लॉस एंजेलिस नाट्यमहोत्सव

Submitted by rmd on 10 March, 2025 - 13:05

नाटक हा मराठी माणसाचा आवडीचा विषय. त्यामुळे ५ डायमेन्शन्स संस्थेतर्फे आयोजित लॉस एंजेलिस नाट्यमहोत्सवाबद्दल कळल्यावर त्याला हजेरी लावायची हे आम्ही निश्चित केलं. या नाट्यमहोत्सवामधे 'अधांतर' हे दोन अंकी नाटक, आणि दोन एकांकिका असणार होत्या.

सुरूवातीला न्यू जर्सी येथून आलेल्या ग्रूपने अधांतर हे दोन अंकी नाटक सादर केलं. अधांतर हे मुंबईच्या बंद पडत चाललेल्या गिरण्या आणि त्याचे कामगारांवर झालेले परिणाम या विषयावर असलेले जयंत पवार यांच्या सशक्त लेखणीतून उमटलेलं नाटक. रंगमंचावर हे नाटक संजय नार्वेकर, भरत जाधव, ज्योती सुभाष, लीना भागवत यांसारख्या मातब्बर कलावंतांनी हे काही वर्षांपूर्वी आणलं. हे शिवधनुष्य या नव्या चमूने कसे पेललं आहे हे पहायची उत्सुकता होतीच. परंतु या टीमने खरोखरीच उत्कृष्ट कामगिरी केली. प्रत्येक कलाकाराने भूमिकेशी एकरूप होऊन अगदी समरसून काम केले. सगळ्यांची जबरदस्त एनर्जी लागलेली होती. सगळ्यात कमाल केली ते आईचं काम करणार्‍या मानसी करंदीकर यांनी. त्याच या नाटकाच्या दिग्दर्शिकासुद्धा होत्या. मंजू, राणे आणि नरू यांच्या भूमिका करणार्‍या कलाकारांचं कामही विशेष उल्लेखनिय. बाकीच्यांची कामंही सुरेख. नाटकाचे नेपथ्य आणि प्रकाशयोजना उत्तम.

त्यानंतर 'युगांतर' नावाची एकांकिका बे एरियाच्या 'कला' ग्रूपने सादर केली. महाभारत संपल्यानंतर द्रौपदी गांधारीची भेट घेण्यासाठी जाते. त्यांच्यात काय बोलणं झालं असेल? द्रौपदी नेमकं काय बोलायला गेली असेल आणि त्यावर गांधारी कशी व्यक्त झाली असेल याचा हा कल्पनाविस्तार. गांधारी आणि द्रौपदी यांना काय काय वाटून गेलं असेल याचा घेतलेला हा वेध रोचक होता. यात प्रमुख भूमिकेत असलेल्या हेमांगी वाडेकर (गांधारी ) आणि समृद्धी घैसास (द्रौपदी ) यांची कामं छान झाली. हेमांगी मायबोलीकर आहेत हे जाताजाता नमूद करावंसं वाटतं.

महोत्सवातली शेवटची एकांकिका घरची अर्थातच लॉस एंजेलिसच्या अभिव्यक्ती ग्रूपची होती - दार कुणी उघडत नाही. सतीश आळेकर लिखित ही एकांकिका एका पोलिस अधिकार्‍याच्या कथनातून उलगडत जाणार्‍या एका तरूणाच्या आत्महत्येबद्दल आहे. हा तरूण काही चिठ्ठीचपाटी मागे न ठेवता आत्महत्या करतो आणि मग पोलिसांना त्याची डायरी सापडते. त्यातून एक अविश्वसनीय कहाणी समजते आणि आत्महत्येचं कारण सुद्धा. सादर करणार्‍या कलाकारांमधे समीर, सुप्रिया, आणि Anudon या मायबोलीकरांचा समावेश होता. Anudon यांनी या एकांकिकेचं दिग्दर्शन केलं होतं. विशेष म्हणजे अगदी आयत्यावेळी ही एकांकिका सादर करायचं ठरल्यामुळे तयारीसाठी अपुरा वेळ मिळूनही प्रत्येकाने आपापलं काम उत्तम केलं याबद्दल पूर्ण टीमचं विशेष कौतुक वाटलं.

नाट्यमहोत्सवात सामील होणार्‍या सगळ्यांचंच वास्तविक खूप कौतुक वाटलं कारण ही सगळी माणसं आपापले उद्योग सांभाळून, पदरमोड करून ही नाटकं बसवतात. ती सादर करायला इतक्या दूरवर येतात. मात्र याबद्दल कोणाचाही तक्रारीचा सूर लागला नाही. याउलट मराठीबद्दल, मराठी नाटकांबद्दल असलेली तळमळच जाणवली. न्यू जर्सीच्या टीमने ते नाटक दोन महिन्यांत - त्यातही केवळ वीकांताला तालमी घेऊन - बसवले होते. इतकं अवघड नाटक इतक्या कमी वेळात बसवणं म्हणजे खरोखरच कमाल आहे. सर्व नाटकांमधे कलाकारांनी घेतलेली मेहनत लक्षात येत होती.

