क्षण एकच विजयाचा

Submitted by Abuva on 14 March, 2025 - 02:34

आला आडवा एक नव-एसयूव्ही वाला
झटक्यात डावी घालूनी उजवा गेला!
चार शिव्या घालण्या उघडला जबडा
वाचूनी पाठची ओवी, उघडाच राहिला..

म्हणे कसा,
देवाची मी करतो पूजा,
करतो जपजाप्य ही
उगा लाभेल देवत्व
म्हणून करतो पापही!

पूजा-जप-पाप?
(ज्यायला याच्या, येवढी मस्ती?)

अर्थ समजण्या अवधी लागला
तेवढ्यात रणगाडा हा सिग्नली अडकला
नशीब, थांबला!
तो थांबला अन् मी त्या पाठी
त्या गाड्यापाठी माझी स्कूटी..

कोण असावा हा महाभाग?
इतके असे पुण्य मायंदाळ
की तागडीत तोलतो
अन् पापांची भर घालून
देवांवर दया करतो?

नसावी ही पुणेरी पाटी
नसावी ही पुणेरी व्यक्ती
निपजला कोण पुण्यात
जयाला झाले पुण्य अती?!

इथले गावगुंडही असती भीरू
यांच्या माजाला आश्वासती गुरू,
गाडी मागे चिकटुनी सांगती,
ठेव थोडी श्रद्धा अन् जमली तर सबुरी,
आहे रे मी पाठीशी, नको भिऊ!

हा तर त्यावरचढ निघाला
डायरेक्ट देवांस वेठीस धरला!

नजर गेली बघण्या नंबर
लक्षात आलं सारं चक्कर
पाटीवर जयकार होता
उदो उदो हे ज्ञातिश्रेष्ठा!

होता असा कोरला तो नंबर
की ट्रॅफिक कॅमेऱ्याचा ही वाढेल नंबर
ही सोय कोण जाणे काय की
पोलिसापासून पाप लपवण्याची?!

होते दोन्ही ब्लिंकर चालू त्याचे
वळायचे कुठे त्याचे त्यास ठावे
धीर कुठे त्यास, मरणाची घाई
इंजनाची फुरफुर मोठी
अन् जोडीस हॉर्न कान फोडी

नव्हताच संयम, सुसाट सुटला
नसताना सिग्नल तसाच घुसला
ट्रॅफिक ची करीत दैना
उडवीत दाणादाण तीन तेरा

अंगावर येतसे धूड पाहुनी
दुचाक्या तिचाक्या आदळती
वळती पळती वाट सोडूनी
हरेकास जिवाची भिती

तो वळला आणि मला दिसला
दिसला तो दांडा बॉनेटला बांधलेला
आणि झळके त्यावरी ध्वज
ओळखीचा!

ध्वज आहे ना, मग बरोबरच आहे!
नियमांची त्यास पत्रास कोठे?
हे तर झेंड्याच्या छत्राखाली
पाळलेले शिकारी कुत्रे!

तोच पाठूनी हॉर्न कर्णकटू
कोणी विनाकारणे लागे केकाटू
हा कोण म्हणून वळून पाहिले,
गाडीआधी तेच ध्वजदर्शन झाले!

होती भली मोठी गाडी पांढरी
काळ्या काचा, आत इसम दाढीधारी
धूत वस्त्रे अंगी, गॉगल काळा डोळ्यावरी
गळ्यात चेना, बोटांत अंगठ्या सोनेरी

हा तर त्याचा नेता,
भोंदू पापभिरू पालनकर्ता
हाच तो नावाचा धनी
खरा पापांचा कर्ताधर्ता
मोकळा करी रस्ता
ज्यासाठी तो शिपुर्डा

ह्या माजुर्ड्याला एस्कॉर्ट हवा
फुकाच्या मोठेपणाच्या वल्गना
अन् नियमांचा बोजवारा उडवा
कारण यांच्या मानापानाच्या कल्पना

आता तुला थांब दावतो बाणा
मनोमनी ठरवून ठाकलो ठाणा
करून स्कूटीच्या बंद इंजिना
अविचल दृष्टी समोर सिग्नला...
(गेलास भोकात...)

अहो आश्चर्यम्!
नव्हतो एकटाच मी
अनेकांचे पित्त खवळले
कित्येकांचे डोके सटकले!

ऐकून त्या कर्णकर्कश हॉर्ना
बघूनी तो अरेरावीचा तोरा
आदळत्या, वळत्या, पळत्या दुचाक्या
थबकल्या, थांबल्या, लायनीत लागल्या
पांढऱ्या गाडीभवती रिंगण धरून उभ्या राहिल्या!

कुणी पोटार्थी,‌कुणी कॉलेजकुमार
कुणी मुलाला आणणारी माता
कुणाची फडकती मोटारसायकल
तर कुणाची जुनाट स्कूटर
कुणी हेल्मेट, कुणी पगडीधारी,
कुणी चष्मा तर कुणी मुखपट्टी

होती जनताच सगळी
सगळीच लव्हाळी
पण मिनिटाभरासाठी
सगळे पहारेकरी,
नियमांचे पालनकरी

जाणूनी तो मूक आवेश,
बंद झाला उन्मत्त घोष
बंद पडला हॉर्न,
आणि इंजिनाचा आक्रोश

जनतेची होता एकजूट,
बनते ती एक वज्रमूठ

बदलला सिग्नल
तेंव्हाच निघाली सारी
(क्वचितच घडते असे की
जनताही नियमांची बूज राखी!)

त्या लोंढ्यापाठी निघाला
मुकाट, गपचुप, शांततेत
शिपुर्डा त्याचा मात्र
उगाचच थैमान करी
पाहुनी सायबाची रीत
पडला मग तोही निपचित

क्षण एकच विजयाचा
उन्मत्त दांडग्यांवरी
समाजाच्या कमकुवतपणाचा
फायदा लुटणाऱ्या लांडग्यांवरी

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults