पिंजरा

Submitted by ध्येयवेडा on 12 March, 2025 - 00:11

वाड्यात आत शिरताच लक्ष जाते ते भिंतीवर लावलेल्या पक्ष्यांच्या भल्या मोठ्या पिंजऱ्याकडे. जेमतेम दोन जोड्यांपासून सुरू झालेलं पिंजऱ्यातील हे कुटुंब आता पंचवीसेक पक्ष्यांचा मोठा परिवार झालेला आहे. कधी त्यांचा चिवचिवाट तर कधी कंठातून निघणारा मंजुळ स्वर मनाला भुरळ घालतोच.

इतका मोठा पिंजरा आणि इतके सारे पक्षी बघून येणाऱ्या-जाणाऱ्यांना खूप कुतूहल वाटते.
असंच एके दिवशी एक मित्र म्हणाला, "किती सुंदर आहेत रे पक्षी, पण पिंजऱ्यात असे बंद केलेले बघवत नाहीत."

"बरोबर आहे तुझं म्हणणं, पण अरे, त्यांना जर असंच बाहेर सोडून दिलं, तर कावळे, घारी मिळून मारून टाकतात बिचाऱ्यांना," मी म्हणालो.

"का बरं? बाकीचे लहान लहान पक्षी व्यवस्थित जगतात की! मग हे का नाही जगू शकत?"

"पुणे म्हणजे त्यांचा नैसर्गिक अधिवास थोडीच आहे? मूळचे आफ्रिकन आहेत ते. त्यांना रोज राळं लागतं खायला, ते इथे कुठे मिळणार? बाहेर सोडलं की सैरावैरा उडत सुटतात, आणि मग मोठ्या पक्ष्यांचे शिकार होतात."

माझ्या या वाक्यानंतर त्यानं काही प्रश्न विचारला नाही, आणि चर्चा थांबली.

संभाषण जरी संपलं असलं, तरी तो विचार माझ्या डोक्यातून जात नव्हता.
पिंजऱ्यातले हे पक्षी थेट आफ्रिकेच्या जंगलातून पकडून आणलेले नाहीत. त्यांच्या अनेक पिढ्या पिंजऱ्यातच गेल्या आहेत. एक पिंजऱ्यातून दुसऱ्या पिंजऱ्यात. पिंजऱ्याचा आकार किती? तर मालकाच्या खिशाएवढा!

पिंजऱ्यात लावलेली मडकी म्हणजेच अंडी घालायची जागा. तिथून आलेली पिल्लं पुरेसे पंख फुटेपर्यंत त्या बंद आणि अंधाऱ्या मडक्यातच राहतात. जसे पंख फुटतात, तसे ती मडक्यातून बाहेर डोकावू लागतात. मडक्याच्या पलीकडेही अजून एक जग आहे, हे त्यांना समजू लागतं.

पुरेशी हिम्मत आली की ती मडक्यातून उंच झेप घ्यायचा प्रयत्न करतात. पण समोरच्या जाळीवर धडकतात, किंवा झोपाळ्यासाठी लटकवलेल्या लोखंडी गाजावर पंख घासून जखमी होतात. कधी कधी धडकल्यामुळे तोल जाऊन खाली पडतात, डोकं फुटतं. काहींच्या जीवावर बेततं, तर काही वाचतात.

एखादा पक्षी चुकून पिंजऱ्यातून बाहेर उडून गेला, तरी रोज आयतं मिळणारं राळं, जाळीवर लटकवलेली कोथिंबीर, किंवा वाटीत ठेवलेलं पाणी कसं मिळवायचं हे त्याला माहीत नसतं. अंडी घालायची मडकी कोणत्याच झाडावर दिसत का नाहीत हे पाहून ते कोड्यात पडतात.

आई-वडिलांनाच हे माहीत नसतं, तर त्यांच्या पिलांना कसं कळणार?

मग जे पक्षी पिंजऱ्यातून बाहेर पडतात, ते इतर पक्ष्यांचे बळी ठरतात! आणि शेवटी त्यांना समजतं – आपलं विश्व किती मोठं? फक्त या पिंजऱ्याएवढं!

भूषण करमरकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद वावे!
वाचत जास्ती असतो सध्या Happy लिहायची इच्छा होत असते, पण काही ना काही कारणामुळे लिहिलं काही जात नाही.

छान लिहिलेय.

पिंजर्‍यातले लवबर्ड्स बघुन नेहमी हेच विचार डोक्यात येतात… यांना बाहेर सोडणे म्हणजे मृत्युच्या हवाली करणे.