नाटक संस्कृतीमधला अविभाज्य भाग असलेला बटाटेवडा आणि चहासुद्धा संयोजकांनी उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे महोत्सवाला चार चांद लागले असं म्हणायला हरकत नाही. मात्र सर्व काही उत्तम असलं तरी एक छोटीशी बाब या सगळ्यात खटकली ती म्हणजे वेळेचं नियोजन. ठरवलेल्या वेळेपेक्षा कार्यक्रम अर्धा तास उशीराने सुरू झाला. त्यामुळे पुढे सगळ्यालाच उशीर होत गेला. मधेमधे असलेले ब्रेक सुद्धा थोडे लांबले असं वाटलं. पुढच्या वेळी हे टाळता आलं तर अधिक चांगल्या तर्‍हेने अश्या कार्यक्रमांचा आस्वाद घेता येईल.

५ डायमेन्शन्स संस्था एकांकिका स्पर्धा सुरू करणार आहे हे ही यानिमित्ताने समजलं. तसं झाल्यास भविष्यातही या नाट्यमहोत्सवासारखीच बहारदार नाटकं / एकांकिका पहायला मिळत राहतील अशी आशा आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिले आहे. हे लिहिल्याबद्दल धन्यवाद. Happy
मायबोलीकरांची नावं वाचून छान वाटले. खालून तिसरा परिच्छेद वाचून कौतुक वाटले.

धन्यवाद रुपा आणि निमिष, तुम्ही एवढा प्रवास करून आलात आणि महोत्सवाचा आनंद घेतला. नंतर फाअर वेळ देता आला नाही पण लवकरच भेटु

धन्यवाद अस्मिता आणि आर्च.
कलाकारांना खरंच हॅट्स ऑफ! इतक्या थोड्या वेळात एवढी जबरदस्त तयारी हे खायचं काम नाही.

समीर _/\_
नाटक जिव्हाळ्याचा मामला शिवाय त्यात तुमच्या टीमचं नाटक म्हटल्यावर अर्थात येणारच होतो. Happy सविस्तर भेटूच लवकरच.

मस्त! तिन्ही प्रयोगांची छान ओळख. आवडले.

ही सगळी माणसं आपापले उद्योग सांभाळून, पदरमोड करून ही नाटकं बसवतात. ती सादर करायला इतक्या दूरवर येतात. >>> याबद्दल टोटल रिस्पेक्ट! त्यातही "अधांतर" सारखे नाटक दोन महिन्यात बसवणे अवघड आहे. मी ते नाटक पाहिलेले नाही पण त्यावरचा "लालबाग परळ" पाहिला आहे, त्यावरून अंदाज येतो.

काही वर्षांपूर्वी समीर, सुप्रिया, रार, मुकुल वगैरे बे एरियात आले होते ती नाटके/एकांकिका पाहिल्या होत्या. ते आठवले. नाटके, त्यांच्या अधे मधे गप्पा व नंतर गटग Happy

वा. छानच. सर्व हौशी, व्यावसायिक मायबोलीकरांचे आणि इतरही कलाकारांचे कौतुक.

वृत्तांत सुरेख लिहिला आहेस रमड.

सुरेख वृत्तांत लिहिला आहेस रमड.
अधांतर खरच जबरदस्त नाटक आहे. खरच अंगावर येत.
त्यावर बेतलेला लालबाग परळ सुद्धा फारच वास्तवदर्शी आहे.
बाकीच्या दोन नाटकाबद्दल माहीत नाही पण दोन्हींचे विषय रोचक आहेत.
मायबोलीकर कलाकार आणि संपूर्ण टीमचे खूप खूप कौतुक.

वा. छानच. सर्व हौशी, व्यावसायिक मायबोलीकरांचे आणि इतरही कलाकारांचे कौतुक.

वृत्तांत सुरेख लिहिला आहेस रमड.>> +१

छान आढावा घेत लिहिले आहे.
नाटकं टीम मध्ये माबोकर नावं वाचून जास्त आनंद झाला.

हे सर्व तिथे manage करणे खाउचे काम नाही, सर्व संयोजक आणि मंडळींना विशेष धन्यवाद सांगा.

नाट्यमहोत्सवात सामील होणार्‍या सगळ्यांचंच वास्तविक खूप कौतुक वाटलं कारण ही सगळी माणसं आपापले उद्योग सांभाळून, पदरमोड करून ही नाटकं बसवतात. ती सादर करायला इतक्या दूरवर येतात. मात्र याबद्दल कोणाचाही तक्रारीचा सूर लागला नाही. याउलट मराठीबद्दल, मराठी नाटकांबद्दल असलेली तळमळच जाणवली. >>>> खरंय

त्यानंतर 'युगांतर' नावाची एकांकिका बे एरियाच्या 'कला' ग्रूपने सादर केली. >>>>
कला (CALAA) ला २५ वर्षे पूर्ण झाली. संस्थापक मुकुंद मराठे ह्यांची विस्तृत मुलाखत पान १८४ वर वाचता येईल. त्यात कलाचा प्रवास आणि एकंदरच इकडे नाटक संस्कृती जोपासताना त्यांनी पेललेली आव्हाने, नाटकांवरचे प्रेम बऱ्याच गोष्टी उलगडत जातात.

https://bmm2024.org/smaranika/