काय भुललासी वरलीया रंगा

Submitted by शिल्पा गडमडे on 14 March, 2025 - 21:37

॥१॥
देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे
गोरटे वा सावळे या मोल नाही फारसे

तिच्या सवयीचे रेल्वेस्थानक.. सवयीची गर्दी.. आणि रेल्वेची वाट पाहाणारे लोकं देखील रोजचीच..
रेल्वेला यायला वेळ असल्यामुळे तिने वेळ मारण्यासाठी गर्दीकडे सभोवार नजर फिरवली, तेव्हा तिला दिसला तो चेहरा.. आणि तिला दचकायला झालं. वेगवेगळे ठिगळं जोडून जसं एखादं कापड शिवलेलं असतं तसा शिवल्यासारखा होता त्याचा चेहरा.. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून तिला क्षणभर भीतीच वाटली.. तिने पटकन नजर दुसरीकडे वळवली..

त्यालाही हे जाणवले बहुतेक..

पुढच्याच क्षणी मनात आलेल्या या भावनेची तिला लाज वाटली..तो चेहरा असा होण्यात त्या माणसाची काय चूक? कदाचित एखाद्या जीवघेण्या अपघातातून लढून जिवंत बाहेर पडल्याचं ते लक्षण असेल.. तो माणूस पुन्हा आयुष्य मिळाले म्हणून आभारी असेल देवाचा.. आणि त्या क्षणी तिला मात्र त्या चेहऱ्यापलीकडे बघता येऊ नये..

“नको हा चेहरा डोळ्यासमोर“ क्षणभर का होईना तिला असं वाटून गेलं.. असं वाटणं तिला कितीतरी वेळ, कितीतरी दिवस छळत राहिलं.. ‘त्याला तर अशा नजरा रोजच्याच असतील बहुदा त्यात मी for a change वेगळी प्रतिक्रिया देऊ शकले असते तर’ असा विचार ती करत राहिली. आता कधीही त्या रेल्वे स्थानकावर गेले कि तिची नजर आपसूकच त्याला शोधत असते..
तो चेहरा कधी दिसलाच तर त्याच्यासाठीचं तोंडभर निर्भळ हसू ती देणं लागते..

॥२॥
देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे
गोरटे वा सावळे या मोल नाही फारसे

आराधनाला खूप वर्षानी बाळ झालं. ती खूप खूप आनंदात होती. बाळाला ‘बघायला’ येणाऱ्या नातेवाईकांपैकी अनेकांची पहिली प्रतिक्रिया ‘वा बाळ एकदम गोरंपान आहे’, ‘नाक मात्र गडबड आहे’, ‘बाळ मोठं झाल्यावर एवढं काही उंच नाही होणार’.
इवला जीव जन्माला येतो आणि लोकं मात्र ‘कोणी पगारावर ठेवून नाव ठेवायचं काम’ दिल्याप्रमाणे बाळाच्या रंग-रूप, ऊंचीची मापं काढायला सज्ज असतात. जे निसर्गाने बहाल केलं आहे, जे मिळण्यात आपला काहीच हक्क नाही, say नाही, त्यावरून नाव ठेवण्यात आपलं काय कर्तृत्व?

॥३॥
देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे
गोरटे वा सावळे या मोल नाही फारसे

‘काय गं, आज अगदी मड पॅक लावल्यासारखा चेहरा दिसतोय तुझा’. जरासं कुत्सित हसत ती जिला ‘जिवाभावाची’ मैत्रीण समजायची त्या मैत्रिणीने केलेली ही कमेंट. या कमेंटला एक मोठा काळ उलटून गेला असला तरी ती हा प्रसंग अजूनही पूर्णपणे विसरू शकली नाही. अशा कमेंट येता-जाता कानावर पडत असल्यामुळे तिची काही रंगांशी मैत्री होऊच शकली नाही. दर उन्हाळ्यात घरासमोर बहरणाऱ्या तिच्या आवडीच्या गुलमोहोराचा रंग तिच्या आवडत्या ड्रेसचा रंग कधीच होऊच शकला नाही.. रंगाच्या करून दिलेल्या (संवेदनाहीन) जाणिवांमुळे..

॥४॥
देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे
गोरटे वा सावळे या मोल नाही फारसे

आजकाल जवळपास सगळ्या चॅनेलवर जाहिरातींच्या रूपात तुमच्याकडे कशाची कमतरता आहे याची उजळणी होत असते. गोरा रंग नसेल तर तुम्ही मुलाखतीमध्ये मध्ये नापास व्हाल, आणि फेअरनेस क्रीम लावली तर तुम्ही ‘माठ’ असलात तरी गोऱ्या रंगामुळे जग जिंकू शकता हे सांगितलं जातं. प्रत्येक क्षेत्रात, कपडे, केस, त्वच्या- सर्वत्र हेच चित्र असतं.

या सगळ्या गर्दीत लक्षात राहाते चॅन्टेल विनी.. वयाच्या चवथ्या वर्षी कोड झालेली एक मुलगी आज कितीतरी ब्रॅंडसाठी जाहिरात करते. कोड झाल्यामुळे लहानपणापासून आलेल्या अनुभवांमुळे निराश न होता फॅशनच्या जगालाच नवा चेहरा देऊ पाहतेय विनी.. कोड असलेली मॉडेल अशी ओळख तिला मिळाली असली तरी ती म्हणते..

‘कोड असल्यामुळे मला प्रसिद्धी मिळाली, but It’s Not Who I Am.

ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥१॥
कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥२॥
नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगें । काय भुललासी वरलिया रंगें ॥३॥

"काय भुललासी वरलिया रंगा?" या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने स्वतःलाच विचारायला हवा…

@ शिल्पा गडमडे

१५.०३.२०२५

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलंय.
रंग रूप उंची हल्ली तर वजनही यावरून सगळेच मापं काढताना दिसतात .तेव्हा हे एव्हढंच लक्षात ठेवावं की "आपण स्वतः वर प्रेम केलं की सगळं जग आपल्यावर प्रेम करतं". कालच पाहिलेल्या वेबसेरीज मधलं हे वाक्य आहे जे एका सावळ्या लग्न जमत नसलेल्या मुलीला उद्देशून म्हंटल गेलंय. शेवटी स्वतः वर प्रेम करणारी व्यक्ती सुंदरच दिसते. आणि आत्मविश्वास जो विनी त आहे म्हणूनच ती म्हणते "कोड असल्यामुळे मला प्रसिद्धी मिळाली, but It’s Not Who I Am."

धन्यवाद सिमरन.. "आपण स्वतः वर प्रेम केलं की सगळं जग आपल्यावर प्रेम करतं" हे जाणवून ते आत्मसात करायला वयाची अनेक वर्ष, अनुभव जमावा लागतो.. विनीचं वाक्य मला मनापासून आवडलं.