24VIII24
नासिकहून संध्या. 5;43 वा. बाहुबली भामरे यांच्या TUV300 ने निघालो तेव्हा दणकून पाऊस सुरू होता. 3 दिवस जोरदार पाऊस आणि जोरदार वारे यांचा अंदाज टीव्ही वाहिन्या देत होत्या.. रात्री 8:02 वा आळेफाट्याला उजवीकडे वळालो. इथून हरिश्चंद्रगड पायथ्याचे खिरेश्वर गाव 43 किमी आहे. खुबी फाट्याच्या अलीकडे एका तरसाने दर्शन दिले. रात्री 8:43 ला खुबी फाट्यावरून उजवीकडे वळालो. हा 5 किमीचा रस्ता पिंपळगावजोगा धरणाच्या कडेने जातो. या रस्त्याला लागल्याबरोबर दाट धुक्याने आमचे स्वागत केले. त्या स्वागताचा स्वीकार करताना गाडीचा वेग थेट 12पूर्णांक4दशांश किमी/तास झाला. मध्ये गाडीची प्रवेशफी म्हणून 50/- दिले. अधिकृत पावती मिळाली. बाळू मेमाणे यांच्याकडे मुक्काम जेवण सोय केलेली होती. पुणे मुंबई मंडळ आधीच येऊन जेवून ताणून वगैरे पडलेलं... सगळ्यांची ओळख परेड झाली. जेवायला आमटी भात. 11 वा झोपलो. सकाळी साडेसहाला (बेलपाडा) वालीवरेचा प्रमोद बहुरणे सोबत येणार आहे. उद्या रविवार असल्याने इथल्याच आडराईच्या जंगलात फिरण्यासाठी काही गट रात्री उशिरा येणार आहेत..आणि आम्ही इथे आलोय हरिश्चंद्रगड या पुराणपर्वताला प्रदक्षिणा करण्याच्या उद्देशाने..!
कुठल्या डोंगराला पर्वत संबोधावे? असा प्रश्न नेहमी पडतो. केव्हातरी वाचनात आलंय की ज्या डोंगरावर नदीचा उगम आहे व कुण्या संत किंवा ऋषीची ही तपोभूमी आहे तर तो डोंगर पर्वत म्हणून ओळखला जावा. हरिश्चंद्रगड ही चांगदेवांची तपोभूमी आहे. मंगळगंगेचा उगम गडावर होतो. कुशीत काळू नदीचा उगम आहे. घाटमाथाधारेवरच बस्तान मांडून असलेल्या या ठिकाणाचा नंतर किल्ला म्हणूनही उपयोग करण्यात आला कारण कोकण व घाटादरम्यान चालणाऱ्या व्यापाराचे प्रमुख मार्ग या भागात आहेत, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी याशिवाय संरक्षणाच्या दृष्टीनेदेखील या भागाचे भौगोलिक स्थान महत्त्वाचे आहे. गडाच्या दक्षिणेला माळशेज घाटवाट तर उत्तरेस सादडे व करपदरा घाट आहेत. पैकी माळशेज घाट गाडीरस्ता झालेला असला तरी घाटाची जुनी पायवाट अजूनही वापरात आहे व त्याच्या खुणा वाटेवर दिसतात.
25VIII24
पहाटे साडेमाडेतीन वाजताच प्रसादमुकादमाची खुडखुड सुरू झाली. बाहेर रात्रभर पाऊस रेंपाटून पडत होता. इतर गट आलेले होते त्यामुळे गर्दी झाली. मक्याच्या दाण्यांचं कॉर्नसूप पिऊन पिशव्या आवरून प्रमोदसोबत रस्ता सोडून पायवाटेने निघालो.. सकाळ 6:43मि... दमट कुंद धुकट चिंब वगैरे वगैरे वातावरण पडलेलं.. नागेश्वराच्या जुन्या मंदिराकडे जायची वाटही एका ओढ्याने अडवलेली.. अलिकडूनच नमस्कार करून निघालो. वाटेवरूनही पाणी वहातेय.. पहिल्या काही मिनिटांतच सगळ्यांचे सगळे बूट चिंब ओले झालेले.. चबाकचबाकफताक!.. मध्येच धुकं निवळल्यावर आजूबाजूचे डोंगर आपापल्या धबधब्याचे सोगे खाली सोडताना दिसतायत व पुन्हा धुक्याआड लपतायत! सगळे डोंगर सारखेच दिसतायत.. गमतचुकत खुबी फाटा मार्गे चेडोबा देवळाकडे आलो. फळांचा फलाहार करून तिथूनच ढांगभर असलेल्या MTDC कमानीच्या बाजूसच असलेल्या जुन्या माळशेज घाटाच्या उतरणीला लागलो. (वेळ सकाळी ८:५५).
जुन्या माळशेज घाटासंबंधी अनेक उल्लेख इतिहासात सापडतात. वसई लढाईपूर्वी माहीम केळवे शिरगाव यासारखी आजूबाजूची ठाणी मराठयानी घेतली त्यावेळी साधारण इ. १७३७ मध्ये रामचंद्र हरी पटवर्धन मालशेज घाट उतरून गेल्याचा उल्लेख आहे. ही वाट उतरताना आढळणाऱ्या खोदीव पायऱ्या, टाकी याची साक्ष देतात.
घाटाच्या सुरुवातीलाच चांगल्या रुंद पायऱ्या दिसतात. पावसात मात्र शेवाळलेल्या असल्याने जपूनच उतरत होतो. डावीकडे एका ओढ्याचा आवाज आमची संगत करीत होता. अर्ध्या तासात कातळात कोरलेल्या गणेशापाशी पोहोचलो. डावी सोंड, डावी उभी मांडी घालून बसलेल्या या शेंदूरलिंपित गणेशमूर्तीवर चंद्रसूर्य कोरलेले आहेत. वर छान महिरप कोरलेली आहे. डावीकडे टाकी आहेत.. वेळ ९.३३. आता खाली उतरताना एक लय मिळाली आहे. मध्येच ओढा आमच्या वाटेला धक्का देत आम्हाला गुडघाभर पाण्यातून चालायला भाग पाडतोय. चबाकचबाकफताक!..
पाऊस व ओलाचिंब आसमंत असतानाही एकदम हवेत दमटपणा जाणवू लागताच आपण आता घाटपायथ्याकडे म्हणजेच कोकणात आलोय हे लक्षात येतंय! इथे एक वाघदेवाचं शिल्प आहे, पण त्यासाठी थोडं पुढे जायला हवं. तिकडे न जाता आमची वाट आता उजवीकडे सरकायला लागलेय. इथेच डोंगराचा एक छोटा भाग ढासळून खाली आलाय; त्यासोबत काही अजस्त्र शिळाही खाली आदळल्या आहेत. इथे आंब्याची झाडे जास्त असल्याने स्थानिकांमध्ये हा भाग आंब्याचा माळ म्हणून ओळखला जातो.. वेळ १०:३४.
आता या धुवांधार पावसाळी दिवसात आमच्यापुढे सगळ्यात मोठे आव्हान होते ते म्हणजे रोरावत वहाणाऱ्या काळू नदीचे पात्र ओलांडण्याचे. वरच्या बाजूला धोधावणाऱ्या काळू आणि रेठी अशा दोन्ही धबधब्यांचा प्रवाह एकत्र झालेल्या काळू नदीचं पात्र पावसाळ्यात रौद्र होते. काळू धबधब्याच्या पायथ्याकडे काळूचा वोघ (की ओघ) पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. उन्हाळ्यात येथील रांजणकुंडेही पहाण्यासारखी आहेत. गावकरी पावसाळ्यात दर शनिवार रविवारी थिटबी गावातून येणाऱ्यांसाठी नदीपात्र ओलांडायला झिपलाईनची व्यवस्था करतात (दर जाऊनयेऊन १००रु./प्रतीव्यक्ती सध्या) त्यामुळे इथे पावसाळ्यात भेट देणाऱ्यांची चांगली सोय झाली आहे. आम्हाला फक्त जायचेच होते तरीही तेवढेच पैसे पडतील म्हटल्यावर थोडी घासाघिस केली. झिपलाईनवर दोर, अडकवण्याचा कंबरपट्टा (Harness) व कडी (Carabiner/Crab) चांगल्या प्रतीचे दिसत होते. १० मिनिटात सगळे नदीपार झालो. (वेळ ११:२१)
इथून लांबवर एक गाडीरस्ता दिसत होता तो सावर्णे गावचा पण आमच्या मुकादमाला ते नामंजूर असल्याने त्याने प्रमोदला बाजारपेठेच्या जुन्या वाटेनेच नेण्याबद्दल सांगितले. अर्ध्या तासाने वाघ्याच्या वाडीअलीकडे पुन्हा एक मोठं पात्र असलेला ओढा लागला. पात्र उथळ असले तरी प्रवाह जोरदार होता. सह्याद्री संजीवन संस्था सहभागीना घेऊन आली होती व त्यांनी सुरक्षिततेसाठी ओढापात्रात दोर लावलेला होता. दोरावर जोर देणाऱ्यांची गर्दी वाढल्याने त्यांनी आणखी एक दोर लावून दोन्ही दोर ताणून पुन्हा बांधले. यात अर्धा तास वेळ गेल्यावर सगळ्यांनी पात्र ओलांडले. चबाकचबाकफताक!.. वाघ्याच्या वाडीत ३ बसेस उभ्या होत्या. आम्हीही थोडा श्वास घेतला. वेळ १२.५४
आता वाघ्याच्या वाडीतून वालीवरे गावात जायला अंदाजे २ तास लागणार होते. सहयकडेने जाणाऱ्या या वाटेला बाजारपेठेची वाट असे म्हणतात. आता थेट गाडीरस्ता झाल्याने या वापर कमी झालेला आहे. वाटेत रोहिदास शिखराकडून येणारी डोंगरधार ओलांडावी लागते. हिच्या माथ्यावर बाजारपेठेची खिंड आहे. साधारण १०० मीटरची ही चढाई आहे. सकाळपासून आम्हाला लागलेली ही पहिली चढाई...!
वाटेत जवळपास ९ पूर्णांक ७ दशांश २ शतांश लहानमोठे ओढे आम्ही ओलांडले. आता पाण्याच्या प्रवाहाचे काहीच वाटेनासे झाले होते. चबाकचबाकफताक!.. तहान लागलेली नसली तरी डोंगरातून खळखळणाऱ्या पांढऱ्याशुभ्र धारेचे गोड पाणी वरचेवर पीत होतो. सर्वकाळ दाट जंगलझाडी होती. मुकदमाने सगळ्यांकडून आधी चांगला सराव करून घेतलेला असल्याने सगळे एका दमात खिंडीत पोहोचले. वेळ २:२४. मुकादमाने आधीच सांगितल्याप्रमाणे वालीवरेत गेल्यानंतर पुढे सादडे घाट चढून पाचनईत मुक्कामाला आजच जायचे की थांबायचे हे ठरणार होते कारण वालीवरेच्या पुढे सादडे घाटातून खाली येणारा सदाबाचा ओढा ओलांडावा लागतो. घाटात जोरदार पाऊस असल्यास हा ओढा ओलांडणे कठीण होतेच शिवाय सादडे घाटातही सूं सूं वाऱ्यापावसामुळे वरुन दगड कोसळण्याची भीती होती. झाडीतून दणादण उतरून सपाटीला आलो तर जोरदार सरीने स्वागत केले. शेतांच्या बांधांवरून, वस्ती ओलांडून, कोकणकड्याकडून येणाऱ्या ओढयावर बांधलेला पूल ओलांडून वालीवरेत मनोजकडे आलो तेव्हा पावणेतीन वाजले होते. मनोजने पुढे जाण्यास थेट नकार दिला. मुकादम शेवटी ५ मिनिटे थांबा मग निर्णय सांगतो असे सांगून गायब झाला. गावच्या देवाला कौल लावून परत आला व गावातच थांबायचा निर्णय जाहीर केला. वेळ ३:१० दुपार.
मनोजने अद्ययावत केलेलं त्याचं घर आम्हाला रहायला दिलं. त्याच्या घराकडे जाताना उजवीकडे ढगांशिवाय काहीही दिसत नाहीये.. नाहीतर इथून ७० एमएम पटाप्रमाणे दिसणारा कोकणकडा भुरळ घालतो. पोहोचल्यावर चिंब झालेले कपडे, बुट वगैरे बाहेरच हळकायला ठेवले. सगळीकडून येणारा पाण्याचा आवाज.. शक्य तितके सुके होण्याचा प्रयत्न करताना भूक चाळवू लागल्याने मुकादमाने कुकर, शिधा, शेगड्या बाहेर काढल्या. संधीकाल होतानाच पावसाची जोरदार फटकेबाजी सुरू झाली. लालबुंदमिश्राजीनी स्वत: दुकानात जाऊन रवा साखर आणून केळी घालून केलेला शिरा तृप्त करून गेला. शेफशर्वरीने लगेच स्वयंपाकाचा ताबा घेतला व खिचडी, शिरा, ऐतिहासिक पिठले. मुकादमाने केलेली उसळ, भात असे क्रमाक्रमाने तयार होत ताटातून पोटात गेल्यावर ७ वाजताच मंडळी झोपण्यासाठी आडवी झाली. पहाटे ४:३० वाजता निघायचा बिगुल वाजणार आहे अशी तंबी मुकादमाने आधीच देऊन ठेवली होती. घोरपराक्रमीअंबरीष घोरवला वेगळी खोली देण्यात आली होती तरी रात्री १० वाजता त्याने आणि नंतर शेफशर्वरीने सगळ्या आचाऱ्याना उठवून पुन्हा कॉफी वगैरे बनवून त्यांना जागे ठेवले. बाहेर पावसाचं धुमशान सुरूच होतं..
26VIII24
रात्री २ वाजता मुकादमाने पुन्हा कुकरच्या शिट्या वाजवत फोडणीचा भात, सूप बनवले. जीपीएक्सदिपकने सोयाचंक बनवलं. एकूणच पोटाला स्टेपनी असल्यागत सगळ्यांनी हादडलं.
बरोब्बर साडेचारला वाटाड्या मनोज आला व निघालो. सगळीकडून येणारा पाण्याचा आवाज.. अंधारात विजेऱ्या लावून चालताना पहिल्या सव्वादोन मिनिटातच हळकलेले बुट पुन्हा चिंब झाले. पायवाटांवरून पाऊलभर पाणी वहातंय.. चबाकचबाकफताक!.. आजूबाजूला काहीही दिसत नाहीये. फक्त सगळीकडून येणारा पाण्याचा आवाज .. २० मिनिटातच सदाबाचा ओढा आला. पाऊस आत्ता थांबल्याने ओढ्यातील पाण्याचा जोर कमी झालेला वाटत होता. पण ओढा काल नक्कीच रौद्रतेने वहात असणार. कंबरभर पाण्यातून ओढा ओलांडल्यावर आता चढण हळूहळू जाणवू लागली आहे. घाटाला सुरुवात झालेली जाणवतेय. वेळ ५:१०.. वाट आता झाडीत शिरलेय. ओढा उजवीकडे ठेवत वाट एका लयीत वर चढतेय. सगळ्यांचा केलेला सराव आता रंग दाखवतोय. मुकादम लवकर चढण्यासाठी लालबुंदमिश्राजींच्या मागे लागलाय.. मध्येच शेफशर्वरीच्या बुटात काटा गेलाय तो काढायला मुकादम, बाहुबली भामरे थांबल्यामुळे लालबुंदमिश्राजींना थोडा श्वास घेता आलाय. शेर्पाधनवडेकाका वाटेत चिक्क्या, बियांचेबिनबियांचे खजूर, मसालामनुके इत्यादि खुराक देत असल्याने मंडळी दमाने चढत आहेत. घाटात एके ठिकाणी तिठा आहे. इथून डावीकडील वाट करपदरा नावाने व उजवीकडील वाट सादडे नावाने ओळखली जाते. वेळ सकाळी ६.४२.. सगळीकडून येणारा पाण्याचा आवाज.. आता एकदम खडी चढाई १०-१५ मिनिटात मिनीधबधबा प्रवाहात आणून सोडते. इथे चौगुले सरपंच, शेफशर्वरी आणि मुकादम यांचा, सरपंचांच्या सफरचंदी फोनवर इनस्टा क्लिकक्लीकाट व रीलरीलाट सुरु झालाय. लालबुंदमिश्राजीनी भगवी पपई कापून वाटलीय.
थोडं वर आल्यावर सादडे घाटाची नाळ सुरू होण्याचा टप्पा.. वेळ ७.२५ सकाळ..
कानाचे पडदे भेदतील एवढा सूनसाट वारा आणि नाळेतून वहाणारं पाणी यामुळे एरवी सोपं असणारं हे प्रकरण थोडं उशीर करतंय पण न थांबता सादडे घाटाचा माथा आम्ही गाठलाय.. वेळ सकाळी ७.४५..
भटकंतीमधील मुख्य चढाई वेळेत पूर्ण केल्याने आता मंडळींचा उत्साह वाढलाय. पेठेच्या वाडीतून येणारी डांबरी सडक आम्हाला ४० मिनिटात साडेमाडेतीन किलोमीटरमध्ये पाचनईत पोहोचवतेय. बदरी भारमल हॉटेलात कोरा चहा, सफरचंद ब्रेक घेऊन निघालो. लालबुंदमिश्राजीना एका जीपमध्ये बसवून लव्हाळीच्या अलीकडे वाघदेव ठिकाणापाशी थांबून रहायला सांगितले. वेळ सकाळी ८:५५.. मधूनच पावसाची धोधाण सर येतेय पण सगळेच वेगवान चालीने निघालेत.. सादडे घाट चढल्यापासून उजवीकडे हरिश्चंद्रच्या पसरलेल्या पर्वतकुशीतूनच सतत जात आहोत. लव्हाळीकडे जाणाऱ्या डांबरी सडकेवरूनच लव्हाळीच्या अलीकडे वाघदेवाच्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा ९:३० वाजले होते. मिश्राजी जिथे वाट पहात उभे होते तिथूनच आडवाटेने आम्ही हरिश्चंद्रगडाच्या वेताळधारेच्या पायथ्याशी असलेल्या लव्हाळीच्या जंगलात शिरलो.
लव्हाळीचं जंगल अप्रतिम आहे. पावसाळी पायवाटांवरून गर्द कुंद अशा जंगलातून वाट तुडवताना धबधबे आणि पावसाचाच आवाज येत होता. मुकादम आणि मनोज एवढ्या धुक्यातूनही बरोब्बर वाट शोधत होते. पावसाळ्यात वाटा झाडीमुळे दिसत नाहीत, त्यामुळे डोक्यात उपग्रह बसवलेल्या या दोघांचेही कौतूकच! मध्येच एकदोन वेळा अंबरीष घोरवने पण बरोब्बर वाट दाखवली. जीवनात योग्य वाट दाखवणारेच संतमहात्मे असतात. वाटेत चिकूच्या पानांप्रमाणे पाने असलेलं आणि साधारण चिकूच्या झाडाच्या ऊंचीएवढं करपाचं झाड दिसलं. करपदरा वाटेवर ही झाडे बरीच असल्याने या वाटेला त्यावरून नाव पडलं असावं. दोनेक तास छोटे चढउतार करीत एका झापावर पोहोचलो. हे ठिकाण तर अप्रतिमच.. डावीकडे भैरोबादुर्ग, पलीकडे ढगात गेलेला कारकाई डोंगर, समोर लांबवर दिसणारी टोलारखिंड (या नावाचं मूळ शोधायला हवं..) उजवीकडे हरिश्चंद्राच्या हिरव्यागार अंगाखांद्यावरून झेपावणारे जलप्रवाह..! वेळ मध्यान्ह ११:१७.
झापावर सातूपीठ, मोसंब्या, टोमॅटो सूप वगैरे पोटभरणा करून पुढे निघालो. वेळ १२:०४. भातशेतीच्या कडेने जाताना बूट पावणेचार इंच चिखलरबडीत रुततायत! चबाकचबाकफताक..! आता गुहा येणार.. आता गुहा येणार.. जीपीएक्सदीपक आणि मुकादमाची सारखी टकळी सुरू आहे त्यामुळे गुहेची उत्सुकता आहे.. आणि अचानक कातळात नैसर्गिकरीत्या बनलेली गुहा व त्यावरून कोसळणारा आडवाबंब धबधबा समोर आला... मस्त जागा! इथे सगळयानी क्लिकक्लीकाट केला. आता टोलार खिंड आवाक्यात आली आहे. अर्ध्या तासाची परिक्रमेतील शेवटची चढाई आता सूरु होणार आहे. वेळ १२:४७.. जंगलातून सुरुवातीलाच डावीकडे लव्हाळी गावाकडे जाणारी पायवाट दिसते. मस्त मळलेली पायवाट. वनखात्याने क्रमांक दिलेले दगड वाटेत दिसत आहेत. टोलार खिंड येईपर्यंत कुणीही थांबले नाहीत. खिंडीत वाघदेवाचे शिल्प आहे. उजवीकडील वाट हरिश्चंद्रगडावर जाते व समोरील वाट खिरेश्वरला उतरते. वेळ दुपार १:२२.
आता खाली खिरेश्वरला पोहोचल्यावर परिक्रमेची सांगता होणार होती व जेवणाची वेळ असतानाही त्याबद्दल काही ठरले नसल्याने काल मुक्काम असलेल्या बाळू मेमाणेलाच सगळ्यांसाठी जेवण बनवण्याचे फोनवरून सांगण्यात आले. टोलार खिंडीतून उतरताना आमच्यासोबत पायवाटेवरून वाहणारं पाणीही उतरत होतं. उतरताना शेफशर्वरी व मनोजच्या पायात गोळे येण्याचा कार्यक्रम पार पडला. मनोजची खरं तर तब्येतच ठीक नव्हती कारण पायात गोळे येणारा मी बघितलेला हा पहिलाच वाटाड्या. लालबुंदमिश्राजींच्या पायांमधून एक साप अडखळत धडपडत गेला. नवल म्हणजे अत्यंत वाहती वाट असूनही कुणीही पर्यटक गिर्यारोहक आम्हाला भेटले नाहीत. दाणदाण उतरत खिरेश्वरला बाळू मेमाणे(उत्तर) कडे जाऊन विसावलो. (खिरेश्वरात २ बाळू मेमाणे आहेत. एक उत्तर टोकाला व दूसरे दक्षिण टोकाला)
सुकून, कपडे बदलून बसलो. मनोजनेही कोरडा शर्ट चढवला तेव्हा त्याच्या पाठीतून वाफा येताना दिसल्या म्हटलं हे काय तर गरमी हाय, गोळी घेतो म्हणाला. पिठलंभाताच्या जेवणावर आडवा हात मारून निघेपर्यंत साडेचार वाजले. निघताना बाहुबली भामरेंची TUV300 सुरू होईना. गाडीची किल्ली परिक्रमेदरम्यान खिशात राहिल्याने तिला हुडहुडी भरली. चुलीजवळ ठेवून, आतल्या सेलचा जुगाड करून एकदाची गाडी सुरू झाली आणि आमचा थकलाभागला जीव गाडीत पडला. मनोजलाही वाटेत सोडले. पुढे निघालो तर रस्त्यात नुकतेच एक झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाल्याने गाडी मागे वळवली आणि जुन्नरमार्गे जाण्याचा निर्णय घेतला कारण ही अडकलेली वाहतूक लवकर सुरळीत होण्याची चिन्हे नव्हती. मग याच मार्गे पुण्याला निघत असलेल्या सरपंचाना फोन लावून कल्पना दिली व त्याना सोबतच जुन्नरमार्गे जाऊया सांगितले. वाटेत बनकर फाट्याच्या तिठयावर चहा प्यायला थांबलो असताना सरपंचांची गाडी सुरू होईना. धक्का देऊन चालू केली तर स्टेयरिंग लॉक झाले. सर्विस स्टेशनला फोन केला, फ्यूज तपासणी केली, बाहुबलींच्या सर्विस स्टेशनला फोन केला, अंगारेधुपारे केले, पुन्हा धक्का दिला, बोकड कापला, हँडब्रेक लावला-काढला, विमलतोबरा लावलेल्या स्थानिकाने मदत करण्याचा प्रयत्न केला पण छे:!
शेवटी ज्या अगम्यपणे गाडी बंद पडली होती त्याच अगम्यपणे सुरू झाली. बाहुबली व सरपंच दोघांच्याही गाड्यांना बहुतेक खिरेश्वर मुक्काम आवडला असावा.. शेवटी दोन्ही गाड्या निघाल्या. वेळेत रात्री साडेआठच्या सुमारास नासिकच्या हद्दीत आलो खरे पण जन्माष्टमीच्या कृष्णभक्तांच्या इसकॉन गर्दीत अडकलो व घरी पोहोचायला साडेनऊ वाजले. पाऊस खुबी फाट्यापासूनच बंद झालेला पण कानातून पावसाचा, ओढ्यांचा, धबधब्यांचा आवाज आणि डोळ्यांसमोरून डोंगरांचा हिरवा रंग अजूनही नाहीसा होत नाहीये..! (समाप्त)
काही ठळक ठळक..
