रीक्रिएटर

Submitted by मनोज मोहिते on 26 February, 2025 - 12:07

मनोज मोहिते
‘एलए फिल’चा वर्षभरापूर्वीचा एक व्हिडीओ आहे, त्यांच्या यूट्युब चॅनलवर. ‘द फायरबर्ड’च्या तालमीचा. हा आठ मिनिटे तीन सेकंदांचा व्हिडीओ बघणे म्हणजे ट्रीट आहे. असे अनेक व्हिडीओ इंटरनेटवर आहेत, गुस्तावोच्या तालमीचे. नेमक्या या व्हिडीओविषयी थांबलो यासाठी की, ‘एलए फिल’मध्ये गुस्तावो चीफ कण्डक्टर आहे.

गुस्तावो कण्डक्टरच्या नेमलेल्या जागी उभा आहे. आणि सूचना देतोय ‘वन... टू...’ पण थ्री म्हणत नाही. यावेळी तो एक खुणेचा विशेष आवाज काढतो आणि स्ट्रिंग सेक्शन सुरू होतो. ड्रम आणि ब्रास सेक्शनचीही सोबत असतेच. मग तो डोलायला लागतो. त्याचे डोळे बोलू लागतात. गुस्तावो ऑर्केस्ट्रा कण्डक्ट करतो तेव्हा तो ताला-सुरासोबत नादावतो. ऑर्केस्ट्रामधील सारे वादक- कोरस असला तर कोरस- हे बॅटनवर बेतलेले असतात. गुस्तावो हा बॅटनसोबत स्वत:वरही साऱ्यांना बेतून धरतो.

या व्हिडीओत काही सेकंद होत नाही तोच तो साऱ्यांना थांबवतो. आणि म्हणतो, ‘शेवटाला घाबरू नका.’ त्या संगीताच्या तुकड्याचा शेवट. तिथे कोणते स्वर उमटले आहेत आणि त्याला काय अपेक्षित आहे हे तो सांगतो. ‘शेवटापर्यंत नियंत्रण ठेवा. (स्ट्रिंग सेक्शनला सांगतो) ‘तुम्ही बो खूप जास्त जम्प करत ठेवाल, तर ते खूप लाउड होईल.’

ते कसे लाउड होईल, हे तो सांगतो. यावेळी त्याचा डावा हात व्हायोलिन होतो आणि उजव्या हातातला बॅटन बो होऊन जातो. साहजिक आहे. गिटार नाही का आपण, झाला मूड तर डावा हात आडवा करतो आणि उजव्या हाताच्या बोटांमध्ये स्ट्रिंग्ज समजून वाजवू लागतो. नाटकात नाही का आपण, ‘तो बघ आकाशातला चंद्र’ असे नटाने म्हटले आणि वर रंगमंचाच्या छताकडे बोट दाखवले तर आपण प्रेक्षक छताकडे बघतो; तिथे चंद्र नाही हे ठाऊक असूनही. हेही असेच. देहबोली अशीच असते. साऱ्या साऱ्या लयकारीतून ती खूप काही बोलते. नकार द्यायला हलकीची मान हलविणेही पुरेसे असते. होकार द्यायला हलकीशी मान हलविणेही पुरेसे असते. होकार हवा असल्यास आपली मान अधिकाधिक हलणे गरजेचे असते आणि नकार द्यायलाही मनाला मानेला गती अपेक्षित असते. मानेच्या कमी-अधिक हलण्यातून हा असा होकार-नकार मिळत असतो. इथे तर ‘बो’ची बोली आहे. बॅटनची बोली आहे. गुस्तावो त्यात स्वत:च्या देहाचीही बोली बेमालूम ब्लेण्ड करतो.

म्हणतो, ‘हे जरा जरा रोसिनीसारखे हवे आहे.’ अधूनमधून आपल्या लूजरशी खेळत राहतो. मध्येच हसतो. खोडकर हसतो. आणि वाद्यांचा सुरेल खेळ पुन्हा सुरू होतो. सोबतीला गुस्तावोचा देहबोलीचा मेळ असतोच असतो. ‘गुड’ म्हणतो. मध्येच ‘व्होकलायझिंग’ करतो. त्याला या जागचा सूर ‘ग्राझिओसो...’ हवा असतो. ग्रेसफुल. एलिगण्ट.

