मभागौदि २०२५, निसर्गायन-शर्वरी.

Submitted by -शर्वरी- on 26 February, 2025 - 18:08

अजस्त्र, कभिन्न तटबंदी सारखे
उंचच उंच सरळ उभे प्रचंड कडे
पुर्वी तिथे एक नदी होती…म्हणे.
तेंव्हा इथे विशालकाय डायनासोर ही रहायचे.
नीट बघितले तर एखाद्या कातळात
सापडतील त्यांच्या पायांचे ठसे.

इथे थंडी खुप आहे. गार भरार वारा आहे.
दडपून जाईल छाती असे हे सुळके आहेत.
धुळभरला रस्ता आणि किर्र शांतता आहे.
बाहेर पडायचा रस्ता
हा पसरला आहे समोर.
चलं, निघावं आता लगोलग,
उभ्या कड्यांच्याही वर
आकाशात आली आहे चंद्रकोर.
दिवसाही इथे पक्षी नाहीत फिरकत.
अंधारल्या वाटांवर येतील आदिम जीव सरपटत.
घाबरु नको तरीपण.
कितीही वाटलं एकाकी तरी,
मी आहे ना तुझ्या सोबत?

नीट ऐक कान देऊन.
या शांततेलाही आवाज आहे.
अजस्त्र, आदिम जागेलाही जगण्याची आस आहे.
घाबरलीस तर ऐकु येईल तुला तुझाच श्वासोच्छवास.
निर्भयतेने ऐकशील तर या पाषाणालाही आहे आवाज.
ओळख झाली की मग, बोलतील ते नक्की तुझ्याशी
आदिम, अजस्त्र, अंधाऱ्या गोष्टी का जोडतेस नरकाशी?

जर बोलत राहीलो आपण तर,
या कातळांना फुटतील का कधी झरे…
सापडतील का नविन रस्ते,
नव्या ठिकाणी जाणारे?

असु दे. आज इतकेच पुरे.
पण येऊ आपण पुन्हा पुन्हा.
परत येऊ, येत राहु.
जेवढे, जेंव्हा जमेल तेंव्हा.
या निरवतेत सापडेल कदाचित…नवे काही
किंवा आकळेल जुनेच…नव्याने काही
किंवा कदाचित…काहीच नाही.
किंवा कदाचित…काहीच नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वाती, तु म्हंटलेले आवडेल.
अवाक झाले नाही. Lol पण confuse झाले. जे लिहीले होते ते निसर्गायन आहे का या विचाराने. परत edit करते.

सुंदर लिहिलंय.
मथळ्यात आयडीही लिहिशील का? (निसर्गायन - शर्वरी असं).

छान लिहिले आहे..
अजस्त्र, आदिम जागेलाही जगण्याची आस आहे.>>>> मस्त.
फोटो कुठला आहे. मस्त आहे.

छान लिहिलंय..
नीट ऐक कान देऊन.
या शांततेलाही आवाज आहे.
अजस्त्र, आदिम जागेलाही जगण्याची आस आहे.
घाबरलीस तर ऐकु येईल तुला तुझाच श्वासोच्छवास.
निर्भयतेने ऐकशील तर या पाषाणालाही आहे आवाज.
ओळख झाली की मग, बोलतील ते नक्की तुझ्याशी
आदिम, अजस्त्र, अंधाऱ्या गोष्टी का जोडतेस नरकाशी?>>> विशेष आवडलं..

धन्यवाद अंजू, ऋतुराज, छन्दिफन्दि.
ऋतुराज, फोटो Monument Valley चा आहे. अनेक वेस्टर्न चित्रपटांमध्ये हा भाग आपल्याला दिसतो.
निसर्गाची अजस्त्रता, झाडे-पाणी-जीवनाचा अभाव असणारे,मनामध्ये भीती निर्माण करणारे रुप, त्यामुळे, इथे गेल्यानंतर, परत आल्यावरही अनेक दिवस जी अस्वस्थता दाटून राहिली ती मांडावी वाटली.

छान लिहिलं आहे. आवडलं आणि मुख्य म्हणजे पटलंही.
नेहमीच्या निसर्ग सौंदर्या सोबत, अशा जागा, जुने पडके किल्ले, वाडे त्यातले साप -सरडे, घुक्क अंधारातला निसर्ग याबद्दलही आकर्षण वाटत आले आहे.

Happy छान लिहिले आहे. एक आध्यात्मिक छटा जाणवते तुझ्या अशा लेखनात. निसर्ग प्रत्येकाला आपापली रूपं ओळखायला मदत करतो.

मानव, ऋन्मेष, अस्मिता, हेमाताई मनापासून धन्यवाद!
अस्मिता, तुझ्या वाक्यावर विचार करते आहे. Happy