मभागौदि २०२५ - निसर्गायण - शाल्मलीची अनुभूती - ऋतुराज.

Submitted by ऋतुराज. on 28 February, 2025 - 09:22

शाल्मलीची अनुभूती

जवळजवळ दोन वर्षांनी कोरोनाचा अंमल नाहीसा होतोय अशी चिन्हे दिसू लागली. फेब्रुवारी संपून मार्च चालू झाला. वातावरणातील उष्मा वाढल्याने ऋतूबदलाची देखील चाहूल जाणवू लागली. आता निसर्गभ्रमंती करायला बाहेर पडलेच पाहिजे अशी मनाने उचल खाल्ली आणि मग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ठाण्याच्या बाजूला असणाऱ्या, येऊर या हक्काच्या ठिकाणी मित्रमंडळींनी एक निसर्गभ्रमंती आयोजित केली. रविवारी सकाळी लवकर उठून आणि घोडबंदरचं अभद्र ट्राफिक पार करून वेळेत येऊरला पोचलो.
येताना ट्रॅफिक बरोबर घोडबंदरच्या घाटात जंगलाचा काही भाग लागतो. पहाटेच्या प्रकाशात तो भाग अगदी धुंदावलेला वाटतो. धुक्याच्या अंथरुणात लपेटून सुस्तावलेली झाडे प्रकाशाच्या शिडकाव्याने हळूहळू आपापली डोकी वर काढल्यासारखी भासू लागतात.
येऊरला ट्रेल साठी इच्छित स्थळी पोहचल्यावर लगेचच भारद्वाजाचे दर्शन झाले. शुभशकुन समजून लगेचच भटकंतीला सुरवात केली. आता बऱ्यापैकी उजाडलं होत आणि रविवार असल्याने अपेक्षित असलेली हौशी वर्दळ, गजबज दिसत होती. अनेक पक्षांचा किलबिलाट चालू होताच. भ्रमंतीच्या सुरुवातीलाच स्वागतोत्सुक अश्या भल्याथोरल्या चिंचेच्या व आंब्याच्या वृक्षांनी दर्शन दिल आणि अजूनही अशी “जुनी खोडं” टिकून आहेत हे पाहून हायसं वाटलं. आंब्याच्या झाडावर बरीच बांडगुळं होती. अंशतः परपोषी (Partially Parasite) असलेल्या या बांडगुळांचा व आम्रतरूचा संसार अनेक वर्षे सुखेनैव चालू आहे इथे. पुढे गेल्यावर निष्पर्ण झालेला वावळ दिसला, बहुधा बहराच्या तयारीत असावा. एकदा बहरला की मग तो त्याचे "चिरबिल्व" नाव सार्थ करणार होता. आजूबाजूच्या सागाच्या पानांनी हिरव्या रंगाचा त्याग करून मातकट रंग आत्मसात केला होता. त्यांची पानगळ अजून चालू होतीच. त्याच्या आसपास काही बाभळीच्या झाडांवर वाघरी ऑर्किड भरभरून वाढली होती परंतु अजून फुलली नव्हती. पुढे गेल्यावर दोनचार ऑर्किडला फुलंही दिसली. जवळच हिरव्यागार पानांचा हसोळी वृक्ष आडवा तिडवा पसरला होता. बाजूलाच पोपटी रंगाच्या पानांच्या बॅकग्राऊंडवर असंख्य शुभ्र चांदण्यांच्या फुलांनी डवरलेली करवंदाची जाळी पाहून आणि तो सुगंध श्वासात साठवून आम्ही पुढे निघालो. लवकरच "जाळीमंदी पिकली करवंद" म्हणायचे दिवस जवळ आले होते.
Screenshot_20250228_193049_Photos.jpg
पुढे ओळीने बरीच ऐनाची आणि पळसाची झाडं होती. पण अजूनही पळस फुलला नव्हता. मळलेल्या पायवाटेवरून जाताना दोन्ही बाजूला रानघेवड्याची पांढरी पिवळट फुले भरभरून दिसत होती. बऱ्याच ठिकाणी सुकलेल्या वेलीवर खाजकुहिलीच्या शेंगा लटकत होत्या. कोतवाल, मैना, पोपट, बुलबुल अश्या बऱ्याच पक्ष्यांचे अधूनमधून दर्शन होत होते. आता काही पळसाच्या झाडांना फुल दिसली मग त्या नाजूक, लवयुक्त किंशुक पुष्पांचे यथेच्छ फोटो काढून पुढे निघालो.
Screenshot_20250228_193143_Photos.jpg

आजूबाजूला सुकलेल्या रानमोडीची आणि कारवीची दाटी होती. ह्याच्या बाजूने जाताना एक वेगळाच मस्तकात जाणारा, उग्र वास येऊ लागला. उक्षीलाही आता भरभरून बहर आला होता. तिच्या नवथर, कोवळ्या, मऊ पालवीला कुरवाळत आणि तिच्या फुलांनी हेलिकॉप्टर गम्मत खेळून पुढे गेलो.
Screenshot_20250228_193100_Photos.jpg
वाटेत पर्णहीन मोईची काही झाडे फुललेली आढळली.
आता पुढे गेल्यावर मात्र सगळ्या वाटेचा ताबा भडक गुलाबी काटेसावरीने घेतला होता. अचानक फुलांनी लगडलेली झाडं दिसू लागली आणि मग किती आणि कसे फोटो काढू असं वाटू लागलं. फुललेल्या झाडांचे, फुलांचे लांबून, जवळून असे भरपूर फोटो काढले. काही गळून पडलेल्या फुलांतील मधुरस पण चाखला. पुढे जाऊ तशी आणखी काटेसावरीची झाडच झाड दिसू लागली. पक्ष्यांची पण त्यावर अगदी जोरदार मेजवानी चालू होती. जाड हिरवं संदल, पाच भडक गुलाबी मांसल पाकळ्या आणि त्यात दहा-दहा च्या गुच्छात रचलेले काळ्या डोक्याचे पुंकेसर आणि मध्यभागी पुन्हा दहा वीस पुंकेसरांच्या मध्यात पाच टोकाचा मुकुट घातलेला स्त्रीकेसराचा दांडा. नुसतं बघत राहावं असं रूप.
Screenshot_20250228_193015_Photos.jpg

याच फुलांच्या संदलाची आणि पाकळ्यांची एक खास पाककृती करतात उत्तर भारतात. काटेसावरीचं एक शास्त्रीय नाव Salmalia malabarica असं आहे त्यातलं Salmalia हे संस्कृत मधल्या शाल्मली वरून आलय. इतक्या सुंदर झाडाला काटेसावर या रुक्ष नावापेक्षा शाल्मली हे नाव अधिक शोभून दिसत हे त्या नाव देणाऱ्या साहेबाला बरोबर कळलं होत.
याच सुंदर, मोहक फुलरूपी नवतरुणीचे रूपांतर हिरव्या बोन्डात होईल व वाळल्यावर त्यातून उडेल तो सावरीचा कापूस 'म्हातारी'.

पुढे गेल्यावर दोन फुलाफळांनी युक्त अशी कांडोळची पांढरीशुभ्र झाडं आपलं "भुत्या" हे नाव सार्थ करत दिमाखात उभी होती. आता उन्ह चांगलीच तापली होती. जठराग्नीच्या आहुतीची वेळ झाल्याने सगळ्यांनी परतीची वाट धरली. जाताना पुन्हा ती भडक गुलाबी शाल्मली भरभरून पाहत आणि डोळ्यात साठवत होतो. शाल्मलीला इंग्रजीत Red Silk Cotton Tree असं म्हणतात. याचा कापूस उच्च प्रतीचा मानला जातो.

ऋग्वेदात शाल्मलीचा उल्लेख आला आहे. लग्नाचा रथ याच्या लाकडापासून बनवतात म्हणे. बहरलेली शाल्मली ऐश्वर्यसंपन्न लक्ष्मीचे रूप मानतात. नरकात शिक्षा देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काट्यात याचा उपयोग करतात असे मानतात म्हणूनच एक नाव यमद्रुम.
Screenshot_20250228_192911_Photos.jpg

कालिदासाने केलेले ऋतुसंहारातील शाल्मलीचे वर्णन:

बहुतर इव जात: शाल्मालीना वनेषु स्फुटति कनकगौर: कोटेरेषु दृमाणाम् II
परिणतदलशाखानुत्पतन्प्राशु वृक्षान्भ्रमति पवनधूत: सर्वतोSग्निवनान्ते II

शाल्मली वृक्षांच्या वनांत एकवटलेला, झाडांच्या ढोलीत सुवर्णाप्रमाणे तेजस्वी दिसणारा, पिकलेली पाने असलेल्या फांद्यांचे वृक्ष हलवून, वाऱ्याने उसळलेला अग्नि वनामध्ये सर्वत्र पसरत आहे.

अधिकतर असा हो शाल्मली रानभागीं
भडकत कनकांगीं कोटरीं वृक्षभागी
ऊसळत दल शाखा उंच वृक्षाग्रप्रांतीं
भ्रमत पवनसंगें अग्नि साऱ्या वनांतीं
(ऋतुसंहार - वि वा भिडे)

हजारो वर्षांपूर्वी भारतातून व्यापारासाठी युरोप पर्यंत जाणारा एक Silk Route होता. पण आजचा “Red Silk Cotton Route” एक वेगळीच अनुभूती देऊन गेला.

६ मार्च २०२२

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम! तुमचे references लेखाला वेगळ्या उंचीवर नेतात.

मस्तच लिहिलेय…

हसोळी हा कुठला वृक्ष?

आमच्या इथे रस्त्याच्या कडेला एक शाल्मली फुललीय. एकही पान नाही पण वर सुर्याकडे बघणारी फुलेच फुले. आसमंत मध्ये इण्गळहळ्ळीकरांनी शाल्मलीचे वर्णन पक्ष्यांचे ज्युस सेंटर म्हणुन केलेय.

मस्तच. लहानपणी अशी फुललेली काटेसावर आणि त्यातून उडणारा कापूस म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीची वातवारणनिर्मिती व्हायची! आताही कधी तो उडणारा कापूस दिसला तर नॉस्टॅल्जिक आनंदाची उकळी फुटते उगीचच Happy

शाल्मलीचा कापुस एकदम सॉफ्ट अँड सिल्की असतो. तो का वापरत नाहीत कापड बनवायला हा प्रश्न नेहमी पडायचा. शेवटी कोणीतरी जाणकाराने सांगितले की तो सुंदर असला तरी आखुड असतो त्यामुळे कापड बनत नाही.

अहाहा..! वनस्पती शास्त्राला उत्तम भाषाज्ञानाची जोड..! येऊरच्या trails ची आठवण करून दिल्याबद्दल आभार..! मजा आली.

वाह! मस्त मजा आली वाचताना
Red Silk Cotton Route>> खरच अगदी

बऱ्याच वर्षांपुर्वी आम्ही तिघे आणि ललिता प्रीती येऊरला एका ट्रेल करता गेलो होतो. मेधा कारखानीस म्हणून एक माहितीचा खजिना असलेल्या बाई आहेत, त्यांनी ऑर्गनाईज केला होता ट्रेल. माझ्या काही लक्षात नाही त्यांनी त्यावेळेस सांगितलेली सगळी माहिती, पण ट्रेलचा ओव्हरऑल अनुभव विस्मयचकित करणारा होता

सुंदर लेख.....
पलाश फुलं शांताबाईना अशी वाटली.
गगनास गंध आला, मधुमास धुंद झाला
फुलले पलाश रानी, जळत्या ज्वाला

आहाहा, अप्रतिम सर्वच फोटो. माहितीपूर्ण लेख.

मला काटेसावरपेक्षा शाल्मली नाव अगदी योग्य वाटतं, कशी मखमली फुलं असतात. मखमली शाल्मली.

अप्रतिम लेख आणि फोटो. केवढं काय काय माहिती आहे तुला, ऋतुराज!
तो शाल्मलीचा फोटो तर केवळ सुंदर - लखलखता रंग कैद केला आहेस.

वनस्पती शास्त्राला उत्तम भाषाज्ञानाची जोड >>> +१

धन्यवाद,
स्वाती_आंबोळे, शर्वरी, साधना ताई, अनिंद्य, maitreyee, निर्लेप, सिमरन, कविन, दत्तात्रय साळुंके, मनीमोहोर, शशांक पुरंदरे, अंजू, rmd.

हसोळी हा कुठला वृक्ष?>>>>> Grewia microcos.
धामण कुळातील. याची पाने लांब, टोकदार हिरवीगार असतात

नाहीतर कालीदास कोणाला आठवतो आता ?>>>> कालिदासाला विसरून कसं चालेल. _/\_

शाल्मलीचा कापुस एकदम सॉफ्ट अँड सिल्की असतो.>>>
याचा कापूस लाईफ सेव्हिंग जॅकेट मध्ये वापरतात म्हणे.

मस्त फोटो लिखाण आणि माझ्यासाठी नवीन माहिती.

ज्या झाडाचा उपयोग लग्नाचा रथ बनवण्यास होतो त्याचाच वापर नरकात शिक्षा देण्यास सुद्धा होतो हा निव्वळ योगायोग नसावा Happy

ज्या झाडाचा उपयोग लग्नाचा रथ बनवण्यास होतो त्याचाच वापर नरकात शिक्षा देण्यास सुद्धा होतो हा निव्वळ योगायोग नसावा >> +७८६. अगदी हेच म्हणणार होतो.

ऋ2चा हातखंडा विषय आणि अपेक्षेप्रमाणे सिक्सर मारली आहे. लेख आवडला.

चिरबिल्व, यमद्रुम, शाल्मली … सुंदर नावे. +१
सुरेख, उत्तम भाषा, फोटो व साहित्यिक संदर्भांनी रमणीय झाला आहे लेख ऋतुराज. असे लेखन नियमित येऊ द्या. वैविध्यपूर्ण लेखन वाचणाऱ्यालाही समृद्ध करते. Happy

ऋ, जबरी पंच. Happy

लेख आवडला!

शाल्मली च लालभडक फुलं खूपच सुंदर दिसतय. सगळे फोटो ही आवडले.

Red Silk Cotton Route” एक वेगळीच अनुभूती देऊन गेला. Happy

बंगलोरच्या लालबागमध्ये प्रचंड मोठा वृक्ष आहे शाल्मलीचा. गेल्या वर्षी कोवळ्या, नवीन पानांनी डवरलेला असताना दर्शन झालं होतं त्याचं. काय देखणा!
तेव्हाचा फोटो सापडला तर देते.

सुरेख, उत्तम भाषा, फोटो व साहित्यिक संदर्भांनी रमणीय झाला आहे लेख ऋतुराज. असे लेखन नियमित येऊ द्या. वैविध्यपूर्ण लेखन वाचणाऱ्यालाही समृद्ध करते.

>>>>>> ++१००००

वा ! सुंदर लेख. निसर्गसौंदर्य समजणारी दृष्टी कदाचित माझ्याकडे नाही. तुमच्या लेखातून ते पोचलं.

यानिमित्ताने एक आठवलं की माझ्या एका सहकर्मिणीच्या मुलींची नावं शेफाली आणि शाल्मली अशी आहेत.

Pages