शेवटचा दिस गोड व्हावा...

Submitted by प्रकाश घाटपांडे on 19 February, 2025 - 06:26

शेवटचा दिस गोड व्हावा... या डॉ अनिल जोशी यांच्या पुस्तकात शीर्षकावरुनच वाचकांना कल्पना येते की पुस्तक कोणत्या विषयवरील आहे. डॉ अनिल जोशी हे पंढरपूर येथील नगरपरिषदेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून निवृत्त झाले. त्यांनी बी.जे मेडिकल महाविद्यालयात न्यायवैद्यकशास्त्राचे अधिव्याखाता म्हणून ही काम केले. त्यामुळे मृत्यू या विषयाशी घनिष्ट संबंध त्यांनी मानवी नात्यांच्या गुंतागुंतीत सहृदयतेने पाहिला. त्यातूनच त्यांना या विषयावर पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली.
त्यामागील भूमिकेत ते म्हणतात,"मरणप्राय वेदना सहन करत मरणाची वाट पाहणारे असे असंख्य रुग्ण आपण पाहतो. अशा प्रसंगी किंवा अशा एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर आपण पटकन 'बरं झालं, सुटका झाली!' अशी प्रतिक्रिया देतो. ही सुटका निसर्ग म्हणजेच इतर कोणीतरी करते. समजा अशी सुटका करण्याचा कायदेशीर हक्क तो रुग्ण किंवा त्या रुग्णाचे आरोग्यविषयक निर्णय घेणारी परिसंस्था यांना उपलब्ध झाला तर काय होईल? नेमका हाच विचार लोकांसमोर मांडणे ही हे पुस्तक लिहिण्यामागची माझी भूमिका आहे"
पुस्तकाला प्रस्तावना सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ प्रसन्न दाभोलकर यांची आहे. इच्छामरणाचा विषय निघाला की आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर दुर्धर आजाराने ग्रासलेला, उपचाराची हद्द गाठलेला आणि असहायपणे वेदना सहन करीत मृत्यूची वाट बघणारा माणूस येतो.आपला मृत्यू वेदनारहित व्हावा, आपल्याला अंथरुणावर खितपत पडून राहावे लागू नये, आपल्या मृत्यूनंतर 'सुटला अखेरीस' किंवा 'आपली सुटका झाली' असा विचार कोणाच्या मनात येऊ नये अशी आपणा सर्वांचीच इच्छा असते; परंतु असे सुदैवी थोडेच असतात. आपला मृत्यू कसा होईल हे आज आपल्या हातात नाही; परंतु या मृत्यूकडे न घाबरता शांत चित्ताने कसे जावे याबाबत आपले मन तयार करणे नक्कीच आपल्या हातात आहे. यासाठी जी माहिती असावी लागते ती या पुस्तकात सविस्तर आली आहे. पुस्तकात डॉ प्रसन्न दाभोलकरांची सुखांतपत्र अशी एक मराठी गझल आहे. पुस्तकात ही लेखकाने साहित्यिक कवी यांच्या लेखनाचे समयोचित संदर्भ दिले आहेत. त्यामुळे ते जरा रुक्ष होण्यापासून वाचले आहे.
विषय प्रवेश, इच्छामरणाचा इतिहास, इच्छामरण हवे की की नको? इच्छामरणाचे विविध पातळ्यावरील अनुभव, इच्छामरणाचे भवितव्य अशा प्रकरणांमधे जगात घडलेल्या माहितीचा संक्षिप्त आढावा घेतला आहे. संपूर्ण पुस्तकात इच्छामरण हा शब्द दयामरण ( passive euthanasia) अशा अर्थाने घेतला आहे.
इच्छामरणाबाबत तत्कालीन समाजात नकारात्मक मत होण्याच्या विविध कारणांमध्ये हिटलरच्या नाझी राजवटीत या शब्दाचा आधार घेत केली गेलेली ज्यू लोकांची निर्मम कत्तल हेदेखील एक महत्त्वाचे कारण आहे. नाझी राजवटीचा काळ हा मानवी इतिहासातील एक अत्यंत वाईट आणि अमानुष काळ होता. या काळात लाखो निर्दोष लोकांचा बळी घेतला गेला. नाझी लोकांनी केलेल्या विविध अत्याचारांमध्येच या 'युथनेशिया' कार्यक्रमाचा समावेश होता. युथनेशिया हा नाझींचा एक गुप्त कार्यक्रम होता ज्यामध्ये अपंग, आजारी आणि मनोरुग्ण लोकांना तथाकथित 'दयामृत्यू' देण्यात आला. हा कार्यक्रम १९३९मध्ये सुरू झाला आणि १९४५मध्ये नाझींचा पराभव होईपर्यंत तो चालू होता. या कार्यक्रमात अंदाजे दोन लाख लोकांना मारण्यात आले. या लोकांना गॅस चेंबर्स, प्राणघातक औषधे आणि इतर अमानुष पद्धतींनी मारण्यात आले. याची माहिती लेखकाने दिली आहे.
असाध्य आजाराने ग्रस्त रुग्णाला वेदनेतून मुक्त करून जीवन संपवण्याचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार अप्रत्यक्ष मदतीचा आहे. यामध्ये रुग्णाचे आयुष्य लांबविणारे उपचार बंद केले जातात. मुख्यत्वेकरून कृत्रिम श्वसनयंत्रणेचा वापर थांबवला जातो आणि मग रुग्ण आजाराच्या नैसर्गिक प्रक्रियेमुळे मरण पावतो.. अप्रत्यक्ष मदतीतून झालेला मृत्यू म्हणजे अप्रत्यक्ष इच्छामरण (Passive Euthanasia); तर डॉक्टरांच्या सहेतुक कृतीने झालेला मृत्यू म्हणजे प्रत्यक्ष इच्छामरण (Active Euthanasia) हा दुसरा प्र्कार. डॉक्टरांच्या मदतीने केली गेलेली आत्महत्या हा अर्थातच सक्रिय इच्छामरणाचा एक उपप्रकार समजला पाहिजे. इच्छामरणाच्या विविध प्रकारांबद्दल पुढे सविस्तर विवेचन पुस्तकात केले आहे.

इच्छामरणाचा इतिहास
आपली घटना भारतीय नागरिकाला 'जगण्याचा हक्क' देते. भारतीय राज्यघटनेच्या कलम २१ अनुसार भारतीय नागरिकाला हा जगण्याचा हक्क मिळतो.
हे कलम शब्दशः, 'Protection of life and personal liberty : No person shall be deprived of his life or personal liber- ty except according to procedure established by law.' आहे.
भारतीय नागरिकाचे आयुष्य किंवा जगणे सुसह्य व एका विशिष्ट दर्जाचे किंवा गुणवत्तेचे असावे असे यात अभिप्रेत आहे. कायदेशीर अन्वयार्थ हा किचकट विषय आहे.म्हणून तर अरुणा शानभाग प्रकरणात जैसे थे भुमिका न्यायालयाने घेतली होती.
एका विशिष्ट क्षणाला या ज्येष्ठ व्यक्ती वेदनांनी किंवा आजारांच्या वेगवेगळ्या गुंतागुंतींनी परावलंबी झाल्या की या व्यवस्थादेखील काहीशा हतबल होतात व प्रसंगी अपुऱ्या पडतात. अशा प्रसंगी काय करायचे या प्रश्नाला भिडून त्याचे मानवीय उत्तर शोधायची वेळ आता आली आहे.
आणखी एक मुद्दा येथे स्पष्ट केला पाहिजे : इच्छामरणाचा प्रश्न हा फक्त वृद्धांचा प्रश्न आहे असे मुळीच नाही. असाध्य आजाराने ग्रासलेल्या कोणत्याही वयोगटातील व्यक्तीसमोर व तिच्या कुटुंबासमोर हा प्रश्न येऊ शकतो. वृद्धांसमोर तो येण्याची शक्यता थोडी अधिक आहे एवढेच. कायदेशीरदृष्ट्या सज्ञान नसलेल्या रुग्णांबाबत हा निर्णय कोणी घ्यायचा हा आणखी एक अवघड कायदेशीर पेच आहे आणि त्यावर अधिक विचार होणे गरजेचे आहे. हे लेखक आवर्जून सांगतो.
वृद्धांची काळजी घेण्यासाठी कोणतीही एकच एक ‘योग्य’ पद्धत नाही. प्रत्येक संस्कृतीची, देशाची व कुटुंबाची आपापली गरज आणि मूल्ये असतात आणि त्यानुसार वेगवेगळ्या व्यवस्था विकसित होतात. अंतिमतः समाजातील वृद्धांची संख्या वाढली की इच्छामरणाचे निर्णय घेण्याची गरजही वाढेल.
इच्छामरण कशासाठी? या प्रश्नाचे थेट उत्तर द्यायचे झाल्यास, आपण गेल्यावर 'सुटलो एकदाचे' असे आपल्याला आणि 'सुटलो एकदाचे' असे भोवतालच्यांनाही वाटू नये म्हणून इच्छामरण, असे म्हणावे लागेल. उत्तर आत्ता काहीसे क्रूर वाटले तरी याबाबतचे विश्लेषण वाचल्यानंतर ते तसे नाही; तर ते सत्याच्या खूप जवळ जाते.
इच्छामरणाचा संकल्प व सिद्धी हे अंतरसुद्धा अतिशय काळजीपूर्वक पार करावे लागणार आहे. इच्छामरणाची प्रक्रिया ही सुनियोजित व वेदनामुक्त असणे ही या सर्व प्रक्रियेची एक महत्त्वाची पूर्वअट आहे. डॉक्टर फिलिप आणि त्यांची 'The Exit International' ही संस्था हा सर्व विषय किती गांभीर्याने घेते हे समजावून घेण्यासाठी त्यांच्या या हस्तपुस्तिकेची सविस्तर माहिती यात दिली आहे. डेरेक हंफ्री यांच्या फायनल एक्झिट या पुस्तकाबद्दल व त्या अनुषंगाने सविस्तर विवेचन यात दिले आहे. पुस्तकात विविध माहितीप्रद कोष्टके दिली आहेत ज्यातून पटकन इच्छामरणाच्या कायद्याची संकलीत माहीती मिळते
परिशिष्टात अद्ययावत स्फुट व संदर्भ दिले आहेत. इच्छामरण या संकल्पनेवर काम करणार्‍या संस्थांची माहिती दिली आहे.डीग्निटस ही स्विझर्लंड मधील संस्था त्यासाठी सहाय्य करते. त्यांच्या पॅकेजचा खर्च अंदाजे दहा लाख रुपये आहे अशी रोचक माहिती त्यात आहे. पुस्तकात काही ठिकाणी विस्कळीत पणा वाटला तरी सुधारित जीवनमूल्य रुजवण्यात पुस्तकाचा फार मोठा वाटा आहे. मलपृष्ठावर अंतर्नाद चे भानु काळे यांची प्रतिक्रिया आहे.
------
शेवटचा दिस गोड व्हावा...
लेखक- डॉ. अनिल जोशी
प्रकाशक- सौ.शुभांगी अनिल जोशी
4649 अ/2 ’अंतर्नाद’
पंढरपूर ता. पो.स्टे मागे
पंढरपुर 413304
संपर्क-9420781943
पहिली आवृत्ती - जानेवारी 2025
पृष्ठे- 144
मूल्य- 200/-

Group content visibility: 
Public - accessible to all site users