"अगं शुद्ध नंदीबैल आहे तो! कोणीही काहीही सल्ले देतं आणि हा बुगूबुगू म्हणून मान डोलावतो! इतकी छान तब्येत होती, आता पाप्याचं पितर झालंय नुसतं!
मी स्पष्ट म्हटलं त्याला, 'आता शहाणपणा पुरे! तुझ्या घुगर्या जेवल्या आहेत मी, कळलं?! पंचवीस तरी पावसाळे जास्त पाहिलेत तुझ्यापेक्षा! माझं ऐक आणि नीट खायलाप्यायला लाग!'
बघू, आता तरी उजेड पडतोय का!
आणि हो, पुढच्या वीकेन्डला आम्ही गडबडीत असू. शनिवारी देशपांडे काकांचं सहस्रचंद्रदर्शन करताहेत त्यांची मुलं, आणि रविवारी नाशकात विभाच्या मुलाचं लग्न. गोरज मुहूर्त आहे, अक्षता पडल्या की लगेच परतीला लागू आम्ही. अगदी सूप वाजेतोवर थांबणार नाही. सोमवारी कामावर जायचंय. रात्र थोडी आणि सोंगं फार म्हणतात तशातली गत होणार आहे खरंतर. विभाला मी 'बघू, बघू' म्हणून टोलवायचा प्रयत्न केला आधी, पण म्हटलं जाऊ दे, तिच्याकडचं शेवटचं कार्य आहे."
हे झालं एक सहज कौटुंबिक संभाषण. तुम्हाला यातले सगळे,निदान बहुतेक संदर्भ नेमके कळले, हो ना?
आता असं समजा, की हे संभाषण तुमचा एखादा अमराठी रूममेट ऐकतो आहे. त्याला यातलं काय काय कळेल?
'घुगर्या जेवलेल्या असणं' किंवा 'पाप्याचं पितर' हे 'अॅडव्हान्स्ड लेव्हल' संदर्भ जाऊ द्या, पण ‘शहाणपणा’ हे कौतुकाने म्हटलेलं नाही हे त्याला कळेल?
समजा हा सगळा मजकूर इंग्रजीत भाषांतरीत करायचा झाला, तर?
शब्दाला प्रतिशब्द असं या संभाषणाचं भाषांतर करणं जवळपास अशक्य आहे, कारण यातले बहुतांश संदर्भ भाषिक कमी आणि सांस्कृतिक अधिक आहेत.
आता हाच संवाद असा कल्पून पाहा:
"अगं भोळा आहे तो, कोणाचेही सल्ले ऐकतो! खूप बारीक झालाय!
मी स्पष्ट म्हटलं त्याला, 'आता प्रकृती सांभाळ! माझ्यापेक्षा वयाने लहान आहेस, तेव्हा माझं ऐक आणि इतकी अनावश्यक आणि कडक पथ्यं पाळत जाऊ नकोस.'
आता त्याच्यात सुधारणा होईल अशी आशा आहे.
आणि हो, पुढच्या वीकेन्डला आम्ही गडबडीत असू. शनिवारी देशपांडे काकांचा एक्क्याऐंशींवा वाढदिवस साजरा करताहेत मुलं त्यांची, आणि रविवारी नाशकात विभाच्या मुलाचं लग्न. लग्न संध्याकाळी लागेल, ते झालं की लगेच परतीला लागू आम्ही. इतर पाहुणे निघायची वाट पाहात थांबणार नाही. सोमवारी कामावर जायचंय. धावपळ होणार आहे खरंतर. लग्नाला जावं की नाही असं वाटत होतं, पण पण जायचं ठरवलं शेवटी. आता इतक्यात त्यांच्या कुटुंबात कोणता मोठा सोहळा होणार नाही."
या मजकुराचं शब्दशः भाषांतर करणं तुलनेने सोपं असेल, नाही का?
यातल्या पहिल्या प्रकारच्या संवादाला इंग्रजीत High Context Communication असं म्हणतात. आणि ज्या मानवसमूहांमधले बहुतांशी संवाद (communication) असे ‘अन्वयार्थसमृद्ध’ असतात त्यांना High Context Cultures म्हटलं जातं. उलट ज्या मानवसमूहांतले बहुतेक संवाद थेट आणि शब्दशः अर्थ पोचेल असे घडतात, त्यांना Low Context Cultures समजतात.
हे high आणि low माप अर्थातच तौलनिक असतं. ते एक रंगपटल (spectrum) आहे.
म्हणजे उदाहरणार्थ अमेरिकन इंग्रजी संभाषण हे सहसा ब्रिटिश इंग्रजीपेक्षा low context असतं.
किंवा पुणेरी मराठी हे सहसा मुंबईच्या मराठीपेक्षा अधिक high context असतं.
अनेक आशियाई देशांची high context culturesमध्ये, तर अमेरिका किंवा जर्मनीसारख्या देशांची तुलनेने low context culturesमध्ये गणना केली जाते.
यातले 'सहसा' आणि 'अमुकपेक्षा'/’तुलनेने’ हे शब्द महत्त्वाचे.
मग एखादा मानवसमूह अधिकाधिक ‘अन्वयार्थसमृद्ध’ कसा होत जातो? साधारणपणे असं दिसून आलं आहे की दीर्घ इतिहास असणारे आणि बहुतांशी सांस्कृतिकदृष्ट्या एकसंध (homogeneous) असणारे समाज हे तुलनेने अधिक high context असतात.
याचा लहान प्रमाणात पडताळा घट्ट वीण असणार्या कुटुंबांमध्ये किंवा मायबोलीसारख्या समूहांमध्येदेखील येतो. उदाहरणार्थ इथल्या वाहत्या धाग्यांवर नेहमी गप्पा मारणार्यांच्यातले काही खास शब्दप्रयोग (inside jokes) सोबत अन्वयार्थांचा गोतावळाच घेऊन येतात, जे त्या पानावरच्या लोकांना न सांगता नेमके कळतात.
high context मानवसमूहांचा आणखी एक गुणधर्म म्हणजे अनेकदा त्यांच्यात वय/हुद्दा/लिंग/आर्थिक स्थिती इत्यादींवर आधारित सामाजिक वर्गवारी, किंवा उतरंडसुद्धा (hierarchy) सर्वमान्य असल्याचं दिसून येतं.
म्हणजे गंमत म्हणून मी सुरुवातीला दिलेलं संभाषण पुन्हा वाचून बघा. खरंतर त्यात बोलणार्याबद्दल एकही लिंगसूचक शब्द किंवा क्रियापद नाही. तरीही ते वाचताना कोण बोलत असल्याचं तुमच्या डोळ्यांपुढे आलं? मराठी घरात सहसा या प्रकारे बोलणारं, नातेसंबंध / सणसमारंभ यांबद्दल अगत्य असलेलं कोण असतं? शब्दांमधल्या मोकळ्या जागांतून ही माहिती कशी संक्रमित झाली? गंमत आहे ना?
आता याउलट जिथे निरनिराळ्या संस्कृतीतल्या लोकांची सरमिसळ असते, जिथे व्यक्तीला समूहापेक्षा अधिक महत्त्व असतं (individualistic, जसे आधीच्या उदाहरणांतले अमेरिका आणि मुंबई), तिथे संभाषण अर्थवाही होण्यासाठी सूचित अन्वयार्थांपेक्षा स्पष्ट तपशिलांना अर्थातच अधिक महत्त्व यायला लागतं.
पारंपरिक भारतीय पाककृती आणि उदाहरणार्थ फ्रेन्च पाककृती कशा प्रकारे संक्रमित होतात हे पाहिलं तर हा मुद्दा लगेच लक्षात येईल. वाटीभर/चिमूटभर/डाळीएवढं वगैरे मापं, ‘तेलाला ताव आला की’ / ‘खमंग वास येईपर्यंत’ / ‘बोट बुडवेल इतपत गरम’ वगैरे लक्षणं यांची भारतीय पाककृतींमध्ये रेलचेल असते.
माझी काकू 'धिरडं तव्यावर घातलं की चुर्र आवाज यायला हवा, मग त्यावर झाकण ठेवून अंगणातल्या तुळशीला एक प्रदक्षिणा घालून यायची आणि मगच ते सोडवायला सुरुवात करायची' असा ठोकताळा सांगायची! आता माझ्या जन्माने अमेरिकन असलेल्या मुलाला हे सांगितलं तर त्याला तव्याचं तापमान किती, नॉनस्टिक की कास्ट आयर्न, गॅस रेन्ज की इंडक्शन, घर किती मोठं, अंगण किती लांब, स्वयंपाक्याच्या चालण्याचा वेग किती, असे सगळे प्रश्न पडतील, पण मला तेव्हा ते नीट कळलं होतं.
