BMC - बेसिक मौटेनीरिंग कोर्स

Submitted by अजित केतकर on 4 March, 2025 - 10:34

BMC अर्थात "बेसिक मौटेनीरिंग कोर्स"

"मी BMC केला.. तू पण कर आवडेल तुला". बहिणीने मला किल्ली मारली. आजपर्यंत BMC म्हणजे बॉम्बे म्यू. कॉर्पो. हेच माहिती होते. पण हे BMC म्हणजे 'बेसिक मौटेनीरिंग कोर्स'. बहिणीने इतर जुजबी माहिती दिली आणि 'चांगली तयारी करून जा' असा इशारा वजा सल्ला दिला.

अंतरजालावर शोध घेतला. हा कोर्स भारतातील अनेक संस्थांमध्ये उपलब्ध असला तरी पर्वतारोहण क्षेत्रातील मानबिंदू असलेले दर्जिलिंगचे HMI (हिमालयन माऊंटेनीरिंग इन्स्टिटयूट) आणि उत्तरकाशीचे NIM (नेहरू इन्स्टिटयूट ऑफ माऊंटेनीरिंग) यांच्याकडे केलेल्या या कोर्सला भारतात तोड नाही आणि जगात मान्यता आहे असे समजले. यूट्यूबवर हिमांशीचा खूप छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पहिला आणि बरीचशी कल्पना आली. NIM च्या माहितीपत्रकात या कोर्ससाठी तयारी म्हणून १५ किलो वजन पाठीवर घेऊन १ महिनाभर तरी रोज ५ किमी चालायचे असे सुचवलेले पाहून धडकीच भरली. एवढे जमेल का आपल्याला? बहिणीशी पुनः बोललो तर ती अगदी सहज बोलून गेली "त्यात काय एवढे.. होऊन जाईल...तयारी चांगली कर".

अजून थोडी माहिती मिळवून "प्रयत्न तर करून बघू" असा विचार करून जायचे ठरवले. ४० ते ५५ वर्षे वयोगटासाठी हा कोर्स फक्त NIM मधे उपलब्ध असल्याचे समजले. तो सुद्धा वर्षातून सप्टेंबरच्या एकाच बॅचमधे. २४ सालातील ही बॅच फुल्ल झाल्याने सप्टेंबर, २०२५ मधे जागा मिळाली. बहीण म्हणाली NIM वाले खूप समजून घेणारे आहेत त्यांना २०२४ साठी विनंती करून बघ. आणि खरंच वाढत्या वयाचे कारण दिल्याने एका विनंतीवर मला सप्टेंबर २०२४ ची २८४ बॅच मिळाली.

तयारी सुरु झाली. या कोर्स आधी जून मध्ये गौमुख तपोवन ट्रेक करायचा होता. त्यासाठी रोज ५ किलो वजन पाठीवर घेऊन ५ किमी चालणे सुरु केले होतेच. त्यातच आठवड्याला वजनात २ किलो भर टाकायचे ठरवले... पण तपोवन ट्रेक झाल्यानंतर. उगाच काही त्रास झाला तर तपोवन ट्रेक रद्द करायला नको. जून मध्ये तपोवन ट्रेक छान झाला. पाठीवरचे वजन ठरवल्याप्रमाणे वाढवून चालायला सुरुवात केली आणि जुलै अखेर १५ किलोवर पोहोचलो. आता NIM ने सुचवल्या प्रमाणे सराव ऑगस्ट महिनाभर करता येणार होता. हळूहळू १५ किलो वजन घेऊन ५-६ किमी चालणे सहज जमायला लागले. पाऊस असताना घरातच फेऱ्या मारून, जिने चढ-उतर करत सवय चालू ठेवली. सप्टेंबर मधे नौपाडा ते येऊर असा ८ किमीचा व शेवटी चढण असलेला टप्पाही वजनासह जमला आणि कोर्स साठी सज्ज झालो.

अगदी शेवटचे काही दिवस NIM व्यवस्थापनाने त्यांच्या साईटवर २८४ बॅचचा ग्रुप केल्याने इतर प्रशिक्षणार्थी संपर्कात आले. कायप्पा गट झाला. गप्पांना उधाण आले. माझ्या मुंबई हरिद्वार ट्रेनने येणारे तन्वी आणि यश हे दोन साथीदार मिळाले.

अखेर १२ सप्टेंबरला निघालो. सगळे सुरळीत झाले तर आता कोर्स पूर्ण करूनच १२ ऑक्टोबरला परतायचे. तन्वी आणि यश भेटले. ट्रेन मध्ये गप्पा रंगल्या आणि साधारण आमच्याच वेळेला हरिद्वार ते उत्तरकाशी प्रवास करु इच्छिणाऱ्यांचा कायप्पावर ग्रुप झाला. हरिद्वारला उतरल्यावर रिमझिम पावसात जीप-ग्रुप जमा झाला. बाकीच्या सोबत्यांचे प्रथमदर्शन झाले. ओळख परेड झाली. काही तयारी करून आलेले तर काही बिना तयारीचे आलेले होते (किंवा तसे भासवत असावेत). पण सगळेच प्रचंड चार्ज झालेले उत्साहात होते. थोड्या गप्पा, चहा झाल्यावर जीप केली आणि संध्याकाळी चारच्या सुमारास उत्तरकाशीला पोहोचलो. गावाच्या थोडे आधी उजव्या बाजूला ठरलेल्या पिकअप point पाशी उतरलो आणि आमचा ताबा मिलिटरीने घेतला.
IMG-20241214-WA0004.jpg
भारतीय सेनेच्या ताब्यात

काही शिकण्यासाठी भारतीय सेनेच्या ताब्यात असणे ही एक सुखद जाणीव होती. कडक युनिफॉर्म मधले अधिकारी, प्रशिक्षक येऊन जाऊन आपुलकीने चौकशी करत होते, आमच्या प्रश्नांना उत्तरे देत होते. त्यातील प्रसन्न व्यक्तिमत्व आणि त्याहून प्रसन्न हास्य चेहऱ्यावर असलेल्या एका अधिकाऱ्याने सुरुवातीलाच त्याच्या प्रेमळ, लाघवी बोलण्याने बहुतांची मने जिंकली होती. पुढे एक दोन दिवसांत हाच अधिकारी NIM उपप्रमुख आणि संस्थेचा डॉक्टर असल्याचे आम्हाला कळले.

