नागपुरी गोळाभात आणि कैरीची कढी #भारत का दिल देखो

Submitted by मनिम्याऊ on 27 March, 2025 - 05:02
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

गोळाभातासाठी :
तांदूळ : २ वाट्या (शक्यतो चिन्नोर किंवा कोलम). भात खूप चिकट व्हायला नको.
बेसन : ४ वाट्या
तांदूळ पीठ : २-३ चमचे
दही : २ चमचे
मसाले : लाल तिखट, हळदपूड, जिरेपूड, धणेपूड, मीठ, हिंग : सगळे चवीनुसार
तेल : ४ मोठे चमचे.

कैरीच्या कढीसाठी
कच्च्या कैऱ्या : २
सुक्या लाल मिरच्या : ४
सुके खोबरे : अर्धी वाटी (किसून घेणे)
आले : १ इंच
जिरे : एक छोटा चमचा
गूळ : जितका कैरीचा पल्प निघेल त्याच्या निम्मा. (कैरीच्या आंबटपणावर गुळाचे प्रमाण अवलंबून असते)
बेसन : दोन मोठे चमचे
घरगुती गोडा मसाला : १ लहान चमचा
फोडणीसाठी : हिंग, मोहरी, कढीपत्ता, मिरची.

क्रमवार पाककृती: 

गोळाभात
प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून निथळत ठेवणे.
मोठ्या परातीत गोळ्यांसाठी घेतलेले सगळे साहित्य एकत्र कालवून घायचं. पाणी घालायचं नाही. त्यात चार चमचे मोहन घालून भरपूर चोळून घेणे. मुठीमध्ये घट्ट वळल्यास बेसनाचा मुठा तयार झाला पाहिजे. असे सगळे गोळे तयार करून घेणे.

कुकरमध्ये धुतलेले तांदूळ आणि मीठ घालून भात मोकळा शिजेल इतके पाणी घालावे आणि त्यात तयार करून ठेवलेले गोळे सोडून नेहमी प्रमाणेच ३ शिट्ट्या देऊन भात शिजवावा. (पातेल्यात करत असाल तर भात आधी अर्धा कच्चा शिजवून नंतर त्यावर गोळे घाला आणि पूर्ण शिजवा )
Golabhaat1.jpeg
.

कैरीची कढी :
कैऱ्या उकडून गर काढून घेणे
मिरच्या, जिरे, सुके खोबरे आणि आले मिक्सर मधून भरड वाटून घेणे.
खोलगट पातेल्यात फोडणीसाठी तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, एका लाल मिरची आणि कढीपत्त्याची खमंग फोडणी करून घ्यावी.
त्यात खोबऱ्याचे वाटण घालून परतून घ्यावे. यातच कोरडे बेसन घालून खरपूस भाजून घावे.

बेसन खरपूस झाले कि त्यात कैरीचा गर आणि गूळ घालावा. गूळ विरघळला की पाणी घालून चवीनुसार मीठ घालावे. वरून थोडा गोडा मसाला घालावा. एक उकळी आली कि मंद आचेवर २-३ मिनिटे शिजवावे.
Kairi kadhi.jpeg

वाढणी/प्रमाण: 
२ ते ३ जणांसाठी
अधिक टिपा: 

१. गोळाभात खाण्याची पद्धत म्हणजे गोळे भातात कुस्करून, त्यावर फोडणीचे तेल घ्यायचे. असेल तर तळलेली सांडगी मिरची चुरायची. आणि मग हादडायचे. आणि कूलरसमोर ताणून द्यायची.
२. हा पदार्थ शक्यतो उन्हाळ्यातच करतात.
३. वाफवलेला दिसत असला तरी भरपूर प्रमाणात तेलाचा वापर असल्याने हा काही सो कॉल्ड हेल्दी पदार्थ नाही Proud . पचायला जरा जडच असतो. त्यामुळे ज्यादिवशी गोळाभाताचा बेत असेल त्यादिवशी जेवणात शक्यतो इतर काही पदार्थ नसतात.

४. गोळाभात आणि कैरीची कढी अनेक प्रकारे करतात त्यातली हि माझ्या आईची पद्धत आहे.
सध्या काही दिवस नागपूरला माहेरपण सुरु आहे त्यामुळे रोज आईच्या हाताचे नवेनवे (कि पारंपरिक?) पदार्थ हादडणे सुरु आहे.

माहितीचा स्रोत: 
आई
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Screenshot_2025-04-13-12-36-06-10_92460851df6f172a4592fca41cc2d2e6.jpg

शेवटी आज योग आला ही कढी करण्याचा मनिम्याऊ.
रंग वेगळाच दिसतोय (गुळ काळसर आहे) पण चवीला एकदम मस्त अगदी तशीच वऱ्हाडी लग्नातली कढी. परत एकदा धन्यवाद.
आता नियमित करणार.

Pages