उपग्रह इंटरनेट सेवा आणि भारत

Submitted by निमिष_सोनार on 7 March, 2025 - 00:27

सध्या उपग्रह इंटरनेट सेवा चर्चेत आहे. हयूजेसनेट, वनवेब, आणि स्टारलिंक सारख्या कंपन्या भारतात उपग्रह इंटरनेट आणत आहेत. सध्या, स्टारलिंक आणि वनवेबच्या सेवा लाँच होण्याच्या प्रक्रियेत आहेत. एलोन मस्कची उपग्रह ब्रॉडबँड इंटरनेट सेवा कंपनी "स्टारलिंक", भारतात प्रवेश करणार आहे. स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट आता भारताच्या शेजारील देश भूतानमध्ये उपलब्ध आहे. डिसेंबर २०२४ मध्ये अधिकृतपणे भूतानमध्ये स्टारलिंक सेवा उपलब्ध असल्याची पुष्टी केली आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना दुर्गम भागातही हाय-स्पीड सॅटेलाइट इंटरनेटची सुविधा मिळत आहे. भारती एंटरप्रायझेसच्या मालकीची एअरटेल कंपनी सुद्धा भारतात उपग्रह इंटरनेट सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यांच्या उपग्रह इंटरनेट प्रकल्पाचे नाव वनवेब आहे. एअरटेलच्या वनवेबला भारत सरकारकडून काही आवश्यक मंजुरी मिळाल्या आहेत, ज्यामुळे ते लवकरच सेवा सुरू करू शकतात. प्रलंबित सरकारी मंजुरी आणि सुरक्षा चिंतांमुळे भारत अजूनही त्याच्या प्रत्यक्ष सुरुवात होण्याची वाट पाहत आहे. पण त्यामुळे स्पेक्ट्रम वाटप आणि नियामक धोरणांवर वादविवाद सुरू झाले आहेत.

स्टारलिंकच्या आगमनाने, स्थानिक टेलिकॉम कंपन्यांशी स्पर्धा तीव्र होऊ शकते, ज्यामुळे किंमत युद्ध होऊ शकते. एलोन मस्कच्या स्टारलिंकने भारत सरकारने निश्चित केलेल्या प्रमुख नियामक अटींना अधिकृतपणे मान्यता दिली आहे. हे निकष उपग्रह ब्रॉडबँड सेवांसाठी परवाना मिळविण्यासाठी निश्चित केले आहेत. उपग्रह इंटरनेट सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने भारतीय दूरसंचार विभागाने (DoT) अनिवार्य केलेल्या कडक सुरक्षा आणि डेटा स्टोरेज नियमांचे पालन करण्यास स्टारलिंकने सहमती दर्शविली आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) उपग्रह सेवांसाठी स्पेक्ट्रम वाटप आणि किंमत निश्चित करण्याची पद्धत ठरवण्याच्या प्रक्रियेत आहे. या वर्षाच्या अखेरीस उपग्रह ब्रॉडबँड सेवा सुरू होण्याची अपेक्षा अधिकाऱ्यांना आहे. वनवेबच्या माध्यमातून, एअरटेल भारतातील दुर्गम आणि ग्रामीण भागांमध्ये जलद आणि विश्वसनीय इंटरनेट सेवा प्रदान करण्याचा उद्देश ठेवत आहे.

स्टारलिंकचा सर्वात मोठा स्पर्धक वनवेब आहे , जो जागतिक कनेक्टिव्हिटीवर लक्ष केंद्रित करून लो अर्थ ऑर्बिट (LEO) उपग्रह इंटरनेट प्रदान करतो. एअरटेल वनवेब व्यतिरिक्त स्टारलिंक सोबत, जिओ सॅटकॉम, आणि अमेझॉन कुइपर सारख्या कंपन्या देखील भारतात सॅटेलाइट ब्रॉडबँड लाँच करण्याच्या शर्यतीत आहेत. जिओ आणि एअरटेलने आवश्यक अनुपालन पूर्ण केले आहे, ज्यामुळे स्पेक्ट्रम वाटप झाल्यानंतर त्यांना सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा सुरू करण्यास मार्ग मोकळा होईल.

इंटरनेट सेवा प्रदान करण्यासाठी स्टारलिंक लो-अर्थ ऑर्बिट (Low Earth Orbit) या प्रकारच्या उपग्रहांवर अवलंबून आहे, ज्याद्वारे हाय स्पीड इंटरनेट सेवा मिळेल आणि पारंपारिक पायाभूत सुविधा नसलेल्या भारतातील दुर्गम खेडेगावांसाठी ते एक वरदान ठरेल. कोणत्याही सॅटेलाइट इंटरनेटपेक्षा फायबर जवळजवळ नेहमीच वेगवान, अधिक विश्वासार्ह आणि अधिक किफायतशीर असते. पण फायबर सर्वत्र उपलब्ध नाही. सामान्य ढगाळ हवामान स्टारलिंकवर परिणाम करणार नाही. पण वादळी ढग सिग्नलवर परिणाम करू शकतात कारण ते पाऊस निर्माण करतात ज्यामुळे सिग्नलमध्ये व्यत्यय येऊ शकतो.

फायबर इंटरनेटच्या बाबतीत 1 Gbps ते 10 Gbps पर्यंत वेग मिळू शकतो, प्रतिसाद वेळ (Latency) खूप कमी असते, म्हणजे ऑनलाइन गेमिंग, व्हिडिओ कॉल आणि लाइव्ह स्ट्रीमिंग उत्तम चालते. हवामानामुळे फारसे अडथळे येत नाहीत. उपग्रह इंटरनेटच्या बाबतीत वेग कमी म्हणजे 100 Mbps ते 250 Mbpsपर्यंत मिळतो स्टारलिंक मध्ये थोडा जास्त मिळेल. यात लेटन्सी जास्त असते कारण सिग्नल अंतराळात जाऊन येतो, त्यामुळे विलंब (Latency) जास्त असतो, विशेषतः गेमिंगसाठी ते अयोग्य आहे. हवामानाचा प्रभाव – पाऊस, ढगाळ वातावरणामुळे इंटरनेट स्लो होऊ शकते.

उपग्रह इंटरनेट कोणासाठी योग्य आहे? तर ज्या भागात फायबर किंवा 4G/5G सेवा नाही, दुर्गम भागात राहणाऱ्या व्यक्ती किंवा संशोधक, तसेच बोट, विमान, लष्करी किंवा आपत्ती व्यवस्थापन सेवा आणि भरकटलेल्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांसाठी (जसे की डोंगराळ प्रदेश, जंगली भाग). लो-अर्थ ऑर्बिट (LEO) उपग्रह इंटरनेट प्रमाणेच जिओस्टॅशनरी (GEO) उपग्रह इंटरनेट सुद्धा असते. जिओस्टॅशनरी मध्ये उपग्रह हा पृथ्वीपासून 35,786 किमी उंचीवर स्थिर असतो आणि त्यामुळे तुलनेने मोठ्या प्रदेशासाठी कव्हरेज मिळते. लो-अर्थ ऑर्बिट मध्ये उपग्रह पृथ्वीपासून फक्त 500-1200 किमी उंचीवर असतो, त्यामुळे वेगवान सेवा देते पण प्रदेश कव्हरेज कमी असते. उपग्रह इंटरनेट सेवा महाग असून डिश इंस्टॉलेशन आवश्यक असते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे जर स्वस्तात उपलब्ध झाले आणि सातत्याने चांगली सेवा मिळाली तर वर्क फ्रॉम होम करणारे बरेच जण ग्रामीण भागात / छोट्या शहरांत जातील आणि तेथून काम करू शकतील. फक्त बेभरवशाच्या विजेसाठी इन्व्हर्टर ची सोय करावी लागेल .

स्टारलिंक वेगवान असेल पण तेव्हढीही स्वस्त नसणार आहे. त्या सेवेसाठी हजारो ( सात हजार? ) LEO उपग्रह अवकाशांत काम करित आहेत. इतर अनेक कंपन्या त्यांचे उपग्रह सोडणार आहेत किंवा तशा योजना आहेत. २०३० पर्यंत लाखो उपग्रह अवकाशांत असतील. LEO क्षेत्रांत उपग्रहांची वर्दळ प्रचंड प्रमाणांत वाढणार आहे.

उपग्रहांचे आयुष्य संपल्यावर ते कधी तरी पडणार आहेत किंवा पाडावे लागतील, नव्हे आता पडायला सुरवातही झाली आहे. हे उपग्रह पृथ्वीवर one piece आदळत नसले ( विघटन आणि अवकाशात जळतील अशी अपेक्षा आहे ) तरी आपण अवकाशांत foot print सोडणार आहोत. अवकाश हे एक क्षेत्र राहिले होते, तिथेही आपण आता प्रदूषण करणार.
या अगणित उपग्रहांच्या अस्तित्वामुळे अवकाश तसेच जमिनीवरच्या दुर्बिणींच्या कार्यात उपद्रव वाढण्याच्या शक्यतेबद्दल( खगोलशास्त्राचा अभ्यासकांनी भिती चिंता वर्तवली आहे.

https://indianexpress.com/article/technology/science/elon-musk-starlink-...

आपल्याला काही सुविधा मिळत असतील तर त्यांच्या दुष्परिणामांचाही ( असतील तर ) विचार व्हायला हवा. Happy

ग्रामीण भागात जायचं दिवसात वेळ मिळेल तसं कंपनीचं काम करायचं. फावल्या वेळात गावात जनजागृती करायची. त्यांना रात्रीचे तारे दाखवायचे. त्यांची मदत घेऊन गावात वीज तयार करायची. एक मोठी गाडी घेऊन त्यातच मुक्काम ठोकायचा. शेवटी वर्क फ्रॉम होम संपून कंपनीने परत वर्क फ्रॉम ऑफिस सुरू केलं की गावच्या लोकांची आठवण काढून जॉबला रामराम ठोकायचा आणि तिकडे जाऊन गावच्या लोकांसोबत कुस्ती खेळायची.

ह्याचा वापर ग्रामीण आणि दुर्गम भागात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी किंवा वैद्यकीय सेवांसठी केला गेला तर अधिक उत्तम.