कॉर्पोरेट कश्मकश

Submitted by Abuva on 31 March, 2025 - 07:35
Microsoft Designer created water colour of a bird in quest of a next in harsh env

गाडी‌ घरासमोर पार्क केली तेंव्हा रात्रीचे अकरा वाजून गेले होते. इंजिन बंद केलं, दिवे मालवले आणि एक क्षण शांत बसलो. दिवसभराच्या उटारेटीचा शीण जाणवला, गात्रांत ओघळला आणि थिजून उरला. डोळ्यासमोर दिवसभरातल्या मारामाऱ्या करूनही उरलेल्या कामांची चित्रं फिरत होती. नजर निवळली तेंव्हा लॉनपलीकडे इमारतीचा कॉरिडॉर आणि माझं खालच्याच मजल्यावर असलेलं अपार्टमेंट दिसत होतं. किचनचा दिवा चालू होता. अचानक भुकेची जाणीव झाली. दुपारचं जेवण चुकलं होतं. पण मग काहीही, काही तरी भरलं होतं. कॉफी ढोसढोस ढोसली होती. चला. जेवावं आणि झोपावं, लगेच.
लॅचमध्ये किल्ली घालतानाच आतून टिव्हीचा आवाज ऐकू आला. अंबिका,... ही अजून जागी आहे? ती समोर सोफ्यावर टीव्ही बघत बसली होती.
"हाय सर, यू आर लेट टुडे"
"हाय अंबिका, येस. बट व्हाय आर यू अप सो लेट? जेवलीस ना?"
अंबिका नाही म्हणाली.
"अरे, जेवून घ्यायचं की! आलोच मी", असं म्हणत मी माझ्या खोलीत गेलो.
अंबिका चारच दिवसांपूर्वी पुण्याहून आली होती. आमचा या देशात प्रोजेक्ट चालला होता. पंधरा-वीस जणं होतो. माझ्यासारखे बरेचसे सिंगल होते. पण दोन-तीन जणं विथ-फॅमिली होते. असा एक छोटा गोतावळा मी हाकत होतो. हे गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकातले दिवस होते. म्हणजे आयटी युगाचे तसे सुरुवातीचे दिवस. भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतांतून आलेली मंडळी इथं दोन तीन प्रोजेक्ट्स मधे गुंतली होती. त्यातलीच एक अंबिका.
हात पाय धुवून कपडे बदलून मी बाहेर आलो. अंबिकेनं तोवर ताटं वाढून घेतली होती. मला जरा अवघडलं. गेल्या काही वर्षांत कुणी तरी आपलं ताट वाढून देतं ही सवय मोडली होती. ती डायनिंग टेबलवर बसून वाट पहात होती.
"अंबिका, तू कशाला हे सगळं.."
"कुछ नही सर. आप थके होगे. तुम्हाला मी घरून आणलेलं अचार वाढू का?" तिनं वाढलं.
"बाकी टवाळ जेवून गेले?"
"हो."
"तू का नाही जेवलीस त्यांच्याबरोबर?"
"..."
आता या मुलीशी काय बोलायचं हा प्रश्नच होता.
काय होतं, सगळ्या बॅचलर्ससाठी मी तेंव्हा घरी मेस चालवायचो. आमची एक हेल्पर होती. तिचे भारतीय पूर्वज काही पिढ्यांपूर्वी वेठबिगार म्हणून या देशात इंग्रज सरकारनं आणले होते. त्यामुळे तिला काही प्रमाणात आपल्यासारखा स्वयंपाक जमायचा. ते आमच्यासारख्या बॅचलर्सच्या पथ्यावरच पडलं होतं! त्यामुळे संध्याकाळी जेवणासाठी सगळे माझ्याकडे जमायचे.  गेले दोन-तीन दिवस ती सगळी गॅन्ग असल्यानं हिच्याशी वेगळं बोलण्याचा प्रसंग आला नव्हता. सगळे जेवायचे. काय उरलंय ते थातूरमातूर आवरून चालायला लागायचे. मी आणि इतर दोघे तिघे जरा सिनियर सुट्टा मारायला लॉनवर किंवा स्विमिंग पूल काठी जायचो. येईपर्यंत अंबिका तिच्या खोलीत दार बंद करून गेली असायची. सकाळी आठपर्यंत आटपून दोघेही बाहेर पडायचो. त्यामुळे तसा बोलण्याचा प्रसंग आलाच नव्हता.
ही वेळ काम कसं चाललंय वगैरे प्रश्न विचारायची नव्हती. म्हणजे मलाच भयंकर कंटाळा, नव्हे वीट, आला होता या क्षणी कामाचे विषय काढायचा, बोलायचा.
"आई-वडील कसे आहेत?" असा एक सावध, सेफ प्रश्न मी टाकला.
"ठीक आहेत. आईला माझी फार काळजी होती. पुण्याला होते तेव्हा मी दिवसातून एक तास तरी तिच्याशी फोनवर बोलायचे. पण इथे आल्यानंतर ते बंदच झालंय. मग आता मी एक इमेल लिहिते तिला. रोज पाठवते. आमच्या शेजारी एक मुलगा आहे त्याच्या ऑफिसमध्ये इंटरनेट आहे. मग तो त्याचा प्रिंट आऊट काढतो आणि घरी नेऊन देतो."
तिचं हे बोलणं चालू असताना आता ही इमेल कधी लिहिते हा प्रश्न मला पडला होता. आम्ही कस्टमर साईटला काम करायचो. म्हणजे कस्टमर टाईममध्ये, कस्टमरचं मशीन, इंटरनेट वापरून... मी तोंड उघडणार इतक्यात पानातल्या लोणच्याकडे नजर गेली. मग तोंडावर आलेले शब्द चवदार लोणच्याबरोबर गिळून टाकले! काय करणार..
तिचा धबधबा वहातच होता. आता ती तिच्या वडीलांविषयी बोलत होती. थोड्या वेळानं माझ्या लक्षात आलं की ती वेगळ्याच व्यक्तीविषयी बोलत होती. कदाचित वडील हा विषय संपला असेल. असावा, म्हंजे!
"डिड आय स्पीक टू मच?"
अचानक ती माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेनं बघते आहे याची मला जाणीव झाली.
मी "सॉरी?" असं विचारलं
"ओह नो, सॉरी, आय मस्ट हॅव बोअर्ड यू..." असं म्हणून ती तिचं ताट उचलून किचनमध्ये गेली. मी डोक्यावर हात मारला. च्यायला..
पण तीच बाहेर येताना हसत म्हणाली, "जास्त बकबक करण्याची खोड आहे माझी."
ती टेबल आवरू लागली. मी सांगितलं तिला, "राहू दे, मी आवरतो. मला सवय आहे."
पण तिनं ऐकलं नाही.
सगळं आटपल्यावर ती तिच्या खोलीत अंतर्धान होण्यापूर्वी मी तिला सांगितलं, की मला बरेच वेळा उशीर होतो. माझ्यासाठी थांबत जाऊ नकोस. सगळ्यांबरोबर जेऊन घेत जा.
"असं कसं? आपण एकत्र रहातो. बरं सर, मी सकाळी डबा करणार आहे. चालेल ना? मधुरा आणि श्रीकला घेऊन येतात, मी पाहिलंय. मला ते लंच रूम मधलं जेवण जात नाही."
"जरूर, जरूर."
"हाऊ अबाउट यू सर?"
"नै, नै, नै, मी लंच घेत नाही!"
"हो, मला सांगितलं मुलांनी. पण का सर?"
"नाही, मी जेवण घेत नाही. मी इकडून तिकडे सारखा जात असतो. जाता येता माझं खाणं होतं."
"पण आता मी बनवते आहे..."
"लूक अंबिका, लेट्स नॉट गो देअर. आय प्रीफर नॉट टू हॅव लंच. ओके?
आणि प्लीज, डोन्ट वेट फॉर मी फॉर डिनर हेन्सफोर्थ. चलो, इट्स लेट नाऊ. गुड नाईट"
विषय बंद.
असं मला वाटलं होतं. पण...
"गुड नाईट, सर. पण तुम्ही सकाळी चहा घेता नं? मग मी तुमचा चहा बनवीन!"
"अगं पण तू कॉफी घेतेस ना?"
"हो, पण माझी आई रोज चहाच घेते. ती मल्याळी आहे ना.. त्यामुळे मला चांगला बनवता येतो. मी करू?"
"बरं कर." मी निरुपायानं शरणागती लिहून दिली. "गुड नाईट!"
या प्रोजेक्ट लोकेशनला इतर दोन मुली होत्या त्या एकत्र रहात होत्या. तिसरीला सामावून घ्यायला त्यांच्या अपार्टमेंटमध्ये जागा नव्हती. बरं, एकट्या मुलीला एका अपार्टमेंटमधे ठेवण्याची चंगळ परवडणारी नव्हती. आणि ते सेफही नव्हतं. मी एकटाच रहात होतो. त्यात मी मानानं सगळ्यात सिनिअर, कंट्री हेड होतो. त्यामुळे सध्यापुरती तरी ही व्यवस्था केली होती. हे जड जाऊ नये... काय माहिती? तसा मी झटकून टाकण्यात तरबेज होतो. पण मुलीबरोबर कसं वागतात बुवा? कोणास ठाऊक...
रात्री दीड-दोन वाजता मला क्लायंटचा कॉल आला. त्यांचं ऑपरेशन सेंटर चोवीस तास, सदासर्वकाळ चालू असायचं. एक बॅच प्रोसेस सांडली होती. पाच मिनिटांत तयार होऊन पंधराव्या मिनिटाला मी ऑफिसमध्ये होतो. पंधरा-वीस मिनिटांत प्रॉब्लेम शोधून फिक्स तयार केला. प्रोसेस रोलबॅक करून ठेवली. क्लायंटचा प्रोग्रामर यायला तीन वाजले. कारण ती आल्याशिवाय फिक्स प्रॉडक्शनमध्ये टाकता यायचा नाही! तरीही नंतर आम्ही दोघेही तिथेच बसून राहिलो. न जाणो पुन्हा पुढे कुठे प्रोसेसमध्ये प्रॉब्लेम आला तर सकाळी सहाच्या आत रिपोर्ट्स डिस्पॅच होणार नाहीत... जनरल लेजरचा फायनल रन झाला अन् मगच मी घरी आलो. तेव्हा सहा वाजत आले होते. आता कुठे झोपायचे? चहा घेतला, आणि आवरायला गेलो. आटपून बाहेर आलो, तर अंबिका तिचा डबा बनवत होती. तिला गुड मॉर्निंग घातला. तर बाईंचा काहीच प्रतिसाद नाही! तेव्हढ्यात ड्रायव्हर आला. त्यानं किल्ल्या घेतल्या अन् गेला. मी बूट चढवू लागलो. तर अंबिका किचन मधून बाहेर आली आणि तावात म्हणाली, " माझ्या हातचा चहा प्यायचा नव्हता तर तसं सांगायचं" आणि फणकाऱ्यात आत निघून गेली. मी अवाक्. आता हिला कोण सांगणार सगळं? च्यायची कटकट! गेली ह्याच्यात...
त्यादिवशी संध्याकाळीही मला यायला आठ वगैरे झालेच. पण सगळ्यांबरोबर जेवण घेता आलं. आठ-दहा जणं असायचे जेवायला. सगळं मिळून तासभर कल्ला असायचा. वरच्या मुली त्यांचं जेवण आटपून यायच्या. मलाही सगळ्यांशी दोन-पाच मिनिटं बोलून काय चाललंय त्यांच्या प्रोजेक्ट्स मध्ये यांचा अंदाज यायचा. कुणाचे प्रॉब्लेम्स असायचे - पैसे, सुट्ट्या, आजारपणं. मग त्याची प्रत्येकाशी चर्चा व्हायची. कुठे टीव्हीवर सीएनएन वा बीबीसीच्या बातम्या असायच्या. एखादा पिक्चर नाही तर एमटीव्ही वगैरे थेरं चालू असायची. गप्पागोष्टी, हास्यविनोद, एकमेकांच्या तंगड्या खेचणं, क्वचित प्रसंगी वादविवाद, असं चालू असायचं! भोजनोत्तर बिडी फुकून झाली, सगळे गेले की टीव्ही बघत बसायचं असा माझा शिरस्ता होता. मी तंगड्या पसरून सोफ्यावर सांडलो तोच अंबिका आली. मी जरा सावरून बसलो! ती एका खुर्चीत बसून टीव्ही पहायला लागली. गप्प होती. मी सवयीप्रमाणे टीएमसी किंवा तत्सम चॅनलवर वेस्टर्न मूव्ही पहाण्यात गुंतलो होतो.
ती म्हणाली, "सॉरी सर, मला माहित नव्हतं की तुम्ही काल रात्रभर कामावर होतात."
"सॉरी काय त्यात?  सिस्टीमला प्रॉब्लेम आला होता. जावं लागतं असं बरेचदा"
"नाही, सकाळी मला वाटलं, की तुम्ही मुद्दाम स्वतःचा चहा बनवून घेतला"
आत्ता मला उलगडा झाला त्या सॉरीचा. तिचा सकाळचा सात्विक संताप अनाठायी होता हे तिला लक्षात आलं होतं. मी‌ च्यायला विसरूनही गेलो होतो!
"हां हां! डोन्ट वरी... माझं जरा बेभरवशाचं काम असतं."
ती थोडा वेळ बसली.
टीव्ही समोरच मला कधी झोप लागली, पत्ता नाही. पण अर्ध्या रात्री ऑपरेशन सेंटरच्या फोननं जाग आली तेंव्हा टीव्ही बंद होता, दिवे मालवलेले होते.
अंबिका दाक्षिणात्य होती. सांगायला हरकत नाही की खाशी सुंदर नसली तरी सुबक होती, चार जणींत उठून दिसणारी होती. चार का, शंभर जणींत उठून दिसणारी होती! आमचे एक सिनियर होते, त्यांच्या ओळखीनं पुण्यात आमच्या होम बेसला लागली होती. तिच्या जॉईनिंगच्या दिवशीच मी पुण्यात होतो. एका मोठ्या, कंपनीसाठी महत्त्वाच्या प्रोजेक्टची धुरा वाहात असल्यामुळे, त्या दिवशी एका ऑल-हॅन्ड्स मीटिंगसमोर माझं प्रेझेंटेशन होतं. यात दोन भाग होते. एक तर प्रोजेक्टची माहिती देणं, आणि दुसरं म्हणजे थोडी जाहिरात! माझा प्रोजेक्ट हा एका थर्ड वर्ल्ड कंट्रीत होता. त्यामुळे यूएस आणि यूकेसाठी जीव टाकणारे सहसा इथे यायला नाखूश असायचे. त्यामुळे आमच्या कंपनीची एक अलिखित पॉलिसी होती, की एक-दोन वर्षं इथे हातपाय मारल्याशिवाय यूएस वा यूकेची संधी द्यायची नाही. असो. तर त्याच दिवशी जॉइन होऊनही अंबिकानं माझ्या सेशनला बराच उत्साह दाखवला होता. आणि त्या दिवसानंतर आता वर्षा-दीड वर्षानं ती इथं आली होती.

अर्थात तिच्या आयुष्यात मधल्या काळात बरंच पाणी वाहून गेलं होतं.

(क्रमशः)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिल आहे.
ही क्रमशः आहे का?
असल्यास पुढचा भाग लवकर टाका

क्रमशः असल्याने कथा वाचली नाही.
माबोवर फार गुंतवून गुंतवून अर्धवट टाकलेल्या कथांचा मी फार धसका घेतला आहे.

कृपया धाग्याच्या नावातच भाग १, भाग २ इत्यादी आणि शेवटच्या भागात अंतिम भाग असे लिहावे ही हात जोडून कळकळीची नम्र विनंती __/\__

तुमचे एकंदर कॉर्पोरेट वर असणारे लिखाण एकदम प्रवाही असते. जबरदस्त हातखंडा आहे तुमचा ह्यात.>+१११