आता एक गंमत आहे. सारे वादक त्याला, त्याच्या देहबोलीला फॉलो करीत असतात. एका क्षणाला ती चुकते. सूर चुकतो. तो ‘सॉरी’ म्हणतो. स्वत:ला दुरुस्त करतो. मोकळा करतो. तोच क्षणी ट्रम्बोन कानात भरतो. या ट्रम्बोनला तो दाद देतो. ‘माय डिअर, आय लव्ह. इट साउण्ड्‌स गुड.’ पण त्याला इतकेच नकोय. अधिक हवे आहे. मग बोटांच्या चिमटीने सांगतो, ‘मेबी लेस फॉर्ते.’ म्हणजे नेमके काय अपेक्षित आहे, हे समजावून सांगतो.

पाने पलटतो. या पानांचा आवाज कानात भरतो. ‘आवाज ‘चिर्र’ हवा... आणि प्लीज, जरा वेगळेपणा आणा, माय डियर्स... इन थ्री आफ्टर इलेव्हन...’ पिअॅनोकडून काय अपेक्षित आहे, हे सांगतो. पुन्हा लूजरशी खेळतो. खेळता खेळता एक गोष्ट सांगतो. ‘एक व्हिडीओ आहे. एका दिग्गज संगीतकाराचा. बहुधा जर्मन. तो... तो तेव्हाचा व्हिडीओ; सत्तरीच्या दशकातला. द युरोपियन युथ ऑर्केस्ट्राचा. अबादोने ऑर्केस्ट्रा तयार केला होता तेव्हाचा. हा त्याचा व्हिडीओ आहे, मिरॅक्युलस मॅण्डरिन. हा व्हिडीओ म्हणजे मॅडपण. कॅमेरा असा जातो की... (कसा जातो हे आवाज काढत हातांनी सांगतो. कॅमेऱ्याचा अँगल सांगतो) आणि मग ते सारे युवा; ते असे दिसतात... (आता एक अॅग्रेसिव्ह आवाज काढतो) आता ते ट्रॅ्म्बोन्स, मग स्ट्रिंग्ज... सारे सारे वेडावतात. बूम! ‘हे म्युझिक खूप क्रेझी आहे. पण...’

पण, ठाऊक आहे, हे अगदी साधेही असू शकते. माझ्या मनात... (मनात काय आहे हे पुन्हा व्होकलायझिंग करून सांगतो.) ‘प्रत्येक जण प्रत्येक क्षणाला प्रतिसाद देतो. बी वाइल्ड!’ गुस्तावो साऱ्या वादकांना खोडकर हसत ‘वाइल्ड’ व्हायला सांगतो. ‘तसा प्रयत्न करा. चला काही वर्षांमागे जाऊ... समजा की आपण सोळा वर्षांचे आहोत. (हे वाक्य कानी पडताच सारे वादक हसतात) पंधराचे आहोत. बहुधा १४, १५, १६... सो वि आर इन द- (आता गुस्तावो श्वास घेतो) म्हणतो, आता सारे नानाविध गंध आहेत. ओके! विचार करण्याची आपली सारी पद्धत आता बदलली आहे. आणि हो, चुका करा! चलो, ट्राय करते है... फोर, वन, टू अॅण्ड- ऑर्केस्ट्रा सुरू...

गुस्तावो दुदामेल. ‘एलए फिल’ म्हणजेच ‘लॉस एंजेलिस फिलहार्मोनिक’चा चीफ कण्डक्टर. काही वर्षांपूर्वी तो या पदावर आला. मूळचा व्हेनेझुएलाचा. त्याचे वडील वादक, पण क्लासिकल म्युझिकचे नाही. सालसा आणि लॅटिन म्युझिकमध्ये त्यांचा सहभाग असे. त्या काळाबाबत गुस्तावो म्हणतो, ‘घरी क्लासिकल म्युझिक कधी ऐकले नाही.’ बेसबॉल प्लेअर, सॉकर प्लेअर, आणि संगीत अगदी आजूबाजूला होते. त्यामुळे मी अगदी नैसर्गिकरित्या संगीतकार झालो.’ असे तो सांगतो. ‘अमेरिकन लॅटिनो’शी बोलताना, ‘स्वत:ला मजबूत करणार नाही, तोवर करिअर घडणार नाही.’ हेही आवर्जून नोंदवितो. गुस्तावोने संगीताची रीतसर शिक्षण वयाच्या बाराव्या वर्षी सुरू केले. नंतर तो म्युझिक कण्डक्टर होण्याकडे गंभीरपणे वळला. तरुणवयातच कण्डक्टर झाला.

एखाद्या खळाळ नादात समरसून वाहत राहणे, वाहता वाहता वळणे घेणे, वळणे घेता घेता नवी खोली, नवी उंची गाठणे... वाऱ्याशी बोलणे, त्याला टिचकी मारणे मग पुन्हा मध्येच अगदी सूक्ष्मसंथ होणे आणि मग उसळून वर येणे... हे सारे सारे ऑर्केस्ट्राचा कण्डक्टर करत असतो, वादकांना करायला लावत असतो. गुस्तावोचे खास वैशिष्ट्य हे की तो हे सारे तितकेच स्वत: एन्जॉय करतो... अशावेळी कान आणि डोळे दोन्ही इतके गुंतगुंग होतात की कानाने ऐकलेले डोळ्यांना सांगावे की डोळ्यांनी पाहिलेले कानाला ऐकवावे... एकेका क्षणाला काय काय ऐकावे-पाहावे याचा गोंधळच उडतो.

गुस्तावो आता चाळिशीत आहे. त्याने यंदा तीन ग्रॅमी पुरस्कार जिंकले. त्याने गुस्तावोने कण्डक्ट केलेल्या ‘ऑर्टिझ : रिव्हॉल्युशन डायमेण्टिना’ या कम्पोझिशनला यंदा ‘बेस्ट ऑर्क्रेस्ट्रल परफॉर्मन्स’, ‘बेस्ट क्लासिकल कॉम्पेडियम’ आणि ‘बेस्ट कण्टेम्पररी क्लासिकल कम्पोझिशन’ या तीन गटांत ग्रॅमी मिळाले. ‘बेस्ट कण्टेम्पररी क्लासिकल कम्पोझिशन’ या गटात विख्यात म्युझिक कम्पोझर गॅब्रिएला ऑर्टिझ यांच्यासह त्याला ग्रॅमी मिळाले. २०१९ सालच्या ‘ग्लिटर रिव्हॉल्युशन’वर हे गाणे बेतलेले आहे. गुस्तावोला आजवर ग्रॅमीचे नऊ नॉमिनेशन्स मिळाले असून सात ग्रॅमी जिंकले आहेत. पैकी या वर्षीच तीन घेतले आहेत.

गुस्तावो ‘एलए फिल’चा चीफ कण्डक्टर म्हणून रुजू झाला, तेव्हा लिओनार्ड स्लॅटकिन ‘ग्रामोफोन’शी बोलताना म्हणाले होते, ‘व्हेनेझुएलात मोठे होण्याचा अनुभव कामी येईल. लॉस एंजेलिसमध्ये मोठ्या संख्येने असलेल्या हिस्पॅनिकांना तो ऑर्केस्ट्राशी कनेक्ट करेल, असे की जे अद्याप इथवर येऊ शकले नाहीत.’ स्लॅटकिन हे २००५ ते २००७ या काळात ‘एलए फिल’चे प्रिन्सिपल गेस्ट कण्डक्टर होते.

‘एलए फिल’मध्ये गुस्तावोला संधी मिळाली तेव्हा तो उत्साहित होता. ‘एलए ही जागा नव्या परंपरांची आहे. अविश्वसनीय आणि वेडेपणाच्या गोष्टी करण्याची ही जागा आहे. संगीताचा एकच पीस तुम्ही अनेकदा वाजवू शकता, पण प्रत्येकवेळी तो सारखाच राहणार नाही. संगीत तुम्ही क्रिएट करीत नाहीत, तर रीक्रिएट करता’, असे त्याचे ठाम मत आहे. ‘पीपल वर्किंग फॉर बेटर वर्ल्ड’ असा गुस्तावोचा गाढ विश्वास आहे. गुस्तावो आजच्याच घडीचा नव्हे, तर आजवरच्या महत्त्वाच्या फिलहार्मोनिकच्या/ऑर्केस्ट्राच्या अव्वल दर्जाच्या म्युझिक कण्डक्टरच्या यादीत आधीच गेला आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults