
‘मार्च’ महिन्यात जन्मलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू
‘मार्च’मध्ये जन्म झालेल्या व्यक्ती ह्या ‘प्रभावशाली, कल्पक, उत्साही, धाडसी’ असतात असे म्हटले जाते. सध्या चालू असलेल्या मार्च महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकणे नक्कीच रंजक ठरेल.
ईफ्तेकार अली खान पतौडी :- (१६ मार्च १९१०) ‘ईफ्तेकार पतौडी’ हे एकमेव असे खेळाडू आहेत की ज्यांनी भारत व इंग्लंड या दोन्ही देशांचे (प्रत्येकी ३) कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे, तसेच त्यांनी भारताचे त्या तीनही कसोटी सामन्यांत नेतृत्व केले होते. मधल्या फळीतील फलंदाज असलेल्या ईफ्तेकारनी कसोटी पदार्पणात ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक केले. ते हरयाणातील पतौडी या संस्थानचे नवाब होते. पुढे भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवलेले ‘मन्सूर अली खान पतौडी’ हे त्यांचे पुत्र होत.
विजय हजारे :- (११ मार्च १९१५) भारताचे महान फलंदाज ‘हजारे’ यांचा जन्म सांगलीमध्ये एका ख्रिस्ती-मराठी कुटुंबात झाला. त्यांनी प्रथमश्रेणी क्रिकेट महाराष्ट्र, बरोडा आणि मध्य प्रांतासाठी खेळले. हजारे मधल्या फळीतील फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज होते. ते ३० कसोटी खेळले ज्यात १४ मध्ये नेतृत्व केले. कसोटीत त्यांनी ४७.६५ च्या सरासरीने ७ शतकांसह २१९२ धावा केल्या आणि २० बळी घेतले. तर प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर ५८.३८ च्या सरासरीने ६० शतकांसह १८,७४० धावा आणि २४.६१ च्या सरासरीने ५९५ बळी आहेत. १९४७-४८ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अॅडलेड कसोटीत दोन्ही डावात शतके, तसेच ब्रॅडमन यांना दोन वेळा बाद करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. देशांतर्गत ५० षटकांची क्रिकेट स्पर्धा त्यांच्याच नावे भरवली जाते. त्यांच्या नावावर असलेले काही विक्रम पुढीलप्रमाणे–
**प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज,
**प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये दोन त्रिशतके झळकावणारा पहिला भारतीय,
**कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतक झळकावणारा पहिला भारतीय,
** सलग तीन कसोटी सामन्यात शतक झळकावणारा पहिला भारतीय,
**१००० कसोटी धावा पूर्ण करणारा पहिला भारतीय,
**पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले ते आणि जसू पटेल, हे पहिले क्रिकेटपटू होते.
पॉली उम्रीगर :- (२८ मार्च १९२६) सोलापूरमध्ये जन्मलेले ‘पॉली’ भारतीय क्रिकेटमधील उत्तुंग आणि आदरणीय व्यक्तिमत्व राहिले आहे. उजव्या हाताने खेळणाऱ्या अष्टपैलू पॉलीनी ५९ कसोटीत १२ शतकांसह ३६३१ धावा केल्या. शिवाय आपल्या मध्यमगती व ऑफ ब्रेक गोलंदाजीने ३५ बळी घेतले. आठ कसोटीत त्यांनी भारताचे नेतृत्वही केले. सुनील गावसकरच्या उदयापर्यंत फलंदाजीतले अनेक भारतीय विक्रम त्यांच्या नावावर होते. कसोटी द्विशतक करणारे ते पहिले भारतीय फलंदाज होते. १९६२ साली वेस्ट इंडिजविरुद्ध एकाच कसोटीत शतक व डावात ५ बळी असा दुर्मिळ विक्रम त्यांनी केला. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर १६,१५५ धावा आणि ३२५ बळी आहेत. निवृत्तीनंतर निवड समिती अध्यक्ष, संघ व्यवस्थापक, क्रिकेट संघटना सचिव, पिच क्युरेटर अश्या विविध रूपांत ते खेळाशी संलग्न राहिले.
