#मधुमेहीनो_गोड_खा

Submitted by pltambe@yahoo.co.in on 11 March, 2025 - 07:31

#मधुमेहीनो_गोड_खा
मला गेली २० वर्षांहून जास्तकाळ मधुमेहाची व्याधी जडली आहे.
मला माधुमेहाचे निदान झाले तेंव्हा पासून डॉक्टरांनी माझ्या गोड खाण्यावर पथ्य म्हणून बंदी घातली आहे.
पण गेली २० वर्ष माझा मधुमेह मी नियंत्रित ठेवलेला आहे.
आणि मला गोडाची इतकी प्रचंड आवड आहे की , दुपारच्या व रात्रीच्या जेवणानंतर मला काहीतरी गोड खाल्या खेरीज चैनच पडत नाही.
१५ वर्षांपूर्वी लोकमान्यनगर पुणे येथे झालेल्या एका मधुमेहावरील चर्चासत्रा दरम्यान मी माझी ही 'गोड' समस्या प्रश्नोत्तराच्या वेळी सांगितल्यावर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या डॉ, रघुनाथ गोडबोले व इतर सर्व मान्यवरांनी मला निक्षून सांगितले की, ‘जर तुम्हाला माधुमहाची व्याधी असेल तर ,पथ्य पाळावेच लागेल आणि कटाक्षाने गोड पदार्थ वर्ज्य करणे प्राप्त आहे. याला कोणताही पर्याय नाही. ’
मात्र सर्व मान्यवरांनी दिलेल्या उत्तरा नंतर व सल्यानंतर पुण्यातील ख्यातकीर्त डॉक्टर ह. वि. सरदेसाई यांनी मात्र मला सांगितले की ,तुम्हाला जर गोडा शिवाय चालतच नसेल तर तुम्ही जरूर गोड खा. अजिबात मन मारू नका.
पण त्याच वेळी त्यांनी एक उदाहरण देऊन असेही सांगितले की 'देवाला जसे तुम्ही एका छोट्या चांदीच्या वाटीतून 'नैवेद्य' दाखवता तसे अगदी छोट्या नैवेद्याच्या वाटीतून श्रीखंड,बासुंदी,खीर किंवा एखादा अगदी छोटा मिनी गुलाबजाम अथवा छोटीशी डॉलर जिलबी खात जा.पण त्याची भरपाई म्हणून त्या दिवशी तुम्ही जेवणात अर्धी पोळी कमी खा आणि मागचा भात खाऊ नका. या खेरीज त्या दिवशी व्यायामाचे वेळी अर्धा तास जास्त चाला. असे केल्याने रकातील साखर न वाढता तुम्हाला तुमची गोडाची हौस भागवता येईल.
डॉ. ह, वि. सरदेसाई यांच्या त्या सल्ल्यानुसार मी गेली १५ वर्षाहून जास्त काळ माझी 'गोडाची' आवड पुरेपूर भागवत असतो. आणि तरीही नियमित तपासणीत माझी साखर नियंत्रणात म्हणजेच दिलेल्या ‘मापदंडात’ (within parameters) असते.
माझी आवड पुरवण्यासाठी आम्ही घरी मुद्दाम काहीतरी गोडाचे पदार्थ बनवत असतो किंवा विकत आणून ठेवत असतो.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users