आज नेहमी प्रमाणे बाबांच्या फोटोला नमस्कार करून अभि खुर्चीत येऊन बसला. अभि च्या डोळ्या समोरून भर भर त्याचे बालपणीचे दिवस येऊ लागले,
त्यांचे लहान गाव, तेथील त्यांचं वाडीलोपार्जित वाडा. गावाबाहेरील मारुती मंदिर, तिथे दरवर्षी नित्यानेमाने होणारा राम जन्मा चा सोहळा आणि हनुमान जयंतीला असलेला भंडारा, सारं गाव तिथे प्रसाद घ्यायला गोळा होत असे. अभि आणि त्याचे मित्र कार्यक्रमासाठी भरपूर वर्गणी गोळा करीत,
त्यामुळे दरवर्षी कार्यक्रम खूप उत्साहाने पार पडत असे. रात्री कार्यक्रम संपवून घरी यायला उशीर होत असे. एकदा असेच रात्री खूप उशीर झाला म्हणून आम्ही मित्र देवळात च झोपलो, गप्पा करीत करीत कधी झोप लागली कळलेच नाही, अचानक बाबांचा आवाज अभिsss आणि मला दचकून जग आली, बाबांनी खूप रागावले, म्हणून मीही, मग रागारागाने घरी येऊन झोपी गेलो पुढचे दोन दिवस माझा बाबांशी अबोल होता, शेवटी आई ने मध्यस्ती केली तेव्हा कुठे आमच्यात सलोखा झाला. अभि मनातल्या मनात बाबांच्या आठवणीने व्याकूळ झाला.
कितीही तापट असले आणि वरवर त्यांनी कधी आमच्या वरील प्रेम दर्शविल नाही तरीही, आज मात्र त्यांची शिस्त, धाक त्यांची काळजी सार काही आठवतंय. त्यांच्या शिस्ती मुळेच आज आम्ही दोघे आमच्या क्षेत्रात उंच भरारी घेऊ शकलो.
मी आणि चारू ने गावातील शाळेतून च आमचे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले, चारू लहानपणापासून च खूप हट्टी पण अभ्यासात एकदम हुशार. पुढे काय शिकणार हे तिला सांगता येत नसे पण कायम आकाशातील विमानांची, ग्रह ताऱ्यांची ओढ. बाबा तिला सप्तर्षी, व्याध शुक्र, गुरु, मंगळ ग्रह दाखवून त्यांची युती कशी होते ही समजावून सांगत. तेव्हा पासूनच तिच्या मनात त्यांच्या बद्दल कुतूहल निर्माण झाले होते.
फडके मास्तर म्हणून गावामध्ये बाबांना सगळे ओळखत. शिस्तप्रिय आणि विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून गावात त्यांचा नाव लौकिक होता. रेल्वे मधील नोकरीसाठी निवड होऊन देखील बाबा, अण्णा आणि माई कडे कोण बघणार म्हणून रेल्वे ची नोकरी सोडून, शाळा मास्तर म्हणून शाळेत ऋजु झाले. अण्णांची गावाकडे शेती होती. तिच्या कडे देखील लक्ष्य ठेवण गरजेच होत.
अण्णा नी बाबा, मनू काका आणि सुमा आत्याला शिकायला म्हणून जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवल होत, मनूकाका इंजीनियर होऊन सरकारी नोकरीत लागले, सुमा आत्या लग्न होऊन दिल्ली ला गेली. बाबांनी गावालाच आपली कर्मभूमि मानले.
मला आठवत ते म्हणजे आमच्या सोबत वाड्यात अण्णां ची बहीण म्हणजे आत्या आजी देखील रहात होती. कालांतराने ती आजारी होऊन देवाघरी गेली. तेव्हा आई ला आजी म्हणाली होती. सुटली बिचारी, त्यावेळी खरे तर माझे कळण्याचे वय नव्हते, पण मला असे वाटले की माई आई बद्दल च असे बोलते आहे. कारण आत्या आजी आईला सारखी घालून पडून बोलत असे. त्यामुळे माझ्या मनात तिच्याबद्दल अढी निर्माण झाली होती. कळायला लागले तसे मी आईला कितीदा एकांतात डोळे पुसताना बघितले आहे.
शालेय शिक्षण पूर्ण करून मी महाविद्यालयात प्रवेश घेतला, पण माझे शिक्षण पूर्ण होण्या आधीच बाबा अगदी साध्या आजाराने देवाघरी गेले, पाठोपाठ आजी ही गेली.
नंतर आईनेच खंबीर पणे शेती आणि घर सांभाळत अतिशय कष्टाने आम्हा मुलांना मोठे केले. शिवाय अण्णा चे लहान मोठे आजार पण लहान गावातील लोक मास्तरांची बायको म्हणून मान देत असत. पण घर, शेती आणि अण्णा यांचा सांभाळ तिने खूप सोशीक पणे केला. आज ही सार काही आठवतंय आणि आपण गाव सोडून किती पुढे आलोय याची जाणीव झाली.
एवढ्यात फोन ची बेल वाजली, पलीकडून आई चा आवाज,
“अरे पोचले रे बाबा सुखरूप,”
“ प्रवास व्यवस्थित झाला ना ग ? कुठे काही प्रॉब्लेम तर नाही न झाला आई? “ अभि ला आई चा आवाज ऐकून अत्यानंद झाला होता.
दक्षिण मुंबईतील टोलेजंग इमारतीच्या पंचावनाव्या मजल्यावरील स्वतः च्या ऑफिस मध्ये बसून अभि बोलत होता, आणि आज त्याला बाबांची खूप आठवण येत होती, आईचा आवाज ऐकून तर आणखीनच डोळे भरून आले.
कारणही तसंच घडल होत, बाबांच्या पश्चात, चारू आणि अभिला आई ने खूप कष्ट करून आपल्या पायांवर भक्कम पणे उभे केले होते. त्यात ही चारू ने लहान पणा पासून अवकशाला गवसणी घालण्या चीच स्वप्ने बघितली होती. आणि आज तिचे ही स्वप्न पूर्ण होऊन ती अमेरिकेतली नासा या प्रसिद्ध संशोधन संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाली होती. आई ला तिनेच आपल्या कडे बोलावून घेतले होते.
अभि चे लक्ष्य बाबांच्या फोटोकडे गेले आणि त्याला त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलेले दिसले.
.
#सुरपाखरू
आशीर्वाद
Submitted by शिवानी बलकुंदी on 24 February, 2025 - 00:45
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा