आधीचे भाग:
- नेपाळ : एक जीवंत सांस्कृतिक संग्रहालय - भाग १ (जनकपुर)
- नेपाळ : एक जीवंत सांस्कृतिक संग्रहालय - भाग २ (जानकी मंदिर)
२००८ साली युनेस्कोने 'जागतिक वारसा स्थळ' घोषित केलेल्या ह्या भव्य-दिव्य आणि अतिशय सुंदर अशा महालसदृष्य जानकी मंदिरातुन बाहेर पडल्यावर आम्ही मंदिराच्या आवारात पुढ्यातच, डावीकडे असलेल्या हनुमान मंदिराकडे आमचा मोर्चा वळवला. ह्या हनुमान मंदिराचा रंग भगवा नसता तर पाहणाऱ्याला तो एखादा दर्गा किंवा लहानशी मशिदच वाटेल ह्यात शंका नाही.
जनकपूरचे 'जानकी मंदिर' पाहताना "इतिहासात कधीही कुठल्याही परकीय राजवटीच्या / सत्तेच्या अंमलाखाली न गेलेल्या आणि २००६ पर्यंत अधिकृतरीत्या जगातील एकमेव 'हिंदु राष्ट्र' असा लौकिक मिरवणाऱ्या नेपाळमधली सर्व प्राचीन-अर्वाचीन मंदिरे ही मुख्यत्वे 'नेवारी' व 'पॅगोडा' आणि 'मैथिली' व 'हिंदू' वास्तूशैलीत बांधलेली असताना तिथले हे एकमेव मंदिर 'मुघल, हिंदू आणि मैथिली' अशा मिश्र वास्तुशैलीत का बांधले असावे?" आणि "स्वातंत्र्यपूर्व भारतातील ओर्च्छा (टिकमगढ) संस्थानाची राणी 'वृषा भानू' हिने हे जानकी मंदिर नेपाळमध्ये बांधण्याचे काय कारण असावे?" असे दोन प्रश्न पाहणाऱ्याच्या मनात हमखास उभे रहातात!
ह्या दोन पैकी पहिल्या प्रश्नाच्या उत्तरासाठी सोळाव्या शतकात बुंदेलखंडातील 'बुंदेली राजपूत' ह्या लढवय्या जमातीचा तत्कालीन प्रमुख आणि त्यानेच स्थापन केलेल्या 'ओर्च्छा' राज्याचा पहिला राजा असलेलया 'रुद्र प्रताप सिंग' (१५०१ - १५३१) ह्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'ओर्च्छा', 'बुंदेली-राजपूत वास्तुकला', तिथली 'राम भक्ती' आणि 'राम राजा मंदिर' ह्याविषयीचा थोडा इतिहास जाणून घेणे अगत्याचे ठरते. आणि दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर दोन कहाण्या / अख्यायिकांतून मिळते. (आता थोडे अवांतर होणार असले तरी सहृदय माबोकरांनी सांभाळून घ्यावे!)
सोळाव्या शतकात ओर्च्छा मध्ये किल्ला संकुल, विविध महाल/हवेल्या, मंदिरे बांधताना तिथल्या मूळच्या 'बुंदेली राजपूत' वास्तूशैलीच्या बरोबरीने 'एक मोठा घुमट आणि त्याच्या भोवती चार लहान घुमट' आणि 'महिरपी कमानी' अशा 'मुघल' वास्तुकलेतील (इंडो-इस्लामिक आर्किटेक्चर) वैशिष्ट्यांचाही सुरेखरीत्या वापर केलेला पाहायला मिळतो. मुळात मुघल वास्तुकला / स्थापत्यशास्त्र हे 'स्वयंभू' नसून ते 'पर्शियन वास्तुकला', 'हिंदू' (विशेषतः राजस्थानी आणि बुंदेली राजपूत वास्तुकला') आणि 'इस्लामी वास्तुकला' ह्या तिघांच्या सुरेख संगमातून निर्माण झालेले आहे.
भारतात अयोध्येनंतर ओर्च्छा हे एकमेव असे ठिकाण आहे कि जेथे प्रभू श्रीरामांना केवळ देव म्हणूनच नाही तर राजा म्हणूनही पुजले जाते, त्यामुळे इथले सोळाव्या शतकातील राम मंदिर देखील 'राम राजा मंदिर' म्हणून ओळखले जाते.
ज्याप्रमाणे जनकपूर येथील 'जानकी मंदिर' पाहताना त्याची रचना इतर हिंदू मंदिरांसारखी नसल्याचे लक्षात येते, नेमकी तीच गोष्ट ओर्च्छाचे भव्य 'राम राजा मंदिर' पाहणाऱ्यांनाही जाणवते!
राम राजा मंदिर - ओर्च्छा ▼ओर्च्छाच्या राम राजा मंदिराची कहाणी / आख्यायिका...
सोळाव्या शतकातला ओर्च्छाचा राजा 'मधुकर शहा जुदेव बुंदेला' (१५५४ - १५९२) हा भगवान श्रीकृष्णांचा परम भक्त होता तर त्याची पत्नी राणी 'गणेश कुंवरी' ही श्रीरामांची निस्सीम भक्त होती. एकदा राजाने राणीला ब्रज-मथुरेला जाण्याचा आपला विचार असल्याचे सांगत तिलाही बरोबर येण्यास सांगितले पण राणीच्या मनात त्यावेळी अयोध्येला जायचा विचार असल्याने तिने राजासोबत जाण्यास नकार दिला. राजा आपल्या विचारावर ठाम होता आणि राणी आपल्या!
राजाने वारंवार विनंती करूनही राणी आपल्या नकारावर ठाम असल्याचे पाहून क्रोधीत झालेलया राजाने राणीला "अयोध्येला जाऊन भगवान रामाला तुझ्यासोबत घेऊन ये, अन्यथा ओर्च्छाला परत येऊ नकोस" अशी आज्ञा दिली.
राजाज्ञेवरून अयोध्येला पोहोचल्यावर राणीने लक्ष्मण घाटावर भगवान श्रीरामाची तपश्चर्या करायला सुरुवात केली. अनेक दिवस कठोर तपश्चर्या करूनही श्रीरामांचे दर्शन न झाल्याने निराश झालेल्या राणीच्या मनात शरयू नदीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवण्याचा विचार पक्का झाल्यावर तिच्या भक्तीने प्रसन्न झालेले प्रभू श्रीराम बालरूपात (रामलल्ला) राणीच्या मांडीवर प्रकट झाले आणि तीन अटींवर तिच्यासोबत ओर्च्छाला येण्यास तयार झाले.
- आपण पुष्य नक्षत्रावर प्रस्थान करायचे जेणेकरून साधू संतांच्या सोबतीने आपल्याला ओर्च्छाला पोहोचता येईल.
- एकदा आपण ओर्च्छाला पोहोचलो की, मीच ओर्च्छाचा राजा असेन.
- तुम्ही ज्या ठिकाणी मला पहिल्यांदा जमिनीवर ठेवाल तेच माझ्या वास्तव्याचे कायमस्वरूपी ठिकाण असेल.
प्रभू श्रीरामांच्या दर्शनाने कृतार्थ झालेल्या राणी 'गणेश कुंवरीने' त्यांच्या सर्व अटी मान्य केल्या.
श्रावण शुक्ल पंचमीला पुष्य नक्षत्रावर बालरुपातल्या प्रभू श्रीरामांसह राणी ओर्च्छाला परत येण्यासाठी निघाल्याची बातमी समजताच आनंदित झालेल्या राजा 'मधुकर शहा जुदेव बुंदेला' ह्यांनी श्रीरामांसाठी एक मंदिर बांधण्यास सुरुवात केली. ओर्च्छाला पोचल्यावर दीर्घ प्रवासामुळे थकलेली राणी तिच्या महालात मुक्कामासाठी थांबली आणि कडेवरील रामलल्लांना आपल्या खोलीत ठेऊन स्नानादिकर्मे उरकण्यासाठी गेली. तिसऱ्या अटीनुसार त्यांना ज्या ठिकाणी जमिनीवर ठेवले तेच बालरूप लुप्त होऊन मूर्तिरूप धारण केलेल्या प्रभू श्रीरामांच्या वास्तव्याचे कायमस्वरूपी ठिकाण बनले. तेव्हापासून पूर्वी 'रानी महल' म्हणून ओळखला जाणारा राणीचा महाल 'राम राजा मंदिर' म्हणून ओळखला जाऊ लागला.
बाबराने अयोध्येतील राम मंदिर उध्वस्त केल्यावर नागरिकांनी त्यातल्या अनेक मूर्ती आणि धार्मिक महत्व असलेल्या वस्तू आपल्या प्राणाची बाजी लावून आपल्या घरी सांभाळून ठेवल्या होत्या. प्रभू श्रीरामांची निस्सीम भक्त असलेल्या राणी गणेश कुंवरीने एक गुप्त मोहीम आखून त्यातल्या कित्येक मूर्ती आणि वस्तूंचा संभाव्य विध्वंस टाळण्यासाठी ओर्च्छाला आणून भक्तिभावाने त्यांचे जतन केले होते. त्यात मागच्या भागात उल्लेख केलेल्या जानकी मंदिरात स्थापन केलेल्या अयोध्येत सापडलेल्या सीतेच्या मूर्तींचाही समावेश होता.
सोळाव्या शतकातल्या इतिहासात खरंतर राणी गणेश कुंवरीचे स्थान खूप मानाचे आहे परंतु दुर्दैवाने हे ऐतिहासिक व्यक्तिमत्व कमालीचे दुर्लक्षित राहिले आहे.
ओर्च्छा (टिकमगढ) संस्थानाची राणी 'वृषा भानू' हिने हे जानकी मंदिर नेपाळमध्ये का बांधले ह्याविषयीच्या दोन कहाण्या:
- एकदा राणी वृषा भानू नेपाळमध्ये गेली असताना जनकपूरमध्ये आज ज्या स्थानावर 'जानकी मंदिर' आहे त्या ठिकाणी तिचा तंबूत मुक्काम होता. रात्री तिच्या स्वप्नात सीतामाई आली आणि तिने "हे माझे जन्मस्थान असून तू ह्याठिकाणी माझे मंदिर बांध" असे सांगितले.
- आपला लाडका पुत्र कुठलासा गंभीर आजार होऊन कुठल्याही औषधोपचारांनी गुण येत नसल्याने दिवसेंदिवस प्रकृती खालावत जाऊन मरणासन्न अवस्थेत पोचला असताना राणी वृषा भानूने ओर्च्छाचे आराध्य दैवत असलेल्या 'राम राजांना' "आपल्या पुत्राच्या प्रकृतीस आराम पडण्यासाठी सीतामाईच्या जन्मस्थानी तुमच्या सारखेच महालसदृष्य भव्य मंदिर उभारून त्यात राणी 'गणेश कुंवरीने' अयोध्येतुन सुरक्षितपणे आणून राजघराण्याच्या पिढीजात संग्रहात सांभाळून ठेवलेल्या सीतेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा" नवस केला होता.
राम राजा तिच्या नवसाला पाऊन तिचा पुत्र त्या गंभीर आजारातून बरा होऊन त्याचा जीव वाचल्याने राणी वृषा भानूने नेपाळमधील जनकपूर ह्या सीतेच्या जन्मस्थानी हे मंदिर बांधले.
वरील दोन कहाण्यांपैकी पहिली कहाणी काल्पनिक तर दुसरी ओर्च्छातली 'राम भक्ती' आणि 'गणेश कुंवरी'चा इतिहास पाहता तर्कशुद्ध आणि अधिक विश्वसनीय वाटते, खरे खोटे देव जाणे!
असो, खालचा ओर्च्छाच्या राजघराण्याचे पिढीजात वास्तव्य असलेला ओर्च्छाच्या किल्याचा आणि राम राजा मंदिराचा एकत्रित फोटो पाहिल्यावर तिथे सोळाव्या शतकापासूनच रुळलेल्या मुघल वास्तुकलेचा प्रभाव पडलेल्या बुंदेली-राजपूत आणि मैथिली अशा मिश्र वास्तूशैलीत हे महालसदृष्य जानकी मंदिर बांधल्याचे लक्षात येते, अर्थात विसाव्या शतकात हे मंदिर बांधताना संगमरवराचा अधिक वापर केल्याने पूर्वी दगडाचा वापर करून बांधलेल्या वास्तुंपेक्षा हे अधिक इस्लामी पद्धतीचे वाटते ह्यात शंकाच नाही!
हनुमान मंदिरात दर्शन घेतल्यावर जानकी मंदिराच्या मागच्या बाजूला पायी दीड-दोन मिनिटांच्या अंतरावर असलेला 'राम जानकी विवाह मंडप' पाहायला आम्ही निघालो.
वास्तविक राम-सीतेचा विवाह संपन्न झालेला पौराणिक 'मणी मंडप' तीनेक किमी अंतरावर असताना आधुनिक काळात हा वेगळा 'विवाह मंडप' बांधण्याचे काय प्रयोजन असावे हे समजले नाही, कदाचित विवाह सोहळ्यातले काही विधी ह्याठिकाणी झाले असावेत असा आपला एक अंदाज!
छानशा बगीच्यामध्ये पॅगोडा शैलीत बांधलेल्या ह्या संगमरवरी विवाह मंडपात मध्यभागी विवाह प्रसंगीच्या राम-सीतेच्या आणि त्यांच्या दोन्ही बाजूंना बसलेल्या ऋषीमुनींच्या आणि काही पौराणिक पात्रांच्या मूर्ती आहेत.
विवाह मंडप पाहून झाल्यावर तिथून साधारण अर्धा किलोमीटर अंतरावरच्या राम मंदिराच्या दिशेने आमची सात-आठ मिनिटांची पदयात्रा सुरु झाली.
जनकपूरमधील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक असलेले हे राम मंदिर सतराव्या शतकात 'अमरसिंह थापा' ह्या गोरखाली सेनापतीने नेपाळमधील इतर देवस्थानांप्रमाणेच पारंपारिक पॅगोडा शैलीत बांधले आहे. 'रामनवमी' आणि घटस्थापनेपासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत १५ दिवस साजरा केला जाणारा नेपाळ मधील सर्वात मोठा वार्षिक उत्सव असलेल्या 'दशैन' ह्या दोन प्रसंगी मंदिरात यात्रेकरूंची प्रचंड गर्दी असते.
प्रसन्न वातावरणात विलक्षण शांततेची अनुभूती देणाऱ्या ह्या मंदिर परिसरात थोडावेळ बसून भुकेची जाणीव व्हायला लागल्यावर दोन-सव्वा दोनच्या सुमारास आमाच्या हॉटेलवर परतल्यावर तिथल्याच उपहारगृहात तीन भाज्या, डाळ-भात, चटणी, कोशिंबीर,पापड अशा पदार्थांचा समावेश असलेल्या 'नेपाळी भोजनाचा' आस्वाद घेतला. भाता पेक्षा पोळी/फुलके हे मुख्यान्न असलेल्या माझ्यासारख्याला तिखट चवीचे जेवण आवडले असले तरी पोळी/फुलके/तंदूर रोटीचा अभाव जाणवल्याने समाधान झाले नाही!
जेवण झाल्यावर रूमवर येऊन थोडावेळ टीव्ही बघत लोळत पडून आराम केल्यावर साडे चारच्या सुमारास हॉटेलच्या व्यवस्थापकाने दीड तासासाठी ६०० नेपाळी रुपये अशा भाड्यात ठरवून दिलेल्या ई-रिक्षाने साधारण तीनेक किमी अंतरावर असलेला 'मणी मंडप' पाहायला निघून दहा एक मिनिटांत त्याठिकाणी पोचलो.
त्रेता युगात राम आणि सीतेचा विवाह ह्या ठिकाणी संपन्न झाला होता अशी पौराणिक-धार्मिक मान्यता असलेल्या ह्या स्थानावर प्राचीन वास्तू किंवा त्यांचे अवशेष दृष्टीस पडत नाहीत, पण शहराबाहेर असल्याने इथले शांत-रम्य वातावरण, प्राचीन मणी मंडपाच्या (विवाह मंडप) जागी नव्याने बांधलेलया मंडपात स्थापन केलेली श्री राम-जानकीची मूर्ती, त्याच्या डाव्या बाजूचे हनुमान मंदिर, समोर असलेला तलाव आणि तलावाकाठचे शिव मंदिर अशा गोष्टी एक वेगळीच प्रसन्न अनुभूती देतात!
हनुमान मंदिराची दर्शनी बाजू वगळता गाभाऱ्याच्या बाहेरील तीन भिंतींवर 'हनुमान चालीसा', 'संकटमोचन हनुमानाष्टक' आणि 'श्री बजरंग बाण' अशी स्तोत्रे/दोहे लिहिलेली आहेत. तोपर्यंत पूर्वी कॅसेट्सवर, मग एम पी थ्रीवर, काहीवेळा मंदिरांत स्पीकरवर आणि गेल्या काही वर्षांपासून युट्युबवर ह्यांचे श्रवण अनेकदा केले आहे, परंतु त्यादिवशी पहिल्यांदाच हि स्तोत्रे/दोहे 'वाचली' आणि "अमुक ठिकाणी तमुक केल्यास किंवा नुसते गेल्यासही व्हायब्रेशन्स जाणवतात" वगैरे गोष्टी ऐकून होतो, पण ते नक्की काय असते ह्याचा अनुभव मात्र त्या दिवशी मिळाला. अर्थात कदाचित ते माझ्या 'मनाचे खेळ' असू शकतील, पण जे काही अनुभवले ते वर्णनातीत होते एवढे नक्की!
मणी मंडपासमोरील तलाव आणि शिव मंदिर ▼
तलावाकाठच्या शिवमंदिराच्या शेजारीच एक आश्रम होता आणि तिथे एक व्यक्ती उंटाच्या चार-पाण्याची व्यवस्था बघत होता. नेपाळमध्ये आणि तेही आश्रमात उंट बघून थोडे आश्चर्य वाटले होते. तो मनुष्य "उंट कि सवारी, हलकी हो या भारी, बीस रुपैये सवारी, जनहित मैं जारी..." छाप फेरीवाला तर नक्कीच वाटत नव्हता म्हणून त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा कळले कि तो मूळचा राजस्थानचा रहिवासी असून आठेक वर्षांपूर्वी तरुण वयातच संन्यास घेतल्यानंतर 'वीरू' नावाच्या आपल्या लाडक्या उंटाच्या पाठीवर आवश्यक तो शिधा, तंबू, जरूरीपुरते किरकोळ सामान आणि वस्त्रे लादून त्याच्यासमवेत पायी पदभ्रमण करत भारतातलया सर्व तीर्थक्षेत्री जाऊन आल्यावर आता नेपाळ मधल्या तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी सीमोल्लंघन करून इथे आला आहे.
'विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर' हि म्हण लहानपणापासून ऐकत आलो आहे, त्याच धर्तीवर ह्या 'संन्याशाचे बिऱ्हाड उंटावर' असल्याचे पाहून त्याच्या पायी तीर्थयात्रेची कमाल वाटली!
असो, तासाभरात मणी मंडप आणि आजूबाजूचा परिसर निवांतपणे बघून आम्ही तिथून निघालो आणि पावणे सहाच्या सुमारास पुन्हा हॉटेलवर पोचलो. वडिलांना रूममध्ये आराम करण्यासाठी सोडून मी आणि भाचा काल रक्षाबंधन निमित्ताने जनकपुरमधली बरीचशी दुकाने बंद असल्याने राहून गेलेली नेपाळी सिम कार्ड्स आणि अन्य काही किरकोळ वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गेलो.
अर्ध्या-पाऊण तासात आमची जुजबी खरेदी आटोपल्यावर आमच्या 'हॉटेल विवान'च्या रूफ टॉप बार अँड रेस्टोरंट मध्ये जाऊन 'ब्लॅक ओक' ह्या नेपाळच्या स्थानिक प्रीमियम व्हिस्कीचा स्प्रिंग रोल्स आणि सी.सी.पी. च्या साथीने निवांतपणे आस्वाद घेत बसलो. आठच्या सुमारास वडिलांना कडक-चिवट पदार्थ चावण्यास त्रास होत असल्याने त्यांच्यासाठी आपल्या खिचडीशी मिळता-जुळता एक नेपाळी पदार्थ (ज्याचे नाव आता विसरलो) थोडा मऊसर बनवण्याची सूचना देऊन रूममध्ये पाठवून दिला.
आपली 'ॲपल सायडर' संपवून संथपणे चाललेला माझा 'कार्यक्रम' कधी आटपतो ह्याची वाट बघत मला कंपनी देत बसलेल्या भाच्याच्या संयमाचा अंत न पाहाता साडे आठच्या सुमारास त्याच्यासाठी व्हेज तर माझ्यासाठी चिकन हक्का नूडल्सची ऑर्डर देऊन खान-पान उरकून सव्वा नऊच्या सुमारास आम्ही रूमवर परतलो.
दुसऱ्या दिवशी काठमांडूला जाण्यासाठीची 'बुद्धा एअरवेज'ची आमची फ्लाईट दुपारी पावणे तीनची होती त्यामुळे सकाळी लवकर उठण्याचीहि घाई नव्हती आणि केवळ १ तास आधी म्हणजे पावणे दोन पर्यंत एरपोर्टवर पोहोचायचे असल्याने सामानाची आवरा-आवरी वगैरे करायलाही मुबलक वेळ हाताशी होता. वडील रोजच्या सवयीने दहाच्या सुमारासच झोपले होते. मोबाईलवर 'मांगा' वाचता वाचता भाच्यालाही झोप लागली होती. साडे बारा - पाऊण वाजेपर्यंत टिव्ही वर चित्रपट/गाणी बघून मी पण निद्रादेवीच्या स्वाधीन झालो.
दुसऱ्या दिवशी आम्ही उशिरा म्हणजे साडे दहाच्या सुमारास उठलो तेव्हा सकाळी लवकर उठणारे वडील जानकी मंदिरात जाऊन परत येताना नाश्ता करूनच आले होते. गर्दी नसल्याने मनासारखे दर्शन आणि संपूर्ण मंदिर पाहण्यात त्यांचे दोनेक तास मजेत गेल्याने स्वारी खुश होती! चांगलीच भूक लागली असल्याने पटापट ब्रश करून आम्ही दोघे परवा गेलो होतो त्याच अगदी जवळच्या उपहारगृहात जाऊन छोले-भटुरे-जिलबी असा मालकाने सुचवलेला नाश्ता केला. भटुरे आणि जिलबी एकदम मस्त होती पण 'छोले' म्हणून कबुली चण्यांच्या जागी हिरवे वाटणे वापरलेले बघून गंमत वाटली, अर्थात चवीला तेही चांगलेच लागले ह्यात वाद नाही.
दणदणीत नाश्ता झाल्यावर रूमवर परतून आमच्या आंघोळी-पांघोळी आणि सामानाची आवरा-आवर उरकल्यावर एकच्या सुमारास कालच्याप्रमाणेच हॉटेल व्यवस्थापकाने ४५० नेपाळी रुपये भाड्यात ठरवलेल्या ई-रिक्षाने हॉटेलपासून सुमारे तीन किमी अंतरावर असलेल्या जनकपूर एरपोर्टवर पोचलो.
छोट्याशा जनकपूर एरपोर्टवर वेळेआधीच पोचल्याने सुरक्षा तपासणी सुरु होईपर्यंत सुमारे पाऊण तास वाट पाहावी लागली. बोर्डिंग गेट उघडल्यावर मात्र चालत चालत विमानापर्यंत पोचण्यास पाच मिनिटेही लागली नसतील.
सर्व प्रवाशांचे बोर्डिंग झाल्यावर तीन वाजता म्हणजे निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने विमान काठमांडूच्या दिशेने झेपावले...
तळटीप: ओर्च्छा येथील किल्ला आणि राम राजा मंदिराचे फोटोज जालावरून साभार. ह्या मालिकेचे पहिले दोन भाग प्रकाशित केल्यावर पुढचे भाग टाकण्यात खंड पडण्यामागे एक तांत्रिक समस्या होती, परंतु वेळीच त्या समस्येचे वेमांकडून निराकरण करून घेण्यात मी कुठेतरी कमी पडलो हा सर्वस्वी माझाच दोष असल्याने पुढील भाग टाकण्यास झालेल्या दिरंगाईसाठी मनापासून दिलगीरी व्यक्त करतो 🙏
क्रमश:
छान माहिती.
छान माहिती.
वाचतोय.
पुढील भाग लवकर टाका आता