
मनोज मोहिते
त्या दिवशी माझ्या डोळ्यांत बाबापण दाटून आले होते. उरात आनंदाचा धबधबा कोसळत होता. असे दाटून येणे आणि हे असे कोसळणे म्हणजे अतीव भावनावेग, हे जाणवत होते. तरीही स्वत:ला आत मोकळे सोडून दिले होते. सारे बंध सैल होते. एरवी सहजी इतका सैलसर होत नाही. पण तो दिवस वेगळा होता. मी अपार आनंदात होतो. अथा माझ्या डोळ्यांपुढे होती. कोवळे ऊन दाखविताना अंगणात होतो तेव्हा तिच्यासवे मीही त्या उन्हात स्वत:ला भिजवून घेत होतो. शहारलो होतो. आतला मोकळा प्रवाह अंगभर जाणवत होता. हृदयाला भिडत होता. सारे जाणवत होते. हृदय आणि मनाचे पटकन्जुळून येत नाही. त्या दिवशी मनाने स्वत:ला हृदयाकडे सरेंडर करून दिले होते. तो दिवस खास होता.
तो दिवस... ज्या दिवशी बाबांचे निधन झाले होते. मी तेव्हा उणापुरा साडेसहा महिन्यांचा होतो. तोच दिवस... माझ्या कडेवरची अथा या दिवशी त्याच वयाची होती. मी हे सारे सारे रीलेट करीत होतो. माझे बाबा गेले तेव्हा मी वयाच्या, भावनांच्या, जाणिवेच्या नेमक्या कोणत्या अवस्थेत होतो, हे मला या दिवशी कळत होते. मी ते जाणीवपूर्वक कळवून घेत होतो. माझ्या वाट्याला आलेला बाबांचा त्या दिवशीचा अखेरचा तो स्पर्श कदाचित अनुभवत होतो. खाणाखुणा शोधत होतो. अथाच्या अवतीभवती होतो. त्या दिवशीच्या माझ्या इवल्या आयुष्यात काय काय घडत होते; घडले होते हे काहीच ठाऊक नाही. आठवणींचा विषयच नाही. या वयातल्या आठवणी आपल्याला आई किंवा बाबांकडून हक्काने मिळतात. घरी कुणी मोठे असेल तर त्यांच्याकडून थोडे थोडे कळत राहते. माझ्याबाबत असे काहीच घडले नाही. आईच्या तोंडून बाबा कधी कळले नाही. तिचा वेगळाच संघर्ष. अवघे तीन वर्षांचे वैवाहिक जीवन होत नाही तोच काळाचा मार तिने सोसला. स्वत:ला सावरून मला; केवळ मला सांभाळत राहिली. जपत राहिली. वीस वर्षांआधीपर्यंत. मग तीही निघून गेली. ना बाबा, ना आई! आजी तेवढी बाबांविषयी तुटक तुटक सांगायची. तीही गेली. मी कुणाला विचारू? बाबा कसे, हे कसे सांगू!
मला माझे बाबा सांगता येत नाही. अथाला तिचा बाबा सांगता येतो!
बाबाचा सुट्टीचा दिवस अथाच्या मनात फिट्ट बसला आहे. ‘बाबा, आज सुट्टी आहे. चल भांडण करू...’ असे म्हणून ती माझ्या मागे हात धुवून लागते. तत्पूर्वी हात धुताना भरपूर बबल्स उडवून झालेले असतात. सर्वात मोठा बबल मोठ्ठ्याने आवाज देऊन दाखवून झालेला असतो. त्यामुळे तिचा हात स्वच्छछान असतो. मी माझे हात सज्ज करतो. मग आमचे भांडण सुरू होते. सुरू ‘खेळण्यातले भांडण’ म्हणून होते, पण मग ते गंभीर वाटेकडे वळते. मग मारामारी होते. रडारडी होते. तीही माघार घेत नाही. मीही माघार घेत नाही. तिने पाच ढुशूम दिल्या तर मी मोजून सात ढुशूम देतो. पण ते देताना मी चिटिंग करतो. एक जास्तीचा ढुशूम देतो. (लहान मुलांच्या भांडणात असेच होते!) मग तिचे गणित चुकते. ती मोजून सात ढुशूम देते. मग मीही नऊपर्यंत गणिताला गणितच समजतो आणि नंतर दहा-बारा-अठरा-पंचवीस-पस्तीस... असे म्हणत गणिताचा भूगोल करतो. अथाचा हिशेब पार चुकतो. आता ती चिडते. आईकडे जाते. आई म्हणते, ‘मला सांगू नका. तुमचे तुम्ही बघा...’ आई आमचे भांडण सोडवत नाही. अशीच करते! तिने माझी बाजू घ्यायला हवी. किमान अथाची तरी. पण ती घेत नाही. आम्हा दोघांना आईचा राग येतो. आम्ही आमचे खरेवाले भांडण म्युच्युअल अंडरस्टॅण्डिंगने मिटवून घेतो.
‘आई, तुला हे जमत नाही. बाबाच करून टाकेल’ अशी एक वाक्यरचना अधूनमधून आईच्या कानावर पडत असते. आई हे वाक्य विसरत नाही. का कुणास ठाऊक! (येथे एक डोळा मिटलेली आणि एक डोळा उघडा असलेली इमोजी!) अथाला आताही कडेवर यायचे असते. मी ती लंबू झाल्याचे कारण देतो. ते तिला मान्य नसते. मी तिला खांद्यावर बसवून घरभर फिरविले पाहिजे, हा तिचा हट्ट असतो. मी नाना कारणे देत हे टाळतो, पण एखादवेळी सुटकेचा मार्ग सापडत नाही. बाबा दाढी करीत असला की दाढीचा ब्रश पळवून दुसऱ्या आरशात गालभर फोम लावण्याची भारीच हौस आहे. लॉकडाउनच्या दिवसांत तिची घरी कटिंग करून दिली होती, तेव्हा शांतपणे बसली होती. एरवी शांत अजिबात बसत नाही. दहा मिनिटे न बोलता बसण्याच्या कॉम्पिटिशनमध्ये ती आजवर जिंकलेली नाही. आमच्या न हसण्याच्या कॉम्पिटिशनमध्ये ती दरवेळी हरते. डोळे न मिचकविण्याच्या कॉम्पिटिशनमध्ये मला दरवेळी हरावे लागते. मी घरी आलो आणि अथा जागी असली की ती दारामागे लपून असते. मला अशा प्रत्येकवेळी शोधण्याची अॅक्टिंग करावी लागते. माझे अभिनयाचे स्किल यामुळे डेव्हलप होत असल्याचा मला भलताच भास होतो. आत्मविश्वासच वाढतो. बाबाला बिलगणे हा तिचा हक्काचा छंदआनंद आहे. कुठूनही येते आणि एक पाय पकडून मटकन्बसून जाते. अपेक्षा ही की, मी तसेच तिला घरभर घेऊन फिरावे. तीन-चार वर्षांपर्यंत तसे आवडीने करतही होतो. आता माझ्या या आवडीपुढे तिच्या वजनाचे पारडे जड पडते. बापाचा जीव बापुडा. ती हट्टच धरून बसते. मी कशीबशी स्वत:ची सुटका करवून घेतो. यावेळीही जे कसब वापरतो, तेही बघून माझा आत्मविश्वासच वाढतो. अथा अशी पक्की बिलगुली आहे! बाबाला सल्ला देणे हे आपले कर्तव्य आहे, यावर तिचा ठाम विश्वास आहे. एखादवेळी अथाकडून सल्ला आला आणि त्यावर ‘हो सोनाली’ असे मी म्हटले की ‘सोनाली’ म्हणण्यामागचा नेमका रोख तिला कळतो. असे तिला तिचे अर्थ कळण्याचे दिवस सुरू झाले आहेत, हे ती सहा वर्षांची असताना जाणवले होते. तीन-साडेतीन वर्षांची असेपर्यंत ती बव्हंशी आमच्यावर अवलंबून होती. चार वर्षांची होता होता तिने तिचे तिचे लॉजिक लावणे सुरू केले होते. थोड्याशा लॉजिकमध्ये टू टी स्पून इम्प्रोवायझेशन सुरू झाले होते.
अथाला बाबा रोज शाळेत सोडून देतो. मागच्या वर्षीपर्यंत सोडून द्यायचा आणि घेऊन यायचा. आता शाळेच्या वेळा बदलल्या असल्याने बाबा सोडून देतो. आई घेऊन येते. या बदलाची अद्याप सवय व्हायची आहे. होईल. हा पंधरा मिनिटांचा वेळ म्हणजे आमचा हक्काचा वेळ. यात आमच्या इण्टेन्स गप्पा असतात. बरेच जागतिक विषय चर्चेला येतात. महत्त्वाचे विषय. गाड्यांचे ब्रॅण्ड्स मोजण्यापासून ते रस्त्यावरची माणसे कशी वागतात यापासून ते आयुष्याच्या गप्पा. दुनियादारीच्या गोष्टी. या आम्ही दोघेही एन्जॉय करतो. किंबहुना आम्हाला त्या हव्याच असतात. आमची ती गरज असते. अथाचा शाळेपूर्वीचा काळ, मधला करोनाचा काळ आणि आताचा शाळेचा काळ हेही आम्हा बापलेकीच्या आयुष्यातले मोठेच टप्पे आहेत. शाळेचे पहिले वर्ष म्हणजे नर्सरीचे. वर्षभर शाळेत होती. मग करोनाची दोन वर्षे ऑनलाइन शिकण्यात गेली. केजी-टूच्या अखेरीस प्रत्यक्ष शाळा भरू लागली. मग पहिलीत नवी शाळा. अवकाश विस्तारलेला. ती सहज रुळली. तिने तिचे तिचे फ्रेण्ड्स जोडले. स्वत:चा सर्कल तयार केला. यात ती पार गुंतली. तिच्या भावनिक गुंत्याची आम्हाला काळजी असते. बाबा म्हणून मला जरा जास्तच! तिला हे गुंतणे चटकन्सोडवता सोडवत नाही. मोठेपणी हिचे कसे होईल, हा बाबाला आणि आईला एकाचवेळी प्रश्न पडतो. तूर्त विषय जरा जास्तच गंभीर झाला की आई ‘बाबा’ला पुढे करते. मग मी तिच्याशी बोलतो. विषय सोपा करण्याचा प्रयत्न करतो. भविष्यातही असेच होणार आहे, असे दिसते.
पाऊस आला की अथाला अंगणात सुसाट पळायचे असते. पाणी दिसले की त्यावरूनच जायचे असते. माती दिसली की तिच्याशी खेळत बसायचे असते. माती आणि पाणी तिचा अत्यंत आवडीचा विषय. डॉगी हा हट्टाचा विषय. अथाला तिचा दोस्त डॉगी हवा आहे. तिला घराजवळचे बव्हंशी डॉगी ठाऊक आहेत. ओळखीचे झाले आहेत. आजीच्या घरासमोर मैदान आहे. तिथे काही वर्षांपूर्वी पिल्ले होती. आजीकडे गेली की ती तीन पिल्ले घरी आणत असे. आई आणि तिने या पिल्लांची नावेही ठेवली होती. गुबलू, डोडो आणि घन:श्याम. घन:श्याम हे नाव कसे ठेवले गेले हे बाबाला अजूनही कळलेले नाही. मैत्रीण राधिकाकडे ‘लालू’ नावाचा कुत्रा आहे. त्याला कितीकच उचक्या लागत असतील. घरी एकदा चुकून कुणाचा तरी पाळीव पोपट आला होता, तेव्हा त्याचा किती लाड करू नि किती नाही, असे अथाला झाले होते. दोनेक वर्षांची होती तेव्हा. ‘लहाणपणी’ तो कसा तिच्या बोटाला चावला होता, हे ती अजूनही सांगते. तिच्या लहाणपणी असे बरेच काही घडलेले आहे. ती नर्सरीत होती तेव्हा तिच्या बेंचवर लहान मुलगी बसली होती.