• शहामहाशयची ओळख करून देताना मुकादम: ‘हा महाआशय. याने निममधून बेसिक कोर्स केलाय, त्यामुळे आता आमचा बेसिक कोर्सवरील विश्वास पूर्ण उडालाय!’
• खुबी फाट्याअलीकडे दिसलेले तरस.
• महाशयने जेवताना आमटीत, त्याला न चालणारी लसूण असल्याने स्वत:चा भात स्वत: करून घेतला.
• घोरअंबरीष पुढील महिन्यात अंधांसोबत काश्मीर ते कन्याकुमारी सायकलिंग करणार आहे त्याबद्दल सूप पिताना त्याची थोडक्यात घेतली गेलेली मुलाखत. (ही मोहीम त्यांच्या चमूने यशस्वीरीत्या पूर्ण केली)
• डॉक्टरमोहन गुडघादुखीमुळे नागेश्वर ते चेडोबा एवढी परिक्रमा करून परतले. त्यांच्याकडील खाण्याचे सामान काढून घेण्यात आले.
• जिपीएक्सदिपकचा महागडा प्राडालिनियारोजा चष्मा झिपलाईनजवळ विसरला. (किंमत २६४२७) जिपीएक्सदिपकची काठी ३ पूर्णांकानंतर आलेला ओढा ओलांडताना पोहत वाहून गेली. (किंमत १७३७)
जिपीएक्सदीपकने सरपंचांची उधार घेतलेली आयात केलेली महागडी छत्री सादडे घाटात हरवली (किंमत ४३६९)
अशाप्रकारे जिपीएक्सदिपकला ही परिक्रमा महागडी ठरली.
• काळू नदी झिपलाईनवर ओलांडताना लालबुंदमिश्राजी ज्या दोरावर होते तो प्रवाहाच्या जवळून असल्याने त्यांनी मस्त प्रवाह कापत नदी ओलांडली.
• वाघ्याच्या वाडीच्या अलीकडील ओढा ओलांडताना आधीच्या मोठ्या ग्रुपमधील एक मुलगी मध्यातच प्रवाहामुळे शीर्षासनात गेली, तिला सरळ करून पैलतीरी नेताना गेलेला वेळ. वाडीत काळू धबधब्यासाठी मुंबईतून ३ बसेस भरून पर्यटक आलेले.
• वालीवरे मुक्कामातील स्वयंपाकात शर्वरी व जिपीएक्सदीपकने बनवलेले ऐतिहासिक पिठले. पिस्तूल स्कवाट, व्हरटीकल डिप्स यांचे प्रात्यक्षिक. झोपण्याआधी झालेले सरपंचांचे सेशन.
• शेर्पाधनवडेकाकांनी आणलेल्या मस्त वेगवेगळ्या चिककया, मसालामनुके वगैरे..
महत्त्वाच्या ठिकाणांची समुद्रसपाटीपासून उंची:
खुबी ७००मी
गणपती घाट/ जुना माळशेज घाट माथा ७२० मी
माळशेज घाट पायथा ३०० मी
वाघ्याची वाडी २९०मी
बाजारपेठ खिंड ३९० मी
वालीवरे २६०मी
सादडे घाट माथा ९३० मी
पाचनई ८८० मी
टोलार खिंड १०४० मी
एकूण अंतर ४४.५६किमी/ २७.६८मैल
भारीच लिहिलंय सॉल्लिड ट्रेक
भारीच लिहिलंय सॉल्लिड ट्रेक
भारीच वर्णन. एकदम डोळ्यासमोर
भारीच वर्णन. एकदम डोळ्यासमोर आले
छान
छान
मस्त लिहिलंय
मस्त लिहिलंय
फोटो अजून हवे होते
मस्त ट्रेक
मस्त ट्रेक
मस्त! फोटो सुंदर..पण अजून हवे
मस्त! फोटो सुंदर..पण अजून हवे!