एकनाथ सोलकर :- (१८ मार्च १९४८) मुंबईच्या हिंदू जिमखान्यावरील माळ्याच्या ‘एकनाथ’ ह्या गुणी मुलाने जिद्द, मेहनत व क्रीडागुण यांच्या जोरावर भारतीय संघापर्यंत मजल मारली. भारतासाठी २७ कसोटी आणि ७ एकदिवसीय सामने खेळणारा डावखुरा एकनाथ कोणत्याही स्थानावर फलंदाजी करे आणि मध्यमगती किंवा फिरकी गोलंदाजी टाके. तो भारताचा आजपर्यंतचा सर्वोत्कृष्ट क्लोज-इन फील्डर म्हणून ओळखला जातो. त्याने २७ कसोटीत ५३ झेल घेतले असून त्याचे हे झेल/कसोटी यांचे विक्रमी गुणोत्तर आजही जगातला कोणीही क्षेत्ररक्षक साध्य करू शकलेला नाही. प्रसिद्ध फिरकी चौकडीने भारताला अनेक सामने जिंकून दिले त्यात एकनाथच्या चपळ क्षेत्ररक्षणाचा, अफलातून झेलांचा सिंहाचा वाटा होता. धाडसी एकनाथने विनाहेल्मेट ‘फॉरवर्ड शॉर्टलेग’ला उभे राहून अविश्वसनीय झेल घेतले आहेत. कसोटीत त्याने १०६८ धावा काढल्या आणि १८ बळी घेतले. १९७१ साली वेस्ट इंडिज आणि इंग्लंड मधील भारताच्या पहिल्याच मालिका विजयात सोलकरचा मोलाचा वाटा होता. प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने ६८५१ धावा केल्या आणि २७६ बळी मिळवले. भारताच्या स्वातंत्र्यदिनानंतर जन्मलेला भारतासाठी कसोटी खेळणारा तो पहिला क्रिकेटपटू होता.
ऑल्वीन कालीचरण :- (२१ मार्च १९४९) भारतीय (तमिळ) वंशाच्या ‘कालीचरण’ यांचा जन्म वेस्ट इंडिज मधील गयाना देशातला. बुटका पण आकर्षक डावखुरा मधल्या फळीतील फलंदाज असलेल्या कालीचरणनी कसोटी पदार्पण करताना पहिल्या दोन कसोटींत शतके झळकावली. त्यांनी ६६ सामन्यांत ४३९९ धावा काढताना १२ शतके फटकावली. कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या १८७ त्यांनी १९७८ मध्ये मुंबईत नोंदवली. मात्र १९८२ साली बंदी घातलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या बंडखोर खेळाडूंच्या दौऱ्यात सामील झाल्याने त्यांची क्रिकेट कारकीर्द अकाली संपुष्टात आली. १९७५ आणि १९७९ च्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या वेस्ट इंडिज क्रिकेट संघांचे ते सदस्य होते.
विवियन रिचर्डस :- (७ मार्च १९५२) क्रिकेट इतिहासातील सर्वकालीन महान फलंदाजांपैकी एक असा ‘विव्ह’ अॅंटिग्वा येथे जन्मला. गोलंदाजांना कस्पटासमान वागवणारी बेदरकार आक्रमक फलंदाजी, प्रभावशाली व्यक्तिमत्व आणि मैदानावरचा राजेशाही वावर यामुळे त्याला मिळालेली ‘किंग’ ही पदवी तो अगदी सार्थ ठरवी. त्याचे कसोटी पदार्पण भारताविरुद्ध १९७४ मध्ये बेंगळुरू इथे झाले. त्यानंतर दुसऱ्याच कसोटीत दिल्ली येथे १९२* अफलातून खेळी केली. एकूण १२१ कसोटीत २४ शतकांसह ५० च्या सरासरीने त्याने ८५४० धावा केल्या. २९१ ही सर्वोच्च धावसंख्या इंग्लंडविरुद्ध १९७६ मध्ये नोंदवली. वन-डेमध्ये त्याने १८७ सामन्यात ९० च्या स्ट्राइक-रेटने ४७ च्या सरासरीने ६७२१ धावा ठोकून काढल्या. अफलातून फलंदाजीबरोबरच तो अप्रतिम क्षेत्ररक्षक आणि बऱ्यापैकी फिरकी गोलंदाज होता. त्याने कसोटीत १२२ झेल घेतले आणि ३२ बळी मिळवले. तर वन-डेमध्ये ११८ बळी टिपले आणि १०० झेल घेतले. विंडीजच्या १९७५ आणि ७९ च्या पहिल्या दोन विश्वचषक विजयांत त्याचा प्रमुख वाटा होता. कप्तान म्हणून देखील तो चांगलाच यशस्वी ठरला. त्याच्या विस्मयकारक फलंदाजीने विंडीजच्याच नव्हे तर जगभरच्या रसिकांना वेडावले आणि युवकांना क्रिकेटपटू होण्याची प्रेरणा दिली. त्याचे काही विशेष पराक्रम पुढीलप्रमाणे –
**१९८६ मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध फक्त ५६ चेंडूत शतक ठोकले, तेव्हा ते कसोटीतील सर्वात जलद शतक होते आणि १५० च्या स्ट्राइक रेटने केलेले पहिले शतक होते.
**वन-डे मध्ये पहिल्या १,००० धावा फक्त २१ डावात केल्या, जो बराच काळ विश्वविक्रम होता.
**१९८४ साली त्याने इंग्लंडविरुद्ध वन-डेत १८९* धावांची अविश्वसनीय खेळी केली. सर्वोच्च धावसंख्येचा हा बराच काळ विश्वविक्रम होता.
**याच सामन्यात त्याने होल्डिंगबरोबर १० व्या गड्यासाठी नाबाद १०६ धावांची भागीदारी केली, जो विक्रम अजूनही कायम आहे.
**एका वन-डे सामन्यात शतक आणि ५ बळी घेणारा पहिला खेळाडू. तसेच वन-डेत अर्धशतक करून ५ बळी घेणाराही पहिला खेळाडू.
**वन-डेमध्ये १००० धावा आणि ५० बळी, अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू.
**सलग १२ आंतरराष्ट्रीय सामन्यांत अर्धशतकी मजल.
नासिर हुसैन :- (२८ मार्च १९६८) मद्रास (चेन्नई) येथे जन्मलेल्या नासेरचे वडील तमिळ-मुस्लिम होते तर आई ब्रिटिश. ईसेक्स परगण्याच्या हुसैनने इंग्लंडकडून ९६ कसोटी सामने खेळले त्यात ५७६४ धावा केल्या. शिवाय तो ८८ एकदिवसीय सामने खेळला ज्यात २३३२ धावा केल्या. नासेर एक कल्पक आणि यशस्वी कर्णधार होता. त्याने ४५ कसोटी आणि ५६ एकदिवसीय सामन्यांत इंग्लंडचे नेतृत्व केले.
इंझमाम उल हक :- (३ मार्च १९७०) पाकिस्तानाच्या या जबरदस्त फलंदाजाचा जन्म ‘मुलतान’ येथे झाला. १९९२ च्या वन-डे विश्वचषकात (जो पाकिस्तानने जिंकला) उपांत्य आणि अंतिम फेरीतील त्याच्या झंझावाती फलंदाजीने तो प्रकाशझोतात आला. त्याने १२० कसोटीत ८८३० तर ३७८ वन-डे मध्ये ११,७३९ धावा काढल्या. २००२ साली त्याने न्यूझीलंडविरुद्ध त्रिशतक (३२९) झळकावले. मात्र गुटगुटीत शरीर, संथ हालचाली व अनेकदा धावबाद होणे यामुळे हा अप्रतिम फलंदाज अनेकदा तज्ञांच्या टीकेचा व रसिकांच्या चेष्टेचा विषय बने. १९९७ च्या कॅनडामधील एका सामन्यात भारताच्या एका प्रेक्षकाने त्याला ‘बटाटा’ असे चिडवल्यावर त्याचा तोल सुटून त्याने त्या प्रेक्षकाला बॅटने मारहाण केली होती. २००६ मध्ये इंग्लंडमध्ये एका कसोटीत पंचांनी पाक संघाला चेंडू कुरतडण्यासाठी ५ धावांची पेनल्टी लावली. त्यावेळी कर्णधार इंझमाम चिडला आणि संघ घेऊन पॅव्हेलियनमध्ये बसला. यामुळे तो सामना इंग्लंडला बहाल करण्यात आला व इंझमामवर काही काळासाठी बंदी घालण्यात आली.
