कॉर्पोरेट कश्मकश – (भाग ३, अंतिम)

Submitted by Abuva on 1 April, 2025 - 05:05
Microsoft create image of sparrow flying over a desert to a distant oasis

(भाग २: https://www.maayboli.com/node/86551)

नवीन आला. पुन्हा एकदा माझ्याच अपार्टमेंटमध्ये. पुन्हा तिघं. त्याची फ्लाईट लेट नाईट पोहोचली. एअरपोर्टवर रिसीव्ह करायला मी गेलो होतो. तो कधी झोपला कळलं नाही - जेट लॅग! मी सकाळी नेहमीसारखा बाहेर पडलो तेव्हा तो झोपलाच होता. सकाळी सकाळी उठून अंबिका त्याला भेटायला. उतावीळ झाली होती. पण मी तिला थांबवलं. झोपू दे म्हणून सांगितलं. अंबिकाला काय मनात आलं, त्याची काळजी घ्यायला, का कशाला माहित नाही, घरीच थांबली! मी निघून गेलो.
संध्याकाळी घरी आलो, तर खोलीत अंतर्वस्त्रांसकट बचकभर कपड्यांचा ढीग. घरात सिगारेटचा वास भरून राहिला होता. हे दोघेही गायब. म्हणे सगळ्यांची ओळख करायला गेले होते. अंबिकाताईंचा उत्साह फसफसून ओसंडत होता. चला, मित्र मिळाला होता तिला! म्हणजे मी... सुटलो.
पण या वेळी माहौल वेगळा होता. गेल्या वेळी मनोज होता तेव्हा भारतातल्या तीन प्रदेशांतली लोकं एकत्र रहात होती. आता - दोन व्हर्सेस एक झालं. मी एकटा पडलो. प्रश्न जेवणाचा होता. मी आणि अंबिका शाकाहारी होतो, कधी विचार करावाच लागला नाही. पण नवीनमहाराजांना रोजचं जेवण नॉनव्हेज शिवाय घशाखाली उतरत नव्हतं. अंबिकाताईंना त्याचा कळवळा आला. त्यांनी चिकन बनवणे शिकून त्याचे चोचले पुरवण्याचा घाट घातला. तेही तिच्या वागण्याचा विचार करता बरोबरच होते म्हणा. मला नाही का ती आमरस खायला घालत होती! नशीब एवढंच अजून ती मीपण नॉनव्हेज खाते म्हणत नव्हती. तिच्या नाममुद्रांकित पूर्वजांचं सुकृत असावं. मात्र आता तिची टकळी बंदच होत नव्हती. ते दोघंही अगम्य भाषेत अतर्क्य काळ बोलत रहायचे. समोर टिव्ही सुरू असला तरी! आणि या संभाषणात मला कुठेही जागा नसायची. सुरुवातीला मला याचं वैषम्य वाटलं! नंतर, बरं वाटलं! गेले सहा-आठ महिने अंबिकाशी न बोलून, वा अगदी जुजबी बोलून तिची कुचंबणा केल्याचा ती वचपा काढत असावी, असा माझा वहीम होता. अर्थात, तिच्या मनात असल्या भावना येणं शक्य नव्हतं एवढी ती निर्व्याज होती. छक्केपंजे वगैरे तिला काही माहितीही नव्हते.
आमच्या कंपनीत एक प्रथा होती. जर एखादाही माणूस आपली भाषा न समजणारा असेल, तर सरळ राष्ट्रभाषेत वा इंग्लिशमध्ये बोलायचे. इस्पेशिअली, कस्टमर साईटला. तिथे इंग्लिश शिवाय दुसरी भाषा चालायची नाही, अगदी आमच्या आमच्यात सुद्धा! ह्या दंडकाला, ऑफ कोर्स घरी हरताळ फासला जायचा.‌ पण ही परिस्थिती जरा बिकट होती. मात्र मी स्पष्ट शब्दांत त्यांना सांगितलं होतं की क्लायंट साईटला जर चुकूनही मला ते दोघे व्हर्नॅक्युलरमध्ये संभाषण करताना सापडले तर याद राखा!

---

माझ्या सुदैवानं एका इतर अपार्टमेंटमध्ये नवीनची लवकरच सोय झाली आणि मला जरा शांतता लाभली. माणूस गदळ होता. एक तर सहा फुटी उभा-आडवा वाढलेला रेडा. अत्यंत अस्वच्छ, सदैव सिगारेट अन् सांच्याला बीअर. इतक्या टापटीपित रहाणारी, (टायपिंग सोडून) सगळं निगुतीनं करणारी अंबिका कसं काय हे सगळं सहन करून त्याच्याशी तासंतास संवाद करू शकत होती, कोण जाणे! काय मेतकूट जमलं होतं कळत नव्हतं. इथे खायला करून ती त्याला त्याच्या अपार्टमेंटमध्ये देऊन यायची. त्यांच्या समभाषिक लोकांनी मला हे जरा पातळी ओलांडून जाताहेत हे सूचित केलं होतं. पण मी हात झटकले. सज्ञान लोकांच्या परस्परसंबंधांत पडण्यात मला काही गम्य नव्हतं. काम व्यवस्थित होतंय ना, मग बास.
आता मला भारतात सुट्टीवर जायचे वेध लागले होते. गणपतीचा काळ होता. मी नेहमी याच सुमारास एखादं महिना परत येत असे. काय सुख असतं पुण्यात या काळात, आहाहा! मी पंचवीस-तीस वर्षांपूर्वीची बाब सांगतोय हां! दोन वर्षं होत आली होती मला भारतात परत येऊन. पण दैव माझं असं की अंबिकाताईंची वार्षिक सुट्टीही तेंव्हाच आली होती! "ओहोहो, वी विल गो बॅक टुगेदर!" असा चीत्कार अंबिकेच्या तोंडून ऐकता क्षणी मी माझा प्लॅन बदलला! च्यायला, ही बया पाठ सोडायलाच तयार नव्हती! हा विचार येताच मीच थबकलो. स्वतःशीच हसलो, अनुरागाचा अंकुर जळला म्हणायचा!
नाही, मला एक दिवस लवकर पोहोचायचे आहे, असं सांगून मी धडपड करत व्हाया लंडन-दिल्ली-मुंबई असं पुण्याचं तिकीट काढलं. ती प्रोजेक्ट को-ऑर्डिनेशनसाठी दोन दिवस पुण्यात थांबून पुढे गावी जाणार होती. तिचं दुसऱ्या दिवशीचं व्हाया लंडन-मुंबई तिकीट काढलं. हुश्श!
पण दैव म्हणतं... नाही! मी फ्लाईट पकडली, आणि कर्मधर्मसंयोगानं काही तरी टेक्निकल फॉल्ट आल्यानं ती अर्ध्या रस्त्यात कुठे तरी उतरवली गेली. मग काय, एक रात्र तिथे काढली, आणि दुसऱ्या दिवशी वेगळ्या विमानानं लंडनला प्रयाण केलं. माझं डेस्टिनेशन मुंबई असल्यानं एअरलाईननं तिकीट बदलून मला डायरेक्ट मुंबई फ्लाईटला बसवलं. आता अशा प्रवाशांची जी गत होते तीच माझी झाली - धावपळ, मरमर, चिडचीड. वॉशरूम जवळच्या सगळ्यात शेवटच्या लायनीत मला सीट मिळाली. नशिबाने आख्खी रो रिकामी होती. मला तशीही फ्लाईट वगैरेमध्ये दणकून झोप लागते. इथे तर मानसिक ताण होता, श्रम होते. लगेच झोप लागली. कधी तरी जाग आली. बाजूला बघतो तर... अंबिका! भूत बघितल्यासारखा दचकलो!
"ओ, आय वॉज गोइंग टू वॉशरूम ॲन्ड आय सॉ यू हिअर! आय वॉज सो सरप्राइज्ड, यू नो! यू वेर स्लीपिंग, सो आय ब्रॉट माय स्टफ डाऊन... हाऊ कम यू आर इन धिस फ्लाईट?" मला फ्लाईटमध्ये बघून ती म्हणाली, आता इथेच येऊन बसते! कप्पाळ... माझी भयंकर चिडचीड झाली. तिची दुसऱ्या दिवशीची फ्लाईट होती ना, ती हीच! तिच्यापासून दूर पळत होतो, तर दैव म्हणतं नाऽऽही! पण त्याही अवस्थेत मला तिच्या निरागसतेचं नवल वाटलं!
मुंबईला एअरपोर्टवर घ्यायला मित्र आले होते. त्यांना कळे ना - च्यायला, हा एक तर न कळवता एक दिवस उशीरा आला. आम्ही सगळे इकडे काळजीत. आणि येताना बरोबर डायरेक्ट चिकनी पोरगी घेऊन आला?! मग अंबिकेला केके का सॅंडीज ला बसवला आणि मी मित्रांसोबत पुण्याला आलो..

