ही धरा जरा ओलेती असती...

Submitted by मुग्धमानसी on 15 April, 2025 - 07:36

ही धरा जरा ओलेती असती... रुजले असते.
वा सडून जाते, कुजते... पण हे असले नसते!

मी असते म्हणजे माझे दान माझ्या पदरी
मी असते म्हणजे माझा श्वास माझ्या उदरी
तुमचा श्वास मिसळला असता... जगले असते.
ही धरा जरा ओलेती असती... रुजले असते.

माझ्या असण्याची मुळे भटकली दहा दिशांना
अधांतरी बिलगून राहिली आभासांना
अंतरंग मातीचे कळते... निजले असते.
ही धरा जरा ओलेती असती... रुजले असते.

बहुतेक असेही नाही की ही धरणी निष्ठूर
माझेच बियाणे रुजण्यासाठी नाही आतूर
प्रश्न जरासा कळता... उत्तर दिसले असते
ही धरा जरा ओलेती असती... रुजले असते.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद!
@धनवन्ती भेटुयात की. ठरव कधी कुठे ते.