शब्दधसका

Submitted by प्रकाश घाटपांडे on 5 March, 2025 - 01:50

तुम्ही एखाद्या विशिष्ट नावाचा किंवा शब्दाचा धसका घेतला आहे का? ओनोमाटोफोबिया (Onomatophobia)म्हणजे विशिष्ट शब्दांची किंवा नावांची त्यांच्या कथित महत्त्वामुळे होणारी असामान्य वा असाधारण भीती . ही विशिष्ट नावे वा शब्द ऐकण्याची उच्चारण्याची दुर्भिती आहे. ओनोमाटो (म्हणजे शब्द) आणि फोबिया (म्हणजे भीती) या शब्दांचे मूळ ग्रीक आहे.
फोबिया लिस्ट वेबसाइटवर ५०० हून अधिक नामांकित फोबिया आहेत, त्यांची ग्रीकाळलेली नावे व वैशिष्ट्ये पाहिले तर चक्क हास्यास्पद वाटावीत असे ते फोबिया आहेत.
जब पचास-पचास कोस दूर गांव में, जब बच्चा रोता है, तो मां कहती है बेटा सो जा, सो जा नहीं तो गब्बर सिंह आ जाएगा हा शोले मधील डायलॉग खूप फेमस झाला होता. त्यामुळे अनेक मुलांनी गब्बर या नावाचा धसका घेतला असेल. सुदैवाने अशा नावाची व्यक्ती त्यांच्या परिचयात व संपर्क क्षेत्रात नसल्याने या धसक्याचे रुपांतर ओनोमाटोफोबिया (Onomatophobia) मधे झाल नसाव. काही माणसे विशिष्ट नावांनी किंवा शब्दांनी ट्रिगर होतात. अस्वस्थ होतात. ही अस्वस्थता वाढली की ते संभाषण दुसरी कडे वळवतात किंवा कलटी मारतात. लोकांच्या ते लक्षात ही येत नाही. कॉलेज मधे माझा एक मित्र होता तो डुक्कर या शब्दाने फार अस्वस्थ व्हायचा. घाणेरडा प्राणी म्हणून ई असे उदगार येण्या इतपत ते मर्यादित नव्हत. त्या मागे काही तरी इतिहास असावा असे मला वाटायचे. कदाचित "डुक्कर" असे संबोधून त्याचा एखाद्या सुंदर मुलीने चारचौघात अपमान तर केला नसावा? ही शंका मला यायची. पण मी त्याला तसे विचारले नाही. म्हणल कशाला मित्राला दुखवा? मी कधी मग त्याच्या समोर तो शब्द उच्चारला नाही. दुर्दैवाने तो आज हयात नाही. भेटला असता तर मी त्याला इतक्या वर्षांनंतर सुद्धा तुला डुक्कर या शब्दाचा फोबिया आहे का? असे विचारले असते.
आमच्याकडे बिट्टू नावाचा एक भुभु होता. नावाला फक्त भुभु घरातला मेंबर . बायको वा भुभु यातले एकच जण घरात राहू शकते असा तिढा निर्माण झाला असता तर मी बायकोला सोडले असते. तर अशा या बिट्ट्याला अंघोळीचा जाम फोबिया होता.जबरदस्तीने अंघोळ घालायला लागायची. त्याला आपल बोलण पण समजायचे. आता बिट्टूला अंघोळ घातली पाहिजे असे आम्ही आपापसात बोलत असलो तर "अंघोळ" शब्द आला की हा लगचे खोलीतून कलटी मारायचा. कधी पलंगाखाली लपून बसायचा. म्हणजे बिट्ट्याला पण ओनोमाटोफोबिया (Onomatophobia) होता. त्याच्या मृत्युनंतरच त्याची त्यातून सुटका झाली.
ताई माझी सवात मोठी बहिण. ही मी लहान असताना तिचे लग्न झाले. त्यानंतर लगेचच बाळंतपणात ती वारली. तिची नुकतीच जन्मलेली मुलगी पण वारली. ताईला सासुरवास होता अशी कुजबुज नातेवाईकात होती.ताईचे सासर दुष्ट होते का? तिचा छळ करायचे का? हे मला माहित नाही. पण नंतर च्या काळात माझ्या दोन नं च्या बहिणीने माईने जेव्हा तिच्या मुलीचे लग्न जुळवताना स्थळ पहाताना ताईच्या नवर्‍याचे नाव किंवा आडनाव येणार नाही अशीच स्थळे पाहिले. चुकून जरी ती नावे दिसली तरी ती त्यावर काट मारत असे.
पुर्वानुभवातील एखाद्या कटु स्मृती मुळे वा अनुभवामुळे किंवा समजुतीमुळे एखादे भय मनात इतके घर करुन राहते की नामसाधर्म्यामुळे पुढील आयुष्यात येणार्‍या संबंधित नावाच्या व्यक्तिशी संपर्क देखील टाळला जातो. अगदीच न टाळण्यासारखी असेल तर किमान आपण स्वत:ला तिच्या पासून दूर ठेवतो.
मी 1995 च्या दरम्यान कॉंप्युटर घेतला. त्या नंतर पुढे इंटर नेट ही आले. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा म्हणून त्याबरोबर व्हायरस देखील आले. त्यावेळी अशा व्हायरस पासून आपला संगणक वाचवण्यासाठी ॲंटीव्हायरस चे प्रोग्राम पण आले. दै.सकाळ मधे त्याच्या छोट्या जाहिराती यायच्या. त्यात एक जाहिरात यायची आपला संगणक व्हायरसपासून मुक्त करण्यासाठी आमचा हा प्रोग्राम इन्स्टॉल करा. संपर्क *** असे म्हणून एका सेल्स गर्ल चा फोन नं दिला होता. आता *** ही माझ्या ओनोमाटोफोबिया (Onomatophobia) चा विषय होती. त्यामुळे मला गरज असतानाही मी antivirus टाकण्याचे टाळत आलो. कारण त्यासाठी मला *** ला फोन करावा लागणार होता. आपण फोन केला अन "ती"नेच उचलला तर? नको बाबा! रिस्क! अरे पण आता ती व्यक्ती लग्न होउन पुणे सोडून गेली आहे. ती कशाला तुझ्याशी बोलेल? आणि तिचे हे क्षेत्रही नाहीये. पण फोबियाला तर्कसुसंगती मानवत नसते. दुधाने तोंड पोळले तर माणूस ताकही फुंकून पितो. मी शेवट पर्यंत फोन केला नाही. मी antivirus सुद्धा अगदी अलिकडे म्हणजे 8-10 वर्षात टाकला. Quick Heal हे नाव बघून on line install केला म्हणजे कुणाला फोन करायला नको.कदाचित Quick Heal या नावाचा परिणाम माझ्यावर होउन माझाओनोमाटोफोबिया (Onomatophobia)दूर होईल.
पुर्वी मी रहात होतो तिथे सोसायटीत *** नावाची एक बाई होती. मी तिची नजरानजर सुद्धा टाळत असे. नकोच ती भानगड! तुम्हाला हसू येत असेल. कदाचित मी अतिशयक्ती करत आहे असेही वाटत असेल. पण तसे नाहीये. मलाही आता ते आठवले की हसू येते. कदाचित हे फोबिया प्रदीर्घ काळानंतर सौम्य होत असतील. मी त्यासाठी स्वयंउपचार केले. मी स्वयंघोषित मानसशास्त्राचा वाचक विद्यार्थी असल्याने मला मानसशास्त्रातील काही भाग माहिती आहे. ओसीडी, फोबिया यासाठी मानसशास्त्रातील अनेक थेरपी वापरतात. अशाच एका थेरपीच नाव आहे ERP exposure response prevention ज्यात रुग्णाला ज्याची भीती वाटते वा रुगण ज्या परिस्थितीपासून पळ काढतो त्याच परिस्थितीशी सामना करण्यासाठी त्याला प्रवृत्त करुन त्याची भीती घालवायची. पुर्वी पोहायला शिकवताना मुलाला तलावात काही सुरक्षितता बाळगून ढकलून द्यायची पद्धत वापरत. असे केल्याने त्याची पाण्याची भीती मरते असे सांगितले जाई. तसेच काहीसे.
अरे पुरुषासारखा पुरुष अन बाईच्या नावाला घाबरतो? अरे हाड! थू! तुझ्या जिंदगानीवर! एवढं संवेदनशील राहून चालतय का आजच्या जगात? कोलायला शिक! घंटा तुला काही फरक पडत नाहीये. लोक अनेक धंदे करुन जगाला कोलतात. तू म्हणजे साने गुरुजींचा शाम आहेस झालं! दरोडेखोरांच्या टोळीत एखाद्या उचल्याने पापक्षालनासाठी आत्मपीडन करुन स्वत:ला शुद्ध व सिद्ध करण्याचा यडपटपणा आहे. अरे जग तुला मोजत पण नाही. कोण तू?उगीच जगाला स्वत:ला दखलपात्र करण्याच्या प्रयत्नात मेषपात्र होउ नकोस! साला बाई -बाटली मधली बाटली तुला चालते अन बाई म्हणल्यावर का रे टरकते? जा "बुधवार पेठे"त जाउन नळकुंडी साफ करुन ये. असा आत्मसंवाद करुन विद्रोही मनाने मला दिलासा देखील दिला. ERP ची देखील मदत घेतली. ज्या *** पासून लांब पळत होतो त्यांच्याशी जाणीव पुर्वक जवळीक करण्याचा प्रयत्न केला. काही दगाफटका झाला असता तर विद्रोही मन सोबत होतेच. सुदैवाने दगा फटका झाला नाही.

शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे; अरे बाबा, नावात बरंच काही आहे! नाव सोनुबाई अन हाती कथलाचा वाळा अशी आपल्याकडे म्हण आहे. एखादे नाव डोळ्यासमोर आले कि त्याची गुणवैशिष्ट्ये मेंदुत तयार होत असतात. आपल्या साधनेत व्यत्यय तर आला नाही ना असे म्हटले की ‘सखाराम गटणे’आठवतो. पायजमा-झब्बा घालणारा, जाड भिंगाचा चष्मा घालणारा, हातातली पुस्तकं सावरणारा, गळ्यात शबनम काहीसा धांदरट आणि डोळ्यांत ‘छप्पन सशांची व्याकुळता’ एकत्र साठलेला मनुष्यविशेष मग डोळ्यांसमोर येतो.मधुशालेतून लटपटत्या पायांनी बाहेर पडणाऱ्या, चप्पल घालण्यासाठी स्वत:शी झटापट करणार्‍या , संध्याकाळ झाली की टाकण्याची भाषा करणार्‍या मद्यप्रेमीला पाहताच, त्याला आपण ‘तळीराम’ म्हणून संबोधतो. सूट बूट कोट, गळ्यात स्टेथोस्कोप असणार्‍या डॉक्टर चे नाव तळीराम आपल्या पचनी पडेल का? मी काळे नावाची अत्यंत गोरेपान माणसे पाहिली आहेत व गोरे नावाची काळी ढुस्स माणसे ही पाहिली आहेत. अशा विसंगतीतून विनोद निर्मिती फार पटकन होते. या विसंगती कदाचित ओनोमाटोफोबिया (Onomatophobia) कमी करायला मदत करत असावीत.
पुर्वी जन्माला आलेली मुले फारशी जगायची नाहीत. चांगली देवादिकाची नावे ठेवून ही जगायची नाहीत. मग त्याच्यावर उतारा म्हणून मुलाचे नाव दगडू, धोंडू, भिकु अशी ठेवली जात. मग ही मुले जगली व मोठी झाली व मान्यवर झाली कि दगडोपंत, धोंडोपंत, भिकाजीपंत अशा नावारुपाला येत. नथुराम हे नाव असेच आले. नथुरामच्या आईने तिला सारख्या मुली होत. मुलगा व्हावा म्हणून नवस बोलली कि जर मुलगा झाला तर मी त्याला नथ घालेन. नथ घालणारा मुलगा तो नथुराम. गांधीजींच्या खुनामुळे तो बदनामरुपाला आला. बदनाम हुवा तो क्या नाम तो हुवा।

टिळकस्मारकला मी व्याख्यानांना जायचो. मी जिकडे जाईल तिकडील भुभु मंडळी एका शिट्टीवर माझी दोस्त बनतात. तिथे असाच एक कोब्रा भुभ्या होता.गोरा आणि घारा. मी त्याला शिट्टी वाजवून बोलावले. तिथल्या एका माणसाने मला सांगितले की त्याचे नाव मोदी आहे. मी त्याला "मोती" "मोती" म्हणून बोलवायला लागलो. तर तो माणूस म्हणाला कि "मोती" नाही त्याचे नाव "मोदी" आहे. मी म्हटल मोती काय मोदी काय माझ्यासाठी तो भुभु मित्रच आहे. मी मोदी भक्त ही नाही व मोदी द्वेष्टाही नाही. मग त्याने त्याचे तपकिरी गार गार नाक हुंगताना माझ्या हाताला लावले. मग मी खाली वाकून त्याच्या गार गार नाकाचा स्पर्श माझ्या कानाला व गालाला करुन स्वत:ला सुखावून घेतले. हे भुभु लोक्स जेव्हा गार गार नाकाने माझा कान हुंगतात तेव्हा त्यांच्या मिशीमुळे होणारा गुदगुल्या करणारा स्पर्श व गार गार नाकाचा स्पर्श यांचा एकत्रित परिणामाने अंगावर रोमांच उभे राहतात.स्वर्ग सुख म्हणतात ते हेच!
उगाच का तुकाराम महाराज म्हणतात
नामसंकीर्तन साधन पै सोपे । जळतील पापे जन्मांतरीची ।।
न लगती सायास जावे वनांतरा । सुखे येतो घरा नारायण ।।

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख चांगला आहे. नवा शब्द कळला. मला 'इंग्लंड' च्या उल्लेखाचा धसका बसलेला. तो औषधांनी गेला. पण त्या शब्दातच बायपोलरचा उगम होता माझ्याकरता. कारण आठवण निगडित होती. शब्द आला की हातपाय कापत, रडू येई आणि भयंकर वाटू लागे.

सामो, बर्‍याचदा आपण अशा शब्दधसक्याशी संलग्न असलेली स्मृती ही मनाच्या कप्प्यात बंद करुन ठेवली असते. कधी गोपनीयता तर कधी खाजगीपणा अशा सामाजिक संकेतांमुळे आपण त्याचे तपशील टाळतो. तपशील उघड केले तर आपण हास्यास्पद वा केविलवाणे ठरु या भीती पोटी ही आपण ते टाळतो. अगदी मित्रांमधे सुद्धा आपल्याला कमीपणा येईल वा मित्र टिंगल टवाळी करतील अशा समजूतीने किंवा भीतीने आपण ते शेअर करीत नाही.
आता डुक्कर या शब्दाचा ओनोमाटोफोबिया बाबत मी मित्राला सामाजिक संकेतामुळे वा दुखवायला नको म्हणून असलेली उत्सुकता तशीच दाबून ठेवली. त्याच्या निधनामुळे ते अनुत्तरीत च राहिले. मी स्वत: *** बाबतचा ओनोमाटोफोबिया गेली तेहतीस वर्षे बंद कप्प्यातच ठेवला होता. मला स्वत:ला त्यावेळी देखील व आत्ता देखील ते हास्यास्पद वाटते. तरी ही तो होता. मी स्वत:च स्वत: वर ERP थेरपीचा उपचार केला.

मला इथे काही सदस्यांची नावे बघितली की शब्दधसका बसतो. (बोकलत, तुम्ही नाही हो त्यात. #बोकलत लोगों के दिलो मे रहता है ) Happy

इंटरेस्टिंग..
अर्थात त्रास होणाऱ्यांना वाईट.
पण हे असे असते आणि इतके कोणाला त्रासदायक होत असेल याची कल्पना नव्हती.