शाहिद आफ्रिदी :- (१ मार्च १९८०) पाकिस्तानच्या या अस्सल अष्टपैलू क्रिकेटरचा जन्म खैबर प्रांतातला. आफ्रिदी अति-आक्रमक पण बेशिस्त फलंदाज, मध्यमगतीने लेग-स्पिन टाकणारा गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक होता. टी-२० क्रिकेटच्या जन्माआधी त्या शैलीने फलंदाजी करणारा खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. त्याने ३९८ वन-डेमध्ये ११७ च्या स्ट्राइक-रेटने ८०६४ धावा काढल्या आणि ३९५ बळी घेतले. तर ९९ टी-२० सामन्यांत १५० च्या स्ट्राइक-रेटने १४१६ धावा केल्या आणि ९८ बळी घेतले. त्याशिवाय २७ कसोटीत १७१६ धावा करत ४८ बळी घेतले. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो काही काळ संघाचा कर्णधारही होता, तसेच २००९ च्या टी-२० विश्वचषकविजेत्या पाक संघाचा प्रमुख शिलेदार होता. मात्र बेशिस्तपणा, चेंडूशी छेडछाड, सहकाऱ्यांशी मतभेद, अंतर्गत राजकारण यांमुळे तो सतत विवादात असे. त्याच्या नावावर असलेले काही विक्रम – अ) वन-डेमध्ये शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू ब) वन-डे कारकिर्दीत सर्वाधिक षटकार क) सलग ३ वन-डे सामन्यांत ४ किंवा अधिक बळी ड) वन-डेमध्ये ३७ चेंडूत शतक, जो बराच काळ विश्वविक्रम होता.
हाशीम अमला :- (३१ मार्च १९८३) सुरत येथील पूर्वज असलेल्या ‘अमला’चा जन्म दक्षिण आफ्रिकेतील दरबान येथला. भरघोस लांब दाढी, पूर्ण टक्कल आणि शांत चेहरा, यामुळे अमला लक्ष वेधून घेत असे. त्याचे कसोटी पदार्पण २००४ मध्ये भारताविरुद्ध झाले. १२४ कसोटी सामन्यांत त्याने २८ शतकांच्या सहाय्याने ९२८२ धावा काढल्या. चांगला क्षेत्ररक्षक असणाऱ्या अमलाने १०८ झेल पकडले असून १४ कसोटीत आफ्रिकेचे नेतृत्व करण्याची संधी त्याला मिळाली. त्रिशतक झळकवणारा तो आफ्रिकेचा पहिला फलंदाज ठरला. २०१० साली त्याने कसोटी आणि एकदिवसीय सामने ह्या दोन्हीही प्रकारात एका वर्षात १००० धावा काढण्याचा विक्रम केला. २०१० च्या भारत दौऱ्यात त्याने दोन कसोटीत केवळ एकदा बाद होत तब्बल ४९० धावा ठोकून काढल्या. कलकत्ता कसोटीमध्ये त्याने दोन्ही डावात शतके केली. फेब्रुवारी २०१३ मध्ये ICC फलंदाजांच्या क्रमवारीत तो अग्रस्थानी होता. वन-डेमध्येही त्याने विक्रमांचा पाऊस पाडत १८१ सामन्यांत ८११३ धावा केल्या.