अथा आता आठ वर्षांची आहे. तिच्यापाशी माझ्या बऱ्याच आठवणी जमा झालेल्या आहेत. तिच्याकडे तिची आठवणींची पिगी बँक आहे. ही पिगी बँक भरती राहावी यासाठी ती दरवेळी माझ्याकडून काही ना काही घेत असते. मीही आनंदाने शक्य तितके देत असतो. आमची पिगी बँक मोठ्ठी आहे. ही इ त की मोऽऽठ्ठी! तिच्यामध्ये काहीही कितीही मावू शकते. आमची दंगामस्ती मावू शकते. आमची हमरीतुमरी मावू शकते. आमची खरीखुरी भांडणे मावू शकतात. आमच्या गप्पा मावू शकतात. इवलीशी होती तेव्हापासूनच्या अनेक आठवणी या पिगी बँकेने निगुतीने सांभाळल्या आहेत. गंमत ही की, तळाशी असलेल्या आठवणींनी आपली कोझी कोझी जागा तयार करवून घेतली आहे. आताचे रोजचे अनुभव छोटुशा उभ्या खाचेतून आत सहज शिरतात. दुनियादारीच्या गोष्टी त्यात आता जाऊ लागल्या आहेत. समजावून सांगण्याच्या गोष्टी त्यात जपून ठेवत आहोत. रागाचे फुगे त्यात भरपूर आहेत. याचा एक वेगळा कप्पा. तिला तिचा तिचा वेळ घालवायचा असला, की खरीखुरी पिगी बँक काढते. तिच्याशी बराच वेळ खेळत बसते. मी त्या पिगी बँकेकडे पाहतो आणि आत हळूच हसून घेतो. मजा वाटते.
आमच्या त्या पिगी बँकेत एखादी गोष्ट दिसली नाही, की आम्ही अस्वस्थ होतो. अशावेळी मग सोनाली मदतीला धावून येते. आठवणींच्या कप्प्यातली ती गोष्टी हमखास शोधून देते. आम्ही खुश. आम्ही खुश तर ती खुश! आईच्या आनंदाची निमित्ते आणखीच वेगळी आहेत. ती बाबाच्या दृष्टिकोनातून पटकन्कळत नाहीत. त्यासाठी त्या वेळपुरती नजर बदलवावी लागते. आईची नजर हवी असते. मग वेगळेच अर्थ उकलत जातात. अनेक गोष्टी स्पष्ट होऊ लागतात. बाबा हा असा प्रयोग करून पाहतो. काही कळले; हाती लागले की चमकत्या डोळ्यांनी बाबा क्षणात आईकडे बघतो. आईच्या डोळ्यांत तोच भाव. आम्ही हसतो. आईच्या डोळ्यांतला आनंद बाबाला कळतो. बाबाच्या डोळ्यांतला आनंद आईला. आनंद तिप्पट होतो. अथाचाही यात वाटा असतो. आम्हा प्रत्येकाच्या वाट्याला त्या त्या क्षणी येणारा आनंद एकदम मोठ्ठा होतो. अशावेळी आनंदाच्या भरात आपसूक एकमेकांना मिठी मारली जाते. ‘फॅमिली हग’. अथाला हे क्षण; या क्षणाचे अर्थ आता कळतात. मुली लवकर मोठ्या होतात. आई आणि बाबाला हा वेग पकडता आला पाहिजे.
तर हे असे आहे. पालकत्व म्हणजे दर टप्पा शिकण्याची प्रक्रिया हे लक्षात येत आहे. या आनंदाच्या नोंदी आहेत आणि बापपण म्हणजे काळजावरच्या कोरीव खाणाखुणा!
(सदर लेख २०२४ सालच्या ‘हेमांगी’ या दिवाळी अंकात प्रकाशित झाला आहे.)
छान लिहिलेय. बिलगुली म्हणजे?
छान लिहिलेय.
बिलगुली म्हणजे?