नांव नोंदणी केली आणि विम्याचे पैसे भरले. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जमा झालेल्या मंडळींना दोन बस मधून NIM मधे नेण्यात आले. अतिशय स्वच्छ, नीट नेटका, आखीव रेखीव असा अप्रतिम NIM परिसर पाहून खूप छान वाटले.
IMG-20241214-WA0011.jpg
सुंदर NIM परिसर

आता इथेच जवळपास महिनाभर रगडपट्टी करून घ्यायची होती. पोहोचताच आम्हाला बंक बेड असलेल्या एका मोठ्या हॉलमधे पाठवण्यात आले. खालचे सगळे बेड अधीच्या प्रशिक्षणार्थिंनी भरलेले होते. कोपऱ्यातल्या एका वरच्या बेड वर सॅक टाकली आणि कॅम्पसमधे चक्कर मारायला बाहेर पडलो. छान थंडी होती. उंच देवदार वृक्षांच्या गर्दीत नागमोडी फिरणारे कळेभोर रस्ते फारच सुरेख दिसत होते. अंधार पडू लागल्यावर रस्त्यांच्या मधोमध आणि दोन्ही कडांना बारीक दिवे चमकू लागले. डोक्यावरच्या निरभ्र आकाशात चांदण्या आणि समोरचे हे दिवे एकमेकांशी सौंदर्याची स्पर्धा करत होते. रात्रीच्या जेवणासाठी घंटा झाली. एक मजला खाली जेवणाचा हॉल होता. सेनेच्या शिस्तीत थाळ्या घेऊन रांगेत सर्वाना सुग्रास जेवणाचे वाटप चालू होते. मनसोक्त जेवून आयुष्यात पहिल्यांदा बंक बेड "वर" झोपलो. सकाळी ५ वाजता घंटा गजर, चहा, ६ वाजता नाश्ता आणि ७ वाजता "फॉल इन" अशी पूर्ण कोर्स भर साधारणपणे दिवसाची सुरुवात व्हायची. "फॉलिन" हा खास 'सेनाशब्दप्रयोग' असावा. याचा अर्थ नेमून दिलेल्या गटांचे एकेका रांगेत सरळ रेषेत उभे रहाणे. हे तपासायची पद्धत अगदी सोपी.. सर्वात पुढे उभ्या असलेल्या गट प्रमुखाशिवाय प्रत्येकाला फक्त आपल्या पुढच्याचेच डोके दिसत असले पाहिजे आणि दिलेल्या वेळेपर्यंत गटातील सगळे जण हजर असल्याची खात्री गट प्रमुखाला पाहिजे!!
'फॉलिन' चा पहिलाच अनुभव घेतल्यावर थोडेसे व्यायाम झाले. उद्यापासून हळूहळू चढत्या क्रमाने व्यायामाचे रूपांतर रगडपट्टीत करून आम्हाला या कठीण कोर्सला सामोरे जायला तयार तयार करणार असल्याची कल्पना देण्यात आली. NIM परिसरात फिरताना पायात कायम शूज आवश्यक असल्याचे आणि मुख्य प्रवेशद्वारा पलीकडे जायची कोणालाही परवानगी नसल्याचे सांगून नाश्त्यासाठी पाठवण्यात आले. खाण्यापिण्यात पौष्टिक अन्न देण्यात येत होते. शाकाहारी मंडळींना जास्तीचे चीज द्यायचे. सगळ्या कोर्स चे वेळापत्रक सूचना फालकावर लावण्यात आले होते. त्याप्रमाणे वेळेचे काटेकोर पालन करण्यासाठी सर्वांना बजावण्यात आले.

साधारण १०० हून जास्त जणाची आमची बॅच होती. त्यात सेनादलात काम करणारे, आमच्यासारखे ४० वर्षांहून अधिक वय असलेले, स्त्रीया, उत्तराखंड मधील स्थानिक आणि बाकी तरुणमंडळ अशी विभिन्नता होती. आमचे १५ गट करण्यात आले. या गटांना रोप १, रोप २...रोप १५ असे संबोधण्यात आले. प्रत्येक रोप मधे सेनादलातील, वय ४०च्या पुढील, स्थानिक, स्त्रिया यांची शक्य तेवढी सामान विभागणी करून सर्व रोप्स मध्ये क्षमतेचा समतोल ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. आता पूर्ण कोर्स होईपर्यंत ही विभागणी राहणार होती. आमचा रोप ८ होता ज्यात सेनासेवक राजा, तरुण गडी राहुल, प्रतिक, कार्तिक, स्थानिक सुधांशु आणि चाळीशी पार केलेले हेमेन आणि मी असे ७ जण होतो.
दुपारी पर्वतारोहण संबंधीत विवीध विषयांची माहिती देण्यात आली. एक दिवस शेजारील डोंगरावर सरावासाठी (की प्राथमिक क्षमता चाचणी साठी??) नेऊन आणले. दुर्दैवाने यावेळी एका मॅडम चा पाय मुरगळला. डॉ चे दोन दिवस बरेच प्रयत्न चालू होते, पण यश येत नव्हते. त्यांना रोजचा व्यायामही करता येईना. पुढचा दमछाक करणारा कोर्स विचारात घेऊन शेवटी त्यांना कोर्स सोडून घरी जाण्यासाठी सांगण्यात आले.

दुसऱ्या दिवशी प्रत्येक रोप साठी एकेक खोली देण्यात आली. त्यामुळे आमचे स्थलांतर बंक बेड हॉल मधून बंक बेड स्पेशल रूम मध्ये झाले पण इथेही माझी वर्णी 'वरती'च लागली. एकत्र रहायला मिळाल्यामुळे रोप सोबत्यांसोबत भरपूर गप्पा आणि छान ओळखी झाल्या.
IMG-20241214-WA0007.jpg
आमची बंक बेड स्पेशल रूम

रोज सकाळी "फॉलिन" नंतर तास दीड तास व्यायाम चालू झाला. यात NIM पासून गावाच्या दिशेने एक दीड किलोमीटर धावत उतरून तेवढेच धावत वर येणे, धावताना पावलागणिक जमिनीला हात लावणे, हात वर ठेवत, धावणे आणि धावून आल्यावर ३०-४० मोठ्या पायऱ्या दोन पायांनी उड्या मारत चढणे असे प्रकार होते. हे झाल्यावर जागेवर उड्या, जोर, वैठका, असे इतर व्यायाम व्हायचे. या वेळात कोणालाच ५ सेकंदही स्वस्थता मिळणार नाही याची पूर्ण काळजी आमचे प्रशिक्षक घेत होते.

एक दिवशी दुपारी उपकरणांचे वाटप आणि शारीरिक तपासणी झाली. मोठाच सोहळा होता. मोठी मजबूत सॅक (९०लिटर्स ची ), योग मॅट, स्लीपिंग बॅग आणि लाईनर, हेल्मेट, हारनेस, कॅरॅबिनेर्स, छोटा रोप, खडकावर घालायचे रबरी शूज, बर्फात घालायचे शूज, क्रॅम्पॉन (शूज खाली खिळ्यांची जोडणी), ऍक्स, टिफिन, पाण्याची बाटली, चमचा, चहा-मग, विंटर सूट, जॅकेट आणि कचरा टाकायला छोटी पिशवी असे वैयक्तिक सामान प्रत्येकाला देण्यात आले. शिवाय चामड्याच्या हात मोज्यांचे ४ जोड आणि मोठे (३० ते ५० मीटरचे) दोन रोप हे प्रत्येक रोपसाठी सामायिक असेही देण्यात आले. आता हे सगळा कोर्स होईपर्यंत वापरायचे आणि सांभाळायचे. काही हरवले तर किंमतीच्या काही पट वसुली होणार होती. परिसरात ठीकठिकाणी रोपसोबत्यांनी आपापलं सामान मांडून ठेवले होते. सर्वांनी आपापले सगळे सामान - मुख्य म्हणजे सॅक धडधाकट, दोषरहीत आहे ना ते तपासले. प्रशिक्षकही त्यांच्या नेमलेल्या रोपमंडळींच्या समानाची तपासणी करत होते. जे ठीक नव्हते ते बदलून आणायला सांगत होते. स्नो शूज, रबर शूज, क्रॅम्पॉन आपल्या पायांना बरोबर बसतात याची खात्री करून घेतली. जे सामान ठीक नव्हते ते सर्व बदलून घेतले.

सरावाचा ट्रेक झाल्यानंतर ६-७ दिवस "टेखला" ट्रेनिंग कॅम्प ला जायचे होते. हे NIM पासून साधारण ९ किमी होते. रोज पाठीवर सॅक घेऊन जायला सुरुवात झाली. रोज थोडे थोडे वजन वाढवायच्या सूचना देण्यात आल्या. थोडा चढ उताराचा रस्ता होता. उत्तरकाशीच्या जंगलातून थोडी पायवाट आणि बराचसा डांबरी घाट रस्ता आणि शेवटी दगडी पायऱ्यांची थोडी खडी चढण अशी एकूण वाट लावणारी वाट होती. पाठीवर एकसारख्या सॅक घेऊन झाडीतून शिस्तबद्ध जाणारी आमची १०० जणांची सरकती रांग गावकरी, पर्यटक मोठ्या कौतुकाने पाहायचे. लांबून आमची रांग नक्कीच हिरवळीवर चालणाऱ्या एखाद्या लांब अळी सारखी भासत असावी. वर टेखलाला विवीध प्रकारचे खडक, शिळा होत्या. त्यावर आम्हाला प्रस्तारारोहणाचे, दोराच्या साहाय्याने वर चढायचे, जुमार वापरायचे, खडकात मारायचे विविध प्रकारचे खिळे, त्यांचा आणि रोपचा वापर, विविध प्रकारच्या गाठी, रोप गुंडाळायच्या पद्धती व त्यांचे उपयोग असे अनेक धडे देण्यात आले आणि भरपूर प्रात्यक्षिके करून घेतली. आमचे प्रशिक्षक चेष्टा करण्यात पण पटाईत होते. मी पहिल्यांदाच जुमार वापरत ५० मीटरच्या दोरावर चढायला सुरुवात केली तेव्हा पहिले ४-५ फूट चढल्यावर माझे हात भरून आले आणि मी ओरडलोच "सर जी नही हो रहा है | उतार दो नीचे| " तर सर मिश्किलपणे हसत म्हणाले "अब या तो उपर चढो नही तो लटके रहो जहाँ हो !! नीचे नही आ सकते... याद करो जुमार कैसे काम करता है| जय जुमार | " आणि निघून गेले की.. मग थोडा विचार आणि प्रयत्न केल्यावर जमले झकास "जय जुमार" आणि पोहोचलो वरच्या टोकाला.. मग भेटल्यावर खांद्यावर हात ठेवत सर म्हणाले "उतार देता तो जुमारिंग जिंदगी भर नही सीख पाते". या अनुभवी प्रशिक्षकांना किती ताणायचे बरोब्बर माहिती होते. सहज कोणाला सूट देत नव्हते.
IMG-20241214-WA0008.jpg
प्रस्तारारोहणाचे धडे

दुपारी जेवण झाल्यावर तेथील झाडांच्या सावलीत काही लेक्चर्स असायची. एकूणच पूर्ण निसर्गाच्या सांनिध्यात चालू असलेले हे प्रशिक्षण वेगळाच आनंद देत होते. शरीर जेवढे थकत होते तेवढेच मन उल्हासित होत होते.

टेखलाहून परतताना मात्र सगळ्या गलितगात्र मंडळींना NIM पर्यंत यायला सेनेच्या बसेस होत्या. तरुण दणकट मंडळी बसच्या शिड्यांवर, टपावर पटापट चढून सगळ्यांच्या सॅक टपावर रांगेत ठेवायचे आणि बाकीचे आपापले थकलेले देह बसमध्ये ढकलायचे. अर्ध्या पाऊण तासाच्या या परतीच्या प्रवासात बरेच जण गाढ झोपून जायचे. संध्याकाळी पाच साडेपाचला NIM मध्ये आल्यावर थोड्या वेळाने एखादे लेक्चर आणि मग जेवण होऊन दिवस संपायचा. रात्री जेवण झाल्यावर NIM च्या शांत निसर्गरम्य परिसरात चांदण्यात नहात फेरफटका मारायला फार मजा यायची. पण रात्री "९ च्या आत घरात" अशी तंबी दिलेली असल्याने थोड्याच वेळात खोलीत परतावे लागे.

टेखला चे शेवटचे दोन दिवस पूर्ण सामान घेऊन जायला सांगितले होते. यामुळे जे जाऊ शकले त्यांना चांगली सवय झाली. ज्यांची क्षमता नव्हती किंवा नशीब नव्हते त्यांना ताप, इतर तब्येतीची कुरकुर झाली आणि ते घरी परतले.

अधून मधून पाऊस पडत होता त्याप्रमाणे कपडे वाळवण्याच्या दृष्टीने धुलाई ठरवायला लागत होती. सकाळी हवामानाचा अंदाज घेऊन एक दोनदा टेखला ऐवजी NIM मधेच योगासने, चढाईभिंतीवर चढायचा सराव, इतर शारीरिक व्यायाम असे ऐनवेळी बदललेले वेळापत्रक होते.

वरच्या कॅम्पला जायच्या दोन दिवस आधी संध्याकाळी NIM च्या बसेस आम्हाला उत्तरकाशी गावात घेऊन गेल्या. कोणाला काही सामान घ्यायचे असेल त्यांच्यासाठी आणि सर्वांनाच उत्तरकाशीमध्ये थोडा फेरफटका मारण्यासाठी ही व्यवस्था. मग कोणी पोंचो, कोणी क्रीम कोणी थंडीचे अधिक कपडे, मोजे घेतले. चाट साठी बऱ्याच दिवसांचे भुकेले होते त्यांनी बाजारात खाऊ गल्लीत ताव मारले. रात्री थोड्याश्या पावसात बस मधून सर्व जण NIM मध्ये परतलो .

एक दिवस डॉक्टरांनी आमच्या दृष्टीने भयंकर असे प्रात्यक्षिक दाखवले. Hypothermia ही अति थंडीमुळे होणारी शरीराची अवस्था. ही अवस्था येण्याआधी थंडी वाढत गेल्यावर शरीरात होणारे बदल प्रत्यक्ष दाखवण्यासाठी डॉ नी दोन स्वयंसेवक मागितले. त्यांना उघडे होऊन नदीच्या पाण्यात डुबकी मारुन २० मिनिटे खांदयापर्यंत पाण्यात उभे करणार होते आणि त्यांच्या शरीरात होणारे बदल बाकीच्यांना प्रत्यक्ष दाखवणार होते. आठ दहा जण तयार झाले. त्यातील दोन स्थानिकांना निवडून बसने सगळे जण नदीपाशी पोहोचले. त्या दोघांच्या सुरक्षितातेसाठी लागणारी सर्व व्यवस्था नदी काठावर तयार केली आणि त्या दोघांना शर्ट काढून नदीच्या थंड पाण्यात डुबकी मारुन उभे केले. आवश्यक ती खबरदरी घेण्यासाठी डॉ जातीने त्या दोघांवर लक्ष ठेवून काठाजवळच उभे होते. Hypothermia च्या दिशेने शरीर जाताना एका सुरक्षित टप्प्या पर्यंत या दोघांचे तापमान कमी झाल्यावर त्यांना बाहेर काढले आणि आमच्यापैकी काही जणांकडून प्रत्यक्ष उपचार करून घेतले. रुग्णाला ब्लॅंकेट मध्ये कसे गुंडाळायचे, लागले तर गरम पाण्याची पिशवी कशी, कुठे ठेवायची, उष्णता रोधक आवरण कसे गुंडाळायचे या सगळ्याचे प्रात्यक्षिक दाखवले. नदीकाठी हा अभ्यास म्हणजे एक वेगळाच अनुभव होता. हे सगळे छान प्रकारे पार पडल्यावर NIM प्रमुख तिथे आले आणि त्यांचे केदारनाथ आणि इतर ठिकाणी प्रलय आला तेव्हाचे रेस्क्यू ऑपेरेशन मधील भयंकर अनुभव सांगितले. अर्थात त्याचे कोणीही रेकॉर्डिंग करायचे नाही ही अट घालूनच.

NIM प्रमुख आणि उपप्रमुख यांची लेक्चर्स नियमित होत होती. आज दोघांनीही सगळ्यांना पुनः संबोधित केले. वरच्या कॅम्प मध्ये जाताना आणि गेल्यावर विशेष काळजी काय घ्यायची, पाणी भरपूर प्यायचे, एकही खाणे टाळायचे नाही. काही नाही तर दोन तीन वाट्या डाळ तरी प्यायचीच अशा अनेक महत्वाच्या सूचना अतिशय आपुलकीच्या भावनेने दिल्या. वय ४०च्या पुढच्या म्हाताऱ्यांची डॉ कडून रोज तपासणी होत होती. आज पुनः सगळ्यांची तपासणी झाली. काही जणांप्रमाणे मलाही उच्च रक्तदाब असल्याने गोळ्या वाढवून दिल्या. हट्टाने पुढे जायचे नाही आणि डॉ नी सांगितले की आहेस तिथून परत फिरायचे असे बजावले.

उद्या बर्फातले ट्रेनिंग घ्यायला वरच्या कॅम्प्स साठी निघायचे होते. पहिल्या दिवशी अंदाजे १४ किमी अंतरावर "तेल" कॅम्पला मुक्काम करून दुसऱ्या दिवशी पुढच्या "गुज्जर हट" कॅम्प ला पोहोचायचे होते. मग गुज्जर हटच्या पुढे जवळच बेस कॅम्पला जायचे. बेस कॅम्पला १०-१२ दिवस राहून वर बर्फात ट्रेनिंगला जाऊन येऊन करायचे होते.

आजचा दिवस उद्याची तयारी करण्यासाठी होता. सगळे सामान, वैयक्तिक कपडे, औषधे सॅक मध्ये कसे मावेल असा सर्वांनाच प्रश्न होता. पण NIM चे प्रशिक्षक उत्तम मार्गदर्शन करत होते. "और ठुसो.... और दबाओ अंदर... जुते क्यों खाली छोडें? घुसाओ कपडे जुते के अंदर... ठुस ठुस के" अशी सर्वत्र बोंबाबोंब चालू होती. एकूण वातावरण मजेशीर होते. सॅकच्या वजनाचा उभा आडवा समतोल साधत, गरजेनुसार आधी व नंतर लागणारे सामान क्रमाने लावत सर्व सामान राहिले पाहिजे. शिवाय गटाचे सामान आलटून पालटून घेण्यासाठी जागा शिल्लक हवीच. बाहेरच्या कप्प्यामध्ये उद्या सकाळी पाण्याची बाटली, जेवणाचा डबा आणि एखादे फळ ठेवायला जागा ठेवत सॅकने आकार घेतला. आजपर्यंत सगळ्यात जास्त वजनाची सॅक झाली होती. वीस किलो पेक्षा अधिक वजनाची आणि साधारण अडीच फूट उंचीची जमिनीवरची सॅक आपली आपल्याला खांद्यावर चढवायची सवयही करून घेण्यात आली होती.

बाकी सगळी तयारी झाली, संध्याकाळच्या फॉलिनच्या वेळी सर्व प्रशिक्षकांनी कोणाला काही अडचण नाही ना याची खात्री केली. तब्येतीची विचारपूस केली. "सब फिट है?" या रोजच्या प्रश्नाला "येस्सर" असे रोज वाढत्या जोशात उत्तर मिळत होते. आता कोर्स करून परते पर्यंत फोन बंद असेल म्हणून घरी फोन झाले. खूपश्या उत्साहात आणि थोड्याश्या तणावात जेवून झोपलो.

सकाळी नाश्त्या सोबत जेवणाचे डबे भरून घेतले. जास्तीचे सामान एका नेमून दिलेल्या खोलीत ठेवले आणि आमची खोली रिकामी केली. सुचनेप्रमाणे सर्व जण NIM परिसरातील एका छोट्या टेकडीवरील देवळात जाऊन देव दर्शन घेऊन आले. सॅका टपावर चढवल्या गेल्या आणि सात वाजता बसेस निघाल्या. तासाभराच्या प्रवासानंतर भुक्की या गावापाशी थांबल्या. इथून डांबरी रस्ता सोडून पायी प्रवास चालू. सॅका टपावरून उतरल्या आणि पाठीवर चढल्या. पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि सर्व रोप्सनी रस्ता सोडला. थोडेसे उतरून एका पुलावरून नदी पार केली. पलीकडच्या वस्तीतून वाट काढत मुख्य चढाईला लागलो. वस्ती, रस्ता मागे पडले आणि लहान लहान दिसत नजरेआड गेले. या पहिल्याच चढणात दोन मुलींनी हिम्मत सोडली. अजून थोडा प्रयत्न करावा असे सगळ्यांनी सुचवले पण एवढी वजनी सॅक घेऊन पुढे सलग दोन दिवस चढाई करायचे त्यांना शक्य वाटले नाही आणि त्या परतल्या. बाकीच्यांनी आपापल्या क्षमतेनुसार वेग धरला. अनेक जण ताप असतानाही गोळ्या घेऊन हिम्मत करत होते. काही जणांना तर टायफाईड झाला होता. पण त्यातील कोणीच मागे हटले नाहीत. सगळे जण आपापल्या रोप मध्ये चालत होते. एका ओहोळापाशी शंभर जणांना टेकायची सोय पाहून जेवणाचा थांबा झाला. थोड्या विश्रांती नंतर निघून तासाभरात आम्ही तेल कॅम्प ला पोहोचलो. मागची मंडळी पोहोचेपर्यंत आधी आलेल्यांचा थोडा वेळ आराम झाला. झुकत्या उन्हात, सोनेरी शिखरे पहात रांगेत बसून एकमेकांच्या पाठी, खांदे, माना चेपून देताना आणि घेताना फार मजा आली. सुदैवाने तंबू लावलेलेच होते त्यामुळे थोड्या वेळाने तयार तंबू घरांचे वाटप झाले. खांद्यावरचे वजन उतरल्यावर खूप हलके वाटू लागले. प्रत्येक ठिकाणी भोवतालचे निसर्ग सौंदर्य आणि स्वच्छ हवा यांनी दमलेल्या शरीरात लगेच उत्साह भरत होता. संध्याकाळी शेजारच्या टेकडीवर मोकळ्यापाठींनी फेरफटका झाला. उद्या कोर्समधील सगळ्यात कठीण दिवसाला सामोरे जायचे. रोपमध्ये चालताना मी आणि हेमेन थोडे मागे पडत होतो. आम्हा दोघांमुळे रोप-८ मागे पडू नये म्हणून आमच्यातील तरुण मंडळींनी मोठ्या रोप्सचे अधिक वजन त्यांच्याचकडे ठेवायचे ठरवले. नियमानुसार सामायिक वजन अळीपाळीने सर्वाकडे द्यायचे सांगितले असले तरी अशा वेळी आमच्यासारख्यांना दिलेली सूट ही रोप साठी कौतुकास्पद ठरायची.
सकाळी पाच.. सहा.. सात वाजता दुखऱ्या खांद्द्यांवर पुनः सॅक घेऊन सगळे निघाले.
आजचा दिवस परीक्षेचा होता. काहींनी काठ्या घेतल्या होत्या. प्रत्येक रोप सोबत दोन प्रशिक्षक लक्ष ठेऊन होते. थोड्या थोड्या वेळाने "कुछ तकलीफ तो नही ना?" असे खूप आपुलकीने विचारत होते. काल संध्याकाळी एनर्जी बार, सुका मेवा असा पोषक खाऊ वाटण्यात आला होता. तो खायच्या सूचना देत होते. आम्हा उच्च रक्तदाबवाल्यांकडे सगळ्यांचे विशेष लक्ष होते. आज सकाळच्या टप्प्यात एकदम खडी चढाई होती. तिथे सर्वांचीच खूप दमछाक झाली. कालच्या प्रमाणेच जेवणाचा थांबा झाला. त्याशिवाय साधारण दर तासाने एक छोटासा ब्रेक होत होता. पण तो अगदी पाचच मिनिटे.. लगेच शिटी..की निघाले सगळे. जास्त वेळ थांबले की शरीर थंड होते आणि पुनः वेग घ्यायला वेळ लागतो.. पायात गोळे येऊ शकतात म्हणून मोजकीच विश्रांती. आज दुपारच्या जेवणानंतर मात्र बरेच अंतर बाकी होते. खरे कोणी सांगत नव्हते. अजून थोडे आहे, एकच चढाई आहे अशी खोटी आशा दाखवत आम्हाला हाकत होते... कारण अंधार पडायच्या आत पोहोचायचा प्रयत्न होता. गुज्जर हट कॅम्प वरचे अधिकारी सतत वॉकि टॉकी वर ग्रुपची विचारपूस करीत होते. मार्गदर्शन करत होते. संध्याकाळी ४ नंतर माझे पाय नाही म्हणू लागले. वजन पेलेनासे झाले. अधून मधून झोक जाऊ लागला. मग एकतर काही वजन दुसऱ्याकडे देणे किंवा आधारासाठी कोणाचा तरी हात धरून चालणे हे दोनच पर्याय होते. आधीच सगळ्यांकडे एवढे वजन असताना माझ्याकडचे वजन कोणाकडे द्यायला मन धजावले नाही. मग रोपसोबती राहूलला हात धरून मला काहीसे खेचत न्यायला सांगितले. हे बरोबर जमले. आयुष्यात पहिल्यांदाच मला कोणी तरी हात धरून नेत होते. मला कल्पना नव्हती, पण हात धरल्यावर मिळालेल्या आधाराने खूप फरक पडला आणि आम्ही पाचच्या सुमारास गुज्जर हट कॅम्पला पोहीचलो. सॅक उतरवली आणि हुश्श झाले. बाकीचे रोप्स टप्प्या टप्प्याने येत होते. शेवटचा गडी यायला सात वाजले. सगळ्यात कठीण टप्पा ९४ जणांनी पार केला होता. बाकीचे परत फिरले. आमच्या रोप मधील सर्वात वजनदार हेमेनचाही पहिल्या चढाईत पाय कचकला होता. त्यानेही तेथूनच परत जाण्याचा विचार केला होता. पण राजाभाई, प्रतिक यांनी धीर दिल्यावर अजून थोडा वेळ प्रयत्न करू असे म्हणत पठ्ठ्या इथपर्यंत पोहोचला.
आता उद्या बेस कॅम्प पर्यंत छोटाच ट्रेक असल्याने तसा सोपा दिवस असणार होता. फॉलीन मध्ये "आज बहोत पीस गये ना? कल आरामसे आठ बजे निकलेंगे" या घोषणेनेच आराम वाटला. कसेबसे थोडे जेवलो आणि झोपलो.

