिक्युरिटीशी भांडत होत्या. अनेक लोकांना बाहेर जायचा रस्ता सापडत नव्हता म्हणून पुन्हा जिथून आले तिथे परत जात होते आणि सिक्युरिटीशी भांडत होते. सिक्युरिटी त्यांना पीटाळत होती.
मध्ये मध्ये पाणी पिण्याची व्यवस्था होती – तेवढंच काय ते सुख. जाताना प्रसाद दिला. राममंदिरात येऊन गेल्याचा पुरावा म्हणून फोटो घेण्याची एकही जागा नव्हती.
मला वाटतं, एवढे हाल जर मुस्लिमांच्या ताब्यात रामजन्मभूमी जमीन असती तरी त्यांनी देखील हिंदूंचं केलं नसतं, तेवढं योगी सरकारने केलंय. शिर्डीचं मंदिर व्यवस्थेच्या बाबतीत कितीतरी पटीने आदर्श आहे!
तर असे कसेबसे दर्शन आटोपून पुन्हा गोरखपूरकडे वळालो. अयोध्येबद्दलचे सगळे भ्रम तुटले. इतर कुठे फिरायची इच्छा राहिली नाही! उगाच नाही अयोध्यासाठी अनेक शहरांमधून सुरू करण्यात आलेल्या फ्लाईट्स बंद पडल्या. मुळात देवदर्शन करायला म्हातारे लोक जास्त येतात. त्यांचेच कसे हाल होतील नि जिरतील याची उत्तम व्यवस्था रामजन्मभूमी मंदिरावर करण्यात आली आहे. ना कुणी फोटो काढू शकतो, ना नीट दर्शन घेऊ शकतो. त्यामुळे अयोध्याधाम जास्त प्रसिद्ध पावलेले नाही. उत्तरोत्तर इथे भाविक कमीच होत जाणार, आणि मोठी पब्लिसिटी होणारच नाही.
ज्याला कुणाला जायचे असेल त्याने सोबत एनर्जी ड्रिंक, ओआरएस, टोप्या, गोळ्या, औषधे असा लवाजमा बरोबर असू द्यावा. आपण मंदिरात नाही तर ट्रेकिंगला जातोय, अशा तयारीने जावे.
गोरखपूरला येऊन गोरक्षनाथ मंदिरात दर्शन घेतले
पुढे गोरखपूरमधले काम आटोपून २०० किमीवरील वाराणसीला जाऊन यावे असा विचार केला. गोरखपूरहून रेल्वे नव्हती, म्हणून ४० किमीवरील “देवरिया सदर”ला जाऊन रेल्वे पकडली.
रेल्वे स्टेशनवर वेळ होता म्हणून बाहेर जाऊन कॉफी प्यावी असा विचार केला, पण बाहेर भयंकर प्रमाणात कत्तलखाने होते. तिथला वास नि वातावरण पाहून भयंकर मळमळ झाली. परत आता २ महिने तरी नॉनव्हेज खाल्ले जाणार नाही.
रेल्वेत AC चेअर कार मिळाले होते. बाजूला एक कुठल्यातरी कॉलेजचा गप्पिष्ट प्रोफेसर येऊन बसला. त्याने त्याची विंडो सिट मला दिली नि त्या बदल्यात भयंकर गप्पा मारल्या. कानातला हेडफोन पुन्हा पुन्हा काढून तो काय सांगतोय ते ऐकत बसावे लागायचे. असे ४ तास गेले. मधल्या काळात त्याने थोडाफार वेळ दिला, तोपर्यंत वाराणसीच्या हॉटेल आणि घाटांची माहिती युट्यूबवर घेतली. युट्यूबवरील व्हिडिओ पाहून भयंकर उत्सुकता लागली. केव्हा पोहोचेल वाराणसीला, असे झाले.
दशाश्वमेध घाट ते नवा बनलेला नमो घाट पहावाच, असे ठरवून तयारीला लागलो. युट्यूबवर “रांझणा” सिनेमाच्या गाण्यांवर अनेक व्हिडिओ होते, त्यात सुंदर गंगा नि घाट दिसत होते. हा सिनेमा मी कॉलेजमध्ये असताना थिएटरमध्ये पाहिला होता.
रात्री १० वाजता वाराणसी जंक्शनला पोहोचलो. रिक्षावाल्याला १०० टेकवून “तीर्थ गेस्ट हाऊस”ला निघालो. हे गेस्ट हाऊस मी रेल्वेत असतानाच बुक केले होते — ६०० रुपयांत काशी विश्वेश्वर मंदिराला लागूनच रूम मिळाली. गंगेकिनारीही गेस्ट हाऊस आहेत, सकाळी गंगा घाट थेट दिसेल असे. १२ पर्यंत जेवण आटोपून, चेक-इन करून मी गंगेकडे सुटलो.
दशाश्वमेध घाटापासून सुरुवात करून मी एकेक घाट ओलांडत जात होतो. मनकर्णिका घाट अखंड प्रेते जाळत होता.
इतर घाट — पेशवे घाट, गणेश घाट, भोसले घाट, मनकर्णिका घाट ओलांडत मी जात होतो. पुढे लोक नव्हते. दशाश्वमेध घाटाजवळ लोक झोपले होते पण पुढे शुकशुकाट होता. एक फॉरेनर मुलगी आणि मीच फिरत होतो. ती मला घाबरली असावी, कारण प्रचंड जोरात चालत होती. मी मागे चाललो असतो तर तिचा पिच्छा करतोय असे तिला वाटले असते, म्हणून स्पीड वाढवून तिला ओव्हरटेक केले नि पुढे गेलो.
भोसले घाटावरचा हा दरवाजा मला विशेष आवडला, तिथे फोटो घेण्याचा मोह आवरला नाही.
बऱ्याच ठिकाणी पोलीस होते. ते कुणालाही घाटाजवळ येऊ देत नव्हते. जिथे पोलीस नव्हते, तिथे लोक आंघोळी उरकत होते. दीड तास चालल्यावर दमलो. नमो घाट अजूनही अर्धा तास दाखवत होता, मग परत फिरलो.
मंदिर पहाटे २.३० ला उघडेल, असे कळले होते. तोपर्यंत ज्ञानव्यापी मशिद पाहू म्हणून G-मॅप लावून १ वाजता निघालो. अचानक “श्री काशी विश्वनाथ मंदिराचा बोर्ड” दिसला. तिथे फोटो घेतले. तिथल्या पोलिसाने माहिती दिली की मंदिर पहाटे ४ वाजता उघडेल. २५० रुपयेचे तिकीट काढून वेगळी रांग असते, त्याने लवकर दर्शन होते.
एक महाराष्ट्रातील स्त्रियांचं पथक २ वाजेपासून मंदिराबाहेर रांगेत बसले होते. परत रूमवर आलो — जवळच होता. अतिशय अरुंद बोळातून रस्ता होता. bhinti छान चित्रानी रंगवल्या होत्या. २ वाजता झोपलो. ४ वाजता उठून आंघोळ करून मोबाईल रूमवरचा ठेऊन मंदिरात आलो. रांग मोठी नव्हती, पण रांगेत उभे राहिल्यावर लक्षात आले की फार हळूहळू पुढे सरकतेय.
टीव्ही स्क्रीन्सवर लोक पिंडीला हात लावून दर्शन घेताना दिसत होते. हिंदूंचे मक्का म्हणावे असे सर्वात पवित्र मंदिर आणि थेट पिंडीला हात लावणे हे सौभाग्य — तर त्र्यंबक, भीमाशंकर, घृष्णेश्वर कुठेच मिळत नाही — म्हणून आनंदलो.
पण माझा नंबर आला तेव्हा ५ वाजून गेले होते आणि ५ वाजेपर्यंतच सर्वसामान्यांना पिंडीला हात लावता येतो. नंतर VIP ना प्रवेश (११०० रुपये देऊन).
मला मंदिर फार आवडले. अतिशय छान आणि छोटे. आपल्या अहिल्याबाईंनी बांधलेले म्हणजे आपण पिंडीपासून पाच फूटावरून गाभाऱ्याच्या बाहेरूनच दर्शन घेतो. पण गाभारा तेवढेच मंदिर! उगाच जास्तीचे बांधकाम नाही. सोन्याच्या (?) पत्र्याने मढवलेले.
हा पत्रा राजा रणजितसिंहांनी दिला, असे वाचले होते. मंदिर परिसर पांढऱ्या फरशीने केलेला, अतिशय स्वच्छ होता.
थोडक्यात, मंदिर असावे तर असे! नाहीतर खूप मोठे बांधकाम अजिबात नको.
पिंड मला नीट दिसली नाही कारण स्त्रिया मध्ये होत्या पोलीस पुढे ढकलत होते. एक पोलिसाला माझी दया आली नि त्याने २ मिनिटे थांबून स्त्रिया उठून जाण्यापर्यंत रांग होल्ड केली नि मला दर्शन घेऊ दिले.
तोपर्यंत आतल्या पुजाऱ्याने पिंडीवरील हार उचलून माझ्या गळ्यात घातला. मंदिर परिसरात थोडा वेळ बसलो. माकडे भरपूर होती, माणसाना घाबरत नव्हती.
Exit वर पोलिसाला सांगितले की मला ज्ञानव्यापी मशीद पाहायची आहे. त्याने मला दुसऱ्या बाजूला जा सांगितले. तिकडे गेल्यावर नंदी दिसला — त्याचे दर्शन घ्यायलाही रांग होती. नंदीचे तोंड ज्ञानवापीच्या दिशेने आहे.
ज्ञानव्यापीच्या दिशेने गेलो. ज्ञानव्यापी मागून पाहता यावी अशीही व्यवस्था आहे. मागच्या बाजूने मंदिराचे अवशेष असलेले खांब स्पष्ट दिसतात. मंदिर आणि मशिदीच्या दरम्यान जाळीच्या लोखंडी भिंती आहेत. पलीकडे मशिदीत सैन्याचे शस्त्रधारी सैनिक.
मशिदीच्या खाली, नंदीच्या समोर एक भुयार खोदला आहे जिथे जुन्या मंदिराचे खांब स्पष्ट दिसतात. कोर्टाच्या आदेशाने वर्षभराआधीच ते सुरू झाले आहे. तिथे मंदिर स्थापन केले आहे. असे तिथल्या पुजाऱ्याने सांगितले.
सगळं दर्शन घेऊन बाहेर आलो. लोक अन्नपूर्णा मंदिर, कालभैरव वगैरे मंदिरात जात होते, पण मला तिकडे जायची इच्छा झाली नाही. मी सॅक घेऊन होटलवाल्याचा टॉवेल आत टाकून , थेट दशाश्वमेध घाटावर पोहोचलो. मला वाटलं होतं की पाणी अतिशय घाण असेल, पण अपेक्षेपेक्षा खूपच स्वच्छ होतं. घाटावरच्या चार-पाच ठिकाणी पाहिल्यानंतर अतिस्वच्छ जागा बघून कपडे काढले आणि डुबकी मारली — पापं धुतली गेली! पाणी थंड नव्हतं, सुसह्य होतं.
सकाळी घाट गजबजलेला होता
पुन्हा कपडे करून नावेत बसलो. इथे एक गंमत पाहिली नाव वाले मराठी कुटुंबे दिसली की मराठीत बोलायचे, या आई या, पटकन बस, शंभर रुपये वगैरे. नाव आधी गंगेच्या पैलतीरी गेली. तिथं उतरून लोकांनी आंघोळी केल्या. तिकडचं पाणी जास्त स्वच्छ होतं कारण गर्दी नव्हती. मग नावेनं सगळे घाट फिरवून आणले. मी नावेत पुढच्या टोकावर जाऊन जागा पटकावली, आणि एका मुलीला फोटो नीट काढ म्हणून दम देऊन मोबाईल तिच्या हातात दिला. तिनंही बिचारीनं चांगले फोटो काढले.
नाव मधोमध आली तेव्हा मी बिस्लेरीच्या तीन बाटल्यांमध्ये गंगाजल भरलं. मध्ये तहान लागली म्हणून चुकून थोडं गंगाजल प्यायलो. नाव पुन्हा किनाऱ्याला लागली.
एक गोंडस बाळ दिसले, त्याच्या वडिलाना विचारून त्याचा फोटो घेतला.
वेळ कमी होता, पुढची ट्रेन होती. थोडं बनारस फिरलो — बऱ्यापैकी स्वच्छ होतं. साधू, भिकारी वगैरेचा काही त्रास नव्हता. वातावरण अगदी प्रसन्न होतं. गंगा आरती मात्र पाहायला मिळाली नाही. diet वर असल्याने गिठले खाद्यपदार्थ चाखले नाही.
फोटो अधिक वर्णन (photo essay
फोटो अधिक वर्णन (photo essay)लेख जबरी झाला आहे.
नॅशनल जिओग्राफिक छाप.
मस्त मित्रा
मस्त मित्रा
खूप छान झालाय लेख.
खूप छान झालाय लेख.
आता कॉरिडॉर मुळे काशीचे गल्ली बोळ इतिहास जमा झाले हे काहीना आवडलं असेल पण मला ते गेले ह्याच खरतर खूप वाईट वाटत. वाराणसी एवढ प्राचीन शहर ... त्याचं प्राचीन पण मिरवणाऱ्या खुणा आपण जमीन दोस्त केल्या... गल्ली बोळ तसेच ठेवून भुयारी रेल्वे सारखे खालून रस्ते सहज करता आले असते असं मला वाटत. काशीचे गल्लीबोळ त्या शहराच वैभव होतं, विकासाच्या नावाखाली त्यावरच आपण नांगर फिरवला आहे. आता पंढरपूरच पण म्हणे हेच करणार आहेत.
छान लिहिलंय. धावतं आणि
छान लिहिलंय. धावतं आणि फॅक्चुअल असल्याने मजा आली वाचताना.
फार छान, वास्तवदर्शी लेख.
फार छान, वास्तवदर्शी लेख.
उगीच भावनिक पाल्हाळ नाही किंवा भक्तीचा बडेजाव ही नाही.
राम मंदिरात गेल्यावर माझ्याही मनात एक्झॅक्टली याच भावना आल्या होत्या.
हे राम मंदिर बनवलं यांनी? इतके वाद आणि राजकारण करून? असे वाटत राहिले.
काशीलाही असेच झाले. नीट पिंड मला दिसलीच नाही...
खाली वाकून पाहीपर्यंत पोलिसांनी पुढे ढकलले....
इतके प्राचीन शहर..म्हणून खूप भारावल्यासारखे वाटत होते.
बनारस हिंदू युनिव्हर्सिटी फार छान आहे मात्र. तिथले शिव मंदिर फारच सुरेख आहे.
छान वर्णन. राम मंदिराबद्दल हा
छान वर्णन. राम मंदिराबद्दल हा अँगल पहिल्यांदाच वाचला. बहुतेक लोक जे जाउन येतात ते प्रचंड भारावलेलेच असतात. ऐकून ऐकून आणि टिव्ही वर पाहून मला वाटले भव्य मंदिर असेल एकदम.
बनारस चे फोटो आवडले. घाटांवर पाणी स्वच्छ होते हे वाचून आश्चर्य वाटते. हजारो लोक कायम डुबक्या मारायला येणार, फुले , निर्माल्य टाकणार. तिथे काही सतत स्वच्छता करणारी यंत्रणा आहे का?
तिथे काही सतत स्वच्छता करणारी
तिथे काही सतत स्वच्छता करणारी यंत्रणा आहे का? >> आहे, फिल्टरेशन मशीन सतत फिरत असतात नदीमध्ये. तसेच नदी स्वच्छ ठेवा, काही टाकू नका वगैरे प्रचार होतच असतो. तरी घाटांजवळ पाणी एवढ स्वच्छ वाटत नाही पण नदी पात्राच्या मध्यात स्वच्छ असत.
चुकून बिसलरी समजुन पाणी
चुकून बिसलरी समजुन नदीचे पाणी प्यायले वाचल्यावर आता काही तरी गडबड घोटाळा होणार वाटलेलं. पण तसं काही झालेलं दिसत नाहीये
मस्त लिहिले आहे. खूप आवडले.
मस्त लिहिले आहे. खूप आवडले. ते पाय भाजणं, म्हाताऱ्याकोताऱ्यांचे हाल वाचून वैताग पोचला.
सर्व प्रतिसाद कर्त्यांचे खूप
सर्व प्रतिसाद कर्त्यांचे खूप खूप आभार, तुमच्या शुभेच्छांमुळे लिहायला आणखी ऊर्जा मिळेल.
आता कॉरिडॉर मुळे काशीचे गल्ली बोळ इतिहास जमा झाले हे काहीना आवडलं असेल पण मला ते गेले ह्याच खरतर खूप वाईट वाटत. वाराणसी एवढ प्राचीन शहर ... त्याचं प्राचीन पण मिरवणाऱ्या खुणा आपण जमीन दोस्त केल्या
>>>>>
पण त्यामुळे सोयही झालीय, तसेच आजूबाजूला अनेक गेस्ट हाऊस गल्ली बोळातच आहेत, नी वाराणसीत गेल्यावर एकदा तरी गल्ल्या पालथ्या घालाव्याच लागतात.
हे राम मंदिर बनवलं यांनी?
हे राम मंदिर बनवलं यांनी? इतके वाद आणि राजकारण करून? असे वाटत राहिले >>>
सहमत! राममंदिर कसे हवे होते? अगदी माती केली संधीची. अरे कमीत कमी मूर्ती तरी १०-१५ फूट बनवायची? आजूबाजूला आणखी ४ मंदिरे बनवण्यापेक्षा एकच प्रचंड मोठे मंदिर सहज बनवता आले असते, हिंदूंच्या प्रचंड देणग्या नी सरकारी मदत कुठे गेली कळत नाही.
काशीलाही असेच झाले. नीट पिंड
काशीलाही असेच झाले. नीट पिंड मला दिसलीच नाही...
खाली वाकून पाहीपर्यंत पोलिसांनी पुढे ढकलले.... >>>>
सहमत! पिंड लहान आहे नी दर्शनाला वेळ पुरत नाही.
बाकी घाट नी मंदिर सोडून वेळेअभावी इतर ठिकाणी फिरणे झाले नाही.
बनारस चे फोटो आवडले. घाटांवर पाणी स्वच्छ होते हे वाचून आश्चर्य वाटते. हजारो लोक कायम डुबक्या मारायला येणार, फुले , निर्माल्य टाकणार. तिथे काही सतत स्वच्छता करणारी यंत्रणा आहे का? >>>
माहीत नाही पण निर्माल्य, नारळ, झेंडूची फुले असे प्रकार घाटावर आजीबात दिसले नाहीत, नदी अतिशय स्वच्छ वाटावी अशी दिसत होती. हा माझ्यासाठी मोठा सांस्कृतिक धक्का होता, खरेतर मी आंघोळ करणारच नव्हतो अपेक्षा होती की पाणी घाणेरडे असेल नी मी आंघोळ करणार नाही.
गंगा स्वच्छ दिसली वाचून बरं
गंगा स्वच्छ दिसली वाचून बरं वाटलं.
मी पण जाऊन आलो काशीला मागच्या
मी पण जाऊन आलो काशीला मागच्या आठवड्यात. मी पहाटे ४ वाजता गेलो होतो दर्शनाला छान दर्शन झाले अगदी स्पर्श करून. दशाश्वमेध घाटावर स्वच्छता होती आणि पाणी पण स्वच्छ होते.
अयोध्या चा अनुभव माझा पण सारखाच होता आम्ही पण जिथे मोबाइल ठेवायचे लॉकर होते तेच मंदिर समजून फोटो काढले. आणि त्यानंतर १ किमी चालल्यावर खरे मंदिर आले. गर्दी भरपूर होती पण दर्शन लवकर झाले आणि वृद्ध लोकांसाठी व्हीलचेअर ची चांगली सुविधा होती.
छान वृत्तांत. जोवर सर्व
छान वृत्तांत. जोवर सर्व पुर्ण होत नाही तोवर तिकडे जायचे नाही असे ठरवले आहे. तोवर रामराया माझे क्षेम बघेलच याची खात्री आहे.
गंगा स्वच्छ होतेय हे छानच आहे. सगळेच घाट स्वच्छ होऊदेत.
धन्यवाद धीरज, साधना!
धन्यवाद धीरज, साधना!
छान लिहिलय. सोहोळा बघता राम
छान लिहिलय. सोहोळा बघता राम मंदिर हे भव्य असेल अशी कल्पना होती. असो.
गंगा स्वच्छ होते आहे हे वाचून खरंच आनंद झाला.
खूप छान लेख आणि वर्णन, फोटो
खूप छान लेख आणि वर्णन, फोटो खरंच एखाद्या फेमस व्लॉगर सारखे आलेत.ते पाय भाजण्याचं अगदी अगदी, बर्याच मंदिरांमध्ये दुपारच्या वेळी होतं.
गंगेचं पाणी बऱ्यापैकी स्वच्छ होतं आणि त्यासाठी प्रयत्नही करतायत हे वाचून आनंद झाला.
मला आधीचे काही फोटो दिसत
मला आधीचे काही फोटो दिसत नाहीयेत. इतर घाट पासून सुरुवात केलीय त्याखालचे सर्व फोटो दिसतायेत, सुरेख आहेत फोटो.
राममंदीरात दर्शनासाठी कोणालाही त्रास होऊ नये, अशी व्यवस्था करायला हवी, असा त्रास व्हायला नको. फोटो त्याचे भव्य बघितलेले.
सध्यातरी तिथे जाण्यात फार अर्थ नाहीये असं तुमच्या लेखावरुन दिसून येतंय, धन्यवाद. साधनाने लिहिलं तसं, पूर्ण होऊदे मंदीर मगच जायला हवं.
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
मध्यंतरी कुंभ दरम्यान अयोध्येला जाणे झाले.
अयोध्या मंदिराबाबत सहमत. जे भव्य दिव्य अपेक्षित होते तसे अजून तरी दिसत नाही. अजून बरेच काम बाकी आहे.
त्यामुळे ज्यांना जायचे आहे त्यांनी पूर्ण काम झाल्यावरच जावे.
तिथे येणारी गर्दी पाहता प्रशस्त गाभारा योग्य वाटला. आमचे दर्शन पण चांगले झाले.
शरयू नदीच्या घाटाचे सुशोभीकरण छान केले आहे.
धन्यवाद सिमरन, अंजू, ऋतुराज!
धन्यवाद सिमरन, अंजू, ऋतुराज!
लेख प्रचि दोन्ही आवडले.
लेख प्रचि दोन्ही आवडले.
फोटोमधील गोंडस बाळ खूपच गोड
फोटोमधील गोंडस बाळ खूपच गोड आहे
हो, राम मंदिर अजिबात भव्य
हो, राम मंदिर अजिबात भव्य वाटत नाही, आणि आजुबाजूला बांधकाम चालू असताना दर्शन करणं पण विचित्र वाटतं. फार घाईघाईत उघडलं आहे. कदाचित बांधकाम पूर्ण झाल्यावर भव्य दिसेल. चपला आणि मोबाईल ठेवायची व्यवस्था मात्र छान केली आहे. आणि व्हीलचेअर ची पण. शिवाय मूर्ती खूप सुंदर आहे, मला तरी मोठी भव्य वाटली. गाभारा छान मोठा बनवला आहे त्यामुळे दर्शनाचं सुख मिळतं.