ईतर काही प्रमुख खेळाडू ::
[अ] परदेशी खेळाडू --
क्लेम हिल (१८ मार्च १८७७) = ऑस्ट्रेलिया - मधल्या फळीतील डावखुरा फलंदाज. ४९ कसोटी (३४१२ धावा). कसोटीत ९९ धावांवर बाद होणारा पहिला फलंदाज.
जॉन एड्रीच (२६ मार्च १९१६) = इंग्लंड – डावखुरा सलामीवीर. ७७ कसोटी (५१३८ धावा). न्यूझीलंडविरुद्ध १९६५ साली नाबाद त्रिशतक.
वॉली ग्राउट (३० मार्च १९२७) = ऑस्ट्रेलिया – समीक्षकांनी गौरवलेला महान यष्टीरक्षक. ५१ कसोटी (यष्टीमागे १८७ बळी, ८९० धावा).
वासीम बारी (२३ मार्च १९४८) = पाकिस्तान – यष्टीरक्षक. ८१ कसोटी (यष्टीमागे २२८ बळी), ५१ वन-डे (यष्टीमागे ६२ बळी). पाकिस्तानचा आजवरचा सर्वात यशस्वी कसोटी यष्टीरक्षक.
रॉडनी हॉग (५ मार्च १९५१) = ऑस्ट्रेलिया – वेगवान गोलंदाज. ३८ कसोटी (१२३ बळी), ७१ वन-डे (८५ बळी).
जेफ हॉवर्थ (२९ मार्च १९५१) = न्यूझीलंड – मधल्या फळीतील फलंदाज, कर्णधार. ४७ कसोटी (२५३१ धावा), ७० वन-डे (१३८४ धावा).
कॉलीन क्रॉफ्ट (१५ मार्च १९५३) = वेस्ट इंडिज – विंडीजच्या सुवर्णकाळातील गाजलेला वेगवान गोलंदाज. २७ कसोटी (१२५ बळी), १९ वन-डे.
मोहसीन खान (१५ मार्च १९५५) = पाकिस्तान – सलामी फलंदाज. ४८ कसोटी (२७०९ धावा), ७५ वन-डे (१८७७ धावा). भारतीय सिनेतारका ‘रीना रॉय’ हिच्याशी विवाह. काही बॉलीवूड चित्रपटांमध्ये नायकाची भूमिका.
डिन जोन्स (२४ मार्च १९६१) = ऑस्ट्रेलिया - मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज, जबरदस्त क्षेत्ररक्षक. ५२ कसोटी (३६३१ धावा), १६४ वन-डे (६०६८ धावा). वन-डेतला महान फलंदाज मानला जात असे. १९८६ च्या मद्रास टाय-टेस्ट मध्ये भारताविरुद्ध द्विशतक.
ब्रुस रीड (१४ मार्च १९६३) = ऑस्ट्रेलिया – डावखुरा वेगवान गोलंदाज. २७ कसोटी (११३ बळी), ६१ वन-डे (६३ बळी). ६ फूट ८ इंच उंचीने व कृश शरीरयष्टिने लक्ष्य वेधून घेई.
अँड्रू हडसन (१७ मार्च १९६५) = दक्षिण आफ्रिका – सलामी फलंदाज. ३५ कसोटी (२००७ धावा), ८९ वन-डे (२५५९ धावा). कसोटी पदार्पणात शतक करणारा पहिला आफ्रिकी फलंदाज.
डॅरील कलीनन (४ मार्च १९६७) = दक्षिण आफ्रिका - मधल्या फळीतील फलंदाज. ७० कसोटी (४५५४ धावा), १३८ वन-डे (३८६० धावा).
अॅशले जाइल्स (१९ मार्च १९७३) = इंग्लंड – डावखुरा फिरकी गोलंदाज. ५४ कसोटी (१४३ बळी, १४२१ धावा), ६२ वन-डे (५५ बळी).
निकी बोये (२० मार्च १९७३) = दक्षिण आफ्रिका – डावरा फिरकी गोलंदाज, उपयुक्त फलंदाज. ४३ कसोटी (१०० बळी, १३१२ धावा), ११५ वन-डे (९६ बळी, १४१४ धावा).
हिथ स्ट्रीक (१६ मार्च १९७४) = झिंबाब्वे - वेगवान गोलंदाज, आक्रमक फलंदाज व कप्तान. झिंबाब्वेचा आजवरचा सर्वात यशस्वी गोलंदाज. ६५ कसोटी (२१६ बळी, १९९० धावा), १८९ वन-डे (२३९ बळी, २९४३ धावा).
अँड्रयू स्ट्राऊस (२ मार्च १९७७) = इंग्लंड – द. आफ्रिकेत जन्मलेला डावरा सलामी फलंदाज, कप्तान. १०० कसोटी (७०३७ धावा), १२७ वन-डे (४२०५ धावा). कसोटी पदार्पणात शतक.
रंगना हेराथ (१९ मार्च १९७८) = श्रीलंका - डावखुरा फिरकी गोलंदाज. ९३ कसोटीत ४३३ बळी, त्यात सामन्यात १० बळी ९ वेळा, तर डावात ५ बळी ३४ वेळा. शिवाय ७१ वन-डेत ७४ बळी, १७ टी-२०.
ग्रॅमी स्वान (२४ मार्च १९७९) = इंग्लंड – ऑफ ब्रेक फिरकी गोलंदाज. ६० कसोटी (२५५ बळी), ७९ वन-डे (१०४ बळी), ३९ टी२०.
इम्रान ताहिर (२७ मार्च १९७९) = दक्षिण आफ्रिका – मूळ पाकिस्तानी वंशाचा लेग स्पिनर. १०७ वन-डे (१७३ बळी), ३८ टी-२० (६३ बळी), २० कसोटी (५७ बळी).
हसन रझा (११ मार्च १९८२) = पाकिस्तान - मधल्या फळीतील फलंदाज. १४ व्या वर्षी कसोटी पदार्पण करून विश्वविक्रमाची नोंद. ७ कसोटी, १६ वन-डे.
रॉस टेलर (८ मार्च १९८४) = न्यूझीलंड – मधल्या फळीतील फलंदाज, कर्णधार. ११२ कसोटी (७६८३ धावा, १६३ झेल), २३६ वन-डे (८६०७ धावा, १४२ झेल), १०२ टी-२० (१९०९ धावा).
अजंता मेंडिस (११ मार्च १९८५) = श्रीलंका – फिरकी गोलंदाज. सुरवातीला त्याच्या गूढ गोलंदाजीने जगभरच्या फलंदाजांना बुचकळ्यात टाकले. ८७ वन-डे (१५२ बळी), ३९ टी-२० (६६ बळी), १९ कसोटी (७० बळी). वन-डेमध्ये सर्वात जलद ५० बळी घेणारा गोलंदाज.
नील वॅगनर (१३ मार्च १९८६) = न्यूझीलंड – दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला डावरा वेगवान गोलंदाज. ६४ कसोटीत २६० बळी.
सुरंगा लकमल (१० मार्च १९८७) = श्रीलंका – मध्यमगती गोलंदाज. ७० कसोटी (१७१ बळी), ८६ वन-डे (१०९ बळी).
शाकीब अल हसन** (२४ मार्च १९८७) = बांगलादेश - डावखुरा फलंदाज, फिरकी गोलंदाज व कप्तान. आत्तापर्यंत ७१ कसोटी (४६०९ धावा, २४६ बळी), २४७ वन-डे (७५७० धावा, ३१७ वन-डे), १२९ टी-२० (२५५१ धावा, १४९ बळी). कसोटी सामन्यात शतक करून १० बळी घेणारा फक्त चौथा खेळाडू.
क्रिस वोक्स** (२ मार्च १९८९) = इंग्लंड – वेगवान गोलंदाज, उपयुक्त फलंदाज. आत्तापर्यंत ५७ कसोटी (१८१ बळी, १९७० धावा), १२२ वन-डे (१७३ बळी, १५२४ धावा), ३३ टी-२०.
तमीम इक्बाल** (२० मार्च १९८९) = बांगलादेश – डावखुरा सलामी फलंदाज, कर्णधार. आत्तापर्यंत ७० कसोटी (५१३४ धावा), २४३ वन-डे (८३५७ धावा), ७८ टी-२० (१७५८ धावा).
रोस्टन चेस** (२२ मार्च १९९२) = वेस्ट इंडिज – फलंदाज, ऑफ स्पिनर. एका कसोटी सामन्यात शतक व ५ बळी घेण्याचा विक्रम. आत्तापर्यंत ४९ कसोटी, ५४ वन-डे, ३२ टी-२०.
[ब] भारतीय खेळाडू --
रंगा सोहोनी (५ मार्च १९१८) – राजस्थानमध्ये जन्मलेले महाराष्ट्रीयन ‘श्रीरंग सोहोनी’ मध्यमगती गोलंदाज आणि उपयुक्त फलंदाज होते. दुसऱ्या महायुद्धामुळे त्यांची उमेदीची वर्षे वाया गेली आणि केवळ ४ कसोटी खेळता आल्या.
नरी कॉन्ट्रॅक्टर (७ मार्च १९३४) – गुजरातमधील गोध्राचे ‘नरीमन’ डावखुरे सलामी फलंदाज होते. आपल्या पदार्पणाच्या प्रथमश्रेणी सामन्यात दोन्ही डावांत शतक करणारे ते जगातले केवळ दुसरे फलंदाज होते. १९५५ साली न्यूझीलंडविरुद्ध कसोटी पदार्पण केलेले नरी १९६२ च्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर भारताचे कर्णधार होते. याच दौऱ्यावर बार्बाडोसविरुद्धच्या सराव सामन्यात वेगवान गोलंदाज ग्रिफिथचा बीमर थेट त्यांच्या डोक्यावर आदळला. नरी जबर जखमी होऊन बेशुद्ध झाले. यावेळी खूप रक्तस्त्राव झाल्याने काहींनी रक्तदान करून त्यांचे प्राण वाचवले. आधी वेस्ट इंडिजमध्ये आणि मग भारतात त्यांच्या डोक्याच्या शस्त्रक्रिया झाल्या. असा हा जिगरबाज खेळाडू भारतासाठी ३१ कसोटी खेळला ज्यात त्यांनी १६११ धावा केल्या. त्यात १२ कसोटीमध्ये त्यांनी नेतृत्व केले.
एम. एल. जयसिंहा (३ मार्च १९३९) – हैदराबादचा हा सलामी फलंदाज आकर्षक फलंदाजीबरोबरच देखण्या व्यक्तिमत्वामुळे लोकप्रिय होता. त्यांनी ३९ कसोटीत २०५६ धावा केल्या. २४५ प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये त्यांनी १३,५१६ धावांबरोबरच ऑफ स्पिन गोलंदाजीने ४३१ बळी टिपले.
अब्बास अली बेग (१९ मार्च १९३९) - मधल्या फळीतील ह्या शैलिदार हैद्राबादी फलंदाजाने इंग्लंडविरुद्ध पदार्पणाच्या कसोटीत अवघ्या २० व्या वर्षी मॅंचेस्टर येथे शतक केले. अशी कामगिरी करणारे ते सर्वात तरुण भारतीय आणि परदेशात करणारे पहिले भारतीय ठरले. पण सातत्याच्या अभावामुळे ते फक्त १० कसोटी खेळले ज्यात ४२८ धावा केल्या. मात्र बेग हे कसोटी खेळताना मैदानावर तरुणीकडून गालावर चुंबन घेतले गेलेले पहिले भारतीय खेळाडू ठरले (ही घटना ६ जानेवारी १९६० रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर झाली).
उमेश कुळकर्णी (७ मार्च १९४२) – अलिबागचे ‘उमेश’ डावखुरे मध्यमगती गोलंदाज होते. मुंबईकडून प्रथम दर्जाचे क्रिकेट खेळणाऱ्या उमेशना १९६७-६८ च्या ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड दौऱ्यावर ४ कसोटींमध्ये संधी मिळाली ज्यात त्यांनी ५ बळी घेतले.
सलिल अंकोला (१ मार्च १९६८) – महाराष्ट्र संघाकडून प्रथमश्रेणी कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या वेगवान गोलंदाज ‘अंकोला’ने पहिल्याच रणजी सामन्यात हॅटट्रिकसह ६ बळी घेतले. थोड्याच काळात १९८९ मध्ये तेंडूलकर आणि वकार युनूससह त्याचे कसोटी पदार्पण झाले. नंतर तो मुंबईकडून खेळू लागला पण सततच्या दुखापतींमुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला ब्रेक लागला. एकूण तो फक्त १ कसोटी आणि २० वन-डे खेळू शकला. नंतर तो अभिनयाकडे वळला आणि काही हिन्दी चित्रपट व मालिकांमधून अभिनय केला.
पार्थिव पटेल (९ मार्च १९८५) – अहमदाबादच्या या छोट्या चणीच्या खेळाडूने इंग्लंडविरुद्ध १७ व्या वर्षी कसोटी पदार्पण केले आणि कसोटी खेळणारा जगातला सर्वात तरुण यष्टीरक्षक बनला. तो चांगला डावखुरा फलंदाज देखील होता. पण नंतर धोनीच्या उपस्थितीमुळे त्याला फार संधी मिळाल्या नाहीत. त्याने २५ कसोटीमध्ये यष्टीमागे ७२ बळी टिपत ९३४ धावा केल्या. तर ३८ वन-डेमध्ये यष्टीमागे ३९ बळी आणि ७३६ धावा अशी कामगिरी राहिली.
केदार जाधव (२६ मार्च १९८५) – पुण्याचा मधल्या फळीतील फलंदाज ‘केदार’ने महाराष्ट्रासाठी बराच काळ प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये धावांच्या राशी ओतल्या. फलस्वरूप बऱ्याच उशिरा वयाच्या तिशीत त्याचा भारतीय संघात मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी समावेश झाला. तो एकूण ७३ वन-डे आणि ९ टी-२० खेळला. वन-डेमध्ये त्याने आपले नाणे खणखणीत वाजवले. त्यामध्ये त्याच्या ४२.०९ च्या सरासरीने २ शतकांसह आणि १०२ च्या धावगतीने १३८९ धावा आहेत. शिवाय फिरकी गोलंदाजीने २७ बळी घेतले.
मोहम्मद सिराज** (१३ मार्च १९९४) – हैद्राबादच्या एका रिक्षा ड्रायवरचा हा मुलगा अतिशय मेहनती वेगवान गोलंदाज आहे. गोलंदाजीचे मोठे स्पेल वेगाने टाकण्याची त्याची क्षमता प्रभावित करते. आतापर्यंत तो ३६ कसोटी, ४४ वन-डे व १६ टी-२० खेळला असून कसोटीत १०० बळींचा टप्पा त्याने नुकताच पार केला आहे.
( ** खेळाडू म्हणून अजून कारकीर्द चालू )
( * फलंदाज नाबाद )
( ++ सारी आकडेवारी २८-०२-२०२५ पर्यंतची )
मित्रहो, ‘मार्च’ महिन्यामध्ये जन्मलेल्या या प्रमुख आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंबद्दल जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडले असेल. आपल्या काही प्रतिक्रिया, सूचना असतील तर जरूर कळवा तसेच हा लेख आपल्या क्रिकेटप्रेमी मित्रपरिवाराला अग्रेषित करायला विसरू नका.
- गुरुप्रसाद दि पणदूरकर
(मुंबई)