का तसे म्हटले?!

Submitted by स्वाती_आंबोळे on 14 March, 2025 - 23:52

मला तर खातरी होती व्यसन सुटले, पुरे सुटले
जरासे लक्ष नाही राहिले तर पाय भरकटले!

चढांवर अन् उतारांवर मजेने धावले नाते
कशाला लागले ते जीवघेणे वळण शेवटले

किती आतून बाहेरून कळलो एकमेकांना
किती आतून बाहेरून सारे चित्र पालटले

कशा पडतात गाठी आणि का होतात निरगाठी
असा साधाच पडला प्रश्न अन् काळीज पिळवटले

बरे इतकेच झाले, स्पष्ट सारे बोलले गेले
तरी एकेकदा वाटून जाते, का तसे म्हटले?!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच सुंदर.
अगदी फॅमिली कोर्टात फ्रेम करून लावावी अशी कविता!!
Happy

स्वाती आंबोळे, गझल आवडली.

कशा पडतात गाठी आणि का होतात निरगाठी
असा साधाच पडला प्रश्न अन् काळीज पिळवटले

सुंदर शेर आहे!