सकाळी सहा... सात.. आठ वाजता फॉलिन करून निघालो. काल कमालीचे थकल्याने कोणत्याच जाणीवा झाल्या नव्हत्या..आज मात्र दम लवकर लागतोय हे लक्षात आले. आमची वाटचाल १२००० फुटाच्या वर चालू होती . प्रशिक्षकांना याची पूर्ण जाणीव होती त्यामुळे आज अजिबात घाई नव्हती. दर अर्ध्या तासाने चांगली १०-१५ मिनिटे विश्रांती देत होते. बाराच्या सुमारास बेस कॅम्पला पोहोचलो. निसर्गसौंदर्याने नटलेले ठिकाण कॅम्पसाठी निवडलेले होते. वारा सुटला होता. "मौसम बिगड सकता है | जल्दीसे अपना अपना टेन्ट लगा लो |" प्रशिक्षकांची आरोळी आली. लेक्चर्स मधून तंबू लावायचे शिकवले होते त्यातील दहा जणांचा गोल तंबू ठोकण्याचे आता प्रात्यक्षिक होणार होते. राजा आणि प्रतिक २५-३० किलोचा बांधलेला तंबू घेऊन आले. गोलाकार तंबू पसरवून सर्व बाजूच्या खुंट्या मारल्या. मधला खांब उभा केला आणि सर्व बाजूच्या दोऱ्या पक्क्या खेचून बांधल्या. रोप प्रशिक्षक आम्हा सातही जणांवर पक्के लक्ष ठेवून होते...कोण कामचुकार पणा करतोय, कोण इतरांना मदत करतोय, कोण भांडतोय का, चिडतोय का अशा बारीक सारीक गोष्टींवर त्यांचे लक्ष होते. कोणी चुकत असेल तर सांगत होते आणि रात्री प्रत्येक निरीक्षणाचा आमच्या मार्कांमध्ये हिशेब मांडत होते!! शेवटी या सर्वांचा विचार करून आमची श्रेणी ठरणार होती.

तंबू उभा राहिला आणि प्रशिक्षकांनी तो पास केला. प्रत्येक तंबूची दोन तीन प्रशिक्षक येऊन तपासणी करत होते. पाऊस पडला तर कोणाच्याही तंबूत पाणी शिरायला नको याची खबरदारी घेत होते. शेवटी १२ रात्रींचा प्रश्न होता. नेमून दिलेल्या जागी मुलांचे १५ आणि मुलींचे २ असे एकूण १७ तंबू छान उभे राहिले. कॅम्प सजला. सर्व ऍक्स तंबू बाहेर आणि शूज तंबुंच्या दोन आवरणांच्या मध्ये ठेवून बाकी सामान आत आणले. मॅट्स दोन रांगेत लावून सॅका मध्ये ठेवल्या. मळलेले कपडे धुवून तंबू दोऱ्यांवर वाळायला पडले आणि तंबूही सजला. दहा जणांच्या जागेत सातच जण असल्याने तशी ऐसपैस जागा होती. आता इथेच पुढचे १२ दिवस रात्री मुक्काम होता.
IMG-20241214-WA0012.jpg
कॅम्प सजला

कॅम्प परिसरात सर्वात उंच जागी लेक्चर्स साठी मोठा हॉलतंबू होता. त्याच्या एका एका बाजूला प्रशिक्षकांचे तंबू आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टरांचा एक दवाखाना तंबू होता यात दोन खाटांची सोय होती. हॉलतंबूच्या समोरच दगड रचून बऱ्यापैकी पक्के बांधकाम असलेला स्वयंपाक तंबू आणि त्याबाहेर जेवण वाटपासाठी नुसते छप्पर असलेली जागा. त्यापुढे दगड रचून बसायला कट्टे केलेले होते. इथून थोडे खाली उतरल्यावर थोडा सपाट भागावर आमच्या सगळ्यांचे तंबू. त्यापुढे शेवटी दरीच्या बाजूला चार पाच पायऱ्या उतरून प्लास्टिकच्या खोक्यांची दरवाजा-कडी असलेली स्वच्छ आटोपशीर ८ शौचालये आणि दोन नळ अशी सकाळची सोय होती. (हे सगळे गुगल मॅप्सवर दिसत असल्याने अधून मधून ते पहात आठवणीत रमून जायला आजही मजा वाटते). कॅम्पसाईटच्या वरच्या बाजूला असलेल्या झऱ्यातून सर्व कॅम्प साठी पाणी फिरवले असल्याने सर्वत्र मुबलक पाणी. छोटी छोटी झुडूपे असलेल्या दरीखाली खळाळती नदी आणि नदीपलीकडे अजस्त्र पर्वत. अशा निसर्गरम्य परिसरात उत्तम व्यवस्था असलेली आमची कॅम्पसाईट. या अजस्त्र पर्वताचे द्रौपदी का डांडा (DKD) हे शिखर सकाळी बर्फाच्छादित असायचे. सूर्यदयाच्या वेळी हा सुवर्ण मुकुट पहाणे म्हणजे पर्वणीच होती.

संध्याकाळी फॉलिन मध्ये इथले वेळापत्रक सांगण्यात आले. कोणीही जेवल्याशिवाय झोपायचे नाही हे पुनः सांगण्यात आले. इथे ऑक्सिजन कमी असल्याने दम लवकर लागतो आणि ते स्वभाविक आहे. काळजीचे कारण नाही. पण इतर काही त्रास वाटला तर लगेच डॉ कडे यायचे हे सारे सांगण्यात आले. थोडा वेळ तंबूत जाऊन रात्रीची, उद्याची तयारी केली. जेवायचे ठिकाण तंबूपासून १०० मीटर अंतरावर पण थोडे उंचीवर होते. जायचे अगदी जीवावर आले होते. पण याचीच पूर्ण कल्पना असल्याने प्रशिक्षकांनी आधीच दम दिला होता. थोडे चालल्यावर लगेच दम लागत होता. पण नाईलाजाने डबे घेऊन जाऊन जेवून आलो. रात्री वेगवेगळे प्रशिक्षक येऊन "सब लोग टेंट मे आ गये ना? सबने खाना खाया ना?" असे दोन तीन वेळा विचारून गेले. इथे क्वचित अस्वलांचा वावर असतो. तेव्हा रात्री तंबू बाहेर पडताना कोणाला तरी सोबत घेऊन दोघांनी बॅटऱ्या हातात घेऊन बाहेर पडायचे अशी सक्त ताकीद दिली.
सगळ्यात कठीण दिवस आमच्या रोप मधील कोणालाही कोणताच अनपेक्षित त्रास न होता पार पडल्याने तंबूत थोड्या उशीरा पर्यंत गप्पा झाल्या आणि झोपलो.
दुसऱ्या दिवशी थोडा आराम होता. थोडे वजन घेऊन "आईस क्राफ्ट" साठी ज्या ग्लेशियर वर जायचे होते त्याच्या अर्ध्या वाटेपर्यंत आम्हाला नेऊन आणले. इथे मोरेन्स वरून चालायचा अनुभव मिळाला.
IMG-20241214-WA0016.jpg
"आईस क्राफ्ट" ठिकाणी जायचा रस्ता.. उजवीकडे ग्लेशियर

पुढच्या दिवसांत स्नो शूज, क्रॅम्पॉन्स आणि इतर सामान असे १२ -१३ किलो वजन सॅक मध्ये घेऊन प्रत्यक्ष ग्लेशियर पाशी नेऊन तिथे लेक्चर्स, प्रत्यक्षिके आणि नंतर प्रत्यक्ष बर्फावर आमचा सराव झाला. यात क्रॅम्पॉन्स बांधून त्याचे खिळे बर्फात रुतवून कसे चढायचे, चढताना विश्रांती साठी बर्फ उतारावर मधेच कसे थांबायचे, बर्फात दोर बांधण्यासाठी खिळे कसे ठोकायचे, स्क्रू कसे मारायचे, ऍक्स रुतवण्याचे प्रकार, बर्फाच्या उतारावर घसरलोच तर ऍक्स च्या मदतीने झटक्यात कसे थांबायचे...असे बर्फात चढाई साठी आवश्यक असे मूलभूत तांत्रिक प्रशिक्षण झाले.
IMG-20241214-WA0015.jpg
कडक बर्फातले प्रशिक्षण

बेस कॅम्प पासून ग्लेशियर साधारण अडीच तीन तासाची चढाई होती. पण ऑक्सिजनच्या कमतरतेत वजन घेऊन एवढे जायचे असल्याने एक दिवसाआड ग्लेशियर ला जायचे ठरवले होते. आठ रोप्स ग्लेशियर ला जाऊन प्रशिक्षण घ्यायचे तेव्हा बाकीच्यांना बेस कॅम्प मधेच इतर भाग शिकवला जाई. वरच्या डोंगरावर ताजा बर्फ (स्नो) पडत नसल्याने अधिक उंचीवरील ऍडव्हान्स बेस कॅम्पला जाणे रद्द करण्यात आले. बेस कॅम्प जवळपासच गवतावर "स्नो क्राफ्ट" चे प्रशिक्षण देण्यात आले. यात एकाच दोराला बांधून घेत ग्रुपने कसे चालायचे, कोणी एक क्रीवास (बर्फाने झाकलेली खोल भेग) पडला तर बाकीच्यांनी आपल्याला अँकर कसे करायचे आणि मग एकमेकांना संदेश देत कृती करत खाली पडलेल्याला कसे बाहेर काढायचे ? याची प्रत्यक्षिके झाली. अव्हेलांच / हिमवादळ / व्हाईट आउट यातून कसे वाचायचे? याचेही धडे देण्यात आले. असे या कॅम्पला प्रशिक्षण चालू असताना अजून दोन मुली तब्येत बिघडल्याने परत गेल्या. त्यातील एका आर्मीतल्या मुलीला तर स्ट्रेचरवरून सलाईन सहित खाली न्यावे लागले. चार पाच दिवस बिचारी सलाईन घेत झोपून होती. शेवटी आम्ही ९२ राहिलो.

आता altitude gain बाकी होते. यात सर्वांनी शेजारच्या १५००० फूट उंचीच्या शिखराच्या दिशेने आपापल्या क्षमते नुसार जायचे होते. यात प्रत्येक जण स्वतंत्र. प्रत्येकाने वजनी सामानाशिवाय दिलेल्या वेळेपर्यंत शक्य तेवढे जायचे आणि परतायचे. हे झाले की शेवटी लेखी परीक्षा देऊन परतीला लागायचे. मग तेल कॅम्पला मुक्काम आणि तेथून NIM उत्तरकाशी ला परतयचे होते.

बेस कॅम्प ला रात्री सॅटेलाईट फोनची सुविधा उपलब्ध होती. जेवण झाल्यावर नंबर लावून घरी बोलण्याची मोठीच सोय होती. आधी एक दोन वेळा घरी छान बोलता आले होते. आज मी घरी फोन लावला तर बाबांना दवाखान्यात दाखल केले असल्याचे कळले आणि चक्रे उलटी फिरू लागली. तसे गंभीर काही नसले तरी इतक्या अंतरावर असताना अजून थांबायचा धीर होईना. रात्रीत विचार करून शक्य तेवढ्या लवकर परतायचा निर्णय घेतला आणि सकाळी ६ च्या सुमारास अधिकाऱ्यांना सांगितले. परिस्थितीचा अंदाज घेत प्रमुख अधिकाऱ्यांनी "चिंता मत करो. सब ठीक होगा. ब्रेकफास्ट लो और तुरंत निकलो इसके साथ" असे म्हणत एकाच्या खांद्यावर हात ठेवला. हाता तोंडाशी आलेले BMC माझ्याकडून पूर्ण होणार नव्हते. इवलीशी पण अमूल्य अशी ऍक्स एका लष्कराच्या अधिकाऱ्याकडून छातीवर लावून घेत त्याला सलाम ठोकणे राहून जाणार होते. पण इलाज नव्हता. मन जड झाले होते. नाश्ता केला. तासाभरात माझ्या परतीची सर्व जय्यत तयारी अधिकाऱ्यांनी करून ठेवली होती. भरल्या डोळ्यांनी सर्व प्रशिक्षक वर्गाचा निरोप घेताना फार कष्ट प्रद वाटत होते. सगळे जण "आप काफी स्ट्रॉंग हो.. बहुत अच्छा परफॉर्म किया आपने.." सांगत धीर देत होते. प्रमुख अधिकाऱ्याला हात जोडून सर्व NIM चमूचे आभार मानले. सर्व व्यवस्था आणि प्रशिक्षक उत्तम असल्याचे सांगितले आणि सॅकपाशी गेलो. अधिकाऱ्याने सांगितले "सॅक आप मत लेना.. देर होगी. ये ले लेगा तो आप जल्दी पहुचोगे...आजही शाम को NIM". सोबत येणाऱ्या पोर्टर गाईडने माझी सॅक घेतली तरी माझे पाय सॅक अधिक जड झाले होते. निरोपाचा क्षण अधिक न लांबावता अस्पष्ट दिसणाऱ्या अधिकारी वर्गाचा, इतर शिक्षकांचा, सहकार्यांचा निरोप घेतला.

सॅकचे वजन माझ्या पाठीवर नसल्याने आम्ही झपझप उतरायला लागलो. सोबती नेपाळी होता. सॅक थोडा वेळ घेऊ का विचारल्यावर "सर जी नही | हम तो सिंगल लोड हो तो ३० किलो और डबल लोड हो तो ६० किलो उठाकर चढते है | आप चिंता मत करो| चलते रहो | " असे म्हणाला. दुपारी जेवायच्या वेळेपर्यंत तेल कॅम्पला पोहोचलो. कॅम्प शांत होता. पण पोर्टर मंडळींसाठी डाळ भाताचे जेवण तयार होते. जेवण झाल्यावर वेग मंदावेल म्हणून २-३ वाट्या आमटीच प्यायली आणि निघालो. "आप बढिया चल रहे हो | शॉर्ट कट से जायेंगे क्या? जल्दी पहुचेगे" पोर्टर ने प्रश्न टाकला. पाठीवर वजन नसल्याने लगेच हो म्हणून टाकले.. तीव्र उताराची थोडी घसरडी वाट होती, पण त्यामुळे दुपारी तीन वाजताच डांबरी रस्ता नजरेत आला. वस्ती जवळ जवळ येऊ लागली आणि साडेतीनला आम्ही गावातील रस्त्यापाशी आलो. लवकर आल्याने पोर्टर ही खुशीत म्हणाला "दो दिन पहेले मॅडम के साथ आये तो साडे पाच बजे थे | तेल कॅम्प पहुचने मे रात हो गयी | आज ठीक पहुचुंगा | " हो, पोर्टर्सना आम्हाला गावात सोडून परत वरती तेल कॅम्पला परतायचे असायचे. माझ्यासाठी NIM ची गाडी तयारच होती. माझी सॅक गाडीत ठेऊन पोर्टरने जबाबदारी व्यवस्थित पार पाडली आणि बिचारा लगेच परत निघाला तेल कॅम्प ला जायला!!!.
गाडीने तासाभरातच NIM ला पोहीचलो. घरी सगळे ठीक होते. दुपारी जेवलो तेथील एकाच्या फोनला रेंज होती. लगेच घरी उद्याचे तिकीट काढायला सांगता आले होते. त्यामुळे माझे परतायचे तिकीट काढलेले होते. सर्व साहित्य परत केले. हिशेब पूर्ण केला.
परतल्यावर सॅकचे वजन करायला मिळाले. पाण्याची बाटली आणि जेवणाचा डबा रिकामे असतानाही सॅक २४ किलोहून अधिक वजनाची होती!!!कोर्स अपूर्ण सोडावा लागल्याचे वाईट वाटत असतानाच एकही दुखापत न होता बरेचसे प्रशिक्षण पूर्ण केल्याचा आनंद वाटत होता. आपल्या शरीरक्षमतेच्या नव्या सीमा समजल्याने वेगळे समाधानही वाटत होते आणि आश्चर्यही. हे चमत्कार यंत्र घडवणाऱ्याकडे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी टेकडीवरच्या देवळात जाऊन आलो. एकटाच असल्याने मनसोक्त फिरून NIM परिसर शेवटचा डोळे भरून पहिला आणि मनात साठवला. रात्री जेवण मुक्काम करून पहाटे ५ वाजता अपूर्ण स्वप्न आणि NIM दोन्हीही सोडले...

टीप : घरी आल्यावर मोबाईल format झाल्याने माझ्या नोंदी आणि फोटो गायब झाले. त्यामुळे इतरांकडून मिळालेले मोजके फोटोच इथे देऊ शकलो आणि दिनक्रमात काही त्रुटी असू शकतील.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अफाट भारी!
वयाच्या ५५पर्यंत करता येतो हे माहीत नव्हते.

NIMमधे प्रशिक्षणाची संधी मिळाली आणि तुम्ही ती घेतली याबद्दल अभिनंदन!
आता त्या प्रशिक्षणाचा अनुभव वापरून काही खास करायचा विचार आहे का?

वाचतांना भारी वाटले.. कौतुकास्पद.

आता त्या प्रशिक्षणाचा अनुभव वापरून काही खास करायचा विचार आहे का? <<>>>> +११

वाह! काय जबरदस्त आहे हे. तुमचं प्रशिक्षण पूर्ण व्हायला हवे होते. थोडक्यात राहिलं अशी चुटपुट लागली.

फार भारी वाटलं वाचून.
जबरदस्त अनुभव असणार आहे हा.
तुमचा कोर्स पूर्ण झाला नाही ह्याचे फार वाईट वाटले.

वाह! काय भारी अनुभव... खूप छान लिहिलंय..
शरीराचा मनाचा कस लागण्यासारखंच आहे.
आपल्या शरीरक्षमतेच्या नव्या सीमा समजल्याने वेगळे समाधानही वाटत होते आणि आश्चर्यही. हे चमत्कार यंत्र घडवणाऱ्याकडे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी टेकडीवरच्या देवळात जाऊन आलो.>>>>>>>>>> फार सुंदर विचार. ग्रॅटीट्युड Happy

छान छान अभिप्राया बद्दल सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद

बाबा बरे आहेत ना आता? <<<>>>>हो, बाबांची तब्येत आता चांगली आहे. विचारल्या बद्दल धन्यवाद

आता त्या प्रशिक्षणाचा अनुभव वापरून काही खास करायचा
विचार आहे का?<<<<>>> NIM साठी (भारतीय सेने साठी) काही महिने सेवाकाम करायची इच्छा होती आणि आहे. YHAI चे ट्रेक्स असतात त्यांच्यासाठी कॅम्प लीडर म्हणून जाता येईल. सध्या काहीच शक्य नाही. बघू कसे आणि केव्हा जमते. Happy

वा ! भारी लिहिलंय ! मस्त अनुभव.
तुम्हांला परतलेलं पाहूनच वडिलांची तब्येत सुधारली असणार Happy

वाह! काय मस्त आहे हे. तुमचं प्रशिक्षण पूर्ण व्हायला हवे होते.
बाबांची तब्येत आता चांगली आहे हे छान झालं .
तुमचा लेख वाचल्यावर मी NIM ची website बघितली. सगळीकडे एज लिमिट ४५ आहे.

सगळीकडे एज लिमिट ४५ आहे.<<<>>> नाही. तळात download मध्ये जाऊन training program २०२५ बघा. त्यात २८९ बॅच चे वय २० ते ५५.
मला आधी हीच २८९ बॅच मिळाली होती. सप्टेंबर १४, २०२५ ला चालू होणारी.
तसेही ५५ च्या पुढेही वय असेल आणि क्षमता असेल तर NIM अधिकाऱ्यांशी बोलून प्रवेश मिळू शकतो. एखादे जास्तीचे फिटनेस सर्टिफिकेट आणायला सांगू शकतात.
तुम्हाला हा कोर्स करायची इच्छा असेल तर आपण फोनवर (९५९४०९९१४४) बोलू शकतो अधिक माहिती देईन.

काय प्रतिक्रिया द्यावी हे सुचत नाही इतकं....
कौतुकास्पद आणि प्रेरणादायी हे हे सगळं!!
अभिनंदन तुमचे!
दार्जिलिंग ला ही इन्स्टिटय़ूट पाहिलेली आहे.