मभागौदि २०२५ - निसर्गायण - काही खाजगी क्षण- कविन

Submitted by कविन on 28 February, 2025 - 00:41

माझा सगळ्यात पहिला ट्रेक नाणेघाटचा होता. बहुतेक नोव्हेंबर मधे केला होता. त्यानंतर २-३ वेळा नाणेघाट ट्रेक केला वेगवेगळ्या ऋतुंमधे. पावसाळ्यातला नाणेघाट हा नोव्हेंबरच्या नाणेघाटापेक्षा वेगळा होता आणि ऐन उन्हाळ्यात पहाटे चढताना जाणवलेला नाणेघाट हा अजून वेगळा अनुभव होता.
वाट तीच होती. मी ही तीच होते तरी प्रत्येक वेळेस मनात कोरला गेलेला नाणेघाट वेगळा होता. बरे त्याच १०-१२ जणांसोबत दरवेळी केलेला हा ट्रेक प्रत्येकाला वेगळा अनुभव देऊन गेला होता. बहुतेक प्रत्येका बरोबरचा त्याचा करार वेगळा होता.
हे असं प्रत्येक बाबतीत होत असतं ना आपलं. म्हणजे निव्वळ त्यावेळेसची आपली शारिरिक मानसिक अवस्था या गोष्टी घडवून आणते असे नव्हे. मला म्हणायचे आहे की एकच वास्तू दरवेळी नव्याने उलगडते. कधी एखादी आधी जाणवलेली शेड गडद होते, एखादी फिकुटते तर काही नवीन रंग भरुन एक नवे चित्र समोर येते. ऋतुच काय पण दिवसाच्या प्रत्येक प्रहरातही वेगळेपण जाणवून द्यायची ताकद असते.

सकाळच्या प्रहरी आणि मावळतीला किरणांनी आपल्याशी मारलेल्या गप्पांचा पोत वेगळा असतो का? दोन्हीत ऊब जाणवते हलकिशी हवीहवीशी पण दोन्हीतले वेगळे पण मनाला जाणवते. इतकेच काय पाना पानांच्या आडून कवडश्यांची नक्षी करत संवाद साधणाऱ्या किरणांची बोलीही वेगळी भासते.

नुकतेच म्हणजे नोव्हेंबर मधे आम्ही इंदौर उजैन महेश्वर वगैरे फिरुन आलो. या पैकी महेश्वरला नर्मदेचा घाट अनुभवायची प्रचंड इच्छा होती. महेश्वरला पोहोचून घाटावर गेलो तेव्हा उन्हे उतरत होती. उतरणाऱ्या उन्हासोबत हळू हळू काळोखी शांतता हलके पसरत चालली होती सभोवार. इथे नर्मदेच्या पाण्यात एक बेट असावे अशा प्रकारे चारी बाजूंनी पाण्याने वेढलेले असे शिवमंदीर आहे, बाणेश्वर त्याचे नाव. घाटापासून तिथवर बोटीतून जाता येते. फार नाही अगदीच छोटी राईड आहे ही पण हळू हळू अंधारुन येत असताना घाटावरुन पाण्यात सोडलेल्या दिव्यांची रांग बघत, एकीकडे बाणेश्वराचे प्रतिबिंब बघत केलेला हा प्रवास आपल्या नकळत आपल्या आतही ती शांतता झिरपवत नेतं. त्या क्षणी नर्मदेच्या घाटाने, त्या कृष्णकिनाऱ्याने, नदीच्या शांत प्रवाहाने आमच्याशी साधलेला संवाद जादुई होता. त्यांच्या शांततेचं आमच्या मनात प्रतिबिंब उमटवणारा असा खास होता. इतका खास की यापुढे काही लिहूच नये, इथेच थांबावं असं वाटणारा हा क्षण.
खरेतर अशी शांतता अनुभवल्यावर याहून अधिक वेगळे काय सापडणार असे वाटत होते पण रात्र सरली नवा दिवस सुरु झाला आणि सकाळी सुर्योदयापुर्वीच जाग येऊन आम्ही परत एकदा घाटावर आलो. तिथून निघण्यापूर्वी नर्मदेचा निरोप घ्यावा असा काहीसा वेडा विचार त्यामागे होता. असा निरोप नाही घेता येत. नर्मदेच्या ठिकाणी आपले काही श्वास आपण सोडून येतो आणि काही लेणी तिची आपल्या मनात कोरुन आपल्यासोबत घेऊन येतो. त्यामुळे असा (कॉर्ड कट) नाळ तोडून टाकल्या सारखा सगळे बंध आवरुन घेता येतील असा निरोप नाही घेता येत पण हे कुठे त्यावेळी उमजलेलं इतक्या ठळकपणे. हे तर नर्मदेला भेटून येऊन आज तीन महिने झाल्यावर या निमित्ताने नव्याने समजलय. तर सांगत होते आम्ही निरोप घ्यायला सकाळच्या प्रहरी नर्मदेच्या घाटावर गेलो त्याबद्दल. त्याही दिवशी घाटावर शांततेची सोबत होती. फक्त रात्रीच्या आणि सकाळच्या शांततेचा पोत वेगळा होता.
नदी पात्रात आदल्या रात्री कोणी कोणी सोडलेल्या दिव्यांपैकी काही दिवे किनाऱ्याला लागले होते. यातलाच एक दिवा आमचा असेल का? की प्रवाहात पुढे पुढे निघून गेलेल्यातला एक असेल तो? माहिती नाही पण हरकत नाही तसही सोडून दिल्यावर आपण त्याला विचारातही अडकवून ठेवण्यात काय अर्थ?
तिथेच एकजण पाण्यात बुडलेल्या पायरीवर बसून ध्यानधारणा करत होता. त्याला आतून शांत वाटत होते का माहिती नाही पण त्याचे असे ध्यानस्थ बसणे, कोवळ्या सुर्यकिरणांनी त्याला अभीषेक करणे, मधूनच देवळातल्या घंटेचा नाद या सगळ्यात मिसळणे या सगळ्याने जे चित्र तयार झाले होते ते मनाच्या आत शांतता झिरपवत होते.
कालचा कृष्ण सावळा किनारा आणि आजचा सोनेरी झाक असलेला किनारा दोन्ही चित्रे लोभस होती. दोन्हीत तिथे खिळवून ठेवण्याची अपार ताकद होती आणि तरिही नदीचे प्रवाहीपण अबाधित होते. मला वाटते निरोप घेऊन निघालो तरी शांतते सोबतच हे प्रवाहीपण आमच्या आत एक भाग बनून आमच्या सोबत पुढच्या प्रवासाला निघाले होते. अर्थात हे आज तीन महिन्यांनी डोळे मिटून ते क्षण पुन्हा फिरुन आले तेव्हा झालेली अनुभूती आहे ही. परत भेट होईल तेव्हा नर्मदा अजून काही वेगळा संवाद घडेल का आमच्यात? जसा नाणेघाटा सोबत घडला? नक्कीच घडेल, कारण प्रत्येक प्रहरातला प्रत्येक ऋतूतला इतकच काय प्रत्येक क्षणा क्षणातला निसर्ग वेगळा असतो आणि प्रत्येकाशी साधला गेलेला संवाद हा त्यांच्याशी असलेला वैयक्तिक करार सांगत असतो.

IMG_20241120_180507.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुंदर लिहिलंय..
फोटो ही छान!

नर्मदे विषयी इतक्या लोकांकडून ऐकले त्यामुळे एकदा कधीतरी ती भेट घडावी अशी इच्छा आहे.. आज तुमचा लेख वाचताना ती अजून प्रबळ झाली.

नाणेघाट माझा पहिला आणि शेवटचा ट्रेक ( एकमेव) म्हणून तो अनुभव लक्षात राहिलेला..

छानच लिहिलंय !

पण

पुर्वापार चालत आलेल्या मराठी शब्दांशी नाळ तुटायला नको असेल तर कॉर्ड कट आणि मेडीटेशन सारखे शब्द येणार नाहीत ह्याकडे ध्यान द्यायला हवे आहे.

खरय हर्पेन. पण त्यावेळी ओघात लिहीताना नाही सुचले खरे.

धन्यवाद प्रज्ञा, आडो, शर्मिला, छंदीफंदी आणि हर्पेन

अप्रतिम!

मनुष्याच्या भावना आदिमकाळापासून पाण्याशी एकरूप झाल्या आहेत.

रीना, मृ, दोन्ही स्वाती, मामी, ममो, मैत्रेयी,वंदना धन्यवाद

छंदीफंदी, छानच आहे घाट तिथला. म्हणजे ओंकारेश्वरलाही चांगलाच आहे असे ऐकलेय. आमचं तिथे नाही जाणे झाले. महेश्वरला तेव्हढे जाणे झाले. महेश्वरचा घाट चांगला आहेच पण राजवाड्याचा भाग, दगडी बांधकाम हे पण सुंदर आहे.

मला वाटते निरोप घेऊन निघालो तरी शांतते सोबतच हे प्रवाहीपण आमच्या आत एक भाग बनून आमच्या सोबत पुढच्या प्रवासाला निघाले होते. >>>>> क्या बात है !!
संपूर्ण लेखच अतिशय जमलाय... अनुभवलेलं शब्दबद्ध करणं खरं तर अगदीच कठीण गोष्ट - पण इथे ते अगदी जमून आलंय... Happy

क्षणभर मीच नर्मदेकाठी गेले आहे की काय असं वाटलं तुझा लेख वाचून. ती शांतता मलाही जाणवली इथे. फोटोही साजेसा.
छान झाला आहे लेख, कविन. आवडला.

अहाहा
फारच सुंदर.
मी गेलो आहे महेश्वरला. तो घाट आणि तो नर्मदेतील बोटीतून केलेला प्रवास अफलातून अनुभव आहे.
नर्मदा, महेश्वर तो परिसर एक गूढ आहे. एकदा आपण गेलो की पुन्हा पुन्हा आकर्षिले जातोच.
फोटो सुद्धा छान आलाय.

फारच सुंदर लिहिले आहे..

तिथून निघण्यापूर्वी नर्मदेचा निरोप घ्यावा असा काहीसा वेडा विचार त्यामागे होता. >>>> असा एखाद्या आवडलेल्या जागेचा निरोप घ्यावा असे खरेच वाटते.

तरल अनुभव आणि लेखन.

【【【【नर्मदेच्या ठिकाणी आपले काही श्वास आपण सोडून येतो आणि काही लेणी तिची आपल्या मनात कोरुन आपल्यासोबत घेऊन येतो.】】】】

नेमकं एकदम.