मला पण एका शब्दाचा धसका आहे. पण त्याचे कारण वेगळे आहे. प्रेमभंगाची केस. तिचे नाव कुठे अचानक ऐकले तर आता पुन्हा त्याच आठवणी डोक्यात येणार आणि त्रास देणार याची भीती वाटते. बरे ते नाव म्हणजे मराठीतला एक शब्द आहे. बोली भाषेत फार प्रचलित नाही पण वाचनात कधीतरी येतो. तेव्हा असा डोक्याला शॉट लागतो, अरे यार कश्याला उगाच हे वाचले असे होऊन जाते..
कधी फेसबुक सजेस्टेड फ्रेंड मध्ये ते नाव दिसले तर त्याचा एक वेगळाच त्रास होतो. त्या नावाची जगात दुसरीही मुलगी आहे हे पटतच नाही Sad

>>> मला इथे काही सदस्यांची नावे बघितली की शब्दधसका बसतो.

मला एक दोन सदस्यांची नावे पाहून हायसे वाटते, बाकी भयावह वातावरण वाटते

Lol

(वेमांची व प्रशासकांची माफी मागून)

(हल्ली हसण्याचे स्मायली दिले नाहीत तर हलकीफुलकी कंमेंट आहे हे कळत नाही हा एक निराळाच आयाम)

बेफिकीर Proud
यापेक्षा वाईट म्हणजे जेव्हा कोणाला आपला उपरोध कळत नाही..
त्या वेळी तर तू नेमके याच्या उलट म्हणाला होतास म्हणून पकडायला येतात..
अरे देवा तो उपरोध होता असे म्हणताच आता पलटी खाल्लीस म्हणून नाचू लागतात..
मायबोली इज ए फन Happy

मला एकच भिती वाटते. युनोहू ची!
पण आमचे मास्तर म्हणतात, "फीअर ऑफ नेम इनक्रिजेस द फिअर ऑफ थिंग इट सेल्फ " सो ऑल्वेज युज द प्रॉपर नेम्स फॉर थिंग्ज्स! Happy

बसतो खरा धसका लोकसनी.
आता आमचंच बगा की.
साधासरळ माणुस मी, पण चार सिणेमात काम केलं अन लोकासनी आमच्या नावाचा धसकाच बसला की वो!
पण आमी काय त्यासनी दोष देत नाही.
समदे आकलनाचे ढंग. पांडुरंग पांडुरंग!

सिनेमाचा विषय काढला म्हणून ' सुजाता ' चित्रपट आठवला. एक बेवारस मुल एका फोरेस्टरची पत्नी ( सुलोचना ) आपल्या मुलीसारखी प्रेमाने वाढवते. फक्त, तिची कुणालाही ओळख करून देताना " हमारी बेटी " न म्हणता, " हमारे बेटी जैसी " असं म्हणते; तो " जैसी " शब्द त्या मुलीच्या नेहमी खूपच जिव्हारी
लागतो व तें नूतनने फारच प्रभावीपणे दाखवलं आहे. अर्थात, शेवटी हा धसकादायी " जैसी" शब्द गळून पडतो व त्या मुलीला " हमारी बेटी " संबोधलं जातं , हे चित्रपटाचं सार आहेच !!!

काही वेळा नावाचा अगदीच धसका घेतला नसला तरी ती नावे आपल्याला आवडत नसतात, त्यामुळे आपणे ते उल्लेख टाळतो. आमच्या खात्यात एकाचे नाव पोपट होते त्याला ते आजिबात आवडत नसे. आता खेडेगावांत ते आई वडिलांनी ठेवलेले काय करणार. शहरात आल्यावर त्या नावाची लाज वाटू लागली. शेवटी त्यानी गॅजेट करुन ते नाव अधिकृत पण बदलून प्रदीप घेतले व शासकीय कागदपत्रांवर ते बदलून घेतले. आमच्या डोक्यात त्याचे जुने नाव पोपट हेच रजिस्टर असल्याने त्याला पोपट असे संबोधले जाई.