तेच पाश्चात्य पाककृतींत इतके औंस, तितकं तापमान, अमुक मिनिटं बेकिंग असे प्रमाणित (standardized) तपशील असतात. 'शब्दांवाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले' वगैरे भानगडी त्यांना पाककृतींमध्ये झेपत नाहीत.
High context communicationsमध्ये अनेकदा प्रत्यक्ष शब्दांइतकेच ते उच्चारतानाचा सूर, हावभाव हेही महत्त्वाचे असतात. अशा भाषा अनेकदा अधिक नादमय असतात. 'ती फुलराणी'मधलं भक्ती बर्वेचं 'तुला शिकवीन चांगलाच धडा' हे गद्यकाव्यात्मक स्वगत आठवतं? त्यात ती शेवटी 'जाऊ द्या, गरीबाला सोडा!' हे ज्या प्रकारे म्हणते, त्यातून तिने 'क्षमा केली' असं ध्वनित होतं का?
'My Fair Lady'मध्ये त्या जागी 'Just you wait' गाणं आहे. सहज गंमत म्हणून त्याचा शेवट कसा होतो तेही बघा.
ही सगळी अनौपचारिक संभाषणांची उदाहरणं झाली.
पण आता आपण सगळेच ग्लोबल सिटिझन झालो आहोत. समाजमाध्यमांवरच्या वैयक्तिक वावरावरच नव्हे, तर कामाच्या निमित्ताने कराव्या लागणार्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पांतही हे अशा प्रकारचे फरक कळत नकळत प्रभाव टाकत असतात. अशा वेळी ज्या व्यक्ती वा समूहाबरोबर संभाषण/काम/वाटाघाटी करायच्या त्यांच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीची निदान जुजबी माहिती असेल तर गैरसमजांना कमी वाव उरून अधिक परिणामकारकरीत्त्या काम करता येऊ शकतं.
उदाहरणार्थ मॅनेजरला नावाने हाक मारणारा सहकारी उद्धट नसतो आणि तिला मॅडम म्हणणारा सहकारी भंपक नसतो. सगळं काम तपशीलवार समजावणारा मायक्रोमॅनेजर तुम्हाला अपात्र समजत नसतो आणि टीम्समध्ये दोनच नेमके शब्द टाइप करणारा बाकीची माहिती हेतुतः लपवत असेलच असं नसतं. या नकळत अंगवळणी पडून गेलेल्या, त्या त्या समाजात पिढ्यानपिढ्या बाणवल्या गेलेल्या फक्त सवयी असतात अनेकदा. अशा निरनिराळ्या कार्यपद्धती अंगी बाणलेल्या गटांची कार्यक्षम मोट बांधता यावी म्हणून हा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.
आंतरजालावर 'High Context Communication' असं शोधलंत तर या संदर्भातले अनेक अभ्यासपूर्ण, सोदाहरण माहिती देणारे दुवे सापडतील. (तळटिपांमध्ये दोन उदाहरणं देते आहे.)
त्यांत स्पेसिफिक मराठीबद्दलचा दुवा अर्थातच नाही, पण या रंगपटलावर मराठी तिच्या सगळ्या लेखी आणि बोली अवतारांसह high context बाजूला झळकेल हे नक्की. तिच्यातला अंगभूत उपरोधही बहुधा त्यातूनच येत असावा असं मानायला वाव आहे. तुम्हाला काय वाटतं?
मराठी भाषा यंदा अभिजात ठरली म्हणून त्याविषयी लेख लिहावा अशी सूचना संयोजकांनी केली होती, पण त्याबद्दल लिहिण्याइतका माझा व्यासंग नाही. खेरीज प्रामाणिकपणे सांगायचं तर भाषा अभिजात असल्यानसल्याचं मला विशेष सोयरसुतकही नाही. अभिजात असण्यापेक्षा माझी भाषा अद्ययावत्, लवचिक आणि प्रवाही असणं मला जास्त आवडेल
म्हणजे आता हाच लेख लिहिताना 'high/low context' या संज्ञांचं मराठी भाषांतर काय करता येईल यावर मी बराच विचार केला, मित्रमैत्रिणींना विचारलं, पण समाधानकारक भाषांतर सुचलं नाही. मुळात contextसाठीदेखील स्वतंत्र प्रतिशब्द मराठीत नाही. 'संदर्भ' म्हणजे reference की context हे... contextनुसारच ठरतं!
मग भाषांतराच्या हट्टापायी संस्कृतोद्भव शब्द मोडून/जोडून उगाच क्लिष्ट संज्ञा 'तयार' करण्याऐवजी मी मूळ इंग्रजी संज्ञाच वापरायचं ठरवलं. जितक्या अधिक वापरल्या जातील तितक्या अशा संज्ञाही पेन, टेबल, किंवा याच लेखात आलेल्या मॅनेजर वगैरे शब्दांसारख्या रुळतील आणि भाषा प्रवाही राहील.
म्हणजे मग माझ्या भाषेवर माझं प्रेम आहे की नाही? आहे तर! इतकं प्रेम आहे, की तिचा स्वभाव कसा आहे, तिचा नाद कसा आहे, तिची मुळं किती खोलवर रुजलेली आहेत, तिच्या फांद्या किती दूरवर पसरलेल्या आहेत हे शक्य तितकं माहीत करून घ्यायला मला आवडतं. त्या फांद्यांवर कोणकोणते पक्षी येऊन काय काय गाऊन जातात ते कानांत साठवायला आवडतं. संधी मिळेल तिथे माझ्या भाषेत संभाषण करावं, तिच्या निरनिराळ्या बोली आणि लहजे समजून घेऊन त्यांची कोडकौतुकं करावीत, नवेजुने शब्द जिभेवर खेळवावेत - रुळवावेत, त्यांच्या चवीचा, पोताचा, रसाचा आस्वाद घ्यावा, शक्य तर एखादं गाणं आपणही गुणगुणावं यासारखा दुसरा आनंद नाही!
म्हणूनच भाषांच्या, संस्कृतींच्या संदर्भात अशी काही माहिती वाचनात आली, की 'आपली भाषा यात कुठे बसेल बरं' असा विचार आपसुखच मनात येतो. या मराठी भाषा गौरवदिनाच्या निमित्ताने तुम्हालाही तिच्या स्वभावाच्या या पैलूची ओळख करून द्यावी म्हणून हा छोटासा प्रयत्न.
संदर्भादाखल दुवे :
१. High Context Communications
२. High Context Communication examples
स्वाती_आंबोळे
भरत +१२३ सुंदर लेख !!
भरत +१२३
सुंदर लेख !!
सोदाहरण सांगितल्यामुळे अतिशय
सोदाहरण सांगितल्यामुळे अतिशय रोचक आणि समजायला सोपा झाला आहे. लेख फार आवडला. कधी असा विचार केला नव्हता. >>> अगदी
लेख अणि प्रतिसाद सगळेच मस्त.
खूप खूप आवडला. नविन दृष्टिकोन
लेख खूप खूप आवडला. नविन दृष्टिकोन मिळाला.
Context ला 'जमीन' म्हणता येईल का?
लेख आवडला!
लेख आवडला!
मराठीत सुगम प्रतिशब्द सहज मिळत नाहीत याचे एक कारण
High context भाषा असू शकते का असा प्रश्न मनात आला.
उदाहरणार्थ, CD compact disc या शब्दांवरून खरंतर काहीच अर्थबोध होत नाही ज्याला context माहिती नसेल त्याला. हा high context शब्द आहे पण मराठीत आणताना सुगम करण्याच्या नादात आपण पण तो low context करायचा प्रयत्न करतो आणि मराठी high context भाषा असल्याने ते जमत नाही असं काहीसं.
अतिशय सुंदर लेख. मागे यावर
अतिशय सुंदर लेख. मागे यावर जुजबी चर्चा झालेली आठवली, पण तू सविस्तर माहिती छान दिली आहेस. शिवाय भाषेचं समावेशक - inclusive - होत जाणं ह्याचा high context सोडण्याशी संबंध आहे हा मुद्दा डोळे उघडणारा आहे.
High context language - हा
High context language - हा शब्दप्रयोगच मुळात थोडासा high context असावा, त्यामुळे थेट भाषांतर करता येत नाही.
प्रौढत्वी निज शैशवास जपणे
प्रौढत्वी निज शैशवास जपणे सोपं नाही म्हणतात ते काय उगाच!
Pages