✪ शंतनू नायडूची प्रेरणादायी मुलाखत
✪ वाचनासाठी पुरस्कार देण्याची वेळ येऊ नये
✪ "मला रतन टाटांबद्दल प्रश्न विचारू नका!"
✪ मुंबई बूकीज- निसर्गात वाचण्याची चळवळ
✪ पुस्तकं डोनेट करणं सोपं, पण मांडीवर घेऊन वाचनाची गोडी लावणं कठीण
✪ Good fellows India – नातवंड भाड्याने देतो! ती वेळ आलेली आहे
✪ रतन टाटा माझ्यासाठी "डंबलडोर" होते!
✪ आई शिक्षिका. पण घरी शिक्षिका व शाळेत आई
✪ आई म्हणते, मराठी मुलगी मिळाली तर बरं होईल!
सर्वांना नमस्कार. काही दिवसांपूर्वी लोकमत साहित्य पुरस्कार कार्यक्रमामध्ये टाटा मोटर्समधील जनरल मॅनेजर शंतनू नायडूची मुलाखत बघितली! शंतनू नायडू! आदरणीय रतन टाटांचा तरूण मित्र! पण हा शंतनू नायडू (त्याच्या उत्साहामुळे व ऊर्जेमुळे "ते" नाही तर "तो" म्हणावसं वाटलं) इतका भन्नाट असेल हे माहिती नव्हतं. पुण्यामध्ये तो शिकला. आईमुळे त्याच्यावर वाचनाचे संस्कार झाले. श्वान प्रेमाचेही संस्कार झाले. आणि कालांतराने श्वान प्रेमामुळेच तो रतन टाटांच्या संपर्कात आला.
लोकमत साहित्य पुरस्कार समारंभात त्याला वाचन चळवळ व "मुंबई बूकीज" उपक्रमासाठी पुरस्कार देण्यात आला. ह्या मुलाखतीमध्ये त्याने सुरूवातीलाच सांगितलं, की मला रतन टाटांबद्दल प्रश्न विचारू नका! आणि वाचनासाठी पुरस्कार द्यावा लागतोय, ही खरं तर चांगली गोष्ट नाहीय! आणि त्या पूर्ण मुलाखतीमध्ये त्याने अस्खलित मराठीमध्ये सुंदर मनोगत व्यक्त केलं. खरी मोठी माणसं नेहमी विनम्र असतात आणि डाउन टू अर्थ असतात. हे त्याला ऐकताना सतत जाणवत होतं.
(माझ्या ब्लॉगवर हा लेख इंग्रजीत उपलब्ध व माझे इतर लेख उपलब्ध. हा लेख इथे इंग्रजी व मराठीत ऑडिओ स्वरूपात ऐकता येईल.)
आजच्या पिढीला वाचनाची गोडी लागावी म्हणून शंतनू व त्याच्या मित्र- मैत्रिणींनी बूकीज हा क्लब सुरू केला. ("त्या प्रकारचे बूकी" नाहीत हे!) मुंबईसह आता अनेक शहरांमध्ये त्याचा विस्तार होतोय. दर शनिवारी- रविवारी उद्यानामध्ये एकत्र येऊन पुस्तक वाचायचे असं त्याचं स्वरूप! निसर्गातली शांतता वाचनासाठी खूप मदत करते असं शंतनू सांगतो. तिथे नियम केलेला नसूनही कोणीही मोबाईल वापरत नाहीत. सगळे पुस्तक वाचण्यात तल्लीन होतात. नंतर निघताना सगळ्यांनी वाचलेली पुस्तकं समोर ठेवली जातात. कोणी काय काय वाचलं हे त्यात दिसतं. नंतर हा उपक्रम इतर शाळा व वस्त्यांमध्येही सुरू झाला. ज्या मुलांकडे पुस्तकं नव्हती त्यांना पुस्तकं देण्यात आली. जिथे पुस्तकं ठेवायला जागा नव्हती, तिथे वाचनालयंसुद्धा सुरू केली. शंतनू सांगतो की, त्यासाठी एका आठवड्यात आठ हजार पुस्तकं डोनेशनमधून मिळाली. पण अशी पुस्तकं मिळवणं सोपं आहे, मुलांना सोबत घेऊन- मांडीवर बसवून पुस्तकाची गोडी लावणं कठीण आहे! शंतनू सांगतो की, वाचनाचं अजून एक महत्त्व म्हणजे ते विचारांना चालना देतं. विचारशक्तीला बळ देतं. प्रत्येकाकडे सोशल मीडिया स्क्रॉल करायला इतका वेळ असतो, पण मग पुस्तकासाठी का नसतो, असा परखड प्रश्नही तो विचारतो.
शंतनूच्या सगळ्याच गोष्टी अशाच विलक्षण आहेत! त्याने व त्याच्या मित्र- मैत्रिणींनी काही काळापूर्वी एक अभिनव उपक्रम सुरू केला होता- Good fellows India. त्याचा उद्देश एकटे पडलेल्या आजी- आजोबांना भाड्याने नातवंडं देणं हा आहे! ज्यांचे मुलं त्यांच्यासोबत राहात नाहीत, अशा ज्येष्ठ नागरिकांना सोबत देण्याची ही व्यवस्था आहे. आणि हीसुद्धा काळाची गरज आहे, असं शंतनू सांगतो. हे सगळं आईकडून शिकलो असं शंतनू सांगतो. माझी आई पुण्यात मनपा शाळेत शिकवते, पण ती घरी जास्त शिक्षिका असते व शाळेत आई, असंही तो सांगतो!
शंतनूकडे बघून व त्याची ऊर्जा बघून वाटत नाही की, त्याचं वय तब्बल ३३ असेल! त्याचं वय, चेहरा व त्याचं कार्य- हे काहीच जुळत नाही! त्याच्या आईचं म्हणणं आहे, त्याच्यासाठी मराठी मुलगी मिळाली तर बरं होईल! मराठी मुलींनी प्रयत्न करायला हरकत नाही! ह्या मुलाखतीत तो रतन टाटांबद्दल काही बोलला नाहीय. रतन टाटा एक "लाईटहाऊस" आहेत, असं त्याने त्याच्या पुस्तकात लिहीलंय. ते पुस्तकही वाचनीय असणार. रतन टाटांना तो "डंबलडोर" मानतो! त्याची मुलाखत आवर्जून ऐकण्यासारखी आहे. आणि तो जे सांगतोय, ते आपण ऐकलंसुद्धा पाहिजे!
(वाचल्याबद्दल धन्यवाद! जवळच्यांसोबत लेख शेअर करू शकता. माझ्या वरच्या ब्लॉगवर सामाजिक उपक्रम, फिटनेस, ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, ध्यान, आकाश दर्शन इ. बद्दलचे लेख वाचता येतील. निरंजन वेलणकर ०९४२२१०८३७६. लेख लिहील्याचा दिनांक ८ एप्रिल २०२५.)
छान लेख
छान लेख
बुकिज बद्दल कुठेतरी वाचलं होतं.
भन्नाट दिसतोय हा माणूस.
भन्नाट दिसतोय हा माणूस. पुस्तक वाचलं पाहिजे.
Over hyped आहे हा, याने आता
Over hyped आहे हा, याने आता काहीही केले तरी टाटा कनेक्शन मुळे वर जाणार
>>> Over hyped आहे हा, याने
>>> Over hyped आहे हा, याने आता काहीही केले तरी टाटा कनेक्शन मुळे वर जाणार>>>> त्याच्या वर असे मत बनण्यासाठी काही घटना घडल्या आहेत का? टाटा कनेक्शन हा अभिप्राय एखाद्या अंडरवर्ल्ड शी संबंध असल्या सारखा वाटला.
खूप आधाररहित्म पूर्वग्रहकलुषित अभिप्राय वाटला.... कशासाठी, एखाद्या अपरिचित व्यक्तीबद्दल इतका कडवट पणा?
खुप ऊत्साही आहे हा..
खुप ऊत्साही आहे हा..
मी मेंबर आहे 'पुणे बुकीज'ची. मस्त कल्पना आहे ही.
Over hyped आहे हा, याने आता
Over hyped आहे हा, याने आता काहीही केले तरी टाटा कनेक्शन मुळे वर जाणार
वर जाणार म्हणजे? त्याने स्वतःसाठी काही लाभ घेतला आहे का? जे काही करत आहे त्यात समाजाचा विचार आणि भूतदयेचे कार्य करत आहे. त्याची qualification बघता तो तरुण वयात अशी कार्य करतो आहे ह्याचे कौतुक वाटते.
छान लेख.मीपण शंतनू नायडू ची
छान लेख.मीपण शंतनू नायडू ची मुलाखत पाहिली. छान मराठीत बोलला, एक प्राणिप्रेमी म्हणून माहीत होताच पण पुस्तकं वाचावीत म्हणून त्याने अतिशय उत्तम उपक्रम सुरू केला आहे ,त्याचं पुस्तकही मिळवून वाचणार.
इथे मुलाखत आहे नक्की पाहा https://youtu.be/6RjIETVRjEw?si=qyNVi0n0XfDw667i
त्याच काम पाहिलयावर आणि ही मुलाखत पाहिल्यावर लक्षात येईल, उगाच नाही रतन टाटांनी 11 वर्षांपूर्वी केवळ 22 वर्षांचा हिरा शोधून काढला . त्याच्याकडून चांगल्या कामाची ही लेगसी कंन्टिन्यू राहील असंच वाटतं.
मध्ये लोकमत पुरस्कार
मध्ये लोकमत पुरस्कार निमित्याने ह्याची मुलाखत थोडी बघितली, किती सुरेख मराठी बोलतो. आई लक्ष ठेऊन असते त्याच्या भाषेवर म्हणाला, चुकलं तर आईचे मेसेजेस येतात म्हणाला. पुण्यात वाढलाय आणि आई पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये शिक्षिका आहे असं सांगितलं.
पुस्तकवाचन वाढवण्यासाठी जाम धडपड करतोय. कौतुकास्पद आहे.