---

नवीन महाशय मात्र रगेल आणि रंगेल निघाले. वागणं बोलणं रफ होतंच. एकंदर कस्टमर साईटला तिथल्या लोकांशीही त्याला नीट वागता आलं नाही.  नाईट क्लब्स, पब, इथे जाण्यात त्यांना भलताच इंटरेस्ट होता. तो शुक्रवार-शनिवार रात्ररात्र बाहेर असतो असा रिपोर्ट येऊ लागला. त्याच्या कामावर कस्टमर नाखूष आहे हे कळलं. आणि मी त्याला वॉर्निंग दिली. पण फार बदल झाला नाही. मग मात्र मी त्याची गठडी वळण्याचा निर्णय घेतला. वर्षाच्या आत त्याच्या हातात परतीचं तिकीट ठेवलं. अंबिकानं त्याच्यावतीनं खूप रदबदली केली. पण कंपनीचं नाव खराब होण्याचा धोका मी पत्करू शकत नव्हतो. आय हॅड टु पुट माय फूट डाऊन.

---

रविवार हा त्याचा प्रयाणाचा दिवस. शनिवारी सकाळीच त्याच्याबरोबर बसून सगळा हिशेब पूर्ण केला. आता तो मोकळा होता, आम्ही मोकळे. दुपारची झोप आटपून मी सोफ्यावर सांडलो होतो. एका हातात चहाचा कप, दुसऱ्या हातात कुठलसं पुस्तक. उन्हाळ्याचे दिवस होते. पंखा गरगरत होता. पण उघड्या दारातून गरम वारे घुसत होते. समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांचा दमटपणा जाणवत होता. अचानक अंबिका तीरासारखी घरात घुसली. पुस्तकातून डोकं काढून मी तिच्याकडे पाहिलं. तिचा चेहेरा रडवेला दिसत होता. गेले कित्येक दिवस तिची धुसफूस चालली होतीच. त्याचा माझ्यावर परिणाम होण्याची सुतराम शक्यता नव्हती. ते तिलाही ठावूक होतं. येऊन खुर्चीत बसली. माझ्याकडे रोखून बघत होती. ती चिडली होती, हे उघड होतं. मी चहाचा कप खाली ठेवला. माझा चेहेरा प्रश्नांकित झाला होता. तिच्या पुढच्या विधानानं मात्र मला धक्का बसला. विधान? आरोप...
"तुला माझ्याबरोबर एकटं रहायचंय म्हणून तू त्याला विनाकारण परत पाठवतो आहेस!”
मी सुन्न झालो. या आरोपाचा धनी होण्याजोगतं मी काय केलं होतं? काय घडलं होतं माझ्या हातून? धक्क्यातून सावरायला मला सेकंदभर लागला. मग मात्र मला भयंकर राग आला. संतापाची शिळक मस्तकात गेली. व्हॉट बुलशिट.. हातातलं पुस्तक फेकून मी ताडकन सोफ्यावरून उठलो. शक्य असतं तर तिच्या कानाखाली... आईबहिणीवरून शिव्या माझ्या तोंडावर आल्या होत्या. माझ्या चेहेऱ्यावरचे क्रुद्ध भाव बघताच अंबिका भानावर आली.
"सॉरी, सॉरी अबुवा, आय डिडन्ट मीन दॅट. आय नेव्हर मेन्ट दॅट. यू नो ईट. आय डोन्ट नो व्हॉट मेड मी से दॅट. प्लीज फरगिव्ह मी!”
मग मात्र तिचा बांध फुटला. ती हमसून, हमसून रडायला लागली. व्हॉट द हेल... तिच्याकडे पाठ फिरवून मी दाराजवळ बाहेर नजर लावून उभा राहिलो. तिच्या हुंदक्यांचा आवाज माझ्या कानी पडत होता. इतर वेळी सगळ्या टवाळांना धिटाईनं तोंड देणारी अंबिका मी पाहिली होती. पण हा विकल अवतार नवा होता.
'आणि इतका हिडीस आरोप? कंम्प्लीटली आउट ऑफ कॅरॅक्टर फॉर हर!’
'मस्ट बी एक्स्टेन्युएटिंग सर्कमस्टन्सेस.’
'कुणीतरी कान भरले असतील!’
माझा राग हळूहळू मावळला.
'बच्ची है, छोड दो साला.’ मी जागचा हललो, वळलो.
'काय काय भोगावं लागत असेल तिला...’
इतक्या वर्षांत पहिल्यांदाच, मी पुढे होउन तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
"डोन्ट वरी, अंबिका, शांत हो”. किचनमध्ये जाऊन मी पाणी घेऊन आलो.
कढ ओसरल्यावर ती म्हणाली, "प्लीज, प्लीज फरगिव्ह मी, प्लीज!”
ती आता माझ्याकडे पहाते आहे हे लक्षात आल्यावर मी तिला हळूच विचारलं,
"पण तो आरोप भयानक होता. का वाटलं तुला असं?"
तिच्या चेहेऱ्यावर अपराधी भाव उमटले. जोरजोरात नकारार्थी मान हलवत ती म्हणाली "आय वॉज रॉन्ग, रॉन्ग! तू आजपर्यंत कायम माझी पाठराखण केली आहेस, एखाद्या भावासारखी. मला कधीही तुझ्याबरोबर एकटं रहायला भिती वाटली नाहीये. आय ओव अ लॉट टू यू फॉर दॅट सेन्स ऑफ कंम्फर्ट, सिक्युरिटी.” तिला पाण्याचा ग्लास देऊन मी परत माझ्या जागी येऊन बसलो. थोडा वेळ शांतता होती. फक्त डोक्यावर गरगरणाऱ्या पंख्याचा आवाज येत होता. "पण... पण मला बॉडीगार्डबरोबर आयुष्य काढायचं नाहीये! मला आयुष्य फुलवायचंय, खुलवायचंय, सजवायचंय...”, जणु स्वतःशीच बोलावं तसं म्हणाली.
'च्यायला... काय म्हणाली ती? बॉडीगार्ड? मी?!’
तिच्या बोलण्यात आवेग होता. "मला त्याच्याबरोबर रहायचंय...” तिच्या चेहेऱ्यावर असीम वेदना उमटली होती. "आता मला त्याला गमवायचं नाहीये! मी खूपखूप सहन केलंय रे आजपर्यंत, एकट्यानं, धीरानं, तोंडाला कुलुप घालून... माझ्या आईवडिलांसाठी, त्यांच्याकडे बघून उभी राहिलेय मी. पण आंतून मोडलेय मी, मुळांपासून.. आधार हवाय मला. नाही आता मी सहन करू शकतेय हा एकटेपणा. मन आसुसलेय आता.. मला कुणाच्या तरी आसऱ्याची गरज आहे! मला त्याच्या आसऱ्याची गरज आहे”.
न राहवून मी विचारलं, अगदी अशक्य झालं म्हणूनच विचारलं, नाही तर परक्यांच्याबाबतीत... अंबिका या क्षणी परकी नव्हती, "अंबिका, आर यू... आर यू अबसोल्यूटली शुअर, नवीन ईज द वन?”
ती थबकली. तिनं हातांशी चाळा केला. तिनं वरती बघितलं तेंव्हा तिच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलले होते.
"व्हॉट आयम अबसोल्यूटली शुअर ईज.. ईट्स नॉट यू!” मी परत अवाक्. तिचा चेहेरा गंभीर होता. पण तिच्या आवाजात उपहास होता का?
"नॉर एनी वन एल्स! डोन्ट गेट मी रॉंग. आय रिस्पेक्ट यू. पण ऍज अ बॉस, ऍज अ कलीग, ऍज अ... ब्रदर.”
तिच्या चेहेऱ्यावर तिच्या मनातली खळबळ उमटली होती. "यू नो, जेंव्हा मी इथे आले तेव्हा मी आधारच शोधत होते. घटस्फोटाच्या धक्क्यातून सावरत होते. कदाचित तुझ्याकडे आधाराच्या अपेक्षेने बघत होते. पण तुला त्याची जाणीवही नव्हती. तू साधी माझी विचारपूसही केली नाहीस. जमेल तसं तू मला लाथाडलंस.”
मी काही बोलणार इतक्यात तीच पुढे म्हणाली,
"नाही, माझी काही तक्रार नाही. तू केलंस ते बरोबरच होतं रे, तुझ्या दृष्टीनं. तुझी जबाबदारी कंपनी होती, मी नाही! हे ही खरंच की त्याचमुळे मी जरा सावरले. तुझ्याचसारखं मी पण स्वतःला कामात गुरफटून घेतलं. त्यातच शक्ती शोधली. पण नवीन आला आणि माझं जिणं पुन्हा पालटलं, पालवलं. तो माझा शाळामित्र. आल्या क्षणी त्यानं माझ्या हळव्या नसेवर बोट ठेवलं. त्यानं मला मोकळं केलं. दग्ध मनावर फुंकर घातली, आणि... जाऊ दे. तुला एवढं कळलं तरी खूपै. बाकी सगळं तुझ्या सिलॅबसचा भाग नाहीये...” ती हलकसं हसली, आणि माझ्या नकळत मीही स्मितावलो 'च्यामायला..’
आय थिंक वी बोथ अंडरस्टूड इच अदर परफेक्टली!
तिची विचारमग्न नजर दरवाज्याबाहेरच्या लॉनवर खिळली होती. या वर्षी पावसानं ओढ दिली होती. त्यामुळे पाण्याच्या वापरावर बंधनं आली होती. नेहमी हिरवंगार असणारं लॉन, आता करडं-पिवळं पडलं होतं. सरत्या दुपारी, लॉनपलिकडच्या मैदानात वारा धुळीचे लोट उठवत होता.
"हा माझा निर्णय आहे. बरोबर का चूक, आईवडील काहीही म्हणू देत. हा माझा चॉईस आहे... जाऊ दे त्याला परत. आय विल फाइंड माय वे टू हिम”, तिनं समारोप केला.
इट वॉज अ युनीक एक्सपिरीअन्स.
पुण्यात नवीननं लगोलग रिझाईन केलं. दुसरा जॉब घेऊन यूएसला गेला असं कळलं. असो. इथे आम्ही एकत्र रहात होतोच. पण त्या दिवशी जे काही घडलं, त्या विषयी आम्ही पुन्हा कधीही चकार शब्द उच्चारला नाही. काही महिन्यांतच अंबिकाचाही प्रोजेक्ट संपला आणि ती पुण्याला परतली.

---

कालचक्र फिरतच होतं. मी आता लॅंड ऑफ ऑपॉर्च्युनिटी मधे आलो होतो. तिथे नवा प्रोजेक्ट, नवी लोकेशन लीड करत होतो. अंबिका त्या प्रोजेक्टवरही होतीच. पण... पण या वेळी ती वेगळ्या ठिकाणी रहात होती. कारण तिचं लग्न नवीनबरोबर झालं होतं! देव तरी काय जोड्या जुळवतो, धन्य! कधी त्यांच्या घरी जाणं झालं तर त्या कसायाच्या दावणीला बांधलेली ही गरीब गाय, असली विजोड जोडी बघून वाईट वाटायचं. तो पहिला तसा, हा दुसराही असलाच. जणू पुराण कथेतील शापित यक्षिणी होती ती. तिचं नशीबच गांडू... का अतिघाईमुळे झालेल्या चुका... काय माहिती! संसाराच्या चटक्यांनी असावा, तिचा चेहेरा काळवंडला होता. तरीही त्या चेहेऱ्यावरचं हास्य, तिचा उत्साह कधीही कमी झाला नाही. का कोण जाणे, कधी कधी वाटायचं, की ती माझ्या डोळ्यांत काही तरी शोधते आहे... कदाचित आधार, कदाचित तिच्या निर्णयाविषयीची नाराजी.. अर्थात, मी निगरगट्ट होतो! माझ्या लेखी, ती आणि तिचं नशीब...
तिच्या कामातला धांद्रटपणा, अतिघाई चालूच राहिली. पण तिचं असणं, बोलणं, वागणं इतकं सच्चं होतं की क्लायंटनं कधीही तक्रार केली नाही!

---

पुन्हा एकदा अंबिकेबरोबर रहाणं नशिबी होतं. खरं तर, कमनशिबी ती होती.
एका रात्री आमच्या एका कलीगचा फोन आला. अंबिकेच्या घरासमोर पोलीस कार उभी आहे! अमेरिकेतही आम्ही कळपानं रहाणं सोडलं नव्हतं. त्यामुळे बहुतेक सगळे एकाच अपार्टमेंट कॉंप्लेक्समध्ये वा कम्युनिटीत रहात होतो. या कलीगच्या बिल्डींगसमोरच अंबिकाचं बिर्‍हाड होतं. धावत गेलो. डोमेस्टिक व्हायोलन्स. अंबिकेचं ओरडणं ऐकून शेजाऱ्यांनी कंप्लेंट केली होती. नवीनमहाराज नशेत धुत्त होते. अंबिकेचा हात (पुन्हा) मोडला होता! बट अंबिका क्लेम्ड ॲक्सिडेंट. शेजारी सांगत होते, "आम्ही खूप वेळा कोमोशन ऐकतो. पण आज फारच झालं." पोलिसवूमननं अंबिकेला बाजूला घेऊन बरीच विचारपूस केली. पण अंबिका आपल्या म्हणण्यावर ठाम होती. मग मी मधे पडलो. तिला (पोलिसवूमनला) आम्ही अंबिकेची काळजी घेऊ अशी ग्वाही दिली. तिनं तोंडी वॉर्निंग देऊन नवीनला सोडला. मी अंबिकेला तातडीनं बॅग भरायला सांगितली. हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सीत घेऊन गेलो, प्लास्टर घातलं. मग आमच्या अपार्टमेंटवर घेऊन आलो. तिनंही ऐकलं. तीनचार दिवस राहिली होती. या वेळी तिची सेवा करण्याची संधी मला होती! मग‌ नवीन आला. काय बोलणी व्हायची ती झाली, आणि तिची रवानगी पुन्हा दिल्या घरी केली. काय करणार...

---

काही दिवसांतच तिनं कंपनी सोडली. ती आणि नवीन भारतात परत आले. संपर्क तुटला. आजही लिंक्डइनवर तिचं प्रोफाईल दिसतं.  (पण नवीनचं प्रोफाईल दिसत नाही.) चांगली प्रगती केली आहे. कॉन्टॅक्ट करावासा वाटतो. पण कशाला गढे मुडदे खोदून काढावे असा विचार मनात येतो, आणि मी थांबतो.

(समाप्त)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान जमलीय कथा...
काही मुली असे आयुष्याचे मातेरे कसे करून घेतात हे समजण्याच्या पलीकडे आहे.

व्वा, मस्त.
छान लिहिली आहे कथा.
काही मुली असे आयुष्याचे मातेरे कसे करून घेतात हे समजण्याच्या पलीकडे आहे.>>>>>>+११
ही लवकर संपवली असे वाटले.
पुलेशु.

ओह !
प्रेम आंधळं असतं. इथे प्रेमाची व्याख्या परिस्थितीने ठरवली.
तिने निभावली.
तुमचा रोल observer म्हणून राहिला.
छान लिहिता तुम्ही.

छान होती कथा!
अंबिका खूप सुसंगत रंगवलीत!