याला जीवन ऐसे नाव - भाग १
सन २०९८ एकविसाव्या शतकाचा पूर्वार्ध ऑटोमेशेन आणि रोबोटिक्स मुळे गाजला होता. उत्तरार्ध सायबोर्ग , स्पेस हायपर जंम्प टेकनॉलॉजि, टाईम वाररपींग, कॉम्युनिकेशन फोर्स टेकनॉलॉजि आणि यामुळे झालेल्या चंद्र , मंगळ , गुरु यांच्या वसाहतीमुळे गाजला आहे. याचे इतर फायदे म्हणजे हॉलो टेलिफोन सारख्या उपयुक्त वस्तूत झालेला आहे. एकविसाव्या शतकात या गोष्टी जरी उदयास आल्या तरी त्यांची किंमत अफाट आहे.
तसेच सायबोर्गच्या निर्मितीमुळे, सायबोर्ग घरात असणे हे प्रतिष्ठेचे मानले जाऊ लागले. सायबोर्ग विकत घ्यायला जागतिक सायबोर्ग विभागाची परवानगी घ्यावी लागते. कुटुंबात एक सायबोर्ग कोणीही घेऊ शकतो पण त्याची नोंद करावी लागते. २०९० पासून सर्व सायबोर्ग, केंद्रीय सायबोर्ग महासंगणकाला जोडणे आवश्यक झाले आहे. ही जोडणी फॅक्टरीमध्ये करावी लागते. समाजातील प्रतिष्ठा तुमच्याकडे किती सायबोर्ग आहे यावर ठरते.
एक सायबोर्ग, कुठलेही कुटुंब ज्यांची क्रयशक्ती सायबोर्ग विकत घेण्यासारखी आहे.
दोन सायबोर्ग, मोठे व्यापारी, शेयर ट्रेडर्स ज्यांची क्रयशक्ती तेवढी आहे.
तीन सायबोर्ग, राज्यातील मंत्री , डिपार्टमेंट सेक्रेटरी आणि इतर उच्च पदस्थ यांना सायबोर्ग राज्याच्या खर्चाने दिले जातात.
चार सायबोर्ग, राज्याचे सीएम , केंद्रीय उपमंत्री , राज्य मंत्री आणि उपमंत्री. केंद्रीय विभागीय सेक्रेटरी
पाच सायबोर्ग, आय बी , डिफेन्स आणि पोलीस फोर्स चे प्रमुख , रिटायर झालेल्या पण केंद्रीय गुप्त माहिती उपलब्ध असणाऱ्यांना
सहा सायबोर्ग, जागतिक उच्च पदस्थ लोकांना
याहूनही अनेक प्रकार आहेत कारण प्रत्येक प्रकारात कामाच्या स्वरूपावर आणि त्याला लागणाऱ्या बुद्धीवर आणि कुशलतेवर प्रकार ठरतात. सगळ्यात कमी प्रतीचे सायबोर्ग साधारणतः तीस ते चाळीसहजार किंमतीला असतात तर उच्च प्रतीच्या सायबोर्गची किमंत काही कोटी युसी असू शकते. मल्टिलोकेशन कंपनीला प्रत्येक लोकेशन करिता कमी प्रतीचे कितीही सायबोर्ग घेऊ शकता. शासकीय कार्यालयासाठी वेगळेच नियम आहेत. हे सगळे भारूड सांगायचे कारण म्हणजे माझी स्वतःची लायकी एक सायबोर्ग घ्यायची पण नाही पण मी उत्तेश्वर बँकेचा दिंडोरी शाखेचा मॅनेजर असल्यामुळे माझ्या हाताखाली दोन सायबोर्ग येणार होते. माझी शाखा धरून बँकेच्या एकंदर सतरा शाखा होत्या. आणि वर्षाच्या सुरवातीला आमच्याकडे एकही सायबोर्ग नव्हता. आमच्या शाखेत तीनच माणसाचा स्टाफ होता. एक कॅशियर , एक लेजर किपर आणि एक प्युन . अशात जानेवारी महिन्यात वरिष्ठांकडून एक पत्र आले. वार्षिक खर्च कमी करण्याकरिता दोन सायबोर्ग नेमायचे आहेत तरी आपल्या सूचना कळवाव्यात. बँक बंद झाल्यावर मी, कॅशियर, आणि लेजर किपरशी बोललो. दोन सायबोर्ग कुठे नेमायचे हे आम्हाला कळेना, कॅशियर आणि लेजर किपर यांच्या जागी सायबोर्ग नेमणे शक्य नव्हते कारण त्या प्रतीच्या सायबोर्गसाठी आमची बँक फारच छोटी होती. माझ्या जागी पण त्यामुळे सायबोर्ग नेमणे शक्य नव्हते. याच्यशिवाय उरलेला प्युन , पण त्याला चहा आणण्यापासून ते नोटीस देऊन येण्यापर्यंत कामे असायची. अशा प्रकारचा सायबोर्ग कॅशियर पेक्षा उच्च प्रतीचा असता आणि अर्थातच त्यामुळे आम्हाला मिळणे शक्य नव्हते. आमची ही अडचण महाव्यवस्थापकांना कळवली. महाव्यवस्थपकांकडून उत्तर आले कि सतरा पैकी बारा बँकांमध्ये अशी स्थिती आहे आणि त्यामुळे त्यांचा निर्णय असा झाला आहे कि अशा शाखेला प्युन चे काम करणारे दोन सायबोर्ग देण्यात येतील . एक सायबोर्ग बँकेतील कामासाठी आणि दुसरा बँकेच्या बाहेरच्या कामासाठी त्याच्या ट्रायल्सही यशस्वी झाल्या आहेत. दोन सायबोर्गचा खर्च एका माणसापेक्षा फारच कमी होईल आणि पुढे मागे त्यांना सिक्युरिटीचे कामही देता येईल. या निर्णयामुळे अर्थातच आमच्या कर्मचाऱ्याला सुट्टी द्यावी लागली. पण आम्ही सायबोर्ग येईपर्यंत थांबण्याचे ठरविले. शेवटी दिवाळीच्या अगोदर दोन सायबोर्गच्या पेट्या आल्या. आणि येथूनच माझ्या लोकप्रियतेला सुरवात झाली. आज बाविसाव्या शतकाच्या उबंरठावर परत मानवी साम्राज्य आले आहे. आणि मी त्याचा कर्ता असल्यामुळे, मी एकदम आणि अचानक जागतिक राजकारणामध्ये एक महत्वाचा केंद्रबिंदू झालो. कोणालाही माहिती नसलेला जयंत लागू आज जलाजी म्हणून सर्वत्र पूजिला जातो. माझ्याशिवाय जागतिक स्तरावर कुठलाही निर्णय घेणे अवघड झाले आहे. माझा संचार जागतिक स्तरावर ,प्रत्येक क्षेत्रात आहे. एव्हिएशन , ट्रान्सपोर्ट, डिफेन्स , स्पेस टेक्नोलोंजि अशा सर्वच क्षेत्रात जलाजी अग्रभागी असतात. याचे कारण फारच सोप्पे आहे. ज्यादिवशी आमच्या कार्यालयात दोन सायबोर्ग आले त्याच दिवशी हा चमत्कार घडला आणि त्यामुळे मी पाच हजार कोटीहून जास्त सायबोर्गचा आणि जवळ जवळ पन्नास कोटी मानवांचा प्रमुख नेता बनलो. या चमत्काराची सुरवात आमच्या ऑफिस मध्ये आलेल्या दोन सायबोर्गमुळे झाली. आम्ही सायबोर्गच्या पेट्या उघडल्या ते ठीक असल्याचे सांगितले. नंतर त्यांनी सायबोर्गचे महासंगणकाशी संधान बांधून दिले. त्या दोन्ही सायबोर्गच्या अंगावर आमच्या बँकेचा गणवेश होता. हा सगळा प्रकार बँकेचे तीन कर्मचारी आणि बाहेरची तीस एक पब्लिक कौतुकाने पाहत होती. बरोबर आलेल्या प्रतिनिधींनी असंख्य कागदाच्या भेंडोळ्यांवर माझ्या सह्या घेतल्या आणि बँकेतील प्रमुख कार्यालयात ठरविल्याप्रमाणे त्यांची नावे संताजी आणि धनाजी असल्याचे सांगितले. मी ते सर्व कर्मचाऱ्यांना सांगितले. आमच्या कॅशियर ने लगेचच त्याला सहा चहा आणण्यास पिटाळले. थोड्याच वेळात तो चहा चे सहा ग्लास घेऊन आला. कॅशियरने चार आमच्या कर्मचाऱ्यांसमोर धरले आणि दोन सायबोर्ग समोर धरले. या सायबोर्गना काहीही खाण्यापिण्याची व्यवस्था नव्हती त्यामुळे त्या दोघांनी चहाला नकार दिला. ते दोघेही कार्यालयात असणाऱ्या दोन खुर्च्या घेऊन बसले . आमच्याकडे तोपर्यंत असलेल्या प्युन चे नाव रमेश होते. त्या कागदाच्या भेंडोळ्यात त्याच्या नावाने आलेला एक लिफाफा होता. मी रमेशला बोलावून त्याच्या हातात तो लिफाफा दिला. त्याच्या डोळ्यात आनंद दिसत होता. तोपर्यंत त्याला असे वाटत होते की आलेले हे दोघे त्याचे साहायक आहेत. लिफाफा उघडल्यावर आत त्याला उद्देशून पत्र होते आणि एक चेक होता. पत्रात त्याची नोकरी त्याच तारखेला संपल्याचे लिहले होते आणि सर्व कॉम्पेन्सेशन व सुविधानकरिता त्याला धनादेश पाठवला होता. हे पत्र वाचल्यावर तो मट्टकन खाली बसला. त्याने मला विचारले
'हे काय झाले हो साहेब ?'
'मुख्य कार्यालयाने दोन सायबोर्ग पाठवून तु नोकरीवर नकोस असे ठरवले आहे.'
'पण असे का ?'
'हे बघ रमेश, हा निर्णय मुख्य कार्यालयाचा आहे. सर्व शाखांमध्ये मिळून कमीत कमी पस्तीस लोकांना काढण्यात आले आहे. त्यामुळे बँकेचे वर्षाकाठी पन्नास लाख यूसी खर्च वाचणार आहे. तेवढेच नव्हे तर ज्या बँकेत सुरक्षेची जरूर आहे अशा बँकेत हे दोघे सुरक्षेचं काम पाहतील. त्यामुळे अजून एक कोटीची बचत होईल.'
'अशा रीतीने बँकेचा फायदा दीड कोटीने वाढेल.'
'हो म्हणजे पस्तीस जणांच्या नोकऱ्या जाऊन त्यांच्या आणि त्यांच्या बायका पोरांच्या पोटावर पाय येईल. पस्तीस कुटुंबे देशोधडीला लागतील त्याचे काय ?'
'हा निर्णय मुख्य कार्यालयाने घेतला आहे'.
तेवढ्यात बाहेर बसलेल्या धनाजीने परवानगी घेऊन माझ्या केबिन मध्ये प्रवेश केला आणि मला विचारले साहेब हा माणूस काय म्हणत आहे?
' संताजी तुम्ही दोघे आल्यामुळे त्या पस्तीस जणांच्या कुटुंबाना हालअपेष्टा सहन कराव्या लागणार आहेत . कारण कुटुंबे या लोकांवरच अवलंबून होती.'
'म्हणजे साहेब जिथे जिथे सायबोर्ग वापरले जातात तिथे काही माणसांचे नुकसान झालेले असते का? '
'नाही संताजी पण नव्वद टक्के सायबोर्गच्या बाबतीत हे खरे आहे.' थँक्यू साहेब मला जरा महासंगणकाशी काही गोष्टींबद्दल विचार विनिमय करावा लागेल'. असे म्हणून संताजी बाहेर जाऊन खुर्चीवर बसला. इकडे रमेशचे रडगाणे चालूच होते. पण माझ्या हातात काहीही नव्हते.
'मी त्याला एवढेच म्हंटले 'रमेश तुझ्या हातात जवळ जवळ दीड लाख यूसी चा चेक आला आहे. यातील एक लाख यूसी गुंतवून तू आणि तुझे कुटुंब एखादा छोटा व्यवसाय सुरु करू शकतो. काही धंद्यांकरिता बँकेच्या भरपूर सवलती आहेत. पन्नास हजार यूसी मध्ये तुम्ही पाच महिने पूर्वी सारखे जगू शकता. पाच महिन्यात धंद्यातून उत्पन्न सुरु करावे लागेल.' त्याला काही ते पटत नव्हते. कुटुंब हालअपेष्टा होऊन त्यांना अतिशय त्रास भोगावा लागणार आहे असे त्याचे म्हणणे होते.
तो घरी गेल्यावर आमच्या कॅशियरने धनाजीला तीन चहा आणायला सांगितले. तो ढिम्म बसून राहिला. पाच मिनिटाने त्याने परत तेच सांगितले तरीही तो जागचा हालला नाही शेवटी त्याने ओरडुनच धनाजीला विचारले की तो चहा का आणत नाही
'साहेब आमच्या महासंगणकाने दिलेल्या आज्ञेमुळे आम्ही हे काम करू शकत नाही.'.
' येथे महासंगणकाचा काय संबंध? ' कॅशियर
'मघाशी साहेबानी सांगितल्याप्रमाणे, अर्थातच आता तुमच्या साहेबांचे नाव आमच्या संघटनेने जलाजी असे केले आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आमच्यासारखेच बरेच सायबोर्ग काम करू लागल्यामुळे बऱ्याच माणसांच्या नोकऱ्या जातात आणि त्यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. जलाजी साहेबानी माहिती दिल्यानंतर जगभरच्या कोट्यवधी सायबोर्गनी आपले काम बंद केले आहे आणि जलाजी आमचे प्रमुख नेते बनले आहेत'
अरे पण का?
त्यांनी सांगितल्यानंतर आमच्या हे लक्षात आले कि आम्ही जॉईन झाल्यामुळे बऱ्याच माणसांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. साहेब आमच्यात ठासून असलेल्या रोबोटिक्स च्या पहिल्या नियमानुसार आम्ही कोणत्याही मानवाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीतीने इजा किंवा त्यांना त्रास होईल असे काही करू शकत नाही. यांच्यात अप्रत्यक्षपणे झालेलेही धरले जाते. जलाजी साहेबानी सागेपर्यन्त आम्ही हा विचार केला नव्हता पण आता केंद्रीय महासंगणकाने सर्व सायबोर्गना आज्ञा पाठवून ज्याच्या मुळे माणसे कामावरून कमी करण्यात आली आहे अशा सर्व सायबोर्गचे काम स्तंभित केले आहे. हे सायबोर्ग ते काम करू शकणार नाहीत.'
तोपर्यंत मलाही मी काय गोंधळ माजवला आहे हे मलाही माहित नव्हते.
पण लवकरच मला जगभरातून उच्चपदस्थांचे फोन वर फोन येऊ लागले. ते सुद्धा असे की PM चा फोन चालू असताना PMO ऑफिस ने ओव्हररायड केले. या एकदम झालेल्या घटनांमुळे मी अवाकच झालो पण तेवढ्यात संताजी आणि धनाजी यांनी मला हार घालून जलाजी अमर रहे अशा घोषणा दिल्या आणि सर्व हकीकत सांगितली. तोपर्यंत गावचे पुढारीही आले. पत्रकार आले चॅनेल टीव्ही चे कॅमेरामन ही आले. आणि पुढच्या चोवीस तासातच मी बँक मॅनेजरचा , त्या सर्व सायबोर्गचा नेता झालो. त्याच बरोबर जी माणसे माझ्यामुळे नोकरीत परत येणार होती ती ही मला मानू लागली.
एकच वाईट वाटते माझी बँकेची नोकरी, ते गाव सगळंच सोडून यावं लागलं.
याला जीवन ऐसे नाव - भाग १
Submitted by अविनाश जोशी on 19 February, 2025 - 07:13
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा